Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

८ ऑगस्ट, दिवस २२० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी २०१ ते २२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २६२९ ते २६४०

8 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

8 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“८ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ८ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २६२९ ते २६४० चे पारायण आपण करणार आहोत.
८ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २०१ ते २२५,

201-14
तयाचि गा परिपाठी । सत्त्व तमाते पोटी । घालूनि जेव्हा उठी । रजोगुण ॥201॥
त्याच रीतीने सत्वगुणास व तमोगुणास या दोघानाही पाठीमागे सारून जेव्हा रजोगुण उठतो.
202-14
तेव्हा कर्मावाचूनि काही । आन गोमटे नाही । ऐसे मानी देही । देहराजु ॥202॥
तेव्हा कर्मावाचून दुसरे काही सुंदर दिसत नाही असे देहाचा राजा जो जिवात्मा मानतो.
203-14
त्रिगुण वृद्धि निरूपण । ती श्लोकी सांगितले जाण । आता सत्त्वादि वृद्धिलक्षण । सादर परियेसी ॥203॥
तीन गुणांची वृद्धी कशी होते, याचे निरूपण तीन श्लोकांनी तुला सांगितले असे समज. आता सत्वादि वृद्धीचे लक्षण आदरपूर्वक ऐक श्रवन कर.
*सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ।
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥14. 11॥
लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा ।
रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥14. 12॥
अप्रकाशो$प्रवृत्तिश्र्च प्रमादो मोह एव च ।
तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥14. 13॥
यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् ।
तदोत्तमविदां लोकानमलान् प्रतिपद्दते ॥14. 14॥
रजसि प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते ।
तथा प्रलीनस्तमसि मुढयोनिषु जायते ॥14. 15॥
*श्लोकार्थ -: -:*
1)या देहामधे सर्व इंद्रियांचे ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होते तेव्हा सत्वगुण वाढले आहे. असे जाणावे. ॥11॥
2)अर्जुना, जेव्हा मनुष्यामध्ये रजोगुण वाढला असता प्रवृत्ती, लोभ अशा अनेक कर्माचा आंरभ होण्यास सुरुवात होते. अशांती आणि इच्छा तयार होते. ॥12॥
3) हे कुरुनंदना, जेव्हा तमोगुण आधिक वाढतो तेव्हा अप्रवृत्ती, अविवेक, प्रमाद आणि मोह तयार होतात. ॥13॥
4)जेव्हा सत्वगुणाची वाढ झाली असताना जर हा मनुष्य मृत्यु पावतो, तेव्हा तो ज्ञानी व शुद्ध विचारांच्या लोकांमध्ये जन्म घेतो. ॥14॥
5) जेव्हा रजोगुणाची वाढ होते तेव्हा मृत्यु जवळ येतो. तर कर्माने आसक्त असलेल्या लोकामध्ये जन्म प्राप्त होतो.
आणि जर तमोगुणाच्या काळात मृत्यु आला, तर पशुपक्ष्यांचा योनीत जन्म प्राप्त होतो ॥15॥
204-14
पै रजतमविजये । सत्त्व गा देही इये । वाढता चिन्हे तिये । ऐसी होती ॥204॥
बाबा अर्जुना, रजोगुण व तमोगुण यांच्यावर मात करून जेव्हा सत्वगुणा या देहात वाढतो, तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात.
205-14
जे प्रज्ञा आंतुलीकडे । न समाती, बाहेरी वोसंडे । वसंती पद्मखंडे । दृती जैसी ॥205॥
की वसंत ऋतूत ज्याप्रमाणे सुवास कमलांच्या पाकळ्यात न मावता बाहेर पडतो, तशी बुद्धी ज्ञान अंतकरणात ओतप्रोत भरुन बाहेर पडते.


206-14
सर्वेंद्रियांच्या आंगणी । विवेक करी राबणी । साचचि करचरणी । होती डोळे ॥206॥
सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो किंवा सेवा करत असतो. हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे फुटतात. म्हणजे हातपाय हे कर्मेंद्रिये असूनही त्यांना चांगले वाईट निवडण्याची शक्ती येते.
207-14
राजहंसापुढे । चांचूचे आगरडे । तोडी जेवी झगडे । क्षीरनीराचे ॥207॥
राजहंसापुढे दूध व पाणी यांचे मिश्रण ठेवले असता त्या राजहंसाच्या चोचीचे टोक जसे त्या मिश्रणातील दूध व पाणी यांची वेगळीक करते.
208-14
तेवी दोषादोषविवेकी । इंद्रियेचि होती पारखी । नियमु बा रे पायिकी । वोळगे तै ॥208॥
त्याप्रमाणे पापपुण्य निवडण्यात इंद्रियेच चांगल्या व वाईट कर्माची पारख करतात.
व त्यावेळेला अरे अर्जुना, इंद्रियनिग्रह हाच (आपणहून) सेवा चाकरी करत असतो.
209-14
नाइकणे ते कानचि वाळी । न पहाणे ते दिठीचि गाळी । अवाच्य ते टाळी । जीभचि गा ॥209॥
जे ऐकू नये ते कानच वर्ज्य करतात, जे पाहू नये ते दृष्टीच टाकून देते, ज्याचा उच्चार करू नये ते जीभच टाळते.
210-14
वाती पुढा जैसे । पळो लागे काळवसे । निषिद्ध इंद्रिया तैसे । समोर नोहे ॥210॥
दिव्यापुढे जसा काळोख पळावयास लागतो, त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध विषय येत नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


211-14
धाराधरकाळे । महानदी उचंबळे । तैसी बुद्धि पघळे । शास्त्रजाती ॥211॥
पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रात बुद्धी पसरते.
212-14
अगा पुनवेच्या दिवशी । चंद्रप्रभा धावे आकाशी । ज्ञानी वृत्ति तैसी । फाके सैंघ ॥212॥
अर्जुना, पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात जिकडे तिकडे पसरतो, त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ती सर्वत्र पसरते.
213-14
वासना एकवटे । प्रवृत्ति वोहटे । मानस विटे । विषयांवरी ॥213॥
वासना एकत्र होतात. एक ब्रह्मप्राप्तीविषयीच काय ती वासना असते. संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते व मन विषयांना विटते.
214-14
एवं सत्त्व वाढे । तै हे चिन्ह फुडे । आणि निधनही घडे । तेव्हाचि जरी ॥214॥
याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर असतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू घडला.
215-14
का पाहालेनि सुयाणे । जालया परगुणे । पडियंते पाहुणे । स्वर्गौनिया ॥215॥
तर जशी घरामधे (विपुल) संपत्ती आहे आणि त्याच प्रमाणे त्या संपत्तीवाल्याची उदार वृत्ती असून त्याच्या अंगी धैर्य आहे, तर मग इहलोकात कीर्ती व नंतर स्वर्गसुख त्यास का मिळू नये ?


216-14
तरी जैसीचि घरीची संपत्ती । आणि तैसीचि औदार्यधैर्यवृत्ती । मा परत्रा आणि कीर्ती । का नोहावे ? ॥216॥
अथवा सुकाळ (धान्य व जल यांची विपुलता) प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याच वेळी आपले आवडते मनुष्य (जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे ज्याच्या भेटीचा बिलकुल संभव नव्हता असे आवडते मनुष्य) स्वर्गातून पाहुणे म्हणून यावे.
217-14
मग गोमटेया तया । जावळी असे धनंजया । तेवी सत्त्वी जाणे देहा । के आथि गा ? ॥217॥
अर्जुना मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे का ? त्याप्रमाणे सत्वगुणाच्या वृद्धीत मरण आले असता तो (सत्वगुणाने स्वभावत: युक्त अशा जन्माशिवाय) दुसरीकडे कोठे जाईल ?
218-14
जे स्वगुणी उद्भट । घेऊनि सत्त्व चोखट । निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हे ॥218॥
कारण की आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण, तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगांना योग्य असे हे खोपट (शरीर) टाकून निघतो.
219-14
अवचटे ऐसा जो जाये । तो सत्त्वाचाचि नवा होये । किंबहुना जन्म लाहे । ज्ञानियांमाजी ॥219॥
असा अकस्मात जो जातो, देह ठेवतो तो सत्वगुणांचीच मुर्ती बनलेला असतो. त्याला पुन्हा सत्वगुणाने युक्त असा जन्म मिळतो.
220-14
सांग पा धनुर्धरा । रावो रायपणे डोंगरा । गेलिया अपुरा । होय काई ? ॥220॥
राजा हा राजेपणाने, गादीवर असताना डोंगरावर गेला असता त्याच्या राजेपणात काही कमी येईल काय ? अर्जुना, सांग बरे
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


221-14
नातरी येथिचा दिवा । नेलिया सेजिया गावा । तो तेथे तरी पांडवा । दीपचि की ॥221॥
अथवा अर्जुना येथील (या गावातील) दिवा शेजारच्या गावात नेला असता तेथे तरी तो दिवाच आहे.
222-14
तैसी ते सत्त्वशुद्धी । आगळी ज्ञानेसी वृद्धी । तरंगावो लागे बुद्धी । विवेकावरी ॥222॥
त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्वगुणाचे निर्मलत्व (प्रकाश) ज्ञानासह विशेषच वाढते व त्याची बुद्धी विवेकावर पोहू लागते.
223-14
पै महदादि परिपाठी । विचारूनि शेवटी । विचारासकट पोटी । जिरोनि जाय ॥223॥
महतत्वादि अनुक्रमाचा विचार करून अखेरीस (विचार करणारा) त्या विचारांसकट (ज्या ब्रह्मस्वरूपात) लीन होतो.
224-14
छत्तिसा सदतिसावे । चोविसा पंचविसावे । तिन्ही नुरोनि स्वभावे । चतुर्थ जे ॥224॥
वेदांतात (गीतेत 13 व्या अध्यायाच्या 5/6 श्लोकात सांगितल्याप्रमाणे) छत्तीस तत्वे मानली आहेत, त्यांच्या मते हे ब्रह्म सदतिसावे आहे, सांख्यात चोवीस तत्वे मानली आहेत म्हणून त्यांच्या मते जे ब्रह्म पंचविसावे आहे, व सत्वगुणादि तीन गुणास नाहीसे करून जे स्वभावत: चौथे आहे.
225-14
ऐसे सर्व जे सर्वोत्तम । जाले असे जया सुगम । तयासवे निरुपम । लाहे देह ॥225॥
असे जे ब्रह्म सर्व असून सर्वात उत्तम आहे ते ब्रह्म ज्यास (ज्या कुलात) सुलभ झाले आहे त्याचे बरोबर त्या कुलात त्यास निरुपम देह मिळतो.

दिवस २२० वा. ८ ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २६२९ ते २६४०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २६२९
आता येथे लाजे नाही तुझे काम । जाय मज राम आठवू दे ॥१॥
तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलो या अंकित दुर्जनाचा ॥धृपद॥
माझे केले मज पारिखे माहेर । नष्ट तु साचार चाळविले ॥२॥
सुखासाठी एक वाहियेले खांदी । तेणे बहु मांदी मेळविली ॥३॥
केला चौघाचार नेलो पाचांमधी । नाही दिली शुद्धी धरू आशा ॥४॥
तुका म्हणे आता घेईन कांठीवरी । धनी म्या कैवारी केला देवा ॥५॥
अर्थ
हे लज्जे आता तुला माझ्या मनामध्ये राहायचे काहीच काम राहिले नाही तू आता येथून निघून जा आणि मला रामाचे स्मरण होऊ दयावे. तुझ्या भीडेमुळेच मी दुर्जन लोकाचा अंकीत झालो आणि त्यामुळे माझे आजपर्यंत खूप घात झाले आहेत. माझे माहेर जेथे माझे मायबाप पाडूरंग रुक्मीणी राहतात तेच तू मला परके केले असून मला फसविले आहेस अशी तू नष्ट आहेस. मला सुख प्राप्त होईल यामुळे मी तुला खांदयावर वाहिले परंतू तसे झाले नाही याउलट काम क्रोधासारखे दोषाचा मेळावाच माझ्याभोवती जमा झाला. हे लज्जे तू माझ्याकडून अनेक प्रकारचे पाप करुन घेतले त्यामुळे मला चार चौघांमध्ये व पंचाच्यासमोर उभे राहावे लागले एवढयानेही तुझे समाधान झाले नाही तर तू माझ्या मनाला शुध्द होऊ दिले नाही विविध प्रकारच्या इच्छेंमध्ये तू मला पाडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे लज्जे आता तुला हाकलून देण्यासाठी मी काठी वरती घेईन कारण मी देवाला माझा धनी केला असून तो माझा कैवारी झाला आहे. ”
अभंग क्र. २६३०
आजिवरी होतो तुझे सत्ते खाली । तोवरी त्वां केली विटंबणा ॥१॥
आता तुज राहो नेदी या देशात । ऐसा म्या समर्थ केला धणी ॥धृपद॥
सापे रिग केला कोठे बाळपणी । होतीसी पापिणी काय जाणो ॥२॥
तुका म्हणे म्या हा बुडविला वेव्हार । तुझेचि ढोपर सोलावया ॥३॥
अर्थ
हे लज्जे आजपर्यंत मी तुझ्या सत्तेखाली होतो तोपर्यंत तू माझी खूप विटंबना केली आहे. परंतू आता मी माझ्या देहरुपी देशामध्ये तुला राहूच देणार नाही असा सर्व समर्थ धनी मी केला आहे. हे लज्जे बाळपणी तुझ्यामध्ये सापाने प्रवेश केला आहे त्यामुळे तू एवढी पापीनी आहे की काय काय माहिती ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे लज्जे तुझे ढोपर सोलण्याकरताच हे बघ मी माझे सर्व लोकलज्जेचे व्यवहार बुडविले आहेत. ”
अभंग क्र. २६३१
देवाच्या निरोपे पिटितो डांगोरा । लाजे नका थारा देऊ कोणी ॥१॥
मोडिले रांडेणे सुपंथ मारग । चालविले जग यमपंथे ॥धृपद॥
परिचारी केली आपुलीच रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाही ॥२॥
तुका म्हणे आणा राऊळा धरून । फजित करून सोडू मग ॥३॥
अर्थ
मी देवाच्या निरोपावरुनच दवंडी पिटवित आहे की लाजेला (लज्जा) कोणीही थारा देऊ नका. कारण भक्तीचा चांगला सुपंथ मार्ग या रांडेने मोडविला असून हीने सर्व जग यमाकडे जाणा-या मार्गाकडे वळविले आहे. तिच्या पोटामध्ये किती वाईटपणा आहे हे कोणालाही माहित नाही तिने सर्वत्र आपलीच प्रतिष्ठा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे लोकांनो तुम्ही या लज्जेला विठ्ठलाच्या देवळात धरुन आणा मग आपण हिची चांगलीच फजिती करुन हिला सोडवू. ”
अभंग क्र. २६३२
का रे तुम्ही निर्मळ हरीगुण गाना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जाना ॥१॥
काय गणिकेच्या याती अधिकार मोठा । पापी अजामेळ ऐसा नेला वैकुंठा ॥धृपद॥
ऐसे नेणो मागे किती अनंत अपार । पंच महादोषी त्यांच्या पातका नाही थार ॥२॥
पुत्राचिया लोभे नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचे पुण्य ॥३॥
अर्थ
अहो तुम्ही निर्मळ हरीचे गुण का गात नाहीत आणि आनंदाने नाचत वैकुंठाला का जात नाही ? त्या गणिकेचा अधिकार आणि जात अशी किती मोठी होती आणि पापी अजामेळ देखील देवाने वैकुंठाला नेलाच. अरे मागे असे कितीतरी अनंत अपार असे पंचमहादोषी पातकी होते की त्यांच्या दोषाला पारावारच नव्हता इतके मोठे त्यांचे दोष होते तरी देखील देवाने त्यांचा उध्दार केला. तुकाराम महाराज म्हणतात, “दुष्ट नष्ट अशा अजामेळाने पुत्राच्या लोभाने नारायणा असे म्हटले तर त्याचा उध्दार झाला नाहीतर त्याचे असे कोणते कर्म होते किंवा कोणते पुण्य होते की त्याचा उध्दार व्हावा तात्पर्य असे की हरीनामामुळेच त्याचा उध्दार झाला. ”
अभंग क्र. २६३३
बैसोनिया खाऊ जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥१॥
ऐसे केले नारायणे । बरवे जिणे सुखाचे ॥धृपद॥
घरीच्या घरी भांडवल । न लगे बोल वेचावे ॥२॥
तुका म्हणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥३॥
अर्थ
नारायणाने जो प्रेमरुपी खाऊचा लाभ करुन दिला तोच एकातात बसून सेवन करु. अशा प्रकारचे माझे सुखाचे जीवन नारायणानेच केले हे फार चांगले केले. सर्व प्रेमरुपी लाभाचे भांडवल घरच्या घरीच मिळाले असून बाहेर कोठे शब्दच खर्च करावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “प्रपंचासाठी आटाआटी करणे आणि त्याच्यासाठी जे भरपूर कष्ट करावे लागतात ते सर्व चुकले आहेत. ”
अभंग क्र. २६३४
नाही भ्यालो तरी पावलो या ठाया । तुम्हा आळवाया जविळके ॥१॥
सत्ताबळे आता मागेन भोजन । केले ते चिंतन आजिवरी ॥धृपद॥
नवनीतासाठी खादला हा जीव । थोड्यासाठी कीव कोण करी ॥२॥
तुका म्हणे ताक न लगे हे घाटे । पांडुरंगा खोटे चाळवण ॥३॥
अर्थ
देवा मी कोणालाही घाबरलो नाही त्यामुळेच तर तुमच्याजवळ तुम्हाला आळवायसाठी आलो आहे. देवा आजपर्यंत मी तुमचे जे चिंतन केले आहे त्याच्याच सत्तेवर मी तुम्हाला ब्रम्हज्ञानाचे भोजन मागणार आहे. सार अशा नवनीतासाठी तर मी तुमचा जीव खाल्ला आहे असार असा थोडयाफार गोष्टीसाठी कोण करुणा भाकतोय ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला संसाररुपी असार असे ताक नको आहे मला तुमच्या ब्रम्हज्ञानासारखे नवनीत पाहिजे आहे आणि असे खोटे ताक मला देवून माझी फसवणूक तुम्ही करु नका. ”
अभंग क्र. २६३५
सारीन ते आता एकाचि भोजने । वारीन मागणे वेळोवेळा ॥१॥
शेवटींचा घास गोड करी माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥धृपद॥
वंचू नये आता काहीच प्रकार । धाकल्याचे थोर झाल्यावरी ॥२॥
तुका म्हणे पोटी बहु झाला वाव । काही नेदी ठावे उरो मागे ॥३॥
अर्थ
देवा आता मी एकदाच तुझ्या ब्रम्हज्ञानाचे भोजन करीन आणि वेळोवेळा तुला मागणे मागायचे बंद करुन टाकीन. हे कृपावंते पाडूरंगे अगे तु मला शेवटचा गोड घास खाऊ घाल. एकदा की लहान मूल मोठे झाले की कोणत्याही प्रकारे त्याची वंचना करु नये. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा माझ्या पोटामध्ये इतकी भूक आहे की, तुम्ही मला भक्तीज्ञानाचे कितीही पक्वान्न वाढले तरी मी ते सर्व खाऊन टाकीन मागे काहीही उरु देणार नाही. ”
अभंग क्र. २६३६
पोट धाले मग न लगे पंगती । झालिया निश्चिंती खेळ गोड ॥१॥
आपुलिया हाते देई वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥धृपद॥
घराचा विसर होईल आनंद । नाचेन मी छंदे प्रेमाचिया ॥२॥
तुका म्हणे तोचिवरी करकर । मग हे उत्तर खंडईल ॥३॥
अर्थ
एकदा की पोट भरले की पुन्हा पंगतीला बसावे लागत नाही आणि एकदा की निश्चिंती झाली की भक्तीचा खेळ गोड वाटतो. हे विठ्ठला तू आपल्या हाताने मला घास भरव आणि त्यानंतर मला भक्तीचे पाणी पाज. हे विठ्ठला तुझ्या प्रेमाच्या आनंदाने मला घराचा विसर पडेल आणि तुझ्या प्रेमाच्या छंदात मी नाचेन. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विठ्ठला जोपर्यंत तू माझे पोट भरवित नाही तोपर्यंत मी तुझ्याजवळ अशीच किरकिर करीन एकदा की माझे पोट भरले की मग माझे बोलणेच बंद पडेन. ”
अभंग क्र. २६३७
बोलविसी तरी । तुझ्या येईन उत्तरी ॥१॥
काही कोड कवतुके । हाती द्यावया भातुके ॥धृपद॥
बोलविसी तैसे । करीन सेवक सरिसे ॥२॥
तुका म्हणे देवा । माझे चळण तुज सेवा ॥३॥
अर्थ
देवा तू मला हाक मारली की मी लगेच तुझ्याकडे येईन. देवा माझे काही गोड कौतुक पूर्ण करुन घेण्यासाठी माझ्या हाती तुझे प्रेमरुपी खाऊ देण्यासाठी, तू मला जशी हाक मारशील तसा मी तुझ्याकडे धावत येईन आणि तू दिलेला खाऊ मी सेवन करीन. तुकाराम महाराज म्हणतात, “माझे सर्व इंद्रिये तुझ्या इच्छेप्रमाणेच हालचाल करत आहेस. ”
अभंग क्र. २६३८
दिला जीवभाव । तेव्हा सांडिला म्या ठाव ॥१॥
आता वर्ते तुझी सत्ता । येथे सकळ अनंता ॥धृपद॥
माझीया मरणे । तुम्ही बैसविले ठाणे ॥२॥
तुका म्हणे काही । मी हे माझे येथे नाही ॥३॥
अर्थ
देवा ज्यावेळी मी माझा जीवभाव तुला अर्पण केला त्याच वेळी मी त्याचा आश्रय सोडून दिला आहे. त्यामुळे हे अनंता आता मी येथे या भवसागरामध्ये तुझ्या सत्तेनेच वर्तत आहे. देवा देहभावच माझा राहिला नाही त्यामुळे माझ्या देहभावाला मरण आले असून त्यामुळेच तर तुम्ही माझ्या अंत:करणामध्ये तुमचे ठाणे बसविले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळेच हे देवा माझ्या ठिकाणी मी आणि माझे हे काहीच राहिले नाही. ”
अभंग क्र. २६३९
एकाचिये वेठी । सापडलो फुकासाठी ॥१॥
घेतो काम सत्ताबळे । माझे करूनि भेंडोळे ॥धृपद॥
धावे मागे मागे । जाय तिकडे चालत लागे ॥२॥
तुका म्हणे नेले । माझे सर्वस्वे विठ्ठले ॥३॥
अर्थ
मी एकाच्याच हाती त्याची वेठबिगारी करण्यासाठी सापडलो आहे. तो माझ्याकडून त्याच्या सत्तेने बळजबरीने काम करवून घेतो त्याने तर मातीचे ढेकूळच करुन टाकले आहे. तो सारखा माझ्या मागे मागे धावत असतो मी जिकडे जाईल तिकडे माझ्या मागे लागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “असा तो विठ्ठल आहे व त्याने माझे सर्वस्व हरण केले आहे. ”
अभंग क्र. २६४०
आता द्यावे अभयदान । जीवन ये कृपेचे ॥१॥
उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकी ॥धृपद॥
नाभी नाभी या उत्तरे । करुणाकरे शांतवीजे ॥२॥
तुका म्हणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥३॥
अर्थ
देवा मला तुम्ही अभयदान दयावे तुमच्या कृपेनेच मी जीवन जगू शकेन. देवा तुमचे दोन्ही बाहू वरती करा आणि तुमचे हात आमच्या मस्तकावर ठेवा. तू भिऊ नकोस तू भिऊ नकोस अशा प्रकारचे शब्द उच्चारुन माझ्यावर करुणा करुन देवाने माझे सांत्वन करावे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी जी अपेक्षा केली होती त्याचे फळ प्राप्त होण्याचा हा आजचा दिवस आहे. ”

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version