“१ सप्टेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १ सप्टेंबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २९१७ ते २९२८ चे पारायण आपण करणार आहोत.
१ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ३७६ ते ४००,
376-15
पै रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथे पांडवा । नाही तो गा ? ॥376॥
पण अर्जुना, असे पहा की, वृक्ष हलत असला म्हणजेच वारा वहात असल्यामुळे आहे असे म्हणावे ? आणि जेथे वृक्षच नसेल तेथे वारा नाहीच असे का समजावयाचें ? 76
377-15
का आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपे तेथ देखिजे । तरी तेधवांचि जाले मानिजे । काय आधी नाही ? ॥377॥
किंवा, आरसा समोर ठेवून आपण आपले रूप त्यात पाहिले, म्हणजे मूळरूपही तेव्हांच झाले असे का समजावयाचे ? ते आधी नव्हते का ? 77
378-15
का परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा । तरी आपणपे नाही ऐसा । निश्चयो करावा ? ॥378॥
किंवा आरसा परत नेला, आणि त्यातील आभासाचा लोप झाला म्हणजे आपलाच लोप झाला असा का निश्चय करावयाचा ? 78
379-15
शब्द तरी आकाशाचा । परी कपाळी पिटे मेघाचा । का चंद्री वेगु अभ्राचा । अरोपिजे ॥379॥
वस्तुतः शब्द हा आकाशाच गुण आहे, पण ( मेघांचा ) गडगडाट झाला म्हणजे तो ध्वनि मेघांचा आहे असे सर्व लोक म्हणतात, किवा अभ्रांच्या गतीचा आरोप चंद्रावर करून चंद्रच चालतो आहे असे म्हणतात. 79
380-15
तैसे होइजे जाइजे देहे । ते आत्मसत्ते अविक्रिये । निष्टंकिती गा मोहे । आंधळे ते ॥380॥
उत्पन्न होणे किवा नष्ट होणे हे वस्तुतः देहाचे धर्म आहेत, पण, ज्यांची विचारशक्ति लोपली आहे असे अज्ञजन मोहाने, ते धर्म, अविक्रिय व सत्तास्वरूप जो आत्मा त्याचेच आहेत असा निश्चय करितात. 380
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-15
येथ आत्मा आत्मयाच्या ठायी । देखिजे देहीचा धर्मु देही । ऐसे देखणे ते पाही । आन आहाती ॥381॥
ह्या व्यवहारांत ( होणे जाणे ) आत्म्याचा काहीही संबंध नसून, तो स्वसत्तेनेच असंगत्वाने स्थित आहे; व हे केवल देहधर्म होत, अशी ज्यांची दृष्टि ( निश्चय ) आहे ते निराळेच अगर विरळा आहेत. 81
382-15
ज्ञाने का जयाचे डोळे । देखोनि न राहती देहीचे खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मी जैसे ॥382॥
ग्रीष्म ऋतूतील सूर्याचे तीक्ष्ण किरण मेघांतून पार निघून खालील पृथ्वीतलापर्यंत जसे पोंचतात, त्याप्रमाणे ज्यांची दृष्टि ( बुद्धि ) ज्ञानामुळे पांचभौतिक देहखोळ पाहून तेथेच कुंठित होत नाही. 82
383-15
तैसे विवेकाचेनि पैसे । जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसे । आत्मयाते ॥383॥
तर, वरील दृष्टांताप्रमाणंविवेकाच्या प्रकाशने ती दृष्टि देहाच्या पलीकडील जी आत्मवस्तु तेथवर पोचू शकते, असे जे ज्ञानी, ते, आत्म्याला असा पहातात. 83
384-15
जैसे तारांगणी भरले । गगन समुद्री बिंबले । परी ते तुटोनि नाही पडिले । ऐसे निवडे ॥384॥
जसे अनंत नक्षत्रयुक्त आकाश समुद्रात प्रतिबिंबित झाले असता, ते काही वरून तुटून पडले नाही असेच सर्व मानतात. 84
385-15
गगन गगनीचि आहे । हे आभासे ते वाये । तैसा आत्मा देखती देहे । गंवसिलाही ॥385॥
व आकाश होते तसेच आपल्या ठिकाणी आहे, हा दिसणारा केवळ मिथ्याभ्यास आहे असे म्हणतात; त्याचप्रमाणे देहस्थ वाटणारा आत्माही वस्तुतः देहस्थ नाही (तो स्वस्वरूपस्थित आहे) अशी ज्ञान्यांची दृष्टि असते 85
386-15
खळाळाच्या लगबगी । फेडूनि खळाळाच्या भागी । देखिजे चंद्रिका का उगी । चंद्री जेवी ॥386॥
पाण्याच्या खळाळीची चंचलता, त्यात प्रतिफलित झालेल्या चंद्राचीही आहे असे जरी दिसले तरी, ती चंद्राची नसून केवळ पाण्याची आहे, चंद्र अचलच आहे असे जसे मानतात, 86
387-15
का नाडरचि भरे शोषे । सूर्यु तो जैसा तैसाचि असे । देह होता जाता तैसे । देखती माते ॥387॥
डबक्यातील सूर्याचे प्रतिबिंब दिसणे अगर लोपणे हा केवळ त्यात पाणी असणे अगर नसणे ह्याचा खेळ होय; सूर्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसून तो स्वस्थानी जसाच्या तसाच असतो, तसाच देहाच्या होण्याजाण्याने मला काहीही विकार होत नाही असे जे ज्ञानी पाहातात. 87
388-15
घटु मठु घडले । तेचि पाठी मोडले । परी आकाश ते संचले । असतचि असे ॥388॥
घट, मठ घडले आणि मागून मोडले तरी तेथील आकाश असते तसेच स्थित असते. (विकार पावत नाही. ) 88
389-15
तैसे अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पिते । हे देहचि होते जाते । जाणती फुडे ॥389॥
तसेच, अखंड जी आत्मसत्ता तिच्या आधारावर अज्ञान्यांनी कल्पिलेले हे देहच होतात जातात, त्याने (वरील आकाशाच्या दष्टांताप्रमाणे आत्मसत्तेत वर काहीही विकार नाही असे ते स्पष्ट जाणतात. 89
390-15
चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे । ऐसे आत्मज्ञाने चोखटे । जाणती ते ॥390॥
ज्यांना यथार्थ आत्मबोध झाला आहे त्यांच्या दृष्टीने, शुद्ध चैतन्यस्वरूप आत्मा कधी वाढतही नाही, किंवा घटतही नाही; तसाच तो काही चेष्टा करीतहि नाही किंवा करवीतही नाही. 390
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-15
आणि ज्ञानही आपैते होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल । सकळ शास्त्रांचे येईल । सर्वस्व हाता ॥391॥
इतर ज्ञानाची गोष्ट घेतली तर, ते स्वाधीन होणे शक्य आहे, इतके की, त्यायोगे पृथ्वीचे परमाणूही मोजता येतील आणि सकल शास्त्रसार करतलामलकवत् ग्रहण होईल, 91
392-15
परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिगे मानसी । तरी सर्वात्मका मजसी । नव्हेचि भेटी ॥392॥
परंतु इतका व्युत्पन्न व ज्ञानसंपन्न होऊनही, जर अत:करणात वैराग्याचा प्रवेश नसेल तर, सर्वात्मक जो मी, त्या माझी भेट (ज्ञान) त्याला होणारच नाही. 92
393-15
पै तोंड भरो का विचारा । आणि अंतःकरणी विषयासि थारा । तरी नातुडे धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ॥393॥
आणखीही असे की, सर्व शास्त्रे मुखोद्गत असूनही अंत:करणात विषयलालसा असेल, तरीही, अर्जुना, माझी त्याला कालत्रयी प्राप्ति होणार नाही. 93
394-15
हा गा वोसणतयाच्या ग्रंथी । काई तुटती संसारगुंती ? । की परिवसिलिया पोथी । वाचिली होय ? ॥394॥
अरे, झोपेत बरळल्या गेलेल्या ग्रंथांतील वाक्यांनी कोणी संसारमुक्त झाला आहे काय ? किंवा पोथीचे नुसते रक्षण अगर तिची पूजा करून ती वाचल्याचे श्रेय येते काय ? 94
395-15
नाना बांधोनिया डोळे । घ्राणी लाविजती मुक्ताफळे । तरी तयांचे काय कळे । मोल मान ? ॥395॥
किंवा डोळे बांधुन परीक्षेसाठी मोती नाकास लाविले तर त्यांचे मुल्य अगर महत्व कळेल काय ? 95
396-15
तै सा चित्ती अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे माते ॥396॥
त्याप्रमाणे, चित्तांत अहंकाराचे बिऱ्हाड, (पक्के ठाण) आणि जिव्हेवर सर्व शास्त्रे खेळती, असे कोट्यवधी जन्म गेले तरी मत्प्राप्ति होणे नाही. 96
397-15
जो एक मी का समस्ती । व्यापकु असे भूतजाती । ऐक तिये व्याप्ती । रूप करू ॥397॥
एक असणारा जो मी, त्या माझी, सर्व भूतांत कधी व्याप्ति आहे तिची तुला फोड करून सांगू. 97
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥15. 12॥
398-15
तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी । ते दीप्ति माझी जाणावी । आद्यंती आहे ॥398॥
सूर्य आणि ही सर्व विश्वरचना ज्या प्रकाशाने दिसते तो सर्व प्रकाश माझा आहे असे समज. तोच विश्वरचनेच्या आधी व नंतरही आहेच. 98
399-15
जल शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता । ते चंद्री पंडुसुता । ज्योत्स्ना माझी ॥399॥
अर्जुना, सूर्य, जळ शोषण करून गेल्यावर, तेथे, मागाहून ओलावा पुरविणारी जी चंद्रप्रभा, ती माझी होय. 99
400-15
आणि दहन-पाचनसिद्धी । करीतसे जे निरवधी । ते हुताशी तेजोवृद्धी । माझीचि गा ॥400॥
आणि, दहन किंवा पाचन करण्याची जी अग्नीच्या ठिकाणची अमर्याद शक्ति, तेही माझेच तेज होय. 400
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २४४ वा. १, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २९१७ ते २९२८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २९१७
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥
बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥धृपद॥
जरी झाला श्रम । तरी पडो नये भ्रम ॥२॥
तुका म्हणे दासा । देव सरिसा सरिसा ॥३॥
अर्थ
भक्तीमार्ग हा आमच्या सुखाची वाटचाल आहे तेथे आम्ही हळूहळू पाऊल पुढे टाकत आहोत. भक्तीमार्ग हा आमच्या बालगोपाळांच्या भोळया भक्तांचा मार्ग आहे आणि तेथे सेव्य सेवकता सरळपणा आहे. या मार्गामधे जरी श्रम कष्ट झाले तरी मात्र कोणालाही या मार्गामध्ये भ्रम पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “या भक्तीमार्गामधे देव त्याच्या दासांबरोबर सारखा सारखा राहात असतो. ”
अभंग क्र. २९१८
चुकली ते वाट । पुढे सांपडवी नीट ॥१॥
म्हणउनी गर्भवास । नेणती ते हरीचे दास ॥धृपद॥
संचिताचा संग । काय जाणो पावे भंग ॥२॥
तुका म्हणे दृष्टी । उघडितो नव्हे कष्टी ॥३॥
अर्थ
काही भक्त सुरुतीला परमार्थातील वाट चुकले परंतु पुढे त्यांना नामसंकीर्तनाची चांगली वाट सापडली. त्यामुळेच तर हरीचे दास गर्भवास म्हणजे काय आहे ते जाणत नाही. त्यांच्या पूर्वसंचितांचा संबंधही आता भंग झाला की काय काय माहित. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याची ज्ञानदृष्टी उघडी आहे तो कधीही कष्टी होत नाही. ”
अभंग क्र. २९१९
कइ तो दिवस देखेन डोळा । कल्याण मंगळामंगळाचे ॥१॥
आयुष्याच्या शेवटी पायासवे भेटी । काळवेळ तुटी झाल्या तरे ॥धृपद॥
सरो हे संचित पदरींचा गोवा । उताविळ देवा मन झाले ॥२॥
पाउलापाउली करिता विचार । अनंतविकार चित्ता अंगी ॥३॥
म्हणउनि भयाभीत होतो जीव । भाकितसे कीव अट्टाहासे ॥४॥
दुःखा च्या उत्तरी आळविले पाय । पाहणे ते काय अजून अंत ॥५॥
तुका म्हणे होईल आइकिले कानी । तरि चक्रपाणी धाव घाला ॥६॥
अर्थ
सर्वात कल्याणकारी आणि मंगळातही मंगळ असलेला दिवस असा मी कधी माझ्या डोळयाने पाहीन ? आयुष्याच्या शेवटी जर हरीच्या पायाची भेट जर घडली तरच मी भवसागर तरुन जाऊ शकेल. देवा माझ्या पदरी जे संचित कर्म बांधलेले आहे ते तुटून जावो ते नाश पावो यासाठी माझे मन उतावीळ झाले आहे. या प्रपंचामध्ये जर पावला पावलाला विचार केले तर अनेक प्रकारचे विकार आपल्या चित्तामध्ये येतात. त्यामुळे देवा माझा जीव भयभीत होत आहे व त्यामुळेच मी तुला देवा अट्टाहासाने काकूळतीला येऊन करुणा भाकीत आहे. मी दु:खी झालो आहे व दु:खपूर्ण शब्दांनी तुझ्या पायाला आळवीत आहे तरी देखील तू अजून माझा काय अंत पाहात आहेस देवा ? तुकाराम महाराज म्हणतात, “अहो चक्रपाणी मी तुम्हाला ज्या दिवशी पूर्ण शब्दाने करुणा भाकील ते तुम्ही तुमच्या कानाने ऐकले तर माझ्याकडे तुम्ही धाव घाला. ”
अभंग क्र. २९२०
कळो येते वर्म । तरी न पवतो श्रम ॥१॥
तुम्हा शिरी होता भार । आम्हा कैचा संसार ॥धृपद॥
होते अभयदान । तरी स्थिर होते मन ॥२॥
तुका म्हणे पाहे । ऐसी वाट उभा आहे ॥३॥
अर्थ
देवा जर मला तुझे वर्म आधीच कळले असते तर एवढे मला श्रमच झाले नसते. अहो देवा जर सुरवातीलाच तुम्ही आमच्या योगक्षेमाचा भार तुमच्या माथ्यावर घेतला असता तर आमच्या मागे हा संसार लागलाच कशाला असता ? तुम्ही जर सुरवातीलाच अभयदान दिले असते तर माझे मन केव्हा स्थिर झाले असते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमची वाट पाहात उभा आहे. ”
अभंग क्र. २९२१
वारंवार हाचि न पडावा विसर । बसावे अंतर तुमच्या गुणी ॥१॥
इच्छेचा ये दाता तू एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥धृपद॥
लाभाचिये वोढी उताविळे मन । त्यापरि चिंतन चरणाचे ॥२॥
तुका म्हणे जीवी जीवन ओलावा । पांडुरंगे दावा शीघ्र आता ॥३॥
अर्थ
देवा वारंवार मला तुमचा विसर पडू नये आणि तुमच्या गुणाच्यामध्येच मी वस्ती करावी हीच माझी इच्छा आहे. अहो कृपावंता मायबापा जी इच्छा करावी ती पूर्ण करणारा त्रिभूवनामध्ये तूच एक समर्थ दाता आहेस. अहो हरी माझ्या मनाला तुमच्या प्राप्तीच्या लाभाची ओढ लागली आहे म्हणून ते उतावीळ झाले आहे. आणि त्या कारणामुळेच तुमच्या चरणाचे चिंतन ते करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पाडूरंगा आता माझ्या जीवाचे जीवन आणि तुझ्या प्रेमाचा ओलावा तू मला त्वरेने शीघ्रतेने दयावा. ”
अभंग क्र. २९२२
आइकावी माझी कवतुकउत्तरे । देउनी सादरे चित्त देवा ॥१॥
वोरसे आवडी आलो पायापासी । होय ते मनेसी सुख कीजे ॥धृपद॥
तुमचे न भंगे सर्वोत्तमपण । करिता समाधान लेकराचे ॥२॥
तुका म्हणे जरी बोलतो बोबडे । तरी लाडे कोडे कवतुके ॥३॥
अर्थ
देवा माझे कौतुकाचे बोलणे तुम्ही चित्त देऊन सावधानतेने ऐकावे. देवा तुमच्या प्रेमरसाच्या आवडीने मी तुमच्या पायाजवळ आलो आहे आणि ज्या योगाने माझे मन सुखी होईल असेच तुम्ही काहीतरी करा. देवा तुम्ही माझ्यासारख्या लेकराचे जर काही समाधान केले तर तुमचा सर्वोत्तमपणा भंग पावणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मी तुमच्याशी बोबडे, लाडाने बोलत आहे तरी देखील तुम्ही त्याचे कोड कौतुक करा. ”
अभंग क्र. २९२३
नाही गुणदोष लिंपोदेत अंगी । झाडिता प्रसंगी वरावरी ॥१॥
निकटवासिया आळवितो धावा । येथूनिया देवा सोडवूनी ॥धृपद॥
उमटे अंतरी ते करू प्रगट । कळोनी बोभाट धाव घाली ॥२॥
तुका म्हणे तरि वांचलो या काळे । समर्थाचे बळे सुखी असो ॥३॥
अर्थ
मी लोकांचे कोणतेही गुणदोष माझ्या अंगाला लागू देत नाही जरी प्रसंगी मला ते लक्षात आले तरी मी वरच्यावर लगेच ते बाजूला टाकून देत असतो. देवा मला माहित आहे तू माझ्या निकटच वास करीत आहे त्यामुळे मी तुला आळवीतो आहे तुला मी हाक मारली की तू लगेच धावून ये आणि मला यातून सोडव. जे आमच्या अंत:करणात उमटते तेच आम्ही देवाजवळ प्रकट करतो आणि त्याचा बोभाटा झाला की ते देवाला कळते आणि तो आमच्याकडे धाव घालत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “कोणताही प्रसंग असो आम्ही काळाच्या तडाख्यातून वाचतो कारण आम्ही समर्थाची लेकरे आहोत व त्याच्या बळानेच आम्ही नेहमी सुखी आहोत. ”
अभंग क्र. २९२४
आता येणे पडिपाडे । रस सेवू हा निवाडे । मुंगी नेली गोडे । ठेविलिये अडचणी ॥१॥
तैसे होय माझ्या जीवा । चरण न सोडी केशवा । विषयबुद्धी हेवा । वोस पडो सकळ ॥धृपद॥
भुकेलिया श्वाना । गाठ पडे सवे अन्ना । मुको पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥२॥
काय जिंकियेले मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भक्ती तुका ये जाती ॥३॥
अर्थ
आम्ही परमार्थरस कितीही अडचणीत असला तरी तो सेवन करु. जसा गोड पदार्थ कितीही अडचणीत ठेवला तरी तेथे जातेच अगदी त्याप्रमाणे आम्ही परमार्थरस कितीही अडचणीत असला तरी मुंगी तो पदार्थ सेवन करते. हे माझ्या जीवा अगदी त्या मुंगीप्रमाणे तू होय आणि केशवाचे चरण कधीही सोडू नको आणि विषयाचा हेवा करणारी माझी बुध्दी नेहमी सर्वकाळ ओस पडो. भुकेला कुत्रा असावा आणि त्याला अन्न मिळावे, तर तो कुत्रा एकवेळ प्राण सोडून देईल परंतू तोंडातले कधीही सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो कामातूर झालेल्या मनुष्याने आपले मन कधी जिंकले आहे काय आपला जीव देखील कामवासनेपुढे तो गवताप्रमाणे मानतो. व्याभिचारी स्त्रीचा भोग घेण्याकरता तो तिच्या मागे मागे फिरत असतो अगदी त्याच जातीची माझी भक्ती आहे. ”
अभंग क्र. २९२५
न पवीजे तया ठाया । आलो कायाक्लेशेसी ॥१॥
आता माझे आणी मना । नारायणा ओजेचे ॥धृपद॥
बहु रिणे पिडिलो फार । परिहार करावा ॥२॥
तुका म्हणे निर्बळशक्ति । काकुलती म्हुण येतो ॥३॥
अर्थ
मी माझ्या शरीराला खूप त्रास देत आलो आहे देवा तरी देखील मला तुमच्याजवळ जागा मिळत नाही. हे नारायणा आता माझे हित करण्याविषयी तुम्ही तुमच्या मनामध्ये आणा. मी पाप पुण्याच्या ऋणाने फार पिडीत झालो आहे त्यातून आता तुम्हीच माझा परीहार म्हणजे निवारण करावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी निर्मळ आहे शक्तीहीन आहे म्हणून तर तुम्हाला काकूळतीला येतो आहे. ”
अभंग क्र. २९२६
बहु फिरलो ठायाठाव । कोठे भाव पुरेचि ना ॥१॥
समाधान तो पावलो । उरलो बोलो यावरी ॥धृपद॥
घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्याने ॥२॥
तुका म्हणे जेवू आधी । खवखव मधी सारावी ॥३॥
अर्थ
देवा मी खूप ठिकाणी फिरलो परंतू माझे समाधान कोठेही झाले नाही. परंतू मी तुझ्याजवळ आलो आणि समाधानी झालो आता मी केवळ बोलण्यापुरताच उरलो आहे. देवा तू आमचा आर्शिवाद घे आणि आमच्या आशिर्वादाने तू सुखाने नांद. तुकाराम महाराज म्हणतात, “आता बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला सारुन टाक आता खूप भूक लागली आहे त्यामुळे आपण दोघेही ऐक्यरसाचे जेवण जेऊ. ”
अभंग क्र. २९२७
कोण येथे रिता गेला । जो जो आला या ठाया ॥१॥
तातडी ते काय आता । ज्याची चिंता तयासी ॥धृपद॥
नावासाठी नेघें भार । न लगे फार वित्पत्ति ॥२॥
तुका म्हणे न लगे जावे । कोठे देवे सुचेना ॥३॥
अर्थ
देवाजवळ जे जे कोणी आले आहेत त्यापैकी कोण रिकाम्या हाताने गेले आहे. आपण आपला उध्दार व्हावा यासाठी आता तातडी कशासाठी करायची कारण देवाला शरण गेलो आहोत त्यामुळे ही चिंता खरी तर देवाची आहे त्यामुळे त्याला त्याच्या स्वत:ची नामरक्षणाची चिंता आहे त्यामुळे तो आपला उध्दार करीलच. देवाच्या नावासाठी जो भक्त आपल्या माथ्यावर इतर कोणत्याही साधनांचा भार घेत नाही त्याला देवाची प्राप्ती होण्यासाठी फार विद्वत्ताही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी भक्ताला कोठेही जावे लागत नाही आणि देवालाही भक्ताला सोडून दुसरीकडे कोठे जाण्याचे सुचत नाही. ”
अभंग क्र. २९२८
इंद्रियाचे पुरे कोड । तेचि गोड पुढती ही ॥१॥
जावे म्हणती पंढरपुरा । हाचि बरा संसार ॥धृपद॥
बैसले ते मनामुळी । सुख डोळी देखिले ॥२॥
तुका म्हणे देती कान । वाणावाण निवडूनी ॥३॥
अर्थ
जे कार्य केल्याने इंद्रियांचे लाड पूर्ण होतात तेच कार्य पुन्हा करावेसे वाटते व इंद्रियांना तेच कार्य गोड वाटते. या न्यायाने ज्या हरीभक्तांचे पंढरपूरला जाऊन इंद्रिय सुखावतात ते हरीभक्त म्हणतात पंढरपूरला जावे आणि जे संसाराचे दास आहेत त्यांच्या इंद्रियाचे सर्व लाड संसारत पूर्ण होतात त्यामुळे ते म्हणतात हाच संसार बरा आहे. जे मनाच्या मूळाजवळ बसले आहे ते प्रत्यक्ष डोळयाने पाहिले की सुख होते. तुकाराम महाराज म्हणतात, “व ज्या कार्याने इंद्रिय सुखावले जातात तेच कार्य ऐकण्याकडे मनुष्य कान देतात व तेच ऐकतात आणि आपआपल्या दृष्टीने जे चांगले वाईट आहे ते निवडून मनुष्य काढतात. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

