कैकयी एक रहस्य भाग ७, (२५ ते २६)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! कैकयी एक रहस्य !!!

!!!  कैकयी  !!!

                 भाग – २५.

           भारद्वाजऋषी पुढे म्हणाले, भरता,तुला कल्पना नसेल,पण तुझी माता धोरणी,हुशार, राजकारणपटू आहे. एक क्षणभर वरदानांचा विषय बाजूला ठेवून विचार कर, श्रीरामावर तुझ्यापेक्षा नितांत प्रेम करणारी तुझी माता एकाएकी अशी कां वागली, यामागे कांहीतरी कारण असले पाहिजे, असा विचार तू कां नाही केला? कुळपरंपरेनुसार जेष्ठ पुत्रच राज्यभिषेकाचा अधिकारी असतो हे तिला माहित नव्हते कां? तुला राज्य मिळाले तरी, तुझी रामावरील निष्ठा, बंधूप्रेमाने तूं राज्य स्विकारणार नाही हे ती जाणत नव्हती कां? तुझ्यासाठी राज्य आणि रामाला वनवास मागीतल्यामुळे तिची तिन्ही लोकात निर्भत्सना होईल हे त्या वीरांगणी,क्षात्राणीला चांगलेच माहित असून देखील निर्भत्सनेचे विष पचवण्यास कां तयार झाली?तर मिळणारे राज्य नाकारुन तुला मिळणार्‍या यशकीर्तीपेक्षा श्रीरामाने वनवासामुळे त्याला मिळणारे राक्षस  संहाराचे यश त्रिकालबाधीत राहील हे ओळखून रामाच्या ध्येयपूर्तीसाठी यावचंद्रदिविकरौ स्वतःच्या होणार्‍या अवहेलनेचे विष ती पचवित आहे.तिला माहित नव्हते कां स्वतःचा पुत्र आपली निर्भत्सना करेल तेव्हा ते सहन करणे किती कठीण होईल हे जाणूनही तिने सर्व जगाच्या कल्याणासाठी,ऋषीमुनींना राक्षसां पासून मुक्ती मिळावी,दंडकारण्य नेहमीसाठी राक्षसमुक्त व्हावे,जनजिवन निर्भय व्हावे, या साठी ती हे सर्व सहन करीत आहे.

           भरता, कैकयीसारख्या वीरांगणेचे ह्रदय ओळखणे येवढे सोपे नाही.

              सर्वजण चित्रकुट पर्वताच्या पायथ्याशी पोहोचले.एवढ्या मोठ्या चित्रकुट पर्वतावर श्रीरामदादास कुठे आणि कसे शोधायचे? भरत निराश न होता,प्रयत्न सुरुच होते.एका उंच झाडावर चढून चहु बाजुंनी पाहत असतांना एका दिशेला बारीकशी धूराची रेषा दिसली.तिथेच कुठेतरी रामदादाची कुटी असावी म्हणून कांही निवडक मंडळीसह भरत चित्रकुट पर्वतावर चढू लागला.थोड्याच वेळात रामदादाची कुटी त्याच्या दृष्टीक्षेपात आली. रामदादा बसलेले होते, शिघ्रकोपी लक्ष्मण हाती धनुष्यबाण घेऊन त्याचेकडे रागाने पाहत लढाई च्या पवित्र्यात उभा होता.रामदादांचे सगून, सावळे रुप बाहु पसरुन भरताकडे येत असल्याचे पाहून,एखाद्या निरागस बालकाने मातेकडे झेप घ्यावी तसे भरताने रामदादाऽऽऽ म्हणून धाव घेतली.भावनारिकेने भरताने त्यांच्या पायाला मिठी मारली.रामांनी प्रेमाने त्यांना उचलून अलिंगन दिले.दोघांच्याही नेत्रातून अखड अश्रूधारा वाहू लागल्या. एकमेकांच्या आसवांनी दोघांचेही खांदे भिजत होते.हे करुणामय अलौकिक दृष्य भरतासोबत आलेली मंडळी,लक्ष्मण एवढेच नव्हे तर चित्रकुटावरील वृक्ष,लतावेली,पशूपक्षी,पाषाण, अंबर,धरती पाहत होते.

        या अतुलनीय राम-भरत मिलनाचे वर्णन करणे माझ्या लेखणीस केवळ अशक्य आहे.

           भावनावेग ओसरल्यावर दोघेही पर्णकुटीच्या अंगणांत आले.लक्ष्मणाचा राग शांत झाला होता.लक्ष्मण व शत्रुघ्न शिघ्रकोपी असले तरी लगेच शांतही होत होते.नंतर भरताने लक्ष्मणालाही अलिंगन दिले.सीता वहिनीचेही चरणस्पर्श केला. नंतर रामांनी अंगणातिल एका प्रशस्त शिलाखंडावर  आपल्या शेजारी भरताला बसवून घेतले. अयोध्येतील क्षेमकुशल विचारले. नगराची व राज्याची सर्व माहिती दिल्यावर भरत म्हणाला, दादा, तुमचा वियोग सहन न होऊन, तुमचे नांव घेत पिताश्रींनी प्राण त्याग केला.दादा, विश्वास ठेव या प्रकरणापासुन मी पुर्णतः अनभिन्न आहे. हे घडायच्या आधिपासूनच मी केकयनगरीत होतो हे सारे पापकर्म माझ्या कैकयी मातेने केले आहे तिच्या आहारी जाऊन तातमहाराजांनी तुम्हाला वनवासी केलेय!

              दादा, मी तुमचा दास आहे.या दासाची विनंती स्विकारुन,आपण राज्य स्विकारावे.भरताने रामांच्या चरणी डोके ठेवून स्फुंदुन स्फुदन रडू लागला. रामांनी उठवून त्यालाा ह्रदयाशी धरत म्हणाले, अरे, भरताऽऽ तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे..तुझ्याबद्दल कल्पांतीही शंका येऊ शकत नाही.उत्तम कुलोत्पन्न,धर्म पालक आणि श्रेष्ठ व्रताचे पालन करणारा, मी पितृज्ञेचे उल्लंघन केल्याचे पाप मी कसा करुं शकेन, मी पिताश्रींच्या आज्ञेने चौदा वर्षे वनवास भोगतो, तूं राज्य करुन प्रजेला सुखी कर! यात कोणीही बदल करुं शकणार नाही, ब्रम्हदेव आले तरीही!

            नंतर रामांनी पिताजींच्या नांवे जलांजलाची तयारी करण्यास रामांनी सर्वाना मंदाकिनी घाटावर येण्यास सांगीतले.नंतर जलांजली व पिंडदान देऊन सर्वजण चित्रकुटा वरील पर्णकुटीजवळ परत आले.

                 क्रमशः
  संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
                  दि. ८-४-२०२२.

!!!  कै क यी  !!!

             अंतिम भाग – २६.

         श्रीराम आपल्या तर,भरत आपल्या भूमीकेवर ठाम होते.दोघेही आपापले विचार एकमेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. भरत म्हणाला दादा, तूं स्थितप्रज्ञ आहेस. तूं दुःखाने दुःखी  किंवा प्रिय गोष्टीने अत्यानंदीही होत नाहीस.तू रागद्वेष विरहित, विवेकशील असल्यामुळे, तुला संताप येत नाही. पण माझे तसे नाही.मी धर्मबंधनात नसतो तर,पित्याच्या मृत्युला आणि तुझ्या वनवासाला उत्तरदायी असलेल्या माझ्या मातेस कधीच ठार केले असते.मी पिताश्रींची निंदा करुं इच्छित नाही, परंतु पत्नीला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी अधर्म व अर्थहिन कार्य केले ते उलथवून, पित्याची चुक सुधारणारा पुत्र उत्तम म्हणवल्या जातो. पित्याचे धर्मबाह्य कार्य असल्यामुळे तुम्ही धर्म पालन करुन राष्र्टरक्षणासाठी माझ्या प्रार्थनेचा स्विकार करावा ही इच्छा आपले कुलगुरु वसिष्ठ ऋत्विज, मंत्रीगण,सेनापती आणि प्रजाजनांची आहे.मातेचा कलंक पुसून पिताजींना निंदेपासून वाचवावं,तरी सुध्दा तूं आपल्या निश्चयावर दृढच असशील तर मीही इथे तुझ्या सोबत राहीन.आणि हे ही म्हणने मान्य केले नाही तर मी धरणे धरुन बसतो.

        अरे, भरताऽऽ असा मी काय अपराध केला म्हणून तूं माझ्याविरुध्द धरणे धरतोस? अरेऽ, कैकयीमाता आणि पिताजींच्या विवाहा पासून तिच्या पुत्राला म्हणजे तुला राज्य देण्या साठी वचनबध्द होते.पिताजींचे देवसुर संग्रामात ज्या मातेने प्राण पणास लावून त्यांचे प्राणरक्षण केले होते.त्या वीरांगणा मातेस प्राप्त  झालेल्या दोन वरदानांनुसार वर्तमान स्थिती उत्पन्न झाली आहे.त्यांच्या आज्ञेचे पालन करुन व त्यांना सत्यवादी बनवून १४ वर्षे वनवास भोगून दोघांच्या ऋणातून मुक्त होईल व तू शत्रृघ्नासह अयोध्येस परत जाऊन राज्य कर.

              कोणत्याच प्रकारे रामदादा ऐकत नसल्यामुळे नाईलाजास्तव भरत म्हणाला, तुझी आज्ञा ठेव समजून अयोध्येचे राज्य सांभाळीन, परंतु १४ वर्षे संपल्याबरोबर परत आला नाही तर मी अग्निकाष्ठे भक्षण करेन.

          जोवर तूं वनात आहेस तोवर मी कोणत्याही सुखाचा उपभोग घेणार नाही. वल्कले धारण व जटाजूट करुन,अयोध्येजवळी ल नंदीग्रामात कुटी बांधून ब्रम्हचारी जीवन जगेन.आपल्या पादुका राजसिंहासनावर विराजमान करुन तुमच्या नांवे राज्य चालवेन. तृणशय्येवर झोपेन व कंदमुळे खाऊन निर्वाह करेन.

             भरताने सोबत आणलेल्या सुवर्ण पादुका श्रीरामांना पायात घालायला लावल्यात. रामांनी त्या पादुका एकवेळ पायात घातल्या व काढून भरताच्या स्वाधीन केल्या.भरताने मस्तकी धारण केले.सारे परतीच्या प्रवासाला निघाले.वातावरण अगदी ह्रदय हेलावणारे झाले होते.

              निघतांना राम म्हणाले, भरता, तिन्ही मातांची सारखीच काळजी घे.या सर्व प्रकरणात कैकयीमातेची कांहीच चुक नाही.तिला दोष देऊं नकोस, हे जे घडले ते नियतीने आधीच ठरवले होते.मी,लक्ष्मण,सीताचा वनवास भविष्यासाठी देवलोक,मृत्युलोक आणि पाताळ लोक या त्रैलोक्यासाठी हितावह व कल्याणकारी होणार आहे हे तुला भारद्वाज ऋषींनी सांगीतले आहेच.तेच मी तुला परत सांगतोय.

           कैकयीमाता एक वीरांगणा क्षात्राणी आहे.दूर दृष्टी ठेवून निर्णय घेणारी आहे.भलेही बाह्य जगात ती खलस्री वाटत असली तरी, माझेवर नितांत प्रेम असणारी माता अशी कां वागली? त्यामागे तसेच काही कारण असेल हा विचार तूं कां केला नाहीस?जेष्ठ पुत्राचा राज्याभिषेकाचा अधिकार माझाच आहे हे तिला माहित होते म्हणूनच,प्रथम मंथरेकडून तिला ही बातमी समजली तेव्हा अत्यानंदाने गळ्यातील मौल्यवान हार उपहार म्हणून मंथरेला दिला होता.

            तुझे बंधूप्रेम,माझ्यावरील निष्ठा असल्याने तू कधीच राज्याचा स्विकार करणार नाहीस हे ती चांगलेच जाणून होती.सर्वात महत्वाचे म्हणजे, तुला राज्य व मला वनवास मागीतल्याने त्रैलोक्यात तिची अपकीर्ती,निंदा नालस्ती,अपमान,अवहेलना,घृणीत दृष्टीने सगळे पाहतील हे ती पूर्णपणे जाणून होती.तरी सुध्दा एवढे जहाल विष पचवायला तयार झाली रोज तिळतिळ मरायला तयार झाली.यातच माझा भाग्योदय आहे हे ठाऊक असल्याने नेहमीसाठी माझ्यावरील प्रेमाखातर खलस्री बनुन हरघडी विषाचे घोट घेते आहे.ती जे कांही वागली ते नियतीच्या अधिन राहूनच!

            यापुढे तिला दोषी ठरवू नकोस.मातृ प्रेमात कमी पडू नकोस,रामाच्या समजावण्याने भरताच्या मनातील क्षोम नष्ट झाला.आपल्या मातेबद्दल त्याला अभिमान वाटूं लागला. कैकयीने कृतज्ञतेने रामाकडे बघीतले.तीला या भावभक्तीपेक्षा आणखी काय हवे होते?आतां भविष्यात होणार्‍या निंदा नालस्तीचे विष पचवायचे बळ तिला प्राप्त झाले.आतां कोणताच विकल्प तिच्या मनी उरला नव्हता.

          अशा या खलस्री ठरलेल्या पण देशहिता साठी स्वतःला ओवाळून टाकणार्‍या,झोकून देणार्‍या कैकयीस प्रणाम!

          जय श्रीराम

                    !! समाप्त !!
संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                दि. ८-४-२०२२.

                            

 

कैकयी एक रहस्य संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading