रूख्मिणी चरित्र भाग ५, (२१ ते २५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


            श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता……..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! रूख्मिणी चरित्र !!!

*!!!रूख्मिणी भाग-२१!!!*

           रुख्मिणीच्या लक्षात आले, तिची धाकटी नंनद सुभद्रा धनंजयाकडे आकृष्ट झाली असून, स्रीसुलभ लज्जा व एक वेगळीच ओढ लागल्याचे दिसत होते. मनात आले, खरच हा विवाह झाला तर स्वामींना सर्वाधिक हर्ष होईल.त्यांचे सुभद्रे वरील भगिनीप्रेम सार्‍यांनाच माहित आहे. आणि दुसरीकडे प्रिय मित्र! पण हे कसे शक्य व्हावे? हस्तिनापूर युवराज दुर्योधन बलरामदादांचे लाडके शिष्य.सुभद्रेचा विवाह त्याच्याशी जजवळ जवळ निश्चित! त्याचा पांडवाप्रती असलेले वर्तन, कपटी स्वभाव,दुष्टपणा,उध्दटपणाच्या स्वभावाचा असल्याने स्वामी आपली लाडकी बहिण दुर्योधनाला देतील का पण बलरामदादा प्रतिष्ठेचा प्रश्न करुन आपला हट्ट सोडतील का? रुख्मिणीचे मन उलटसुलट आवर्तनात फिरु लागले.

बघता बघता धनंजयाचा दोन सप्ताहाचा मुक्काम संपला आणि इंद्रप्रस्थाला जाण्यास प्रस्थान ठेवले. त्याने आपल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली होती,भुरळ घातली होती.

‌               इंद्रप्रस्थाला जाण्याची सिध्दता वेगाने सुरु  झाली. आम्ही आठही राण्या जाऊ म्हटल्यावर सर्वांत जास्त आनंद कालिंदीला झाला.कारण तिचे माहेर तिकडेच होते. पण सर्वांना जाऊन चालणार नव्हते. इथला कारभार पाहण्यासाठी कुणीतरी थांबणे आवश्यक होते.हे जाणून जाबवंती म्हणाली, महाराणी, स्वामींच्या अनुपस्थितीत इथला कारभार नेहमी तुम्हीच सांभाळता. यावेळी द्वितिय पत्नी म्हणून मला संधी द्या. रुख्मिणीला तिचे कौतुक आणि अभिमान वाटला. मनात आले द्वारकेत आली तेव्हा वनकन्या,लाजरीबुजरी, नागरी संस्कारापासून वंचित, आदीवासी वेष, भाषा सारंच वेगळे आणि आतां एक परिपक्व विचारांची समजूतदार स्री द्वारकाधीशांची द्वितिय पत्नी निर्भिडपणे सांगते की, तुम्ही सातही जणी जा.मी इथला कारभार सांभाळते.

             इंद्रप्रस्थाचा प्रवास खूप दूरचा असल्यामुळे,मुलंंबाळं, स्रीयांच्या सुरक्षेसाठी सैन्यही आवश्यक होते.पूर्ण तयारी होत असतानाच एक दिवस सत्या येऊन रुख्मिणीला म्हणाली, ताई वयोमानानुसार थोरले महाराज व दोन्ही माता राज्यरोहनासाठी जाणार नाही.त्यांच्या सेवेसाठी व राणी जाबवंतीच्या मदती साठी मी इथेच थांबेन म्हणते. रुख्मिणी अचंबाने बघतच राहीली. कांही दिवसांपूर्वी बालिश प्रश्न विचारणारी,महाराणी ऐवजी ताई म्हणू का म्हणून विचारणारी, जाबवंतीपासून थोडी दूरच राहणारी सत्या आज विचारत होती,तीच्या सहाय्यासाठी थांबू कां? रुख्मिणीला खूप आनंद झाला.

              गुरुवर्य सांदीपनींनी काढून दिलेल्या शुभ मुहूर्तावर, सर्वांनी इंद्रप्रस्थासाठी प्रस्थान केले.रुख्मिणीचा पाय निघत नसलेला पाहून देवकीमाता म्हणाल्या, अगऽऽ रुख्मिणी किती चिंता करशील? निःशंक व आनंदी मनाने जा.इथला प्रत्येक व्यक्ति तुझ्या मार्गदर्शनाने परीपूर्ण झाला आहे.चिंता नको करुस. नकळत तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना पुन्हा वंदन करुन नौकेकढे वळले.

              तिला आठवण झाली,तिच्या आणि स्वामींच्या कौंडण्यपूर ते द्वारका प्रवासाची. त्यावेळची तारुण्यसुलभ, स्वामीप्राप्तीचे समाधान, तृप्ती, विश्वास, माहेरचे तुटलेले संबंध, रुख्मीदादाचे भय, द्वारकाविषयीची उत्सुकता अशा अनेक भावनांचा कल्लोळ मनात उठला होता. आणि आज? परिपक्व विचारांची, द्वारकेची अनभिषिक्त महाराणी, आप्तांना प्रेमाने बांधून ठेवणारी स्री, पुत्रांची माता, वहिनी, सून, कामरुप देशांच्या स्रीयांचा आधार, प्रसंगी योग्य निर्णय घेणारी समर्थ शासक! आयुष्यात किती भूमिका पार पाडाव्या लागतात.

            यात्रा दरम्यान शक्यतो कोणत्याही राज्यात न थांबता वस्तीबाहेरच मुक्काम होत होता. इंद्रप्रस्थ यात्रा  वेगाने रोज अनेक योजने अंतर कापत होती. तरी सुध्दा विराट नगरी नाही टाळतां आली. तिथल्या राजाच्या आग्रहाने दोन दिवस मुक्काम करावाच लागला. निघतेवेळी राजा म्हणाले, अन्यायासाठी धावून जाणार्‍या, हे थोर योगेश्वरा, कधी गरज पडलीच तर प्राणाची बाजी लावून सहाय्यार्थ धावून येऊ. सर्वांनाच इंद्रप्रस्था चे वेध लागले होते.

           इंद्रप्रस्थाच्या वेशीवर स्वतः धर्मराजा युधिष्ठीरासहित पांचही पांडव महाराणी द्रौपदीसह अनेक मान्यवर आले. मंगल वाद्यांच्या आणि यादवांच्या जयजयकाराने आसमंत दणाणून गेला. सर्वांचे पुष्पमालेने स्वागत झाले. सर्वजणं इंद्रप्रस्थात मुक्कामाच्या प्रासादाकडे निघाले. ही इंद्रप्रस्थ नगरी  जणूं सुवर्ण नगरीची धाकटी बहिणच! महाद्वारात शुभ्र वस्र परिधान केलेल्या राजमाता कुंतीबरोबर पंचारतीच तबक घेऊन पांच सुवासिनी स्वागतासाठी उभ्या होत्या.

                    क्रमशः
      संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                      दि. ६-६-२०२२.

22

*!!!रूख्मिणी भाग-२२!!!*

              थोड्याच वेळात सारे राजप्रासादात पोहोचलले. समारंभाची सर्व सिध्दता झाली होती. द्वारकेच्या सहाही राण्यांकडे अतिथींच्या व्यवस्थेची कामगिरी सोपवली. तिकडे बलरामदादा, उध्वजी व श्रीकृष्णाकडे हेच काम सोपवले. दुसरे दिवशी पंचनद्यांच्या जलाच्या अभिषेकात ऋषीमुनींच्या मंत्रघोषात व आशिर्वादात दुष्ट लागण्यासारखा कार्यक्रम सपन्न झाला.आतां द्वारकेस परत जाण्याचे वेध लागले, पण कुंतीमातेच्या आग्रहाने आणखी चार दिवस थांबावे लागले. रुख्मिणीच्या व द्रौपदीच्या मनमोकळ्या गप्पा व अंतरीच्या गुढ वार्ता झाल्यात. रुख्मिणीला माहेरपण भोगल्यासारखे वाटले. निरोप घेतांना सर्वांनाच जड गेले. आतां पुर्नभेट कधी? हा प्रश्न सर्वांच्याच मनात आल्यावर श्रीकृष्ण म्हणाले,लवकरच योग येणार आहे.

             कालिंदी, भद्रा, विंदा व लक्ष्मणा त्यांच्या माहेरी गेल्या होत्या.बाकीच्यांनी द्वारकेत मोठ्या उत्साहाने प्रवेश केला. इंद्रप्रस्थाहून परत आल्यापासून एरवी मुक्तपणे खळखळून हसणारी सुभद्रा एकदम उदास भासत होती. तिने आपले हास्य धनुर्धराजवळ ठेवून आली होती.

याबाबतीत इतरांशी बोलण्या आधी स्वामींजवळ बोलण्याचा तिने निश्चय केला.एका चांदण्या रात्री दोघेच सागरकिनार्‍यावर फिरायला गेले. तेथील एका उंच खडकावर बसले असतां तिचा गंभीर चेहरा बघून स्वामी म्हणाले, रुख्मिणी कांही समस्या उद्भवली का?येवढी गंभीर झालीस? स्वामी इंद्रप्रस्थाहून आल्यापासून आपली लाडकी सुभद्रा खाण, पिणं, मोकळं बोलणं सारचं विसरली.ती आपल्यातच हरवल्यासारखी असते.हे तिचे वयच आहे. स्वामी म्हणाले, माझ्याही लक्षात आले आहे. सुभद्रा व पार्थ एकमेकांवर अनुरक्त आहेत.पण बलराम दादाने आधीच त्यांचा लाडका शिष्य दुर्यैधनाची तिच्यासाठी निवड केली आहे. त्यांना विरोध नाही करतां येणार. स्वामी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. ते शिघ्रकोपी, दुराग्रही आहेत. ते पार्थाशी विवाह करुं देणार नाही. चिंता नको करुस. काढतो कांहीतरी मार्ग!

              एक दिवस श्रीकृष्ण म्हणाले, रुख्मिणी, सुभद्रेला दैव अनुकुल दिसतेय. द्रोपदीच्या संदर्भात कौटुंबिक नियमाचा आज्ञाभंग झाल्यामुळे, अर्जुनाला एक वर्षासाठी शिक्षा म्हणून तीर्थयात्रेला जावे लागत आहे. त्याला मी आधीच सोमनाथला संन्यासाच्या वेषात तप  करण्यासाठी जाण्याचा गुप्त संदेश दिला आहे. तो तिथे गेला की, तूं धाकट्या राण्यांना घेऊन सुभद्रेसह त्या तपस्व्याच्या दर्शनाला जा. ठरल्याप्रमाणे त्या सर्व तिथे पोहोचल्या. सुभद्राने सन्यासाच्या रुपातील पार्थाला नमस्कार केल्यावर, मिटल्या डोळ्यानेच आशिर्वाद देत म्हणाला बालिके तुझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी पोर्णिमेला जगन्माते च्या दर्शनासाठी रैवतक पर्वतावर जा. सुभद्रा मनोमन आनंदी होऊन सार्‍याजणी द्वारकेत परतल्या.

              इकडे दोन्ही भाऊ  सुभद्राविवाहाची आखणी करुं लागले. बलरामदादाने पोर्णिमेनंतरच्या पंचमीचा मुहूर्त काढल्याचे दुर्योधनाला कळवून विवाहासाठी विधीवत आमंत्रण धाडले. त्यानुसार दुर्योधन त्रिदल सैन्य, आप्त,  स्नेही सहित सुसज्ज सिध्दतेनुसार द्वारकेस येण्यास निघाला. राजमहाल, राजमार्ग, मंदिरे, द्वारकानगरी सुशोभित करण्याच्या कामाला वेग आला. दुसरीकडे श्रीकृष्ण आपली गुप्त योजना कार्यान्वित करण्यासाठी वेगाने लागले होते.

             ठरल्याप्रमाणे पोर्णिमेला रेवतीताई, रुख्मिणी,सुभद्रा  तिच्या सख्या, राजपुरोहित रैवक राज्यात, रेवताताईंच्या पित्याच्या साम्राजात सकाळीच पोहोचले. परंपरेनुसार त्यांचे यथोचित स्वागत झाले. दुसर्‍या दिवशी पहाटेच सार्‍याजणी तयार होऊन राजप्रासाद ते आदीशक्ती मंदिर असा रथातून प्रवास झाला. मंदिरात पोहोचल्यावर देवीचे दर्शन घेतल्यावर त्या ध्यानमंदिराकडे जायला निघाल्या असतां राजपुरोहिताने  मनाई केली, कारण तिथे कोणी योगी पुरुष कुणालाच दर्शन देत नाही.मग सुभद्रेने राजपुरोहिताच्या मार्गदर्शनाखाली विधीवत पुजा केली व प्रसाद ग्रहण करुन त्या सर्व गाभार्‍या बाहेर मंदिरात आल्या. सर्वजणी मंदीराची शिल्फकला,भव्यता  बघण्यात दंग होत्या. रुख्मिणी व सुभद्रा पायर्‍या उतरत होत्या. तोच चार अश्वांचा सुवर्णरथ जवळ आला.पार्थाने तिचा हात धरुन रथात ओढले आणि वायुवेगाने रथ निघून गेला. आणि रुख्मिणीने जोरात किंकाळी फोडल्याबरोबर राजपुरोहितासह सारे धावून जवळ आले असता, काय झाले म्हणून विच्यारल्या वर ती मुखातून सन्यासी… सुभद्रा.. एवढेच शब्द उच्चारत होती.

                      क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. ७-६-२०२२.

23

*!!!रूख्मिणी भाग-२३!!!*

             काय झाले कुणालाच कळत नव्हते. आणि रुख्मिणी?  रथ दूर जाण्यास जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून खूप घाबरल्याचे नाटक छान वठवत होती. तिला प्यायला पाणी दिले, थोडी शांत झाल्यावर, काय झाले विचारल्यावर ती म्हणाली, डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच वेगाने एक रथ येऊन सभद्राहरण झाल्याचे सांगीतल्या बरोबर वार्ता वायुवेगाने पसरली.स्वतः कुक्कादिम्न महाराजांनी संन्यासाचा रथ गेल्या दिशेने पाठलागाच्या आज्ञा दिल्या. मधे बराच वेळ गेल्यामुळे रुख्मिणी निश्चिंत झाली.कृष्णांनी आधीच इंद्रप्रस्थाच्या मार्गाने जाण्यासाठी आधीच गुप्त स्थळे निश्चित करुन आवश्यक सुरक्षाव्यवस्था केली होती.

               सुभद्राशिवाय सर्वजणी द्वारकेत परतल्या. वार्ता ऐकून, बलरामदादाने क्रोधाने आकाशपाताळ एक केले. त्यांनी उध्वजींना व श्रीकृष्णाला बोलावले. नेहमीप्रमाणेच उध्ववजी शांत होते. श्रीकृष्ण दादांना शांत करीत म्हणाले, दादा  सुभद्रा आपली सर्वांचीच लाडकी ना? दादा, शांत मनाने विचार कर. पती निवडण्याचं, स्वयंवराचं स्वातंत्र्य राजकन्यांना आहे ना? तुंच म्हणतोस ना? प्रत्येकाच्या ललाटरेषा आधीच ठरलेल्या असतात. तो सन्यासी दुसरा तिसरा कोणी  नसून, ज्याची कीर्ती त्रिखंडात गाजत आहे तो धनुर्धर पार्थ आहे आणि हे हरण सुभद्रेच्या इच्छेने झाले आहे तेव्हा दुर्योधन इथे येऊन अपमानित होण्यापेक्षा त्याला सत्य घटना कथन कर. तो तुझा परमशिष्य असल्यामुळे प्रश्न उद्ववणार नाही.

                घुमसत का होईना दादा स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे वागले.कांही दिवसांनी इंद्रप्रस्थात अर्जुन-सुभद्रा विवाह थाटात संपन्न झाल्याची वार्ता आली. कृष्ण-रुख्मिणी कडून एक मोठं कर्तव्य पार पडल्यामुळे समाधानी,कृतार्थ झाले.या विवाहामुळे  एकीकडे कर्तव्यपूर्तीचा आनंद होता तर, दुसरीकडे तिच्या अस्तित्वाची उणीव भासत होती. ही घटना सोडली तर, बाकी सर्वीकडे आनंदात काळ जात होता. आठही राण्यांच्या १०-१० अपत्यांनी राणीवसा फुलून गेला होता. द्वारकेची कीर्ती दशदिशा पसरली होती. पृथ्वीवरील एक आदर्श राज्य म्हणून द्वारकेकडे पाहल्या जात होते.

               तिकडे पांडवांचे इंद्रप्रस्थ राज्यही चांगलेच स्थिरावले होते. राजसूय यज्ञ करायचे निश्चित झाल्यामुळे दिग्विजयाचे अश्व चौफेर यश संपादन करुन विजयीसेना धन, सुवर्ण, रत्नांचे भांडार, पशुधन, धान्याचे विपूल साठे पांडवांच्या संपतीत भर घालत होते.

             अलिकडे उध्ववजी व स्वामी कोणत्यातरी विषयावर गंभीर वार्ता करतांना दिसल्यामुळे, एक दिवस रुख्मिणीने विचारल्यावर, गंभीर स्वरात कृष्ण म्हणाले, रुख्मीणी, नरकासुरासारखाच आणखी एका दुष्ट खलप्रवृत्तीचा नायनाट करायचा आहे.त्याच्या भरलेल्या पापाचा घडा फुटायलाच हवा. कोण आहे? जरासंध! त्याने “नरेश बळी महायज्ञ” करण्या साठी १०१ राजांना कारागृहात ठेवले. त्यांना यज्ञात बळी देण्यापुर्वीच सक्तीचे पाववे उचलून, फार विचारपूर्वक गुप्त योजना आखावी लागणार आहे. हे संभाषण आपल्यातच असू दे.म्हणजे जरासंधाचे दिवस भरले तर? हा जरासंध यादवकुळा चा पुराणशत्रु. त्याच्या सतरा स्वार्‍या युवावस्थेत स्वामींनी परतवल्या होत्या. त्याच्यामुळेच मथुरा सोडावी लागली होती. आपल्या विवाहाच्या वेळीही त्याने बरीच खेळी खेळला होता. त्याचवेळी स्वामींनी त्याचा बंदोबस्त केला असतां तर आज  “नरबळी” ठरणार्‍या नरेशांना जिवंतपणी मृत्युला तोंड द्यावे लागले नसते.

           पण जेव्हा जे घडायचे ते तेव्हाच घडते. एके दिवशी दारुकासमवेत स्वामी बलरामदादांना मुद्दामच कांही न कळवतां गरुडध्वजारुढ होऊन इंद्रप्रस्थाकडे रवाना झाले. दोन महिन्याने वार्ता आली, सतत तेरा दिवस भीमसेन व जरासंधाचे गदायुध्द होऊन शेवटी त्याला यमसदनाला पाठवले नेहमीप्रमाणेच आपल्या अलिप्त,निरिच्छ वृत्तीने मगधचे विशाल राज्य  जरासंधाचा पुत्र सहदेवच्या स्वाधीन केले.आणि बंदीस्त राजांची बंदीवासातुन सुटका केली.

           श्रीकृष्ण द्वारकेत पोहोचल्यावर प्रजेने त्यांचे न भूतो न भविष्यती असे भव्य स्वागत केले. जरासंधाच्या मृत्युमुळे एक दुष्ट पर्व संपले. या आनंदाबरोबरच एक आणखी आनंदवार्ता आली.इंद्रप्रस्थात होणार्‍या राजसूय यज्ञाचे सर्वांसाठी आमंत्रण  आले. यज्ञाला जास्त अवधी नसल्यामुळे इंद्रप्रस्थाला जाण्याची तयारी वेगात सुरु झाली.

                      क्रमशः
    संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि.  ७-६-२०२२.

24

*!!!रूख्मिणी भाग-२४!!!*

              यज्ञाला अवधी कमी असल्यामुळे लवकर पोहचण्या साठी अनर्त,भृगुराज्य,अवंती, कुंतीभोज, पांचालमार्गे इंद्रप्रस्था ला पोहोचलो. यावेळी द्रौपदी, सुभद्रा व्यतिरिक्त अन्य राण्यांना बघण्याचा योग आला. त्या सहसा माहेरीच असतात. या मंगलमय यज्ञप्रसंगी माहेरच्या आप्तांसह आल्या होत्या. इंद्रप्रस्थ सीमेवर सर्वचजणी स्वागतासाठी आल्या होत्या. सर्व वातावरण उत्साहाने व आनंदाने भारलेले होते. सुभद्रेकडे पाहून मन सुखावले. तृप्त पत्नी, मातृत्व लाभलेली छोट्या अभिमन्युची माता, धनुर्धराची पत्नी या नात्याने ती यज्ञस्थळी वावरत होती. आम्हाला बघून घाईघाईने येऊन गळ्यात पडली. कृष्णानेही तिला जवळ घेतले. बलरामदादाजवळ जरा भित भितच गेली. त्यांनी पण मागचे विसरुन तिला जवळ घेतले.

              दुसर्‍या दिवशी परमभाग्याचा क्षण म्हणजे, पती बरोबर रुख्मिणीलाही अग्रपुजेचा मान मिळाला. या आनंद प्रसंगी चेदीराज शिशूपालही राहणार होता. अभिषिक्त नसले तरी, या विश्वाचे अनभिषिक्त सम्राटाची पत्नी आहे हे त्याला जाणवून द्यायचे होते.

               पहाटे लवकरच जाग आली.एवढी गडबड असूनही कामात शिस्त होती. रुख्मिणी तयार होऊन स्वामींसह यज्ञस्थळाकडे निघाले. तिथे देशोदेशीचे राजे, महाराजे, अनेक कुलगुरु, ऋषिमुनी आसनस्थ झालेले होते. यज्ञकुंड प्रज्वलित झालेला, पवित्र आणि मंगलमय मंत्रोच्चाराने वातावरण भारुन गेले होते.

            निर्देशित आसनावर असनस्थ झाल्यावर रुख्मिणीने सहज सभामंडपात दृष्टी टाकली. महर्षी व्यास, पितामह भीष्म, विदूर, दुर्योधन, दुःशासन, अंगराज कर्ण आणि शिशूपालकडे लक्ष जाताच ती दचकली. तो एकटक स्वामींकडे बघत होता. त्याच्या चेहर्‍यावरच्या भावात काय नव्हते? स्वामींविषयी क्रोध, संताप, द्वेष मत्सर चर्या लाल झालेली, नेत्रातून सूडभावनेच्या ठीणग्या बाहेर पडत होत्या. असे वाटत होते, तो कोणत्याही क्षणी शस्र घेऊन स्वामींवर हल्ला करेल. स्वामींना कां दिसलं नसेल? पण मनातील भाव चेहर्‍यावर उमटू न देण्याचे कसब त्यांच्या ठायी होते. योग्य वेळ आल्यावरच ते काय करायचे पाहून घेतीलच! रुख्मिणी आपल्या विचारांतून बाहेर आली तोच स्वतः युधिष्ठीर महाराणी द्रौपदीसह येतांना दिसले. त्यांच्या विनंतीनुसार अग्रपुजेसाठी निर्देशित केलेल्या आसनावर स्वामीं सह रुख्मिणी स्थानापन्न झाली.

‌              अग्रपुजेची विधी सुरु झाली. यज्ञकुंडात समिधा  पडू लागल्या. रुख्मिणीने सहजच स्वामींकडे बघीतले तर तिला काय दिसले? शंख,चक्र,गदा,पद्मधारी, सभोवती दिव्य प्रभा पसरलेली तेजःपुंज प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूच, नारायण चैत्यन्यमूर्ती तिच्याकडे बघून मंदस्मित करत होते. क्षणात भानावर आली. पुन्हा बघितले तर, पुर्ववत स्वामी दिसले. तिला प्रश्न पडला, स्वामी म्हणजे कोण? सृष्टीचे पालनककर्ते प्रत्यक्ष नारायण ? तर मी कोण? जणूं प्रत्यक्ष विष्णू संदेश देत म्हणत आहे, रुख्मिणी संकोच करु नकोस. ही पाद्यपुजा तुझी नसून  हे वरवर दिसणारे उपचार आहेत. प्रत्यभाव ही पुजा आहे, चैतन्याची, आदिशक्तीची. क्षणभर कां होईना तिला प्रत्यक्ष विष्णूचे दर्शन घडले होते.

           पुजेची पुढील विधी सुरु करणार तोच गर्जनेसह शिशूपालचा आवाज आला. कृष्णा थांब! हा मान स्विकारण्याची तुझी योग्यता नाही. मी जिवंत असेपर्यंत हा मान तुला कदापि मिळू देणार नाही. यादवांचे सेनापती व पांडव क्रोधाने थरथरत शस्रे उगारुन त्याच्याकडे जाण्यास सिध्द झाले असतां, स्वामींनी त्यांना थांबण्याची खूण केली. जेष्ठ मंडळींना शांत राहण्यास सांगीतले.

आपल्या बोलण्याची कोणतीच प्रतिक्रीया उमटली नाही बघून शिशूपाल वाटेल तसे अपशब्द बोलुन तोंडसुख घेऊ लागला. क्षणापूर्वी शांत असलेला स्वामींचा चेहरा रागाने लाल झाला. गर्जत म्हणाले, तुझ्या पापाचे घडे भरलेत.तुझे शंभर अपराध पूर्ण झाले. तुझ्या आई ला दिलेल्या वचनातून मुक्त झालो. डोळे मिटून मनात मंत्रोचार केला आणि क्षणात सुदर्शनचक्र त्यांच्या बोटावर आरुढ होऊन फिरु लागले. प्रचंड वेगाने ते तेजस्वी चक्र शिशूपालकडे झेपावले. तो वाट फुटेल तिकडे पळणार्‍या शिशूपालचा त्या दिव्य चक्राने वेध घेतला व शिरच्छेद झाला. पुन्हा ते चक्र बोटावर येऊन स्थिरावले. पृथ्वीवरील आणखी एका दुष्ट प्रवृत्तीचा  विनाश झाला.

                        क्रमशः
        संकलन व © ®   मिनाक्षी देशमुख.
                      दि. ७-६-२०२२.

25

*!!!रूख्मिणी भाग-२५!!!*

          पांडवांचा राजसूय यज्ञ ‘न भूतो न भविष्यती ‘ अशा वैभवी स्वरुपात संपन्न झाला. उपस्थितांच्या नेत्राचे पारणे फिटले. राजसूय यज्ञ संपन्न झाल्यावर द्वारकावासी सुवर्ण द्वारकेकडे निघाले. अर्ध्या प्रवासात असतांनाच क्रोध आणणारा वृतांत कळला. द्वारकेत श्रीकृष्ण, बलराम, उध्वव नसल्याची संधी साधून, जरासंधाच्या गटातील अर्बूज साम्राज्याच्या मर्तिकावती राज्याच्या शाल्वाने डाव साधला. त्याच्याजवळ असलेल्या चार विलक्षण गतिमान वायुमानाच्या सहाय्याने त्याने आपली सेना  द्वारकाद्वीपवर उतरवली. जवळ जवळ एक मास आपल्या अधिपत्याखाली प्रद्युम्नने अन्य बंधूंच्या सहाय्याने, सेनेसह शर्थीने युध्द करुन शाल्वाच्या सेनेला पळवून लावले. पांडवांच्या राजसूय यज्ञात व्यत्यय नको म्हणून त्याने कळवले नव्हते. ही वार्ता ऐकुन कृष्ण गंभीर झाले. सुरक्षेच्या दृष्टीने द्वारकाद्वीप अतिशय मजबूत होते. तटरक्षक दलही निष्णात व प्रामाणिक होते. असे असूनही हा प्रसंग उद्भवला. त्याचा बंदोबस्त करणे अत्यंथ आवश्यक होते. रथाचे अश्व वेगाने दौडत ठरलेल्या तिथीच्या आधीच द्वारकेला सारे पोहोचले.

           पोहोचल्याबरोबर संध्याकाळी सभा बोलावली. पराक्रमी सैनिकांचा सत्कार व युध्दात कामी आलेल्या सैनिकां च्या कुटुंबाची व्यवस्था लावण्यात आली. जवळजवळ महिना भर युध्द चालल्यामुळे द्वारकेच्या सैनिकांची व संपत्तीची फार मोठी हानी झाली. गंभीर स्वरात  स्वामी म्हणाले, आतां प्रथम काम हाती घ्यायचे ते, जरासंध व शिशूपाल सारखे शाल्वाचे उच्चाटन करणे. आणि मी ते लवकरच करणार. स्वीमींच्या शब्दावर सर्वांचाच गाढ विश्वास होता. केवळ आठ दिवसांत शाल्वाच्या पारिपात्याची योजनेचा आराखडा तयार झाला. या वेळी  युध्दावर जाण्यासाठी कांही स्वतःचे पुत्र, बलरामदादाचे पुत्र व अन्य यादवांचे तरुण पुत्र सोबत घेतले. या तरुणांचे देश भक्ती प्रेमाने व पराक्रम गाजवण्यासाठी त्यांचे  रक्त सळसळत होते.बाहु स्फुरत होते. स्वामींनी गुप्त सभा घेऊन त्यांना योजना समजावून सांगीतली. या तरुण युवकांना औक्षण करतांना त्यांच्या मातांच्या एका डोळ्यात अभिमान तर दुसर्‍या डोळ्यात आसू होते. ते पाहून त्यांना आश्वास्त करत म्हणाले हे युध्द समोरासमोर नसल्यामुळे निर्धास्त राहावे.

             स्वामींनी योजनाच अशी आखली होती की, शाल्वाचा निःपात होणेच आहे. योजनेनुसार असा गाजावाजा केला की, कामरुप नरेश भगदत्तच्या आमंत्रणानुसार सोबत बलरामदादा, उध्ववजी  व तरुणपिढीला माहीती व्हावी म्हणून त्यांना घेऊन शिकारीसाठी कामरुप, मजीपूर वंग येथे जाणार. ही बातमी शाल्वाला समजल्यावर त्याला अतिशय आनंद झाला. यावेळी द्वारकेत कुणीच नसल्यामुळे, झालेला पराभव भरुन काढण्यासाठी, निवडक सैन्यासह आपल्या वेगवान वायुयान घेऊन त्याने द्वारकेकडे कूच केले. तो अर्ध्या वाटेत असतांनाच स्वामींच्या सैन्याने त्याच्या साम्राजाला वेढा घातला. हे कळताच तो माघारी आपल्या अर्बुज साम्राज्याकडे वळला. तो टप्प्यात येताच स्वामींनी आपल्या दिव्य सुदर्शनचक्राने त्याचे व वायुयानाचे तुकडे होऊन समुद्रात कोसळले. जरासंधाशी संबंधीत शत्रुच्या शृंखलेतील आणखी एक प्रबळ शत्रू नष्ट झाला.

           रक्ताचा एक थेंबही न सांडता शाल्वाचे पारिपात्य झाले होते तरी, अलिकडे स्वारी अस्वस्थ कां होती? कांहीतरी कुठे वेगळे घडले हे निश्चित. रुख्मिणीने आपली शंका व्यक्त केल्यावर, ते हसून म्हणाले, खरच तूं मनकवडी आहेस. शाल्वाचा परावभव केला,पण मनाला अशुभाचे संकेत मिळत आहे. कांहीतरी भयंकर घटना घडली. आपल्या साम्राज्यात तर नाही, मग कुठे? पांडवांकडे तर घडले नसेल ना? शाल्व अभियानात गुंतलो असतां कांही भयानक घडल्याची जाणीव झाली. एका स्रीच्या आर्त किंकाळ्याच्या हाका ऐकू आल्या. रुख्मिणी, मला ती साद माझ्या प्रिय सखीची माझ्या ह्रदयाला घातलेली होती. मी प्रतिसादही दिला होता. माझ्या प्रिय पांडुपुत्रांवर कोणते संकट ओढवले असेल? माझ्या कृष्णेला कां साद घालावी लागली? स्वामी, पांडव महापराक्रमी आहेत. त्यांची बाजू सत्याची आहे. आणि प्रत्यक्ष तुमच्यासारखे योगेश्वर त्यांच्या पाठीशी असल्याने ते कोणत्याही संकटातून तरुन जातील. आपले गुप्तहेर बातमी आणतीलच. आपण शांत व्हावे.

                     क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                 दि. ७-६-२०२२.

रूख्मिणी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading