“२१ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 21 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २१ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३१५७ ते ३१६८ चे पारायण आपण करणार आहोत.
२१ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी २७६ ते ३००,
276-16
तरी वाद्येंवीण नादु । नेदी कवणाही सादु । का अपुष्पी मकरंदु । न लभे जैसा ॥276॥ वाद्ये
अरे, वाद्यादि साधनांशिवाय नाद जसा श्रवणाचा विषय होऊ शकत नाही, किंवा जेथे पुष्पादि पदार्थ नाहीत, तेथे जसा सुगंध येत नाही. 76
277-16
तैसी प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जव एकाधे शरीर । माल्हातीना ॥277॥
तशी ही आसुरी संपत्ति, एखाद्या शरीराचा आश्रय केल्याशिवाय स्वतंत्रतया दृष्टिगोचर होण्यासारखी नाही. 77
278-16
मग आविष्कारला लांकुडे । पावकु जैसा जोडे । तैसी प्राणिदेही सापडे । आटोपली हे ॥278॥
काष्ठाचा आश्रय केलेला अग्नि जसा स्पष्टपणे दिसतो, त्याप्रमाणे, प्राणिदेहाच्या आश्रयाने राहणारी ही आसुरी संपत्ति नजरेस येते. 78
279-16
ते वेळी जे वाढी ऊसा । तेचि आंतुला रसा । देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ॥279॥ उसा
उसाच्या वाढीबरोबर जशी त्यातील रसाचीही वाढ होत असते, त्याप्रमाणे, प्राण्यांच्या देहाच्या वाढीबरोबर त्याच्या आश्रयाने असणाच्या ह्या आसुरी संपत्तीचीही वाढ होत असते. 79
280-16
आता तयाचि प्राणिया । रूप करू धनंजया । घडले जे आसुरीया । दोषवृंदी ॥280॥
आता अर्जुना, अशा ह्या दोषयुक्त आसुरी संपत्तीने घडलेले जे प्राणी आहेत, त्यांचेच वर्णन करू. 280
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥16. 7॥
281-16
तरी पुण्यालागी प्रवृत्ती । का पापाविषयी निवृत्ती । या जाणणेयाची राती । तयांचे मन ॥281॥
तरी पुण्याचरणाविषयी प्रवृत्ति असावी व पापमार्गापासून निवृत्त व्हावे ह्या जाणीवेचा ज्याच्या मनात पूर्ण अंधार आहे. 81
282-16
निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा । कोशकिटु जैसा । जाचिन्नला पै ॥282॥
निर्गमन व प्रवेश करण्याला द्वार आहे की नाही ह्याचा विचार न करता आवेशाने घरटे बांधणारा कोशकीटक जसा आत कोंडून जाऊन संकटांत पडतो. 82
283-16
का दिधले मागुती येईल । की न ये हे पुढील । न पाहाता दे भांडवल । मूर्ख चोरा ॥283॥
किंवा दिलेले पुढे येईल की नाही हा विचार न करता जो मूर्ख चोरांना भांडवल देतो. 83
284-16
तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी । नेणिजती आसुरी जनी । आणि शौच ते स्वप्नी । देखती ना ते ॥284॥
त्याप्रमाणे, आसुरी संपत्तीच्या लोकांना प्रवृत्ति किंवा निवृत्ति ह्या दोन्ही गोष्टींचा गंधही नसतो व शुद्धतेचे तर त्यांना कधी स्वप्नही पडत नाही. 84
285-16
काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा । राक्षसही मांसा । विटो शके॥285॥
कदाचित् कोळसाही आपली काळिमा टाकील, कावळाही कदाचित् शुभ्र होईल, किंवा राक्षसांनाही कदाचित् मांसाचा वीट येईल ! 85
286-16
परी आसुरा प्राणिया । शौच नाही धनंजया । पवित्रत्व जेवी भांडिया । मद्याचिया ॥286॥
परंतु मद्याने भरलेले भांडे जसे केव्हांही पवित्र म्हणण्याची सोय नाही, त्याप्रमाणे, अर्जुना, आसुरी संपत्तीचे प्राणी कधीही शुद्ध असण्याची गोष्टच नको ! 86
287-16
वाढविती विधीची आस । का पाहाती वडिलांची वास । आचाराची भाष । नेणतीचि ते ॥287॥
कारण, विधीचे पालन करणे, वाडवडिलांची चालरीत पहाणे, शुद्धाचाराची चाड राखणे वगैरे भाषाही त्यांचे गावी नसते. 87
288-16
जैसे चरणे शेळियेचे । का धावणे वारियाचे । जाळणे आगीचे । भलतेउते ॥288॥
शेळीच्या चरण्यात जशी वगळावगळ नसते, वारा जसा कोठेही वाहतो कि वा आग जशी सापडेल तो भाग जाळीत सुटते 88
289-16
तैसे पुढा सूनि स्वैर । आचरती ते गा आसुर । सत्येसि कीर वैर । सदाचि तया ॥289॥
त्याप्रमाणे, आसुरी संपत्तीचे लोक इच्छेला प्राधान्य देऊन स्वैराचार करतात व सत्याचे व त्यांचे हटकून नित्य वैर असते 89
290-16
जरी नांगिया आपुलिया । विंचू करी गुदगुलिया । तरी साचा बोली बोलिया । बोलती ते ॥290॥
आपल्या नांगीने लोकांना विंचू गुदगुल्या करितो हे जितके खरे. तितकीच ते सत्य बोलतात हे खरे समजावे ! 290
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-16
आपानाचेनि तोंडे । जरी सुगंधा येणे घडे । तरी सत्य तया जोडे । आसुरांते ॥291॥
अपानवायु ( गुदद्वारचा वास ) सुगंधी असतो असे कधी घडले. असेल तर तो कधीतरी सत्य बोलला असेल ही तितकेच शक्य आहे. 91
292-16
ऐसे ते न करिता काही । आंगेचि वोखटे पाही । आता बोलती ते नवाई । सांगिजैल ॥292॥
अरे, त्यांनी काहीही क्रिया केली नाही तरी ते स्वभावतः किंवा आंगानेच टाकाऊ असतात; आता त्यांच्या बोलण्याचा चमत्कार तुला सांगतो. 92
293-16
एऱ्हवी करेयाच्या ठायी चांग । ते तयासि कैचे नीट आंग । तैसा आसुरांचा प्रसंग । प्रसंगे परीस ॥293॥
उंटाच्या शरीराचा कोणता भाग असा आहे की, तो सरळ आहे असे म्हणता येईल ? असुरांची गोष्ट तशीच आहे. त्यांचे काय चांगले आहे असे म्हणावे ? पण प्रसंगाने सांगतों; श्रवण कर. 93
294-16
उधवणीचे जेवी तोंड । उभळी धुंवाचे उभड । हे जाणिजे तेवी उघड । सांगो ते बोल ॥294॥
यांच्या बोलाचे उघड वर्णन करणे म्हणजे, धुराडाच्या तोंडातून धुराच्या लोटाशिवाय दुसरे काय निघणार आहे ? तसेच ते ठरेल हे लक्षात असू दे. 94
असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् ।
अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम् ॥16. 8॥
295-16
तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो । चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु ॥295॥
तरी विश्व हे अनादि असून त्याचा सर्वाधीश ईश्वर नियंता आहे व त्याच्या दरबारात धर्म्यक अधर्म्य ( न्याय की अन्याय ) हा निवाडा वेदनिर्णयावर अवलंबून असतो. 95
296-16
वेदी अन्यायी पडे । तो निरयभोगे दंडे । सन्यायी तो सुरवाडे । स्वर्गी जिये ॥296॥
वेदाज्ञेप्रमाणे जो अन्यायी असेल, त्याला नरकादि भोगांचा दंड भोगणे पडेल व न्यायी असेल त्याला सुखाने स्वर्गप्राप्ति होईल. 96
297-16
ऐसी हे विश्वव्यवस्था । अनादि जे पार्था । इयेते म्हणती ते वृथा । अवघेचि हे ॥297॥
अशी ही जी विश्वाची अनादि व्यवस्था अथवा घडी आहे, ती अर्जुना, हे सर्व लोक झुट किंवा व्यर्थ आहे असे म्हणतात. 97
298-16
यज्ञमूढ ठकिले यागी । देवपिसे प्रतिमालिंगी । नागविले भगवे योगी । समाधिभ्रमे ॥298॥
यज्ञाच्या व्यसनाने वेडे झालेले यागाने ठकले, देवाचे वेड लागलेले प्रतिमादिकांनी ठकले, व समाधिभ्रमाने अणवी वस्त्रे परिधान केलेल्या योग्यांना नागविलें. 98
299-16
येथ आपुलेनि बळे । भोगिजे जे जे वेटाळे । हे वाचोनि वेगळे । पुण्य आहे ? ॥299॥
ह्या जगात आपल्या सामर्थ्यावर जे जे भोगता येण्यासारखे असेल ते ते भोगण्यावाचून दुसरे कसले पुण्य आहे ? 99
300-16
ना अशक्तपणे आंगिके । वेगळवेटाळी न टके । ऐसा गादिजेवीण विषयसुखे । तेचि पाप ॥300॥
किंवा अंगच्या नेभळे पणामुळे विषयसुख साधने एकत्र करता न येऊन किंवा भोगता न येऊन जो दुःख भोगतो तेच पाप होय. 300
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २६४ वा. २१, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३१५७ ते ३१६८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३१५७
ध्यानी ध्याता पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥१॥
तेथे बोला कैची उरी । माझे मीपण झाला हरी ॥धृपद॥
चित्तचैतन्यी पडता मिठी । दिसे हरीरूप अवघी सृष्टि ॥२॥
तुका म्हणे सांगो काय । एकाएकी वृत्ति हरीमय ॥३॥
अर्थ
जो पंढरीरायाचे मनामध्ये सतत चिंतन करत असतो त्याचे मन आणि त्याचे शरीर देखील हरीरुप होते असा पालट होतो. मग तेथे बोलण्यास काहीही शिल्लक राहात नाही माझे आणि मीपण हे देखील हरीरुपच होते. चित्ताची आणि चैतन्याची मिठी पडली की सर्व सृष्टी हरीरुपच दिसू लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “मी तुम्हाला काय सांगू हरीचे ध्यान सतत केले असता वृत्ती देखील हरीमयच होऊन जाते. ”
3:11
अभंग क्र. ३१५८
देव तिळी आला । गोडे गोड जीव धाला ॥१॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥धृपद॥
पापपुण्य गेले । एका स्नानेचि खुंटले ॥२॥
तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ॥३॥
अर्थ
आज मकरसंक्रांतीचा दिवस आहे या पर्वकाळी देव तिळात आला आहे आणि जीवाचे जे मूळस्वरुप (गोड) आहे त्या गोडीमध्ये देवाची गोडी मिसळल्या गेल्यामुळे जीव अधिकच तृप्त झाला आहे. अशा प्रकारे मी आजचा पर्वकाळ साधून घेतला आहे या निमित्ताने अंत:करणातील सर्व काम क्रोधरुपी मळ गेला आहे. ज्ञानरुपी शुध्द जलाने एकदाच स्नान केले व सर्व पाप पुण्यच नाहीसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, “जनामध्ये (लोकांमध्ये) जनार्दन आहे हे मी जाणून घेतले आहे व माझी वाणी त्याबद्दल गोड व शुध्द बोलत आहे. ”
3:11
अभंग क्र. ३१५९
अन्यायासी राजा न करिता दंड । बहुत ते लंड पीडी जना ॥१॥
न करिता निगा न काढिता तन । कैची येती कण हातासी ते ॥धृपद॥
तुका म्हणे संता करू नये अनृत । पाप नाही नित विचारिता ॥२॥
अर्थ
अन्याय करणाऱ्या लोकांना जर राजाने दंड केला नाही तर ते दुष्ट लोक सामान्य लोकांना फार त्रास देतील. अहो पीक पेरले तर त्याची निगा ठेवली नाही आणि त्याच्यातील तण जर काढले नाही तर हातामध्ये धान्य येईल कसे ? तुकाराम महाराज म्हणतात, “राजा कितीही बलाढय असो परंतू संतांवर खोटा आरोप ठेवून संतांना दंड किंवा शिक्षा करु नये आणि जो खरच अन्यायी असेल पापी असेल त्याला देहदंडाची जरी शिक्षा देण्याची वेळ आली तरी दयावी याचे राजाला कोणत्याही प्रकारचे पाप लागणार नाही याउलट राजाने त्या अन्यायी व पापी मनुष्याला दंड दिला नाही तर राजाच पापी ठरतो. ”
3:12
अभंग क्र. ३१६०
काय उणे मज पांडुरंगा पायी । रिद्धिसिद्धी ठायी वोळगती ॥१॥
कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचे बापुडे नहो आम्ही ॥धृपद॥
स्वर्गसुखे आम्ही केली पावटणी । पापपुण्ये दोन्ही उलंडिली ॥२॥
तुका म्हणे घरी आणिले वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥३॥
अर्थ
अहो मी पाडूरंगाच्या पायाजवळ गेलो तर मला काय कमीपणा आहे त्या पाडूरंगाच्या पायाजवळ तर रिध्दी सिध्दी देखील दासी होऊन त्याची सेवा करत आहेत. अहो एवढे मोठे सुख सोडून नाशवंत सुखाकडे कोण पाहतोय तृष्णेने आम्ही गरीब झालेलो नाहीत. अहो आम्ही या सुखापुढे सर्व सुखाची पावटणी केली आहे पाप आणि पुण्य हे तर केव्हाच आम्ही उडवून दिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही वैकुंठच आमच्या घरी आणले आहे आणि वैष्णवांची बाजारपेठच येथे वसवली आहे. ”
3:12
अभंग क्र. ३१६१
अर्भकाचे साठी । पंते हाती धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगी । क्रिया करुनी दाविती अंगी ॥धृपद॥
बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥२॥
तुका म्हणे नांव । जनासाठी उदकी ठाव ॥३॥
अर्थ
लहान मुलांना शिकवण्यासाठी पंतोजी आपल्या हातात पाटी धरत असतात. त्याप्रमाणे संत देखील आहेत ते मुक्त आहेत परंतू सामान्य लोक मुक्त व्हावे या करता जगामध्ये वावरतात आणि चांगले कर्म करुन दाखवतात. लहान बाळकाचे हळूहळू पावल टाकणे पाहून त्याच्या चालीनुसारच आई पाऊल टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, “लोकांना पाण्यातून तरुन जाण्याकरताच नांव पाण्यामध्ये राहात असते. ”
3:12
अभंग क्र. ३१६२
सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठी विठोबाचे ॥१॥
तयाच्या चिंतने निरसले संकट । तराल दुर्घट भवसिंधु ॥धृपद॥
जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम । धरी हाचि नेम अहर्निशी ॥२॥
तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत । भावे गाता गीत विठोबाचे ॥३॥
अर्थ
जगामध्ये सार काय असार काय याचा विचार करा आणि लवकरात लवकर विठोबाचे नाम कंठात धारण करा. त्याच्या चिंतनाने म्हणजेच विठोबाच्या सतत चिंतनानेच तुमचे सर्व संकट दूर होतील नाहीसे होतील आणि दुर्गट असा भवसिंधू तुम्ही सहज तरुन जाल. अहो तुम्ही मनुष्य देहाच्या उत्तम कुळात जन्माला आला आहात तर रामाचे नामस्मरण तुम्ही तुमच्या वाचेने नित्य करत राहा आणि हाच नित्य नियम तुम्ही रात्रंदिवस धरा व त्याचे पालन करा. तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्ही जर भक्तीभावपूर्वक विठोबाचे गुणगान गायीले तर कोटीकुळे पुनीत म्हणजे पवित्र होतात. ”
3:12
अभंग क्र. ३१६३
ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥
येर जवळी ते दुरी । धेनु वत्स सांडी घरी ॥धृपद॥
गोडी प्रियापाशी । सुख उपजे येरासी ॥२॥
तुका म्हणे बोल । घडे तयाठायी मोल ॥३॥
अर्थ
ज्याला ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची इच्छा अपेक्षा असते ती गोष्ट भले तर त्याच्यापासून कितीही दूर असो परंतू मनाने ती त्याच्याजवळच राहते. नाहीतर एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती आपल्याजवळ असली आणि त्या व्यक्तीविषयी किंवा त्या गोष्टीविषयी आपल्या मनात प्रेमच नसेल तर ती व्यक्ती जवळ असून देखील दूर असल्यासारखेच आहे जसे गाय वासराला जन्म देते आणि त्या वासराला सोडून रानात चरण्यासाठी तर जाते परंतू मनाने ती त्या वासराजवळच वास करते. एखादया प्रिय व्यक्तीविषयी आपल्या अंत:करणामध्ये गोडी असते आणि त्याची भेट जर आपल्याला झाली तर त्याच्यामध्ये व आपल्यामध्ये सुख उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात, “आणि आपण अशाच व्यक्तीजवळ महत्वाचे बोल बोलत असतो. ”
3:13
अभंग क्र. ३१६४
द्रव्य घेऊनिया कथा जरी करी । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥
माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा । तरी नारायण जिव्हा झडो ॥धृपद॥
साह्य तू झालासी काय उणे तुपे । आणीक भूतांपे काय मागो ॥२॥
तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायी । तू माझा गोसावी पांडुरंगा ॥३॥
अर्थ
मी जर द्रव्य घेऊन भारी कथा करत असेल तर हे हरी त्या क्षणीच माझा देह भंग पावो. हे नारायणा, माझी कथा ठेवा, माझे कीर्तन ठेवा असे जर मी कोणाला म्हणत असेल तर त्याचवेळी माझी जीभ गळून पडो. अहो देवा तुमच्याजवळ काय उणे आहे मग तुम्ही जर मला प्रत्यक्ष साहाय्य करणारे झाले आहात मग इतर या मनुष्यांना मी काय मागू ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अरे पाडूरंगा तू माझा स्वामी आहेस सर्व सिध्दी तुझ्या पायी लोळण घेतात, तुझी सेवा करतात आणि प्रत्यक्ष तूच मला साहाय्य करत आहेस तर मग मी द्रव्य घेऊन कथा तरी का करत बसावी ? ”
3:13
अभंग क्र. ३१६५
जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हेचि ज्ञान ब्रम्ह होय ॥१॥
कोठोनिया काही न लगे आणावे । न लगे कोठे जावे तरावया ॥धृपद॥
जरी देव काही धरिल पै चित्ती । तरि हेचि होती दिव्य चक्षु ॥२॥
तुका म्हणे जरी देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाही ॥३॥
अर्थ
जर हा नारायण माझ्यावर कृपा करील तरच मला ब्रम्हज्ञान प्राप्त होईल. कोठे काही आणण्यासाठी जावेही लागणार नाही व कोठून आणावेही लागणार नाही त्यामुळे या भवसागरातून तरुन जाण्यासाठी कोठे जावे देखील लागणार नाही. जर देवाने मनात आणलेच तर माझे सामान्य डोळे देखील दिव्य चक्षू होतील. तुकाराम महाराज म्हणतात, “जर देवाने त्याचे नीजस्वरुप आपल्याला दाखवले तर जीवदशेचा बाद होईल व देहभावच नाहीसा होईल. ”
3:14
अभंग क्र. ३१६६
रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥
जीवा ही आगोज पडती आघात । येऊनिया नित्य नित्य वारू ॥धृपद॥
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे । अवघीयांचे काळे केले तोंड ॥२॥
अर्थ
अहो आम्हाला रात्रंदिवस केवळ युध्दाचाच प्रसंग असतो अंतरंगात मनाशी भांडण करावे लागते आणि बाह्यरंगात या दुष्ट लोकांशी युध्द चालू असते. अशा प्रकारे जीवावर वेगवेगळे आघात येऊन पडतात आणि त्याचा नेहमीच अगदी नेहमीच आम्हाला प्रतिकार, त्या आघातांना नष्ट करावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “परंतू देवा मी तुझ्या नामाच्या बळावर या सर्व आघातांचे तोंडच काळे केले आहे. ”
3:14
अभंग क्र. ३१६७
होईन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणी लागेन ॥१॥
आणीक दुजे काही । मी मागे न तुजपासी । आठविता सुख । भय नास नाही ज्यासी ॥धृपद॥
होइन मोचे वाहणा । पायी सकळा संतजना । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥२॥
सांडोवा पायरी । वोहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥३॥
लागे संता पायी । ऐसा ठेवी भलते ठायी । तुका म्हणे देई । धाक नाही जन्माचा ॥४॥
अर्थ
पंढरीला जाणाऱ्या मार्गामध्ये मी लहान मोठे खडे होईल, पायाला लागणारी बारीकशी धूळ देखील होईल. कारण त्या वाटेने संत नेहमी जात असतात व त्या निमित्ताने त्यांचा स्पर्श मला होईल त्यांचे पाय माझ्या अंगाला लागतील. यापेक्षा वेगळे काहीही देवा मी तुझ्याजवळ मागणार नाही. संतांचे स्मरण केले असता जे सुख प्राप्त होते ते अविनाशी सुख असते व त्या सुखामुळे भय देखील वाटत नाही. मी सर्व संतांच्या पायात घालणाऱ्या मोची (वाहाणा) होईल. एवढेच नाही तर त्यांचे उच्चिष्ट सेवन करण्यास मिळावे यासाठी मी त्यांच्याजवळ मांजर सुकर किंवा कुत्रा देखील होऊन जवळ राहीन. मी पायरी होऊन विहीरीच्या, ओढयाच्या, गंगातीराच्या ठिकाणी राहीन कारण संत तेथे येतील व त्यांचे पाय माझ्यावर ठेवतील. मग त्यांवरुन संत सज्जन चालत जातील. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा ज्या ठिकाणी मला संतांच्या पायाचा स्पर्श होईल संतांचे पाय माझ्या अंगाला लागतील अशा भलत्या ठिकाणी का होईना पण ठेव. दयायचे असेल तर हेच दान मला दे त्यामुळे मला जन्माचे कोणत्याही प्रकारचे भय किंवा धाक राहाणार नाही. ”
3:14
अभंग क्र. ३१६८
कासया व्हावे आम्ही जीवन्मुक्त । सांडुनिया थीत प्रेमसुख ॥१॥
वैष्णवाचा दास झाला नारायण । काय त्या मिळोन असो सुखी ॥धृपद॥
काय त्या गाठीचे पडले सुटोन । उगलाचि बैसोन धीर धरू ॥२॥
सुख आम्हासाठी केले हे निर्माण । निर्दैव तो कोण हाणे लाता ॥३॥
तुका म्हणे मज न लगे सायुज्यता । राहेन या संता समागमे ॥४॥
अर्थ
देवा तुझे चांगले प्रेमसुख सोडून आम्ही जीवन मुक्त कशासाठी व्हावे ? हा नारायणच जर वैष्णवाचा दास होत असेल तर मग त्याच्यामध्ये एकरुप होऊन त्याच्यात मिसळून काय सुख मिळणार आहे ? अहो आम्हाला नारायणाचे सुख आमच्या पदरात मिळाले आहे तर मग असे असताना आमच्या पदरचे असे काय हरवले आहे काय, की आम्हाला मुक्तीची अपेक्षा करावी लागेल आम्ही नारायणाचे प्रेमसुख प्राप्त व्हावे यासाठी उगाचच धीर धरुन बसून राहू. खरे तर हे सुख देवाने आमच्यासाठीच निर्माण केले आहे मग या जगात असा कोण दुर्दैवी आहे की देवाच्या प्रेमसुखाला लाथा हाणेल. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला सायुज्यमुक्ती नको आहे मी संतांच्या सहवासातच राहीन. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

