“१६ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १६ September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १६ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग अभंग ३०९७ ते ३१०८ चे पारायण आपण करणार आहोत.
१६ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी १५१ ते १७५,
151-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
वरी कोणे एके उपाये । पडिले ते उभे होये । तेच कीजे परी घाये । नेदावे वर्मी ॥151॥
तर, जो कोणी पतित असेल तो ज्या उपायाने उभा राहील म्हणजे सुधारेल ते उपाय योजून त्याचा मर्मच्छेद करू नये. 51
152-16
पै उत्तमाचियासाठी । नीच मानिजे किरीटी । हे वाचोनि दिठी । दोषु न घेपे ॥152॥
किंवा, अर्जुना, एखाद्या उत्तम किंवा पुरुषाची तुलना मनात आणून त्यामानाने हा कनिष्ठ आहे असे मनात न आणिता जो त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करितो. 52
153-16
अगा अपैशून्याचे लक्षण । अर्जुना हे फुडे जाण । मोक्षमार्गींचे सुखासन । मुख्य हे गा ॥153॥
अर्जुना, ” अपैशुन्याचे ” अथवा सुजनतेने हे लक्षण होय व मोक्षमार्गातील हे एक सुखसाधन आहे. 53
154-16
आता दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी । निवविता न कडसी । साने थोर ॥154॥
आता दया म्हणजे काय विचारशील, तर ती अशी असावी की, पूर्णचंद्र परतापहरण करितांना जसा भेदाभेद राखीत नाही, तशी ती प्राणिमात्राच्या ठिकाणी सारखी असावी. 54
155-16
तैसे दुःखिताचे शिणणे । हिरता सकणवपणे । उत्तमाधम नेणे । विवंचू गा ॥155॥
म्हणून कोणाही दुःखितांचे दुःख पाहून, त्याचा उत्तमपणा अगर अधमपणा मनात न आणिता त्याची करुणा करावी. 55
156-16
पै जगी जीवनासारिखे । वस्तु अंगवरी उपखे । परी जाते जीवित राखे । तृणाचेहि ॥156॥
किंवा जगात जीवनासारखी (जलासारखी) दुसरी कोणती वस्तु आहे की जी आपला सर्वस्व वेच करून घेऊनही गवतासारख्याचेही जीवित रक्षण करिते. 56
157-16
तैसे पुढिलाचेनि तापे । कळवळलिये कृपे । सर्वस्वेसी दिधलेहि आपणपे । थोडेचि गमे ॥157॥
त्याप्रमाणे दुःखातं पाहून ज्याला कृपेने कळवळा येतो व जो त्याच्या सहाय्यार्थं आपले सर्वस्व देऊनही काहीच दिले नाही असे चित्तांत मानतो. 57
158-16
निम्न भरलियाविणे । पाणी ढळोचि नेणे । तेवी श्रांता तोषौनि जाणे । सामोरे पा ॥158॥
सखल प्रदेश पूर्ण भरल्याशिवाय पाणी जसे वाहू लागतच नाही, त्याप्रमाणे ज्याला समोरील पीडिताचे दुःख निवारण केल्याशिवाय अन्य काहीही करणे सुचत नाही. 58
159-16
पै पायी काटा नेहटे । तव व्यथा जीवी उमटे । तैसा पोळे संकटे । पुढिलांचेनि ॥159॥
किंवा पायात मोडलेला काटा असेपर्यंत जसे जीवाला त्याचे दुःख होते, त्याप्रमाणे पुढीलाचे संकट पाहून जो नित्य पाळतो. 59
160-16
का पावो शीतळता लाहे । की ते डोळ्याचिलागी होये । तैसा परसुखे जाये । सुखावतु ॥160॥
किंवा पावलाला शीतलोपचार केले तर त्यांचा जसा त्यांच्यापेक्षा डोळ्यांनाच अधिक उपयोग होतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्यायाचे सुख पाहूनच मनात सुखी होतो. 160
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-16
किंबहुना तृषितालागी । पाणी आरायिले असे जगी । तैसे दुःखितांचे सेलभागी । जिणे जयाचे ॥161॥
किंबहुना, तृषितांची तृषा हरण व्हावी म्हणूनच जस जगात पाण्याचा जन्म आहे, त्याप्रमाणे दुःखितांचे दुःख हरण करावे हेच ज्याच्या जीवनाचे मुख्य कर्तव्य आहे. 61
162-16
तो पुरुषु वीरराया । मूर्तिमंत जाण दया । मी उदयजताचि तया । ऋणिया लाभे ॥162॥
अर्जुना, असा जो पुरुष तो दयेची केवळ मूर्तींच होय; तो जन्मत:च मला ऋणी करून ठेवितो. 62
163-16
आता सूर्यासि जीवे । अनुसरलिया राजीवे । परी ते तो न शिवे । सौरभ्य जैसे ॥163॥
आता, कमल जरी, सूर्यापाशी जीवे भावे अनन्य असले तरी, तो जसा त्याच्या सुगंधाला स्पर्शही करीत नाही, 63
164-16
का वसंताचिया वाहाणी । आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी । ते न करीतुचि घेणी । निगाला तो ॥164॥
किंवा वसंतऋतूच्या आगमनाने सर्व वनश्री जरी पत्र, पुष्प, फल युक्त ऐश्वर्याला धारण करते तरी, तो त्या ऐश्वर्याकडे ढंकूनही न पहाता जसा सरळ निघून जातो. 64
165-16
हे असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशी । परी महाविष्णु जैसी । न गणीच ते ॥165॥
किंवा, ही राहो, सर्व सिद्धींसह लक्ष्मी पायाशी आली असतांही श्रीमहाविष्णु जसे तिला मुळीच महत्त्व देत नाही. 65
166-16
तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे । भोग पाईक जालिया इच्छेचे । परी भोगावे हे न रुचे । मनामाजी ॥166॥
त्याप्रमाणे ऐहिक किंवा पारत्रिक भोग ह्याच्या इच्छेचे दास होऊन पुढे आले तरी, त्यांच्या भोगाविषयी ज्याला यत्किंचितही इच्छा होत नाही. 66
167-16
बहुवे काय कौतुकी । जीव नोहे विषयाभिलाखी । अलोलुप्त्वदशा ठाउकी । जाण ते हे ॥167॥
बहुत काय सांगावे ? कौतुकाखातरही ज्याला कधी विषयसेवनाची इच्छा होत नाही. अशी जी दशा ते “अलोलुप्त्व” होय. 67
168-16
आता माशिया जैसे मोहळ । जळचरा जेवी जळ । का पक्षिया अंतराळ । मोकळे हे ॥168॥
आता, मधमाशांना जसे मोहोळ किंवा जलचरांना जसे जल, किंवा पक्षांना जसे आकाश नित्यप्रिय असते. 68
169-16
नातरी बाळकोद्देशे । मातेचे स्नेह जैसे । का वसंतीच्या स्पर्शे । मऊ मलयानिळु ॥169॥
किंवा, बालकाविषयी मातेचे चित्त जसे नित्य प्रेमयुक्त असते अथवा मलयागिरीवरून वसंतात येणारा वारा जसा मधुर व कोमल असतो. 69
170-16
डोळ्या प्रियाची भेटी । का पिलिया कूर्मीची दिठी । तैसी भूतमात्री राहटी । मवाळ ते ॥170॥
पतिव्रतेला पतिदर्शन, किंवा कांसवीच्या पिलांना मातृदृष्टि, ह्याप्रमाणे भूतमात्राविषयी ज्याच्या अंतःकरणात नित्यप्रेम व मार्दव असते. 170
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-16
स्पर्शे अतिमृदु । मुखी घेता सुस्वादु । घ्राणासि सुगंधु । उजाळु आंगे ॥171॥
स्पर्श केला तर मृदु, सेवन केला तर रुचकर, वास घेतला तर सुगंधित, व रूपाने शुभ्र असा जो कापूर. 71
172-16
तो आवडे तेवढा घेता । विरुद्ध जरी न होता । तरी उपमे येता । कापूर की ॥172॥
तो वाटेल तेवढा सेवन करून जर बाधा न करिता, तर, त्याची उपमा देता आली असती. 72
173-16
परी महाभूते पोटी वाहे । तेवीचि परमाणूमाजी सामाये । या विश्वानुसार होये । गगन जैसे ॥173॥
परंतु ज्याच्या पोटात पंचमहाभूतांचा समावेश होऊनही जे परमाणूमध्येही प्रविष्ट असते व जे विश्वाचा आकार धारण करिते असे जे गगन. 73
174-16
काय सांगो ऐसे जिणे । जे जगाचेनि जीवे प्राणे । तया नांव म्हणे । मार्दव मी ॥174॥
फार काय सांगावे ! याचे जिणे म्हणजे केवळ जगाच्या कल्याणार्थच असते त्याला ‘मार्दव ” असे मी म्हणतो74
175-16
आता पराजये राजा । जैसा कदर्थिजे लाजा । का मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव ॥175॥
आता पराभव पावलेला राजा जसा लज्जेने व्यथित होतो, किंवा मानी पुरुष निकृष्ट स्थिति प्राप्त झाली असता जसा निस्तेज होतो. 75
दिवस २५९ वा. १६, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३०९७ ते ३१०८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३०९७
भूमीवरी कोण ऐसा । गांजू शकेहरीच्या दासा ॥१॥
सुखे नाचा हो कीर्त्तनी । जयजयकारे गर्जा वाणी ॥धृपद॥
काळा सुटे पळ । जाती दुरिते सकळ ॥२॥
तुका म्हणे चित्ती । साच माना हे निश्चिंती ॥३॥
अर्थ
या भूमीवर असा कोण आहे की, जो हरीच्या दासांना त्रास देऊ शकेल ? त्यामुळे कोणालाही घाबरु नका सुखाने हरी कीर्तन करा हरीची गर्जना व जयजयकार वाणीने करत राहा. असे केल्याने काळ पळत सुटेल आणि तुमची सर्व पातके नाहीसी होतील. तुकाराम महाराज म्हणतात, “मी जे काही तुम्हाला सांगितले आहे ते अगदी खरे आहे व निश्चिंत आहे हे तुम्ही जाणा. ”
2:59
अभंग क्र. ३०९८
झाला जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥१॥
करीन आडक्या घोंगडे । उभ्या बाजारी उघडे ॥धृपद॥
जो जो धरिली भीड । तो तो बहु केली चीड ॥२॥
तुका म्हणे मूळ । तुझे उच्चारीन कुळ ॥३॥
अर्थ
जो जीवावरच उदार झाला आहे त्याला कोणाची काय भीडभार राहणार ? देवा उभ्या बाजारात मी तुला उघडा करीन तुझ्या अंगावरचे कितीही मौल्यवान घोंगडे असले तरी ते हिसकावून घेईन आणि त्याची किंमत आडक्या इतकीच करीन. अहो देवा तुझी भीडभाड तरी मी किती दिवस धरावी जो जो तुझी भीड धरावी तो तो मला तू चीड आणली आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी आता गप्प बसणार नाही चारचौघामध्ये मी तुझ्या कुळाचा आणि मुळाचा उच्चार करीन आणि तुझे मूळ स्वरुप काय आहे ते सर्व जगाला सांगेन. ”
3:00
अभंग क्र. ३०९९
मिळे हरीदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥१॥
तेथे म्या काय करावे । माझे कोणे आइकावे ॥धृपद॥
कैसे तुज लाजवावे । भक्त म्हणोनिया भावे ॥२॥
नाचता नये ताली । वाजविता नये टाळी ॥३॥
अंती मांडिती भुषणे । शरीर माझे दैन्यवाणे ॥४॥
तुका म्हणे कमळापति । मज न द्यावे त्यांचे हाती ॥५॥
अर्थ
देवा तुझ्याजवळ तुझ्या दासांची इतकी गर्दी आहे इतकी त्यांची लांबच लांब रांग लागली आहे की मला तेथे पोहोचण्यास लवकर जागाच मिळत नाही. देवा तेथे मी काय करावे मला पुढे जाऊ दया असे जरी मी म्हटलो तरी तेथे माझे कोण ऐकणार आहे ? देवा मी तुझा मोठा भक्त आहे असे मी म्हणून का उगाच तुला लाजवावे कारण विचार करुन पाहिले तर मी त्या योग्यतेचा नाही. मला साधे तालावर नाचता काय तालावर टाळी देखील वाजवता येत नाही. देवा तुझ्यासमोर ज्या तुझ्या दासांची दाटी झाली आहे रांग लागली आहे त्यांचे शरीर म्हणजे टिळे माळ मुद्रा या भूषणांनी सुशोभित झालेले आहे अतिमंडीत आहेत परंतू माझे शरीर तर दैन्यवाणे म्हणजे दीन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा त्यामुळेच तुम्ही मला संतांच्या हाती दयावे. ”
3:00
अभंग क्र. ३१००
जाणो नेणो काय । चित्ती धरू तुझे पाय ॥१॥
आता हेचि वर्म । गाऊ धरूनिया प्रेम ॥धृपद॥
कासया सांडू मांडू । भाव हृदयीच कोंडू ॥२॥
तुका म्हणे देवा । जन्मोजन्मी मागे सेवा ॥३॥
अर्थ
देवा काय समजून घ्यावे आणि काय समजून नाही घ्यावे हे मला काही कळत नाही त्यामुळे मी तुझे पाय चित्तात धरुन राहात आहे. देवा मला खरे वर्म आता समजले ते म्हणजे तुझ्या पायाची भक्ती करणे आणि तुझ्या पायाविषयीच आम्ही आमच्या मनामध्ये प्रेम धारण करु व तुझे गुणगान गाऊ. देवा काय टाकून देऊ आणि काय धरुन ठेवू हे मला काही कळत नाही त्यामुळे आता तुला ह्दयात भक्तीभावाने कोंडून ठेवु हेच चांगले. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा जन्मोजन्मी मला तुझी सेवा घडू दयावी हेच मागणे मी तुला मागत आहे. ”
3:00
अभंग क्र. ३१०१
अभंग क्र. ३१०१
जाळे घातले सागरी । बिंदु न राहे भीतरी ॥१॥
तैसे पापियाचे मन । तया नावडे कीर्तन ॥धृपद॥
गाढव गंगेसी न्हाणिले । जाउनि उकरड्यावरी लोळे ॥२॥
प्रीती पोसिले काउळे । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥३॥
तुका म्हणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी ॥४॥
अर्थ
समुद्रामध्ये जाळे घातले आणि ते वर काढले तर त्यामध्ये (जाळया मध्ये) बिंदू म्हणजे एक थेंब देखील पाणी राहात नाही. त्याप्रमाणेच पाप्याची म्हणजे पापी माणसाचे मन आहे त्यांना कितीही चांगला उपदेश केला तरी त्यांच्या मनामध्ये चांगला उपदेश राहात नाही आणि त्यांना हरीकथा तर कधीच आवडत नाही. गाढवाला गंगेजवळ नेऊन गंगेच्या पाण्याने जरी आंघोळ घातली तरी ते उकिरडयावर जाऊनच लोळते. कावळयाला कितीही प्रेमाने पोसले कितीही मिष्टान्न खाण्यास दिले तरी ते शेवटी विष्टेवरच जाऊन लोळते. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो हरी खेकडयाला ज्याप्रमाणे कस्तुरीचा सुगंध केव्हाही आवडतच नाही त्याप्रमाणे पापी मनुष्याला हरीकथा व कीर्तन कधीही आवडत नाही. ”
3:00
अभंग क्र. ३१०२
तरलो म्हणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फाटा ॥१॥
वायाविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥धृपद॥
ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥२॥
तुका म्हणे ऐसी किती । नरका गेली अधोगती ॥३॥
अर्थ
माझा उध्दार झाला आहे मी तरलो गेलो आहे असा जो म्हणतो त्याला भ्रम झाला आहे असे समजावे आणि त्या भ्रमानेच तो आडमार्गाला गेला आहे असे समजावे. जसे कापसाचे कच्चे बोंड तुटून खाली पडून व्यर्थ वायालाच जाते त्याप्रमाणे हा दांभिक मनुष्य अभिमानी मनुष्य आपल्याला सुख मिळावे चार लोकांमध्ये मानसन्मान मिळावा याची इच्छा करत असतो या विचाराने तो देखील वाया जातो. वेदाने सांगितलेल्या ग्वाहीला हा प्रमाण मानत नाही आणि आपले स्वतंत्र मत हा स्थापन करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “असे कितीतरी ताठा धरणारे अभिमान धरणारे लोक नरकाला व अधोगतीला गेलेले आहेत. ”
3:00
अभंग क्र. ३१०३
कठिण नारळाचे अंग । बाहेरी भीतरीचे चांग ॥१॥
तैसा करी का विचार । शुद्ध कारण अंतर ॥धृपद॥
वरी काटे फणसफळा । माजि अंतरी जिव्हाळा ॥२॥
मिठें रुचविले अन्न । नये सतंत कारण ॥३॥
ऊस बाहेरी दिसे काळा । आत रसाचा आगळा ॥४॥
तुका म्हणे मोल गोडी । काय चाड वरील्या खोडी ॥५॥
अर्थ
नारळाचे बाहेरचे अंग हे अतिशय कठीण असते परंतू आतमधे ते खाण्यास खूप चांगले असते. या उदाहरणावरुन तुम्ही हे लक्षात घ्या की, मनुष्य बाहेरुन कसाही असला तरी चालेल परंतू त्याचे अंत:करण शुध्दच असले पाहिजे. फणस फळाला वरवर खूप काटे असतात परंतू आतमधून ते खूप गोड असते. मीठ अन्नाला चव आणते परंतू मीठेवाचून अन्न स्वतंत्र असेल तर त्याची चव लागत नाही. ऊस बाहेरुन काळा दिसतो परंतू त्याच्या आतमधे खूप चविष्ट रस असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अंत:करणातील गोडी महत्वाची आहे वरील खोडीशी आपल्याला काय कर्तव्य आहे. ”
3:01
अभंग क्र. ३१०४
बाळ माते निष्ठुर होय । परि ते स्नेह करीत आहे ॥१॥
तैसा तू गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आम्हा ॥धृपद॥
नेणती भागली । कडे घेता अंग घाली ॥२॥
भूक साहे तहान । त्याचे राखे समाधान ॥३॥
त्याच्या दुःखे धाये । आपला जीव देऊ पाहे ॥४॥
नावे घाली उडी । तुका म्हणे प्राण काढी ॥५॥
अर्थ
मुलगा एखादयावेळी आईवर निष्ठूर होऊन रागावतो परंतू आई कधीही मुलावर निष्ठूर होत नाही ती सतत त्याच्यावर प्रेमच करीत राहते. त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा तू देखील तसाच आहे एक क्षणभर देखील तू आम्हाला विसरत नाही. नेणते लेकरु चालून चालून जर थकले तर त्याला कडेवर घेण्यासाठी आई आपले अंग पुढे करते व त्याला कडेवर घेते. स्वत:ला कितीही तहान लागो भूक लागो तरी देखील आई ते सहन करते परंतू मुलाला पोट भरुन त्याची तृप्ती होईपर्यंत जेवू घालून त्याचे समाधान करते. मुलाला झालेला त्रास पाहून ती माता माऊली रडू लागते आणि त्या मुलासाठी वेळप्रसंगी आपला जीव देण्यासाठी देखील ती मागेपुढे पाहात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मुलाने आपल्या आईला नुसते आई या नावाने हाक जरी मारली तरी ती आई त्याच्यासाठी धावत येते अशा प्रकारे आई आपल्या मुलासाठी प्राण काढीत असते. ”
3:01
अभंग क्र. ३१०५
दाता लक्षुमीचा पति । माझे मागणे ते किती ॥१॥
जाणे तान्हेल्याची तहान । पीता गंगा नव्हे न्यून ॥ध्रु॥
कल्पतरु झाला देता । तेथे पोटाचा मागता ॥२॥
तुका म्हणे संता ध्याता । परब्रम्हची आले हाता ॥३॥
अर्थ
दान देणारा दाता जर लक्ष्मीचा पती आहे तर मग माझे मागणे तरी त्याच्यापुढे कितीसे आहे ? एखादया तहानलेल्या व्यक्तीने जर गंगेतून पाणी घेऊन त्याची तहान भागवण्यासाठी ते पाणी प्याले तर गंगेतील पाणी कधीही कमी होणार नाही. एखादा व्यक्ती कल्पतरुच्या वृक्षाखाली बसला आणि त्याला कल्पतरु प्रसन्न झाला व काय मागायचे ते दान माग असे कल्पतरुने त्या व्यक्तीला म्हटले तर त्या व्यक्तीने मला खूप भूक लागली आहे मला पोट भरुन जेवण्यास अन्न दे असे म्हटले तर त्याचे दान त्या कल्पतरुपुढे किती छोटेसे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे मी त्या संताचे ध्यान केले त्यांची सेवा केली तर परब्रम्हच माझ्या हाताशी आले. ”
3:01
अभंग क्र. ३१०६
कुरुवंडी करीन काया । वरोनि पाया गोजिरिया ॥१॥
बैसले ते रूप डोळा । मन चाळा लागले ॥धृपद॥
परते न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥२॥
तुका म्हणे विसावलो । येथे धालो धणीवरी ॥३॥
अर्थ
देवा मी तुझ्या गोजिरवाण्या पायावरुन माझे शरीर ओवाळून टाकीन. देवा तुमचे रुप माझ्या डोळयामध्ये अगदी ठासून बसले आहे आणि मनात त्याचाच चाळा म्हणजे छंद लागला आहे. देवा मला तुझ्या रुपाच्या ठिकाणी इतकी आवड बसली आहे की ती आता दूर तर करवतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला तुमचे दर्शन झाले आणि माझी डोळयाची तृप्ती होईपर्यंत मी तुमचे रुप पाहिले आहे त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली व येथेच मी विसावलो आहे. ”
3:01
अभंग क्र. ३१०७
साधनाचे कष्ट मोठे । भय वाटे थोर हे ॥१॥
मुखे गावे भावे गीत । सर्व हित बैसलिया ॥धृपद॥
दासा नव्हे कर्म दान । तन मन निश्चळि ॥२॥
तुका म्हणे आत्मनिष्ठा । भोग चेष्टा मनाची ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या प्राप्तीसाठी योग याग जप तप अनुष्ठान ही साधने मोठी कष्टदायक आहेत आणि ती साधने करताना चूक होती की काय याचेही फार भय वाटत आहे. एवढे करण्यापेक्षा मुखाने हरीचे गीत भक्तीभावपूर्वक गावे असे केल्याने बसल्या जागेवरच आपले सर्व हित होईल. हरीच्या दासांना कोणत्याही प्रकारचे दानधर्म नसते त्यांनी केवळ एक ठिकाणी बसून तन मन हरीच्या ठिकाणी निश्चल करावे. तुकाराम महाराज म्हणतात, “जे कोणी आत्मनिष्ठ आहेत त्यांचे मन देखील निश्चल असते परंतू विविध प्रकारचे भोग भोगण्याची ज्यांची इच्छा असते ते म्हणजे केवळ मनाच्या नाना चेष्टाच असतात. ”
3:02
अभंग क्र. ३१०८
घेता आणिकाचा जीव । तेव्हा कीव कराना ॥१॥
आपले ते वरदळ नेदा । हे गोविंदा कृपणता ॥धृपद॥
सेवा तरी इच्छा सांग । चोरिले अंग साहेना ॥२॥
तुका म्हणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही इतरांकडून सेवा करुन करुन त्यांचा फार जीव घेता मग त्यांच्यावर थोडी तरी दया करीत जावा. हे गोविंदा अहो तुम्ही तर भक्तांसाठी तुमच्या अंगाला थोडा देखील धक्का लागू देत नाही इतकी तर तुमच्या अंगी कृपणता आहे. अहो आमच्याकडून हवी तशी तुम्ही सेवा करुन घेता आम्ही थोडा जरी अंगचोरपणा केला तर तो तुम्हाला सहनही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे माझ्या धन्या विठोबा तू इतका निर्दयी आमच्याविषयी का झाला आहेस ते मला समजले आहे कारण तुला कोणत्याही प्रकारचे संतान नाही तुला मागे व पुढे असे कोणीही नाही. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

