कैकयी एक रहस्य भाग २, (५ ते ८)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! कैकयी एक रहस्य !!!

!!!  कैकयी  !!!

                  भाग – ५.

          देवेंद्रांनी दशरथराजाचा सत्कार करुन आपल्या आसनाशेजारी त्यांना बसवून घेतले. आणि कैकयीला इंद्रपत्नी शचीदेवींनी आपल्या जवळ प्रेमाणे बसविले.असा सन्मान मिळवणारे बहुधा दशरथ हेच एकमेव महिपती असावे. स्वर्गातील अनुपम सौंदर्य बघून कैकयी अगदी हरखून गेली. तेथील अप्सरांचे सौंदर्य पाहून विश्वामित्र आणि विभंडडिक ऋषी सारखे थोर व महान तपस्वींचे तपखंडन होऊन कां कच्छपी लागले हे लक्षात येते. तेथील वातावरण, नृत्यागणांचा पदविलास, किन्नरांचे मधूर गायन इत्यादी सारे सारे मन मोहवून टाकणारे होते. चालतांना जणूं तरंगल्यासारखे वाटत होते. येथील सुमधूर पेय, भोजन अतिशय चवदार होते.आसने,शय्या जणूं पिंजलेल्या कापसा सारखे मऊ होते.

            शंबरासुरावरच्या विजयामुळे राजा दशरथांबरोबर कैकयीलाही स्वर्गसुख घेण्याचा योग आला.तिला इथून हलूच नये असे वाटत होते. एक महिन्याच्या वास्तव्यानंर देवेंद्र राजाला म्हणाले, तुम्ही हवे तेवढे दिवस इथे राहू शकता परंतु पृथ्वीवरचे तुमचे कार्य अपूरे राहिले असल्यामुळे तुम्हाला परत जाणे भाग आहे. देवेद्रांनी अनेक किंमती उपहार,आभुषणे,वस्रे, शिवाय अस्रशस्रही प्रदान केली. कर्तव्याची जाण असलेल्या राजासह कैकयीला विमानाने पृथ्वीवर पोहचविण्यात आले.स्वर्गाच्या अवर्णीय आठवणी कौसल्या व सुमित्राला सागण्यास कैकयी उताविळ झाली होती.

               विवाहानंतरचे १५-१६ वर्षे अगदी सुखात गेलीत.पण अलिकडे दशरथराजा उदास  राहू लागले. कारण आम्हा तिघीनांही अद्याप पुत्र झाले नव्हते. वंशाला व या समृध्द कोसल सामाज्याला वारस नसल्याचे दुःख त्यांना छळत होते. कैकयीच्या लग्नाअधी कौसल्येला शांता नावांची मुलगी झाली होती. पण अंगदेशनरेश रोमपाद व कौसल्याची मोठी बहिण वर्षिनीदेवी ला अपत्य नसल्यामुळे दशरथराजांनी प्रथम अपत्य देण्याचे त्यांना वचन दिले असल्यामुळे, पहिले अपत्य शांताला अगदी बालवयातच त्यांना दत्तक दिले होते.याही घटनेला वीस वर्षाचा काळ लोटला.त्यानंतर अयोध्येच्या राजमहालात पाळणा हलला नाही. कौसल्या सुमित्रा या दोघींनाही अपत्यप्राप्ती झाली नाही. अशातच राजा केकयानगरीत आले असता ते कैकयीच्या रुपाला तर भाळले होतेच पण तिला तरी पुत्र होईल या हेतूने त्यांनी कैकयीशी विवाह

केला.सुरवातीचे कांही वर्षे दशरथराजा निश्चिंत होते.कारण  ते युवराज व अविवाहित असतांना त्यांना अवगत असलेल्या रववेधी धनुर्विद्येने श्रावणाचे अनवधाने हत्या झाली त्यावेळी त्याच्या अंध व वृध्द मातापित्यांनी  शाप दिला होता, तुलाही आमच्याप्रमाणेच पुत्रवियोगाने मृत्यु येईल शिवाय कौसल्यासोबतच्या विवाह प्रसंगी ब्रम्हदेवांनी रावणास म्हटले होते, तुझा मृत्यु कौसल्या- दशरथपुत्राकडून होईल.या ब्रम्हवचनावर राजाचा दृढ विश्वास होता. म्हणूनच ते निश्चिंत होते.

            दशरथराजा आता तारुण्याकडून वार्धक्याकडे झुकत चालले होते, आता मात्र पुत्र नसल्याच्या चिंतेने ग्रासले होते. ब्रम्हवचन आणि श्रावणाच्या मातापित्याचा शाप अजून पर्यंततरी फळास न आल्याने अश्वमेध व पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्याचे ठरविले.कुलगुरु वसिष्ठ मुनींच्या सल्ल्यानुसार यज्ञाचे मुख्य ऋत्विज शांताचे पती ऋष्यश्रृंग ऋषींना देण्यात आले. त्यांच्याबरोबर शांता आल्याने सर्वांनाच आनंद झाला. शरयूनदीतीरी वर्षभर या यज्ञाची तयारी सुरु होती.अश्वमेध व पुत्रकामेष्ठी यज्ञ सफल व पूर्ण झाले.या यज्ञात दशरथराजासह तिन्ही राण्या अनुष्ठानास बसले होते. यज्ञात ऋषश्रृंग ऋषींनी पूर्णाहुती दिल्यावर एक दिव्य तेजस्वी दिव्य पुरुष पायसपात्र हातात घेऊन प्रगटले व  पात्र राजाला दिले. राजाने पायसाचे दोन भाग केले.पैकी एक भाग कौसल्यादेविस व एक भाग कैकयीला दिल्याचे पाहून सुमित्रा खिन्न झाल्याचे लक्षात येताच कौसल्याने आपल्या भागातला तिसरा भाग सुमित्राला दिला. कैकयीनेही तिचे अनुकरण केले. राजाचे तिन्ही राण्यांवर सारखेच प्रेम असतांना ते असे कां वागले असावेत?कदाचित त्यांना आमची परीक्षा बघायची असावी. दोघींनी आपल्या हिश्यातील भाग दिल्याचे पाहून त्यांच्या मुखावर प्रसन्नता दिसली.

           त्याचवेळी गुरु वसिष्ठांनी भविष्य वर्तवले…कौसल्यादेवीच्या पोटी जन्माला येणारा पुत्र जेष्ठ व जगातील महान पुरुष म्हणून  तसेच कैकयी पोटी येणारा दुसरा पुत्र धर्मात्मा, आणि सुमित्राच्या पोटी येणार्‍या जुळ्या पुत्रां पैकी पहिला पुत्र जेष्ठ भावाचा बहीश्वर प्राण तर दुसरा पुत्र कैकयीच्या पुत्राची सावली म्हणून प्रसिध्द पावेल. हे चारही पुत्र महापराक्रमी होतील व त्रिखंडात नांव दुमदुमेल.

                   क्रमशः
  संकलन व  © ®  मिनाक्षी देशमुख.
                    दि. २८-३-२०२२.

!!!  कैकयी  !!!

                भाग – ६.

          पायसप्रसाद सेवनाचा परिणाम लवकरच दिसून आला.तिन्हीही राण्या गर्भवती झाल्यात.तिघींचीही काळजी राजा घेत होते. कैकयीची विशेष काळजी घेण्यास मंथरा होती. सर्वात जास्त आनंद दशरथ राजास झाला. अयोध्या साम्राज्यास वारस मिळणार म्हणून सारी प्रजा आनंदी झाली.

              गर्भतेजाने कौसल्यादेवीची कांती सूर्यदेवाप्रमाणे तेजस्वी,तर सुमित्रादेवीची कांती अग्निप्रमाणे प्रखर व कैकयीची चंद्राप्रमाणे शितल, मधूर तेजस्वी दिसत होती. यथायोग्य समयी चैत्र  शुक्लपक्ष नवमीस पुनर्वसू नक्षत्र व कर्क लग्नात कौसल्यादेवींनी दिव्य गुणांनी युक्त अशा पुत्रास जन्म दिला.त्यावेळी सूर्य मंगळ, शनी,गुरु आणि शुक्र हे पांचही ग्रह उच्च स्थानी होते आणि लग्नी चंद्राबरोबर विराजमान होते. त्यानंतर कांही प्रहरांनी पुष्प नक्षत्र व मीन लग्नी एका प्रसन्नचित्त पुत्रास जन्म दिला.कापसावर गुलाबी छटा असल्यासारखे नाजुक सुंदर बाळ दिसत होते. त्याचवेळी दासीने येऊन सांगीतले की, सुमित्रादेवींनी आश्लेषा नक्षत्रावर कर्क लग्नात सूर्य उच्चस्थानी  विराजमान असतांना दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.राजमहालात व अयोध्यानगरी आनंदात बुडुन गेली.

             आपल्या राजास पुत्रप्राप्ती झाल्याने अयोध्या नगरीत मोठ्या आनंदाने उत्साह साजरा करण्यात येत होता.नगरीतील रस्ते पताका रांगोळ्यांनी सजले होते.घराघरांसमोर दीप,समया उजळल्या होत्या.घरांना गुढ्या तोरणे लावले होते.मंदिरांमधे वेद,अभंग,मृदुंग पखवाजाचा ध्वनी उमटू लागला.दीनदुबळ्यांना मिष्टांन्ने,कपडेलत्ते, आभुषणे वाटण्यात आले. अयोध्येतील वातावरण एकूनच मंगलमय झाले. 

               बाराव्या दिवशी कुलगुरु वसिष्ठांनी चौघा बालकांची नावे ठेवली.नीलवर्णी,सर्वांना आनंद देणारा,सर्वांना रमविणारा म्हणून कौसल्यापुत्राचे नांव राम तथा रामचंद्र ठेवले. जगताचे भरण करणारा महात्मा म्हणून कैकयी पुत्राचे नाव भरत तर उत्तम लक्षणांचे धाम म्हणून सुमित्राच्या प्रथम पुत्राचे नाव लक्ष्मण आणि सहज लीलेने शत्रु दमन करणारा म्हणून दुसर्‍या पुत्राचे नांव शत्रुघ्न ठेवले. नामकरण सोहळा विधीपूर्वक करण्यात आला.

           तिन्ही राण्यांमधे कैकयी सुंदर व तरुण असल्यामुळे सहाजिकच राजाचा ओढा तिच्या कडे अधिक होता.त्यांचा राज्यकारभारा व्यतिरिक्तचा वेळ कैकयीमहाली व्यतीत होत होता.तिच्याबरोबर राजकारणावर चर्चाही होत असे.त्यामुळे दासदासी,सेवक,मंत्रीगण तिच्या कडे येतांना बिचकत असत.त्यातही मंथरा कैकयीची मुख्य व आवडती दासी असल्यामुळे कैकयीकडे येणार्‍यांशी फटकून वागत असल्या मुळे कैकयीची प्रतिमा जनमाणसात मलिन होत होती.तिला समजावून सांगूनही मंथरेत बदल होत नव्हता.घश्यात हड्डी अडकल्यासारखी तिची गत झाली होती.पण इलाज नव्हता.

                 चारही बाळांच्या बाललीला व कौतुक पाहण्यात वेळ अपुरा पडत होता.रामा कडे लक्ष्मणाचा व भरताकडे शत्रुघ्नचा कल होता. कैकयीला सारखे वाटायचे, राम जरी आपल्या उदरातून जन्मला नसला तरी त्याचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचे अतूट नाते आहे. स्वपुत्र भरतापेक्षाही रामाचा लळा प्रेम रामावर जास्त होते.

             उत्तम गुणांनी युक्त असलेल्या चारही पुत्रांचे जातककर्मादी संस्कार  महाराजांनी मोठ्या थाटात साजरे केले.मातांच्या लाडाकोडात व पित्याच्या संरक्षणात मुलं मोठी होत होती. एक दिवस कैकयी आपल्या महालात निवांत बसली असतां लगबगीने येऊन कौसल्या सांगू लागली,अगऽ आज रामाचा स्नान श्रुंगार करुन त्याला पाळण्यांत व मी  इष्ट देवता नारायणाची पुजा करुन नैवद्याचे ताट त्यांच्यापुढे ठेवुन कांही कामासाठी बाहेर गेले. परत देवघरात आल्यावर पाहते तो काय? राम त्या नैवद्याच्या ताटात जेवत आहे.भयभीत होऊन रामाकडे आलेतर पाळण्यात राम गाढ झोपलेला.पुन्हा देवघरात येऊन पाहिले तर  राम तिच्याकडे मिश्किलपणे हसत भोजन करीत होता. अगऽ मी दोन राम बघितले.हा बुध्दीचा भ्रम आहे की काय? मला घाबरलेली बघून रामाने मधूर स्मित करीत आपले अद्भूत रुप दाखवले.

                   क्रमशः
  संकलन व  © ®  मिनाक्षी देशमुख.
                   दि. २८-३-२०२२.

!!!  कैकयी !!!

                 भाग – ७.

           कौसल्या पुढे सांगू लागली, मी रामाकडे बघत असतांनाच त्याने ” आ ” केला तर त्याच्या मुखात सारे ब्रम्हांड,तारे,सूर्य,चंद्र,ग्रह,पृथ्वी दिसली.शेषशायी विष्णूच्या रुपात रामाने मला दर्शन दिले.लक्ष्मी त्याचे पाय चुरत होती.त्याही पेक्षा आश्चर्य म्हणजे राम ज्या शेषावर पहुडले होते त्या शेषाचे मुख लक्ष्मणाचे होते.अभावित पणे त्या त्रिकुटास मी नमस्कार केला. दीदी तू खरोखरच फार भाग्यवान आहेस, धन्य आहेस. दिदी, प्रत्यक्ष परब्रम्ह तुझ्या पोटी जन्माला आले

              कौसल्या निघून गेल्यावर, कैकयीस वाटले,जरी मी रामाला जन्म दिला नसला तरी अंतरात्म्यास वाटते, माता- पुत्रापेक्षाही आमचे नाते घट्ट आहे.म्हणूनच भरतापेक्षा  काकणभर प्रेम रामावर जास्त आहे.

           कौसल्यादेवीला रामाने जसा चमत्कार दाखवला तसाच चमत्कार दुसर्‍या दिवशी भरताने कैकयीला दाखवला.दशरथ महाराज रोज सकाळी नियमितपणे दानकट्ट्यावर दान करीत असे.आज कांही कारणाने दानकट्ट्या वर जायला उशीर झाला.लगबगीने दानकट्ट्या कडे गेले असतां तिथे एकही याचक नव्हता.त्या कट्ट्यावर बाल भरत व शत्रुघ्न खेळत होते. बाजुला अदबीने सेवक उभे होते. महाराजांना वाटले आपल्याला विलंब झाल्यामुळे सारे याचक रिक्तहस्ते निघून गेले.त्यांना अतिशय वाईट वाटले.तिथे असलेल्या सेवकास म्हणाले आम्हाला थोडा उशीर झाला खरा,पण कुणीच याचक कां थांबला नाही, दान न घेता असे कसे निघून गेले? सेवक म्हणाला, महाराज कोणीही रिक्त हस्ते परत गेलेला  नाही.दान घेऊन तृप्त मनाने गेले आहेत. अरेऽ पण आम्ही दान दिलेच नाही मग दान दिले कुणी? आम्ही दिले. दान तख्तावर खेळत असलेल्या भरताने उत्तर दिले.

तातमहाराज आम्ही इथे खेळत होतो.याचकांची गर्दी वाढली.आपण आला नव्हता.याचक विन्मुख जाऊ नये म्हणून त्यांच्या इच्छेनुसार दान केले आणि ते तृप्त होत आम्हाला आशिर्वाद देऊन निघून गेले.

            महाराजांनी दोन्ही पुत्र भरत,शतृघ्नला छातीशी  कवटाळले.त्यांच्या मस्तकाचे दीर्घावघ्राण केले.त्यांनी कैकयीला सांगीतल्या वर तिला पुत्रांच्या या कृतीने मन भरुन आले. दोन्ही पुत्रांचा अभिमान वाटला.राजमहालात व अयोध्येत  चारही पुत्रांच्या गुणांची सारेच चर्चा करीत होते.

             शिशूवास्थेतील पुत्रांचे आठ वर्षे कशी भरकन निघून गेली कळलेही नाही. आठ वर्षे संपल्यावर कुलगुरु वसिष्ठांनी चौघांचेही उपनयन आणि मौजीबंधन संस्कार मोठ्या थाटात केले.यापुढची कांही वर्षे विद्याभासा साठी गुरुकुलात जाणार होती.इक्ष्वाकुवंशाचे कुलगुरी ऋषीवर्य वसिष्ठांच्या आश्रमात अनेक ऋषी होते.हा आश्रम शरयूनदीतीरी अयोध्ये पासून जास्त दूर नसल्यामुळे  महाराज पुत्रांवर लक्ष ठेवू शकत होते.अधून मधून तिनही माता त्यांना भेटावयास आश्रमात येत असत. गुरु वसिष्ठांनी एका कुटीत राम लक्ष्मण तर दुसर्‍या कुटीत भरत शत्रृघ्नची व्यवस्था केली होती.

          वसिष्ठांच्या कुटी संकुलात वामदेवऋषी, जाबालीऋषी, तसेच धनुर्विद्या शिकविणारे  अशोक ऋषी यांचे स्वतंत्र कुटीत वास्तव्य होते. या गुरुकुलात चारही राजपुत्रांसमवेत वसिष्ठमुनींचे पांच, वामदेवांचे तीन, आणि महाराजांच्या अष्टप्रधानांचे ,महामंत्री सुमंत्रांचे, याशिवाय इतर मंत्र्यांचे पुत्र वेदाभ्यास,शस्रास्राचे अध्ययन घेत होते.

           अयोध्येत आल्यावर मंथरेने घरठाव केला होता.तिला मंडूक नावाचा पुत्र झाला होता महाराजांना गळ घालून त्यालाही या आश्रमात शिकण्यासाठी पाठवले होते.मंडूकचा स्वभाव आई मंथरेपेक्षा फार वेगळा होता. स्वतः आनंदी राहून दुसर्‍याची करमणूक करुन निखळ आनंद देण्यातच त्याला धन्यता वाटत असे.वसिष्ठांचा हा आश्रमसंकुल संपूर्ण जंबुद्वीपमधे आदर्श आश्रम म्हणून नावाजला असल्यामुळे तिथे शिष्यत्व मिळवण्यासाठी धडपडत असत. या आश्रमांत वेद,पुराणे,उपनिषदे,शास्र,अस्र दिव्यास्रे,शस्रे इत्यादी अध्ययन शिकवल्या जात होते. सर्व विषयांत पारंगत होत चारही राजपुत्र मोठे होत होते.

                      क्रमशः
  संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
                  दि. २८-३-२०२२.

!!!  कैकयी  !!!

                   भाग – ८.

            चारही राजपुत्र कुशाग्रबुध्दीचे असल्या मुळे त्यांनी सर्व प्रकारची विद्या लवकर आत्मसात करुन प्रविण झाले.त्यांनी तीनच वर्षात सर्व प्रकारच्या विद्यांचे अध्ययन पूर्ण करुन, गुरुदक्षिणा देऊन स्नातक राजपुत्र राज महालात परत आले.चारही राजपुत्र राजबिंडे दिसत होते.

            रामाचे विनयशील,सौदाह्यपुर्ण वागण्याने अयोध्यावासींना ते प्रिय झाले. दिवसें दिवस रामाचे वाढते प्राबल्य पाहून मंथरेचा जळफळाट होऊ लागला.ती कैकयीच्या मनात भलत्यासलत्या गोष्टी भरवू लागली.अश्वपतींनी घेतलेल्या वचनाची आठवण सतत देऊ लागली.

पण कैकयी तिला गप्प बसवित असे.अगऽ ! मंथरादायी जो विषय आपला नाही त्यात लक्ष घालू नये.अगऽ राजपुत्रांची वयं तरी काय आहे? आता कुठे १३ वर्षाची झाली आहेत.यानंतर पुन्हा रामाबद्दल असे उलटे सुलटे बोललेले मी खपवून घेणार नाही.महाराजांना सांगून तुला शिक्षा करवीन किंवा सरळ केकयानगरीला पाठवणी करीन. भरतात व रामात मी फरक मानत नाही.आणि राहिला प्रश्न राजमातेच्या मानाचा तर, युवराजाच्या राज्याभिषेकानंतर राजे राजसन्यास घेऊन आपल्या राण्यांसह वानप्रस्थाश्रम स्विकारतात.यापुढे हा विषय कधीच काढायचा नाही.

             कैकयी विचार करु लागली,तातांना स्वामींनी वचन दिले म्हणून काय झाले? त्यांनी घेतलेले वचनच मुळी अन्यायकारी नाही काय? कौसल्यादीदीस आंदनात कौसलदेश, वचनाच्या अवगुंठनाखाली, आपला पुत्र भरतास हक्क मिळवणे म्हणजे कौसल्यादीदी व तिचा पुत्र रामावर अन्यायकारक ठरणारे होणार नाही का? रघुकुलाची मर्यादा तोडणारे होणार नाही कां? स्वामींनी रघुकुल रीत तोडवी असे कैकयीला मुळीच वाटत नव्हते.आणि तसेही एखादा अपवाद वगळता सर्वीकडे जेष्ठाचाच राज्याभिषेक होत असतो.आणि राम  नुसता जेष्ठच नाही तर सर्वश्रेष्ठही आहे.सर्वगुणसंपन्न, अत्यंत आज्ञाधारक,सर्वांना प्रिय,सर्व नाती जपणारा,सांभाळणारा मर्यादा पुरुषोत्तम आहे. न्यायी असून प्रजानुरंजनास प्राधान्य देणारा आहे.त्याच्यात शोधूनही अवगुण नाही ज्यामुळे युवराजपदाला बाधक ठरेल? कैकयीने निर्धार केला अशा या सद्गुणी रामाशी विद्रोह करुन पापाची धनीन व्हायचे नाही.स्वतःच्या मातेपेक्षा कैकयीवर रामाचे प्रेम आहे.आणि तातांनी घेतलेले वचन वेगळ्या परिस्थितीत घेतले होते आता परिस्थिती बदललेली आहे.तेव्हा दुष्ट मंथरेच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करणे योग्य ठरेल.

             चौघेही बंधू वेद,पुराणे,उपनिषदे बरोबरच युध्दशास्रातही पारंगत झाले.शिकारी ला ही जाऊ लागले. पाहतां पाहतां त्यांनी १६ व्या वर्षात पदार्पण केले.चारही राजपुत्रांची लोकप्रियता वाढत होती. एके दिवशी कुलगुरुंनी त्यांना भारतभर तीर्थाटनास पाठवण्याचा निर्णय घेतला.तसे महारांना सूचित केल्यावर म्हणाले,आम्हास त्यांचा विरह सहन होणार नाही आणि त्यांच्या मातांना काळजी वाटेल. महाराज काळजीचे कारण नाही.त्यांचेसोबत सेवक,पदाती,कांही ऋषीमुनीही असतील. आणि कोणतेही संकट आल्यास निस्तरण्यास चारही राजपुत्र सक्षम आहेत.कांही दिवसांनी रामाचा राज्याभिषेक होईल.राज्यशकट चालवण्यास त्याच्या सहाय्यार्थ तिन्ही बंधू असतील.त्यामुळे चौघांनाही भारतवर्षातील प्रजा, देवस्थाने, ऋषीमुनींच्या अडचणी ते जवळून पाहू शकतील.त्यातील आलेल्या अनुभवाने सुव्यवस्थित राज्य चालवू शकतील.

             महाराजांना पटल्यामुळे त्यांनी सुमंत्रांना बोलावून तीर्थाटनाची सारी व्यवस्था करण्याची आज्ञा दिली.चारही पुत्र तीर्थाटनाला गेल्यावर त्यांचा विरह सर्वांनाच जाणवू लागला.

          तीन वर्षांनी तीर्थाटनावरुन परत आल्या वर राजपुत्र अतिशय उद्विग्न आणि विषण्ण वाटत होते.महाराजांनी कारण विचारल्यावर भरत म्हणाला,तातश्री! आम्ही उघड्या डोळ्यांनी उजाड आश्रम व तपोवनाची भयावह स्थिती पाहिली. जो परिसर ऋषीमुमी आणि शिष्यगणांच्या मंत्रोच्चाराने दुमदुमत होता  तो भकास, उजाड झाला.पूर्वी ज्याठीकाणी हवना साठी हविष्य गोळा करुन साठवले जात होते तिथे आतां मानवांच्या आणि गोधनांच्या हाडांच्या राशी दिसल्या.यज्ञकुंडे शांत होऊन आश्रमातील कुट्या मोडकळीस,बेवारस झाल्या  एखाद्या ऋषीने हिंमत करुन यज्ञ केलाच तर राक्षस यज्ञकुंडात मानव,जनावरांचे रक्त, मांस,विष्टा टाकून यज्ञाचा भंग करतात.राक्षसां द्वारे ऋषीकन्या,ऋषीपत्न्यांची विटबंना होत असलेली दिसली.जनपदामधील ग्रामस्थाचीही स्थिती वेगळी नाही.ग्रामस्थ राक्षसांचा आहार बनले आहे.हे सर्व पाहून भयंकर चीड आली  मन आक्रंदत आहे.

                     क्रमशः
  संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
                 दि. २८-३-२०२२.

                             

 

कैकयी एक रहस्य संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading