पेशवाई संपुर्ण भाग ६, (२६ ते ३०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या  स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! पेशवाई  !!!

                  भाग – २६.

        पैसा संपला.सर्वांचे अतिशय हाल सुरु झाले.सैनिकांची शरीर क्षमता क्षीण झाली.कुठुनही मदतीची आशा नाही. वारंवार पुण्यास पत्रे पाठवून उत्तर नाही. शेवटी लूटमारीशिवाय पर्यायच उरला नाही.बुंदेले,बर्वे लूटीसाठी निघाले पण यमुनेला प्रचंड पूर असल्यामुळे हात हलवत परत आले.संकटांची मालिका सुरु झाली.अन्नपाण्याविना चाललेले हाल भाऊंना बघवत नव्हते.शेवटी कोंडी फोडण्याचा एकच मार्ग,तह!तहाचा प्रस्ताव घेऊन भवानी शंकर अब्दालीकडे गेले,पण अब्दालीने भलत्याच अटी तहात मांडल्यामुळे भाऊंनी अटी अमान्य करुन युध्दाचा निर्णय घेतला.

          यमुना दुथडी भरुन वाहत होती. अखेर एका ठीकाणी  दिल्लीपासुन कांही अंतरावर कुंजपुर्या जवळ कर्णाळा येथे उताराची माहिती मिळाली.कुंजपुरा गांव आणि किल्ला अब्दालीच्या ताब्यात होता या किल्ल्यावर भरपूर अन्नसाठा,चारा वैराण,पैसा अडका होता.अब्दालीला याच मार्गाने रसद येत होती.सदाशिवराव भाऊंनी दिल्ली सोडून कुंजपुर्याकडे प्रयाण केले.मराठ्यांनी हरहर महादेवा च्या गर्जनेत १७ ऑक्टोबर १७६० मधे कुंजपुरा किल्ल्याला तडाखा दिला. अब्दालीचे पठाण,रोहीले,गिलचे असे एकूण दहा हजार सैनिक मारल्या गेले. कुंजपुरा किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला.

          मल्हारराव होळकरांनी मिळाले ल्या लूटीवर समाधान मानुन दिल्लीकडे परत फिरण्याचा सल्ला भाऊंना दिला. परंतु भाऊंनी मानले नाही.अंदाज चुकला अब्दाली एक हुशार,मुत्सद्दी सेनापती! त्याने धोका पत्करुन पाउण लाख फौजे सह यमुना पार केली.मराठे मिळालेल्या विजयाच्या धुंदीने गाफील राहिले. पहार्यावर असलेल्या बाबा हरि देशपांडे च्या अडीच हजार पथकाची आणि अब्दालीच्या पाउण लाख सेनेशी गाठ पडली.मोठी चकमक उडली.बाजी हरी देशपांडेच्या १२०० सैनिकांची मुंडकी अब्दालीच्या सैन्याने धडावेगळी केली. उरलेले सैन्य भाऊकडे परत आले.भाऊ खिन्न झाले.अब्दाली नेमकी दिल्लीची वाट अडवुन बसलेला.युध्द अटळ आहे.

शेवटी पानिपतवर फौजफाटा,बाकीच्या लोकांसह येऊन छावण्या,तंबू ठोकल्यात

       पानिपत!महारणकुंड!रक्तपिपासू भूमी!कांही दिवसांतच रक्ताचा अभिषेक घडणार होता.तारुण्याच्या आहुती पडणार होत्या.तळतळाच्या शापाने बावणखनीचा शनिवार वाड्यातील प्रत्येक कोपरा विखरणार होता.नियतीचा हाच निर्णय होता.

            २२ नोव्हेंबर १७६०! कार्तिक शुध्द पोर्णिमा,चंद्र ग्रहण!मराठा फौज तंबुत पहुडली होती.तेवढ्यात चोर पावलाने अब्दालीचा वजीर शहावली खान टेहाळणीसाठी मराठ्यांच्या छावणीत दाखल होतांना जनकोजी शिंदे च्या लोकांनी त्याला ओळखले.हरहर महादेवाच्या गर्जनेत भयंकर लढाई जुंपली.वजीराच्या सैन्याची कत्तल झाली.

कांही अंतरावर असलेल्या अब्दालीच्या छावणीकडे वजीर जीव वाचवून पळाला.  अब्दालीचे सैनिक दिनदिन करत मराठ्यां वर तुटुन पडले.गोविंदपंताचे कापलेले शिर अब्दालीने भाऊकडे पाठवले. बळवंतराव मेहेंदेही कामी आले.

        ऐनवेळी द्रव्य संपले.गोविंदपंत गेल्याने रसद बंद झाली.कुठुनही मदती ची आशा नाही.अन्नान दशा झाली. जनावरच काय पण माणसं खायची वेळ आली.

           १३ जानेवारी १७६१ च्या रात्री मसलती झाल्या.प्रत्येक सरदारावर महत्वाच्या जबाबदार्या सोपवल्या. कसेही करुन अब्दालालीला बगल देऊन दिल्लीला पोहचण्याचा बेत आखल्या गेला.सर्वांनी सामानाच्या बांधाबांधीला सुरुवात केली.

           १४ जानेवारी १७६१ ची पहाट उजाडली. भाऊ व विश्वासरावांनी आन्हिक उरकुन पुजापाठ केला.दोघांनी ही सैनिकी पोशाख चढवला.नमस्कारा साठी विश्वासराव भाऊंच्या पायांशी वाकले असतां भाऊंनी वरचेवर उचलुन त्यांना मिठीत घेत,पाठ थोपटत म्हणाले, आपण स्वराज्याचे खरे पाईक!याच धगधगत्या यज्ञकुंडावर पेशवाई उभी ठेवूं चला विश्वासराव! इब्राहिम गारदीने केलेल्या युध्दरचनेतुन आपण सहज बाहेर पडूं, चला….

         समोर रणांगणावर सैनिककांची प्रचंड फौज उभी होती.सर्वांनी या दोघांना मुजरे घातले.हात उंचावुन सैनिकांना संबोधित करत भाऊ म्हणाले,बंधुनो! आपण या पठानांविरुध्द  लढा देण्यास पानिपतवर जमा झालोत.स्वराज्याची शपथ घेऊन म्हणा,”करेंगे या मरेंगे” हरहर मssहाs देss वsss !भाऊंनी समोर बघीतले,छातीचा ढाल करुन उभे असलेले इब्राहिम गारदी,मल्हारराव होळकर,जनकोजी शिंदे,दमाजी गायकवाड,यशवंतराव पवार,अंताजी मानकेश्वर,विठ्ठल शिवदेव आणि समशेर बहाद्दर हे सारे सरदार उभे होते.इब्राहिम गारदी समोर येत भाऊ म्हणाले,तुम्ही खाल्ल्या अन्नाला जागले,फितूर झाले नाही.पेशवाई सदैव ऋणी राहिल.नंतर त्यांनी असाच प्रत्येकाशी संवाद साधला.

                  क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

                 भाग – २७.

           रणशिंगे,नगारे,तासेच्या रण वाद्यात व हरहर महादेवाच्या गर्जनेत भाऊंचे व अब्दालीचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले.भाऊंच्या परवानगीने इब्राहिम गारदीने तोफेला बत्ती दिली. भयानक युध्दाला सुरुवात झाली. तलवारी एकमेकांवर खणकु लागल्या.जो तो प्राणाची बाजी लावुन निकराने लढू लागला.बघतां बघता अब्दालीच्या फौजेची दाणादाण उडाली.पानिपतची रणभूमी रक्ताने न्हाऊन निघाली.

             युध्द धुमश्चक्री सुरु असतांना दुपारच्यावेळी विश्वासरावांना गोळी लागली.क्षणार्धात त्यांनी पानिपतावर अंग टाकले.विश्वासराव ठार झाल्याचे कळताच रणांघणाचा नूरच पालटला.  फौज थांबली.भाऊ शस्र टाकुन पुढे आले विश्वासरावांचा गोरापान देह पडलेला पाहून केवढ्यांदा ओरडले,विश्वासरावss  आम्ही नानांना कसे तोंड दाखवु?तुमचा जिम्मा आमच्यावर मोठ्या विश्वासाने सोपवला होता.त्यांचा विलाप सुरु असतांनाच,सैनिक पळू लागली ते पाहुन सोबत आलेली लोकंही पळूं लागले.या धावपळीत कितीतरी लोकं चेंगरुन मेले. मल्हारराव होळकर,विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड हेही जीव वाचवण्या साठी  पळाले.

            याच संधीचा फायदा घेऊन अब्दालीने नव्या दमाच्या तुकड्या पाठवल्या.या तुकड्यांनी पळणार्या फौजेला,यात्रेकरी,बाजारबुगणे स्रीयांना गाठून कत्तल करुं लागले.दुःखातुन थोडे सावरलेले भाऊ सैन्यांना आवरण्याचा प्रयत्न करत लढण्यासाठी आवाहन करु लागले पण ऐकण्याच्या मनःस्थितीत कुणीच नव्हते.भाऊंच्या सर्वांगात अग्नि कुंड पेटले,काळजात आग भडकली. डोळ्यात निखारे फुलले,नसानसा ताठ झाल्या आणि कशाचीही पर्वा न करतां रिंगण फोडून अब्दालीच्या सहा हजार फौजेत घुसले.आणि सदाशिव भाऊंचा अखेरचा चित्कार ऐकूनच पानिपत शांत झाले.

      इब्राहिम गारदीचा शिरच्छेद करण्यात आला.जानकोजी शिंदेंचा अतोनात छळ करुन मारण्यात आले, तुकोजी शिंदे रणी पडले.अंतोजी माणकेश्वर आणि समशेर बहाद्दर जखमी अवस्थेत दिग गावी आलेत,पण अत्यवस्थेत त्यांच्यावर मृत्युने झडप घातलीच!संताजी वाघ,मानाजी पायगुडे, यशवंतराव पवार,बाजी हरि देशपांडे ठार झालेत.बाकीच्या लोकांच्या कत्तली केल्या.स्रीयांची अब्रू लुटल्या गेली.जे जीव घेऊन पळाले त्यांना गावकर्यांनी मारहाण करुन लुटले.

“दोन मोती गळाले,सत्तावीस मोहरा हरवल्या,रुपये आणि खुर्दाचा पत्ता नाही”

         पुण्याचा बावणखणी शनिवारवाडा

      नानासाहेब यावेळी आपल्या दहा वर्षाच्या नववधू राधाबाईकडे बघत होते. जेव्हा पानिपतवरुन पत्रे येत होती, नाना साहेब स्वतःच्या लग्नात गुंतली होती. तेवढ्यात पानिपतची खबर घेऊन गुप्त हेर आला.खाली मान घालुन उभा असलेला पाहुन विचारले,पानिपतची काय बातमी?श्रीमंत! बातमी अत्यंत वाईट आहे.युध्दात विश्वासराव कामी आलेत.काssय आणि श्रीमंतांना भोवळ आली.असंभssव नानासाहेब केवढ्यांदा तरी ओरडले.

       शनिवारवाड्यांत आकांत उसळला. पाठोपाठ तोफगोळ्यासारख्या एका मागुन एक बातम्या येऊन आदळू लागल्या.पानिपतवर सगळी मराठी फौज कापल्या गेली.प्रेतांचे ढीग पडले. सोबत गेलेल्या लोकांच्या कत्तली झाल्या.स्रीयां ची अब्रू लुटल्या गेल्या आणि खबर आली,श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवेही रणांगणी पडले.

          नानासाहेब सुन्न झाले.ते कुटुंबा सह दिल्लीकडे निघाले.ग्वाल्हेरच्या जवळ पाठोरा मुक्कामी असतांना मल्हार राव होळकर आणि पार्वतीबाईची गाठ पडली.खरी हकिकत समजताच,अनावर शोकाने नानांनी अथरुण धरले.शेवटी पुण्यात शनिवारवाड्यात आणले.तिथेही त्यांना स्वस्थता वाटत नसल्याने पर्वतीवर आणले.पुत्रशोक व बंधुशोकाने त्यांची तब्बेत ढासळतच गेली.आपण वेळेवर कुमक न पाठविल्याने पुत्र आणी भावाला गमवावे लागल्याचा पश्चाताप होऊं लागला.पुढे नानासाहेबांना वाताचे झटके येऊ लागले,स्मृती क्षीण झाली. गोपिकाबाई,माधवराव,नारायणरावांनाही ओळखेनासे झाले.वाताच्या झटक्यात ओरडले भाऊss भाऊsss माsफs कर

२३जून १७६१ ला रात्रीच्या दीड प्रहरी ज्योत विझली.नानासाहेब पेशवे स्वर्गवाशी झाले.

       नियतीही आतां नवीन सारीपाट मांडत होती नव्या पेशव्यासाठी!

              क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

                 भाग -२८.

        दोन मोती गळाले!सत्तावीस मोहरा हरवल्या!रुपया आणि खुर्दा यांचा पत्ताच नव्हता.पुत्र,बंधुच्या धक्क्याने श्रीमंत नानासाहेब कैलाशवासी झाले. शनिवार वाड्यावरचा भगवा झेंडा अर्ध्यावर उतरला होता.गोपिकाबाई शुभ्र वस्रात व शेजारीच सवत म्हणून आलेली १० वर्षाची राधाबाई खाली मान घालुन होती कोवळी पोर!तारुण्य उमलण्याच्या आंत तिच्या जगण्याचे पंख छाटले गेले.तिचं बोडकं डोकं बघवल्या जात नव्हत. एवढ्यात आबाजीपंत आले.ताईसाहेब   बोलावले?होय रिकामी झालेली गादी जास्त वेळ रिकामी ठेवता येणार नाही ना ठीकय!मुहूर्त पाहुन निघूया छत्रपतीकडे सातार्याला.

           २० जुलै १७६१! राघोबादादा माधवरावांना घेऊन सातार्यास दाखल झाले.माधवरावांचा जन्म १६ फेब्रुवारी १८४५ सावनूरला झाला.ताराबाईंचा आशिर्वाद घेऊन राघोबादादा व माधवराव दरबारात आले.१७ वर्षाच्या माधवरावांना छत्रपती रामराजांनी पेशवाईची महावस्रे,शिक्के कट्यार देऊन म्हणाले,माधवराव!तुमच्या शिरावर फार मोठी जबाबदारी आहे.पानिपतचा डाग तुम्हाला धुवून काढुन हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार लावायचा आहे.याचवेळी आबा पुरंदरेंनाही दिवाणगिरीची व मुलतिकीची वस्रे देण्यांत आली.दोघेही पुण्यास परतले.

         माधवराव दिवाणखान्यात विचार मग्न बसले होते.राघोबादादांच्या वागण्याचा त्यांना फार मनःस्ताप होत होता.त्यांना न विचारतां राघोबांनी दरबारातील सगळ्या जुन्या अधिकार्यां ना काढून टाकले.मिरजेमधे मोठे प्रस्थ असलेल्या गोपाळराव पटवर्धनांची जहागिरी काढून घेतली.मने दुखावलेली चांगली माणसे निजामाच्या चाकरीत गेले या षडयंत्रामागे उद्देश काय असावा? वास्तविक राघोबांना वाटले होते की, माधवराव अगदीच कोवळं पोर,त्याला हाताशी धरुन पेशवाईचा कारभार आपण हाकावा.पण त्यांच्या या स्वप्नांना लहान जरी असले तरी मुत्सद्दीपणे माधवांनी तडाखा दिला.त्यामुळे सत्तालोलुप राघोबांच्या कुटील कारस्थानाला उत आला.त्यांच्या रहाट च्या बंगल्यात षडयंत्र शिजू लागली. मुधल,निजाम,शुजाउदौलला मदतीसाठी खलिते पाठवले.

           पानिपतवर मराठ्यांची वाताहात, नंतर पेशवे नानासाहेबांचा अकाली मृत्यु, पेशवे म्हणुन आलेले पोर वयाचे माधवराव! पेशवाई अडचणीत सांपडली. या संधीचा फायदा उठवण्यासाठी निजामाने हालचालीस सुरुवात केली. उदगीरच्या लढाईत सदाशिव भाऊंनी निजामाचा दारुण पराभव करुन,८५ लक्ष रुपयांचा प्रांत पेशवाईला द्यावा लागला होता या अपमानाचा सूड निजामाला घ्यायचा होता.निजामाने यमाजी शिवदेव व विठ्ठल सुंदर यांना पेशवाईत पाठवले. त्यांनी नळदुर्ग आणि अक्कलकोट परगाणे काबिज केले.निजामाने मोठे थैमान घालायला सुरुवात केली.पण मराठे गप्प बसणार होते होय?

         घरगुती भांडणाला बाजूला ठेवून श्रीमंत माधवराव पेशव्यांनी पेशवाईची वस्रे अंगावर चढवली आणि राघोबादादा सोबत युध्दाची रचना केली.गुप्त मसलती झाल्या.उत्तरेकडून मल्हारराव होळकर, दामाजी गायकवाड व इतर सरदारांना बोलावुन घेतले. १७६१ साली ७० हजार फौज शनिवारवाड्यासमोर जमा झाली. या युध्दात पहिली चाल निजामाने केली. येतांना त्याने टोका आणि प्रवरासंगम ही पवित्र स्थळे भ्रष्ट केली,त्यामुळे युध्दाचं स्वरुप धर्मयुध्दात बदललं.निजामाकडे असलेली मराठी फौज आपली देवळं फोडली म्हणून नाराज झाली.निजाम अहमदनगर,श्रीगोंदा,हिवरे,भुलेश्वर जिंकुन उरळीकांचन पर्यंत आला.आणि त्याचवेळी मराठी फौजेने त्याला दगा दिला.मराठ्यांची पवित्र स्थाने भ्रष्ट केल्या मुळे निजामाचा मराठा सेनापती रामचंद्र जाधव,जानोजी भोसले आणि निजामा चा भाऊ मीर मुधल पेशव्यांना येऊन मिळाले.नेमके उजवे हातच निकामी झाल्याने निजाम हादरला.पेशवे माधवराव, राघोबांना म्हणाले.निजाम तावडीत सांपडला आहे,चला त्याचे पारिपत्य करु!पण राघोबांना निजाम कायमचा संपायला नको होता,उद्या पेशवाई मिळवण्यासाठी याच निजामाची मदत घेता येईल हा विचार करुन राघोबा म्हणाले,त्याला जीवे मारण्यापेक्षा तो तह करायला तयार झालाय तर,तह करुया! निजामाचं जीवदान पेशवाईला महागात पडेल काका!पण अट्टाहासाने राघोबांनी २९ डिसेंबर १७६१ मधे तह घडवून आणलाच.निजामाने २२ लाखाची खंडणी देण्याचे कबुल करुन स्वतःची सुटका करुन घेतली.पण राघोबा निजामा च्या मदतीने पेशव्याची गादी बळकावेल ही चर्चा पुण्यात सुरु झाली.अर्थात ही चर्चा माधवरावांच्या कानावर आल्यावर ते अस्वस्थ झाले.

                  क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!  पेशवाई  !!!

                 भाग – २९.

         या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्या साठी माधवराव पेशवे ताडताड पावले टाकत दादासाहेबांच्या रहाटाच्या बंगल्या कडे निघाले.दिवाणखान्यात राघोबा बसले होते.तिथे येऊन माधवराव म्हणाले काका! तुम्ही आम्हाला मुद्दाम निजामाशी तह करायला कां भाग पाडले?तुम्हाला पेशवाई हवी अशी चर्चा पुण्यात आहे. आम्ही नेमकं काय समजाव?

      राघोबा पुढे येत,माधवरावांच्या खांद्यावर हात ठेवत शांत स्वरांत म्हणाले

श्रीमंत माधवराव! तुम्ही ज्या साम्राज्या च्या कोवळ्या पंखाने डावावर बसलात ते छाटायला आम्हाला अजिबात वेळ लागणार नाही.परंतु आम्ही इतके निर्दयी नाही,श्रीमंत ही वेळ न यावी,यासाठी  सालाकाठी खर्चासाठी एक लाख व हवा पालटासाठी पांच किल्ले द्या,म्हणजे आम्ही राजकारणातून कायमचा सन्यास घेऊन देवधर्म करीत बसूं!

         श्रीमंत माधवराव पेशवे गंभीर झाले.मनात म्हणाले,आम्ही एवढे दुध खुळे नाही.पेशवाईचे तुकडे कदापिही होऊ देणार नाही.वरकरणी माधवराव म्हणाले,काका! कर्नाटकात हैदरच्या उपद्रवाचा निचरा करुन मोहिम फत्ते झाली की,आपल्या पैशाचा बंदोबस्त करु माधवराव दिवाणखाण्यांतून निघून गेले. त्यांनी पहिलं काम केलं,सखारामबापूंना खाजगीतून काढून टाकले.राघोबांना प्रत्येक गोष्ट तेच पुरवित होते.त्या जागेवर त्रिम्बकमामा पेठे व बाबूराव फडणीसाची  नेमणूक केली.ते राघोबांवर लक्ष पण ठेवु शकणार होते.

          माधवराव पेशवे कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले,वाटेत मिरजेत गोविंद हरि पटवर्धनांची भेट घेऊन मिरजेचा किल्ला डागडुजी करुन कडेकोट बंदोबस्त करायला सांगीतले.कर्नाटका च्या मोहिमेत श्रीमंतांनी धारवाड ते तुंगभद्रा पर्यंतचा टापू पिंजून काढला. अनेक खंडण्या वसूल करुन जानेवारी १७६२ ला पुण्यास परतले.त्यांच्या प्रथम विजयाप्रित्यर्थ पांच तोफांची सलामी दिली.हत्तीवरुन मोठी मिरवणूक काढण्यात आली.

        त्यारात्री गोडाधोडाचं जेवण झाल्या वर माधवराव आपल्या महाली बसले असतां रमाबाई विडा घेऊन आल्या. म्हणाल्या,स्वारी उद्या थेऊरला श्री गजाननाच्या दर्शनाला जायच कां? हो जाऊ या!आणि माधवराव जुन्या आठवणीत मग्न झाले.म्हणाले,रमा! त्या वेळी आयुष्याचा सार भक्तीच्या महा सागरात शोधण्याच्या प्रयत्नात,जग हे  व्यवहारावरच चालते हे आम्हाला कळत नव्हते.त्यादिवशी आम्ही असेच बराच वेळ पुजापाठात गुंग होतो.तुळशीपत्रे व दुर्वा येण्यास उशीर झाल्यामुळे आमची पुजा खोळंबली होती.रामशास्री प्रभुणे बराच वेळ वाट बघत तिष्ठत होते.आम्ही आल्यावर चिडून म्हणाले!श्रीमंत तुमच्या वर राज्यरक्षणाचा भार आहे.मुख्य कर्तव्य राजरक्षेचे सोडून तुम्हाला संध्या पुजेतच वेळ घालवायचा असेल तर, आमच्या बरोबर काशीला चला,तिथे दीक्षा देववतो.बसा मग नदीकाठी संध्या पुजा करत.त्याक्षणी आमची चूक कळून आली आणि आम्ही राजकारभाराकडे वळलो.पण तोपर्यंत राघोबाकाकांनी पेशवाई मोडीत काढण्याचा डाव रचून चांगली माणसं काढुन खोगीर भरती केली होती.

        रमाबाई खिन्न स्वरांत म्हणाल्या, राघोबामामंजींचा आडदांडपणा अजून संपलेला नाही.रमा!दीर्घश्वास सोडत ते म्हणाले,वारंवार रुसणारे राघोबाकाका, कावेबाज निजाम,अडचणीचा फायदा घेणारे भोसले आणि हिकमती हैदर यांच्या प्रचंड वादळांत पेशवाई हेलकावे घेत आहे.रमा!या वादळाच्या महा सागरात पेशवाई बुडणार तर नाही ना? नाही स्वामी,असं काहीही घडणार नाही. तुम्ही सर्वांना पुरुन नक्की यशस्वी व्हाल याची आम्हाला खात्री आहे.स्वामी! पेशवाईची महावस्रे देतांना छत्रपतींचे शब्द आठवा.रमाबाईंच्या समंजसपणे बोलण्याने,माधवरावांच्या मनांतील मरगळ दूर झाली.सारे विकल्प नाहीसे झाले.रमाबाईंचा हात गच्च धरत म्हणाले, सांपडला मार्ग,रमा! आम्हाला मार्ग सांपडला.आतां आम्ही मोठमोठ्या वादळांना कैद करु,त्यातुन राघोबाकाकां ची सुध्दा सुटका नाही.

        आज राजदरबार भरणार असल्याने झाडून सारी सरदार मंडळी हजर होणार होती.मुलखातल्या अनेक अडीअडचणींवर चर्चा होणार होती. त्या साठी चाफेखणीला दफ्तरखाना सज्ज झाला होता.तेवढ्यात दिल्ली दरवाजातुन नाना फडणीस व हरिपंत फडके आले. श्रीमंतांनी मुजरा स्विकारुन म्हणाले, आज सकाळी सकाळी वाड्यावर? कांही विशेष? होय विशेषच बातमी घेऊन आलोय श्रीमंत!नाना पुटपुटले….

             क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!!पेशवाई!!!

भाग—३०

        श्रीमंत माधवराव पेशव्यांकडे बघून नाना फडणीस म्हणाले,श्रीमंत!आज सकाळीच आमचा गुप्तहेर बाळू नायकने बातमी आणली,राघोबांनी तुमच्या विरुध्द मोहिम हाती घेतली आहे.ते तर वडगांवला गेलेत. आज तर ते दरबारात हजर राहणार होते,नाही श्रीमंत!आपण ही गादी धारण करण्यापुर्वीपासुनच वाड्यात कट कारस्थाने शिजत होती,परंतु राज धूरा तुमच्या हाती आली आणि…

हे षडयंत्र आम्हाला देखील खूप उशीरा समजलय!

        श्रीमंतांचा चेहरा काळजीने वेढून गेला.नाना,यावेळी काका कुठे आहेत? विंचूरमधे.श्रीमंत! सखाराम बापू आणि आबा पुरंदरे कालच राघोबादादांना विंचूरमधे भेटले.खाजगीतून सखाराम बापूंना काढल्यापासुन त्यांचा पार तिळपापड झाला.त्यांनीच राघोबादादांचे कान फुंकुन या कटाची योजना आखली असणार.निजाम आणि जानोजीराव भोसलेची फौज काल रात्रीच विंचूरमधे दाखल झाली.५० हजाराच्या फौजेनिशी आपल्यावर आक्रमण करणार आहे.

       गजानना!गजानना!!माधवराव अस्वस्थ स्वरांत म्हणाले,शेवटी हे अग्नि कुंड पेशवाईत पेटलच तर!नाना,काका असं कांही करतील यावर अजुनही विश्वास बसत नाही.श्रीमंत!विश्वासराव पानिपतावर गेले,त्यादिवसापासुनच अविश्वासाचं महापर्व सुरु झालं.आतां प्रत्येक क्षण मोलाचा आहे.दरबार भरणारच आहे,तेव्हा सर्व सरदारांना उठावाचा आदेश दिला तरच…

         बरोबर ११ च्या सुमारास दरबार भरला.राघोबादादांनी अचानक केलेल्या उठावावर सविस्तर चर्चा होऊन सर्व सरदारांनी श्रीमंताना आश्वास्त केले आणि हरहर महादेव ss ची गर्जना उठली.पेशवाई उभारण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानातील शत्रूशी लढा दिला होता, परंतु आज स्वतःच्याच रक्ताविरुध्द लढा देण्याची पाळी माधवरावांवर आली आहे. मनुष्यबळ आणि दैववाद यांच्या कात्रीत आज पेशवाई अडकली आहे.श्रीमंत पेशव्यांनी राघोबाविरुध्द लढण्याचा निश्चय केला.

त्यांच्या अस्तित्वासाठी… श्रीमंत पेशवाईसाठी…

         अखेर दिवस उजाडला ७ नोव्हें. १७६२.श्रीमंत माधवरावांचं सैन्य सज्ज झालं.

घोडेस्वार!पायदळ,तोफेकर सारे त्यांच्या आदेशाची वाट बघत होते.समोर विरोधी फौज उभी होती रघुनाथरावांची. त्यात सामील होते..जानोजी भोसले आणि निजाम!घमासान लढाई सुरु झाली.कापाकापी,रक्तपात घडत होता. १२ नोव्हेंबरला आळेगांवी माधवरावांचा सपशेल पराभव झाला.ते आळेफाटे येथे राघोबांना शरण आले.श्रीमंत पेशवे माधवरावांना नजरकैद करुन शनिवार वाड्यावर चौकी पहारे बसवले.सैनिक तटस्थपणे पहारा देत होते.माधवराव खिडकीजवळ उभे राहुन काळाकुट्ट आसमंत न्याहळत होते.मनात उठलेलं वादळ,विचारांच्या गांधीलमाशा अस्तित्वा चा डंख मारत होत्या.मन अगदी छिन्नभिन्न झालं होत.कां? कां व्हावं अस?आम्हाला आमच्याच गृहात नजरकैद कां व्हाव लागलं?

           माधवराव विचारचक्रात अडकले असतांना राघोबा आत येत हसत विचारले, श्रीमंत मावधराव पेशवे नजरकैद कशी वाटते ?काका,तुम्ही अतिशय चुकीचं वागताहात!चुकीचं आणि आम्ही?हे वैभव आमचे पिताश्री बाजीराव पेशव्यांनी उभं केलय!रिवाजानुसार फक्त आणि फक्त आमचाच अधिकार होता, पण पेशवाईची वस्रे तुम्ही लोकांनी आम्हाला मिळूच दिली नाही.आमचा हक्क हिरावुन घेतला.काss ?कशासाठी आज तो अधिकार तुमचा पराभव करुन हस्तगत केला.

        काका,हा पराभव केवळ पेशवाई च्या भल्यासाठी स्विकारला आहे.तुमच्या साठी नाही.

काका,तुम्ही घरभेदीपणा करुन पेशवाईचे तुकडे करायला निघालात,याच संधीचा फायदा घेऊन पिढीजात शत्रू निजाम पेशवाईला धुळीस मिळवु शकतो.काका,त्यांचा डाव ओळखा,त्यांना तुम्ही नको आहांत, पेशवाई हवी आहे.पेशवाई घशात घालुन त्यांना सपूर्ण हिंदुस्थानावर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे.काका,कृपया पेशवाईचा विचार करुन निर्णय घ्या. माधवा! ज्या झाडीची फळं आम्हाला चाखतां येणार नसतील तर,त्या झाडाला नष्ट करणेच आवडेल.एकवेळ निजामाचा  फायदा झाला तरी चालेल,ज्या पेशवाई पासुन आम्हाला दूर व्हावे लागेल ती नष्ट झाली तरी आम्हाला कांही वाटणार नाही जिथे सदैव आमचा सन्मान रक्तबंबाळ झालं,त्या शनिवारवाड्याची वाताहात लागली बेहत्तर!आम्हाला जर पेशवाईचा उपभोग घेता येणार नसेल तर,दुसर्यांना ही घेऊ देणार नाही.कळलं?

               क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

पेशवाई संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading