आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

रूख्मिणी चरित्र भाग ४, (१६ ते २०)
श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता……..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! रूख्मिणी चरित्र !!!
*!!!रूख्मिणी भाग-१६!!!*
दुसर्या दिवशी सुधर्मा राजसभा बोलावण्यात आली. विशेष म्हणजे अक्रुरला बोलवण्यात आले. स्यमंतक मण्यासह येऊन, आपल्या कृत्याबद्दल राजसभेत सर्वांंची जाहीर माफी मागीतली. मणी बघून बलरामांच्या मनातलाही किंतू निघाला.अनेकांचे जीवन ढवळून टाकणार्या स्यमंतक रत्नाचा उपयोग कसा करायचा हे ठरवण्याचा अधिकार यादवश्रेष्ठ अक्रुरांनाच देण्यांत आला. या रत्नप्रकरणावर कायमचा पडदा पडला. श्रीकृष्णाच्या निर्मोही स्वभावपैलूच्या दर्शनाने, व्यक्तीमत्वाने यादवांच्या मनातील आदर द्विगुणित झाला.
प्रदीर्घ कालानंतर सुवर्ण द्वारकेची दिनचर्या सुरळीत सुरु झाली. रुख्मीणीचे दिवस भरत आले. यावेळी स्वामी जवळ असणार म्हणून तिला समाधान वाटले. रात्री एकांतात स्वामी म्हणायचे, रुख्मिणी, आपला द्वितिय पुत्र जन्माला येणार ना? तूं थोडी विश्रांती घ्यायला हवीस.रुख्मिणी, मी बाहेर जो पराक्रम करतो त्याचे सारे श्रेय तुलाच आहे. ते कसे? अगऽ तूं इथली सारी व्यवस्था काटेकोरपणे पाहतेस म्हणून मी बाहेर निश्चिंत असतो. आता सुध्दा सहस्रावधी स्रीयांच्या पुनर्वसनाचे काम केले, तेही आम्ही तिन्ही बंधूंच्या अनुपस्थितीत.द्वारकेच्या राजकारभाराबद्दल तर तोडच नाही. पुरेऽ पुरेऽ खूप झाली प्रशंसा! नाही रुख्मिणी थांबवू नकोस. बोलू दे ही प्रशंसा वृथा नाही. अत्यंत अवघड काम म्हणजे, धाकट्या चारही राण्यांना धाकात ठेवले आहे, तेही स्वतःचा मान, आब, आदर कायम ठेवून. संसाराच्या रथाचे स्वभावरुपी अश्वांचे दोर तूं समर्थपणे हाती पेलले आहेस. प्रजेने स्वेच्छेने “महाराणी” दिलेले बिरुद तू अमर्याद शक्तीने योग्य रितीने सांभाळते आहेस.
खरच आपल्या या संसारसागरातून किती लाटा, किती वादळं, किती रत्न, किती गारगोट्या उसळणार आहेत कुणास ठाऊक? कधी कधी स्वामींच्या बोलण्यातून भविष्यवाणीच उमटतेय असा भास होई.
यथावकाश रुख्मिणीने द्वितिय पुत्रास जन्म दिला. या बाळाची सुरक्षाव्यवस्था सर्वजण अगदी डोळ्यात तेल घालून बघत होते. ती स्वतःसुध्दा त्याला क्षणभरही दृष्टीआड होऊ देत नव्हती. पाठोपाठच सत्यभामा व जाबंवंतीलाही पुत्रलाभ झाला.
तिन्ही मुलांचे नामकरणविधी मोठ्या थाटात साजरे झाले. रुख्मिणीच्या मुलाचे नांव चारुदेष्ण,सत्यभामाच्या मुलाचे भानुसेन, कारण तिचे वडिल सूर्यभक्त होते. आणि जाबवंतीच्या मुलाचे नांव सांब म्हणजे,श्रीशंकर, तिचे वडिल शिवभक्त होते.
या तीन पुत्रांच्या आगमनाने द्वारकाद्वीपांत जणूं उत्साह संचारला. या बाळांशी खेळण्यांत, संगोपन करण्यात दिवस पुरत नव्हता. तोच सत्या व मित्रवृंदाही माता होणार असल्याची वार्ता कानावर आली.पुन्हा एकदा राजप्रासाद, राजद्वीप अनंदाने उजळून निघाले. यथावकाश दोघींनाही पुत्र रत्न प्राप्त झाले. मित्रवृंदेच्या पुत्राचे नांव वृक आणि सत्याच्या पुत्राचे नांव वीर ठेवण्यात आले. पांच पुत्रांच्या आगमनाप्रित्यर्थ पंचदिन महोत्सव साजरा करण्यात आला.
आणखी दोन वर्षे उलटली. परत पांचही राण्यांच्या प्रासादात आणखी एकएक पुत्र खेळू लागले. तरी प्रद्युम्नची आठवण झाली की, रुख्मिणी अस्वस्थ होई. तिची ही अवस्था स्वामींच्या नजरेतून सुटत नसे. मग तिला जवळ घेऊन हळूच म्हणत, रुख्मिणी धीर धर, इच्छित समय जवळ आला आहे. मग निश्चिंत होऊन सर्व पुत्रांशी खेळण्यात रमत असे.
एके रात्री रुख्मिणीला कृष्ण म्हणाले, उद्या सकाळी सप्तगंगेच्या जलाने कलश भरुन ठेव, रेशमी वस्रालंकारांनी सुशोभित २१ सुहासिनी औक्षणासाठी सुवर्ण तबके तयार करुन सज्ज रहायला सांग. एवढा मोठा कोण अतिथी येणार? अगऽ अतिथी नाही तर आपल्याच’ कुळातील आहे. माझी सहावी भगिनी तर नाही ना? एवढ्यात तरी नाही. आणि ती आपल्या कुळातली थोडीच असणार? मग कोण? कां अंत पाहता? रुख्मिणी ती व्यक्ती तू पाहताच तुझ्या चेहर्यावरचा ओसांडणारा आनंदी चेहरा बघायचा आहे. आणि त्वरेने बाहेर निघून गेले.
कोण येणार असेल बर? आणि अचानक मस्तकात वीज चमकली. माझा प्रद्युम्न तर नसेल? त्या रात्री दोन्ही पुत्रांना कुशीत घेऊन तिला गाढ झोप लागली. आणि स्वपानात एक १७-१८ वर्षाचि युवक दिसला. स्वामी म्हणत होते, उठा महाराणी, तुमचा प्रथम पुत्र आला आहे, तिला एकदम जाग आली. गवाक्षातून स्वामींच्या महालाकडे नजर टाकली असतां, ते मृगजिनावर पद्मासन घाहून ध्यानमग्न अवस्थेत बसले होते. त्यांच्याकडे भान हरपून रुख्मिणी बघतच राहिली. किती तेजःपुंज्य दिसत होते, जणू प्रत्यक्ष शिवशंकर, ब्रम्हा, विष्णू, महेश तिन्ही विश्वकर्त्याचा संगम त्यांच्या ठायी झाला होता.प्रत्यक्ष योगेश्वर! नकळत तिने हात जोडले तर तिला आशिर्वादाप्रमाणे हात ऊंचावल्याचा भास झाला.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ५-६-२०२२.
17
*!!!रूख्मिणी भाग-१७!!!*
आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आनंदाचा तो क्षण आला. अतिथी आगमनाच्या सन्मानार्थ मंगलवाद्ये निनादू लागली. दुदुंभी गर्जु लागल्या. आगमणकर्ता शुध्दाक्षमहाद्वारापर्यत आल्याची ती खूण होती. सर्वजण घाईघाईने महाद्वाराकडे निघाले. रुख्मिणी तर जवळ जवळ पळतच पोहचली. तिला दिसले बलरामदादा व स्वामी एका १७-१८ वर्षाच्या अतिशय देखण्या युवकाला घेऊन महाद्वाराची एकेक पायरी पार करीत होते. त्याच्या रुपावर दृष्टी ठरत नव्हती. जणू मदनाचा पुतळाच! रुख्मिणी भान हरपून त्याच्याकडे पाहत होती. ह्रदयाला साक्ष पटली हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा अपह्रत झालेला प्रद्युम्नच आहे तो जवळ आल्यावर, महाराणी औक्षण करा त्याला, या स्वामींच्या वाक्याने ती भानावर आली. औक्षण झाल्यावर नमस्कारासाठी खाली वाकलेल्या पुत्राला कवेत घेत म्हणाली, माझा प्रद्युम्न…माझा प्रद्युम्न! मातेऽऽ म्हणून तोही कुशीत शिरला.आणि दोघांनीही इतके दिवस साठलेल्या अश्रूंना वाट करुन दिला. स्वामींनी म्हटल्या प्रमाणे माझा बाळ सुखरुप परत आला होता. त्या सुखाच्याही घडीत, एवढे दिवस कुठे होता माझा बाळ? कुणी नेला व कां? पण प्रश्नावली जाणण्या ची ही घडी नव्हती.त्याने रेवतीताईंनाही नमस्कार केला. आमच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्हे बघून स्वामी म्हणाले, हळूहळू कळेलच सर्व. तो बरेच दूरवरुन मजल दर मजल करीत आला आहे.सध्या त्याला सध्या विश्रांती घेऊ द्या.
रात्री रुख्मिणीच्या महाली स्वामी आले व तिच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देत म्हणाले, गोवर्धन पर्वताजवळ असलेल्या घनदाट अरण्याचा राजा म्हणवणार्या व मुळात यादव कुळातील असलेल्या सध्या आदीवासी आयुष्य जगणार्या शंबासुराने गैरसमजातून निर्माण झालेल्या सुडबुद्धीने प्रद्युम्नचे पांचव्या दिवशी अपहरण करण्यात आले. शंबासुर आणि पत्नी राणी मायावतीच्या संस्कारात वाढल्यामुळे त्याच्यात रानटी संस्कार आले होते. त्याचे नांवही शांबर ठेवले होते.तो थोडा मोठा झाल्यावर, त्याच राजकुळातील एका व्यक्तीने त्याला त्याची खरी माहिती ऐकवली तेव्हापासून त्याला द्वारकेची ओढ लागली होती. संधी मिळताच कांही विश्वासू निवडक सरदारांना घेऊन द्वारका गाठली.
आतां त्याचेवर नागरी संस्कार करणे आवश्यक होते. आम्हा सर्वामिळून त्याला सुसंस्कृत, शूर, शस्रविद्या निपून, ज्ञानयुक्त राजपुत्र बनवून जगापुढे आणायचे आहे. या सर्व गोष्टीला त्याने मनापासून प्रतिसाद देऊन, थोड्याच दिवसात त्याचेवरचे आदीवासी संस्कार जाऊन तो पूर्णपणे सुविद्य! सुसंस्कृत, शस्रविद्या पारंगत, स्वभावाने प्रेमळ, सान थोरांवर मनापासून प्रेम करणारा, योग्य मान ठेवणारा तेजःपुंज कोवळा तरुण तयार झाला. असे वाटत होते हा आनंदमय काळ इथेच थांबवा पण नियतीला थोडेच मान्य असणार? शिवाय या चक्रवर्ती योगेश्वराचा जन्मच मुळी चक्रासारखे फिरण्यासाठीच झाला होता ना?
आणि एक दिवस पांचाल देशाच्या द्रुपद राज्याचा दूत द्रुपद कन्या याज्ञसेनी उपवर द्रौपदीच्या स्वयंवराचे आमंत्रण घेऊन आला. स्वयंवरातील पण अवघड ठेवला होता. श्रीकृष्णाबरोबर प्रद्युम्न व बलरामदादांचे पुत्र जाणार होते, कारण या मुलांना जगाची ओळख व्हावी हा मुख्य हेतु होता.
एका शुभ मुहूर्तावर श्रीकृष्ण, उध्ववजी, प्रद्युम्न, बलरामदादांचे पुत्र, निवडक मान्यवरांसह व सैनिक घेऊन पांचाल देशाच्या कपिला नगरीकडे प्रस्थान केले. आणि कांही दिवसातच दूत वार्ता घेऊन आला, पणात स्वामी उतरलेच नव्हते. कर्ण सुतपुत्र आहे म्हणून स्वतः द्रोपदीनेच नाकारले. तिथे उपस्थित असलेले मोठमोठे सम्राट, महाराजे, राजपुत्र पण पूर्ण करु शकले नाही. स्वयंवर स्थगित होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असतांनाच, एक तेजःपुंज ब्राम्हणपुत्र वेगाने स्वयंवर स्थानाकडे दमदार पावले टाकत जातांना दिसला
तिथे ठेवलेले धनुष्य उचलून प्रत्यंचा लावली. डोळे मिटून प्रार्थना केली आणि प्रेक्षकांना कांही समजायच्या आत त्याने “पण” पूर्ण केला.उध्ववा, हा नक्की अर्जुनच आहे.ब्राम्हणपुत्रा च्या जयजयकाराने सभामंडप दणाणून गेले. द्रौपदीने त्या ब्राम्हणपुत्राच्या गळ्यात वरमाला घातली. तोच कांही लोक चवताळून पुढे आले, एवढे वैभवसंपन्न, शूरवीर नरेश उपस्थित असतांना, या विश्वसुंदरीने एका गरीब ब्राम्हणाच्या गळ्यात माळ घातली. ते त्या नवविवाहित वधूवराकडे धावले असतां चार तेजःपुंज वीरांनी व पांचाल देशाच्या सैनिकांनी त्यांची चाल असफल केली. ते पांचही ब्राम्हणपुत्र वीर पांडव आहेत हे निश्चित झाले. उध्ववला त्यांच्या मागावर जायला सांगून, श्रीकृष्णही त्यांच्या मागे गेले. पांचही जण त्यांच्या निवासस्थानी पोहचून, अर्जुन म्हणाला, माते, आजची भिक्षा अप्रतिम आणली आहे.नेहमीप्रमाणे कुंतीमाता म्हणाल्या, पांचही बंधूनी वाटून घ्या. आणि ती सौंदर्यवती द्रौपदी पांच बंधूंची पत्नी झाली. विशेष म्हणजे श्रीकृष्णानेही मान्यता देत म्हणाले, विश्वाच्या अंतापर्यत पुजनीय पंचकन्यापैकी एक म्हणून तुझं पद अढळ असेल असा आशिर्वाद देऊन, तिला सखी व बहिणीचे नाते जोडले.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ५-६-२०२२.
18
*!!!रूख्मिणी भाग-१८!!!*
दूताने सांगीतलेली हकिकत ऐकून रुख्मिणी स्तब्ध झाली. एका पत्नीचे पांच पती? नैतिता? शास्राचा आधार? स्वामींची सम्मती व आशिर्वाद? नक्कीच यामागे सबळ कारण असावे, स्वामींचा पांठींबा आहे म्हणजे योग्यच असेल. द्रौपदीला भेटण्याची तीव्र इच्छा रुख्मिणींला झाली. तिचे ते अलौकिक सौंदर्य, आतां पांच पांडवांचे राज्ञीपद, स्वामींशी पर्यायानै तिच्याशीही नाते जोडल्या गेले. नियती अतर्क्य असते हेच खरे!
नियोजित दिनी सर्वांचे द्वारकाद्वीपावर आगमन झाले. राजमाता कुंतीदेवी व तिचे पांच पुत्र आगित भस्म झाले नसून ते जिवंत व सुखरुप आहे हे कळल्यावर वसुदेव व दोन्ही मातांना खूप आनंद झाला. सर्वी निरवानिरव झाल्यावर श्रीकृष्ण रात्री रुख्मिणी महाली आल्यावर मनात खदखदणारा प्रश्न रुख्मिणीने विचारल्यावर, ते म्हणाले,अगऽ ती याज्ञसेनी, तेजाने लखलखणारी दामिनी आहे. पांच पांडवही दिव्य मंत्रामुळे जन्मलेले दिव्य शक्तींची रुपे आहेत. या दोहोंचा संगम नियतीने महान कार्यासाठी घडवून आणला आहे. याचे उत्तर भविष्यच देईल. स्वामी, तुम्ही विवाहाचा पण जिंकायला गेला होतात ना? मग ही सखी, बहिण मानण्याची उर्मी कुठून उत्पन्न झाली? हा पण तुम्ही सहज जिंकून तिला राणीपद देऊ शकला असता. रुख्मिणी, तुझ्या बुध्दीमत्तेची उगीच नाही प्रशंसा करत. अगऽ! प्रथम जेव्हा मी तिला बघीतले, तेव्हाच माझा जन्म झाल्यावर ज्या आदिशक्तीने आकाशाकडे दामिनीच्या रुपाने झेप घेतली, तिच्यात असलेली दिव्यता द्रौपदीत भासली.तिचं हरण न करतां तिच्या पाठीशी उभं राहून तिचं रक्षण करावसं वाटल्याने तिच्याशी निरागस नातं जोडावसं वाटलं. तुमच्यासारखा योगेश्वर बंधू, सखा मिळणे हे तिचे मोठच भाग्य!
द्वारकाद्वीपावर सर्व कारभार नियमित पार पडत होते. कामरुप स्रीयांची गृहसंकुले पूर्ण होऊन त्यांच्या आवडीनुसार उद्योग सुरु करुन दिले होते. सर्वीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रद्युम्नच्या दुरत्वाचा सलही निघाला होता. कधी कधी माहेरच्या दुराव्याचे शल्य जाणवायचे पण, माता शुध्दमती दूताकरवी तिथल्या घटनांची माहिती कळवत असल्याने, तेवढ्यावरच समाधान मानुन घेत होती.
सर्व सुरळीत सुरु असतांनाच, प्रदेशातील मद्र देशाच्या राजाने त्याची पुत्री लक्ष्मणाचे स्वयंवर ठेवल्याचे आमंत्रण व्दारकेच्या अनभिषिक्त कृष्णालाही आले. वसुदेव महाराजांना कृष्णाने जावेसे वाटत होते. कारण त्यांची बहिण श्रृतकीर्तीचे सासर कैकयदेश हा मद्रदेशाच्या सीमेलगतच होते. वृध्दत्वामुळे ते बहिणीला भेटायला एवढे योजने दूर जाऊ शकत नव्हते व श्रृतकीर्ती येऊ शकत नव्हती.त्यामुळे कृष्णाने तिचे क्षेमकुशल विचारुन यावे अशी इच्छा होती. पित्याची इच्छा डावलणे शक्य नव्हते. कैकयदेशी जाण्याची सिध्दता वेगाने सुरु झाली. रुख्मिणीच्या मनात विचारांचे आवर्तने उठत होती.द्रौपदी स्वयंवराला स्वामी निघाले तेव्हा मी कां अस्वस्थ झाले होते? इतर चार सवतींच्यावेळी किंवा आतां लक्ष्मणाच्या वेळीही मनात कांहीच आले नाही. तिला आपलेसे करुं शकले नसते कां? जाऊ देत, जे घडलेच नाही त्याचा विचार कशाला? खुल्या मनाने ती लक्ष्मणाच्या स्वागताला तयार झाली.
ठरलेल्या मुहूर्तावर स्वामी, उध्ववजी, अमात्य व कुशल सेना घेउन निघाले. तत्पूर्वी रुख्मीणीसह ते पित्याचा आशिर्वाद घेण्यास गेले, तेव्हा त्यांनी बहिणीची भेट घेण्यास पुन्हा सांगीतले. बहिणीच्या आठवणीने त्यांच्या नेथ्रात अश्रू तरळले. त्यांचे ते भगिनी प्रेम पाहून तिलाही आपल्या बंधूंची आठवण झाली. माझ्या पांचही बंधूंची धाकटी लाडकी एकुलती एका बहिणीची आठवण येत नसेल का? रुख्मीदादा चा माझ्यावर राग आहे पण बाकीच्या बंधूंचे काय? त्यांनी स्वामींशी कां आणि किती दिवस वैर धरावे? स्वामींची गाजत असलेली कीर्ती त्यांच्या कानी जात नलेल का? मी केले ते योग्य केले हे आतातरी पटायला नको का? सध्या तरी शक्यता दिसत नाही. ती आपल्याच विचारात गर्क होती.
स्वामी मद्रदेशाकडे निघून गेल्यावर सारे असूनही तिला एकटे एकटे वाटत होते. आणि वार्ता आली, स्वामींनी स्वयंवरचा पण लिलया जिंकून, लक्ष्मणा स्वामींची सहावी पत्नी म्हणून सुवर्ण नगरीत प्रवेशणार होती. पुन्हा एकदा स्वामींनी श्रेष्ठत्व सिध्द केले.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-६-२०२२.
19
*!!!रूख्मिणी भाग-१९!!!*
स्वयंवर म्हणजे केवळ उपवर कन्येशी विवाह करणे येवढेच मर्यादीत नसते, तर आपले श्रेष्ठत्व सिंध्द करण्याची संधी, राजाशी नविन नाते जोडणे, भविष्यात गरज भासली तर मदत घेणे हे राजकारणी हेतू असतात. स्वामींचे पांच विवाह झाले ते राजनैतिक दृष्टीने.पण रुख्मिणीच्या बाबतीत मात्र तसे नव्हते. तिने नकळत्या वयापासूनच पती म्हणून त्यांना स्विकारीले, अतोनात प्रेम केले.या विवाहाने त्यांचा फायदा तर झाला नाहीच, तोटाच झाला. विशाल विदर्भ देशाशी कायमचे शत्रृत्व निर्माण झाले.
दूत वार्ता सांगत होता,कृष्णमहाराज आतां कैकय देशातील गिर्जक नगरात आत्या व आतोबांना भेटायला गेलेत. आतोबा, राजा बृहत्सेनांनी त्यांना आग्रहाने ठेवून घेतले. उपहारात स्वामींना प्रचंड धन, सुवर्ण,रत्ने,गोधन,अश्व, धनधान्य दिले.वृतांत सांगून दूत निघून गेला.. वाट होती नववधूच्या आगमनाची.स्वागताच्या तयारीला लागणे भाग होते
प्रद्युम्न सर्व प्रकारचे शिक्षण ग्रहण करण्यासाठी गुरुकुलात गेला. दोन सप्ताहाने वार्ता आली, कैकयधीपतीने आपली राजकन्या भद्राला स्विकारण्याची स्वामींना आग्रहाची विनंती केली.. राजकीय दृष्टीने हा विवाह करणे आवश्यक होते, कारण भद्र आणि कैकय देश जोडून असल्यामुळे, पंचनदातील दोन प्रदेशांशी द्वारकेचै मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. या विवाहाने रक्तसंबंध व राजसंबंधात वृध्दी झाली.
एकदा स्वामी बोललेले रुख्मीणीला आठवले, म्हणाले होते, रुख्मिणी माझ्या जीवनात आठ या संख्येला फार महत्व आहे. माझा जन्म श्रावण अष्टमीचा,, माझ्या मातापित्यांचा मी आठवा पुत्र आणि अष्ट…एवढे अर्धे बोलून सोडून दिले होते. म्हणजे, आणखी एक राणी येणार तर? कोण असेल बरं?
दूताने वार्ता आणली, नव्याराणी लक्ष्मणादेवी व भद्रादेवींनी द्वारकेकडे प्रयान केले आणि स्वामी, उध्ववजी, व बलरामदादा हस्तिनापूरकडे गेले, तिथला मुक्काम किती दिवसांचा असेल सांगता येत नाही. सार्यांचीच निराशा झाली. लक्ष्मणा व भद्रा द्वारकेत आल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
स्वामी इथे नसल्यामुळे व लवकर येण्याची शक्यता नसल्यामुळे लक्ष्मणा व भद्राला आपल्या विश्वासात घेउन इतर चार राण्यांप्रमाणे त्यांना आपलेसे करणे रुख्मिणीने कर्तव्य समजून त्यांना आपल्या महालात येण्याचा संदेश दिला.
स्वामींचा हस्तिनापूरला जाण्याचा नक्कीच विशिष्ट हेतू असावा. जेष्ठ पांडुपुत्र युधिष्ठीर हा वारस असून, महाराज धृतराष्र्ट सिंहासन द्यायला तयार नाही. त्याच्या या कटात जेष्ठ पुत्र दुर्योधन, दुःशासन व गांधारीचा बंधू शकुनीची साथ होती. न्यायाने वागणे तर दूरच, उलट डाव रचून पांडवांना संपवण्याची संधी शोधत होते.. सत्याची कास धरणार्या श्रीकृष्णाची पांडवांना साथ असल्यामुळे, पांडवांना त्यांच्या हक्कापासून वंचित करणे सोपे नव्हते. पांडवांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा होता तेही कपटी, कुटील राजनीती करणार्यां कडून. कृष्णाला राजसिंहासनाचा मोह कधीच नव्हता. असते तर आतांपर्यत त्यांनी जिंकलेले अनेक राज्ये अधिपत्याखाली असती. अशा निर्मोही व्यक्तीला पांडवांच्या हक्कासाठी लढायचे होते.
बर्याच प्रतिक्षेनंतर दूत वार्ता घेऊन आला. तो सांगु लागला, पितामह भीष्म, गुरु द्रौणाचार्य,विदूर अशा मोठ्या व्यक्तींना डावलून, निबिड घनघोर खांडववन पांडवांना देण्याचा प्रस्ताव श्रीकृष्णा समोर ठेवला. त्यांचे म्हणने , हे पांडूपुत्र नाहीतच. मंत्राद्वारे कुंती व माद्रीपासेन जन्मलेले आहेत त्यामुळे राज्यावर त्यांचा हक्क नाही. धतराष्र्ट हे विश्वस्त म्हनून नेमलेले आहे. आणि विश्वस्त जिवंत असतांना वेगळे राज्य देण्याचा प्रश्नच नाही. तुमच्या शब्दाचा मान ठेवून खांडववन देत आहे.
श्रीकृष्ण शांतपणे धृतराष्र्टाला म्हणाले, तुमचा हा निर्णय अन्यायकारक आहे हे इथे उपस्थित असलेले ज्ञानी जाणतात. विश्वस्ताची नेमणूक वारस वयात येऊन सिंहासनावर आसनस्थ होईपर्यतच असते. पण कुटीलपणे स्वार्थाने अंध होऊन ही परंपरा डावलली जात आहे. शक्यतो युध्द टळावे, युध्दामुळे होणारी वित्त व जिवितहानी टळावी या शुध्द हेतूने पांडवांच्या वतीने हा प्रस्ताव मान्य करतो. त्रिखंडात कीर्त होईल अशी सुजलाम् सुफलाम् भूमीत तिचे रुपांतर करण्याचे आव्हान स्विकारतो.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-६-२०२२.
20
*!!!रूख्मिणी भाग-२०!!!*
युधिष्ठीरने श्रीकृष्णाच्या निर्णयाला संमती दिली. विनाविलंब कृष्णाने पंचनद,पांचाल,कामरुप या मित्रराज्यातून प्रचंड प्रमाणावर कामगार बोलावून खांडववन साफ करण्याचे काम सुरु केले. लगेच द्वारका वसवणार्या तज्ञ तंत्रज्ञ, कुशल कामगारांना बोलावून, जवळच असलेले इंद्रमुख नावाचे गाव आहे तेच नाव या राज्याला देण्याचे ठरविले. दुसर्या दिवशी पितामह भीष्मांच्या हस्ते भूमिपुजन केल्यावर कामाला वेग आला. प्रजाजन उत्स्फुर्तपणे सेवा देत होते. इंद्रप्रस्थाची उभारणी वेगाने सुरु झाली.
लगेच दूताने आणखी एक बातमी आणली. कालिंदी नावाच्या एका शूर क्षत्रिय कन्येने तपस्येच्या बळावर श्रीकृष्णाचे मन जिंकले.तिचा ठाम निश्चय होता. विवाह करीन तर श्रीकृष्णाशीच! तिने यमुनेच्या जलात उभे राहून श्रीकृष्ण नावाचा अखंड जप, कड्याक्याची थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा नकरता करीत होती. अखेर तिच्या तपश्चर्येला फळ आले. हस्तिनापूरी विदुराघरी श्रीकृष्णाचा मुक्काम असतांना पहाटे यमुनेत स्नानाला गेल्यावर ही तेजस्वी, तपस्वी कन्या दिसली. तिच्या मंजुळ आवाजात श्रीकृष्ण जप एकून निकट आलेल्या श्रीकृष्णाला पाहून तिची भावसमाधी भंगली. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला समोर बघून ती आनंदविभोर झाली. दोघांची दृष्टादृष्ट झाली. ह्रदयाची ओळख ह्रदयाला पटली. शास्राप्रमाणे गांधर्वविवाह झाला.रुख्मिणीला ओढ होती पतीसह नवी वधू कालिंदीची.
दोन सप्ताहानंतर कालिंदीसह स्वामीचे आगमन झाले.परंररेनुसार स्वागत करण्यात आले. शांत स्थिरवृत्तीची प्रसन्नचित्त, अगदी साधी रहाणी असणारी वेगळ्या स्वभावाची कालिंदी सर्वांनाच विशेषतः रुख्मिणीला मनापासून आवडली. तिचे जपतप, व्रत वैकल्य उरकल्यावर फावल्या वेळात ती रुख्मिणीच्या मागे मागे असायची.
श्रीकृष्णाचा मुक्काम जरी द्वारकाद्वीपावर असला तरी त्यांचे लक्ष इंद्रप्रस्थ स्थापनेकडे लागले होते. तेथील त्यांना खडा न् खडा मिळत होती. याच कालावधीत त्यांचे मित्र सुदामा भेट घडली. तनमन धनाने उत्कट प्रेम त्यांनीच करावे. मग ते प्रेम कोणतेही असो. मातृप्रेम, पितृप्रेम, पुत्र-पुत्री प्रेम, भातृप्रेम, पत्नीप्रेम, सखीप्रेम, मित्रप्रेम हातचे कांहीही न राखता मुक्तपणे प्रेमाची उधळण करतात, मात्र अन्यायींना तेवढ्याच कठोरपणे धडाही शिकवतात.
दिवस, महिने उलटत होते. इंद्रप्रस्थ उभारणीचे काम सुरु होते.इकडे द्वारकेचीही भरभराट होत होती. राणीवशातील आठही राण्या पंचपुत्रांच्या माता झाल्या. प्रजेचे कल्याण,सुरक्षा कला, संस्कृतीसंवर्धन, धर्मसुरक्षा ही द्वारकेची संहीता होती. धर्माच्या उन्नतीसाठी मोठमोठे ऋषीमुनींचे द्वारकेत नेहमीच येणे होऊन चर्चा होत असे. धर्माला ग्लानी येऊ नये हे तर स्वामींच्या जीवनाचे मुख्य सूत्र होते. याचबरोबर कलागुणांना वाव देऊन योग्य कलाकारांचा सत्कार केल्या जातोच.
हे सर्व वर्णन ऐकून आणि आजपपर्यंत प्रभासक्षेत्र सोडून कुठेच न गेलेल्या रुख्मिणीला इंद्रप्रस्थ, विशेषतः द्रौपदी व कुंतीमाताला भेटण्याची अनिवार ओढ लागली. मनकवडे स्वामींनी तिच्या मनातील विचार जाणून म्हणाले, रुख्मिणी थोड्याच अवधीत तुझी इच्छा फलद्रुप होईल. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे युधिष्ठीरांच्या राज्यरोहणाचे आमंत्रण खुद्द अर्जुन येत असल्याची वार्ता दूताने आणली. भारतखंडात पांडवांनी आपले आगळे वेगगळे स्थान निर्माण केले होते. कौरवांनी पांडवाशी केलेल्या हाडवैर व दिलेले अनेक प्रकारच्या क्लेशामुळे जनमानसात कौरवांची प्रतिमा मलिन झाली होती.
धनंजयाच्या स्वागतासाठी द्वारकानगरी सजुन सज्ज झाली होती. अर्जुन येतांच स्वामींनी त्याला घट्ट मिठी मारली. दोघांमधे सख्खे भाऊ शोभावेत इतके विलक्षण साम्य होते. वसुदेव महाराज व दोन्ही मातांच्या दर्शनाला जाण्याआधी अर्जुनाने रुख्मिणीला नमस्कार करत म्हणाला, वहिनी, तुमची भेट घेण्याची फार इच्छा होती. द्वारकेची महाराणी म्हणून नव्हे तर, माझ्या प्रिय योगेश्वराची अर्धांगिनी, स्वामीनी म्हणून. भाऊजी, विश्वविख्यात धनुर्धराने माझ्यासमोर नतमस्तक व्हावे एवढी थोर मी नाही. नंतर अर्जुन थोरल्या महाराजांच्या प्रासादाकडे निघाला. ज्याच्या नावाने त्याच्या जिवंतपणी श्राध्द केले,तर्पन केले त्या आपल्या भाच्याला समोर बघून वसुदेव महाराजांचे अंतःकरण भरुन आले. अर्जुनाने रितसर राज्यरोहन समारंभाचे आमंत्रण दिले. पण रुख्मिणीच्या लक्षात एक गोष्ट आली….
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ६-६-२०२२.
–









