“२२ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 22 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २२ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३१६९ ते ३१८० चे पारायण आपण करणार आहोत.
२२ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ३०१ ते ३२५,
301-16
प्राण घेपती संपन्नांचे । ते पाप जरी साचे । तरी सर्वस्व हाता ये तयांचे । हे पुण्यफळ की ? ॥301॥
श्रीमान् लोकांचे प्राण घेणे हे जर पापच असेल तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हेही पुण्यफळ मानावयास नको काय ? 1
302-16
बळी अबळाते खाय । हेचि बाधित जरी होय । तरी मासया का न होय । निसंतान ? ॥302॥
सामर्थ्यवानाणे दुर्बळाला खावे हे जर खरोखर पाप असेल तर, माशांचे आजवर निसंतान का झाले नाही ? 2
303-16
आणि कुळे शोधूनि दोन्ही । कुमारेचि शुभलग्नी । मेळवीजती प्रजासाधनी । हेतु जरी ॥303॥
आणि कुलशील पाहून कुमार व कुमारी यांचा शुभमुर्हुतावर विवाह करणे हे जर प्रजाप्राप्ती चे साधन असेल. 3
304-16
तरी पशुपक्षादि जाती । जया मिती नाही संतती । तया कोणे प्रतिपत्ती । विवाह केले ? ॥304॥
तर- ज्यांच्या प्रजेला गणित नाही असे पशुपक्षादिकार्य विवाह कोणत्या मुहूर्तावर व कोणी लाविले होते ? 4
305-16
चोरियेचे धन आले । तरी ते कोणासि विष जाले ? । वालभे परद्वार केले । कोढी कोणी होय ? ॥305॥
चोरीने मिळविलेले धन विषाप्रमाणे कोणास बांधिले आहे ? अथवा प्रेमाखातर केलेल्या परस्त्रीगमनाते कोणाच्या अंगावर कुष्ठ उठले आहे सांगा ! 305
306-16
म्हणौनि देवो गोसावी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गावी । करी तो भोगी ॥306॥
म्हणून ईश्वर हा सर्वसत्ताधीश असून तो जीवांना धर्माधर्माचे फल भोगवितो व येथील शुभकर्माचे भोग त्यांना परलोकी (स्वर्गत) देतो. 6
307-16
परी परत्र ना देवो । न दिसे म्हणौनि ते वावो । आणि कर्ता निमे मा ठावो । भोग्यासि कवणु ? ॥307॥
असे म्हणावे तर, परलोक किंवा देव हे केवळ परोक्ष किंवा प्रत्ययाला कधीही न येणारे असल्याने सर्व व्यर्थ आहेत, आणि शुभाशुभकर्मे करणाराच जर नाहीसा होऊन जातो तर भोग्य भोगणार तरी कोण ? 307
308-16
येथ उर्वशिया इंद्र सुखी । जैसा का स्वर्गलोकी । तैसाचि कृमिही नरकी । लोळतु श्लाघे ॥308॥
उर्वशीच्या उपभोगाने इंद्र जर स्वर्गात सुखी आहे असे म्हणाल किंवा म्हणावे तर येथे प्रत्यक्ष नरकांतील कीटकही तशा तऱ्हेचे स्त्रीसुख भोगून संतुष्ट आहेत ! 308
309-16
म्हणौनि नरक स्वर्गु । नव्हे पापपुण्यभागु । जे दोही ठायी सुखभोगु । कामाचाचि तो ॥309॥
म्हणून नरकलोक किंवा स्वर्ग, तसेच पाप व पुण्य वगैरे काहीही नसून दोहीकडे कामतृप्तीनेच सुखभोग सारखा घडतो. 309
310-16
याकारणे कामे । स्त्रीपुरुषयुग्मे । मिळती तेथ जन्मे । आघवे जग ॥310॥
म्हणून कामेच्छेने जेणे स्त्री व पुरुष ही एकत्रसंलग्न होतात तेथे जगांतील सर्व प्राण्यांची सहजच उत्पत्ति होते. 310
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-16
आणि जे जे अभिलाषे । स्वार्थालागी हे पोषे । पाठी परस्परद्वेषे । कामचि नाशी ॥311॥
आणि स्वार्थाच्या इच्छेने आपण जे जे काही जोडतों, त्याचा वीट आल्यावर अगर द्वेष उत्पन्न झाला असता, आपली इच्छाच नाश करिते. 11
312-16
एवं कामावाचूनि काही । जगा मूळचि आन नाही । ऐसे बोलती पाही । आसुर गा ते ॥312॥
ह्या प्रमाणे सर्व लोकव्यवहाराला त्यांच्या इच्छेवाचून अन्य कहीही कारण नाही, असे आसुरीसंपत्तिमानांचे म्हणणे आहे. 12
313-16
आता असो हे किडाळ । बोली न करू पघळ । सांगताचि सफोल । होतसे वाचा ॥313॥
आता ह्या निंद्य कथा पुरेत; त्यांची अधिक चर्चा नको; कारण तसे करणे म्हणजे वाचा व्यर्थ शिणविण्यासारखे होय. 313
एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥16. 9॥
314-16
आणि ईश्वराचिया खंती । नुसधियाचि करिती चांथी । हेही नाही चित्ती । निश्चयो एकु ॥314॥
आणि ईश्वराच्या नास्तित्वाबद्दल नुसती वायफळ बडबड करितात इतकेच नसून त्यांच्या चित्ताचही तसाच निश्चय असतो. 14
315-16
किंबहुना उघड । आंगी लाऊनिया पाखांड । नास्तिकपणाचे हाड । रोविले जीवी ॥315॥
किंबहुना, असा उघडपणे अभिमानाने पाखांड मताचा स्वीकार करणारे हे लोक म्हणजे हा नास्तिकाचा बाजार आहे, हे दाखविण्यासाठी त्यांच्या हद्दीवर पुरलेले नास्तिकतेचे हाडुकच होय. 15
316-16
ते वेळी स्वर्गालागी आदरु । का नरकाचा अडदरु । या वासनांचा अंकुरु । जळोनि गेला ॥316॥
अशा स्थितींत, स्वर्गाविषयी आदर, किंवा नरकाविषयी भय वगैरे चित्तांतील सर्व अंकुर जळून गेलेले असतात. 16
317-16
मग केवळ ये देहखोडा । अमेध्योदकाचा बुडबुडा । विषयपंकी सुहाडा । बुडाले गा ॥317॥
मग, अर्जुना, हे आसुरी संपत्तीचे जन देहरूप खोड्यात गुंतून पडून, अपवित्र जलांतील बुडबुड्याप्रमाणे विषयरूप चिखलात बुडून राहातात. 17
318-16
जै आटावे होती जळचर । तै डोही मिळती ढीवर । का पडावे होय शरीर । तै रोगा उदयो ॥318॥
जलचरांचे निःसंतान होण्याचा योग आला की, त्या जलाशयापाशी कोळयांची गर्दी होते किंवा शरीरक्षय होण्याचा काल आला की, रोगोद्भव होत असतो. 18
319-16
उदैजणे केतूचे जैसे । विश्वा अनिष्टोद्देशे । जन्मती ते तैसे । लोका आटू ॥319॥
धूमकेतूचा उदय म्हणजे जगावर कोसळणया अरिष्टाचे जसे पूर्वचिन्ह होय, त्याप्रमाणे असुरी संपत्तीच्या लोकाचा उदय किंवा भरणा म्हणजे लोकक्षयाचेच लक्षण होय. 19
320-16
विरूढलिया अशुभ । फुटती तै ते कोंभ । पापाचे कीर्तिस्तंभ । चालते ते ॥320॥
जसे पेरावे तसे उगवतो ह्या न्यायाने अशुभ पेरणीला अशुभच अकुर येतात तसेच हे लोक म्हणजे पापाचा डंका पिटणारे चालते जाहिरातीचे खांबच होत. 320
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-16
आणि मागांपुढा जाळणे । वाचूनि आगी काही नेणे । तैसे विरुद्धचि एक करणे । भलतेया ॥321॥
आणि आग पुढे व मागे जे सापडेल ते जसे जाळीत सुटते तशी ह्यांची कोणतीही कृति म्हणजे विरुद्ध अथवा करू नये तीच नेमकी असावयाची, 21
322-16
परी तेचि गा करणे । आदरिती संभ्रमे जेणे । तो आइक पार्था म्हणे । श्रीनिवासु ॥322॥
परंतु तीच त्यांची क्रिया कशा तयारीने होत असते ते अर्जुना, तू श्रवण कर असे भगवान् म्हणाले. 22
काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।
मोहाद् गृहीत्वाऽसद्ग्रहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥16. 10॥
323-16
तरी जाळ पाणिये न भरे । आगी इंधन न पुरे । तया दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो ॥323॥
अरे, जाळे पाण्याने भरले असे कधी होत नाही, किंवा अग्नीला काष्ठे पुरे झाली असेही कधी होत नाही; ह्या दुर्भर पदार्थाप्रमाणे ज्याची क्षुधा कधी शान्त नसते. 23
324-16
तया कामाचा वोलावा । जीवी धरुनिया पांडवा । दंभमानाचा मेळावा । मेळविती ॥324॥
मनामध्ये काम किंवा इच्छा यास आश्रय देऊन, अर्जुना, जे त्यांना दंभ व मान ह्यांची आणखी जोड देतात. 24
325-16
मातलिया कुंजरा । आगळी जाली मदिरा । तैसा मदाचा ताठा तव जरा । चढता आंगी ॥325॥
आधीच माज आलेल्या हत्तीला आणखी दारू पाजावी त्याप्रमाणे हे जसेजसे वृद्ध होतात, तसा तसा त्यांच्या अंगात उन्मत्तपणा वाढत जातो. 25
दिवस २६५ वा. २२, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३१६९ ते ३१८०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३१६९
आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पुंडलिक ॥१॥
कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती ॥२॥
तुका म्हणे जीवा थोर झाले सुख । नाठवे हे भूक तहान काही ॥३॥
अर्थ
मला पंढरी, भीमा नदी, पाडूरंग, चंद्रभागा, शिवलिंग व पुंडलिक हेच आवडतात. कामधेनू, कल्पतरु, चिंतामणी हे आपल्या मनातील आवडीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्याप्रमाणे पंढरी, भीमा नदी, पाडूरंग, चंद्रभागा, शिवलिंग आणि पुंडलिक हे देखील आमच्या आवडीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “या सर्वाच्या दर्शनाने व त्यांच्या भजनाने मला इतके मोठे सुख झाले आहे की त्या सुखामध्ये मला तहान भूक देखील आठवत नाही. ”
3:14
अभंग क्र. ३१७०
प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही नीदानी न घडे त्यासी ॥१॥
दोही पेवावरी ठेवू जाता हात । शेवटी अपघात शरीराचा ॥२॥
तुका म्हणे तया दोहीकडे धक्का । शेवटी तो नरकामाजी पडे ॥३॥
अर्थ
परमार्थ आणि प्रपंच मी दोन्ही बरोबर साध्य करीन असे जर कोणी म्हणेल किंवा ठरवेल तर त्याच्याकडून एकही व्यवस्थित घडणार नाही. दोन्ही पेवांवर हात ठेवू पाहिले तर शरीराचा अपघात होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही एकाच वेळी जो साध्य करण्याचा प्रयत्न करतो त्याला दोन्ही कडेही धक्का मिळतो आणि शेवटी तो नरकामध्येच पडतो. ”
3:14
अभंग क्र. ३१७१
आम्हा भय धाक कोणाचा रे पाहे । काळ मशक काय मानव हे ॥१॥
आम्हासी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥धृपद॥
काय करावी हे कोणाची मान्यता । करिता अनंता कोण वारी ॥२॥
नाही शीण आम्हा झाले कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥३॥
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ॥४॥
अर्थ
आम्ही हरीचे दास आहोत त्यामुळे आम्हाला कोणाचा धाक आणि कोणाचे भय आहे काळ आमच्यापुढे अगदी मक्षकाप्रमाणे आहे तर सामान्य मनुष्यांची आमच्यापुढे काय कथा आहे ? आम्हाला आमच्या पोटाची कसली चिंता आली आमचे पोट भरणारी आमची पाडूरंग माऊली आहे. आम्हाला कोणी मान्यता जरी दिली तरी त्याच्या मान्यतेची आम्हाला काय गरज आहे आणि काय करायची आम्हाला ती मान्यता प्रत्यक्ष अनंताने आम्हाला मान्यता दिली आम्हाला मोठेपणा दिला आहे आणि अनंताने दिलेल्या मोठेपणाला कोण प्रतिबंध करणार आहे ? लोकांना पुनीत म्हणजे पुण्यवान करणे हे आमच्यासाठी कौतुक नाही तर आमच्यासाठी तो शीण झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे मी तर आनंदाचे लाडू खात आहे आणि तो अनंदाचा लाडू तुम्ही देखील घ्या आणि समाधानाने खा उगाच चरफड करु नका. ”
3:15
अभंग क्र. ३१७२
तांबीयाचे नाणे न चले खऱ्या मोले । जरी हिंडविले देशोदेशी ॥१॥
करणीचे काही न मने सज्जना । यावे लागे मना वृद्धांचिया ॥धृपद॥
हिरियासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळा न पाहाती ॥२॥
देऊनिया भिंग कामाविले मोती । पारखिया हाती घेता नये ॥३॥
तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ । आपुले हे चित्त आपणा ग्वाही ॥४॥
अर्थ
सोने चांदीचे नाणे हे खऱ्या मोलाचे असते तांब्याचे नाणे कितीही देशोदेशी घेवून हिंडवले तरी ते कोठेही चालणार नाही. कोणतेही कार्य केले तर संतांना सज्जनांना ते कार्य पटायला हवे व त्याची मान्यता संतांकडून यावी लागते त्या नंतर कार्याला मान्यता प्राप्त होते. शिरगोळा अगदी हिऱ्याप्रमाणे दिसतो परंतू जो हिऱ्यांचा पारखी आहे तो त्या शिरगोळयाला डोळयाने देखील पाहाणार नाही. काचेवर कृत्रिम प्रक्रिया करुन मोती जरी तयार केला तरी मोत्याचा जो पारखी असतो तो त्याला हातात देखील घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात. “परमार्थामध्ये उगाचच खोटे नटून म्हणजे व्यर्थ सोंग दाखवून काय उपयोग आहे आपण कसे वागतो, आपले मन कसे आहे याविषयी आपले चित्तच आपल्याला साक्षी असते. ”
3:15
अभंग क्र. ३१७३
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभविता दूर तेचि भले ॥१॥
ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥धृपद॥
हो का पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रही धरू नये ॥२॥
तुका म्हणे सत्य पाळावे वचन । अन्यथा आपण करू नये ॥३॥
अर्थ
ज्याची संगती केल्यावर आपल्या चित्ताला त्याच्या विषयी ओढ वाटते त्याची संगती करावी आणि ज्याच्या भेटीमुळे आपल्या चित्तात क्षोभ निर्माण होतो त्याच्यापासून दूर राहाणेच चांगले. अशी परंपरा पहिल्यापासूनच चालत आलेली आहे ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतो त्याचा त्याग करणे ही सामान्य माणसांची नीतीच आहे आपण परमार्थ करत असताना आपल्याला कोणी आड येत असेल मग तो पिता असो पुत्र किंवा बंधू कोणीही असो त्यांची संगतीही धरु नये. तुकाराम महाराज म्हणतात, “आपण जे सत्यवचन बोलू ते आपण नीट पाळावेत अन्यथा कोणत्याही प्रकारची वचने कोणालाही देऊच नयेत. ”
3:15
अभंग क्र. ३१७४
आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीने भूषण अधिक पुटा ॥१॥
नाही कोणासवे बोलणे लागत । निश्चिंतीने चित्तसमाधान ॥धृपद॥
लपविले ते ही ढेकरे उमटे । खोटियाचे खोटे उर फोडी ॥२॥
तुका म्हणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥३॥
अर्थ
कोणी कसाही असो परंतू त्याची परीक्षा घेणे आपल्याला जमले पाहिजे सोने अग्नीत टाकल्यानंतर जसे शुध्द होऊन बाहेर येते त्याप्रमाणे आपण कोणाचीही कसोटी घेतली की आपल्याला कोण कसे आहे, चांगले आहे की वाईट आहे हे समजते. कोणत्याही गोष्टीची आपल्याला परीक्षा घेणे जमले पारख करण्याची हातोटी आली की मग कोणाविषयीही (गोष्टीविषयी किंवा मनुष्याविषयी) काहीच बोलण्याची गरज पडत नाही कारण आपल्याला एकदा परीक्षा घेणे जमले की त्याचे खरे स्वरुप कळते त्यामुळे मन समाधानी व निश्चिंत होते. आपण जेवण केले आणि लोकांना सांगितले की आपण जेवलोच नाहीत, परंतू ते काही केल्या लपले जातच नाही जेवण केल्यानंतर ढेकर येतोच व त्यामुळे कळते की आपण जेवण झालेले आहे त्यामुळे खोटया माणसाचे खोटे वागणे हे त्यालाच त्रासदायक ठरते. तुकाराम महाराज म्हणतात, “निंदा आणि स्तुती ही वरवर करता येते परंतू मनुष्याच्या अंतरंगात जो भाव असेल तसेच त्याला फळ मिळते. ”
3:16
अभंग क्र. ३१७५
आणिकाच्या घाते मानिता संतोष । सुखदुःख दोष अंगी लागे ॥१॥
ऐसे मनी वाहू नयेती संकल्प । करू नये पाप भांडवल ॥धृपद॥
किल्मीशाची चित्ती राहाते कांचणी । अंगी ते जोडोनी ठाव जाळी ॥२॥
तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय । होणार ते होय प्रारब्धेचि ॥३॥
अर्थ
इतरांचा घात झाला आणि आपण त्यामध्ये संतोष व्यक्त केला तर सुखदु:खे व दोष आपल्याला लागतात. त्यामुळे इतरांचे वाईट व्हावे किंवा त्यांच्याविषयी वाईट भावना मनात ठेवण्याचे संकल्प मनामध्ये वाहू नयेत आणि पापाचे भांडवल आपल्याजवळ गोळा करु नयेत. मनामध्ये जर आपण केलेले पाप राहिले तर ते विचार आपल्या मनात सारखे चालू असतात व ते आपल्याला बोचत असतात व त्यामुळे आपल्या मनाच्या अंगी ते कायमच राहाते व आपल्या सुखसमाधानाचा ठावच ते जाळून टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, “जर आपण एखादयावर रागावलो तर त्यामुळे आपल्या पुण्याचा क्षय होतो आपले पुण्य विलास पावते त्यामुळे काय होईल ते प्रारब्धानुसारच होईल. ”
3:16
अभंग क्र. ३१७७
गुळे माखोनिया दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥१॥
अंतरी विषयाचे लागले पै पिसे । बाहिरल्या वेषे भुलवी लोका ॥धृपद॥
ऐसिया दांभिका कैची हरीसेवा । नेणेचि सद्भावा कोणे काळी ॥२॥
तुका म्हणे येणे कैसा होय संत । विटाळले चित्त कामक्रोधे ॥३॥
अर्थ
एखादया दगडाला वरवर गूळ माखून ठेवला व गुळाची ढेप म्हणून चार लोकामध्ये ठेवले तर ती चांगली ढेप आहे असे लोकांना वाटते. त्याप्रमाणे काही मनुष्य असे आहेत की, त्यांच्या अंत:करणामध्ये विषयाचे वेड लागलेले आहे परंतू बाहेरुन संतांचा वेष धारण करुन लोकांना ते फसवित असतात. अशा दांभिकांना मग कशी हरीची सेवा घडेल सदभावना म्हणजे काय हे त्यांना माहितच नसते. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याचे चित्त काम, क्रोधाने विटाळलेले आहे तो संत होईलच कसा ? ”
3:16
अभंग क्र. ३१७८
संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥
हेचि थोर चिंता लागली मनासी । निजता निद्रेसी न लगे डोळा ॥धृपद॥
जेविता जेवणी न लगे गोड धड । वाटते काबाड विषयसुख ॥२॥
ऐसिया संकटी पाव कृपानिधी । लावी संतपदी प्रेमभावे ॥३॥
तुका म्हणे आम्ही नेणो काही हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥४॥
अर्थ
देवा संतांच्याविषयी माझ्या मनामधे प्रेम कसे वाढेल आणि हरीच्या नामाचे स्मरण माझ्या मनामध्ये कसे राहील ? देवा याची चिंता माझ्या मनाला फार लागलेली आहे मी झोपण्यासाठी जरी गेलो आणि जरी अंथरुणावर झोपण्यासाठी खाली पडलो तरी माझ्या डोळयाला डोळा लागत नाही. देवा मी जेवण करण्यासाठी जरी बसलो तरी चांगले अन्न देखील मला गोड वाटत नाही विषयसुख तर अगदी काबाडकष्टाप्रमाणेच मला वाटत आहेत. त्यामुळे हे कृपानिधी अशा संकटाच्याप्रसंगी तू मला प्रसन्न हो आणि संतांच्या चरणाच्या ठिकाणी अगदी प्रेमभावाने मला लाव. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा आम्हाला आमचे हित कशात आहे हेच काही कळत आणि तुझ्यावाचून तर आम्ही अगदी अनाथच आहोत. ”
3:16
अभंग क्र. ३१७९
पंढरीचा वास धन्य तेचि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥
मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥धृपद॥
शांति क्षमा अंगी विरक्ति सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥२॥
तुका म्हणे नाही वर्णा अभिमान । अवघेचि जीवन्मुक्त लोक ॥३॥
अर्थ
ज्यांना पंढरीचा सहवास घडतो ते प्राणी धन्य आहेत त्यांची वाणी अमृततुल्य असून त्यांचा देह दिव्य आहे. जे लोक मूर्ख, मतिहीन, दुष्ट, अविचारी आहेत त्यांना पंढरीचा सहवास घडला की ते दयाळू होऊन जातात. व त्या नारीनर म्हणजे स्त्रीपुरुषांच्या अंगी शांती, क्षमा, विरक्ती उत्पन्न होऊन त्यांचे सर्वांग निर्मळ होते व ते नैराश्यहीन होतात. तुकाराम महाराज म्हणतात, “पंढरीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अंगी वर्णाभिमान राहात नाही तसेच जे पंढरीत राहतात ते सर्व लोक जीवनमुक्त होतात. ”
3:16
अभंग क्र. ३१८०
देखीचे ते ज्ञान करावे ते काई । अनुभव नाही आपणासी ॥१॥
इंद्रियांचे गोडी ठकली बहुते । सोडिता मागुते आवरेना ॥धृपद॥
युक्तीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य ते सार तरावया ॥२॥
नांव नावरिता घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥३॥
तुका म्हणे बुद्धी आपुले अधीन । करी नारायण आतुडे तो ॥४॥
अर्थ
आपल्याजवळ काहीच अनुभव नाही आणि वरवर दिखाऊ आणि दुसऱ्याकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाचे काय करावे ? असे शब्दज्ञानी लोक कितीतरी आहेत की जी इंद्रियांच्या आवडीने फसली गेली आहेत कालांतराने विषयांचा त्याग आपण करु असे जरी ते मनात म्हटले तरी देखील त्यांना काही इंद्रिय आवरली जात नाहीत. त्यामुळे योग्य आहार सेवन करणे नीतीने व्यवहार करणे आणि वैराग्य अंगी बाणणे हे तीन मुख्य साधने भवसागरातून तरुन जाण्याचे आहेत. नांव चालवत असताना पाण्यामध्ये व्यवस्थित चालवावी नाहीतर आपल्याला वारा धोका देऊ शकतो घात करु शकतो अगदी त्याप्रमाणे परमार्थामध्ये जर अहंकार धरला तर परमार्थाचा व्यर्थ पसाराच होत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “जो मनुष्य आपली बुध्दी आपल्या आधीन करेल त्यालाच नारायण भेटेल. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

