कैकयी एक रहस्य भाग ५, (१७ ते २०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! कैकयी एक रहस्य !!!

!!!  कैकयी  !!!
                   भाग – १७.

        रामांचे असे बोलणे ऐकून लक्ष्मणाचा क्रोध जास्तच भडकला.त्याला शांत करत राम निक्षून म्हणाले, सौमित्रा माझा हा निर्णय ब्रम्हदेवही बदलू शकत नाही.त्यामुळे क्रोधाला आवर घालून माझ्या वनगमनाची तयारी कर. कौसल्याला कळून चुकले आतां राम आपला निर्णय बदलणार नाही म्हणून तिने वनगमनाची आज्ञा दिली व आशिर्वाद दिला.

               आणि या सर्वापासून अनभिज्ञ सीतेचा निरोप घ्यायला राम तिच्या महाली गेले. वनगमनाची वार्ता वनव्यासारखी नगरीत पसरली.काहीवेळा पूर्वी रामराज्याभिषेकासाठी जयजयकार करणारी रयत आतां चिंताग्रस्त झाली.एवढे सर्व होऊन,महालात व्रतस्थ असलेल्या सीतेला मात्र गंधवार्ताही नव्हती.ती पूजा करुन पतीच्या प्रतिक्षेत असतांनाच रामांनी प्रवेश केला.लक्ष्मण दाराबाहेरच थांबला बराच वेळ झाला तरी राम बाहेर आले नाही म्हणून अस्वस्थ,आशंकित लक्ष्मणाने आत प्रवेश केला असतां सीतेचे बोलणे त्याच्या कानी पडले.स्वामी तुमच्या शिवाय मी इथे राहूच शकत नाही. जिथे तुम्ही तिथे सीता. शिवाय ज्यातीष्यानेही दीर्घकाल पतीबरोबर वनवास घडेल असे भाकित केले होते.पती समवेत राहणे हाच माझा धर्म!तोच स्वर्ग आहे.नेणार नसलात तर आताच प्रायोपवेशनास बसून प्राणत्याग करेन.शेवटी स्रीचे सर्वात मोठे शस्र काढले.दादाचे पाय घट्ट धरुन स्फुदुन स्फुंदुन रडत त्यांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक करुं लागली.

            तिला उठवित राम म्हणाले, प्रिये, वनात जाण्याची तयारी कर!ऐकत असलेला लक्ष्मण तरी कसा मागे राहिल? रामाचे पाय घट्ट धरुन,अश्रूंचा अभिषेक करीत म्हणाला, दादा, मी तुमची सावली असतांना, सावलीशिवाय माझे काय अस्तित्व? मीही येतोय! रामांनी त्याला समजावण्याचा बराच प्रयत्न केला.तुझी अर्धांगीनी उर्मिलाचे काय? निदान तिचा विचार करुन तरी वनात येण्याचा हट्ट सोडून दे. नाही दादा, उर्मालाला मी ओळखतो.तिची माझ्या सोबत येण्याची इच्छा कितीही तीव्र असली तरी ती कर्तव्याला महत्व देणारी आहे.ती इथेच कर्तव्य करत १४ वर्षे माझी वाट पाहत,सर्वांची सेवा करण्यास थांबेल.त्यानेही पायोपवेशनाचे अस्र बाहेर काढले.मी आजपर्यत तुमच्याशिवाय कोणाकडेच हट्ट केला नाही.केलेला हट्ट तुम्ही पुरवित आलात.मग आतासुध्दा पुरवाल ना? त्याला उठवत राम म्हणाले,मी तुझी परीक्षा घेत होतो त्यात तूं उतरलास.या जन्मीच्या माझ्या ध्येयतूर्तीसाठी तुझे माझ्यासोबत असणे आवश्यक आहे.चल तयारीला लाग.परशुरामां नी दिलेले वैष्णव धनुष्य, ब्रम्हर्षी  विश्वामित्रांनी दिलेले अक्षय शरतुणीर व खडःग, तुझे विजय धनुष्य,शर तुणीर ही सर्व आयुधे बरोबर घे. आणि सर्वांचा निरोप घे म्हटल्याबरोबर त्याच्या नजरेसमोर उभी राहिली ती त्याची प्रिया ऊर्मिला! क्षणापूर्वी रामांनी दिलल्या अनुमती च्या आनंदाची धुंदी खाडकण उतरली.

              उर्मिलासमोर जाऊन तिचा निरोप घेण्याचे धैर्य त्याच्यात नव्हते. सोशिक असल्या मुळे अनुमती देईलही.पण बंधूप्रेमापुढे तिच्या भावनांचा विचार त्याने केलाच नव्हता.ती पती विरहाचे १४ वर्षे दुःख सहन करुं शकेल?नाराजी नाही दाखवली तरी आतल्या आत कुढत राहिल.तिच्यासमोर कसा उभा राहू? सुमित्रामातेचा प्रश्न नव्हता.ती माझा स्वभाव व रामावरील माझे प्रेम जाणते.

            आतां मात्र कैकयीमातेचा भयंकर संताप येऊ लागला.तिच्यामुळे सर्वांनाच विरह यातना भोगाव्या लागणार होत्या.पण रामाच्या शपथेने तो बांधल्या गेला होता.अखेर उर्मिला च्या बाबतीत पलायणवादी मार्ग स्विकारण्याचे ठरविले. सुमित्रामातेचा निरोप घेण्यास तिच्या महाली प्रवेशला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.जिला तो टाळणार होता ती त्याची प्रिय उर्मिला तिथे बसलेली दिसली.दोघी सासुसुना कष्टी चेहर्‍याने बसल्या होत्या. तो दिसताच सुमित्रा म्हणाली, ये वत्सा! माझी अनुमती घ्यायला आलास ना? तू काय परवाणगी घेतोस, मिच तुला रामाबरोबर जायची आज्ञा देते. जिथे राम तेथे लक्ष्मण हे समिकरणच आहे.तूृअयोध्येची काळजी करु नकोस.तुझ्या माघारी मी व माझी ही गुणी सून मिळून सर्वांची काळजी घेऊ,सेवा करु.इतकेच काय पण तुम्हाला वनात पाठवणार्‍या कैकयी कडे अनुजा समजून लक्ष देईन.जा ..बाळा..जा.

                    क्रमशः
  संकलन व  © ®  मिनाक्षी देशमुख.
                  दि. १-४-२०२२.

!!!  कैकयी  !!!

                  भाग – १८.

          मातेऽऽ हा एकच शब्द लक्ष्मणाच्या मुखातून बाहेर पडला.धावत जाऊन तिच्या पायावर अश्रूंचा अभिषेक करु लागला. माते विषयीच्या अभिमानाने त्याचा ऊर भरुन आला.  जरी मातेने उर्मिलाची हमी घेतली पण सीते सारखा सोबत येण्याचा हट्ट धरला तर कसे समजावू? या उहापोहात असतांनाच  तिनेच त्याच्या चरणावर स्वतःला लोटून दिले.अश्रूंनी पाय भिजवत होती.तिला उठवून मातेशेजारी बसवले.जणू तिची मुकसंमती होती. त्याच्या मनातील असंख्य विचारांची गर्दी मोडीत काढत सुमित्रा म्हणाली, वत्सा! उर्मिलाची तूं मुळीच काळजी करुं नकोस इक्ष्वाकुवंशाला भूषण वाटणारी कुलवधू लाभली हे या वंशाचे भाग्यच होय.ती आपल्या पतीला बरोबर ओळखते. जेव्हा तुम्हा तिघांच्या वनगमनाबद्दल कळले, तेव्ही तीच माझ्याकडे येऊन मला समजावत  म्हणाली, ते मला काहीही सांगणार नाही.सांगू शकणार नाही.वनामधे सीतेची व रामभाऊजीं ची काळजी घ्यायला कुणी नको का? थोरल्या भावाची सावली, बहिश्वर प्राण असलेले आर्यच हे काम करूं शकतील.मी मुळीच अडवणार नाही किंवा सोबत येण्याचा हट्ट धरुन त्यांची कुचंबना करणार नाही.शिवाय त्यांचेमाघारी इथे माझी जास्त आवश्यकता आहे.कर्तव्य श्रेष्ठ समजून त्यांना हसतमुखाने निरोप देईन.

            लक्ष्मणाला माता आणि पत्नीचा सार्थ अभिमान वाटला मन उचंबळून आले.क्षणभर डोळे मिटून घेतले.डोळे उघडले तेव्हा त्याची प्रिया, धर्मपत्नी सुहास्य वदनाने औक्षणाचे ताट घेऊन उभी होती.तिने औक्षण करुन हातावर दही ठेवले. मातेचा आशिर्वाद घेऊन तडक महालाबाहेर निघून गेला.

            उर्मिला आपल्या महाली येऊन मंचका वर धाडकण अंग टाकले व अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.तिला आठवले, लग्नापासून ते आतांपर्यतचा काळ कसा आनंदात गेला.काल तर आर्य आनंद वार्ता घेऊन येत म्हणाले,मिलाऽ  उद्या माझा दादा रामचा राज्याभिषेक होणार आहे.ही आनंदवार्ता कौसल्यामातेला देण्यास ती जात असतां,दोवारिका दासी जवळ येऊन दबक्या आवाजात म्हणाली, धाकट्या दीदी, घात झाला.आज थोरल्या युवराजांचा होऊ घातलेला अभिषेक होणार नसून युवराज भरतांचा होणार आहे.थोरले युवराज श्रीराम, दीदी सीतादेवी आणि धाकटे युवराज लक्ष्मण वल्कले नेसून चौदा वर्षासाठी दंडकारण्यात वनवासातस जात आहेत.दोवारिकेने ही बातमी सांगीतल्याबरोबर एकदम विजेचा लोळ अंगावर पडल्यासारखा आघात झाला. पाया खालची जमीनच जणूं सरकली.पायातील त्राण नाहीसे होऊन मूर्च्छा येऊ लागली.

              एवढी भीषण घटना घडली आणि स्वामींनी कल्पनाही देऊ नये याचे उर्मिलेला वैषम्य वाटले.विचारांती तिलाच वाटले,घटनाच एवढ्या वेगाने घडल्या की,त्यांना सांगायला वेळच मिळाला नसेल.निरोप घेतेवेळी सांगतील सीतादीदी खरच भाग्यवान!वनात का होईना,ती तिच्या पतीसोबत राहणार आणी ती? तिचे सर्वस्व श्रीरामासोबत जाणार!तिला मात्र कर्तव्य पूर्तीसाठी इथे थांबणे भाग आहे हे ही तितकेच महत्वाचे!उर्मिला तडक कोपभवनाकडे गेली व आडोशाला राहून आंतले दृष्य पाहिले आणि हुंदका फुटते की काय असे वाटले.महत् प्रयासा ने रोखला.छोट्या सासुमातेचे शब्द कानावर आले, महाराज,मूर्च्छित पडण्याचे नाटक बंद करा. रघुवंशातील महान सत्यवचनी पूर्वजांची बूज राखा.पितृवचन पाळण्यासाठी राम अर्ध्यागीनी सीता व अनुज लक्ष्मणासह चौदा वर्षे वनात जाण्यास सिध्द झालेत.भरताला सत्वर बोलावून त्याचा राज्याभिषेक उरकवून घ्या.नंतर त्या रामाकडे वळून म्हणाल्या, रामा तू मर्यादा पुरुषोत्तम व आदर्श पुत्र आहेस.तू जाणतोस, भरताहीपेक्षा तुझ्यावर जास्त माया आहे, तरीही तुला वनात पाठवत आहे त्यामागे कांहीतरी रहस्य असावे हे तुला ठाऊक आहे, मी कोणाला सांगू शकत नाही कारण मी मर्यादेने बांधली आहे.तुझ्या राज्याभिषेकाची  वार्ता कळल्यावर सर्वात जात आनंद मला झाला होता.ही वार्ता ऐकण्यासाठी मी स्वामींची वाट पाहत….आणि त्या अर्धवट बोलून मूक झाल्या.अज्ञात अतिद्रिंय शक्तीने त्यांच्या जिव्हेवर नियंत्रण मिळविले.

                  क्रमशः
    संकलन व  © ® मिनाक्षी देशमुख.
                 दि.१-४-२०२२.

!!!  कैकयी  !!!

                  भाग – १९.

            आतां आणखी तिथे थांबणे योग्य व वाटल्याने ती परत फिरणार तोच कैकयीसासु मातेचे शब्द कानावर पडल्यावर पुन्हा थबकली. म्हणाल्या, राहिली उर्मिला.. तर तिची पती बरोबर जाण्याची कितीही तीव्र इच्छा असली तरी, ती जाणार नाही,कारण लक्ष्मण जसा राम भक्त आहे,तशीच उर्मिला सासुभक्त आहे.ती तिन्हीही सासवांच्या सेवेसाठी इथेच थांबेल.ती अत्यंत संयमी,सहनशील, सुसंस्कारी असल्या मुळे,ऐन तारुण्यात होणारा पतीवियोग सहन करेल.आपल्या माघारी आपले कर्तव्य आपल्या पत्नीने पार पाडावे ही पतीची इच्छा जाणून मूकपणे परिस्थिती आणि प्रसंगाला तोंड देत राहणार.वैदेही परिस्थितीची शिकार झालेली वीरांगणा आहे तर उर्मिला कोमलांगीनी आहे. चौदा वर्षे पतीविरहाचे दुःख सहन करणार्‍या तिच्या त्यागाला तोड नाही.मी खरं तर तिची अपराधी आहे पण इलाज नाही.

             कांही वेळापूर्वी धाकट्या सासूबाईं  विषयी तिच्या मनात जो अनादर निर्माण झाला होता, तो त्यांचे बोलणे ऐकून नाहीसा झाला. स्री ह्रदयाचे आकलन निर्माण करणार्‍या ब्रम्हदेवासही होत नसावे.कालपर्यंत स्वपुत्र भरतापेक्षाही श्रीरामभाऊजींवर प्रेम करणार्‍या कैकयीमाता या क्षणी अश्या अचानक कां बदलल्या हे एक कोडेच आहे. भल्याभल्यांना स्रीमनाचा,स्रीह्रदयाचा  ठाव घेता येत नाही हे खरे असले तरी पुरुषजात स्रीमनाचा विचार करत नाही,अपवाद वगळता.!

              मानीनी कैकयीदेवींनी भरतासाठी राज्य मागीतले ते केकयनरेशांना मिळालेल्या वचनांवर अवलंबून नाही तर, मांमजीमहाराजां कडून मिळालेल्या वराच्या आधारे. मांमजींनी रामराज्यभिषेकाचा निर्णय घेण्याआधी कैकयी मातेला विश्वासात घेतले असते तर कदाचित चित्र वेगळे असते,पण नियती? रामराज्याभिषेकाची आनंदवार्ता मंथरेने आणल्याबरोबर तिला  अत्यानंदाने गळ्यातील मौक्तिकहार मंथरेला दिला अर्थात तिरस्काराने तिने स्विकारला नाही ती गोष्ट वेगळी.मग इतका आनंद झालेल्या सासुबाई अशा अचानक कश्या बदलल्या हे एक रहस्यच आहे.आणि ते कायम रहस्यच राहणार आहे.मंथरा केवळ निमित्य मात्र झाली. नियतीनेच त्यांच्या मनात किल्मिष निर्माण केले आणि साध्याभोळ्या,पण चटकन ज्वालाग्राही राळेसारख्या प्रज्वलित होणार्‍या सासूमाताच्या मनालाला त्या किल्मिषाची चूड लावली.पुढील रामायण घडावे हीच नियतीची इच्छा असावी.सारेच नियतीच्या हातचे बाहूले आहोत.

            नियतीमुळेच सावत्र मुलांचा द्वेष करणारी,पतीच्या मृत्युस कारणीभूत ठरवणारी हलक्या कानाची, मत्सरी स्वभावाची इत्यादी शेलक्या शब्दात त्यांची भविष्यात कायम निर्भत्सना होणार ,त्यांना खलस्री ठरवल्या जाणार हे त्यांना पूर्णपणे ठाऊक असूनही त्या दोन वर मागून घेण्याच्या निर्णयावर आल्या यातच त्यांचे धारिष्ट्य दिसून येते.कानफुंकणारी मंथरा केवळ निमित्य ठरणार होती.स्वतः त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वी होत्या.हुशार,धोरणी, राज कारणपटु, विचारी असतांना खरच एका शुल्लक दासीच्या बहकावणार्‍या हलक्या काना च्या नक्कीच नव्हत्या.भरतभाऊजी राज्य स्विकारणार नाही हे त्या पूर्णतः जाणून होत्या. तरीही त्या निर्णयावर ठाम राहिल्या. आता त्या अशा पायरीवर उभ्या होत्या की,त्यांच्या परती च्या वाटा बंद झाल्या होत्या.सर्व दैवावर,नियती वर सोडून पुढे जे घडेल ते शांतपणे बघणेच त्यांच्या हाती उरले होते.

              बाहेर जनता आक्रंदत होती. अंतःपुरात मंथरा वगळतां सेवक,दासदासी, द्वारपाल,राजपरिवार रडत होते.कैकयीसासुमां ही अपवाद नव्हत्या. थोरल्या रामभाऊजींना त्यांच्या त्यागाची जाणीव झाली ही खात्री वाटल्यावर त्याना इतरांच्या दोषारोपनाची क्षिती नव्हती.सासुमाचा हा अव्यक्त महान त्यागच म्हटला पाहिजे.संपूर्ण हयातभर अहोरात्र पश्चातपदग्ध मनःःस्थितीत समिधेसारख्या जळत राहणार होत्या.जग त्यांच्या या महान त्यागाचा कधीतरी विचार करेल का?

         रामभाऊजींना निरोप देतेवेळी त्यांना कांहीतरी सांगायचे होते पण त्यांना खुणेनच शांत राहण्यास रामांनी सांगीतले.त्या म्हणाल्या, श्रीरामाऽऽ आणि तीव्र गहिवर आल्याने शब्ध घशातच अडकले.जणूं त्यांना क्षमा मागायची असावी.सांत्वन करत रामभाऊजी म्हणाले, माते,या जन्मी तुला मातृसुख देण्यास कमी पडलो ,पण पुढील जन्मी भरभरुन सुख देईन हे या एकवचनी रामाचे वचन आहे.एकदम या वाक्याने त्या मनोमन तृप्त झाल्या.

                      क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                  दि. ६-४-२०२२.

!!!  कैकयी  !!!

                   भाग – २०.

          श्रीराम वनात जायला निघाले तेव्हा कैकयीसासुमा ढसाढसा रडत होत्या.सामान्य जनांना वाटत होते,भरतभाऊजींना राज्य मिळणार म्हणून आनंदाश्रू वाहताहेत.पण हे खरे नव्हते. रामभाऊजी दुरावत असल्याचे दुःखाश्रू होते.कैकयी समजणे या जगाला समजणं फार अवघड होते. यानंतर संपूर्ण जगा कडून यावचंद्रदिवाकरौ भविष्यात मानहानी, अपमान,हेटाळणी,द्वेष,राग,संताप हेच त्यांच्या वाट्याला येणार होते. म्हणूनच निरोप देतांना रामभाऊजी म्हणाले, उर्मिला, कोणातही भेदभाव न करतां तिन्हीही मातांची सारखीच काळजी घे!

              श्रीराम, सीता, लक्ष्मण, सर्वी शस्रास्रे सोबत घेऊन महाराजांचा निरोप घेण्यास कैकयीमहालात आले.एव्हाना रामराज्यभिषेक न होता वनात जात आहे ही वार्ता वार्‍यासारखी अयोध्येत पसरल्यामुळे सारी जनता अतिशय दुःखी होते.रयत महाराजांना दुषणे व कैकयीला शिव्याशाप देत असावे.महाराज अत्यंत कष्टाने  रामाऽ! या कैकयीने मला वरा च्या बंधनात अडकवले, पण तू मला कैदेत टाकून राज्य कारभार हाती घे.हात जोडत, विनयाने राम म्हणाले,

तातमहाराज! मला राज्याचा मोह कधीच नव्हता. आपण अनेक वर्षापासून या पृथ्वीचे अधिपती राहिलेले आहात,पुढेही राहावे. १४ वर्षे वनवास भोगून आपले वचन सत्य करुनच आपले पायाशी परत येईन.

             वचनबद्ध महाराज अतिशय कष्टी दुःखी होताहेत बघून कैकयीलाही वाईट होते. पण ती आतां माघार घेऊं शकत नव्हती.मोठ्या कष्टाने रामाला महाराजांनी अलिंगनबध्द  केले. कैकयीलाही रामांना आपल्या कवेत घेण्याची तीव्र इच्छा होती,पण ती उघडपणे तसं करुं शकत नव्हती.सारा राजपरिवार शोक करीत होता.पण कैकयीला उघडपणे शोकही करतां येत नव्हता.ती मनातल्या मनात आक्रंदत होती सर्वजणं तिच्याकडे घृणेने,उपेक्षेने पाहत होते. नारदमुनी म्हणालेच होते! तुझ्या या योजनेला जग तुला खलस्री ठरवेल,पण जनहितासाठी सारे सहन करावे लागेल.विध्याचा हाच आदेश आहे.महाराज सुमंत्रांना म्हणाले, यांना रथातून अयोध्येबाहेर पोहचवून द्या.

           ज्या राजवाड्यात नित्यनेमाने मंगल ध्वनी निनादत असे तोच राजवाडा आता मूक पणे रडत होता.तिघेही रथारुढ झाल्यावर, आबालवृध्दापासून सारे नगरवासी रथाच्या मागे जाऊ लागले.

             त्यादिवशी ना राजवाड्यात ना नगरात कुणीही भोजन केले नाही की, रात्री झोपूं शकले.कैकयीही झोपू शकली नाही.कशी झोपेल? भरत आल्यावर काय होईल याची चिंता तिला जाळत होती.भरत राज्य ग्रहण करणार नाही याची तिला पक्की खात्री होती. पण सिंहासन जास्त दिवस रिक्तही ठेवतां येणार नव्हते. या परिस्थितीत काय मार्ग निघतो ? आजपर्यंत तिला वाटत होते, महाराज खंबीर पणे हा धक्का पचवून नित्य कामे सुरळीत होतील.ते जरी म्हणत असले की, आतां मी जिवंत राहू शकत नाही हे बोलणे केवळ धाक दाखवण्यासाठी असेल असे तिला वाटत असतांनाच लहानपणीची घटना तिला आठवली ती त्यावेळी फार तर १३-१४ वर्षाची अल्लड, खोडकर बालिका होती. केकयनगरीजवळील उपवनात एक ऋषी ध्यानस्थ बसले होते. कैकयी सख्यांसह वनविहाराला तिथे आली असतां, ध्याधस्थ ऋषींना बघून खोडी करावसी वाटल्याने,बाजूलाच एक जळलेल्या वृक्षाची काळी पुड घेऊन ऋषीच्या चेहर्‍यावर फासली. ध्यानातून बाहेर आल्यावर तोंडाला काळे फासल्या गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांना प्रचंड संताप आला आणि शापवाणी उच्चारली, “आज तूं माझे तोंड काळे केलेस,भविष्यात तुझ्या कृष्णकृत्याने तुझे पती प्राण त्यागतील आणि सार जग तुझं हा सुंदर मुखडा काळा समजून कोणी तुझे तोंड बघणार नाही.

                शाप देऊन ऋषी निघून गेले. बाल पणातील हे घडलेलं प्रकरण ती पूर्णपणे विसरुनही गेली. पुढे महाराजांशी विवाह झाला सर्वसुख सोयी पायाशी लोळत होते. आतामात्र त्या शापवणीची आठवण झाली व पायाखाल ची जमीनच सरकली. महाराजांकडून वरदान मागून घेतल्याचा पश्चाताप होऊ लागला पण वेळ निघून गेली होती.राम परत फिरणे शक्य नव्हते आणि नियतीही तसे करुं देणार नव्हती. भरत राज्यग्रहण करणार तर नाहीच पण तिची अवहेलना,मानखंडना करुन दुषणे देणार हे जाणून होती.मनाची तयारी केली.तिच्या या कृषाणकृत्याने महाराजांचे प्राण जातील हे ती कुणाला सांगूही शकत नव्हती. नारदमुनी आणि शारदादेवीने तिला पुरते पाशात अडकवले होते.

शाप देणार्‍या ऋषीची वाणी खरी ठरु पाहत होती.तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करण्या शिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

                    क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि. ६-४-२०२२.

                            

 

कैकयी एक रहस्य संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading