Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१८ सप्टेंबर, दिवस २६१ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी २०१ ते २२५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३१२१ ते ३१३२

18 SEPTEMBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

18 SEPTEMBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“१८ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 18 September
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १८ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३१२१ ते ३१३२ चे पारायण आपण करणार आहोत.
१८ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी २०१ ते २२५,

201-16
तैसी बांधिली सोडिता । बुडाली काढिता । सांकडी फेडिता । आर्ताचिया ॥201॥
त्याप्रमाणे बद्धांना मुक्त करणारा, बुडणारांचा उद्धार करणारा, व संकटग्रस्तांचे संकट निवारण करणारा. 1
202-16
किंबहुना दिवसराती । पुढिलांचे सुख उन्नति । आणित आणित स्वार्थी । प्रवेशिजे ॥202॥
किंबहुना स्वार्थाच्या व्यापारांत रत असतांनाही सभोवारच्या जीवांच्या सुखाचे व उन्नतीचे ज्याच्या चित्तांत नित्य चिंतन चालू असते. 2
203-16
वाचूनि आपुलिया काजालागी । प्राणिजाताच्या अहितभागी । संकल्पाचीही आडवंगी । न करणे जे ॥203॥
किंवा आपला कार्यभाग साधण्यासाठी दुसऱ्यांचे यत्किंचितही अहित करावे असा नुसता संकल्पही ज्याला शिवत नाही. 3
204-16
पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी । ते सांगितले हे दिठी । पाहो ये तैसे ॥204॥
अर्जुना, अशी वागणूक जेथे दिसेल अगर ऐकू येईल ते “अद्रोहत्व” होय असे तुला पटण्यासारखे सांगितले. 4
205-16
आणि गंगा शंभूचा माथा । पावोनि संकोचे जेवी पार्था । तेवी मान्यपणे सर्वथा । लाजणे जे ॥205॥
आणि, अर्जुना, गंगेला शंकरांनी आपल्या जटेत धारण करून जिरविल्यावर तिच्या स्वतःच्या वेगाचा गर्व जसा हरण झाला व ती जशी लज्जित झाली, तसा लोकांनी अतिशय मानमान्यता केली असता जो चित्तांत संकोच पावतो. 5


206-16
ते हे पुढत पुढती । अमानित्व जाण सुमती । मागा सांगितलेसे किती । तेचि ते बोलो ॥206॥
इत्यादि जे वर्तन हेच अमानित्व होय; अर्जुना मागे ह्याचे दिग्दर्शन आले आहेच; पुन्हा तेच ते सांगणे कशाला ? 6
207-16
एवं इही सव्विसे । ब्रह्मसंपदा हे वसत असे । मोक्षचक्रवर्तीचे जैसे । अग्रहार होय ॥207॥
ह्याप्रमाणे सव्वीस प्रकारची ही दैवी किंवा ब्रह्मसंपत्ति आहे व ती मोक्षसम्राटांचे जणू वतनच होय. 7
208-16
नाना हे संपत्ति दैवी । या गुणतीर्थांची नीच नवी । निर्विण्णसगरांची दैवी । गंगाचि आली ॥208॥
किंवा, नित्य नवे वाटावे अशा ह्या सव्वीस पवित्र गुणरूपांची ही दैवी संपत्ति म्हणजे वैराग्यरूपी सगरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी जणू गंगाच अवतरली आहे ! 8
209-16
की गणकुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा । वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ॥209॥
किंवा ही मुक्ति नवरी ह्या सव्वीस गुणरूपी पुष्पांची माला घेऊन वैराग्यादि साधनांनी संपन्न असलेल्या वराच्या गळ्यात ती घालावी म्हणून जणू त्याचा शोधच करीत आहे ! 9
210-16
की सव्विसे गुणज्योती । इही उजळूनि आरती । गीता आत्मया निजपती । नीरांजना आली ॥210॥
किंवा ह्या सव्वीस गुणरूप ज्योतींनी युक्त अशी आरती घेऊन; आपला पति जो आत्मराज त्याला ओवाळण्यासाठ गीता ते ताट घेऊन पुढे आली आहे. 210
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


211-13
उगळिते निर्मळे । गुण इयेचि मुक्ताफळे । दैवी शुक्तिकळे । गीतार्णवीची ॥211॥
गीतारूप समुद्रांतील शिंपल्यातून ही दैवीसंपत्तिरूप मुक्ताफळेच जणु बाहेर पडली आहेत. 11
212-16
काय बहु वानू ऐसी । अभिव्यक्ती ये अपैसी । केले दैवी गुणराशी । संपत्तिरूप ॥212॥
ह्या दैवीसंपत्तीरूप गुणराशीचे अधिक स्पष्ट असे स्वरूप बोलून किती म्हणून वर्णन करावे ? 12
213-16
आता दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली । तरी निजाभिधानी घाली । आसुरी ते ॥213॥
आता, अंतर्बाह्य दुःखरूप असलेली व दोषादि कंटकांनी युक्त असलेली अशी जरी आसुरी संपत्ति असली तरी, तीही तुला माहीत असू दे. 13
214-16
पै त्याज्य त्यजावयालागी । जाणावी जरी अनुपयोगी । तरी ऐका ते चांगी । श्रोत्रशक्ती ॥214॥
कारण, ती त्याज्य व निरुपयोगी अशी जरी असली तरी जिचा त्याग करावयाचा तिची लक्षणेही चांगल्या प्रकारे ऐकलेली पाहिजेतच. 14
215-16
तरी नरकव्यथा थोरी । आणावया दोषीघोरी । मेळु केला ते आसुरी । संपत्ति हे ॥215॥
तरी जीवांना घोर नरकव्यथा प्राप्त करून देण्यासाठी जे घोर दोष एकत्र जमून त्यांचा मेळावा झाला, ती ही “आसुरी” संपत्ति होय. 15


216-16
नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु । आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा ॥216॥
जगांतील सर्व विषांचे एकीकरण म्हणजे एक “कालकूट” विष म्हणावे त्याप्रमाणे जगांतील सर्व दोषांचे एकत्रीकरण ती ही आसुरी संपत्ति होय. 16
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥16. 4॥
217-16
तरी तयाचि असुरा । दोषांमाजी जया वीरा । वाडपणाचा डांगोरा । तो दंभु ऐसा ॥217॥
तरी, अर्जुना, ह्या दोषयुक्त आसुर संपत्तीमध्ये जो प्रमुख म्हणून गणला जातो असा जो दंभ तो असा असतो. 17
218-16
जैसी आपुली जननी । नग्न दाविलिया जनी । ते तीर्थचि परी पतनी । कारण होय ॥218॥
आपल्या जननीचे स्मरण केव्हांही पवित्रच होय; पण, तेच जनांत तिच्या आंगच्या दोषाविष्करणाच्या निमित्ताने केले असता जसे पतनाला कारण होते. 18
219-16
का विद्या गुरूपदिष्टा । बोभाइलिया चोहटा । तरी इष्टदा परी अनिष्टा । हेतु होती ॥219॥
किंवा गुरूपासून प्राप्त झालेली गुह्यविद्या चव्हाट्यावर उघडी मांडली असता, ती मूळची हितकारिणी खरी, पण तीच अनिष्टाला कारणीभूत होते. 19
220-16
पै आंगे बुडता महापूरी । जे वेगे काढी पैलतीरी । ते नांवचि बांधिलिया शिरी । बुडवी जैसी ॥220॥
जिचे स्वतःचे बहुतेक अंग पुरांत अगर पाण्यात बुडालेले असते तरी जी वेगाने पैलतीराला पोंचविते ती नावच डोक्यावर घेऊन पाण्यात शिरणारा जसा निश्चित बुडणार. 220
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


221-16
कारण जे जीविता । ते वानिले जरी सेविता । तरी अन्नचि पंडुसुता । होय विष ॥221॥
जीवन रक्षण करणारे म्हणून अन्न सेवनसमयी स्तुतियोग्य असले, तरी अर्जुना, तेच प्रमाणाबाहेर सेवन केले असता विषाप्रमाणे बाधक होते. 21
222-16
तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा । तरी तारिता तोचि दोखा- । लागी होय ॥222॥
त्याचप्रमाणे इहपरलोकींचा सखा असा जो स्वधर्म घडेल त्याची चव्हाटयावर टिमकी वाजविल्यास तोच पतनाला कारणीभूत होतो. 22
223-16
म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा । धर्मुचि तो अधर्मु होय वीरा । तो दंभु जाणे ॥223॥
म्हणून आचरलेल्या धर्माचा स्वत:च्या वाचेने डांगोरा अगर प्रसिद्धि करीत बसले असता त्यालाच अधर्माचे फल प्राप्त होतें; व अर्जुना, दंभ म्हणतात तो हाच होय. 23]
224-16
आता मूर्खाचिये जिभे । अक्षरांचा आंबुखा सुभे । आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा ॥224॥
आता, मुर्खाला चार अक्षरे येत झाली की तो जसा ब्रह्मसभेलाही तुच्छ लेखतो ! 24
225-16
का मादुरी लोकाचा घोडा । गजपतिही मानी थोडा । का कांटियेवरिल्या सरडा । स्वर्गुही नीच ॥225॥
किंवा एखाद्या शिलेदाराला आपला घोडा गजराजापेक्षाही श्रेष्ठ आहे असे वाटावे, किंवा, काट्यांच्या वईवरील सरडयाला आपण आकाश पायांखाली आणिले असे वाटावे, 25

दिवस २६१ वा. १८, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३१२१ ते ३१३२
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ३१२१
हरी तुझे नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणे काही ॥१॥
अंतरी विश्वास अखंड नामाचा । कायामने वाचा हेचि देई ॥२॥
तुका म्हणे आता देई संतसंग । तुझे नामी रंग भरो मना ॥३॥
अर्थ
हे हरी मी तुझे नाम अखंड गात राहीन यावाचून दुसरे काही म्हणजे तर्क कुतर्काचे पाखंड करणे मी जाणत नाही. देवा माझ्या अंत:करणात तसेच कायावाचामनात देखील नामाविषयी अखंड विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच टिकून राहवे याच प्रकारचे दान तुम्ही मला दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही मला संत संगती घडू द्यावी आणि तुमच्या नामाचाच रंग माझ्या मनामध्ये भरुन राहावा असे करा. ”
3:04

अभंग क्र. ३१२२
करणे ते हेचि करा । नरका अघोरा का जाता ॥१॥
जयामध्ये नारायण । शुद्धपण ते एक ॥धृपद॥
शरणागता देव राखे । येरा वाखे विघ्नाचे ॥२॥
तुका म्हणे लीन व्हावे । कळे भावे वर्म हे ॥३॥
अर्थ
अहो तुम्हाला काही करायचेच असेल तर मी जे सांगतो ते तुम्ही करा उगाचच घोर नरकाला तुम्ही का जाता ? तुम्ही कोणतेही कर्म करा परंतू ते जर नारायणाला उद्देशून तुम्ही केले तर तेच एक शुध्द पुण्य होईल. देव त्याला शरण आलेल्या दासांचे रक्षण करतो इतरांना अनेक विघ्नांना, संकटांना सामोरे जावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “जर तुम्हाला पुण्य कमवायचेच असेल तर त्यासाठी एक वर्म आहे ते म्हणजे सर्वत्र एक नारायण आहे ही संकल्पना दृढ ठेवावी सर्वासमोर लीन व्हावे. ”
3:05

अभंग क्र. ३१२३
आणीक नका करू चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी ॥१॥
सुखे करा हरीकथा । सर्वथा हे तारील ॥धृपद॥
अनाथाचा नाथ देव । अनुभव सत्य हा ॥२॥
तुका म्हणे बहुता रिती । धरा चित्ती सकळ ॥३॥
अर्थ
हे लोकांनो तुम्ही इतर कोणतेही क्षुद्र व्यवहार करु नका त्यामुळे तुम्ही केवळ दु:खीच व्हाल. तुम्ही सुखासुखी हरीकथा करा मग तो हरी तुम्हाला सर्वथा या भवसागरातून तारेन. देव अनाथांचा नाथ आहे हा सत्य अनुभव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हाच उपदेश आम्ही विविध रितीने लोकांना समजून सांगतो व तोच उपदेश तुम्ही सर्वतोपरी चित्तामध्ये धारण करा. ”
3:05

अभंग क्र. ३१२४
सेट्या ना चौधरी । पाडेपण वाहे शिरी ॥१॥
जकातीचा धंदा । तेथे पाप वसे सदा ॥२॥
गाई म्हैसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥३॥
तुका म्हणे पाही । तेथे पुण्या रीघ नाही ॥४॥
अर्थ
जो मनुष्य नर शेटही नसतो आणि नेमलेला चौधरीही नसतो परंतू विनाकारणच गावचा कारभार आपल्या माथ्यावर घेऊन फिरतो तो मूर्खच आहे असे समजावे. ज्याचा धंदा जकातीचा म्हणजे कर वसुलीचा आहे त्याच्या जवळ अखंड पापच रहात असते. जो व्यापारी गाई म्हशीचे खिलार त्याप्रमाणे त्यांचे तूप विकतो तो वाईट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी वर ज्या गोष्टी सांगितल्या तेथे कधीही पुण्याला प्रवेश मिळणार नाही. ”
3:05

अभंग क्र. ३१२५
मागे बहुत झाले खेळ । आता बळ वोसरले ॥१॥
हालो नये चालो आता । घट रिता पोकळ ॥धृपद॥
भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥२॥
तुका म्हणे पाहता घडी । जगा जोडी अंगारा ॥३॥
अर्थ
मी मागे खूप प्रपंचाचे खेळ खेळलो परंतू आता देहाभिमानाचे बळच माझ्यामधून ओसरले आहे. आता मला स्वरुप स्थिती प्राप्त झालेली आहे आणि जो देहरुपी घट आहे तो आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे जळालेल्या वस्त्राची घडी जशीच्या तशी तर राहातेच परंतू त्याला थोडा जरी हात लावला की, त्याची घडी लगेच मोडते. तुकाराम महाराज म्हणतात, “जळालेल्या वस्त्राची जर आपण घडी पाहण्यास गेलो ते हातात घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हातामधे केवळ राख येते त्याप्रमाणे माझा देह तुम्हाला जरी दिसत असला तरी आता माझा देहरुपी पूर्णपणे मोकळा झालेला आहे वृत्तीशून्य झालेला आहे. ”
3:05

अभंग क्र. ३१२६
आळस आला अंगा । धाव घाली पांडुरंगा ॥१॥
सोसू शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥धृपद॥
करावी व्यसने । दुरी येउनि नारायणे ॥२॥
जवळील दुरी । झालो देवा धरी करी ॥३॥
म्हणउनि देवा । वेळोवेळा करी धावा ॥४॥
तुका म्हणे पांडुरंगा । दुरी धरू नका अंगा ॥५॥
अर्थ
पाडूरंगा परमार्थ करण्याविषयी माझ्या अंगामध्ये आळस आहे तरी तू धाव घाल आणि हा आळस दूर कर. शरीराचे धर्म किती दिवस सोसायचे त्यामुळे अनेक अवगुणाचे घाव माझ्यावर होत आहे. त्यामुळे हे नारायणा माझे सर्व व्यसने तुम्ही दूर करा. देवा मी तुमच्या नेहमी जवळ राहात होतो परंतू या दुर्गुणामुळे मी तुमच्यापासून दूर गेलो त्यामुळे तुम्ही माझ्या हाताला धरा. देवा म्हणून तर मी वेळोवेळी तुमचा धावा करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा म्हणूनच तर मी तुम्हाला विनंती करतो आहे की, मला तुमच्यापासून दूर धरु नका. ”
3:05

अभंग क्र. ३१२७
झंविली महारे । त्याची व्याली असे पोरे ॥१॥
करी संताचा मत्सर । कोपे उभारोनि कर ॥धृपद॥
बीज तैसे फळ । वरी आले अमंगळ ॥२॥
तुका म्हणे ठावे । ऐसे झाले अनुभवे ॥३॥
अर्थ
महार व्यक्ती ज्या स्त्रीशी संबंध करतो तीच स्त्री अशा वाईट मुलांना जन्म देते. की जी पोरे संतांचा मत्सर करतात आणि दोन्ही हात वर करुन रागावून त्यांना मारण्यास सावध होतात. अमंगळ प्रकारचे बीज जर असेल तर वरती फळ देखील अमंगळ प्रकारचेच येते. तुकाराम महाराज म्हणतात, “हे मला अनुभवानेच माहित झाले आहे. ”
3:06

अभंग क्र. ३१२८
जे जे वहावे संकल्प । तेचि पुण्य तेचि पाप ॥१॥
कारण ते मनापासी । मेळविल्या मिळे रसी ॥धृपद॥
सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥२॥
तुका म्हणे सार । नांव जीवनाचे सागर ॥३॥
अर्थ
मनामध्ये जे जे कोणते संकल्प करावे त्यापासून जे कर्म करावेत त्यापासून पुण्य किंवा पाप निर्माण होते. याला मुख्य कारण म्हणजे मन आहे सर्व कार्य मनापासूनच उत्पन्न होतात मनाला ज्या विषयाची आवड लागते त्याच विषयामध्ये ते मिसळून जाते. संसारातील सर्व उठाठेव ह्याच आणि या मनाच्या आधारानेच होत असतात आणि जो कोणी मनाला एकाग्र करुन हरीशी एकरुप करील त्यालाच चांगले म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, “पाणी कोठेही असो त्याचे मूळस्वरुप म्हणजे सागर आहे त्यामुळे पाण्याचे मुख्य नांव समुद्र आहे त्याप्रमाणे क्रिया कशाही प्रकारे घडो त्याला मुख्य कारण मनच आहे. ”
3:06

अभंग क्र. ३१२९
त्या हरीदासांची भेटी घेता । नरका उभयतांसी जाणे ॥१॥
माते परीस थोरी कथा । भाड घेता न लाजे ॥धृपद॥
देता घेता नरकवासी । उभयतांसी रवरव ॥२॥
तुका म्हणे नरकगावा । जाती हावा धरोनि ॥३॥
अर्थ
द्रव्य घेऊन हरीकथा करणारा हरीदास याची भेट घेतली असता द्रव्य घेणारा हरीदास आणि भेट घेणारा दोघेही नरकाला जातात. अहो आईपेक्षाही हरीकथा अतिश्रेष्ठ आहे आणि त्या कथेचे पैसे घेताना व त्या कथेचे पैसे देताना या दोघानाही लाज वाटत नाही. हरीकथा करणारा व हरीकथा करणाऱ्याला पैसे देणारा या दोघानाही रौरव अशा नरकवासात राहावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “पैसे घेऊन किंवा पैशाची हाव मनात धरुन हरीकथा व कीर्तन करणारा नरक गावाला जातात. ”
3:06

अभंग क्र. ३१३०
भोगी झाला त्याग । गीती गाता पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हावरूनि चुकला ॥१॥
करुनि ठेविलो निश्चळ । भय नाही तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठले ॥धृपद॥
तळी पक्षिणीचे परी । नखे चोची चारा धरी । आणुनिया घरी । मुखी घाली बाळका ॥२॥
तुका म्हणे ये आवडी । आम्ही पायी दिली बुडी । आहे तेथे जोडी । जन्मांतरींचे ठेवणे ॥३॥
अर्थ
पाडूरंगाचे गीत मुखाने गायले असता संसाराचा भोग भोगण्याचा देखील हळूहळू त्याग झाला आहे. त्यामुळे इंद्रियांचा आमच्यावरुन ताबा चुकला आहे. आता मनाला मी निश्चल करुन ठेवले आहे कोणत्याही प्रकारचे भय किंवा तळमळ मनात राहिली नाही. माझा सर्व भार विठ्ठलाने स्वत:च्या माथ्यावर घेतला आहे. पक्षीणी जशी पायाच्या नखात व चोचीत चारा धरते, आणि तो चारा घरी आणून आपल्या पिल्लांच्या मुखामध्ये घालते. तुकाराम महाराज म्हणतात, “त्याच आवडीने आम्ही विठ्ठलाच्या पायी गुढी दिली आहे. तेथे आमच्या पूर्वपुण्याचा लाभ ठेवलेला आहे. ”
3:06

अभंग क्र. ३१३१
कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥१॥
दिवस गमा भरा पोट । का गे नेटनेटावा ॥धृपद॥
दिमाख हा कोणा दावा । लटकी जीवा चरफड ॥२॥
तुका म्हणे झोंडगी हो । फुंदा का हो कोरडी ॥३॥
अर्थ
कुंकवाची उठाठेव बोडक्या देवीला म्हणजे विधवा स्त्रीला कशासाठी पाहिजे ? आता कसेतरी पोट भरुन दिवस काढा उगाच का नटासारखे नटता. अहो हा दिमाख तुम्हाला कोणाला दाखवायचा आहे जीवाची व्यर्थ चडफड तुम्ही का करुन घेता ? तुकाराम महाराज म्हणतात, “अहो झोंड बायांनो उगाचच हा कोरडा नखरा का करतात ? ”
3:06

अभंग क्र. ३१३२
आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणेचि वाढेले ॥१॥
ठेवा जोडला मिरासी । ठाव झाला पायापासी । नव्हे आणिकासी । रीघ तेथे यावया ॥धृपद॥
बळी दिला जीवभाव । नेणे आणिकाचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥२॥
तुका म्हणे झालो बळी । आम्ही निकट जवळी । बोलिलो ते पाळी । वचन स्वामी आमुचे ॥३॥
अर्थ
कोणत्याही प्रकारचे कष्टाचे डोंगर न सोसता आम्ही आयते जेवण जेवणार आहोत. या योगानेच आमचा आध्यात्मिक सुखाचा व्यवहार वाढेल. आम्हाला देवाच्या पायाच्या ठिकाणी ठाव मिळाला आहे त्यामुळे वडिलोपार्जित पुण्याईचा ठेवाच आम्हाला मिळाला आहे. वडिलोपार्जित पुर्वपुण्याई असल्याशिवाय कोणीही येथे येऊ शकत नाही. आम्ही आमचा जीव म्हणजे देहच देवाला अर्पण केला आहे आणि त्याच्या नावावाचून आम्ही इतर कोणाचेही नांव जाणत नाही. त्या विठ्ठलाच्या ठिकाणी आम्ही एकनिष्ठ भक्तीभाव ठेवला असून त्याचा विश्वास मनात दृढ धरला आहे आणि तो आज फलद्रुप झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही देवाच्या अगदी जवळ राहून इतके बलवान झालो आहोत की, जी आज्ञा आम्ही आमच्या स्वामीला करु त्या आज्ञेचे पालन आमचा स्वामी पाडूरंग करतो आहे. ”

सप्टेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version