आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय ७ वा ज्ञानविज्ञानयोगः
शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 7: DNYAN VIDNYANYOG:
Sartha Dnyaneshwari Adhyay DNYANVIDNYANYOG
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ॥ अथ सप्तमोऽध्यायः – अध्याय सातवा ॥ ॥ ज्ञानविज्ञानयोगः ॥
अध्याय सातवा
श्रीभगवानुवाच :
मय्यासक्तमना: पार्थ योगं युञ्जन्मदाश्रय: ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥7. 1॥
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।
यज्ज्ञात्वा नेहभूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥7. 2॥
1-7
आइका मग तो अनंतु । पार्थाते असे म्हणतु । पै गा तू योगयुक्त । जालासि आता ॥1॥
श्रोतेहो, ऐका. मग श्रीअनंत पार्थाला म्हणाले :- अरे, तू निश्चयेंकरून योगयुक्त झालास.
2-7
मज समग्राते जाणसी ऐसे । आपुलिया तळहातीचे रत्न जैसे । तुज ज्ञान सांगेन तैसे । विज्ञानेसी ॥2॥
आता मी तुला व्यावहारिक (प्रापंचिक) ज्ञानासह ब्रह्मज्ञान अशा रितीने सांगेन की, त्या योगाने, तळहातावरील रत्न आपण पहातो, त्याप्रमाणे तू मला सगळा ओळखशील.
3-7
एथ विज्ञाने काय करावे । ऐसे घेसी जरी मनोभावे । तरी पै आधी जाणावे । तेचि लागे ॥3॥
या ठिकाणी प्रापंचिक ज्ञानाशी काय करावयाचे आहे, असा जर तुझ्या मनाचा ग्रह होईल तर आधी खरोखर तेच समजून घेतले पाहिजे.
4-7
मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरी नाव न ढळे । टेकलीसांती ॥4॥
मग ज्ञानाच्या साक्षात्काराच्या वेळी बुद्धीची नजर थांबते. ज्याप्रमाणे तीराला टेकलेली नाव हालत नाही
5-7
तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउली निघे । तर्कु आयणी नेघे । आंगी जयाचा ॥5॥
त्याप्रमाणे, ज्या ठिकाणी बुद्धिचा शिरकाव होत नाही, विचारही मागे राहतो आणि तर्काचा हुरूप मोडतो, त्यालाच ज्ञान असे म्हणतात.
6-7
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हे विज्ञान । तेथ सत्यबुद्धि ते अज्ञान । हेही जाण ॥6॥
अर्जुना, बाकीची सर्व प्रापंचिक ज्ञाने त्याला विज्ञान असे म्हणतात; आणि प्रपंच खरा मानणे हे खरे अज्ञान होय असे समज.
7-7
आता अज्ञान अवघे हरपे । विज्ञान नि:शेष करपे । आणि ज्ञान ते स्वरूपे । होऊनि जाईजे ॥7॥
आता, सर्व अज्ञान नाहीसे होईल, विज्ञान समुळ जळुन जाईल आणि मुर्तिमंत ज्ञान प्रकट होईल.
8-7
ऐसे वर्म जे गूढ । ते किजेल वाक्यारूढ । जेणे थोडेन पुरे कोड । बहुत मनीचे ॥8॥
ज्याच्या योगाने सांगणाराचे बोलने खुंटते, ऐकणाराची इच्छा कमी होते, आणि अमुक मोठे व अमुक लहान असा भेद रहात नाही;
9-7
जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे । ऐकतयाचे व्यसन तुटे । हे जाणणे साने मोठे । उरो नेदी ॥9॥
व जे थोडे ऐकले असता सुद्धा मनातील पुष्कळ हेतु पुर्ण होतील, ते गुप्त तत्त्व तुला सांगतो.
मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ॥7. 3॥
10-7
पै गा मनुष्यांचिया सहस्रशां- । माजि विपाइलेयाची येथ धिंवसा । तैसेया धिंवसेकरा बहुवसां- । माजि विरळा जाणे ॥10॥
अरे, खरोखर हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा होते, आणि तसेच, ज्ञानाची इच्छा उत्पन्न झालेल्या पुष्कळांत मला तत्त्वतः जाणणारा क्वचितच सांपडतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-7
जैसा भरलेया त्रिभुवना- । आतु एक एकु चांगु अर्जुना । निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ॥11॥
ज्याप्रमाणे मनुष्यांनी भरलेल्या त्रिभुवनांत फौजेमध्ये ठेवण्याकरिता एकेक चांगला शूर निवडून लक्षावधि फौज तयार करितात,
12-7
की तयाहीपाठी । जे वेळी लोह मांसाते घाटी । ते वेळी विजयश्रीयेचां पाटी । एकुचि बैसे ॥12॥
आणि त्यातूनही, ज्या वेळेस तलवारींचे घाव, शरीरावर बसतात त्या वेळेस एखादाच विजयश्रीचा अधिकारी होतो,
13-7
तैसे आस्थेचा महापुरी । रिघताति कोटिवरी । परी प्राप्तीचा पैलतीरी । विपाइला निगे ॥13॥
त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या आस्थेच्या पुरांत कोट्यवधि लोक उड्या टाकतात, परंतु एखादाच तिच्या पैलथडीस जातो. (एखाद्यालाच माझी प्राप्ति होते).
14-7
म्हणऊनि सामान्य गा नोहे । हे सांगता वडील गोठी गा आहे । परी ते बोलो येईल पाहे । आता प्रस्तुत ऐके ॥14॥
म्हणुन, ही सामान्य गोष्ट नसुन मोठी श्रेष्ठ आहे; परंतु ती पुढे सांगता येईल. प्रस्तृत (तुला विज्ञानाचे रुप) सांगतो ते ऐक.
भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्नाप्रकृतिरष्टधा ॥7. 4॥
15-7
तरी अवधारी गा धनंजया । हे महदादिक माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥15॥
हे धनंजया, ऐक; आपल्या अंगाची पडछाया असते, त्याप्रमाणे ही महदादि तत्त्वे म्हणजे माझी माया होय.
16-7
आणि इयेते प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥16॥
हिलाच प्रकृति असे म्हणावे; व हिचे आठ निरनिराळे प्रकार आहेत असे समजावे; आणि हिच्यापासून हे त्रैलोक्य उत्पन्न होते.
17-7
हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसी । तरी तेचि गा आता परियेसी । विवंचना ॥17॥
ही आठ प्रकारांनी कशी निराळी आहे अशी शंका जर तू मनात आणशील, तर तोच विचार सांगतो, ऐक.
18-7
आप तेज गगन । मही मारुत मन । बुद्धि अहंकार हे भिन्न । आठै भाग ॥18॥
उदक, तेज, आकाश, पृथ्वी, वायु, मन, बुद्धि आणि अहंकार हे तिचे निरनिराळे आठ प्रकार आहेत.
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥7. 5॥
19-7
आणि या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था । तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥19॥
पार्था, ह्या आठ भागांची साम्यस्थिति (एकीकरण) ती माझी परमप्रकृति, आणि तिलाच जीवभुता ही संज्ञा आहे.
20-7
जे जडाते जीववी । चेतनेते चेतवी । मनाकरवी मानवी । शोक मोहो ॥20॥
ही अचेतनाचे (शरीराचे) जीवना करते, ज्ञानाला चेतना देते, आणि मनाला शोक व मोह मानण्यास लाविते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-7
पै बुद्धिचा अंगी जाणणे । ते जियेचिये जवळिकेचे करणे । जिया अहंकाराचेनि विंदाणे । जगचि धरिजे ॥21॥
हे पहा की, हिच्या सान्निध्याने बुद्धीच्या अंगी ज्ञान उत्पन्न होते, व ही अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करिते.
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगत: प्रभव: प्रलयस्तथा ॥7. 6॥
22-7
ते सूक्ष्म प्रकृति कोडे । जै स्थूळाचिया आंगा घडे । तै भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥22॥
ही सूक्ष्म (परा) प्रकृती जेव्हा स्वच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते, तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची टांकसाळ सुरू होते.
23-7
चतुर्विधु ठसा । उमटो लागे आपैसा । मोला तरी सरिसा । परी थरचि आनान ॥23॥
त्या टांकसाळींत आपोआप चार प्रकारचे ठसे उमटू लागतात. त्यातील पंचमहाभुतांची योग्यता सारखीच असते, परंतु जाति भिन्न असतात.
24-7
होती चौऱ्यांसी लक्ष थरा । येरा मिती नेणिजे भांडारा । भरे आदिशून्याचा गाभारा । नाणेयांसी ॥24॥
त्यांच्या चौऱ्यांशी लक्ष जाति असून, त्या जातीत आणखी किती जाति आहेत त्यांची गणती नाही. अशा पुष्कळ नाण्यांनी (जातींनीं) निराकार शून्य म्हणजे अव्यक्ताचा गाभारा भरून जातो.
25-7
ऐसे एकतुके पांचभौतिक । पडती बहुवस टांक । मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ॥25॥
याप्रमाणे पंचमहाभूतांचे एकसारखे पुष्कळ ठसे बनतात व त्यांच्या वृद्धिची गणना प्रकृति (माया) हीच ठेवते.
26-7
जे आंखूनि नाणे विस्तारी । पाठी तयांची आटणी करी । माजी कर्माकर्माचिया व्यवहारी । प्रवर्तु दावी ॥26॥
ती नाण्यांवर खुणा करून त्यांचा विस्तार करिते, व मागाहून त्यांची आटणी करिते; अशा प्रकारे कर्माकर्माप्रमाणे घडामोड करण्याची मायेची प्रवृत्ती आहे.
27-7
हे रूपक परी असो । सांगो उघड जैसे परियेसो । तरी नामरूपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ॥27॥
हे रुपक असो; तुला समजेल अशा उघड रीतीने सांगावयाचे म्हटले, तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरुपांचा विस्तार करते.
28-7
आणि प्रकृति तव माझा ठायी । बिंबे येथ आन नाही । म्हणोनि आदि मध्य अवसान पाही । जगासि मी ॥28॥
आणि प्रकृती तर निःसंशय माझ्याच ठायी बिंबते; अर्थात् जगाची उत्पत्ति, स्थिती व लय यास मीच कारण आहे.
मत्त: परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनंजय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥7. 7॥
29-7
हे रोहिणीचे जळ । तयाचे पाहाता येइजे मूळ । तै रश्मि नव्हती केवळ । होय तो भानु ॥29॥
हे दृश्य विश्व मृगजळासारखे आहे! मृगजळाचे मूळ पांहू गेले असता ते केवळ सूर्यकिरण नसून सूर्यच होय.
30-7
तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी । जै उपसंहरूनि कीजेल ठी । तै मीचि आहे ॥30॥
त्याचप्रमाणे, अर्जुना जिच्यापासून ही सृष्टी झाली आहे, ती प्रकृति आणि सृष्टी यांचा उपसंहार करुन (यांना वजा करून) पाहिले तर अवशिष्ट तत्त्व मीच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-7
ऐसे होय दिसे न दिसे । हे मजचि माजीवडे असे । मिया विश्व धरिजे जैसे । सूत्रे मणि ॥31॥
अशा प्रकारे, जे उत्पन्न होते, दिसते व नाहीसे होते, ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोऱ्याने मणि धरलेले असतात, त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे.
32-7
सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचा सुती वोविले । तैसे म्या जग धरिले । सबाह्याभ्यंतरी ॥32॥
त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे. सोन्याचे मणि करून ते सोन्याच्याच तारेत ओवावे, त्याप्रमाणे हे सर्व जग अंतर्बाह्य मीच व्यापले आहे.
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।
प्रणव: सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ॥7. 8॥
पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥7. 9॥
33-7
म्हणोनि उदकी रसु । का पवनी जो स्पर्शु । शशिसूर्यी जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥33॥
म्हणून, पाण्यात जो रस आहे, किंवा वाऱ्यात जो स्पर्श आहे, आणि चंद्र व सुर्य यांच्यात जो प्रकाश आहे, तो मीच आहे असे समज
34-7
तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीचा ठायी गंधु । गगनी मी शब्दु । वेदी प्रणवु ॥34॥
त्याचप्रमाणे, पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतः असणारा जो सुवास, तो मी; आकाशांत शब्द म्हणून जो आहे, तो मी; तसेच वेदांत ॐकार म्हणून जो आहे, तो मी.
35-7
नराचा ठायी नरत्व । जे अहंभाविये सत्त्व । ते पौरुष मी हे तत्त्व । बोलिजत असे ॥35॥
मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा – जो अहंभावाचे सत्त्व आहे – ते पौरुष मी, हे तत्त्व तुला सांगून ठेवतो
36-7
अग्नी ऐसे आहाच । तेजा नामाचे आहे कवच । ते परौते केलिया साच । निजतेज ते मी ॥36॥
तेजाला अग्नि या नांवाचे जे उगीच पांघरूण आहे, ते दूर केले असता त्यांचे खरे स्वरुप ते मी;
37-7
आणि नानाविध योनि । जन्मोनि भूते त्रिभुवनी । वर्तते आहाति जीवनी । आपुलाला ॥37॥
आणि या त्रिभुवनांत प्राणी पुष्कळ प्रकारच्या जातीत जन्म घेऊन आपआपल्या जातीच्या अनुरोधाने अन्नादि जीवनाने जीवन पावतात.
38-7
एके पवनेचि पीती । एके तृणास्तव जीती । एके अन्नाधारे राहती । जळे एके ॥38॥
कोणी वारा पिऊन असतात, कोणी गवतावर उपजीवीका करतात; कोणी अन्नावर राहतात, आणि कोणी पाण्यावर आपले उपजीवन करता
39-7
ऐसे भूताप्रति आनान । जे प्रकृतिवशे दिसे जीवन । ते आघवा ठायी अभिन्न । मीचि एक ॥39॥
असे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे निरनिराळे जीवन दिसते, ते सर्व मीच आहे.
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥7. 10॥
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥7. 11॥
40-7
पै आदिचेनि अवसरे । विरूढे गगनाचेनि अंकुरे । जे अंती गिळी अक्षरे । प्रणवपटींची ॥40॥
खरोखर, उत्पत्तीचे वेळी जे आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते आणि जे अंतकाली ॐकाराची अक्षरे गिळून टाकते;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-7
जव हा विश्वाकार असे । तव जे विश्वाचिसारखे दिसे । मगमहाप्रळयदशे । कैसेही नव्हे ॥41॥
जोपर्यत या जगाला आकार आहे, तोपर्यंत जे त्याच्यासारखेच दिसते. परंतु महाप्रलयाचे वेळेस ते कोणत्याही आकाराचे नसते;
42-7
ऐसे अनादि जे सहज । ते मी गा विश्वबीज । हे हातातळी तुज । देइजत असे ॥42॥
असे जे ह्या जगाचे अनादि व स्वतःसिद्ध बीज, ते मी आहे; ते आज अगदी तुझ्या हातात देत आहे.
43-7
मग उघड करूनि पांडवा । जै हे आणिसील सांख्याचिया गावा । तै ययाचा उपेगु बरवा । देखसील ॥43॥
मग अर्जुना, ते समजून घेऊन जर तू त्याचा विचार करशील, तर त्याचा उपयोग कसा चांगला होईल तो पहाशील.
44-7
परी हे अप्रासंगिक आलाप । आता असतु न बोलो संक्षेप । जाण तपियांचा ठायी तप । ते स्वरूप माझे ॥44॥
परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे बाजुला राहू दे; तुला मी आपला संक्षेपाने सांगतो :- हे पहा की, तपस्व्यांचे ठायी तप म्हणून जे आहे, ते माझे रुप होय.
45-7
बळियांमाजी बळ । ते मी जाणे अढळ । बुद्धिमंती केवळ । बुद्धि ते मी ॥45॥
बलवानांत बल म्हणून जे आहे ते मी असे निःसंशय समज, आणि बुद्धिमंताना बुद्धि म्हणून जी आहे ती मी.
46-7
भूतांचा ठायी कामु । तो मी म्हणे आत्मारामु । जेणे अर्थास्तव धर्मु । थोरू होय ॥46॥
श्रीकृष्ण म्हणतात :- ज्याच्या आचरणापासून धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात, तो प्राणिमात्राचे ठिकाणी असणारा काम मी.
47-7
येऱ्हवी विकाराचेनि पैसे । करी कीर इंद्रियांचेयाचि ऐसे । परी धर्मासि वेखासे । जावो नेदी ॥47॥
येरवी, विकार उत्पन्न होऊन इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे जरी आचरण केले, तरी तो काम धर्माविरूद्ध जाऊ देत नाही.
48-7
जे अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा । तेवीचि नियमाचा दिवटा । सवे चाले ॥48॥
तो काम निषेधाची आडवाट सोडुन विधीच्या वाटेने नीट जातो; आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर नियमरूप मशाल पेटलेली असते.
49-7
कामु ऐशिया वोजा प्रवर्ते । म्हणोनि धर्मासि होय पुरते । मोक्षतीर्थींचे मुक्ते । संसारु भोगी ॥49॥
अशा रीतीने हा काम चालतो, म्हणून धर्माचे आचरण पूर्ण होते; व त्यामुळे संसारात राहणाराला मोक्षरूपी तीर्थात मुक्ति प्राप्त होते.
50-7
जो श्रुतिगौरवाचा मांडवी । कामसृष्टीचा वेलु वाढवी । जव कर्मफळेसी पालवी । अपवर्गी टेके ॥50॥
तो काम वेदाच्या महत्वरूपी मांडवावर कर्मफलांची पाने मोक्षाला लागत तोपर्यंत सृष्टीचा वेल वाढवितो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-7
ऐसा नियतु का कंदर्पु । जो भूता या बीजरूपु । तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥51॥
योग्यांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात :- अशा नियमाने राहाणारा व प्राणिमात्रास बीजभूत असा काम, तो मी आहे.
52-7
हे एकैक किती सांगावे । आता वस्तुजातचि आघवे । मजपासूनि जाणावे । विकरले असे ॥52॥
हे एकेक तुला कोठवर सांगावे! तर वस्तुमात्र म्हणून जे काही आहे, ते सर्व माझ्यापासून विस्तार पावले आहे असे समज.
ये चैव सात्त्विका भावा । राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेतितान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥7. 12॥
53-7
जे सात्त्विक हन भाव । का रजतमादि सर्व । ते ममरूपसंभव । वोळख तूं ॥53॥
जे सात्विक किंवा रजतमादि भाव आहेत, ते सर्व माझ्या रूपापासुनच उत्पन्न झाले आहेत हे ओळखुन ठेव.
54-7
हे जाले तरी माझांठायी । परी ययांमाजी मी नाही । जैसी स्वप्नींचा डोही । जागृती न बुडे ॥54॥
ते जरी माझ्यापासून झाले आहेत, तरी मी त्यांच्यात नाही. ज्याप्रमाणे स्वप्नीच्या डोहांत जागृती बुडत नाही;
55-7
नातरी रसाचीचि सुघट । जैसी बीजकणिका तरी घनवट । परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारे ॥55॥
किंवा ज्याप्रमाणे बी (दाणा) रसाने पुर्ण भरलेले असते; परंतु त्याचेपासुन अंकुर फुटून लांकूड बनल्यावर,
56-7
मग तया काष्ठाचा ठायी । सांग पा बीजपण असे काई । तैसा मी विकारी नाही । जरी विकारला दिसे ॥56॥
मग त्या लांकडाचे ठिकाणी बिज असते का सांग बरे ? त्याचप्रमाणे सात्विकादि सर्व भाव जरी माझ्याचपासून उत्पन्न झाले आहेत, तरी त्यामध्ये मी नाही.
57-7
पै गगनी उपजे आभाळ । परी तेथ गगन नाही केवळ । अथवा आभाळी होय सलिल । तेथ अभ्र नाही ॥57॥
खरोखर, आकाशांत जे ढग उत्पन्न होतात, त्यात शुद्ध आकाश नसते; किंवा ढगांत जे पाणी असते, त्या पाण्यात ढग नसतात;
58-7
मग तया उदकाचेनि आवेशे । प्रगटले तेज जे लखलखीत दिसे । तिये विजूमाजी असे । सलिल कायी ॥58 ॥
नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज (वीज) जे चकचकीत दिसते, त्या वीजेमध्ये पाणी असते काय ?
59-7
सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमी काय अग्नी आहे । तैसा विकारू हा मी नोहे । जरी विकारला असे ॥59 ॥
अग्नीपासुन जो धुर उत्पन्न होतो, त्या धुरांत अग्नी आहे का सांग बरे ? त्याचप्रमाणे, हे भाव जरी माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत, तरी ते म्हणजे मी नव्हे.
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभि: सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्य: परमव्ययम् ॥7. 13॥
60-7
परी उदकी जाली बाबुळी । ते उदकाते जैसी झाकोळी । का वायाचि आभाळी । आकाश लोपे ॥60॥
तथापि, पाण्यापासूनच उत्पन्न झालेले गोंडाळ पाण्याला झांकून टाकते, किंवा ढगाच्या योगाने आकाश व्यर्थ लोपले जाते;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-7
हा गा स्वप्न हे लटिके म्हणो ये । परी निद्रावशे बाणले होये । तव आठव काय देत आहे । आपणपेया ॥61॥
असे पहा की, स्वप्न हे खोटे आहे, परंतु निद्रेच्या योगाने ते खरे भासते, त्या वेळेस ते आपली आपल्याला आठवण होऊ देते का ?
62-7
हे असो डोळ्यांचे । डोळाचि पडळ रचे । तेणे देखणेपण डोळ्यांचे । न गिळिजे कायि ॥62॥
अथवा डोळ्यातील पाण्याने उत्पन्न झालेला वडस दृष्टि बंद करीत नाही का ?
63-7
तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली । की मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ॥63॥
त्याचप्रमाणे, माझ्याच ठिकाणी प्रतिबिंबित झालेली सत्व, रज व तम या गुणांनी युक्त अशी माझी सावली (माया) पडद्याप्रमाणे माझ्याच स्वरूपाच्या आड येते.
64-7
म्हणऊनि भूते माते नेणती । माझीच परी मी नव्हती । जैसी जळीची जळी न विरती । मुक्ताफळे ॥64॥
म्हणून प्राणी मला जाणत नाहीत, आणि माझ्याचपासून उत्पन्न झालेले असुन ते मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे पाण्यापासूनच उत्पन्न झालेली मोत्ये पाण्यात मिसळत नाहीत;
65-7
पै पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेचि पृथ्वीसि मिळे जरी मिळविजे । एऱ्हवी तोचि अग्निसंगे सिजे । तरी वेगळा होय ॥65॥
अथवा मातीचा घट करुन तो (कच्चेपणी) तसाच मातीस मिळविला असता मिळतो, परंतु तोच विस्तवांत भाजल्यावर निराळा बनतो,
66-7
तैसे भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परी मायायोगे जीव- । दशे आले ॥66॥
त्याचप्रमाणे, सर्व भूतजात हे माझेच अवयव आहेत; परंतु मायेच्या योगाने जीवपणाला पावले,
67-7
म्हणोनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममताभ्रांती । विषयांध झाले ॥67॥
म्हणून माझ्यापासून उत्पन्न झाले असुन मद्रूप होत नाहीत, माझेच असुन मला ओळखीत नाहीत, व ” मी ” आणि ” माझे ” या भ्रांतीने विषयांध झालेले आहेत.
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥7. 14॥
न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिता: ॥7. 15॥
68-7
आता महदादि हे माझी माया । उतरोनिया धनंजया । मी होइजे हे आया । कैसेनि ये ॥68॥
तेव्हा आता; धनंजया, ही महत्तत्वादि माझी माया तरुन मद्रूप व्हावे, ह्या गोष्टीचा अनुभव कसा यावा
69-7
जिये ब्रह्माचळाचा आधाडा । पहिलिया संकल्पजळाचा उभाडा । सवेचि महाभूतांचा बुडबडा । साना आला ॥69॥
कारण) जी मायानदी निर्गुण ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यात असतांनाच प्रथम तिच्या ठिकाणी संकल्परूप जलाचा उगम होऊन पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडा आला
70-7
जे सृष्टीविस्ताराचेनि वोघे । चढत काळकलनेचेनि वेगे । प्रवृत्ति निवृत्तीची तुंगे । तटे सांडी ॥70॥
जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने व कालगतीच्या वेगाने कर्म व मोक्ष यांचे उंच काठ ओलांडुन पुढे चालली आहे;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-7
जे गुणघनाचेनि वृष्टिभरे । भरली मोहाचेनि महापुरे । घेऊनि जात नगरे । यमनियमांची ॥71॥
जी सत्त्वादि-गुणरूपी मेघांच्या वृष्टिने भरुन भ्रांतिरूप महापुराने यमनियमरूपी शहरे वाहून नेत आहे.
72-7
जे द्वेषाचा आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजी प्रमदादि तळपत । महामीन ॥72॥
जिच्यात द्वेषरूपी भोवरे असुन जी मत्सररूप वळणाने वहात आहे; जिच्यात उन्मत्तपणा इत्यादि मोठाले मासे तळपत आहेत;
73-7
जेथ प्रपंचाची वळणे । कर्माकर्मांची बोभाणे । वरी तरताती वोसाणे । सुखदु:खांची ॥73॥
जिच्यात प्रपंचरूपी भेदांची वळणे असुन कर्माकर्माच्या पुरामध्ये सुखदुःखरुपी केरकचरा तरंगत येऊन कडेला लागत आहे;
74-7
रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीवफेन संघाटा । सैंघ दिसे ॥74॥
रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात, व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो किंवा जीमधील विषयसुखरुपी बेटावर कामरुपी लाटा आदळून त्या ठिकाणी जीवसमुदायरुपी फेस पुष्कळ दिसत आहे;
75-7
अहंकाराचिया चळिया । वरी मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मींचिया आकळिया । उल्लाळे घेती ॥75॥
अहंकार रुपी ओघाने व विद्या, धन आणि सामर्थ्य या तीन मदांच्या उकळ्यांनी ज्या ठिकाणी विषयतरंगांच्या लाटा उसळत आहेत,
76-7
उदोअस्ताचे लोंढे । पाडीत जन्ममृत्यूचे चोंढे । जेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥76॥
उदय आणि अस्त यांच्या लोंढ्यांनी जन्ममरणांचे धोंडे पडुन त्या ठिकाणी पंचमहाभुतात्मक शरीररुप बुडबुडे उत्पन्न होतात व लय पावतात.
77-7
सम्मोह विभ्रम मासे । गिळिताती धैर्याची आविषे । तेथ देव्हडे भोवत वळसे । अज्ञानाचे ॥77॥
जिच्यात मोह व भ्रांती हे मासे धैर्यरूप मांस गिळून टाकतात; त्या ठिकाणी अज्ञानरूपी मोठे भोवरे भोवती फिरत असतात;
78-7
भ्रांतीचेनि खडुळे । रेवले आस्थेचे अवगाळे । रजोगुणाचेनि खळाळे । स्वर्गु गाजे ॥78॥
भ्रांतिरूप गढूळ पाण्याने आस्थारूप गाळांत रुतून तमोरुपी खळखळाटाने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते;
79-7
तमाचे धारसे वाड । सत्त्वाचे स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥79॥
(असा हा) तमोरुपी प्रवाह तरुन जाण्यास अवघड आहे; (येथे) सत्वरुपी स्थिर पाण्याचा मोठा डोह आहे; किंबहुना ही मायानदी दुस्तर आहे.
80-7
पै पुनरावृत्तीचेनि उभडे । झळंबती सत्यलोकीचे हुडे । घाये गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ॥80॥
खरोखर हीमधील जन्ममृत्युच्या पुराच्या लोंढ्यात सत्यलोकाचे किल्ले वाहून जातात, आणि ब्रह्मांडगोलाचे धोंडे तेव्हाच गडबडत जातात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-7
तया पाणियाचेनि वहिलेपणे । अझुनी न धरती वोभाणे । ऐसा मायापूर हा कवणे । तरिजेल गा ॥81॥
त्या पुराच्या प्रवाहात अजुन कोणाचे पाय लागत नाहीत! अरे, असा हा मायापूर कोणाच्याने तरून जाववेल
82-7
येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय ते ऐक ॥82॥
आणखी येथे एक मोठेच नवल आहे; ही नदी तरून जाण्याला जे जे उपाय करावे, ते ते अपायकारकच होतात!
83-7
एक स्वयंबुद्धीचा बाही । रिगाले तयांची शुद्धीचि नाही । एक जाणिवेचा डोही । गर्वेचि गिळिले ॥83॥
कोणी आपल्या बुद्धीच्या बळावर (हीमधून तरून जावे म्हणून) हिजमध्ये उडी टाकली, त्यांचा पत्ताच नाही; कोणाला ज्ञानरुपी डोहांत गर्वाने पार गिळून टाकले;
84-7
एकी वेदत्रयाचिया सांगडी । घेतलिया अहंभावाचिया धोंडी । ते मदमीनाचा तोंडी । सगळेचि गेले ॥84॥
कोणी वेदत्रयीच्या सांगडीवर बसून तिच्याखाली मीपनाचे धोंडे बांधून या मायारुप नदीतुन तरून जाण्यास निघाले. ते मदरूपी माशाच्या तोंडात सबंधच नाहीतसे झाले,
85-7
एकी वयसेचे जाड बांधले । मग मन्मथाचिये कासे लागले । ते विषयमगरी सांडिले । चघळूनिया ॥85॥
कोणी तारुण्याच्या बळाने कमर कसुन मदनाच्या कासेला लागले, तो त्यांना विषयरूप सुसरीनेच चघळुन टाकिले.
86-7
आता वृद्धाप्याचिया तरंगा- । माजी मतिभ्रंशाचा जरंगा । तेणे कवळिजताति पै गा । चहूकडे ॥86 ।
मग ते वार्धक्यरुप लाटांमध्ये तरंगत जात असता मतिभ्रंशरूप जाळ्यात सांपडतात, व त्यायोगे चहुंकडून जखडले जाऊन शोकरूप कड्यावर आदळतात,
87-7
आणि शोकाचा कडा उपडत । क्रोधाचा आवर्ती दाटत । आपदागिधी चुंबिजत । उधवला ठायी ॥87 ॥
पुढे क्रोधरूपी भोंवऱ्यात सांपडले असता कोठे वर डोके करावयास लागले, की आपत्तिरूप गिधाडे त्यास टोचटोचुन खाऊ लागतात;
88-7
मग दु:खाचेनि बरबटे बोंबले । पाठी मरणाचे रेवे रेवले । ऐसे कामाचिये कासे लागले । ते गेले वाया ॥88॥
आणि मग ते दुःखरूप चिखलात फसुन मरणरूप वाळुंत रुतले जातात! अशाप्रकारे जे विषयाच्या मागे लागले ते फुकट जातात. (त्यांचे जिणे व्यर्थ होते)
89-7
एकी यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटी । ते स्वर्गसुखाचा कपाटी । शिरकोनि ठेले ॥89॥
कोणी यज्ञादिक क्रियारुपी पेटी बांधूंन पोटाखाली घेतात; ते स्वर्गसुखरूपी कपारींत अडकुन राहतात.
90-7
एकी मोक्षी लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरवसा । परी ते पडिले वळसा । विधिनिषेधांचा ॥90॥
कोणी मोक्षप्राप्तीच्या आशेने कर्मरुप बाहुबलावर भरवसा ठेवतात; परंतु कर्तव्याकर्तव्यांच्या वळणात पडतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-7
जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा नलगे । वरी काही तरो ये योगे । तरी विपाये तो ॥91॥
त्या नदीमध्ये वैराग्यरूप नाव चालत नाही, व विवेकरूप काठी टेकत नाही. तथापि योगाने तरता येईल. परंतु असे क्वचित् घडून येते.
92-7
ऐसे जीवाचिये आंगवणे । इये मायानदीचे उतरणे । हे कासयासारिखे बोलणे । म्हणावे पा ॥92॥
अशाप्रकारे, जीवाच्या अंगबळाने ह्या मायारुप नदीतून तरून जाता येते हे म्हणणे कशासारखे आहे म्हणावे, ते सांगतो.
93-7
जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसि दुर्जनाची बुद्धी । की रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥93॥
जर पथ्य न करणाराची व्याधि टळेल, साधूला दुर्जनाची बुद्धि कळेल, किंवा विषयासक्त पुरुष सिद्धि प्राप्त झाली असता तिला सोडील;
94-7
जरी चोरा सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे । ना तरी भेडा उलटे । विवसी जरी ॥94॥
जर चोरांची सभा भरेल, अथवा माशाला गळ गिळिता येईल, किंवा भित्र्याला भिऊन पिशाच माघारे फिरेल.
95-7
पाडस वागुर करांडी । जरी मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥95॥
जर हरणाचे पाडस जाळे कुरतुडील, किंवा मुंगी मेरु पर्वत ओलांडील, तरच जीवांना (आपल्या स्वतःच्या शहाणपणाने) मायानदी तरुन पलीकडल्या तीरी जाता येईल!
96-7
म्हणऊन गा पंडुसता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तैसी मायामय हे सरिता । न तरवे जीवा ॥96॥
म्हणून, हे पंडुसुता, ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकवत नाही, त्याप्रमाणे ही मायारुप नदी जीवाला तरवत नाही.
97-4
येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावे मज भजले । तया ऐलीच थडीये सरले । मायाजळ ॥97॥
येथे जे मला अनन्यभावाने शरण येतात, ते फक्त ह्या दुस्तर नदीतून सहज तरून जातात. इतकेच नव्हे, तर ते अलीकडच्या कांठी असतांनाच मायारुप जल पार नाहीसे होते.
98-7
जया सद्गुरु तारू पुढे । जे अनुभवाचे कासे गाढे । जया आत्मनिवेदन तरांडे । आकळले ॥98॥
ज्यांना सद्गुरू हाच नावाडी असुन ज्यांनी ब्रह्माची कास बळकट धरली आहे, व ज्यांना आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहे;
99-7
जे अहंभावाचे ओझे सांडूनि । विकल्पाचिया झुळका चुकाऊनि । अनुरागाचा निरुता होऊनि । पाणिढाळु ॥99॥
जे अहंभावाचे ओझे टाकुन, विकल्परूपी वारा चुकवून, आणि बायकामुलांच्यावरील अनुरागरूपी पाण्याची धार टाळून,
100-7
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा । मग निवृत्तीचिया पैलतीरा । झेपावले जे ॥100॥
ते जीवात्म्यांचे ऐक्य हाच उतार त्या उताराने बोधरूपी सांगडीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील काठाला जाऊन पोहोचतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-7
ते उपरतीचा वांवी सेलत । सोहंभावाचेनि थावे पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटी ॥1॥
हात टाकीत ‘अहंब्रह्म ‘ या भावाच्या बळावर पोहून निवृत्तिरूपी तटावर निर्विघ्नपणे निघतात.
102-7
येणे उपाये मज भजले । ते हे माझी माया तरले । परी ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाही ॥2॥
या उपायाने जे मला भजतात, तेच या मायारुप नदीतून तरून जातात; परंतू असे भक्त अगदी विरळा. फार नाहीत.
चतुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥7. 16॥
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रिय:॥7. 17॥
103-7
जे बहुता एका अवांतर । अहंकाराचा भूतसंचार । जाहला म्हणोनि विसर । आत्मबोधाचा ॥103॥
कारण, त्या एकाशिवाय इतर सर्व प्राण्यांना अहंकाररूप भूताचा संचार झाल्यामुळे आत्मस्वरुपाचा विसर पडतो.
104-7
ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे । पुढीले अधोगतीची लाज नेणवे । आणि करितात जे न करावे । वेदु म्हणे ॥104॥
त्या वेळी त्यास नियमरूपी वस्त्राचे भान रहात नाही, अधोगतीची लाज नाहींशी होते, आणि ते वेदबाह्य वर्तणूक करितात.
105-7
पाहे पा शरीराचिया गावा । जयालागी आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनिया ॥105॥
अर्जुना, असे पहा की, या शरीररुप गावात ज्या कार्याकरिता आले, तो सर्व कार्यभाग सोडुन,
106-7
इंद्रियग्रामीचा राजबिदी । अहंममतेचिया जल्पवादी । विकारांतरांची मांदी । मेळवूनिया ॥106॥
या इंद्रियसमुदायरूप राजमार्गावर अहंममतेची बडबड करण्याकरिता कामक्रोधादिक विकारांचा समुदाय गोळा करितात;
107-7
दु:खशोकाचा घार्इ । मारिलीयाची सेचि नाही । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥107॥
आणि दुःख व शोक यांचे घाव पडत असतांही त्यांना त्यांची आठवण सुद्धा नसते. हे सांगावयाचे कारण काय म्हणशील, तर ते मायेने ग्रासलेले असतात.
108-7
म्हणोनि ते माते चुकले । आइका चतुर्विध मज भजले । जिही आत्महित केले । वाढते गा ॥108॥
म्हणून ते मला मुकतात; परंतु फक्त चौघांनीच, ज्यांनी माझे भजन केले त्यांनी आत्महीत वृद्धिंगत केले.
109-7
तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासू बोलिजे । तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥109॥
त्या चौघांपैकी पहिल्याला आर्त, दुसऱ्याला जिज्ञासु, तिसऱ्याला अर्थार्थी, व चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात.
110-7
तेथ आर्तु तो आर्तीचेनिव्याजे । जिज्ञासु तोजाणावयाचिलागी भजे । तिजेनि तेणे इच्छिजे । अर्थसिद्धि ॥110॥
आर्त हा दुःखनिवारणासाठी मला भजतो, जिज्ञासु ज्ञानप्राप्तीकरता भजतो, आणि तिसरा जो अर्थार्थी तो द्रव्यप्राप्तीचे इच्छेने मला भजतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-7
मग चौथियाचा ठायी । काहीचि करणे नाही । म्हणोनि भक्तु एकु पाही । ज्ञानिया जो ॥111॥
परंतु चौथा जो असतो, त्याला काहीच कर्तव्य नसतांही तो मला भजतो, म्हणून तो एक ज्ञानी पुरुषच माझा भक्त होय हे ध्यानांत ठेव.
112-7
जे तया ज्ञानाचेनि प्रकाशे । फिटले भेदाभेदाचे कडवसे । मग मीचि जाहला समरसे । आणि भक्तुही तेविचि ॥112॥
कारण, त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने भेदाभेदरूप अहंकार नाहींसा होतो, व मग त्याचे माझ्याशी ऐक्य होऊन तो मद्रूप होऊन बसतो, व त्याची भक्तीही तशीच कायम असते.
113-7
परी आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक । तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगता तो ॥113॥
परंतु स्फटिक मणि जसा उदकमय दिसतो, तसा हा ज्ञानी पुरुष इतरांच्या दृष्टीला दिसतो तसा नव्हे; त्याचे वर्णन करताना कौतुक वाटते.
114-7
जैसा वारा का गगनी विरे । मग वारेपण वेगळे नुरे । तेवि भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥114॥
ज्याप्रमाणे वारा हा गगनांत शांत झाल्यावर मग त्याचे वारेपण वेगळे उरत नाही, त्याप्रमाणे हा जरी मद्रूप झाला, तरी त्याचा भक्ताचा बाणा जात नाही.
115-7
जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे । येऱ्हवी गगन तो सहजे । असे जैसे ॥115॥
जर वारा हालवून पाहिला तर तो गगनाहून वेगळा भासतो, येऱ्हवी गगन आणि तो ज्याप्रमाणे एकच,
116-7
तैसे शरीरे हन कर्मे । तो भक्त ऐसा गमे । परी अंतरे प्रतीतिधर्मे । मीचि जाहला ॥116॥
त्याचप्रमाणे शरीरासंबंधी सर्व कर्माच्या आचरणाने तो माझा भक्त वाटतो; परंतु स्वानुभवाच्या योगाने तो मद्रूपच असतो
117-7
आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणे । मी आत्मा ऐसे तो जाणे । म्हणऊनि मीही तैसेचि म्हणे । उचंबळला सांता ॥117॥
आणि ज्ञानप्राप्तीच्या उजेडाने मीच त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो, म्हणून मीही संतोष पावून त्याला आपला आत्मा असे म्हणतो.
118-7
हा गा जीवापैलीकडिलिये खुणे । जो पावोनि वावरोही जाणे । तो देहाचेनि वेगळेपणे । काय वेगळा होय ॥118॥
जो जीवपणाच्या पलीकडील खुण समजून घेऊन व्यवहारांत वागतो, तो देह धारण केल्यामुळे माझ्यापासून वेगळा होईल का पहा बरे!
उदारा: सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थित: स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥7. 18॥
119-7
म्हणोनि आपुलालिया हिताचेनि लोभे । मज आवडे तोहि भक्त झोंबे । परी मीचि करी वालभे । ऐसा ज्ञानिया एकु ॥119॥
म्हणून आपल्या हिताकरिता हवा तो मनुष्य माझी भक्ति करतो, परंतु मी ज्याच्यावर प्रीति करतो असा एक भक्त ज्ञानीच होय.
120-7
पाहे पा दुभतेयाचिया आशा । जगचि धेनूसि करिताहे फासा । परी दोरेवीण कैंसा । वत्साचा बळी ॥120॥
हे पहा की, दुधाच्या आशेने सर्व लोक गाईला फासा घालतात, परंतु आपल्या वासराला फासा शिवाय ती कसे दूध पाजते ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-7
का जे तनुमनुप्राणे । ते आणिक काहीचि नेणे । देखे तयाते म्हणे । हे माय माझी ॥121॥
का तर, त्याला दुसरी काही एक गोष्ट माहीत नसून आपल्या तनमनप्राणाने ते आईलाच ओळखत असतें; आणि जी वस्तु पाहील ती माझी आई आहे असे समजते,
122-7
ते येणे माने अनन्यगती । म्हणूनि धेनूहि तैसीचि प्रीती । यालागी लक्ष्मीपति । बोलिले साच ॥122॥
अशा प्रकारे ते वासरू अनन्य भक्त असते म्हणून त्याच्यावर गायही तशीच प्रीति करते. यास्तव लक्ष्मीपति (कृष्ण) जे बोलले ते खरे.
123-7
हे असो मग म्हणितले । जे का तुज सांगितले । तेही भक्त भले । पढियंते आम्हा ॥123॥
हे असो. मग म्हणतात :- ज्ञान्याशिवाय जे तुला इतर भक्त सांगितले, तेही माझे आवडते आहेत.
124-7
परी जाणोनिया माते । जे पाहो विसरला माघौते । जैसे सागरा येऊनि सरिते । मुरडावे ठेले ॥124॥
त्यांना माझे ज्ञान झाले म्हणजे मग ते परत फिरणे विसरतात. ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिचे माघारी फिरणे खुंटते,
125-7
तैसी अंत:करणकुहरी जन्मली । जयाची प्रतीतिगंगा मज मीनली । तो मी हे काय बोली । फार करू ? ॥125॥
त्याचप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणरूपी दरीतून अनुभवरूप गंगा निघून मला मिळाली तो मद्रूप झाला. हे वर्णन किती करू ?
126-7
येऱ्हवी ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझे । हे न म्हणावे परी काय कीजे । न बोलणे बोलो ॥126॥
येऱ्हवी ज्ञानी ज्याला म्हणतात; तो केवळ माझा जीव की प्राण होय. हे सांगू नये, पण काय करावे ? ही न बोलण्याची गोष्ट तुला प्रसंगोपात सांगितली.
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ॥7. 19॥
127-7
जे तो विषयांची मोट झाडी । माजी कामक्रोधांची सांकडी । चुकावूनि आला पाडी । सद्वासनेचिया ॥127॥
जो विषयरूप दाट झाडीतून कामक्रोधादिक संकटे टाळून व सद्वासनेच्या पहाडावर चढून आला
128-7
मग साधुसंगे सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा । अप्रवृतीचा अव्हांटा । डावलूनि ॥128॥
नंतर, हे वीरश्रेष्ठा अर्जुना,साधूंच्या संगतीने, सत्कर्माच्या सरळ वाटेने; दुराचरणाच्या आडमार्गाला डावलून,,
129-7
आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविचि आस्थेचिया न लेचि वाहणा । तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥129॥
आणि आस्थेच्या (फलाशेच्या) वाहणा पायात न घालता शेकडो जन्म भक्तीची वाट चालणारा जो ज्ञानी भक्त तो फलाच्या हेतूंचा का हिशेब करील ?
130-7
ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजी धावता सडिया आयती । तव कर्मक्षयाची पाहती । पाहाट जाली ॥130॥
याप्रमाणे शरीसंबंधी अज्ञानरूप रात्रीत उपाधिरहीत वाट चालत असता सहज कर्मक्षय होऊन ज्ञानोदयाची पहाट होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-7
तैसीच गुरुकृपा उखा उजळली । ज्ञानाची ओतपली पडली । तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥131॥
त्याच वेळेस गुरुकृपारूप उषःकाल होतो आणि मग ज्ञानरुप सुर्याची कोवळी किरणे पडून समदृष्टीचे ऐश्वर्य त्याच्या दृष्टीस पडते.
132-7
ते वेळी जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एकु आहे । अथवा निवांत जरी राहे । तऱ्ही मीचि तया ॥132 ।
त्या वेळी तो जिकडे जिकडे पाहातो, तिकडे तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही. अथवा तो जरी स्वस्थ बसला, तरी त्याला मीच दिसतो.
133-7
हे असो आणिक काही । तया सर्वत्र मीवाचूनि नाही । जैसे सबाह्य जळ डोही । बुडालिया घटा ॥133 ।
फार काय सांगावे ? त्याला सर्व ठिकाणी माझ्यावाचून दुसरे काही दिसत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या घटाच्या आत व बाहेर पाणीच असते,
134-7
तैसा तो मजभीतरी । मी तया आंतु बाहेरी । हे सांगिजे बोलवरी । तैसे नव्हे ॥134 ॥
त्याप्रमाणे तो माझ्या आत व मी त्याच्या अंतर्बाह्य आहे; हे बोलून दाखविण्यासारखे नाही.
135-7
म्हणोनि असो हे इयापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणे संसरलेनि करी । आपु विश्व ॥135 ॥
म्हणून ते असो. याप्रमाणे त्याला ज्ञानाची वखारच दृष्टीस पडते; आणि तो जिकडे जिकडे संचार करितो, तिकडे तिकडे त्याला आपणच विश्व आहो असे भासते.
136-7
हे समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो । म्हणोनि भक्तामाजी रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥136 ॥
या सर्व विश्वांत वासुदेव भरला आहे असा त्याचा पुर्ण अनुभव असतो, म्हणून भक्तांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ आणि तोच ज्ञानी होय.
137-7
जयाचिये प्रतीतीचा वाखौरा । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥137 ॥
धनुर्धरा, ज्याच्या अनुभवाच्या वखारीत सर्व चराचर विश्व सांठविले आहे, असा हा महात्मा फार दुर्लभ आहे.
138-7
येर बहु जोडती किरीटी । जयांची भजने भोगासाठी । जे आशातिमिरे दृष्टी- । मंद जाले ॥138 ॥
ज्याच्याशिवाय, अर्जुना, पुष्कळ मला भजतात, पण त्यांची भक्ती फक्त विषयसुखाशेने असते; कारण आशातिमिराने त्यांची दृष्टी विषयांध झालेली असते.
कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना:प्रपद्यन्तेऽन्यदेवता: ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता: स्वया ॥7. 20 ॥
139-7
आणि फळाचिया हावा । हृदयी कामा झाला रिगावा । की तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥139 ।
आणि फलाच्या इच्छेने त्याच्या ह्रदयात कामाचा रिघाव झाला की, त्याच्या संसर्गाने ज्ञानरुपी दिवा मालवतो.
140-7
ऐसे उभयता आंधारी पडले । म्हणोनि पासीचि माते चुकले । मग सर्वभावे अनुसरले । देवतांतरा ॥140॥
अशा रीतीने त्यांना अंतर्बाह्य अंधार होतो, म्हणून मी त्यांच्याजवळ असुनही ते मला अंतरतात, आणि मग सर्व भावाने इतर देवांना भजू लागतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-7
आधीच प्रकृतीचे पाईक । वरी भोगालागी तव रंक । मग तेणे लोलुप्ये कौतुक । कैसे भजती ॥141॥
अगोदर ते मायेच्या आधीन झालेले, आणि त्यात फलप्राप्तीकरिंता दीन झालेले, मग काय ? ते मोठ्या कौतुकाने लंपट होऊन देवांची कशी भक्ती करितात
142-7
कवणी तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि । का अर्पण यथाविधि । विहित करणे ॥142 ॥
कोणत्या नियमाने व उपचारद्रव्याने, तसेच यधाविधि, त्याला काय वस्तु अर्पण केल्या पाहिजेत इकडे लक्ष देऊन, जे जे उपचार त्याला आवडत असतील ते ते करतात !
योयो यां यां तनुं भक्त:श्रद्धयार्चितुमिच्छति l
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥7. 21 ।
143-7
पै जो जिये देवतांतरी । भजावयाची चाड करी । तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥143॥
परंतु जो जो ज्या ज्या देवतेची फलाकरिता उपासना करितो, त्याची ती इच्छा मीच पुरवितो.
144-7
देवोदेवी मीचि पाही । हाही निश्चय त्यासि नाही । भाव ते ते ठायी । वेगळाला धरी ॥144॥
हे पहा की, देव-देवी मीच आहे; परंतु त्याचा तसाही निश्चय नसतो, म्हणून त्या त्या देवतांचे ठिकाणी त्याचा निरनिराळा भाव असतो.
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च तत: कामान्मयैव विहितान्हि तान् ॥7. 22॥
145-7
मग श्रद्धायुक्त । तेथिचे आराधन जे उचित । ते सिद्धिवरी समस्त । वर्तो लागे ॥145 ॥
मग त्यांना ज्या ज्या देवतेची श्रद्धा असेल, त्या त्या देवतेचे, आपली कार्यसिद्धी होईपर्यंत, ते यथाविधि पूजन करितात.
146-7
ऐसे जेणे जे भाविजे । ते फळ तेणे पाविजे । परी तेही सकळ निपजे । मजचिस्तव ॥146॥
याप्रमाणे ज्याने जे फल इच्छावे ते त्याला प्राप्त होते, परंतु ते सर्व माझ्यापासूनच मिळते
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥7. 23 ।
147-7
परी ते भक्त माते नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती । म्हणोनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥147 ॥
परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते आशापाशांतून मुक्त होत नाहीत, (त्यातच घोटाळतात) आणि म्हणूनच,नाशवंत अशी इच्छित फले प्राप्त होतात.
148-7
किंबहुना ऐसे जे भजन । ते संसाराचेचि साधन । येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥148॥
किंबहुना अशा प्रकारचे हे भजन म्हणजे संसाराचे साधनच होय. बाकी त्याचा फलभोग म्हणजे स्वप्नांतील क्षणिक सुखाप्रमाणेंच होय.
149-7
हे असो परौते । मग हो का आवडे ते । परी यजी जो देवतांते । तो देवत्वासीचि ये ॥149॥
हे एकीकडे राहू द्या. त्यांचे आवडते दैवत का असेना ? त्याने त्या देवतांचे पूजन केले म्हणजे तो देवत्वच पावतो.
150-7
येर तनुमनप्राणी । जे निरंतर माझेयाचि वाहणी । ते देहाचा निर्वाणी । मीचि होती ॥150॥
बाकी तनमन अर्पण करुन जे माझ्याच भक्तीमार्गाला लागले ते देहाती माझ्याकडे येतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥7. 24॥
151-7
परी तैसे ते न करिती प्राणिये । वाया आपुला हिती वाणिये । पै पोहताति पाणिये । तळहातिंचेनि ॥151 ॥
पण प्राणी तसे करीत नाहीत, आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करुन घेऊन (इतर देवतांच्या पूजनाने अल्प फलप्राप्ती करून घेऊन) तळहातावरच्या पाण्यात पोहल्याप्रमाणे करतात !
152-7
नाना अमृताचा सागरी बुडिजे । मग तोंडा का वज्रमिठी पाडिजे । आणि मनी तरी आठविजे । थिल्लरोदकाते ॥152 ॥
किंवा अमृताच्या समुद्रांत बुडाला असता मग तोंड दाबून का धरावे ? आणि मनामध्ये डबक्यातील पाण्याची आठवण का करावी ?
153-7
हे ऐसे काइसेया करावे । जे अमृतीही रिगोनि मरावे । ते सुखे अमृत होऊनि का नसावे । अमृतामाजी ॥153 ॥
अमृतांत शिरून देखील मरावयाचे, हे असे तरी का करावे ? अमृतांत सुखाने अमृतरूप होऊन का राहू नये ?
154-7
तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनिया धनुर्धरा । का प्रतीतिपाखी चिदंबरा । गोसाविया नोहावे ॥154 ॥
त्याचप्रमाणे धनुर्धरा, फलाशारूप पिंजरा टाकुन देऊन अनुभवरूप पंखांनी (संचार करुन) चिदाकाशाचे (भगवत्स्वरुपाने) धनी का न व्हावे ?
155-7
जेथ उंचावतेनि पवाडे । सुखाचा पैसारु जोडे । आपुलेनि सुरवाडे । उडो ये ऐसा ॥155 ॥
ते चिदाकाश,आपण कितीही उंच उडण्याचे मनात आणले तरी सुखाने उडण्यास फैलावलेले आहे
156-7
तया उमपा माप का सुवावे । मज अव्यक्ता व्यक्त का मानावे । सिद्ध असता का निमावे । साधनवरी ॥156॥.
त्या मला, न मोजता येणाऱ्याला, मापांत का घालावे ? मज निराकाराला साकार का मानावे ? मी सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधनाने का शिणावे ?
157-7
परी हा बोल आघवा । जरी विचारिजतसे पांडवा । तरी विशेषे या जीवा । न चोजवे गा ॥157॥
पण अर्जुना, खरे विचारशील की नाही, तर बहुतकरुन हे बोलणे कोणाला आवडत नाही.
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृत्तः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ 7. 25 ॥
158-7
का जे योगमायापडळे । हे जाले आहाती आंधळे । म्हणोनि प्रकाशाचेनिही देहबळे । न देखती माते ॥158 ॥
का की योगमायेच्या पडद्याने ते आंधळे झालेले असतात; म्हणून देहबुद्धीच्या बळाने, प्रकाशरूप जो मी त्या मला ते पहात नाहीत.
159-7
येऱ्हवी मी नसे ऐसे । काही वस्तुजात असे । पाहे पा कवण जळ रसे- । रहित आहे ॥159 ॥
येऱ्हवी, मी जीत नाही अशी एक तरी वस्तु आहे का ? पहा की, कोणतेही पाणी रसविरहीत आहे का ?
160-7
पवन कवणाते न शिवेचि । आकाश के न समायेचि । हे असो एक मीचि । विश्वी असे ॥160 ॥
वारा कोणाला स्पर्श करीत नाही ? आकाश कोठे सामावत नाही ? हे असो; अवघ्या विश्वात मीच एकटा भरलेला आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥7. 26 ॥
161-7
येथे भूते जिये अतीतली । तिये मीचि होऊन ठेली । आणि वर्तत आहाति जेतुली । तीही मीचि ॥161 ।
ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले, त्यांचे ठिकाणी मीच होतो, आणी हल्ली आहेत त्यातही मीच आहे.
162-7
भविष्यमाणे जिये ही । तीही मजवेगळी नाही । हा बोलचि येऱ्हवी काही । होय ना जाय ॥162 ॥
किंवा पुढे होणार आहेत, तेही मनापासुन भिन्न नाहीत, परंतु हे फक्त बोलणे आहे. बाकी काही होत नाही, आणी काही जात नाही.
163-7
दोराचिया सापासी । डोंबा बडि ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी । तेवि भूतासि मिथ्यत्वे ॥163 ॥
ज्याप्रमाणे दोरीच्या सापाविषयी तो काळा, कवड्या,गव्हळा वैगेरे काहीच कल्पना करता येत नाही, त्याप्रमाणे, प्राणिमात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणतीच कल्पना करता येत नाही;
164-7
ऐसा मी पंडुसुता । अनस्यूत सदा असता । या संसार जो भूता । तो आने बोले ॥164 ॥
हे पंडुसुता, अशा प्रकारे मी सदा अखंड आहे; प्राणिमात्राच्या मागे जो संसार लागला आहे, त्याचे कारण निराळे आहे.
165-7
आता थोडी ऐसी । गोठी सांगिजेल परियेसी । जै अहंकारतनूंसी । वालभ पडिले ॥165 ॥
म्हणून त्याविषयी थोडीशी गोष्ट सांगतो, ती ऐक : अभिमान व तनु (शरीर) या दोहोंची प्रीती जडली.
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥7. 27॥
166-7
तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेषेसी मांडिली । वराडिक ॥166 ॥
त्या दोघांच्या प्रीतीपासुन इच्छारूप कन्या उत्पन्न झाली, व ती आपल्या पूर्ण तारुण्यात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न लागले.
167-7
तया दोघास्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोह जाला । मग तो आजेयाने वाढविला । अहंकारे ॥167 ॥
त्या दोघांपासून (सुखदुःखरूप) द्वंदमोह हा पुत्र झाला. नंतर त्याच्या अहंकार आजोबाने त्याला वाढविले.
168-7
जो धृतीसि सदा प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु । आशारसे दोंदिलु । जाला सांता ॥168 ॥
तो द्वंदमोह नेहमी धैर्याला व इंद्रियदमनालाही सदा प्रतिकूळ आणी आशारूप दुग्धाने पुष्ट झालेला आहे.
169-7
असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनि धनुर्धरा । विषयांचा वोवरा । विकृतीसी असे ॥169 ॥
हे धनुर्धरा, असंतोषरूप मद्याने उत्पन्न झाल्यामुळे तो विषयांच्या उपभोगाला विटत नाही.
170-7
तेणे भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे काटे । मग चिरिले अव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥170 ॥
त्याने शुद्ध भक्तीच्या वाटेवर विकल्पाचे काटे पसरुन मग कुमार्गाच्या आडवाटा काढिल्या आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-7
तेणे भूते भांबावली । म्हणोनि संसाराचिया आडवामाजी पडिली । मग महादु:खाचा घेतली । दांडेवरी ॥171 ॥
त्या योगाने प्राणिमात्र भ्रम पावून संसाररूप अरण्यात पडतात, व त्यांना महादुःखाचे सपाटे सोसावे लागतात.
येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ 7. 28 ॥
172-7
ऐसे विकल्पाचे वायाणे । काटे देखोनि सणाणे । जे मतिभ्रमाचे पासवणे । घेतीचिना ॥172॥
याप्रमाणे विकल्पाचे तीक्ष्ण परंतु निष्फल काटे पाहुन, ज्यापासून मतिभ्रम उत्पन्न होतो त्यांना जे मानीत नाहीत;
173-7
उजू एकनिष्ठतेचा पाउली । रगडूनि विकल्पाचिया भाली । महापातकांची सांडिली । अटवी जिही ॥173 ॥
भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी जे नीट जातांना विकल्पाचे काटे चिरडून टाकतात, ते महापातकांचे अरण्य टाकुन सरळ मार्गाने जातात.
174-7
मग पुण्याचे धावा घेतले । आणि माजी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले । वाटवधेया ॥174 ॥
नंतर, पुण्याच्या मार्गाने लौकर चालून माझे सान्नीध्य पावतात आणी अशा रीतीने वाटमाऱ्यांच्या (कामक्रोधादिकांच्या) हातून सुटतात!
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥7. 29 ।
175-7
येऱ्हवी तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा । ऐसिया प्रयत्नाते आस्था । विये जयाची ॥175॥
येऱ्हवी, पार्था, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटावे असे जे साधन आहे, त्याच्या प्राप्तीची ज्यांना इच्छा उत्पन्न होते,
176-7
तया तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रे परब्रह्मे फळे । जया पिकलेला रसु गळे । पूर्णतेचा ॥176॥
त्यांना त्याचा तो प्रयत्न फलद्रूप होऊन ब्रह्मप्राप्ती होते, व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे ते पूर्णतेस पावतात.
177-7
ते वेळी कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे । कर्माचे काम सरे । विरमे मन ॥177॥
त्या वेळी,आम्ही धन्य आहो, असे त्यांना वाटून सर्व जगभर आनंद भरलेला दिसतो,
178-7
ऐसा अध्यात्मलाभ तया । होय गा धनंजया । भांडवल जया । उद्यमी मी ॥178 ॥
नंतर आत्मज्ञानाची हौस पुरी होऊन व कर्मे जागच्या जागी राहून त्याचे मन शांत होते.
179-7
तयाते साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी । तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तया ॥179 ॥
हे धनंजया, अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो; कारण त्यांच्या या परमार्थरूप व्यापारांत भांडवल मीच आहे. त्यांना समदृष्टी हेच व्याज मिळून ऐक्यरूप संपत्तीची समृद्धि होते, यामुळे भेदरूप दैन्याची ओळखही रहात नाही.
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: ॥7. 30॥
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥
श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।
180-7
जिही साधिभूता माते । प्रतीतीचेनि हाते । धरूनि अधिदैवाते । शिवतले गा ॥180॥
ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरुन पांचभौतिकासह मला स्पर्श केला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-7
जया जाणिवेचेनि वेगे । मी अधियज्ञु दृष्टी रिगे । ते तनूचेनि वियोगे । विरहे नव्हती ॥181॥
ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरुन पांचभौतिकासह मला स्पर्श केला, ज्यांच्या ज्ञानाच्या वेगाने मला अधियज्ञ या दृष्टीने पाहिले, त्यांना शरीराच्या वियोगाने (मरणसमयी) दुःख होत नाही
182-7
येऱ्हवी आयुष्याचे सूत्र विघडता । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतयाहि चित्ता । युगांतु नोहे ॥182॥
येऱ्हवी, आयुष्याची दोरी तुटावयाचे बतांत आली असता प्राण्यांची जी खळबळ उडून जाते, ती पाहून, न मरणारांच्या चित्ताला सुद्धा युगांत ओढवल्यासारखे नाही का होत ?
183-7
परी नेणो कैसे पै गा । जे जडोनि गेले माजिया आंगा । ते प्रयाणीचिया लगबगा । न सांडितीच माते ॥183 ।
परंतु जे मद्रूप झाले, ते प्राणांतीही मला सोडीत नाहीत. हे कसे होते ते मला सांगता येत नाही.
184-7
येऱ्हवी तरी जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंत:करण- । युक्त योगी ॥184 ॥
येऱ्हवी असे पक्के समज की, जे अशा प्रकारे पूर्ण ज्ञानी आहेत, तेच अंतःकरणापासून माझे ऐक्य पावले आहेत.
185-7
तव इये शब्दकुपिकेतळी । नोडवेचि अवधानाची अंजुळी । जे नावेक अर्जुन तये वेळी । मागाचि होता ॥185॥
हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधानरूप ओंजळ नव्हती. कारण त्याचे लक्ष क्षणभर दुसरीकडे होते.
186-7
जेथ तद्ब्रह्मवाक्यफळे । जिये नानार्थरसे रसाळे । बहुकाते आहाति परिमळे । भावाचेनि ॥186॥
त्या ठिकाणी ती ब्रह्मप्रतिपादक वाक्ये हीच फले पुष्कळ अर्थरूपी रसाने भरलेली होती, व त्यांचा भक्तिरूप सुवास चोहींकडे पसरला होता.
187-7
सहज कृपामंदानिळे । कृष्णद्रुमाची वचनफळे । अर्जुनश्रवणाचिये खोळे । अवचित पडिली ॥187॥
त्या वेळी कृष्णकृपारूप मंद वाऱ्याच्या योगाने, श्रीकृष्णरूप वृक्षापासुन वचनरूप फळे अर्जुनाच्या श्रवणरूप ओटीत सहज येऊन पडली !
188-7
तिये प्रमेयाचीच हो का वळली । की ब्रह्मरसाचा सागरी चुबुकळिली । मग तैसीच का घोळिली । परमानंदे ॥188॥
ती फळे वेदांतसिद्धांतांचीच बनलेली, ब्रह्मरसाच्या सागरांत बुचकळलेली, व तशीत परमानंदरूप साखरेत घोळलेली होती.
189-7
तेणे बरवेपणे निर्मळे । अर्जुना उन्मेषाचे डोहळे । घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥189॥
अशा रीतीने बनलेली जी निर्मळ फळे, त्याच्या अर्थरूपी गर्भाचा लाभ व्हावा अशी अर्जुनास इच्छा उत्पन्न होऊन तो विस्मयरूप अमृताचे घोट घेऊ लागला.
190-7
तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया । हृदयाचा जीवी गुतकुलिया । होत आहाती ॥190॥
अशा रीतीचे सुख झाल्यावर तो स्वर्गसुखाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या अंतःकरणात गुदगुल्या होऊ लागल्या.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-7
ऐसे वरचिलीचि बरवा । सुख जावो लागले फावा । तंवरसस्वादाचिया हावा । लाहो केला ॥191॥
याप्रमाणे त्या फळाचे बाहेरील स्वरुप पाहुन त्याचा आनंद वाढू लागला. त्या वेळेस त्या फळांची चव घेण्याची जिभेला इच्छा उत्पन्न झाली.
192-7
झाकरी अनुमानाचेनि करतळे । घेऊनि तिये वाक्यफळे । प्रतीतिमुखी एके वेळे । घालू पाहिली ॥192॥
म्हणून लवकर अनुमानरूप हस्तावर ती श्रीकृष्णवाक्यरूप फले घेऊन ती तो अनुभवरूप मुखांत एकदम घालू लागला.
193-7
तव विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूचांही दशनी न फुटती । ऐसे जाणोनि सुभद्रापती । चुंबीचिना ॥193 ॥
त्या वेळी विचाररूप जिभेने ती घेता येईनात, व हेतूरूप दातांनी फुटेनात असे जाणून, सुभद्रापती जो अर्जुन तो त्यांना तोंड लावीना.
194-7
मग चमत्कारला म्हणे । इये जळीची मा तारांगणे । कैसा झकविलो असलगपणे । अक्षरांचेनि ॥194 ॥
मग चमत्कार वाटून असे म्हणतो की, ” अहो, पाण्यात दिसणाऱ्या नक्षत्रांप्रमाणे या अक्षरांच्या सुदरपणाने अक्षरांना फळ समजुन मी कसा फसलो!
195-7
मगइये पदे नव्हती फुडिया । गगनाचियाचि घडिया । येथ आमुची मती बुडलिया । थाव न निघे ॥195 ।
ही अक्षरांची पदे नसुन केवळ आकाशाच्या घड्या आहेत व यात आमच्या बुद्धीने कीती जरी बुड्या मारल्या, तरी काही थांग लागावयाचा नाही. “
196-7
वाचूनि जाणावयाची के गोठी । ऐसे जीवी कल्पूनि किरीटी । तिये पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥196 ।
(तेव्हा ही फले घेता येत नाहीत तर) मग ती जाणता कशी येतील ? असे अर्जुनाने मनात आणून पुनः यादवेंद्र श्रीकृष्णाकडे पाहिले.
197-7
मग विनविले सुभटे । हा हो जी ये एकवाटे । सातही पदे अनुच्छिष्टे । नवले आहाती ॥197॥
मग अर्जुनाने देवास विनंति केली की, ” देवा, ही जी एकवटलेली सात पदे, त्यांचा कधीही कोणी स्वाद घेतला नाही, हे मोठे आश्चर्य आहे.
198-7
येऱ्हवी अवधानाचेनि वहिलेपणे । नाना प्रमेयांचेउगाणे कायl श्रवणाचेनि आंगणे । बोलोलाहाति ॥198॥
एरवी, लक्षपूर्वक ऐकत नसता, केवळ श्रवणाच्या जोरावर (लक्ष नसता श्रवण केले तर) अनेक (साधारण) सिद्धांतांचे तात्पर्यार्थ तरी बोलून दाखविता येतील का ? (नाही. )
199-7
परी तैसे हे नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥199॥
आणि त्यातूनही, देवा, आपले हे बोलणे काही साधारण नव्हे. ही अक्षरे नुसती पाहिल्यावर विस्मयाला देखील मोठे आश्चर्य वाटले.
200-7
कानाचेनि गवाक्षद्वारे । बोलाचे रश्मी अभ्यंतरे । पाहेना तव चमत्कारे । अवधान ठकले ॥200॥
कानाच्या झरोक्यातुन बोलरुपी किरण आत शिरले नाहीत, तोंच चमत्कार वाटुन माझे लक्ष खुंटले (मति चालेना).
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-7
तेविचि अर्थाची चाड मज आहे । ते सांगतांही वेळु न साहे । म्हणूनि निरूपण लवलाहे । किजो देवा ॥201॥
त्या शब्दांचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे असे म्हणण्यात जो वेळ चालला आहे, तोही मला सहन होत नाही. म्हणून, देवा लवकर सांगा
202-7
ऐसा मागील पडताळा घेऊनी । पुढा अभिप्रावो दृष्टी सूनी । तेविचि माजी शिरऊनि । आर्ती आपुली ॥202 ॥
याप्रमाणे, मागील प्रत्यंतर घेऊन, पुढल्या अभिप्रायावर दृष्टि ठेवून व मध्येच आपली ऐकण्याची इच्छा दर्शवून अर्जुनाने विचारले.
203-7
कैसी पुसती पाहे पा जाणीव । भिडेची तरी लंघों नेदी शीव । येऱ्हवी कृष्णहृदयासी खेंव । देवो सरला ॥203 ॥
अर्जुनाची प्रश्न करण्याची काय शैली आहे पहा! की मर्यादेचे उल्लंघन न करिता श्रीकृष्णाच्या ह्रदयाला प्रेमालिंगन देण्यास तो तयार झाला!
204-7
अगा गुरूते जै पुसावे । तै येणे माने सावध होआवे । हे एकचि जाणे आघवे । सव्यसाची ॥204 ।
अहो, श्रीगुरूंना ज्या वेळेस पुसावयाचे, त्या वेळेस अशाच मर्यादेने पुसावे लागते. त्यांची मर्यादा कायम ठेवून कसे पुसावे हे फक्त एक सव्यसाची अर्जुनच जाणतो.
205-7
आता तयाचे ते प्रश्न करणे । वरी सर्वज्ञ हरीचे बोलणे । हे संजयो आवडलेपणे । सांगेल कैसे ॥205 ।
आता त्यांचे ते प्रश्न करणे, आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरिचे उत्तर देणे, हे संजय कशा प्रेमाने सांगेल ते पहा.
206-7
तिये अवधान द्यावे गोठी । बोलिजेल नीट मऱ्हाटी । जैसी कानाचे आधी दृष्टी । उपेगा जाये ॥206॥
जी गोष्ट नीट मराठी भाषेत सांगितली जाईल, तिच्याकडे नीट लक्ष द्या. असे की, ज्या योगाने कानाच्या अगोदर दृष्टीला अर्थ दिसेल,
207-7
बुद्धिचिया जिभा । बोलाचा न चाखता गाभा । अक्षरांचियाचि भांबा । इंद्रिये जिती ॥207॥
बुद्धिरूप जिभेने त्या शब्दांचा रस न चाखता अक्षरांच्या शोभेने इंद्रिये तगतील.
208-7
पाहा पा मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळे । परी वरचिली बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ॥208॥
पहा की,मालती पुष्पाच्या कळ्यांचा स्वाद नाकाला खरोखर येईल, परंतु त्याच्या बाहेरील सुरेखपणाने डोळ्यांना सुख होणार नाही कां ?
209-7
तैसे देशियेचिया हवावा । इंद्रिये करिती राणिवा । मग प्रमेयाचिया गावा । लेसा जाईजे ॥209॥
त्याचप्रमाणे, मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिये सुखाचे राज्य करतील, व मग त्वरीत सिद्धांताच्या गावाला जातील.
210-7
ऐसेनि नागरपणे । बोलु निमे ते बोलणे । ऐका ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥210॥
अशा सुंदरपणाने जे बोलणे ऐकल्यापासून बोलणे बंद होते, ते ऐका, असे निवृत्तिदास ज्ञानदेव म्हणतात.
॥इति श्रीज्ञानदेव विरचिताया भावार्थदीपिकाया विज्ञानयोगोनाम सप्तमोऽध्यायः॥7॥
श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 30 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 210 ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
——संपुर्ण—–
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक


















