आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

कैकयी एक रहस्य भाग ४, (१३ ते १६)
कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! कैकयी एक रहस्य !!!
!!! कैकयी !!!
भाग – १३.
कैकयीच्या मनावर सरस्वतीने पूर्ण अंमल बजावला होता.तिला जाणवले आपली बुध्दी भ्रष्ट होत आहे. स्वतःच्या मुलास राज्य मिळत असेल तर, कोणत्या मातेला नको आहे? तिची बुध्दी फिरु लागली.तिला पूर्ण जाणीव होती, सर्वांना प्रिय असणार्या रामास वनवासा ला पाठवल्याने ती खलस्री ठरणार होती.ती विचार करुं लागली,मी एकटीने वाईटपणा घेतल्याने जर संपूर्ण राक्षसांचा नाश होत असेल जगकल्याण तर हा त्याग करावाच लागेल.तिला कल्पना होती,जेष्ठ बंधूचा हक्क डावलून भरत कधीच राज्य स्विकारणार नाही.सद्यपरिस्थिती त स्वामींनी वानप्रस्थाश्रम स्विकारला तरी भरत श्रीरामाचा प्रतिनिधी म्हणून त्याच्या वतीने राम येईपर्यत राज्य सांभाळेल.पुढे काय घडायचे ते घडो परंतु भरत अयोध्येत येण्यापूर्वी राम वनवासाला जयला हवा.कैकयी विचारात हरवली असतांनाच मंथरेनं तिला भानावर आणले. तिच्या सल्ल्यानुसार अलंकार विहिन, अस्ताव्यस्त वस्रे,केस मोकळे सोडून चेहर्यावर भयंकर रागाचा आवेश आणून कोपभवनात जाऊन जमीनीवर पसरली.
कामकाज आटोपल्यावर महाराज रामराज्याभिषेकाची वार्ता सांगण्याकरितां कैकयी महालात प्रवेशले.दारावरच्या प्रतिहारीने राणी कोपभवनात असल्याचे सांगीतले ते कोप भवनात आले.तिथली अवस्था बघून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले.ते तिच्याजवळ जमीनी वर बसून तिला प्रेमाणे स्पर्श करताच फणकार्याने त्यांचा हात झिडकारला.अजिजी ने राजा म्हणाले, देवी, काय झाले?कुणी तुझा अपमान केला का? कांही अनुचित घडले का? अनेक प्रश्न विचारल्यावरही ती कांहीच बोलली नाही.शेवटी म्हणाले, बोल राणी! काय घडले? काय हवय? तुझे मनोरथ पूर्ण करण्यास मी कोणतेही दिव्य करण्यास तयार आहे.वेळ आला तर प्राण त्याग सुध्दा करीन. सांग लवकर खरे तर तुला सर्वात प्रिय असलेल्या रामाच्या राज्यभिषेकाची वार्ता सांगण्यासाठी प्रथम तुझ्या भेटीस आलो होतो. असो. राजाने अश्वास्त केल्यावर म्हणाली, प्रथम आपण प्रतिज्ञा करा की,माझे मनोरथ कितीही कठीण अप्रिय असले तरी, पूर्ण कराल! त्यांनी प्राण प्रिय रामाची शपथ घेत म्हणाले, तू मागशील ते पूर्ण होईल वचन देतो.महाराज पूर्ण वश झाल्या चीं खात्री झाल्यावर,कैकयीने मनी विचार केला हीच योग्य वेळ आपला मतलब साधण्याची आहे.कठोरपणे म्हणाली, शंबरासूर युध्दात आपण प्रसन्न होऊन मला दोन वर दिले होते, त्याची पूर्तता करण्याची आतां वेळ आली आहे. रामाचा होऊ घातलेला रामाचा राज्याभिषेक थांबवून पहिल्या वराने रामाला १४ वर्षे वनवासाला पाठवावे आणि दुसर्या वराने भरता चा राज्याभिषेक करुन त्याला राज्य द्यावे. तिच्या अशा अनपेक्षित वर मागण्याने महाराजां वर वज्राघात झाला.चांगलेच हादरले.घटकाभर ते दिडःमूढ झाले. क्षणभर अर्थबोधच झाला नाही. आणि अर्थ लक्षात आल्यावर अत्यंत व्याकुळ म्हणाले, हे दिवास्वप्न तर पडले नाही ना? ऐकण्यात माझी गफलत तर झाली नाही ना?भास नाही ना? नाही महाराज आपण बरोबर ऐकले. दुःखावेगाने त्यांना मूर्च्छा येऊन जमीनीवर कोसळले. बर्याच वेळाने शुध्दीवर आल्यावर,अनावर संतापाने म्हणाले, हे दयाहिन दुराचारीणी, रामाने तुझे काय वाईट केले म्हणून त्याचे अनिष्ट चिंतीत आहेस? तुझे त्याच्यावरचे प्रेम ढोंग होते का? तूं राजकन्या वेशातील जहरी नागीन आहेस हे माहित असते तर तुला या घरात आणलेच नसते.
तुला माहित आहे रामावर माझे किती आत्यांतिक प्रेम आहे.तो क्षणभर जरी नजरे आड झाला तर,माझे चैतन्य नष्ट होते.त्याच्या शिवाय मी जिवंत राहू शकणार नाही. मी वृध्द, दीनपणे विनवतो, हवे ते सर्व देतो,पण रामाच्या वनवासाचा हट्ट धरु नकोस ग! मी हात जोडून विनंती करतो रामास अभय दे! महाराज दुःखाने विलाप करत होते.वारंवार त्यांची शुध्द हरपत होती.पण कैकयीच्या ह्रदयाला पाझर फुटत नाही याचे तिलाही आश्चर्य वाटत होते. ही सारी सरस्वतीचीच किमया असावी.एरवीची ती असती तर त्यांची एवढी दयनीय अवस्था बघून ह्रदय द्रवले असते,पण ती विरघळली नाहीच उलट रौद्ररुप धारण करुन अत्यंत कठोरपणे म्हणाली,महाराज अपण दिलेले वचन पाळू शकत नसाल तर, रघुवंश ब्रिदाचा टेंभा मिरवताच कशाला?
कैकयी म्हणाली,मी निक्षून सांगते,कांही झाले, धर्म-अधर्म, खरे-खोटे होवो,माझ्या निर्णयात बदल होणार नाही.आपण प्रतिज्ञा पालन न करतां रामराज्याभिसषेक केला तर आपल्या समोर कालकुट प्राशन करुन प्राण त्याग करेन.आणि रघुकुलाचे जे ब्रिद आहे “प्राण जाय पर वचन न जाय” हे नेहमीसाठी खोटे ठरेल.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ३०-३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग – १४.
कैकयीने निक्षून सांगीतल्यामुळे महाराजांची सारी इंद्रिये गलितगात्र झाली. दिडःमुढ होऊन तिच्याकडे बघत राहिले. दीर्घ सुस्कारा सोडून उन्मळलेल्या वृक्षाप्रमाणे कोसळले.त्यांना कितीतरी वर्षाच्या रुग्नाईता सारखे वाटू लागले.कैकयीला सर्वात प्रिय असलेल्या पतीची दयनीय अवस्था बघून तिचा जीव गलबलत होता.आतल्या आत ह्रदय आक्रंदत होते. परंतु आतां मागे हटून चालणार नव्हते. रामाला कोणत्याही किंमतीवर दंडकारण्यात पाठवणे हेच एक लक्ष तिच्या समोर होते.
अग! तुला कळत कसं नाही,धर्मात्मा भरत रामाला डावलून कोणत्याही परिस्थितीत राज्य स्विकारणार नाही.धर्मपालनाच्या बाबतीत भरत रामापेक्षाही वरचढ आहे. राम राज्यभिषेकाचा निर्णय माझ्या एकट्याचा नाही. या सभेसभेसाठी देशोदेशीचे राजे आलेले आहेत त्यांना काय सांगुन हा निर्णय फिरवू? हे राजे माझ्या तोंडात शेण घालतील ना?म्हणतील या वृध्द राजाने लाडक्या राणीच्या हट्टाखातर आमसभेचा निर्णय फिरवला.कसे सांगू त्यांना कैकयीच्या दबावाला बळी पडून रामाला राज्यातून घालवून वनात पाठवले.अग! राम वनात गेल्यावर कौसल्या,सुमित्रा सीतेची अवस्था काय होईल याचा जरा तरी विचार कर.
आजपर्यंत तुला अत्यंत साधी,सती सावित्री समजत होतो,पण तूं विषारी नागीन निघालीस.नागपाशात मला जखडून टाकलेस. तुझा हट्ट पुरवला तर सर्वत्र बाईलवेडा म्हणून मला चिडवतील,निंदा करतील. कौसल्या पुत्र वियोगाचे दुःखाने प्राण त्यागेल.आम्हा सर्वांचे प्राण घेऊनच तुझे समाधान होत असेल तर, विधवा बनून खुशाल पुत्रासोबत अयोध्येचे राज्य कर!तुझ्यावर भाळून, सर्वात जास्त मनापासून तुझ्यावर प्रेम केले त्याचे फळ भोगावे लागत आहे.भरताला गादी पेक्षा रामाला वनवास हेच महाराजांच्या जिव्हारी लागले.अनेक दूषणे देत, धिक्कार करुं लागले.एक तर तिच्या पाया पडण्यासही उठले पण नियतीने तिची लाज राखली.त्याआधीच ते मूर्च्छित होऊन जमीनीवर कोसळले.पुण्य संपून देवलोकातून भ्रष्ट झालेल्या नहुषपुत्र ययाती सारखे निस्तेज दिसत होते.त्यांची अशी अवस्था बघूनही ती दया दाखवू शकत नव्हती. वरुन कठोर वागत असली तरी ती आंतल्या आंत रडत होती.तिला दुःख तर अतोनात होत होते पण कर्तव्यपालनापुढे दिसू द्यायचे नव्हते.ते शुध्दीवर आल्यावर परत तिने डागण्या द्यायला सुरवात केल्या वर,ते विकल स्वरात म्हणाले, गुणवान, सत्यप्रिय,सर्वांची मने जिंकणार्या रामाचा कांहीही अपराध नसतांना त्याचा अधिकार कसा डावलू? या तिन्ही जगात अत्यंत शूर विद्वान,क्रोधास जिंकणारा क्षमापरायण रामाला देशोधडीला कसे लावू? अशा विलापात रात्र संपली.तिलाही रामावर व पतीवर अन्याय करत आहे या बोचणीने रात्रभर झोप आली नाही.प्रातःकाळपासून पुन्हा आपला हेका तिने सुरुच ठेवला.ते पुन्हा राम राम करत अचेत झाले.
बराच वेळ झाला, अभिषेकविधीची तयारी झाली तरी महाराज आले नाही म्हणून वसिष्ठांनी त्यांना बोलावून आणण्यासाठी सुमंत्रा ला पाठवले.त्यांनी कक्षात प्रवेश केल्यावर, अशा मंगलसमयी महाराज जमीनीवर अस्तव्यस्त पडलेले पाहून अतिशय आश्चर्य वाटले. हीच संधी रामाला इथे बोलावण्याची जाणून ती सुमंत्राना म्हणाली, महाराजांची तब्बेत ठीक नाही.रामाला पाठवून द्या. कैकयीची आज्ञा आणि महाराजांची स्थिती पाहून काहीतरी अघटीत घडले असावे अशी त्यांना शंका आली.कांही पळातच रामाला घेऊन तू कोपभवनात आले.पित्याची अवस्था व कैकयीचे रौद्ररुप बघून राम चपापले.
वेळेचे भान राखून राम म्हणाले,माते, महाराजांची अशी अवस्था कां झाली? माझेशी बोलत कां नाही? माझे कडून कांही प्रमाद घडला का? काय झाले तु तरी सांग! तात महाजाज संतप्त होण्याचे असे कोणते कारण घडले?त्यांच्यासाठी कांहीही करण्यास तयार आहे.इच्छा नसतांनाही निर्लज्ज होऊन मोठ्या धिटाईने, धिटाईने म्हणण्यापेक्षा उसने अवसान आणून कैकयी म्हणाली, त्यांना कांहीही झालेले नाही.तू त्यांना प्रिय असल्यामुळे तुला ते अप्रिय गोष्ट सांगू शकत नाही.त्यांची जिव्हा उचलत नाही.ते कांहीच सांगणार नाही म्हणून मीच तुला सांगते.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ३१-३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग – १५.
कैकयीचे वक्तव्य ऐकून महाराज आवाक होऊन सुन्नपणे तिच्याकडे पाहतच राहिले.तातमहाराज माझे केवळ पिताच नाही तर गुरु,हितैषीही आहे.त्यांच्याकरितां मी कांहीही करुं शकतो.वेळ आली तर प्राण त्यागही! हा एकवचनी राम त्यांची इच्छा पूर्ण करेल.तेवढ्यात शिघ्रकोपी लक्ष्मण सुध्दा घाईघाईने तिथे आला. कैकयी आर्य असूनही अनार्या स्रीप्रमाणे बोलू लागली. शंबरासुराच्या युध्दात महाराजांचा मी प्राण वाचवले होते.तेव्हा प्रसन्न होऊन मला दोन वर दिले होते,तेच मागत आहे. त्यातील एका वराने भरताला राज्य आणि दुसर्या वराने तू दक्षिणेकडील दंडकारण्यात चौदा वर्षे वनवास पत्करण्यासाठी आजच प्रस्थान करायचे आहे.
हे ऐकताच लक्ष्मणाने कैकयीशी बराच वाद घातला.मंथरेला ठार मारण्याची धमकीही दिली.एवढेच नव्हे तर महाराजांसह तिला कैदेत टाकून रामराज्याभिषेक करण्याची धमकी दिली.परंतु रामाने त्याला शांत केले.
कैकयी रामास म्हणाली, पित्याच्या आज्ञाअधिन राहून त्यांची आज्ञा तू पाळावीस. रामाला जराही दुःख झाले नाही की,विचलितही झाले नाही.उलट स्मित हास्य करीत म्हणाले, माते, ठीक आहे.होईल तुझ्या इच्छेप्रमाणे.तुला यातूनच माझे कल्याण साधायचे असू शकते. तू ताबडतोब भरताला बोलावून त्याचा राज्याभिषेक करवून घे.मी बिनाविलंब आजच वनवासासाठी प्रस्थान करत आहे.
कैकयीला खात्री झाली, आतां रामास वनवासास जाण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. तू वनगमनास जाण्यास जेवढा विलंब करशील महाराज तोवर स्नान, भोजन करणार नाही. माते, तुझी आज्ञा म्हनजेच तात महाराजांचीच आज्ञा समजून माझी वनयात्रा आताच सुरु होत आहे.तू एवढी कठोर आज्ञा दिली यामागे नक्कीच नियतीचा कांही बेत असावा.रामाने समजून घेतल्यामुळे कैकयीला हायसे वाटले.आतां संपूर्ण जगाचा रौष पत्करण्यास तिने मनाची तयारी केली.तरी तिचे मन आतल्या आत आक्रोशत होते.रामाने दोघांचे चरणस्पर्श करुन स्वतःच्या मातेची परवाणगी घेण्यास जाऊ लागला तोच,कैकयी च्या मुखातून अभावितपणे शब्द निघाले, श्रीरामा! तुझे कल्याण असो!यशस्वी भव! राम महालाबाहेर पडले.
इकडे राज्याभिषेकाची सर्व तयारी झाली.सर्वजण आतुरतेने वाट बघत होते. राज्याभिषेकाची मूहूर्तघटिका अगदी समीप येऊन ठेपली तरी वक्तशीर असलेले महाराज अजून कसे आले नाही म्हणून कुजबुज सुरु झाली.म्हणून वसिष्ठाच्या आज्ञेने सुमंत्र महाराजांना बोलवायला गेले तर तेही न आल्याने लक्ष्मण स्वतः गेला असतां तिथले दृष्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कैकयीमाता रणचंडीकेसारखी क्रोधायमान आणि तातमहाराज एखाद्या पराजित योध्या प्रमाणे हीन दीन,चेहरा सुकलेला,म्लान झालेला गालावरुन अश्रू ओघळत लोळागोळा होऊन जमीनीवर पडलेले पाहून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.येथे कांही तरी नक्कीच अघटीत घडले असावे. रामाचा चेहरा मात्र नेहमीप्रमाणेच स्थितप्रज्ञ निर्विकार होता. काय घडले या विचारात असतांनाच कैकयीने आजच्या आज वनगमनाचा आदेश दिल्याचे ऐकले मात्र, क्रोधीत झालेल्या लक्ष्मणाला बघून क्षणभर कैकयीही दचकली.पण रामाने त्याला शांत राहण्यास सांगीतल्यावर, धुसफुसतच तो रामाबरोबर कोपभवनाबाहेर पडला.मनोमन त्याला आपल्या स्रीलंपट पित्याचा राग आला.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ३१-३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग – १६.
लक्ष्मण कांही तरी आततायीपणा केल्या शिवाय राहणार नाही हे जाणून त्याने शांत राहवे यासाठी रामाने आपली शपथ घालून त्याच्या पायात शपथेची श्रृंखला अडकवली. त्यामुळे लक्ष्मणाची स्थिती खवळलेल्या वाघाला पिंजर्यात बंदिस्त केल्याप्रमाणे झाली. कैकयी मातेच्या वागण्याचे निर्विकार असलेल्या रामाला मुळीच दुःख झाले नाही.अतिव दुःख झाले ते महाराजांना.ज्यांनी जंबुद्विपातील अनेक युध्दे जिंकून संपूर्ण आर्यवर्तात जरब बसवून एका छत्राखाली आणले.देवसुर युध्दात महाबलाढ्य शंबरासुराचा वध करुन देवांचा देव इंद्राकडून सुध्दा प्रशस्ती मिळवणारे तातमहाराज आज स्वतःच्याच पत्नीसमोर हतबल झाले.स्री ही अबला असते हे कैकयीने खोटे ठरविले.नखे गळलेल्या,दात पाडलेल्या सिंहासारखी केविल वाणी स्थिती तातमहाराजांची झाली.
राम म्हणाले, माते, इक्ष्वाकूवंशातील हा राम वचनापासून कधीही ढळणार नाही, तूं निश्चिंत रहा.लक्ष्मणाला रागावर नियंत्रण ठेवणे फार जड जात होते.अश्रूंना वाट मोकळी करुन तोही रामासोबत कौसल्यामातेचा निरोप घेण्यास निघाले.रामाने मोठ्या धैर्याने आपण वनवासाला जात असल्याची वार्ता तिच्या कानी घातल्यावर भयंकर प्रभंजनात उन्मळून पडलेल्या केळीसारखी तिची अवस्था झाली. व मूर्च्छा येऊन भूमीवर कोसळली.कांही वेळाने सावध झाल्यावर म्हणाली, तुझा अभिषेक झाला असता तर, थोरली असूनही,आजपर्यत माझी जी मानखंडना होत राहिली त्यातून मुक्त झाले असते.भरताचा राज्याभिषेक झाल्यावर कठोरह्रदयी झालेली कैकयी मला दासीपेक्षाही तुच्छ लेखून कोणते अपमान सहन करावे लागेल या कल्पनेनेच अंतःकरण विदिर्ण होतेय,
पुत्रा, हा कसला अन्याय? वर राजाने दिला आणि पाळण्याचे बंधन तुला निभवावे लागत आहे.तुझ्या कल्याणासाठी अनुष्ठाने,उपासतापास हवने केलेली सर्व भक्ती व्यर्थ गेली. रामा मलाही तुझ्याबरोबर घेऊन चल रेऽऽ! अतिशय क्रोधीत लक्ष्मण म्हणाला, दादा, महाराज आपले वडिल असले तरी,स्री लंपट होऊन त्यांचे हे वागणे अधर्मयुक्त आहे. तूं
त्यांना गुरुस्थानी मानतोस परंतु अधर्माने वागणारा गुरुसुध्दा शिक्षेस पात्र ठरतो. दादा, अजून ही गोष्ट महालाबाहेर गेलेली नाही.मी तुला विनंती करतो तू सर्वी सुत्रे हाती घ्यावी.जे विरोध करतील त्यांना परास्त करण्यास मी समर्थ आहे.रामाने त्याला शांत केले.कौसल्या म्हणाली, रामा,पित्याचे वचन जसे तुला प्रिय आहे,तशी मी प्रिय नाही का?मातृसेवा करणे तुझे कर्तव्य नाही का? तू वनात गेल्यास मला देहत्यागाशिवाय पर्याय राहणार नाही.
मातेच्या विलापाने राम जराही डळमळीत झाले नाही.उलट पूर्वजांचे, परशु रामाचे उदाहरणे देऊन म्हणाले, माते, पितृज्ञा पाळणे हा खरा धर्म आहे आणि तो मी पाळीनच. तिच्या चरणी मस्तक ठेवून विनवित म्हणाले, माते, तातमहाराज जिवंत असतांना तुला वनात कसे जातां येईल? ते तुझे पती, गती आणि धर्म आहे.धर्मानुसार त्यांची सेवा करणे तुझे कर्तव्य आहे. तिला अश्वास्त करत लक्ष्मण म्हणाला, माते, दादा माझा प्राण आहे.मी त्याची सावली आहे.त्याचा बहिश्वर प्राण असलेला लक्ष्मणही त्याचेबरोबर वनात जाईल. तूं चिंता नको करुस.
राम म्हणाले, माते, मी वनात शिक्षा म्हणून जात नाही तर, वनात जाऊन मला पांच गोष्टी साध्य करायच्या आहेत.आलेल्या संधीचे सोने करायचे आहे.पहिली म्हणजे, पित्याचे वचनपालन, दुसरी साधना.तिसरी..तेथील दुर्लभ ऋषी मुनींचा सत्संग लाभेल.चौथी.. कैकयीमातेचे समाधान आणि पांचवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राक्षसांचे समुळ उच्छादन करुन देवकार्य साध्य करणे.नंतर लक्ष्मणाकडे वळून राम म्हणाले, जेवढ्या उत्साहाने राज्याभिषेकासाठी धावपळ करीत होतास त्याच तत्परतेने माझ्या वनगमनाची तयारी कर.सौमित्रा,मी कधीच तिन्ही मातांमधे भेदभाव केला नाही.आज कैकयीची बुध्दी विपरित होऊन वनवासात पाठवत आहे तर या मागे विध्यात्याचे किंवा नियतीचे,दैवाचा नक्कीच डाव असेल. तसे नसते तर, भरतापेक्षा ही माझेवर जास्त प्रेम करणारी कैकयीमाता अशी वागली नसती.मी तात्विक बुध्दिने मनाला स्थिर केल्यामुळे राज्य आणि वनवास दोन्हीही सारखेच आहे.किंबहूना वनवासामुळे माझा महान अभ्युदय व्हावा अशीच दैवाची योजना असु शकते म्हणून तू कैकयीमाता व पिताश्रींना दोषी ठरवू नकोस.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ३१-३-२०२२.







