Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१९ सप्टेंबर, दिवस २६२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी २२६ ते २५० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३१३३ ते ३१४४

19 SEPTEMBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

19 SEPTEMBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“१९ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 19 September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १९ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३१३३ ते ३१४४ चे पारायण आपण करणार आहोत.
१९ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी २२६ ते २५०,

226-16
तृणाचेनि इंधने । आगी धावे गगने । थिल्लरबळे मीने । न गणिजे सिंधु ॥226॥
गवताच्या मोळीचा जाळ जसा तात्काळ आकाशात उंचवर जातो, किंवा डबक्यातील माशाला जसा सागर तुच्छ वाटतो. 26
227-16
तैसा माजे स्त्रिया धने । विद्या स्तुती बहुते माने । एके दिवसीचेनि परान्ने । अल्पकु जैसा ॥227॥
एखादे दिवशी मिळणाऱ्या परान्नावर जसे दारिद्रयाने मातावे त्याप्रमाणे, स्त्री, धन, विद्या, स्तुति, मान वगैरे क्षणिक अनुकूल गोष्टींनी जो उन्मत्त होतो. 27
228-16
अभ्रच्छायेचिया जोडी । निदैवु घर मोडी । मृगांबु देखोनि फोडी । पणियाडे मूर्ख ॥228॥
अभ्रांच्या छायेच्या प्राप्तीवर विश्वासून निदैव्याने आपले घर मोडावे, किंवा, मृगजलाची नदी पाहून मुर्खाने आपले जलसंचय फोडावे. 28
229-16
किंबहुना ऐसैसे । उतणे जे संपत्तिमिसे । तो दर्पु गा अनारिसे । न बोले घेई ॥229॥
किंबहुना, संपत्तीच्या वगैरे योगाने अशा प्रकारे डोळ्यांवर जो धूर चढतो तो दर्प म्हणावा, हे वचन मुळीच अन्यथा नव्हे. 29
230-16
आणि जगा वेदी विश्वासु । आणि विश्वासी पूज्य ईशु । जगी एक तेजसु । सूर्युचि हा ॥230॥
आणि सर्व लोकाचा वेदांच्या ठिकाणी विश्वास असून ते ईश्वर हीच जगात पूज्य वस्तु आहे, असे विश्वासाने मानितात, व जगात सर्वात तेजिष्ठ व्यक्ते एक सूर्यच होय. 230
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


231-16
जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौमपद । न मरणे निर्विवाद । जगा पढिये ॥231॥
जगांतील लोकांच्या इच्छेची सीमा म्हणजे एक सार्वभौम, (पृथ्वीची मालकी) पद हीच होय; तसेच केव्हांही मरण येऊ नये हीच सर्वाची नित्य इच्छा असते. 31
232-16
म्हणौनि जग उत्साहे । याते वानू जाये । की ते आइकोनि मत्सरु वाहे । फुगो लागे ॥232॥
वगैरे कारणांस्तव वेदाची व ईश्वराची थोरवी कोणी वर्णन करू गेल्यास ज्याच्या चित्तांत मत्सर उत्पन्न होऊन जो स्वतःबद्दलच्या प्रतिष्ठेच्या बुद्धीने फुगतो. 32
233-16
म्हणे ईश्वराते खाये । तया वेदा विष सूये । गौरवामाजी त्राये । भंगीत असे ॥233॥
आणि म्हणतो-ईश्वर वगैरे आम्ही गिळून बसलो आहो, वेद वगैरे आम्ही मारून टाकले आहेत, व श्रेष्ठांतील श्रेष्ठ रक्षण करणाराचाही आम्ही पराभव करू. 33
234-16
पतंगा नावडे ज्योती । खद्योता भानूची खंती । टिटिभेने आपांपती । वैरी केला ॥234॥
पतंग ज्याप्रमाणे दीपज्योतीचा द्वेष करितो, काजवा जसा सूर्यप्रकाशाचा तिटकारा करितो, किंवा टिटवीने जसा समुद्राशी वैरभाव जोडावा. 34
235-16
तैसा अभिमानाचेनि मोहे । ईश्वराचेही नाम न साहे । बापाते म्हणे मज हे । सवती जाली ॥235॥
त्याप्रमाणे अभिमानाच्या भरी भरून ज्याला ईश्वराचे नांव घेतलेलेही (सामर्थ्यवान् म्हणून) सहन होत नाही किंवा जो स्वत:च्या पित्यालाही हा जेथे तेथे एक सवतीप्रमाणे प्रतिबंधच आहे असे मानितो. 35


236-16
ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु । रौरवाचा रूढु । मार्गुचि पै ॥236॥
असा फाजील मानाच्या भावनेने खुंटयाप्रमाणे ताठ झालेला व अभिमानाने कोणासही न लेखणारा जो, तो खरोखर नरक प्राप्तीचा सीधा रस्ताच होय. 36
237-16
आणि पुढिलांचे सुख । देखणियाचे होय मिख । चढे क्रोधाग्नीचे विख । मनोवृत्ती ॥237॥
आणि दुसरा सुखी आहे असे पहातांच ज्याचे मन क्रोधाग्निविषाने संतप्त होते. 37
238-16
शीतळाचिये भेटी । तातला तेली आगी उठी । चंद्रु देखोनि जळे पोटी । कोल्हा जैसा ॥238॥
उकळणारे तेलांत थंड पाणी टाकले असता जसा भडका उडतो किंवा चंद्रोदय पाहून कोल्हा जसा मनात तडफडतो. 38
239-16
विश्वाचे आयुष्य जेणे उजळे । तो सूर्यु उदैला देखोनि सवळे । पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ॥239॥
ज्याच्या उदयानं सर्वं विश्वाचे व्यापार सुरू होतात, तो प्रातःकाळ येतांच पापी घुबडाचे जसे डोळे फुटतात ! (त्यास दिसेनासे होते ) 39
240-16
जगाची सुखपहांट । चोरा मरणाहूनि निकृष्ट । दुधाचे काळकूट । होय व्याळी ॥240॥
रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटेचा काळ साऱ्या जगास सुखकर वाटतो खरा; पण तोच चोरांना प्राणसंकटाचा वाटतो किंवा, दुधा सारखा पवित्र व मिष्ट पदार्थही सापास पाजिला असता जसे विष बनते. 240
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


241-16
अगाधे समुद्रजळे । प्राशिता अधिक जळे । वडवाग्नी न मिळे । शांति कही ॥241॥
अगाध अशा सागराच्या पोटातही वडवानल अधिकच भडकतो व त्याला जशी कधी शांति लाभत नाही. 41
242-16
तैसा विद्याविनोदविभवे । देखे पुढिलांची दैवे । तव तव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ॥242॥
त्याप्रमाणे दुसऱ्याचे विद्या, विनोद, ऐश्वर्य व सौभाग्य जो जो दृष्टीस पडेल तो तो ज्याचा राग वाढतो तो “क्रोध” होय असे समज. 42
243-16
आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी । बोलणे ते वृष्टी । इंगळांची ॥243॥
ज्याचे मन म्हणजे जणु सर्पाचे वसतिस्थान होय, ज्याची दृष्टि बाणाग्रांसारखी तीक्ष्ण (असहिष्णु) व ज्याचे भाषण जणु अग्निवर्षाव होय. 43
244-16
येर जे क्रियाजात । ते तिखयाचे कर्वत । ऐसे सबाह्य खसासित । जयाचे गा ॥244॥
ज्याच्या इतर क्रिया म्हणजे पोलादी करवताप्रमाणे कांपणाऱ्या, असे ज्याचे अंतर्बाह्य व्यापार दुसऱ्याला झोंबणारे असतात. 44
245-16
तो मनुष्यात अधमु जाण । पारुष्याचे अवतरण । आता आइक खूण । अज्ञानाची ॥245॥
तो पारुष्याची (काठिण्य) मूर्ती असून मनुष्यातील अधम मनुष्य होय असे जाण. आता अज्ञानाची लक्षणे सांगतो, ती श्रवण कर. 45


246-16
तरी शीतोष्णस्पर्शा । निवाडु नेणे पाषाणु जैसा । का रात्री आणि दिवसा । जात्यंधु तो ॥246॥
तरी शीत किंवा उष्ण स्पर्शाची दगडाला जशी भिन्नत्वाते जाण नसते किंवा रात्र आणि दिवस हा भेद जात्यंधाला जसा ज्ञात नसतो. 46
247-16
आगी उठिला आरोगणे । जैसा खाद्याखाद्य न म्हणे । का परिसा पाडु नेणे । सोनया लोहा ॥247॥
अग्नि भडकल्यावर त्याला जसा भक्ष्य काय किंवा अभक्ष्य काय हा विचार नसतो किंवा सोने व लोखंड हा भेद जसा परिसाला माहित नसतो. (भेद पहाण्यासाठी स्पर्श होताच लोह लोहत्वाला मुकते म्हणून). 47
248-16
नातरी नानारसी । रिघोनि दर्वी जैसी । परी रसस्वादासी । चाखो नेणे ॥248॥
किंवा अनेक प्रकारच्या रसांत प्रवेशूनही पळी जशी त्यातील एकाहि रसाची चव जाणत नाही. 48
249-16
का वारा जैसा पारखी । नव्हेचि गा मार्गामार्गविखी । तैसे कृत्याकृत्यविवेकी । अंधपण जे ॥249॥
किंवा वाऱ्याला वाहतांना मार्गाच्या योग्यायोग्यतेची जशी परीक्षा नसते, तसे कर्तव्य काय की अकर्तव्य काय इत्यादि विवेक ज्याला कधीही शिवत नाही असा अंध असतो. 49
250-16
हे चोख हे मैळ । ऐसे नेणोनिया बाळ । देखे ते केवळ । मुखीचि घाली ॥250॥
हे चांगलं, हे घाणेरडे वगैरे काहीही न जाणता बालक जसे हाताला लागेल ते तोंडात घालते. 250
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २६२ वा. १९, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३१३३ ते ३१४४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३१३३
कोण आमची योगतपे । करू बापे जाणावी ॥१॥
गीत संतसंगे गाऊ । उभी ठाऊ जागरणी ॥धृपद॥
आमुचा तो नव्हे लाग । करू त्याग जावया ॥२॥
तुका म्हणे इंद्रियांसी । येचि रसी रंगवू ॥३॥
अर्थ
योग तपे करण्याचे जाणतात असे कोण आमचे बाप आहेत ? संतांच्या संगतीत आम्ही हरीनामाचे गीत गाऊ आणि हरी कीर्तनाच्या जागरणामध्ये आम्ही उभे राहू. सर्व गोष्टीचा त्याग करुन निघून जावे एवढे आमच्याच्याने शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही आमच्या इंद्रियांना हरीनाम गीत गाणे तसेच हरी कीर्तनामध्ये उभे राहाणे या रंगामध्येच रंगून टाकू. ”
3:07

अभंग क्र. ३१३४
आम्हा वैष्णवाचा कुळधर्म कुळीचा । विश्वास नामाचा एका भावे ॥१॥
तरीच हरीदास म्हणविता श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥धृपद॥
गाऊ नाचूं प्रेमे आनंदे कीर्तनी । भक्ति मुक्ति दोन्ही न मगो तुज ॥२॥
सगुण निर्गुण एकची आवडी । चित्ते दिली बुडी चिदानंदी ॥३॥
वृत्तिसहित मन रिघे प्रेम डोही । नाठविती देही देहभाव ॥४॥
तुका म्हणे देवा ऐसीयांची सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मी ॥५॥
अर्थ
एकनिष्ठेने आणि किंचितही मनात संदेह न ठेवता नामावर विश्वास ठेवणे आणि त्याच विश्वासाने नाम घेणे हा आम्हा वैष्णवाचा कुळाचा धर्म आहे. स्वतःला आनंदाने हरिदास म्हणण्याआधी मन निस्पृह आणि वासनारहित करा आणि मग तसे करण्यात धन्यता माना. आम्ही आनंदाने आणि प्रेमाने तुझ्या कीर्तनांत नाचू गाऊ आणि तुझ्यापाशी भुक्ति म्हणजेच रिद्धी आणि सिद्धी म्हणजेच कसल्याही प्रकारचे भोग आणि मोक्ष आम्ही मागणार नाही. तुझे सगुण किंवा निर्गुण कोणतेही रूप असो आम्हाला फक्त त्यापलीकडच्या तुझ्या एकाचीच आवड आणि ओढ आहे आणि तुझ्या कृपेने लाभलेल्या त्या परम आनंदात आमच्या चित्ताने कधीच बुडी घेतली आहे. एवढेच नव्हे तर वृत्तिसहित मनाने देखील त्या प्रेमडोहात प्रवेश केला आहे जेणेकरून आम्ही आमचे पूर्णपणे देहभान हरपून गेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात आमची अशी अवस्था झाली असून ज्या कोणाची अशीच अवस्था झाली असेल त्यांची सेवा करण्याची संधी जन्मोजन्मी आम्हाला मिळावी हेच केशवा आता आमचे तुमच्याकडे मागणे आहे.
3:07

अभंग क्र. ३१३५
उदंड पाहिले उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर । ऐसा विटे वरी देव कोठे ॥धृपद॥
ऐसे संतजण ऐसे हरीदास । ऐसा नाम घोष सांगा कोठे ॥२॥
तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे । पंढरी निर्माण केली देवे ॥३॥
अर्थ
अहो आम्ही खूप क्षेत्र पाहिले खूप क्षेत्रांच्या महिमेचे वर्णन देखील ऐकलेले आहे, परंतु अशी चंद्रभागा असे भीमा तीर आणि असा विटेवर उभा असलेला देव कोठे आहे ? असे संतजन असे हरिदास आणि असा नाम घोष कोठे आहे ते सांगा ? तुकाराम महाराज म्हणतात आम्हा अनाथांसाठी देवाने पंढरी हे क्षेत्र निर्माण केले आहे.
3:07

अभंग क्र. ३१३६
पावलो हा देह कागटाळी न्याये । न घडे उपाये घडो आले ॥१॥
आता माझी खंडी देह देहांतरे । अभय दातारे देऊनिया ॥धृपद॥
अंधळ्याचे पाठी धनाची चरवी । अघटित तेवि घडो आले ॥२॥
तुका म्हणे योग घडला बरवा । आता कास देवा न सोडी मी ॥३॥
अर्थ
देवा काकताल न्याया प्रमाणे म्हणजे आंधळयाच्या टालीत जशा कावळा अचानक सापडावा त्याप्रमाणे मला हा देह अकस्माक सापडला आहे. कोणत्याही उपायाने जे होणे शक्य नाही ते अचानकच आज घडले आहे. हे दातारा मला तुम्ही असे अभयदान दयावे की यापुढे मी कोणत्याही प्रकारचे देह धारण करणार नाही यापुढे देह धारण करण्याची प्रथाच तुम्ही खंडित करावी. आंधळयाच्या पायाला अचानकच धनाची चरबी लागावी तसाच प्रकार मला मनुष्य देह प्राप्त झाल्यावर कळून आला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला मनुष्य देह अपसूकच प्राप्त होण्याचा योग चांगलाच घडून आला आहे आता तुमची कास मी कधीही सोडणार नाही. ”
3:07

अभंग क्र. ३१३७
सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदे ॥१॥
ऐसे तव तुम्ही नाही जी दिसत । का हे अनुचित वदलेती ॥धृपद॥
फाटा झाला त्यासी नाही वोढा वारा । बेरसाचा खरा हा तो गुण ॥२॥
तुका म्हणे नाही ज्याच्या बापा ताळ । तो देखे विटाळ संता अंगी ॥३॥
अर्थ
ज्येष्ठ श्रेष्ठ असो अधम लोकांची कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवणे, त्यांची कोणत्याही प्रकारची लोक मर्यादा न धरणे हे अधम लोकांचे चाळेच असतात जसा मद्यपी त्यांच्या छंदामध्ये भलतेच काहीतरी बरळत असतो अगदी त्याप्रमाणे. हे जणहो तुम्ही तर असे दिसत नाही मग असे अयोग्य तुम्ही का बोलत आहात ? वाटेल तसे बडबडणे, कोणत्याही प्रकारचे तारतम्य नसणे, जसे तोंडात येईल तसे ओरडणे हा तर गुणधर्म गाढवाचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याला स्वत:च्या बापाचाच ताळमेळ नाही त्यालाच संतांच्या अंगी विटाळ म्हणजे कोणत्याही प्रकारचे दोष दिसत असतात. ”
3:07

अभंग क्र. ३१३८
आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहाता लोचन सुखावले ॥१॥
आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे । जो मी तुज पाहे पांडुरंगा ॥धृपद॥
लांचावले मन लागलीसे गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झाले ॥२॥
तुका म्हणे आम्ही मागावी लडिवाळी । पुरवावी आळी मायबापे ॥३॥
अर्थ
हे हरी तुझे गोजिरे सगुण रुप मला फार आवडते ज्यावेळी माझ्या डोळयाने तुझे गोजिरे सगुण रुप मी पाहिले त्यावेळी माझे डोळे फार सुखावले आहेत. हे पाडूरंगा जोपर्यंत मी तुला माझ्या दृष्टीने पाहात आहे तोपर्यंत असाच माझ्या दृष्टीपुढे तू उभा रहा. देवा माझे मन तुझे गोजिरे सगुण रुप पाहाण्यासाठी लाचवले आहे. माझ्या मनाला तुझ्या गोजिऱ्या सगुण रुपाची गोडी लागली आहे आणि तेच गोजिरे सगुण रुप माझा जीव कधीही सोडणार नाही असेच झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही तुमची लाडकी लेकरे आहोत आम्ही लाडाने तुम्हाला काहीही मागावे आणि तुम्ही आमचे हट्ट पूर्ण करावेत हेच योग्य आहे. ”
3:07

अभंग क्र. ३१३९
तिळ एक अर्ध राई । सीतबिंद पावे काई । तया सुखा नाही । अंतपार पाहता ॥१॥
म्हणउनी करा लाहो । नका मागे पुढे पाहो । अवघ्यामध्ये आहो । अवघे साव चित्त तो ॥धृपद॥
तीर्थे न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे काशी गयेहुनी । जी आगळी असती ॥३॥
येथे धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका म्हणे तो येथे ॥३॥
अर्थ
पंढरीत जे सुख आहे त्याच्या तुलनेत एक तिळभर देखील किंवा अर्ध्या राई इतके किंवा पाण्याच्या एका थेंबा एवढे देखील सुख अन्य तीर्थक्षेत्री प्राप्त होत नाही किंबहुना पाहता असे आढळून येते की तेथे मिळणाऱ्या सुखाला काही पारावारच उरत नाही आणि त्या सुखाचा अंत पण मोजता येत नाही. तुम्ही सर्वानी त्वरा करा आणि काहीही मागचा पुढचा विचार न करता पंढरीला भेट द्या. तेथे सर्व जणांमध्ये तुम्हाला तो सावचित्त म्हणजेच सावळे परब्रम्‍ह प्रत्ययास येईल. अशा या पंढरीची इतर कोणत्याही तीर्थक्षेत्राशी तुलना करता येत नाही मग ते काशी असो किंवा गया किंबहुना पंढरी ही त्यांच्यापेक्षा कितीतरी आगळी वेगळी आणि विलक्षण असून तेथे येणारे सर्व भक्त खऱ्या अर्थाने सुखाचे धनी होतात. तुकाराम महाराज म्हणतात परंतु अशा ठिकाणी जो कोणी वर्ण अभिमान मानून मनात लाज धरेल, संदेह बाळगेल तो सहज नाडला गेलाच म्हंणून समजा, त्याला पूर्णपणे विपरीत अनुभव आलाच म्हणून समजा.
3:07

अभंग क्र. ३१४०
विठोबाचे नाम ज्याचे मुखी नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरती ॥१॥
विठ्ठलविठ्ठल भावे म्हणे वाचे । तरी तो काळाचे दात ठेंची ॥धृपद॥
बहुत तारिले सांगो किती आता । ऐसा कोणी दाता दुजा नाही ॥२॥
तुका म्हणे म्या ही ऐकोनिया कीर्ती । धरिला एकांती हृदयामाजी ॥३॥
अर्थ
ज्याच्या मुखामध्ये विठोबाचे नाम निरंतर आहे त्याचे मुख जरी पाहिजे तरी पतित मनुष्य तरुन जातात. विठ्ठल विठ्ठल असे भक्तीभावपूर्वक जो आपल्या वाचेने म्हणेल तो काळाचे देखील दात नक्कीच ठेचील. अहो या विठोबाने अशा कित्येक पतित भक्तांचा उध्दार केला आहे केवळ त्या भक्तांनी नाम घेतले म्हणून. या त्रिभुवनामध्ये विठोबावाचून दुसरा उदार दाता कोणीही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मी या विठोबाची आणि त्याच्या नामाची किर्ती यापूर्वी खूप ऐकली आहे त्यामुळेच तर मी एकातात जाऊन त्या विठोबाला व त्याच्या नामाला माझ्या ह्दयामध्ये धारण केले आहे. ”
3:08

अभंग क्र. ३१४१
आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥१॥
ऐशी दुर्जनसंगती । बहुतांचे घात होती ॥धृपद॥
एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥२॥
तुका म्हणे रांड । ऐसी का ते व्याली भांड ॥३॥
अर्थ
ज्याच्या मुखामध्ये विठोबाचे नाम निरंतर आहे त्याचे मुख जरी पाहिजे तरी पतित मनुष्य तरुन जातात. विठ्ठल विठ्ठल असे भक्तीभावपूर्वक जो आपल्या वाचेने म्हणेल तो काळाचे देखील दात नक्कीच ठेचील. अहो या विठोबाने अशा कित्येक पतित भक्तांचा उध्दार केला आहे केवळ त्या भक्तांनी नाम घेतले म्हणून. या त्रिभुवनामध्ये विठोबावाचून दुसरा उदार दाता कोणीही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मी या विठोबाची आणि त्याच्या नामाची किर्ती यापूर्वी खूप ऐकली आहे त्यामुळेच तर मी एकातात जाऊन त्या विठोबाला व त्याच्या नामाला माझ्या ह्दयामध्ये धारण केले आहे. ”
3:08

अभंग क्र. ३१४२
पंढरीचे भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥
बहु खेचरीचे रान । जाता वेडे होय मन ॥धृपद॥
तेथे जाऊ नका कोणी । गेले नाही आले परतोनि ॥२॥
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाही आला ॥३॥
अर्थ
पंढरीचे भूत फार मोठे आहे वाटेने येणाऱ्या जाणाऱ्याला ते तेव्हाच झपाटून टाकते. पंढरी क्षेत्रातील रान हे खूप खेचरीचे आहे तेथे जे कोणी येतात जातात त्यांचे मन वेडे होऊन जाते. त्यामुळे तेथे कोणी जाऊ नका आणि जे पंढरीला गेलेत ते संसारात पुन्हा कधीही परतून मागे आलेच नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, “मी देखील पंढरीला गेलो आणि पुन्हा जन्मालाच आलो नाही. ”
3:08

अभंग क्र. ३१४३
काय करू आता या मना । न संडी विषयांची वासना ।
प्रार्थितांही राहेना । आदरे पतना नेऊ पाहे ॥१॥
आता धावधावे गा श्रीहरी । गेलो वाया नाही तरी ।
न दिसे कोणी आवरी । आणीक दुजा तयासी ॥धृपद॥
न राहे एके ठायी एकी घडी । चित्त तडतडा तोडी ।
भरले विषय भोवडी । घालू पाहे उडी भवडोही ॥२॥
आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणी ।
तुका म्हणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी ॥३॥
अर्थ
या मनाला आता काय करावे कारण हे मन विषयांची वासनाच सोडत नाहीये. अहो या मनाला कितीही आदरपूर्वक समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते विषयांकडे ओढ घेण्याचे काही राहीना आणि विषयांचा लोभ मला दाखवून पतनाला देखील हे मन नेऊ पाहात आहे. त्यामुळे हे श्रीहरी तू लवकर अति लवकर माझ्याकडे धावत ये नाहीतर मी वायालाच जाईन. अहो देवा माझ्या मनाला आवर घालण्यासाठी तुझ्यावाचून दुसरा कोणीही मला समर्थ दिसत नाही. माझे मन एक क्षण देखील एका ठिकाणी राहात नाही माझे चित्त मला तडा तडा तोडीत आहे. माझे मन विषयांच्या भोवऱ्यामध्ये गुंतले आहे आणि भवडोहामध्ये ते उडी घेऊ पाहाते. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा, तृष्णा, कल्पना या पापींनीनी माझा घात करायचे ठरवले आहे. “हे चक्रपाणी मी तुला इतकी तळमळ करुन सांगतो आहे मग मला मदत करायचे सोडून तू अजून माझी गंमत काय पाहतो आहेस ? ”
3:08

अभंग क्र. ३१४४
पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा ॥१॥
सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥धृपद॥
ऐंशी सहस्र जया सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥२॥
पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥३॥
चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण ॥४॥
तुका म्हणे ज्याचे देव बांदवडी । सांगाते कवडी गेली नाही ॥५॥
अर्थ
रावणाच्या लंकेमध्ये परीसाचे दगड होते जांबुनद नावाचा मौल्यवान रत्नाची भूमी होती आणि रावणाच्या वंशाचा संबंध ब्रम्हदेवाच्या वंशाशी होता. संपूर्ण लंकापुरी सोन्याची होती लंकेला समुद्राचा वेढा होता तेथे कोणालाही प्रवेश करणे शक्य नव्हते अशा या लंकापुरीमध्ये बलाढय राक्षसांचा प्रचंड समुदाय होता. रावणाच्या ऐंशी हजार सुंदर राण्या होत्या त्यामध्ये मुख्य मंदोदरी होती. अहो रावणाच्या मुलांचा व नातवंडाचा लेखाजोखा करणे अशक्य होते परंतू त्यामध्ये मुख्य पुत्र जो रावणाचा होता त्याने इंद्राला देखील युध्दामध्ये पराजित केले त्यामुळे त्याचे नांव इंद्रजित ठेवण्यात आले. चार युगांची मिळून एक चौकडी अशा चौदा चौकडयांचे मिळून आयुष्याची गणना रावणाला होती. आणि त्याच्यामागे कुंभकर्णासारखे बलाढय बंधूवर्ग होते. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याने देव बंदी केला अशा रावणाच्याबरोबर मेल्यानंतर एक कवडी देखील गेली नाही. ”

सप्टेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version