रूख्मिणी चरित्र भाग ३, (११ ते १५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


            श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता……..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! रूख्मिणी चरित्र !!!

11

!!!रूख्मिणी भाग-११!!!

           रुख्मिणीला धीर देऊन, सांत्वना करुन सर्वजण निघून गेल्यावर कक्षात दोघेच उरले. पांच सहा दिवसांनी स्वामी आज भेटत आहे तेही अशा अवस्थेत.दोघेही अश्रूभरल्या नेत्राने नुसतेच एकमेकांकडे बघत होते.शब्दच सुचत नव्हते. शेवटी तिच्या मुखातून हुंदका बाहेर पडलाच. तिला ह्रदयाशी धरत श्रीकृष्ण म्हणाले, रुख्मिणी माझ्यावर विश्वास आहे ना? आपला मुलगा जिथे  कुठे आहे तिथे सुरक्षित आहे. त्याचे नांव आपण प्रद्युम्न ठेवणार होतो ना? सूर्यासारखे तेजस्वी रुप आठवून त्यांनाही गहिवरुन दुःखाचा उमाळा आला. श्रीकृष्ण म्हणाले, मी त्याचा पिता असून त्याचे मुखावलोकनही केले नाही. रुख्मिणी एक लक्षात ठेव, एकदा मानवजन्म स्विकारला की, आपण नियतीच्या हातचे बाहुले बनतो. बाळाचा विरह ही आपल्या सर्वांची नियती आहे.योग्य वेळ आली की, अगदी त्याच्या नावाप्रमाणे तेजस्वी, पराक्रमी पुत्राच्या रुपात तो प्रवेश करणार आहे. तेव्हा दुःखाला आवर घाल. थोडे गोरस पिऊन घे

               तिने मानेनच नकार दिला. रुख्मिणी, मी जसा अनभिषिक्त राजा आहे तशीच तू अनभिषिक्त महाराणी आहेस , पहाटेस ही दुःखद वार्ता कळल्यापासून बाबा, दोन्ही माता,दादा उध्वव, रेवती वहिनी यांच्यासह अगनित प्रजाजनांनी, आबाल वृध्दांनी जलाचा थेंबही घेतला नाही. जेवढे दुःख पुत्रहरणाचे आपल्याला आहे तेवढेच त्या सर्वांना आहे. शिवाय आपल्या दोघांचीही चिंता आहे. तूं थोडा आहार घेतला या वार्तेने त्यांना सावरायला थोडा धीर येईल. नुसते बसून आहेत. ते नित्यकर्मा ला लागून पुत्र शोधायला मदत करतील. हे महाराणीचे कर्तव्य समज.खुप कठीण आहे पण प्रजाही आपले अपत्य आहे याचा विचार नेहमी लक्षात ठेव. हा विरह दीर्घ काळासाठी आहे, मी शब्द देतो, तो परत येईल. स्वतःचे दुःख बाजुला ठेवून प्रजेला  आनंद व सुख दे, हेच कर्तव्य  व कर्म आहे.

               रुख्मिणीला तिच्या स्वामींची तळमळ, तगमग समजत होती.तिला महाराणीची भूमिका, कर्तव्य पार पाडण्यास खुणावत होती.पण आईचे ह्रदय? त्याच्या आठवणीने व काळजीने डोळ्यातील अश्रू आणि दुधाच्या धारा स्रवु लागल्या. तिची विकल स्थिती पाहून श्रीकृष्णालाही दुःख आवरणे कठीण जात होते. कांही विचार करुन तिला डोळे मिटायला सांगीतले आणि तिच्या मस्तकावर हात ठेवला. श्रीकृष्णाने मस्तकावर हात ठेवल्याबरोबर रुख्मिणी दुसर्‍याच विश्वात शिरली. तिला दिसले, शुध्दाक्ष दारावर ती पंचारती घेऊन उत्सुकतेने, आनंदाने भारावून उभी होती, तोच अत्यंत सूर्यासारखा तेजस्वी, बलदंड, अतिशय रुपवान मदनाचा पुतळा शोभावा असा  युवक जवळ येऊन प्रणाम माते म्हणत, तिच्या पायाशी वाकला आणि कुशीत शिरला. माझा प्रद्युम्न म्हणत त्याला ह्रदयाशी धरले

           आतां उघड डोळे.तुला भविष्यकाळ दाखवला. एवढा प्रदीर्घ काळ धीर धरावा लागेल. ती बरीच शांत होऊन गोरसाचा प्याला स्वामींची आज्ञा प्रमाण माणून प्राशन केले.

            कोणावर कोणतेही केवढेही मोठे संकट  आले असले तरी कालचक्र सुरुच असते. प्रद्युम्नचा शोध कसोशीने सुरु होता. चोहो बाजूंनी बलरामदादाचे गुप्तचर, सैनिक वायुवेगाने फिरत होते. तन,मन,धन जीव ओतून योजनाबध्द प्रयत्न जारी होते पण यश येत नव्हते. वरवर जरी ती अश्रू दिसू देत नसली तरी, एकांतात तिच्यातील मातृह्रदय दुःखाने उचंबळून येई, त्या वेळी अश्रूंना वाट मोकळी करुन देत असे. सहसा तिला एकटी ठेवत नसे. तिचे स्वामी तर तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपत असे. या दुःखाला थोडे विसरण्याचा प्रयत्न करुन सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न चालु होता तोच एक विचित्र वादळी घटना घडली.

            सुधर्मा राजसभेत सत्रजित नावाचे जेष्ठ, कर्मठ, कर्तव्यनिष्ठ मंत्री होते. प्रजाजनांचे प्रश्न सोडवणे, सतत पुजापाठ, यज्ञयाग उपासतापास त्यांच्या या कर्मनिष्ठा व सत्कार्यावर प्रसन्न होऊन सूर्यपुजा मंत्राची दीक्षा देणार्‍या गुरुंनी त्यांना एक अनमोल रत्न दिले. त्याचा अलौकिक गुण म्हणजे ते रत्न ज्या घरात जाईल तिथे धनलक्ष्मीचा वरदहस्त लाभत असे. या रत्नाचे नाव होते “सम्यतंक मणी”! सत्रजितला हा मणी प्राप्त झाल्यापासून त्यांचे भाग्य पालटले. भरभराट होऊ लागली. त्यामुळे त्या रत्नाला ते जीवापाड, डोळ्यात तेल घालून जपत असे. या अलौकिक रत्नाची महती श्रीकृष्ण स्वतः जाणत होते.आणि सत्रजितची कर्तव्यनिष्ठाही जाणून होते म्हणुन….

                        क्रमशः
   संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
                   दि. ४-६-२०२२

12

!!!रूख्मिणी भाग-१२!!!

                   अलिकडे जरासंधाच्या सततच्या आक्रमणाने मथुरेची आर्थिक स्थिती ढासळली असल्यामुळे श्रीकृष्ण सत्रजितला म्हणाले, हे रत्न कांही दिवस मथुरेच्या कोषागारात ठेवले तर, मथुरेवरचे आर्थिक संकट टळेल, पण सत्रजितने श्रीकृषाणाचा प्रस्ताव नाकारला. ही घटना श्रीकृष्ण विसरुनही गेले.

            एक दिवस सत्रजितचा बंधू प्रसेनने हे रत्न परीधान करुन लवाजमा घेऊन वृषकाल अरण्यात मृगयेसाठी गेला असतां  त्या निबिड अरण्यात प्रसेन सिंहाच्या हल्यात ठार झाला. त्याचा मृतदेह जांबवान आदीवासींना दिसला. त्याच्या जवळचे ते अमुल्य रत्न त्यांनी आपल्या राजाला नेऊन दिले.

             इकडे बराच कालावधी उलटला तरी प्रसेन परत आला नाही म्हणून चिंतित सत्रजितने प्रसेनला शोधण्यासाठी सैनिकांना अरण्यांत पाठवले. त्यांना सांपडलेले प्रसेनचे प्रेत उचलून आणले. त्याच्या जवळ मणी न सापडल्यामुळे हे कृत्य श्रीकृष्णाचेच आहे या गैरसमजाने भर सभेत सरळ श्रीकृष्णावर आरोप केला.

            श्रीकृष्णावर केलेल्या आरोपाने सारी सभा स्तब्ध झाली.प्रत्यक्ष द्वारकाधीशावरच असला नीच आरोप? राणीवसातील सारेच दिड्ःमुढ झाले. बलरामदादा तर नुसते संतापाने धुसफुसत होते. शांतपणे उठून श्रीकृष्ण म्हणाले, महामंत्री सत्रजितने केलेल्या आरोपाचे निराकरण करणे माझे कर्तव्य आहे. एका रत्नासाठी असे नीच कृत्य करायची मला गरजच नाही. तरी इडादेवीला स्मरुन प्रतिज्ञा करतो की, एक मासाच्या आंत हा आरोप असत्य आहे हे सिध्द करुन दाखवेन.

           पतीचे प्रसंगावधान, मनोधैय, निर्णायक क्षमता, थोरांचा योग्य आदर सारे बघून रीख्मिणीचे ह्रदय अभिमानाने भरुन आला.

             दूसर्‍या दिवशी स्यमंत्रक मणी शोध मोहिमेवर निवडक सैनिकांसह श्रीकृष्णाने वृषकाल अरण्याकढे प्रस्थान ठेवले. रुख्मिणीने पंचारतीने ओवाळून निरोप दिला. विवाहा नंतर प्रथमच एवढ्या दीर्घ काळासाठी कृष्ण बाहेर पडले होते. तिच्या हाती फक्त प्रार्थना करणे एवढेच हाती होते, रोज वार्ता द्वारकेत येत होत्या.सगळा परिसर पिंजून काढला. आजूबाजूच्या लोकांना कसून विचारपूस केली तेव्हा एकाने सांगीतले की, एक दिव्य रत्न महाराज जांबवानांजवळ असेन मोठ्या अभिमानाने स्वतःजवळ बाळगून आहे. लगेच श्रीकृष्णाने त्याची भेट घेऊन सर्व हकिकत कथन करुन रत्नाची मागणी केली. तो द्वारकाधीशाचे सामर्थ्य जाणून असल्यामुळे मणी देण्याचे कबुल केजले त्याचबरोबर आपली लाडकी लेक जांबुवंतीचा स्विकार करण्याची विनंती केली.

             द्वारकाधीश स्यमंत्रक मण्यासह येत असल्याची वार्ता द्वारकेत वायुवेगाने येऊन धडकल्याबरोबर अवघे द्वारकाद्वीप आनंदसागरात बुडून गेले. संपूर्ण द्वारकानगरी सजवण्यात आली. घराघरावर गुढ्यातोरणे उभारण्यात आल्या. राणीवसा तील सर्वजणी शुध्दाक्षदारावर आरतीचे सुवर्ण तबक घेऊन सज्ज होते.

              श्रीकृष्ण समोर आल्यावर औक्षण करण्यासाठी पांच सुहासिनींसह रुख्मिणी पुढे आली, पाहते तो काय स्वामींच्या शेजारी वनवेषातील  जाबवंत वानरराजाची कन्या भयभीत नजरेने पाहत उभी होती. क्षणभर रुख्मिणी स्तब्ध झाली. श्रीकृष्णाच्या आवाजाने भानावर आली.महाराणी, या धाकट्या राणीचेही औक्षण करा.ही आपल्या राजपरिवारात प्रवेश करीत आहे.जणू अंगावर वीज कोसळली. पण त्याचवेळी तिला महाराणीच्या कर्तव्याची जाणीव झाली. महाराणीपद मिरवणे एवढे सोपे नाही. सागरासारखे विशाल ह्रदय असावे लागते.या पुढे आपल्याला बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागणार याची जाणीव झाली. जीवनात येणार्‍या प्रत्येकाला सुख, आनंद, प्रसन्नता द्वारकेची अनभिषिक्त महाराणी म्हणून द्यावे लागणार होते.

             राणीवशात आल्यावर, जांबुवंतीला राजकुलात राणी म्हणून कसे वावरावे याचे धडे महाराणी म्हणून नव्हे तर, मोठी बहिण होऊन देऊं लागली. मुळातच निरामय, निष्पाप, स्वच्छ कोरी पाटी असलेल्या जांबुवंतीवर संस्कार करणे सुलभ गेले.

या सम्यंतक मण्याने जसे श्रीकृष्णाच्या जीवनांत वादळ निर्माण केले तसेच रुख्मिणीच्या जीवनांतही तिच्या जीवनाशी निगडीत वादळवारा निर्माण झाल्यात.

            जेव्हा श्रीकृष्णांनी स्यमंतक मणी सत्रजितला परत करायला गेले तेव्हा आपण, ज्याला राजपदाचा मोह नाही अशा श्रीकृष्णावर चोरीचा आळ घेतल्याबद्दल सत्रजितला अतिशय पश्चाताप होऊ लागला. पुन्हा श्रीकृष्णाच्या निकट कसे जाता येईल या विचाराने, सत्रजित म्हणाले, मी भर राजसभेत तुझ्यावर केलेल्या आरोपाबद्दल जाहीर क्षमा मागतो आणि हे मिळवलेल्या रत्नावर खरं म्हणजे तुझाच हक्क आहे पण मला माहित आहे तूं स्विकारणार नाहीस, पण माझी एक विनंती मान्य करावीस. या रत्नापेक्षाही मला प्रिय असलेले अनमोल कन्यारत्न सत्यभामाचा स्विकार करावा. गांधर्व विवाहाला मुहूर्ताची गरज नाही.हा पाणीग्रहन विधी पार पडल्या वरच सम्यंतक मणी स्विकारेन.

                       क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि.  ४-६-२०२२

13

!!!रूख्मिणी भाग-१३!!!

                 स्वामींची दुसरी पत्नी जाबवंतीच्या येण्याने जेवढी खळबळ माजली होती, मनाची जी अवस्था झाली होती ती अवस्था तिसरी पत्नी सत्यभामाच्या आगमनाने झाली नाही.  जाबवंतीला सोबत घेऊन रुख्मिणी सत्यभामेच्या स्वागताला सामोरी गेली. जाबवंतीचे संस्कार जरी ग्रामीण असले तरी ती स्वभावाने गरीब, भित्री, निष्कपट, निर्मळ पण हुशार होती. तिला हाताळणे जड गेले नाही. पण सत्यभामेचे तसे नव्हते.ती अतिशय तेजस्वी,करारी, क्षात्रतेज असणारी सुंदर युवती होती. ती अश्वविद्येत व सारथी कौशल्यात प्रविण होती.

              एकदा गमतीने कृष्ण म्हणाले, रुख्मिणी, जरा सांभाळून बरं का! सत्यभामा बिजली आहे. रुख्मिणी तेवढ्याच तत्परतेने म्हणाली, मेघांमध्ये चपला कितीही चमकली, कडाडली तरी धरणीमातेच्या उदरात ती शांत होतेच ना? रुख्मिणी, खरच तूं बुध्दीमानी तर आहेसच पण क्षमादायिनी धरा आहेस. सात्विकतेने, सौजन्याने तिला नक्की आपलेसे करशील. रुख्मिणी मनी विचार करुं लागली, आणखी कोणकोणत्या कारणाने किती सवती जीवनात येणार विवाह म्हणजे केवळ व्यक्तिव्यक्तीमधील कुलसंबंधच नसतात, तर त्यात राजकारणही असते. सम्राट, महासम्राट आपली सत्ता बळकट करण्यासाठी, कधी सत्तावृध्दीसाठी, तर कधी संरक्षणा साठी आपली कन्या, भगिनींचे विवाह करुन देतात. तिने आपले विचार पतीला बोलून दाखवल्यावर, श्रीकृष्ण म्हणाले, तूं मनकवडी आहेस हेच विचार माझ्याही मनात येऊन गेले.पण एक खरं आहे, तुझा माझा विवाह कोणत्याही हेतूने नाही तर, परस्परांवरील गाढ प्रेमामुळे झाला.

            सत्यभामा इथेच वाढली. मोठी झाली. ती मंत्र्याची मुलगी असल्यामुळे तिला इथल्या वातावरणात रुळायला वेळ लागणार नाही.ऋतुचक्र सुरुच होते. फार सुखाचा काळ व्यतित होत होता. फक्त अपरहहित बाळाची याद सोडली तर! विदर्भ राज्य, कौंडण्यपूर, सारे समृति कोशातच जमा झाले होते. दुतां करवी  तिकडच्या कुशलवार्ता येत होत्या. श्रीकृष्ण तीला चतुरंग माहिती देत करुन कारण तीची राजकारणातील कार्यक्षमता बघून, बलराम किंवा श्रीकृष्ण द्वारकेबाहेर गेले तर ती, कुलधर्म, कुळाचार, मोठ्यांची सेवा आदर त्याच बरोबर धर्म  राजकारण व्यवस्थित करु शकेल याची त्यांना त्यांना खात्री होती. म्हणूनच या द्वीपाला राणीद्वीप किंवा रुख्मिणीद्वीप म्हणतात. त्यांच्या या कौतुकमिश्रीत प्रशंसाने तिला आनंद तर होईच पण त्यांनी टाकलेल्या विश्वासाची, निमावून नेण्यासाठी कराव्या लागणार्‍या पत्परतेची, निर्णयशक्तीचीही जाणीव होई. या तिच्या गुणांचा कस लागेल असा प्रसंग लवकरच आला.

             हस्तीनापूरहून भयंकर अशुभ वार्ता घेऊन दूत आला. स्वामींची आत्या कुंतीदेवी आपल्या पांच पुत्रांसह वारणावर्तात  आगीच्या भस्मस्थानी पडले. त्यांना तिलांजली देण्यासाठी बलराम, उध्ववजी व कृष्ण तिघांनीही हस्तिनापूरला जाण्याचे ठरले. पण स्वामींचे वागणे तिला गूढ वाटत होते. वरवर जरी तिलांजली जाण्याचा हेतू दिसत असला तरी, त्यांच्या मनात वेगळेच कांही असावेसे वाटत होते. या तिला आलेल्या शंके बाबत विचारल्यावर ते म्हणाले, रुख्मिणी , एवढे लोक माझ्या भोवती असून सुध्दा माझ्या मनातील द्वंद फक्त तुझ्याच लक्षात आले. तुझी शंका सत्य आहे. म्हणाले,मला निश्चित माहित आहे  आत्या आणि पांच पांडव यांचा मृत्यु झाला नसून त्यांना सत्यतेची भूमिका पार पाडण्याची आहे, महाभारत घडणार आहे. जाण्यापूर्वी त्यांनी सभा भरवून  सर्वांवर त्यांची त्यांची कामे सोपवली.तसेच रेवती, सत्यभामा जाबवंती रुख्मिणीसह  कौंटुबिक कार्याची धूरा सांभाळण्याची जबाबदारी सोपवली.

         नातवंडांच्या सहवासात थोरले बाबा व दोन्ही मातांचे मन रमावे म्हणून जाबवंती आणि रेवती मुलांसह मुख्य राजद्वीपावर गेल्या. राणीद्वीपावर सत्यभामा व रुख्मिणी थांबल्या. द्वारका साम्राज्याच्या तटावर घडणार्‍या घटनांचा इत्थंभूत तपशील महामंत्री व सेनाप्रमुखाने रुख्मिणीला देण्याच्या सूचना असल्या मुळे सहाजिकच महाराणीपदाची सारी सूत्रे आपोआपच रुख्मिणीकडे आलीत.

            सर्व सुरळीत सुरु असतांना एक दिवस वार्ता आली, महामंत्री सत्रजितचा वध शतधन्वा या यादवाने केला. त्याला सत्यभामेशी विवाह करायचा होता. पण त्याला डावलून सत्रजितने सत्यभामेचा विवाह श्रीकृष्णाशी केल्यामुळे  सूडाने पेटून त्याने सत्रजितचा वध करुन स्यमंतक मणी घेऊन पळून गेला. वायुवेगाने वार्ता द्वारकेत पोहोचली. सत्यभामा सकाळीच माहेरी गेली. रेवतीताई, जाबवंती व रुख्मिणी तिला भेटायला गेल्या. रुख्मिणीला पाहताच तिच्या कुशीत शिरुन हमसाहमशी रडू लागली. एकीकडे शोक तर दुसरीकडे क्रोधाने ती पेटून उठली. पित्याचे अंत्यसंस्कार झाल्यावर सत्यभामा स्वामींकडे हस्तिनापूरकडे निघून गेली.

                      क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि. ४-६-२०२२

14

*!!!रूख्मिणी भाग-१४!!!*

              कुंतीआत्या  तिच्या पांच पुत्रांसह जिवंत असल्याची वार्ता मिळाली. सत्यभामा स्वामींसह तडक द्वारकेस आले. पित्याच्या वधाचा सूड घेण्याचा एकच ध्यास सत्यभामेला लागल्यामुळे, शतधन्वाला शोधून त्याला मृत्युदंड दिल्यावरच ती शांत झाली. त्याने अक्रुराजवळ ठेवलेला स्यमंतक मणीचा शोध लावून सत्रजितच्या कोषागारात ठेवण्यात आला. बलरामां ना वाटले स्यमंतक मणी श्रीकृष्णाजवळ आहे, तो पाहण्यास मागीतल्यावर तो मणी माझ्याजवळ नाही हे कृष्णाचे सांगणे  असत्य वाटून  गैरसमज होऊन रागाने तीर्थयात्रेला निघून गेले. चिंतित रेवतीला समजावत कृष्ण म्हणाले, अग वहिनी! दादांना जेवढ्या लवकर  क्रोध येतो तितकाच तो पटकण शांतही होतो. सत्य कळले की, येईल लगेच परत. आणि झालेही तसेच. या मण्यापायी अनेक वादळे उठून अखेर शमले. दीर्घकाळानंतर द्वारकाद्वीपाला थोडा निवांतपणा लाभला.

               एक दिवस स्वामी सुधर्मा राजसभेतून चिंतामग्न होऊनच राणीद्वीपावर आले. अस्वस्थतेचे कारण विचारल्यावर म्हणाले, रुख्मिणी, पूर्वेकडे कामरुप प्रदेश आहे तिथे भौमासुरा चे बलाढ्य साम्राज्य, अमर्याद सत्ता,संपत्ती मुळे तो अतिशय उन्मत झाला.त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या राज्यांमधून सोळा सहस्र सुंदर युवतींचे अपहरण करुन त्यांना पशूप्रमाणे  कैद केले आहे.ती वस्ती अक्षरशः नरक आहे, म्हणून प्रजा त्याला नरकासूर नावाने ओळखतात. त्याच्या बंदोबस्ता साठी मला पाचारण करण्यात आले आहे. स्रीजातीचा केवढा हा घोर अपमान? तिला आलेला संताप ऐकून कृष्ण म्हणाले, रुख्मिणी, शांत हो! माझा जन्मच मुळी दुष्टांचा संहार करण्या करितां झाला आहे. मी उद्याच या मोहिमेवर निघत आहे.

          ती नेहमी विचार करायची, स्वामी आहेत तरी कोण? भोगी असूनही त्यागी! योगी असूनही विरागी ! कलागुणांत अग्रभागी असूनही अनासक्त! सर्वांना मोहित करुन स्वतः मात्र निर्मोही! नक्की कोण? बालपणी दहीदुध चोरणारा, गोफ विणणारा, गुरे चारणारा, गोपालकाला करणारा, यमुनेत यथेच्छ डुंबणारा, रासक्रीडेत दंग होणारा श्रीकृष्ण खरा की, पुतनामावशी वध, कालियामर्दन, कंसवध करणारा, जरासंधा सारख्या बलाढ्य शत्रूला सतरा वेळा परतवून लावणारा, माझे पत्र मिळताच, माझी आस पुरवणारा, द्वारकाद्वीप सारखी सुवर्ण नगरी वसवणारा, दुष्टांच्या संहारणार्थ कुठेही, केव्हाही धावून जाणारा, मला तरुण प्रद्युम्नचै दर्शन घडवणारा, खरा श्रीकृष्ण कोण? हे कोडे सुटता सुटत नव्हते.

                  दुसर्‍या दिवशी भौमासुर तथा नरकासुरचा नाश करण्यासाठी राजसभेत सर्वांमुखी एक मताने पाठींबा मिळाला. शिस्तबध्द, सूत्रबध्द योजना आखून सशस्र सैन्यासह  शुभ मुहूर्तावर जाण्यास सज्ज झाले. सत्यभामेने सोबत जाण्यासाठी हट्ट धरल्यामुळे स्वामींनी तिलाही सोबत घेतले. रागावून गेलेले बलराम अजून परतले नव्हते. याच काळात आणखी एक योगायोग घडला. जाबवंती आणि रुख्मिणीला  कडक डोहाळे लागले. प्रद्युम्नचे अपहरण झाल्यावर द्वारकाधीशांच्या दुसर्‍या अपत्याची उत्सुकता राजकुलातच नव्हे तर प्रजाजनांनाही लागली होती.

‌               स्वामी ससैन्य मार्ग आक्रमित असतांनाच एक वार्ता द्वारकेत येऊन थडकली. अवंतीची राजकन्या  मित्रविंदाचे तिच्या स्वयंवर मंडपातून हरण व विवाह करुन तिला द्वारकेत पाठवले. अवंतीचे महाननरेश राजे जयसेन हे स्वामींची सख्खी आत्या राजाधीदेवीचे पती. मित्रवंदा त्यांची आतेबहिण! विंद व अविंद स्वामींचे आतेभाउ, स्वामींची त्रिखंडात पसरत असलेल्या कीर्तीमुळे द्वेष करीत होते. यादवकुळाला तुच्छ मानुन स्वतःच्याच कुळाचा फार अभिमान होता दोधाही भावांना. आणि म्हणूनच मित्रविंदाच्या स्वयंवराचे आमंत्रण स्वामींना दिले नव्हते. ही गोष्ट त्यांच्या मानी मनाला फार लागली. नरकासुराच्या  निःपात करण्याच्या अभियानास जातांना आत्या व सम्राट जयसेनचा आशिर्वाद घेण्याच्या बहाण्याने त्यांनी अवंती नगरीत प्रवेश केला. स्वयंवर मंडपात आमंत्रित राजेमहाराजें  उपस्थितीत होते. स्वामींनीही सन्मानिय अतिथी म्हणून निवडक सेनेसह स्वयंवर मंडपात प्रवेश केला  व कोणाला कांही कळायच्या आंत राजकन्या मिंत्रवंदाचे हरण करुन बाहेर सज्ज असलेल्या रथातून तिला वायुवेगाने रवाना केला. निरोप मिळाल्यानुसार रुख्मिणीने, द्वारकेत प्रवेशलेल्या मित्रवंदाचे पांच सुहासिनीसह तिचे औक्षण करुन, मंगल वाद्यांच्या गजरात स्वागत केले.

                           क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                  दि.  ५-६-२०२२.

15

*!!!रूख्मिणी भाग-१५!!!*

               श्रीकृष्ण प्रचंड सेनेसह प्राग्ज्योतिष्यपूरला पोहचुन ब्रम्हपुत्रा नदीच्या वाळवंटात तळ ठोकल्याची दुताकरवी वार्ता द्वारकेत आली. कामराजराज्य बलाढ्य होतेच त्याचबरोबर तांत्रिक विद्या व मायावी युध्दतंत्रतेचे आगर होते.

                नरकासूरचा सेनापती  मूर युध्दासंबंधी सारे निर्णय घेत असे. सुरवातीला त्याने मायावी युध्द केल्यामुळे यादववीर मृृत्युमुखी पडू लागले. अखेर श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राचा वापर करुन मायावी जाळे उखडले व मूर व त्याच्या सहा पुत्रांचा वध केला. सेनापती पडल्यानंतर भौमासूर रथावर आरुढ होऊन रणांगणावर प्रवेशला. प्रथम धनुष्यबाण युध्द, नंतर तुंबळ गदा युध्द झाले. श्रीकृष्णाच्या गदेच्या प्रचंड प्रहाराने भौमासूराचा वध झाला. त्या दिवशी अश्विन अनंत चतुर्दशी होती. राजाच धारातीर्थी पडल्याचे पाहून नरकासुराचे सैन्य श्रीकृष्णाला शरण आले. दुष्ट राजाच्या क्रूर राजवटीतून त्यांची सुटका झाल्यामुळे  त्यांना फार आनंद झाला.

          नंतर बंदीवान सोळा सहस्र युवतींची सुटका केली. त्या मुक्त झाल्यावर अत्यानंदाने घरी गेल्या पण त्या कलंकित झाल्या  या समजाने त्यांचा स्विकार न केल्याने त्या परत येऊन श्रीकृष्णाला शरण येउन म्हणाल्या आम्हाला घरचे दरवाजे नेहमीसाठी बंद झालेत.  श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही निराधार नाही मी तुमचा आधार, रक्षणकर्ता म्हणून तुमच्या पाठीशी आहे. ते सत्यभामाला म्हणाले, राणी, यांच्या पुनर्वसनाची तयारी करण्यासाठी दुताला पाठवून महाराणीला व्यवस्था करण्याचा निरोप दे.

            तेवढ्यात भौमासुरपुत्र भगदत्त येऊन म्हणाला, द्वारकाधीश, मी आपल्याला शरण आलोय, द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. नाही भगदत्ता, हे राज्य तुझेच आहे, तूच सम्राट म्हणून राज्य कर! आजच तुझा राज्याभिषेक होईल. फक्त एक वचन दे. तूं सन्मानाने व नीतीने राज्य करावे.

            इथले काम संपल्यामुळे, द्वारकेत त्यांच्या आगमनाची उत्सुकतेने वाट बघत असतांनाच त्यांना कळले की, श्रीकृष्ण,सत्यभामा, उध्ववजी स्वयंभू हिमलिंग दर्शनासाठी अनमरनाथला जात आहेत. आणखी दीर्घकालासाठी स्वामींची भेट लांबणीवर पडली म्हणून रुख्मिणीला वाईट वाटले. त्यात मधुन मधून प्रद्युम्नची आठवणही अस्वस्थ करीत होती. तोच वार्ता आली, कौशलदेशाच्या राजाने लावलेला अवघड “पण”  जिंकून गंडकी नदीकाठची कौशल्यकन्या सौंदर्यवती व नृत्य कला निपून सत्येशी श्रीकृष्ण विवाहबध्द झाले.

       भगवत्ताने पाठविलेल्या अगणित संपती व उपहाराने द्वारकेचा कोषागार समृध्द झाला. कांही दिवसांनी सत्यभामे सह नववधू सत्याचे द्वारकेत आगमण झाले. पाठोपाठच सोळा सहस्र कामरुप स्रीयांना घेऊन अजस्र नौका द्वारकाद्वीपाच्या किनार्‍यावर आल्या. सत्यभामेला दिवस गेल्याचे ऐकून रुख्मिणीला अतिशय आनंद झाला. स्वामी, बलरामदादा, उध्ववभाऊजी तिघेही द्वारकेत नसले तरी, गुरुवर्य सांदीपनी, गुरुवर्य गर्गमुनींच्या देखरेखेखाली नित्यव्यवहार काटेकोरपणे सुरु होते. स्वामींची अमरयात्रा आटोपून त्यांचे लवकरच द्वारकेत आगमन होत असल्याचे कळल्यावर स्वामींची आतां लवकरच भेट होईल म्हणून ती व द्वारकेतील लहान थोर सगळेच आतुरतेने वाट बघत होते.

          नरकासूरयुध्द विजयामुळे द्वारकेला तिहेरी फायदा झाला.या युध्दामुळे सुवर्ण द्बारकेचा सर्वीकडे डंका निनादला.भगदत्तने अगणित धन,पशु, सैनिक, शस्र उपहारात दिल्यामुळे द्वारकेचा कोषागार समृध्द झाला. राजनितीच्या दृष्टीने अनेक पराक्रमी व धनवान सम्राटांशी मैत्रीचे नाते जोडल्या गेले.सर्वात महत्वाचे म्हणजे अन्यायाला वचक बसला कुठेही अन्यायपिडींतांसाठी योगेश्वर कृष्ण धावुन जाऊन येतो हा दिलासा मिळाला.

              रुख्मिणी इतकी व्यस्त असून सुध्दा प्रथम पुत्र प्रद्युम्नची आठवण आली की अस्वस्थ होत असे. नारळीपोर्णिमेच्या आदल्या दिवशी श्रीकृष्ण व उध्ववजींचे आगमन होणार ही वार्ता दूताने आणली. अखेर ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उजाडला. मंगल वाद्यांच्या गजरांत श्रीकृष्णाचे शुध्दाक्ष महाद्वारावर आगमन झाले. औक्षण, ओवाळणे झाले.

              दुसर्‍या दिवशी खास सुधर्मासभा बोलावून नरकासूर मोहिमेची माहिती दिली. वर्णन ऐकून सर्वजणं रोमांचित झाले. सभा संपल्यावर जयजयकाराच्या गजरात सारा आसमंत दणाणून गेला. रुख्मिणीचे ह्रदय स्वामींच्या कर्तृत्वाने, अभिमानाने भरुन आले. श्रीकृष्ण द्वारकेत परतल्याबरोबर बलरामदादांना आणायला उध्ववभाऊजींना पाठवले आणि तेही सारं विसरुन धावत आले. दोघे बंधू प्रगाढ अलिंगणात लिप्त झाले. ते मिलन पाहून सर्वांचे डोळे पाणावले. मिठी सुटेना म्हणून रुख्मिणी म्हणाली, दादा, तुमची वाट फक्त धाकटेच नव्हते बघत, तितक्याच आतुरतेने वाट बघणारे आणखीही कांही लोक आहेत बरं का! गडगडाटी हसत दादा म्हणाले, रुख्मिणी, तुझ्या बोलण्याचा मतितार्थ आला ध्यानात, पण ते प्रकरण इतक सोपं नाही.त्यासाठी कित्येक दिवस मास लागतील. आम्ही क्रोधात गेल्याची शिक्षा भोगण्यास तयार आहो.

                        क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                  दि. ५-६-२०२२.

रूख्मिणी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading