रूख्मिणी चरित्र भाग ९, (४१ ते ४३)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


            श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता……..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! रूख्मिणी चरित्र !!!

*!!!रूख्मिणी भाग-४१!!!*

                  या मनाच्या दोलायमान,द्विधा, अवस्थेत स्वामींचा आधार घ्यावासा वाटला पण ते ध्यानात असल्यामुळे, त्यांची ध्यानसमाधी मोडावीसी वाटत नव्हती रुख्मिणीला. राजपरिवारातील व नगरातील युवती,बालिका, स्रीया केव्हाच निघून गेल्यामुळे एक प्रकारची निरव शांतता पसरली होती. स्वामी ध्यानात असले तरी, त्यांचे दुरुन का होईना दर्शन घ्यावे, मनाची उदासी कमी तरी होईल त्यांच्या प्रासादाजवळ गेली. बाहेर उभी राहून त्यांचे दर्शन होत होते.

त्यांच्या मुखावर नेहमीचा प्रसन्न भाव नव्हता तर  एक निरपेक्ष, उदास भाव दिसला. तिला वाटले आपण उदास असल्यामुळं आपल्याला तसे भासत असेल,मनाचा खेळ असेल.

               बर्‍याच वेळाने ती आपल्या कक्षाकडे परतली. थकून मंचकावर अंग टाकले. रात्रभर वेगवेगळे भास होत होते. झोप आलीच नाही.तनाने,मनाने ती पार थकून गेली. अशा उदास अवस्थेत असतांनाच उध्ववजी आलेत.त्यांचा विदिर्ण चेहरा, नेत्रातून अश्रू वाहत असलेले बघून अशुभ शंकेने ह्रदयाचा थरकाप झाला. काय झाले भावोजी?

         वहिनी फार भयानक घटना घडली. ती सांगण्यासाठीच श्रीकृष्णदादांनी तुम्हाला बोलावले. ती त्यांच्या मागून निघाली. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत ती स्वामींपुढे उभी राहिली. त्यांची दुःखाने, विषादाने पिळवटून निघालेली मुद्रा, आजपर्यंतच्या आयुष्यात ती प्रथमच बघत होती, रुख्मिणी, मन घट्ट करुन ऐक. आताच प्रभास पाटणवरुन वार्ता आली, रासक्रीडेसाठी तिथे गेलेले यादव, पुत्र, पौत्र, जनता, तिथे उगवलेल्या लोह दर्भाने मद्यधुंदावस्थेत एकमेकांवर वार करुन मृत्युमुखी पडलेत. थोरल्या दादांनी जलसमाधी घेतली. ऐकुन   तीला चक्कर येऊन पडणार तोच स्वामींनी सावरले,

              मस्तकावर हात ठेवत म्हणाले, सावर स्वतःला. रुख्मिणी, माझी सारी भीस्त फक्त तुझ्यावर आहे.तूच या भयंकर संकटाला सामोरी जाऊन इतरांना धीर द्यायचा आहे.  स्वतःचे दुःख बाजूला सारुन लहान मोठ्यांच्या पाठीशी ऊभं  राहायचे आहे. कर्तव्यकठोर होऊन अनेक कर्तव्ये पार पाडायची आहेत. रुख्मिणी, सावध हो. तू एक माता तर आहेसच, पण एक सून,सासु,आजी, आणि द्वारकेची महाराणी आहेस, दृष्य आणि शब्द या चक्रात ती अडकली होती. त्याच वेळी रेवतीताई व सात राण्यांचा आक्रोश कानावर पडला.कुणी कुणाचे सांत्वन करायचे? सारेच समदुःखी होते, तिच्या त्या संभ्रमावस्थेत स्वामींचे बोलने कानात शिरलेच नाही. सार्‍या जणी हळूहळू शांत होत होत्या, सावरत होत्या. रुख्मिणीही थोडी शांत झाली. मनाला आवर घालण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आयुष्याच्या या अंतिम टप्यात नियतीच्या या क्रूर निर्घुण खेळाला सामोरे जावेच लागणार होते.

             प्रत्येकाच्या भावना गोठून गेल्या होत्या.प्रभासपाटण ला जाणे भाग होते. गेलेल्यांचे अंतिम क्रीयाकर्म, अंत्याविधी करणे क्रमप्राप्त होते. जे उरले होते त्या जेष्ठ, कनिष्ठांना घेऊन निर्जिवपणे पाटसणला पोहोचले. क्रीयाकर्माची उलटी गंगा वाहत होती. ज्यांच्याकरवी आपले क्रीयाकर्म व्हायचे, तर त्यांचेच करायची पाळी आली होती. तिथे पोहचल्यावर आक्रोशाचा कल्लोळ उडाला. आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मृतांना सामुहिक मंत्राग्निने चित्ताग्नि देण्यात आला.पुढचे चौदा दिवसांचेही क्रीयाकर्म यंत्रवत, भंगलेल्या ह्रदयाने पार पाडल्या गेले. थोरले महाराज व दोन्ही माता निर्विकार होते. श्वास सुरु होते म्हणून देहात चेतना असल्याची जाणीव होत होती.

          या विधीसाठी देशोदेशीचे राजे, राजप्रतीनिधी आले होते. आर्यवर्ताच्या इतिहासात ही अघटीत कल्यनातीत घटना घडली होती, ती सुध्दा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेत. ज्या द्वारकेची कीर्ती गेली अनेक तप त्रिखंडात दुमदुमत होती, ती वैभवशाली, पराक्रमी सुवर्ण द्वारका म्हणून! न्यायाचा तारक  व अन्यायाचा संहारक, जीथे चौसष्ट कलांंचा सन्मान होत होता विद्वान तपस्यांचा आदर होत होता, अन्यायाविरुध्द सत्यासाठी लढल्या गेलेल्या महाभारतीय युध्दात अपूर्व योगदान करणार्‍या, शूर योध्यांची, रुप,गुन, समृध्दी असलेल्या अशा अनेक गुणांनी, स्वतेजाने झळकत असलेल्या द्वारकेत आज एवढा भयानक, विदारक, “न भूतो म भविष्यती” असा प्राण संहार तोही स्वकीयांशी, उत्सवभूमीवर, ज्या रासक्रीडेने सार्‍या आर्यवर्ताला वेड लावले होते, त्याच ठीकाणी अगनित द्वारका वासियांच्या चित्ता पेटवल्या गेल्या होत्या. क्रीयाकर्माच्या विधी पूर्ण झाल्यावर शुष्क रिकाम्या मनाने सारे द्वारकेत परतले.

                       क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                  दि. १०-६-२०२२.

42

 *!!!रूख्मिणी भाग-४२!!!*

            ही भीषण घटना घडली तेव्हा ब्रज इंद्रप्रस्थात होता. फक्त एकटाच यादवकुळाचा वंशद्वीप उरला होता. या संक्रमन काळात द्रौपदीसह पाचही पांडव भक्कम आधारस्तंभाप्रमाणे पाठीशी उभे होते. पार्थ तर जणूं स्वामींची व उध्ववजींची सावली होऊनच वावरत होता. द्रौपदी व सुभद्रा सर्व राजस्रीयां ना धीर देण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभ्या होत्या.पण सुभद्रेचा आव ओढून ताणून आणलेला जाणवत होता. सार्‍याच पुत्रशोकाला बळी पडलेल्या, कोणी कोणाचे सांत्वन करायचे?

                द्रौपदी रुख्मिणीला म्हणाली, वहिनी, आतां  प्रजाजनच  आपले पुत्र समजून, त्यांची माता होऊन कर्तव्य पूर्तीसाठी खंबीरपणे उभे रहायला नको का? पण आता तिचे अंतर्मन पुन्हा उभारी धरायला तयार नव्हते.द्वारकेत लग्नानंतर पाऊल टाकल्यापासून अखंडपणे अविरत  कर्तव्येच पार पाडलीत ना? जेष्ठांची स्नुषा, अपत्यांची माता, धाकट्या राण्या, सुभद्रेसाठी जेष्ठ भगिनी, द्वारकावासीयांची महाराणी, आणि स्वामींप्रती? त्यांच्याशी तर अनेक नात्यांनी भूमिका वठवली नव्हती का? जेष्ठ, प्रिय पत्नी, अर्धांगिनी, म्हणून जी जी जबाबदारी टाकली ती तनामनाने अहोरात्र झिजून, हेच जीवित कार्य समजून पूर्ण केले ना? कधी शासनकर्ती, कधी व्यवस्थापिका, तर कधी कामरुप देशाच्या सोळा सहस्र स्रीयांचे पुनरुत्थान करणारी पुनर्वसिन झाली नाही का?

           कर्तव्य…. कर्तव्य… आणि कर्तव्यच! स्वामिंच्या श्वासात श्वास मिसळून अनेक अवघड कर्तव्ये… प्रसंगी स्वःच्या भावभावनांना बाजूला सारुन पूर्ण केले. या सर्वांचे फळ काय मिळाले तर, पुत्र, पौत्रांचे मृत्यु बघण्याचे दुर्भाग्य! कमीतकमी द्रौपदींच्या मुलांचा वध समरांगणी क्षात्रधर्म निभवतांना झाला. स्वभूमीसाठी लढतांना वीरगती मिळाल्याचे तिला समाधान तरी  झाले, पण रुख्मिणीला? हेच यदुवंशीय मातृभूमीचे संरक्षण करतांना धारातीर्थी पडले असते तर, दुःख तेव्हाही झालेच असते, पण विरमरण आल्याचा अभिमान, समाधान तरी वाटले असते. पण असा मृत्यु? विचार करुन करुन तिचे मन विषादात बुडून गेले.

               कांही दिवसांनी पांडवांसह द्रौपदी इंद्रप्रस्थाला निघून गेले. काळ कुणासाठी थांबत नाही. दैनंदिन व्यवहार सुरु झाले, पण सुवर्ण द्वारका जणूं काळवंडली होती. दिमाखदार तेजाने झळाळणारी नगरी निस्तेज भासत होती. याच वातावरणात भर घालणारी आणखी एक बातमी येऊन थडकली. पश्चिमेकडील द्वीपांच्या भूमीवर भूकंप झाल्याने तो द्वीपसमुहच सागरात बुडून गेला. हे संकट द्वारकेकडे येण्याची शक्यता होती, पण आतां कुणालाच या वार्तेचे कांही वाटले नाही. जगायचे म्हणून पुढ्यात आलेले अन्न ग्रहण करत होते. पण निद्रा? ती तर सर्वांवरच रुसली होती.

               एक दिवस गुरुवर्य सांदीपनी,गुरुमाता पुत्रासोबत सांत्वनासाठी द्वारकेत आले आणि प्रत्येकीच्या मनाचा बांध सुटला. गुरुवर्यांनी पित्याच्या ममतेने जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगीतले. म्हणाले, उरलेले आयुष्य इश्वरचिंतनात  शांतपणे निर्लेप वृत्तीने घालवले तरच हा मार्ग पार करणे सोपे जाईल. त्यांच्या सांगण्याने रुख्मिणीचे मन थोडे शांत झाले, आणि विचार आला इथला न्याय सोडून गुरुवर्याच्या आश्रमात जाऊन खर्‍याखुर्‍या वानप्रस्थाचा स्विकारावा कां? विचारावे कांं स्वामींना? या घटनेपासून निवांत अशी स्वामींची भेट झालीच नव्हती. अखेर उध्ववजीकरवी सर्व राण्यांना भेटण्या साठी वेळ काढावा असा संदेश पाठवला. पुत्र, पौत्र शोकाने प्रत्येक जण स्वैरभैर झाली होती. सुना, नातसुना माहेरी गेल्या होत्या. पण आठही राण्यांनी द्वारका सोडण्याचे नाकारले. आतां कुणाला धीर देणे तर दूरच, पण धीराचे शब्दही ऐकायला नको वाटत होते. एक मास उलटला तरी दुःखाची तीव्रता कमी झाली नव्हती. वाटत होते, धरणी दुभंगून सार्‍यांनीच त्यात गडप व्हावे.

              एक दिवस कालिंदी म्हणाली, ताई, आपल्या जगण्याचे प्रयोजनच संपले. आता चिरकाल विश्रांती घ्यावीसी वाटते, ताई, स्वामींकडून माझ्यासाठी अनुज्ञा मागवून द्याल? सत्यभामेने तिला आपल्या कुशीत आवेगाने घेत म्हणाली, कालिंदी, आपण सार्‍याच जणी एकाच अवस्थेत आहोत नाही का? चल आपण सार्‍याजणी स्वामींना भेटायला त्यांच्या महाली जाऊ या! रुख्मिणी म्हणाली, आपल्या सार्‍याना भेटण्यासाठी स्वामींना संदेश पाठवला आहे. एवढे सांगून ती कक्षात आली. आतां स्वामींची प्रतिक्षा करणेच हाती होते. अखेर उध्ववजींनी उद्या श्रीकृष्ण राणीद्वीपावर येणार असल्याचा संदेश दिला. आधी सातही राण्यांकडे जाऊन अंती माझ्याकडे येण्याचा सांगावा द्या भाऊजी!

                       क्रमशः
   संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                दि. १०-६-२०२२.

43

*!!!रूख्मिणी अंतिम भाग-४३!!!*

              रुख्मिणी एकटी असली की, संपूर्ण जीवनपट दृष्टीसमोरुन एखाद्या चलचित्राप्रणाणे सरकत असे. ठरल्या प्रमाणे स्वामी राणीद्वीपावर आले. प्रत्येकीकडे एक एक दिवस राहून, त्यांच्या मनोव्यथा जाणून त्यांचे योग्य सांत्वन करुन ते रुख्मिणीकडे आले तेव्हा ती गवाक्षातून सागराकडे बघत होती. स्वामी शेजारी येऊन उभे राहिले. त्यांच्या नुसत्या आगमनाच्या चाहुलीने ह्रदयात दुःखाच्या लाटा उसळल्या. नेत्रातून आसवांचा पूर वाहू लागला. मनाला कसे आवरावे कळेना. भावनांचा आवेग सहन न होऊन उभी काया गदगदू लागली. त्यांनी दंडाला धरल्याबरोबर त्यांच्या कुशीत शिरली. तिला मुकपणे थोपटत होते. या अवस्थेत किती वेळ गेला कळलेच नाही. हळूहळू शांत होत ती भानावर आली.

                   त्यांच्याकडे दृष्टी टाकली तर, त्यांच्या डोळ्यातून आसवांच्या सरी वाहत होत्या. तिने पदराने त्यांचे आसू पुसले. शांतपणे आसनस्थ झाले. धीरगंभीर स्वरांत म्हणाले, रुख्मिणी, तूं विध्यात्याची करणी जाणतेसच. जीवमात्रांचे अस्तित्व, देहाचे कवच, आत्म्याचे अमरत्व या सार्‍याचे ज्ञान तुला आहे. जे गेले त्यांची नियोजित वेळ आल्यामुळे गेले. रुख्मिणी, आपलाही समय जवळ आला आहे. मन घट्ट करुन ऐक प्रिये,मी स्थापित केलेली ही प्रिय  द्वारका माझ्याबरोबरच लय पावणार आहे. या  सुवर्णद्वारकेचा जन्म, उत्कर्ष, लय या सार्‍या जीवनातील घटना म्हणजे मानवाला जीवनाचे सत्य उलगडून दाखवण्यास दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. एका विशिष्ट उद्देशाने विध्यात्याने या घटनाची योजना केली होती. मी सांगतो ते लक्ष देऊन ऐक. मथुरेवर जरासंधाच्या सतत आक्रमनाने तेथील जन जीवन विस्कळीत झाले होते.भीतीच्या दडपणाखाली जगत होते. केवळ माझ्या मथुरेतील वास्तव्यामुळे. म्हणून सुरक्षित द्वीप शोधून कल्पकता,सौंदर्य आणि आदर्श वास्तुशास्राची अजोड कामगिरी करुन ही सुवर्ण द्वारकानगगरी वसवली. पण नुसती नगररचना करुन चालत नाही तर, सुखी,समाधानी, निरामयी जीवन व्यापन होण्यासाठी, व आरोग्य, आर्थिक आणि महत्वाचे म्हणजे, नैतिक संपन्नतेची आवश्यकता असते. त्यादृष्टीने उद्योग, व्यायामशाळा, नैतिक, सामाजिक, धार्मिक  शिक्षण मिळण्यासाठी पाठशाला, आदर्श शिक्षकवर्ग, अधिकार्‍याची नियुक्ती, वीरवृत्तीला प्रेरणा, चेतना देण्यासाठी विविध शास्रात निपूण शिक्षणकेंद्र, शस्रनिर्मिती कारखाने ह्या सर्व गोष्टींची योजनाबध्द आखणी आणि पुर्णत्वास नेमण्या साठी असंख्य व्यक्तींचा हातभार लागला. आणि माझे आदर्श राज्य स्थापण्याचे स्वप्न पुर्णत्वास नेऊन भावी पिढ्यांसमोर उत्तम उदाहरण प्रस्तुत  केले.

                 तसेच आर्यवर्तातील दुष्ट, क्रूर, अन्यायी प्रवृत्तीला नष्ट करुन, न्यायाचे, नैतिचेचे राज्य निर्माण करुन भरभराटीस नेण्यासाठी जरासंध, कालयवन, प्रौंड्र, शिशुपाल, नरकासूर अशा क्रूर सम्राटांचा त्यांच्या राज्याची अभिलाषा न धरतां संहार केला. जगाला दाखवून दिले की, पराक्रमाएवढा त्यागही महत्वाचा आहे. नारी जातीची प्रतिष्ठा जपणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे ही जाणीव करुन देण्यासाठी सोळा सहस्र नारींची  नरकासुराच्या बंदिवासातून मुक्तता आणि पुनर्वसन केले. स्री पुरुषातील मैत्रीचे नाते किती दृढ असू शकते हे सखी द्रौपदीच्या नात्याने दाखवून दिले. दुष्ट प्रवृत्तीचा विनाश आणि सत्याचा विजय या नैतिक मुल्यांचे श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी महाभारत घडले. या युध्दाव्दारे भयंकर प्राणहानी, वित्तहानी टळण्यासाठी मी अखेरपर्यत प्रयत्न केले. पण गर्वाने  सतांध, मदोमत्त दुर्योधन पक्षाने ऐकले नाही. अंती विजय सत्याचा झाला हे विश्वाला दाखवून द्यायचे होते, हे काम एकट्याचे नव्हते. या महत् कार्यात मातापिता, दादा, उध्वव आणि विशेष म्हणजे तुझा मोलाचा वाटा आहे.

              रुख्मिणी, माझा जनामच मुळी ” धर्मसंस्थापनार्याय संभवामी युगे  युगे ” या उद्देशाने झाला आहे. आणि हे सर्व नियतीने, विध्यात्याने करवून घेतले आहे. रुख्मिणी, एकच अंतिम सत्य आहे, जिथे जन्म, तिथे मृत्यु, जिथे निर्मिती, तिथे विनाश आहेच. अमर आहे  तो फक्त आत्मा. या द्वारकेच्या माध्यमातून हेच विश्वाला दाखवायचे होते. आपल्या पुत्रांचे तरी काय झाले? वैभव संपन्न सुवर्ण नगरीत जन्माला आले, सारी सुख, सुविधा हात जोडून उभी होती. ते या नगरीची आणखी भरभराट करुं शकले असते. पण दुर्गुणांच्या गर्तेत स्वतःचा विनाश ओढवून घेतला. यादवांचा हा विनाश पुढच्या पिढीला समजुन येईल.

             रुख्मिणी, आज जे भरभरुन बोलतो आहे त्याचा अर्थ एकच, माझा जीवनहेतू, पर्यायाने जीवितकार्य समाप्त झाले आहे. या आत्म्याचे कवच टाकुन आत्म्याच्या मुळस्थानी जाण्याचा समय जवळ आला आहे. थांब! अशी दचकू नकोस. माझ्याशिवाय तू जगू शकणार नाही हे मी जाणतो. माझ्या निर्वाणानंतर काय घडणार आहे हे तुला प्रथम दाखवतो असे म्हणून त्यांनी आपला हात तिच्या मस्तकावर ठेवला आणि ती क्षणात समाधीत गेली. समाधीअवस्थेत तिला दिसले, प्रचंड वादळ, महासागरातील मोठमोठ्या लाटांचे तांडव, जिकडे तिकडे महाप्रलय होत आहे आणि त्या प्रलयात द्वारकानगरीला प्रचंड हादरे बसून नौकेसारखे हेलकावे बसत आहे.आणि ऐकाएकी प्रचंड स्फोटाचा आवाज झाला, क्षणात द्वारका सागराच्या उदरात गडप झाली. आणि रुख्मिणी भानावर आली. नेहमीसारखेच प्रसन्न मुद्रेने स्वामी समोर उभे होते. क्षणांत तिला आतां दिसलेल्या दृष्यांचा अर्थ समजला आणि जन्मजन्मांतरीची खून पटली.

              रुख्मिणी आतां निर्लेप झाली. तिलाही मुळस्थानाची ओढ लागली. पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक जीव नियतीच्या इच्छेने उत्पत्ती, स्थिती आणि लय या मार्गानेच जातो , हा श्रीकृष्णाने जगाला शिकवलेला पाठ आहे. स्वामींच्या पाठोपाठ अनंतात विलिन होण्यासाठी रुख्मिणी सिध्द झाली आहे अगदी तृप्त मनाने…

        शुभस्थे…पंथान… संतु…

       अशा या आदीशक्ती असलेल्या रुख्मिणी मातेला मनःपूर्वक त्रिवार वंदन!

                      !!  समाप्त  !!
 संकलन, लेखन व © ®  मिनाक्षी देशमुख.
             दि. ११-६-२०२२.

रूख्मिणी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading