आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

रूख्मिणी चरित्र भाग ६, (२६ ते ३०)
श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता……..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! रूख्मिणी चरित्र !!!
*!!!रूख्मिणी भाग-२६!!!*
श्रीकृष्ण म्हणाले, रुख्मिणी, या मानवी जीवनाच्या क्रीडेत सारं कांही नियतीच्या हाती आहे. प्रत्येचाचे जीवन हा एक गूढ प्रवासच असतो. नेहमीप्रमाणे सुधर्मा राजसभेचे काम काज सुरु होते.तोच पौंड्र राजाचा दूत आला. त्याने भूर्जपत्र अमात्यांच्या हाती दिले. रुख्मिणीही सभेला उपस्थित होती. पौंड्राधीपती जरासंधाच्या गटातील राजा. त्याच्याकडून संदेश आला हे कळताच तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सैनिकांना अजून पुरती विश्रांतीही मिळाली नव्हती तोच पुन्हा युध्दाचे संकट समोर दत्त म्हणून उभे होते. बलरामदादा व श्रीकृष्णाने इशारा करताच आमत्यांनी भूर्जपत्र वाचायला सुरुवात केली. त्यातील एकएक शब्दागणिक उपस्थितांच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. पत्रातील मजकूर थोडक्यात असा.. या विश्वात वासुदेव ही बहुमानाची पदवी केवळ पौंड्राधीपतीचीच आहे.आपण यतःकिंचित गवळी आहो हे विसरुं नये. त्याने भरसभेत माफी मागावी किंवा युध्द करुन स्वतःची योग्यता सिध्द करावी. संतापलेला सभेला शांत करत स्वामी म्हणाले, त्याने आपल्याला पर्याय दिलाय ना? आपण दुसरा पर्याय स्विकारु! अमात्य त्याला मानाची वस्रे देऊन योग्य शब्दात त्याच्या पत्राला उत्तर द्या.
सभा संपल्यावर अस्वस्थ मनाने रुख्मीणी आपल्या महाली आली. जीवनातील या पर्वाला कोणते पर्व म्हणावे? युध्दपर्व की दुष्टसंहार पर्व? स्वामींचा जन्मच मुळी दुष्टांना शासन करण्यासाठी,न्यायाचा धर्म स्थापण्यासाठीच झाला कां त्यांना सतत दूर ठेवण्यात नियतीचा कांही विशेष हेतू असेल का? चौदिशांच्या दुष्टांचा नाश करण्यासाठीच जणूं त्यांचा जन्म आहे का? एका शत्रुचा नाश करावा की, दुसरा शत्रू धुमकेतु सारखा उगवतो. त्याला ठाऊकही नसते की, आपणच आपल्या हाताने स्वतःच्या विनाशाचा खड्डा खोदतोय! हाच प्रश्न तिने श्रीकृष्णाला विचारल्यावर, ते म्हणाले, रुख्मिणी, त्यांच्या पापाचा घडा भरलेला असतो. या कार्यासाठीच एक साधन म्हणून नियतीने माझी योजना केलेली आहे. आणि हे महान कार्य पार पाडण्यासाठी तेवढीच प्रबळ शक्ती माझ्या पाठीशी असावी म्हणून नियतीने तुझी नियुक्ती केली आहे. या अनभिषिक्त राजाच्या प्रतिष्ठेसाठी द्वारका प्राणपणाने युध्दाच्या तयारीला लागली.पौंड्रा राजाला पुढे करुन, स्वामींचे सख्खे आतेबंधू दंतवक्र व विदुरथ करुष देशाचे नरेश, आत्या श्रृतकीर्तीचे पुत्र, अष्टराज्यातील भद्राराणीचे बंधू हे जरासंध समुहातील होते. जरासंधाच्या नरेशबळी यज्ञाच्या कामी मदत करण्यांत या बंधूंचा हात होता.
शुभ मुहूर्तावर स्वामी, बलरामदादा व उध्वजी प्रचंड सेनेसह पौंड्रा राजाच्या पारिपात्यासाठी निघून गेले. दूताने वार्ता आणली, या पौंड्रा राजाने हुबेहुब स्वामींसारखा वेष धारण करुन लढायला आला. या उन्मत्त नरेशाचा सुदर्शन चक्राने वध केल्यावर, चाल करुन येणार्या दंतवक्र आणि विदुरथाचाही संहार केला. नंतर आत्या, आतोबांचे सांत्वन करुन म्हणाले, आम्हा दोघांना आपण आपल्या पुत्रांच्या ठीकाणी मानावे. पुत्र कर्तव्यात उणीव भासूं देणार नाही असे वचन देऊन, सगळे विजयीवीर द्वारकेत पोहोचले. त्यांना येऊन एक सप्ताहही उलटला नाही तोच,सर्वाना हादरवुन टाकणारी भयंकर वार्ता येऊन धडकली. विष्णूयागाच्या निमित्याने दुर्योधनाने द्रौपदी सहित पांच पांडवांना आमंत्रित केले. युधिष्ठीरांना दूताचे आमंत्रण दिले. शकुनीमामाच्या सहाय्याने कपटाने द्यूतात हरवून पांडवांकडून सर्वस्व पणाला लावून घेतले. युधिष्ठीरांनी जणूं बुध्दी फिरल्यासारखे राज्य,संपत्ती, चार बंधू व पत्नी द्रौपदीलाही पणाला लावून हरले. आणि द्रोपदीसह पांच पांडव १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला.
द्रौपदी स्वयंवराच्या वेळेचा व आणि मयसभेतल्या अपमानाचा सूड म्हणून, दुर्योधनाच्या अज्ञेने दुःशासनाने रजःस्वला एकवस्रा द्रौपदीला फरफटत भरसभेत आणून तिचे वस्रहरण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सार्या जेष्ठांच्या उपस्थितीत ही घटना घडली. ती त्या सर्व जेष्ठांना आकांताने साद घालत होती पण कोणीही हाकेला प्रतिसाद दिला नाही. सारे वाचा गेल्यासारखे खाली माना घालून बसून होते. भीम, पार्थ दास झाल्यामुळे त्यांनाही मदतीला जाता येत नव्हते. शेवटी तिने प्राणप्रिय सख्याला आर्त साद घातली आणि चमत्कार घडला. वास्तविक त्यावेळी श्रीकृष्ण हजारो योजने दूर शाल्वाच्या पारिपात्यला गेले होते. पण मनोवेगाने येऊन, धनुष्यरंगी तेजोमय वस्र तिच्या शरीराभोवती फिरत होते.आणि भावी इतिहासात पिढ्या न् पिढ्या मानव जातीला कलंक लागणारा प्रकार थांबला.ठरल्याप्रमाणे द्रोपदीसह पांच पांडव काम्यकवनात निघून गेले. कुंतीमाता विदुराच्या घरी रहायला गेल्यात.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ७-६-२०२२.
27
*!!!रूख्मिणी भाग-२७!!!*
द्रौपदी वस्रहरणाचा प्रकार ऐकून प्रत्येक जण जणूं पाषाण बनला.निःशब्द होऊन सारे निघून गेले. शेकडो योजने दूर असलेल्या स्वामींनी त्यांची प्रिय सखी पांचालीला तेजस्वी वलयाचे आवरण पांघरले होते. वलय नेसवले होते. मनःपूर्वक साद घालणार्याच्या हाकेला धावून जाणार्या स्वामींना, रुख्मिणीने मनोमन शतशः वंदन केले. मनात विचारले, स्वामी खरच तुम्ही कोण आहात? परमात्मा? आत्म्याच्या हाकेला धावून जाणारे युगंधर? भूत भविष्य, वर्तमान जाणणारे योगेश्वर धर्मस्थापनेसाठी जन्माला आलेले आजन्मा? कोण? कोण? आहात? रुख्मिणी कसला विचार करते आहेस? प्रत्यक्ष स्वामी समोर उभे राहून विचारत होते, अभावितपणे न कळत ती त्यांच्या चरणाशी वाकली. त्यांनी वरचेवर उचलत म्हणाले, रुख्मिणी, तुझे स्थान माझ्या ह्रदयात आहे.
अगऽ, द्रौपदी केवळ माझी सखी म्हणून तिचे रक्षण केले असे नाही तर, जगातल्या कोणत्याहि स्रीने तेवढ्याच आर्ततेने साद घातली तर तिच्याही रक्षणासाठी असेच धावून जाईल. ते माझे कर्तव्यच आहे. रुख्मिणी, दुर्योधन, दुःशासनाने द्रौपदीच्या वस्राला हात घालून केवळ तिचाच नव्हे तर समस्त स्रीजातीचा, स्रीत्वाचा अपमान केला आहे. द्रौपदी म्हणजेच याज्ञसेनी, प्रत्यक्ष कडकडत्या सौदामीनीच्या प्रतीष्ठेला डंख मारुन स्वतःच्याच हाताने विनाशाची बिजे रोवलीत.
अत्यंत अस्वस्थ मनःस्थितीत असतांना एके पहाटे उध्ववजी व दारुकला घेऊन स्वामी गरुडध्वजारुढ होऊन अज्ञात स्थळी निघून गेले. कुठे गेले? कशाला गेले? किती कालावधीसाठी गेले सारेच अज्ञात आहे. त्यांनी रुख्मिणीलाही कांहीच सांगीतले नव्हते. अमत्यांनी सांगीतले इथल्या राज्यकारभाराची धुरा वाहण्यास युवराजांना सांगीतले. नियती वर भार टाकून रुख्मिणी निवांत झाली. बलरामदादा इथे असल्यामुळे तिला राजकारभारात लक्ष द्यायचे कारण नव्हते. सुभद्रा अभिमन्युसह आलेली एकदमच प्रौढ झाल्यासारखी वागत होती.
दोन मास होत आले तरी तिघांचाही ठावठीकाणा लागला नाही. आतां सर्वांचाच धीर सुटत चालला होता. देशोदेशी, काम्यकवनात पाठवलेले गुप्तहेर हात हलवत परत आले. अगदी अभयारण्याचा परीसर, हिमालयाचा कानाकोपरा धुंडाळला,पण व्यर्थ! थोरले महाराज, दोन्ही माता, पुत्र, कन्या बलरामदादा, रेवतीताई जिचे त्यांचेवर पुत्रवत प्रेम होते सारेच अस्वस्थ, उदास राहू लागले. राण्यांचीही तीच गत झाली होती. ही अवस्था नुसती राजपरिवाराचीच नव्हती तर, त्यांचेवर अलोट प्रेम करणारे लहान मोठे प्रजाजनही दुःखाने वेडे व्हायची वेळ आली होती. त्यांना असलेल्या असंख्य शत्रुपैकी कुणी कपटाने बंदी तर नसेल केले? कांही बरेवाईट तर झाले नसेल? आणखी दोन सप्ताह लोटले. प्रतिक्षेची मर्यादा संपली.
रुख्मिणी व कालिंदी कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन तिच्यापुढे नतमस्तक होऊन कळवळून प्रार्थना करत म्हणाली, माते तूच खरा आधार आहेस. जोवर तूं मार्ग दाखवत नाहीस तोवर मी अन्नपाणी वर्ज्य करुन इथेच अनुष्ठानास बसते.आणि रुख्मिणी पद्मासन घालून आदीशक्तीच्या जपास बसली. कालिंदी तर उभ्यानेच जप करु लागली. कितीतरी काळ लोटला आणि एक प्रकाशवाट दिसली. ती वाट मंदिरातून निघून थेट गुरीवर्य संदीपनींच्या आश्रमापर्यत गेली.
जगन्माता प्रसन्नपणे हसत असल्याचा तिला भास झाला.तिचे ह्रदय चैतन्यमय झाले. जगन्मातेने मार्ग दाखवला होता.
गुरुवर्य संदीपना स्वामी सध्या कुठे आहेत ले नक्की माहित असेल, कारण कोणतेही कार्य, योजना, कर्तव्यकर्म करण्याआधी गुरुंची आज्ञा घ्यावी लागते हा शास्राचा दंडक होता आणि स्वामी ते काटेकोरपणे पाळत होते. जगन्माते विषयी तिच्या मनांत कृतज्ञता दाटुन आली. तीच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक करुं लागली. तोवर कालिंदीचीही समाधी उतरली. आणि दोघींना घेऊन रथ प्रचंड वेगाने आश्रमात पोहोचला. वायुवेगाने धावत जाऊन तिने गुरुदेवांचे पाय धरले. त्यांनी मस्तकावर हात ठेवून आशिर्वाद देत म्हणाले, तुझे मनोरथ लवकरच पूर्ण होईल.
कालिंदीला तोच आशिर्वाद दिला.
गुरुवर्यांनी दोघींनाही आसनस्थ व्हायला सांगून विचारले, बोल रुख्मिणी कोणत्या हेतुने आलीस? गुरुवर्य आपण अंतर्यामी आहांत. आपल्या अनुज्ञेशिवाय स्वामी कोणतेच कार्य करत नाही. त्यांचा ठावठीकाणा न कळल्यामुळे संपूर्ण द्वारका राजपरिवारासह चिंतेत आहे. कांही काळ असच चालले तर, मोठ्या मेहतीने उभारलेले हे साम्राज्य विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. या संधीचा कुणी शत्रूही फायदा घेऊ शकतो. गुरुदेव आपल्याला कळवळून विनंती करते, ते सध्या कुठे आहेत हे सांगीतल्यास आपली आजन्म ऋणी राहीन.ती पुन्हा त्याच्या चरणावर वाकली.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-६-२०२२.
28
*!!!रूख्मिणी भाग-२८!!!*
गुरुदेव रुख्मिणीला उठवत म्हणाले, बाळे… माझा पट्टशिष्य श्रीकृष्ण, उध्वव व सारथी दारुक प्रयागक्षेत्री घोरअंगिरस ऋषींच्या आश्रमात आहे. पांडवावर ओढवलेल्या परिस्थितीत कांहीच करता आले नाही म्हणून त्याचे मन विषादाने भरुन गेले होते. त्याचं निवारनार्थ मीच समर्थ घोरअंगिरस गुरुवर्याकडे पाठविले. आता तो जे ज्ञान प्राप्त करुन घेणार ते संपूर्ण मानवजातीला युगानुयुगं कार्यप्रवृत्त करण्यास उपयोगी पडणार आहे. रुख्मिणी बाळे,प्रत्येक कार्या मागे कांहीतरी कारण नियतीने योजलेलं असते.भविष्यात कांही विशेष भव्यदिव्य घडणार असेल या माझ्या योगेश्वर शिष्याकडून.आतां त्याचं मन शांत झालं असेल. या त्रयींना आणायला युवराजांना पाठव. कालिंदीसह तिने त्वरेने राजप्रासाद गाठला. दुसर्याच दिवशी बलरामदादा, सेनापती मोठ्या सेनेसह प्रयागक्षेत्राकडे रवाना झाले.
जाण्यापूर्वी बलरामदादा कौतुकाने म्हणाले, रुख्मिणी, तूं खरोखरच महाराणी शोभतेस.
एक मासानंतर द्वारकाधीश,उध्ववजी,व सारथी दारुक द्वारकाद्वीपावर प्रगटले. सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रूंचा पूर लोटला. स्वामींना कुठे ठेवू नी कुठे नको असे झाले. प्रजेसमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे हात जोडून माफी मागत म्हणाले, मी कुणालाही, कांहीही न सांगतां गेल्यामुळे आपणासर्वांंना जो मनःस्ताप झाला त्याबद्दल क्षमा करा.
थोडी निरवानिरव झाल्यावर एके दिवशी रुख्मिणीने विचारले, पांडवांना व महाराणी द्रौपदीला या संकटापासून मुक्त करण्यासाठी कोणतं पाऊल उचलणार आहात? कांही योजना आखली असाल ना? रुख्मिणी, इतके दिवसांच्या माझ्या अनुपस्थितीत खोळंबलेली कामे मार्गी लावून , काम्यकवनात जाऊन पांडवांची भेट घ्यायचा विचार आहे. १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासाच्या काळात त्यांनी काय करावे लागेल या बद्दल त्यांच्याशी विचारविमर्श करावा लागेल. झालेल्या अपमानाने दौपदी पेटून उठली असेल, पांचही पांडवांच्या वागण्याने ती संभ्रमीत झाली असेल, तो संभ्रम दूर करण्याचे काम मलाच करावं लागेल.
रुख्मिणी, अजून तिच्यावरील संकटे संपलेली नाहीत दुर्योधन त्यांना हा वनवास व अज्ञातवास सुखाने जगू देणार नाही. कौरवरुपी कलीच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी कृष्णेला आणखी किती दिव्ये पार पाडावी लागेल हे एक नियतीच जाणते. दोन महिने असेच निघून गेले. द्वारकानगरी पूर्ववत स्थिरावल्यावर ऐक दिवस सर्वांना एकत्रीत करुन कृष्ण म्हणाले, मी काम्यकवनात जाऊन पिंडव, द्रौपदी भेट घेऊन त्यांना कांही अडचणी असल्यास त्या समजुन घेऊन त्यांना द्वारकेकडून कांही सहाय्य हवं का हे विचारुन यावं म्हणतोय! थोरले महाराज अश्रूभरल्या स्वरात म्हणाले, कृष्णा, तू माझा पुत्र असल्याचा मलाअभिमान वाटतो. सत्य,न्याय आणि दुष्टांच्या संहारार्थ चक्रासारखा फिरत असतोस. तूं खरोखरीच चक्रवर्ती आहेस. जा बाळा… जा… जातांना उध्वव व दारुक बरोबर आवश्यक अन्न सामुग्री आणि सेना घेऊन जा. पितांश्रीच्या आश्रेनुसार तिघेही काम्यकवनात निघून गेले. द्वारका पुन्हा सुनी सुनी भासू लागली. सुभद्राचा अल्लडपणा जाऊन पुर्णपणे सहनशील पोक्त झाली.तिचे कान काम्यकवनातील बातमी ऐकण्यास आतुरले होते.
बघता बघता दोन मास सरले. काम्यकवनात गेलेली मंडळी परतली होती. सर्व निवांत झाल्यावर, सारा वृतांत सांगायला उध्ववजी रुख्मिणीच्या महाली आले, तिथेच सुभद्रेला व अन्य राण्यांना पाचारण केले. सर्व आल्यावर उध्ववजी सांगू लागले! धौम्यऋषीच्या कुटीसमोरच पांडवांनी आपली कुटी उभारली. धौम्यऋषी राहत असल्यामुळे तिथे नित्य होमहवन,सुस्वर मंगलपठणाने सारं आसमंत पावित्र्याचा वलययाने मन प्रसन्न होते.
पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, इतरांपेक्षा भीम व दौपदी अस्वस्थ दिसले. विशेषतः द्रौपदी… २-३ दिवसांनी कृष्णदादांनी सर्वांना बोलावले. नियतीची इच्छा म्हणून चार भाऊ शांत बसले पण, दुर्योधनाची मांडी फोडून त्या रक्ताने द्रौपदीची वेणी घालायची भीमाने केलेली प्रतिज्ञा लवकर कार्यान्वित व्हावी असे त्याला वाटत होते. दौपदीसुध्दा क्रोधाने पेटली होती. तिचे म्हणणे हे पाच पराक्रमी पती असून माझी होत असलेली विटंबना नुसते पाहत होते. कृष्णा, अरेऽ तू जर वेळेवर धावेन आला नसतास तर, सीतेप्रमाणे मलाही भूमीच्या कुशीत किंवा अग्नीप्रवेश करावा लागला असता.या पांच बंधूंना माझे पती म्हणवून घेण्याचा अधिकार आहे का?
क्रमशः
संकलन © ® मिनाक्षी देशमुख.
दि ८-६-२०२२.
29
*!!!रूख्मिणी भाग-२९!!!*
उध्ववजी पुढे सांगू लागले, द्रौपदीचा सारा देह क्रौधाने व अपमानाने नुसता कापत होता.खरच ते दृष्य ह्रदय हेलावणारे होते. ती आक्रोश करत दादाला म्हणाली, तूं तरी तुझ्या सखीचं बंधुत्वाचं कर्तव्य पार पाडणार आहेस की नाही? ती थोडी शांत झाल्यावर दादा तीच्याजवळ गेले. तिच्या मस्तकावर हात ठेवत म्हणाले, कृष्णे, तुझं दुःख मला कळत कां नाही? मी शाल्व संहारात गुंतल्याचे पाहून कौरवांनी संधी बरोबर साधली.आणि हे सारं घडलय! कृष्णे तुझ्या डोक्यावर हात ठेवून वचन देतो की, तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अपमानाचा सूड घेतल्या जाईल आणि हा सूड तुझे पांचही पती घेतील. तूं पुन्हा इंद्रप्रस्थाची महाराणी होशील.माझ्यावर विश्वास आहे ना? दादाच्या अमृतमय वाणीच्या आश्वासनाने तप्त भूमीवर हलकेच थंड पाण्याचा शिडकावा पडावा तसे द्रौपदीचे झाले. ती निश्चिंत झाली तसेच पांडवही!
यानंतर पांडवबंधू, द्रौपदी त्यांचे जीवन,त्यांच्या समस्या आतां द्वारकेची दुसरी बाजू झाली. द्वारका चहूअंगाने फळली होती. सुख,समृध्दी, शांती, तृप्ती दुथडी वाहत होती. धर्म, मोक्ष काम, अर्थ हे चार पुरुषार्थ समर्थपणे पेलले जात होते.
पुढच्या पिढीने तारुण्यात पदार्पन केले होते. प्रत्येक जण आपापल्या विषयात निपूण होते. यादवपुत्र म्हणून एकी होती. पण प्रद्युम्न व बलरामदादाचे थोरलं पुत्र सोडले तर अन्य राजपुत्र अल्लड, अपरिपक्व वाटत होते आणि हीच गोष्ट रुख्मिणीला खटकत होती. तीने आपल्या मनातील ही टोचणी स्वामींना बोलून दाखवल्यावर, ते म्हणाले, ही बाब माझ्याही लक्षात आली आहे. अग! आपल्याला जगतांना संघर्ष करावा लागला, या मुलांना सारं आयत मिळत असल्यामुळे त्यांची वृत्ती सुखासीनतेकडे वळत आहे. त्यांना योग्य वळण नाही मिळाले तर, गोरसाऐवजी सोमरसाची जर का चटक लागली तर, त्यांचा तर विनाश होईलच, त्याचबरोबर द्वारकासाम्राज्या चा सुध्दा. रुख्मिणी शांत हो! आपल्या इथे असं कांही घडेलसे वाटत नाही.
आकृतीकाका म्हणजे दुसरे नारदच! सतत संचार करणारे.पायाला भोवराच! फरक येवढाच की, नारद कळ लावून गंमत बघतात तर आकृतीकाका’ दुभंगलेली मने जोडण्याचा प्रयत्न करुन निर्णाण झालेल्या गैरसमजातून मुक्त करतात. ते असेच फिरत फिरत द्वारकेत रुख्मिणीला भेटायला आले. सांगत होते, रुख्मीदादाची कन्या रुख्मावती अतिशय तुझ्याहीपेक्षा देखणी आहे. तुला भेटायची तिच्या मनात तीव्र इच्छा आहे. पण काका, रुख्मीदादा हे नातेसंबंध कधीच मान्य करणार नाही. रुख्मिणीऽऽ विवाहाच्या गाठी स्वर्गात म्हणजेच नियतीने बांधलेल्या असतात. “इच्छा तेथे मार्ग ” प्रयत्न करायला काय हरकत आहे? तू ही गोष्ट भगवान कृष्णाच्या कानावर घाल. मी सुध्दा तुझ्या माहेरी प्रयत्नाचे बीज रुजवतो. हा संग जर जुळून आला तर, प्रत्यक्ष लक्ष्मी विष्णूच स्वर्गातून अवतरले असेच सर्वांना वाटेल.
आकृतीकाका मनात आशेचे बीज पेरुन निघून गेले. रात्री एकांतात काकांचे बोलणे स्वारिंच्या कानावर घातल्यावर म्हणाले, पण रुख्मी प्रद्युम्नवर रुष्ट आहे का याचा शोध घ्यावा लागेल. तसं अपवाद वगळता मामाला भाचे नेहमीच प्रिय असतात. स्वामींच्या बोलण्यातून काय निष्कर्ष काढावा हे तिला कळले नाही.
दिवसांमागून दिवस सरत होते.एके दिवशी स्वामींनी सर्व राण्या, राजपुत्र, राजपुत्री सार्यांना आपल्या कक्षात बोलावून म्हणाले, रुख्मीदादाची जेष्ठ कन्या रुख्मावती प्रद्युम्नची पत्नी म्हणून या सुवर्ण द्वारकेत थाटाने विधीवत विवाह करुन लवकरच प्रवेश करणार आहे. रुख्मिणीचा कानावर विश्वास बसेना. क्षणभर काय ऐकले याचे आकलनच झाले नाही. प्रद्युम्नने पायाला स्पर्श केल्यावर ती भानावर आली स्वामींचे सारेच वागणे अतर्क्य! पुढे घटना एवढ्या वेगाने घडल्या की, कुणाला दुसरा विचार करायला वेळच मिळाला नाही.
एका मंगलमय सुमूहूर्तावर विदर्भ देशाची राजकन्या, रुख्मिणीची भाची, स्नुषा म्हणून सुवर्ण द्वारकेत वाजतगाजत प्रवेश करती झाली. तिला जवळ घेतांना रुख्मिणीच्या ह्रदयात मायेचा पूर उचंबळला. नेत्र अश्रूंनी भरुन आले. रुख्मावती आलीच मुळी सोनपावलांनी. तिच्या पाठोपाठ सातही राण्यांच्या जेष्ठ सुनांनी राणीद्वीपांवर पाऊल ठेवले. राणीवसा तरुणाईच्या चैतन्याने भरुन गेलं.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-६-२०२२.
30
*!!!रूख्मिणी भाग-३०!!!*
श्रीकृष्ण द्वारकेतील नित्य कर्मे, नैमितिक कार्ये, आर्थिक, राजकिय, धार्मिक कार्ये पार पाडत असतानांही काम्यकवनाकडे त्यांचे बारीक लक्ष होते. या पांच वर्षात स्वतः तिकडे गेले नसले तरी कुणी ना कुणी महत्वाची व्यक्ती जाऊन पांडवांचे क्षेमकुशल विचारुन येत. कांही दूत आळीपाळीने तळ ठोकून होते. कांही हेर हस्तिनापूर व मित्र राज्यातही पेरुन ठेवले होते. खरच स्वामींना सर्वसाक्षी म्हणतात हे पुर्णतः सत्य आहे.
मध्यंतरी बलरामदादा, रेवतीताई, सेनापती,अमात्य काम्यकारण्याला भेट देऊन आले होते. सर्वात जास्त द्रौपदी बद्दल वाईट वाटे. तिच्या मागचे नष्टचर्य कधी संपणार कोण जाणे? कांही दिवसांपूर्वी जयद्रथने तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. या घटनेचा परिणाम पार्थाच्या मनावर झाल्यामुळे तो पाशुपत्तास्र प्राप्त करण्यास्तव साधनेसाठी उत्तरेकडे गेला व ते अस्र प्राप्त करुन आला.
एकदा बोलण्याच्या ओघात स्वामी म्हणाले, प्रद्युम्न व रुख्मावतीच्या विवाहात पांचालदेशाचे नरेश द्रुपदराजाचा फार मोठा सहभागा आहे. त्यांनी तुझ्या पित्याचे मन वळवले व त्यांनी रुख्मादादाचे.म्हणून हा विवाहयोग जुळून आला. खरच किती मी भाग्यवान, माझे मनोरथ पूर्ण करण्यासाठी मेहुण्याविषयी मनातील वैरभाव विसरुन, त्याला क्षमा करुन, सखी द्रौपदीकडे शब्द टाकणारे स्वामी थोर की, प्रिय कन्या द्रौपदीचा शब्द राखण्यासाठी तातांकडे शब्द टाकणारे पांचाल नरेश थोर?
दीर्घ काळानंतर पांठवांनी काम्यकवनाचा त्याग करुन द्वैतवनात रहायला गेले. त्यांचेबरोबर धौम्यऋषीही गेले. पांडवांना भेटायला स्वामी, उध्ववजी, सत्यभामा, दारुक,सेवक आणि निवडक सैन्यासह द्वैतवनात गेले. स्वामी एवढ्या तातडीने गेले म्हणजे निश्चितच कांही महत्वाचे काम असेल हे निश्चित. ठरल्या मुहूर्तावर सारी मंडळी द्वारकेस परतली. तिला उध्ववजीकडून कळले की, पांडवांच्रा अज्ञातवासाची योजना स्वामींनी फार विचारपूर्वक आखली. विराटराजाकडे पांचही बंधू व द्रौपदी वेगवेगळ्या भूमिकेत, वेगवेगळ्या नांवानी एकाच
ठीकाणी वावरतील. प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळी जातील.एक वर्षाचा काळ चुटकीसररशी निघून जाईल. ही अद्भूतपूर्ण योजना ऐकून स्वामींची अफाट बुध्दीमत्ता, चातुर्य, योग्य निर्णय क्षमता, समयसुचकता, पांडवांविषयी गाढ प्रेम असे अनेक गुण प्रकट होत होते.
एकाचवेळी एकच व्यक्ती किती व्यवधाने अगदी सहजतेने सांभाळीत होते.
म्हणूनच त्यांच्या या गुणांनीच त्यांना भगवान श्रीकृष्णाची उपाधी प्राप्त झाली होती.
सर्वांचे लक्ष आतां पांडवांच्या अज्ञातवासाकडे लागले असतांनाच अनपेक्षितपणे पुन्हा वादळ उठले. जाबवंतीचा पुत्र सांबाने कुणालाही न कळवता दुर्योधन कन्या लक्ष्मणाचे अपहरण केले. दुर्योधनाने चिडून सांबला कैदेत टाकले. त्यावेळी स्वामी द्वारकेत नव्हते. बलरामदादाने दुर्योधनास आज्ञा केली, सांबला मुक्त करुन दोघांचा विवाह लावून दे. दुर्योधनाने गुरुआज्ञेचे पालन करुन हा विवाह द्वारकेत थाटात संपन्न झाला. स्वामींना हा विवाह कितपत रुचेल ही शंकाच होती. कारण एकीकडे दुर्योधनाशी सोयरीक, तर त्याचवेळी कृष्णेला तुझ्या अपमानाचा बदला घेतला जाईल हे वचन देणे.
स्वामींची निवांत भेट झाल्यावर रुख्मीणीनं ही शंका बोलून दाखवल्यावर गंभीर होत कृष्ण म्हणाले, सांबने केलेला अविचार दादांना निस्तरणे भाग होते. कृष्णेची समजूत काढण्यासाठी अमात्यांना पाठवले आहे. कौरव सुखासुखी इंद्रप्रस्थ परत करेल असे वाटत नाही. “महाभारत” घडण्याचीच जास्त शक्यता दिसते.
पांडवांचा बारा वर्षाचा वनवास संपून अज्ञानतवासाला सुरुवात झाली. स्वामींच्या योजनेनुसार अत्यंत गुप्तता पाळल्या गेली. अवघ्या भारतखंडाचे लक्ष पांडवांच्या अज्ञातवासाकडे लागले होते. उत्कंठा शिगेला पोहचली होती. अश्विनशुध्द दशमीच्या आधी दोनतीन नवरात्रीच्या शुभ काळात त्यांच्या अज्ञातवास संपणार होता.अज्ञातवासाचा काळ म्हणजे अदृष्य कारागृहच, एक दुष्ट पर्वच नाही कां? आतुरतेने प्रतिक्षेचा एक एक क्षण मोजत असतांनाच वार्ता आली की, प्रचंड सेनेसह दुर्योधनाच्या नेतृत्वाखाली आचार्य द्रोण, पितामह भीष्म विराट नगरीकडे निघाले आहेत. प्रथम स्वामी थोडे निराश वाटले. पण लगेच त्यांची चर्या प्रसन्न झाली. मनात कांही अंदाज केला आणि उध्ववजी म्हणाले, चिंतेचे कारण नाही. कौरव विराटनगरीत पोहचेपर्यंत पांडवांचा अज्ञातवासाचा काळ संपलेला असेल. उलट ते विराटराजाच्या बाजूने पराक्रम गाजवून त्यांच्या उपकाराची अल्प प्रमाणात कां होईना उतराई होऊ शकतील.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ८-६-२०२२.
–









