पेशवाई संपुर्ण भाग ९, (४१ ते ४५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या  स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! पेशवाई  !!!                 

भाग – ४१.

        स्वराज्याचा श्रीमंत पेशवा शनिवार वाड्यात मरुन पडला.वाड्यात नेमकं काय सुरु आहे हे माहित नसल्यामुळे, शिवाय वाड्यात पार्वतीबाई,गंगाबाई, राघोबादादा,आनंदीबाई अशी खाश्या मंडळी आणि इतर नोकरचाकर असल्या मुळे वाड्यावर हल्ला करतां येत नव्हता. असं केल्याने गारदी वाड्यातील लोकांची कत्तल करण्यास मागे पुढे पाहयचे नाही. शांतपणे,पण तातडीने निर्णय घेणे भाग होते.

         श्रीमंत नारायणरावांच्या खूनानंतर गारद्यांनी बरीच लुटालुट करुन राघोबांना बाहेरच्या सदरेत आणुन बसवले. इतक्यात पेशवाईचा जासूद नारोजी नाईकने येऊन प्रथम राघोबांना मुजरा घातला व म्हणाला,श्रीमंत!पुतण्याचा खून करुन झालं ना समाधान!छान केल पेशव्यांच्या वंशात येऊन चांगली किर्ती, चांगला नावलौकिक मिळवला.एवढ्यात अब्दुल युसुफने नारोजीवर झडप घालुन त्यांचे शिर धडावेगळे केले.

          राघोबादादांनी चोपदाराला बोलावुन बुधवार चावडीवर जमा असलेल्या लोकांमधून मालोजीराव घोरपडे आणि बजाबा पुरंदरेंना बोलवायला सांगीतले.नंतर गारद्यासमवेत येऊन चाफेखाणीत असलेल्या पेशव्या च्या दप्तर कचेरीतील गादीवर बसले. कांही वेळाने बजाबा पुरंदरे व मालोजी घोरपडे गणेश दरवाज्यातुन येऊन श्रीमंत राघोबादादांच्या समोर हजर झाले. दादा साहेब गंभीर स्वरात म्हणाले,घडलेली घटना परत येत नाही.आता आम्ही स्वराज्याचे पेशवे झालोत.कोतवालाला सांगुन आमच्या नांवाची द्वाही फिरवुन शहराचा पक्का बंदोबस्त करा.या तुम्ही!

मालोजीराव व बजाबा पुरंदरे रागाने चावडीवर येऊन सगळ्यांना घडलेली घटना सांगताच सर्वांचे अवसानच गळले.

        इकडे शनिवारवाड्यात गंगाबाईंंचा आकांत पाहवल्या जात नव्हता.भिंतीवर डोकं आपटून कपाळ रक्तबंबाळ केलं होतं.पार्वतीबाई त्यांना सावरत होत्या. पण त्यांनी सती जाण्याचा एकच घोशा लावला.पार्वतीबाई समजावत म्हणाल्या तूं पोटुशी आहेस,शास्रानुसार तुला असे करतां येत नाही.तरीही त्या ऐकेनात. शेवटी आनंदीबाईंनी त्यांना ओढून एका खोलीत बंद केले.

         रात्रीच्या काळोखात पुण्यातील प्रमुख मंडळी व बुधवार चावडीवर जमा झालेले सरदार उघडी बोडखी होऊन नारायणरावांच्या अंत्यविधिच्या तयारीला लागले.

         इकडे गंगाबाईच्या भाळावरचं कुंकु पुसलं.हातातल्या बांगड्यांचा चुडा, गळ्यातील मंगळसुत्र तोडून आनंदीबाईने त्यांना बोडकी करण्यास सांगीतले.गंगा बाईच्या आकांताने संपूर्ण शनिवारवाडा रडायला लागला.वाड्यातील सगळी प्रेते उचलून जांभळी दरवाज्याने नदी किनार्याकडे नेण्यात आले.अतिशय गंभीर वातावरणात अत्यंसंस्कार पार पाडून मंडळी परतली.

          रात्री नाना फडणीस,त्रम्बकमामा पेठे आणि हरिपंत फडके हे तीन मुत्सद्दी खिन्नपणे मसलतीसाठी बसले असतांना सखाराम बापू बोकील आल्याचे हुजर्या ने सांगीतल्यावर तिघेही चमकले.राघोबां चा उजवा हात आपल्याकडे कसा?कांही वेळाने सखाराम बापू बोकील माडीवर दिवाणखान्यात दाखल झाले.परंतु त्यांचे आगमन कुणालाच रुचले नाही.नाना फडणीस म्हणालेच,बापू तुमची इथे हजेरी अपेक्षित नव्हती.सखाराम बापू खाली मान घालून अश्रूपूर्ण डोळ्यांनी पश्चातापदग्ध स्वरांत म्हणाले,आम्ही घडल्या अपराधाबद्दल साक्ष द्यायला आलोत.आम्हाला काय दुर्बुध्दी सुचली आणि राघोबांच्या नादी लागलो.

          आम्ही नारायणरावांना धरुन कैद करण्याचा सल्ला दिला होता,परंतु आनंदीबाईने संधीचा फायदा घेऊन नारायणरावांचा पुरता काटाच काढला.. या अपलाधाबद्दल द्याल ते प्रायश्चित घेण्यास तयार आहे.परंतु नाना, गरोदर गंगाबाईंना वाचवा.नाना! कंसाला गोकुळात नादणारा कृष्ण बघवला नाही तसचं गंगाबाईच्या पोटात नांदणारा बाळ पेशवा राघोबांनाही बघवणार नाही. नारायणरावांचे कुळच नष्ट करुन गंगा बाईंनाच संपवतील.नाना,गंगाबाईंना वाचवाss सखाराम बापूंची कळकळ, पश्चाताताचे ओघळणारे अश्रू पेशवाईच्या भलेपणासाठीची साक्ष देत होते.नाना बापूवर नजर रोखत म्हणाले,

“यदा यदा ही धर्मस्य,ग्लानिर्भवति भारत।

अभ्युत्यानम् अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्।।”

         बापू तुम्हाला नारायणरावांच्या खूनाचं खरच प्रायश्चित घ्यायचं असेल तर

आम्हाला प्रामाणिकपणे साथ द्यावीढ लागेल.आपण बारभाईचा कारभार स्थापन करुन लवकरांत लवकर राघोबा नांवाचा काळसर्प पुण्यातून हद्दपार करु.

सर्वांनी एकमताने सम्मती दिली.

               क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – ४२.

       नारायणरावांच्या दशव्याच्या उत्तर क्रियेसाठी झाडुन सगळेजणं नदीवर जमा झाले.याचवेळी कांही अंतरावर नाना फडणीस,त्र्यबंकमामा पेठे,हरिपंत फडके आणि सखाराम बापू यांनी वाळूची पिंड बनवली.त्यावर बेल वाहून पिंडेवर हात ठेवून सूर्याला साक्षी ठेवुन शपथ घेतली…यापुढे श्रीमंत नारायणराव पेशव्यांच्याच नांवाने कारभार चालवु आणि आजपासुन राघोबांच्या वंशाला साधा नमस्कारही करणार नाही.सखाराम बापूंचे सर्वांनाच कौतुक वाटले.नाना म्हणाले,आपला मतलब साधण्यासाठी कांही दिवस त्यांच्याच गोटात राहुन हे वादळ बाहेर कसं काढावं याचा विचार करावा लागेल.आम्ही सोबत आहोच. गरजेनुसार भेटत राहूच!

        अमृतराव हे राघोबांचे दत्तक पुत्र! तसे राघोबांना चार अपत्ये झाली होती. दोन मुलींपैकी मोठी मुलगी दुर्गाबाई ऊर्फ गोदूबाई,जन्म १९ डिसेंबर १७६५!विवाह पांडुरंग बाबुजी नाईक जोशी बारामती करांशी ७ फेब्रुवारी १७७३ मधे नारायणरावांनी मोठ्या थाटामाटाने लावून दिले होते.नारायणराव पेशव्यांच्या हत्तेमुळे आईवडिलांचा राग येऊन तीने बारभाईच्या कारभारास मदत केली.

         १७६९ मधे झालेली दुसरी मुलगी बालवयातच मरण पावली.२६ फेब्रुवारी १७६२ मधे भास्कर नांवाचं झालेलं तिसरं अपत्य देवीच्या आजाराने अल्पायुषी ठरला.चौथं अपत्य विनायक, १५ आक्टो

१७६४ ला चावंडसला झाला,त्याच्या जन्माप्रित्यर्थ चावंडस गांवाचं नांव बदलून आनंदवल्ली ठेवल होत.परंतु एक दिवस हेलकावे देत राघोबा खेळवत असतांना विनायक हातून निसटुन दगडा वर आपटल्या गेल्याने जागीच ठार झाला

अश्या तर्हेने राघोबांची दोन मुलं डोळ्या देखत पाखरांसारखी उडून गेली.

“विषाच्या पोटी विषारी फळं… नाही दळ तो भगवंत कैसा?” वंशाला दिवा म्हणून राघोबादादांनी गोपाळराव भुस्कुटेंचा ३॥ वर्षाच्या अमृतरावांना १९ एप्रील १७६८  ला विधिपूर्वक दत्तक घेतले.

           १० आक्टोबर १७७३ साली सातारकर छत्रपतींकडून राघोबादादांना पेशवाईची वस्रे मिळाली.ती वस्रे राघोबां नी शनिवारवाड्यात न स्विकारतां आळेगांवला ३१ ऑक्टो.१७७३ रोजी साध्या समारंभात स्विकारली.राघोबा दादा श्रीमंत पेशवे झाले.राज्यकारभारास सुरुवात झाली. मग काय, नाटकशाळा, मद्य,स्रीया,नृत्य यात ते रंगु लागले.परंतु समाजातला रोष मात्र ओसरला नव्हता.

       त्यामुळेच,शेवटी राघोबादादा आरोपी म्हणून रामशास्री प्रभूणे समोर उभं राहावं लागलं.रामशास्री म्हणजे, तत्वनिष्ठ व्यक्तीमत्व!त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ!माधवराव पेशवे सुध्दा त्यांना मानत होते.त्यांनीच स्वराज्यात न्यायप्रक्रीयेला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली होती.आज नेमका पेशवाई च्या घरचा वाद चव्हाट्यावर आला. रामशास्री प्रभूणेंनी नारायणरावांच्या खूनाचा स्पष्ट आरोप राघोबादादांवर करत म्हणाले, दादासाहेब एकवेळ तुम्ही आमचााआवाज बंद करुं शकाल परंतु जनतेचा नाही.तुम्ही खूनी असल्यामुळे गादीवर बसण्याचा अधिकार तुम्हाला नाही.हे ऐकून तुळाजी पवार चिडून ओरडत म्हणाला,शास्रीबुवा,पेशव्यांना खूनी ठरवून भरदरबाराचाच अपमान करीत आहांत,काय पुरावा आहे ?

          रामशास्री मिश्कील हसत म्हणाले आम्ही स्वराज्याचे न्यायाधीश,पुराव्या शिवाय बोलत नाही.हा घ्या पुरावा… म्हणत,राघोबांनी सुमेरसिंगला पाठवले ला हुकुमनामा भरदरबारात दाखवला. हुकुमनामा पाहुन सारा दरबार चमकला. दादासाहेबांनी स्पष्ट लिहिलय! “श्रीमंत नारायणरावास मारावे।” म्हणजे आमचा कार्यभाग साधता येईल.!”खाली त्यांची सही होती.

       तुळाजी पवार,हुजरेगिरीतच तुमचं आयुष्प गेलं!स्वराज्याचं मीठ एवढं स्वस्त वाटलं की काय तुम्हाला?सुमेरसिंगकडे हा हुकुमनामा तुम्हीच पोहचवला होता ना?चतूर राघोबादादा गयावया करत माफी मागत म्हणाले,शास्रीजी हवं ते प्रायश्चित सांगा!श्रीमंत एकच प्रायश्चित.. देहान्त प्रायश्चित!आत्मशुध्दी,देहशुध्दी देहान्त प्रायश्चित हा एकच मार्ग आहे. आजपर्यंत न्यायाधीश म्हणून स्वराज्यात मानाने राहिलो.हा आमचा शेवटचा निवाडा.शिक्षेची अंमलबजावणी करणं अथवा न करणं हे सर्वस्वी आपल्यावर सोपवतो.ज्याक्षणी न्यायाची पायमल्ली करुन खुद्द पेशव्यांचा खून झाला,त्याच क्षणी पेशवाईच्या अस्ताला वेध लागले. जिथे न्याय नाही तिथे प्रभूणे नाही,म्हणत ते तडक दरबारातुन निघून गेले.

              क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – ४३.

          गंगापुरी गोपिकाबाईंना नारायणरावांच्या खूनाची बातमी समजली आणि त्यांच्या मनाच्या ठीकर्या ठीकर्या झाल्या.पानिपतवर विश्वासराव, थेऊरास क्षयाने गेलेले माधवराव आणि शनिवारवाड्यात बळी पडलेले नारायण  यांच्या आहुत्या गोपिकाबाईंच्या नजरे समोर आल्या.त्या विषन्न मनःस्थितीत गंगापूरचा वाडा सोडून भटकत भटकत नाशिकला पंचवटीत दाखल होऊन जोगवा मागत,वीतभर पोटाची खळगी, मिळणार्या भिक्षेवर भरु लागल्या.ऐके काळच्या पेशवीन म्हणून मिरवणार्या त्यांचे आज राघोबांमुळे दैव फिरलं होतं.

             रहाटचा बंगला!श्रीमंत राघोबा पेशवे झोपाळ्यावर विचारमग्नावस्थेत बसले होते.राहून राहून रामशास्री प्रभूणें च्या शब्दांची आठवण येत होती.एकच प्रायश्चित….देहान्त प्रायश्चित!राघोबा मनात हसत म्हणाले!शास्रीजी तुम्ही चुकीचा निर्णय दिलात!असुरांच्या राज्यात कायद्याला महत्व नसते.जे मागून मिळत नाही ते हिसकावून घेणं हा राघोबांचा धर्म!त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी बेहत्तर!इतक्यात सखाराम बापू आले.हसत म्हणाले,बापू आतांपर्यंत तुम्ही फार मोलाचे सहाय्य केले,पुढेही लागेल.तेव्हा स्वतःची माणसं पेरुन ठेवा,गुप्तहेरांची संख्या वाढवा.फळ्या मजबूत करा.

           अत्यंत घातकी माणुस सखाराम बापू जवळून बघत होते.त्यांनी नदीवर वाळूच्या पिंडीवर घेतलेल्या शपथेची आठवण झाली.आतां स्वराज्याचा डाव नव्याने साधायचा होता.प्रयत्नांची पराकाष्ठा करुन हा काळसर्प बाहेर घालवायचा होता.आम्हाला फसवून नारायणररावांचा खून केला ना,आतां तुम्हाला फसवून धडा शिकवणार आहे.

प्रगटपणे बापू म्हणाले,श्रीमंत!पुण्यात तुमच्याविरुध्द प्रचंड असंतोष माजलाय! आरोप करणार्या प्रत्येकाला हंटरने फोडून काढा.जीभा छाटा,हत्तीच्या पायी द्या.श्रीमंत प्रजेला केव्हाही धडा शिकवता येईल,परंतु बाहेरच्या शत्रूचे काय?साबाजी भोसले निजामाच्या आश्रयाला गेले,त्यांनीच आक्रमण केले तर?गुप्तहेरांकडून आजच बातमी आलीय!मोगलांनी दक्षिणेत पेशवाईच्या अंमलाखालील सर्व ठाणी घेण्याचा धडाका सुरु केला.दक्षिण मुलूख म्हणजे,खंडणी व सोन्याची अंडी देणारा मुलूख!आपल्याला दक्षिण मुलूख घालवून जमणार नाही.आपल्याला लवकरच मोहिमेवर निघावं लागेल.

          मोहिमेवर निघण्यापूर्वी राघोबा दादांनी शनिवारवाड्याचा कडेकोट बंदोबस्ताची जबाबदारी अप्पाजी तुळशी बागेवालेंवर सोपवला.आणि वाड्याची जबाबदारी खाजगी कारभार्यावर सोपवली.सर्वीकडे गुप्तहेर पेरले. आपल्या माघारी बंड होऊ नये म्हणून नाना फडणीस,हरिपंत फडके,मोरोपंत चिटणीस,बाजीपंत जोशी आणि बजाबा पुरंदरे यांना कैद करुन मोहिमेवर सोबत नेण्याचा निर्णय घेतला.त्र्यबंकमामा पेठेवर फौजेची जबाबदारी सोपवली.

          हरsss महादेवsss च्या गर्जनेत मराठी फौजा भीमा नदी ओलांडून सिध्दटेकहून पेडगावात छावणीचा मुक्काम पडला.राघोबांच्या सोबत सेवेला नाटकशाळा होत्याच.सैन्य विश्रांती घेऊ लागली.तेवढ्यात सखाराम बापू राघोबांच्या डेर्यात प्रवेशीत म्हणाले, श्रीमंत सासवडला आमच्या चिरंजीवाची मुंज असल्यामुळे येत्या आठवड्यात जावं लागेल.ठीक आहे जा तुम्ही.गरज पडली तर बोलावुन घेऊं.

           सखाराम बापू तडक नाना फडणीसांच्या डेर्यात दाखल झाले. त्यांच्याशी गुप्त चर्चा करुन ते बाहेर पडले.आतां स्वराज्याला नवी दिशा,नवे कोंब फुटणार!इतके दिवस राघोबांच्या बंधनांत अडकलेली जखडलेली मराठी माती दीर्घ निःश्वास सोडणार होती.

          नंतर सखाराम बापू चिंतो रायरीकरांच्या राहुटीत दाखल होत म्हणाले,चिंतोबा,श्रीमंतांनी एक निर्णय अतिशय चुकीचा घेतला.नाना फडणीस, हरिपंत फडके,त्र्यंबकमामा पेठे यांना कैद करुन सोबत निखारे घेऊन मोहिम करणें ठीक नाही.त्यांना पुण्याला परत पाठवुन त्यांच्या घरांवर चौकी पहारे बसवावे. चिंतोपंतांना सल्ला पटल्यामुळे,राघोबांना हा विचार पटवून देत म्हणाले,कैद्यांना सखाराम बापूंबरोबर पाठवावे.आणि इथेच स्वराजाचं वारं फिरलं.श्रीमंतांचा निरोप घेऊन सखाराम बापू फौजेसह, नाना फडणीस,हरिपंत फडके, त्र्यंबक पेठे या कैद्यांना घेऊन पुण्यांत दाखल झाले.प्रत्येकांच्या घरावर चौक्या पहारे बसविले.

               क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख

!!!  पेशवाई  !!!

भाग – ४४.

        गुप्त मसलत करुन गंगाबाईंना शनिवारवाड्यातून काढून नारोजी तुळशीबागवालेंच्या मदतीने पार्वतीबाई, सगुणाबाई,दुर्गाबाई या सर्वांना घेऊन कडक बंदोबस्तात माहेरी बाळांतपणा साठी नेत असल्याचा बहाणा करुन सखाराम बापू पुरंदरच्या किल्लावर दाखल झाले.

         स्वराज्याची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी,नाना फडणीस,सखाराम बापू बोकील,त्र्यंबकमामा पेठे,हरिपंत फडके आणि मोरोबा तात्या या पांच महारथींनी बारभाई कारस्थानाची स्थापना करुन,राघोबांना स्वराज्यातून कायमचे हद्दपार करण्यासाठी,नाना फडणीसांनी गुप्तहेरामार्फत राघोबांच्या सरदारांना,पुरंदरहुन गंगाबाईंच्या नांवाने राज्यकारभार सुरु केला असल्याचे पत्रे पाठवली. जे सामील होणार नाही त्यांच्या घरादाराची जिम्मेदारी आम्हावर राहणार नाही.त्या पत्रांनी राघोबांच्या फौजेत गोंधळ उडला.सरदारांनी आम्हासाठी काय हुकुम? विचारल्यावर,राघोबा खिन्न स्वरांत म्हणाले,ज्यांची आमच्यावर प्रेम, निष्ठा असेल त्यांनी थांबावे,ज्यांना सोडून जायचे असेल त्यांना अडवणार नाही. क्षणात वातावरण दुभंगले,फळी फुटली. मानकरी,सरदार,शिलेदार,एकंडे,हुजरत,पागे,शिपाई यांनी आवराअवर करुन डेरे, पालं उठली.लोकांना जातांना पाहून, राघोबांच्या ह्रदयात कळ उठली.पराभवा चा पहिला सुस्कारा निघाला.

        मराठी मुलखात झंझावती वादळा ला सुरुवात झाली.स्वराज्याचा नवा डाव मांडण्यासाठी बारभाईच्या हालचालींना प्रचंड वेग आला.शिवाय राघोबांना सोडून आलेल्या लोकांमुळे बारभाईची फळी आणखी मजबूत झाली.राघोबांच्या नाड्या आवरायला सुरुवात झाली.ते निजाम,हैदर यांना आश्रय मागतील हे ओळखुन, नाना फडणीसांनी निजाम, हैदर,राजे रजवाडे,संस्थानिक,पाळेगार, सुभेदार,महलोमहली किल्लेदार या सर्वांना,राघोबादादांनी स्वतःच्या पुतण्या चा खून करुन ते बंडखोर झालेत,त्यांना आश्रय,मदत दिल्यास तुम्हासही घेऊन बुडतील,अशा आशयाचे पत्रें गुप्तहेरां मार्फत रवाना केले.

          नाना फडणीसांनी कयास केल्या प्रमाणे राघोबांनी हैदरशी संधान बांधून कल्याणदुर्ग येथे तह केला.पूर्वी माधवराव पेशव्यांनी तीन स्वार्या करुन मिळवलेला ५० लक्ष रुपयांचा मुलूख राघोबांनी सहज नजराणाच्या रुपात भेट केला.तसेच स्वराज्यातील तुंगभद्रा व कृष्णा नद्यांं मधील पाऊन कोट रुपये उत्पन्नाचा मुलूख केवळ सहा लक्ष खंडणी सालाना मिळावी या अटीवर देऊन टाकला.हा मुलूख स्वराज्यातील वाघांनी कितीतरी कष्टाने मिळवला होता आणि राघोबांनी नाममात्र खंडणीवर हैदरच्या स्वाधीन करुन मोकळे झाले.

          हैदरच्या मदतीने राघोबा पंढरपूर जवळील कासेगांवला येताच त्र्यंबकराव पेठेच्या सैन्याशी गाठ पडली.तुंबळ युध्द झाले.त्र्यंबक पेठेंना जखमी अवस्थेत २ मार्च १७७४ ला कैद करण्यांत आले.

          इकडे पुरंदरच्या किल्ल्यावर १८ एप्रील १७७४ बुधवारी पेशवाईचा नवा तारा सवाई माधवराव जन्माला आले. वयाच्या अवघ्या ४० व्या दिवशी श्रीमंत सवाई माधवरावांना पेशवाईची महावस्रे, शिक्के,कट्यार निशान मिळाले.स्वराज्या ला नवीन पेशवे मिळाल्याची बुंदेलखड, झांशी,काठेवाड,महादजी शिंदे,विसाजी कृष्ण बिनिवाले,होळकर,भोसले, गायकवाड आणि कर्नाटक प्रांती पाठवून राघोबास जो मदत करेल त्याचा बंदोबस्त करण्यांत येईल अशा आशयाची पत्रें रवाना केले.गुप्त मसलतीत नारायणरावां च्या खूनात ज्या ज्या हस्तकांचा हात होता त्या लोकांसाठी अटकसत्र सुरु झाले.खूनाचा मुख्य हस्तक तुळाजी पवार,प्रथम हैदरकडे व नंतर गोव्यास पळाला.गोव्याच्या पोर्तुगीजांनी त्याला पकडून बारभाईच्या हवाली केले.सदोष मानववधाचा अपराध सिध्द झाल्यावर देहान्ताची शिक्षा दिली.खरकसिंगालाही देहान्ताची शिक्षा झाली.अब्दुल युसुफला नागपूरकर भोसलेंनी पकडून बारभाईच्या ताब्यात दिल्यावर त्याचे पांच पाट काढून डोक्यात शेंदूर फासून गाढवावर धींड काढून डोक्यात मेखसू घालून ठार केले. सखाराम हरि गुप्तेंना लोखंडी साखळदंड घालून कैद करण्यांत आले.आणि सर्व संपती जप्त करण्यांत आली.शेवटी अवजड बेड्यांवर डोके आपटून सखाराम हरि गुप्तेंनी आत्महत्या केली. (वरील सर्व घटना वेगवेगळ्या वेळी घडल्या आहेत.)

                क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

भाग – ४५.

            शनिवारवाड्यात गुप्त मसलतीत सर्व प्रमुख मंडळी चाफेखणीच्या दिवान खान्यात जमा झाली होती.सर्वानुमते हरि पंत फडकेंची सरसेनापती म्हणून निवड करण्यांत आली.त्यांना सरसेनापतीची वस्रे,जरीपटका व हाताखाली सदाशिव कामरकर यांना देऊन राघोबादादांना अटक करण्याच्या मोहिमेवर पाठवले.

         मराठी फौजा आपल्यावर चालुन येत असल्याची खबर दादासाहेबांना मिळतांच,तुळजापूरमार्गे बर्हाणपूर अशेरीच्या मैदानावर पोहचले.इथेच फितूरी झाली.भांडणे पेटली.जखमी अवस्थेत असलेल्या त्र्यंबक पेठेंना या लढाईच्या रणधुमाळीत कुणीतरी गोळी मारल्याने पेठे मृत्युमुखी पडले.युध्द थांबल.राघोबादादांचा पक्ष सोडून फौजेतले कांही सैनिक पुण्याकडे परतले.इथे राघोबादादांची दुसरी फळी फुटली.

          इकडे हरिपंत फडकेंना हेरांकडून बातमी मिळाल्यावर,राघोबांच्या मागावर निघाले पण त्याआधीच राघोबा नर्मदा ओलांडून मावळ्यात दाखल झाले. राघोबांनी शिंदे,होळकरांशी संधान साधले,पण उपयोग झाला नाही.शेवटी महेश्वरहून धारला गेले.यावेळी आनंदी बाई सोबत होती.आनंदीबाई गरोदर असल्यामुळे या रणधुमाळीच्या काळात त्यांचे हाल होऊ नये म्हणून खंडेराव पवार यांचेकडे धारच्या किल्ल्यावर ठेवले रात्री आनंदीबाईंशी बोलतांना म्हणाले, आनंदी!आज आमच्याच दातांनी आमच्या ओठांशी वैर मांडलय!आम्हीही बघतोच ही बारभाई मंडळी पेशवाई कशी चालवतात.प्रसंगी इंग्रजांशी संधान बांधून पेशवाई पार उध्वस्त करु.आम्हाला जर पेशवाईचा उपभोग घेता येणार नसेल तर दुसर्यांनाही घेऊं देणार नाही.पेशवाई नेस्तनाबूत करुन पार जाळून टाकु !

          राघोबादादा फौजेसह खंबायतला येऊन इंग्रजांशी संधान बांधले,पण मदत मिळाली नाही.इकडे धारच्या किल्ल्यात १० जानेवारी १७७५ रोजी आनंदीबाईंनी मुलाला जन्म दिला.बाजीराव!हाच तो दुसरा बाजीराव!

      राघोबादादा गुजराकडे निघाले असतां हरिपंतांनी त्यांना मधे गाठले.१७ फेब्रुवारी १७७५ ला दोन्ही सैन्यात युध्दाला तोंड फुटले.तुंबळ युध्द झाले. यात राघोबांचा पराभव झाला.त्यांच्या कडच्या तोफा,हत्ती,घोडे सारंकाही फडकेंच्या फौजेनं पळवून नेले.या रणधुमाळीतही राघोबांच्या सोबत असलेल्या आठ नाटकशाळा(कंचनी) , पंचेचाळीस खितमददारांना घेऊन पायीच भावनगर,धंदुक मार्गे धो धो बंदरावर आले.या बंदरावर ब्रिटीश एजंट मॅलेटशी गाठ पडली.या मॅलेटने पुढील हित लक्षात घेऊन त्याने स्वखर्चाने जहाजातून  सुरतला नेले.२३ फेब्रुवारी १७७५ ला राघोबा सुरतला पोहोचले.

          ६ मार्च १७७५ ला राघोबादादांनी इंग्रजांशी तह केला.तहाप्रमाणे इंग्रजांनी ७०० युरोपियन आणि १८०० हिंदी फौज देण्याचे आश्वासन दिले.राघोबांनी या सैन्य खर्चासाठी दरमहा दीड लाख व अंकलेश्वराच्या वसूलकरातून ७५००रुपये देण्याचे कबूल केले.चतूर,ध्येयधोरणी इंग्रजांनी संधीचा फायदा घेऊन राघोबां कडुन सहा लक्ष रुपयांचे दागदागिने तारण म्हणून ठेवून घेतले.पेशवाईच्या गादीवर बसवण्यास मदत केली.त्या बदल्यात वसई,साष्टी,जबुसार,ओलपड आणि मुंबईजवळची बेटे देण्याचे कबूल केले.

        या तहानंतर ब्रिटीश सेना प्रमुख कर्नल किटींगसह राघोबा खंबायतकडे निघाले असतां,हरिपंत आणि राघोबांच्या फौजेची हासोली गावाजवळ गाठ पडली. हरिपंत फडकेंनी गनिमी काव्याने कर्नल किटींग व राघोबांच्या सैन्याची तुंबळ युध्द करुन चांगलीच दाणादाण उडवुन दिली.

        हिंदुस्थानाता इंग्रज सरकारचा विस्तार करणारा हुशार अधिकारी वाॅरन हेस्टीग्जने फ्रेंच आणि मराठेंना नेस्तनाबूत करण्याचा डाव होता.पण त्या वेळी इंग्रजांची स्थिती तेवढी मजबूत नसल्यामुळे कर्नल ॲप्टनला तहाची बोलणी करण्यास बारभाईकडे पुरंदरला पाठवले.प्रदीर्घ वाटाघाटी नंतर १ मार्च १७७६ रोजी पुरंदरचा तह झाला.या तहात साष्टीबेट व ठाण्याचा भाग इंग्रजांच्या ताब्यात राहील.राघोबांना शांत बसवून त्यांनी ३ लक्ष १५ हजार द्यावे.तसेच या पुढे राघोबांचा पक्ष घेऊन लढणार नाही, मदत करणार नाही.

               क्रमशः
 संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

पेशवाई संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading