आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

पेशवाई संपुर्ण भाग ५, (२१ ते २५)
हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! पेशवाई !!!
भाग – २१.
औरंगजेब असेपर्यंत हिंदुस्थानची राजकीय परिस्थिती एकाच छत्राखाली होती.परंतु त्याच्या मृत्युनंतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली.आणि बादशाही मोडकळीस आली.नेमका याचाच फायदा सत्ताधिशांनी घेतला. निजामने दक्षिणेच्या सुभावर कब्जा केला.राजेमहाराजांनी माळवा,गुजरात, रोहिलखंड व इतर प्रदेश बळकावला. अयोध्येचा नबाब तर स्वतःला मालकच समजू लागला.या चढाओढीत मराठ्यांनी आपला प्रांत मोकळा करुन घेतला आणि दिल्लीकडे नजर वळवली.या सगळ्या स्थितीत दिल्लीचा बादशहा इतका एकाकी पडला की,स्वतःचे व बेगमांचे संंरक्षण करण्यासही असमर्थ ठरला.
या संधीचा फायदा अफगणिस्थान च्या अहमदशहा अब्दालीने घ्यायचे ठरवले.दिल्लीच्या बादशहाला गुप्तहेरां कडून ही माहिती मिळाल्यावर त्याचे धाबे दणाणले.अब्दाली जर चालून आला तर आपली खैर नाही हे बादशहाने ओळखले.आतांपर्यत अन्याय,अत्याचार करणार्या मोगली महासत्तेला अब्दालीचं ग्रहण लागलं.यातुन सही सलामत सुटका होण्यासाठी तातडीने वजीराकरवी पेशव्यांना लखोटा रवाना केला.
श्रीमंत पेशवे पुजा उरकवुन दिवाणखान्यात आले,तेवढ्यात त्रिंबकराव पेठे आले.त्रिंबकराव पेठे!एक मुत्सद्दी व्यक्तीमत्व!पेशव्यांच्या कारभारा तले मुख्य हस्तक.त्यांना दिल्लीवरुन आलेला खलिता श्रीमंताकडे सोपवला. बादशहाने लिहिले होते,श्रीमंत आमची जान खतर्यात आहे.अहमदशहा अब्दाली आम्हास गिळण्यास येत आहे. आपण आमच्या संरक्षणाची जबाबदारी स्विकारल्यास, ५० लक्ष रुपये,अजमेर, आग्रा या दोन प्रांताची सुभेदारी तसेच मुलतान,पंजाब,सिंध राज्यातील व रोहिलखंड प्रांतावरचा चौथाईच्या वसुली चा अधिकार देऊ.मामासाहेब! अम्ही त्याच्या मदतीस तयार असल्याचा खलिता ताबडतोब दिल्लीला रवाना करा
बाजीरावांचे १७२९ ला जन्मलेले तिसरे अपत्य रघुनाथराव!नानासाहेब त्यांना प्रेमाने राघोबादादा म्हणत.राघोबा घरभेदी स्वभावाचे पेशवाईला प्रथम खिंडार पाडणारे,स्वभाव तर भलताच रंगेल,नाटकशाळांची तर गणतीच नाही.१७५० च्या काळात राघोबांनी या स्रीयां वर अतोनात खर्च केला,तोही मराठ्यां च्या शौर्याच्या यज्ञकुंडावर पाय देऊनच!
अश्या या राघोबांना नानासाहेब भेटायला गेले.राघोबा नुकतेच रंगढंग करुन उशीरा आले होते.एवढ्या रात्री वडिल बंधू आल्याचे पाहून दादासाहेबां ना आश्चर्य वाटले.राघोबादादा!तुमचं हे जे कांही चाललं ना ते ठीक नाही.आतांपर्यंत धाकटे भाऊ म्हणून पांघरुण घालत आलोत.सगळी प्रजा आपल्याकडे त्यांचे सरकार म्हणून बघत असतात.
राघोबा! प्रश्न रणभूमी गाजवण्या चा नाही तर,अस्तित्वाचा,सामर्थ्याचा आहे.राघोबादादा एवढा मोठा पसारा पैशाशिवाय चालु शकत नाही.फौजा, पागा,नोकरचाकर,घरचा खर्च भागवण्या साठी लढाया गाजवाव्या लागतात,रसद मारावी लागते.मागच्या माणसांसाठी कापरासारखं जळावं लागतं.तेव्हा कुठे पैसा दिसतो.या शनिवारवाड्याच्या डोलार्यावर असलेले सावकारांच्या कर्जाने आम्हाला अन्न गोड लागत नाही. केवळ आम्ही पेशवे म्हणूनच तगादा लावत नाही,दुसरा कोणी असता तर केव्हाच जप्ती….
श्रीमंत! आपण आमचे थोरले बंधू. आजपर्यंत आमचे खूप लाड पुरवलेत. वडिलांच्या माघारी कांही कमी पडू दिले नाही.आज आम्हाला आमच्या अस्तित्वा ची जाणीव झाली.आपण जबाबदारी सोपवावी आम्ही हरप्रयत्ने पूर्ण करु. नानांना समाधान वाटले.राघोबा हा पेशवाईचा रथ आपण सर्वांमिळून पुढे न्यायचा आहे.
राघोबादादा!दिल्लीवरुन बादशहाचं फर्मान आलं आहे.आपली मदत मागतोय! या मोहिमेसाठी तयार व्हा.जीवाची मशाल पेटवून प्रचंड दौलत घेऊन या.श्रीमंतांच्या आज्ञेनुसार प्रचंड फौज आणि सखाराम बापू,नारो शंकर, चिंतो विठ्ठल आणि विठ्ठल शिवदेव ह्या मातब्बर सरदारांसह राघोबादादा स्वारी वर निघाले.वाटेत दत्ताजी शिंदे,जयप्पा शिंदे,मल्हारराव होळकर ही मंडळीही ससैन्य येऊन मिळाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – २२.
जिकडे तिकडे मराठी फौज पसरली.आग्रा प्रांत सुरजमल जाटाच्या ताब्यात तर अजमेर प्रांतावर राजपूतांचा ताबा होता.राघोबादादा मल्हाररावांना म्हणाले,काका!जाट,राजपूतांचा काटा काढल्याशिवाय दिल्लीच्या बादशहाचं आसन स्थिर होणं कठीण वाटतय!प्रथम समझौताचा प्रयत्न करुया,नाहीतर युध्द आहेच!त्याप्रमाणे सुरजमलकडे निरोप गेला.उगाच पेशव्याशी वैर नको म्हणुन जाटाने ४० लक्षावर तह करण्याचा निरोप आला.पण इतक्या कमी रकमेत सैन्याचा खर्चही भागला नसतां,म्हणुन राघोबांनी एक कोटीची खंडणी मागीतली.जाटाचा उलट निरोप आला,४० लक्ष खंडणी किंवा युध्दास तयार व्हा.आणि त्याने कुंभेरी किल्ल्यावर प्रचंड सैन्य जमा करुन युध्दाचं आव्हान दिलं.
राघोबादादांच्या सैन्याने कुंभेरी किल्ल्याला वेढा दिला.दोन्हीकडच्या सैन्यात भिषण धूमश्चक्री माजली.राघोबां चे सैन्य टप्प्यात येतांच,कुंभेरी किल्ल्या वरुन तोफा डागण्यांत आल्या.कितीतरी सैन्य होरपळून मेली.असेच एके दिवशी दिवशी कुंभेरी किल्ल्यावरुन प्रचड तोफ गोळा आला आणि खंडेराव होळकरांना लागून क्षणात गतप्राण झाले. खडेराव हे मल्हाररावांचे एकुलते लाडके पुत्र आणि अहिल्याबाईंचे पती!
आपला लाडका पुत्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला पाहून,बेभान मल्हाररावांनी,तुझा शिरच्छेद करीन अशी भिषण प्रतिज्ञा केली.ती प्रतिज्ञा ऐकुन स्मशान शांतता पसरली.युध्द थांबलं. सुरजमल जाट थरारला.मल्हारराव होळकर शब्दाला जागणारा काळपुरुष! त्याने लगेच गुप्तहेरामार्फत जयप्पा शिंदें ना किल्ल्यात पाचारण केले.राघोबांशी तह करण्याची मसलत शिजली.जयप्पा शिंदेने राघोबांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण मल्हारराव एक कोट रुपयांवर अडुन राहल्यामुळे त्यांच्या हट्टातून युध्द पेटले.आतां फक्त ३० लक्ष घेऊन तह करण्याची वेळ आली ती सुध्दा तीन वर्षात!वरुन लढाईचा खर्च,माणसं कामी आली ते वेगळचं!त्यातच पेशवे नाना साहेबांचा कर्ज निवारण्यासाठी पैशाचा तगादा!अखेर फौजेचे विभाजन झाले. राघोबादादा स्वतःची फौज घेऊन मथुरे कडे,मल्हारराव होळकर बादशहाच्या रक्षणार्थ दिल्लीला रवाना झाले.जयप्पा शिंदे अजमेरप्रांती निघून गेले.
अजमेर रजपुतांचा प्रांत,जयप्पाने रजपुतांविरुध्द तलवार उपसली.युध्दाचा भडका उडाला.जयप्पाला मारण्याचा कट शिजला.त्यारात्री रजपुतांचा वकील तहाचा खलिता घेऊन जयप्पाच्या छावणीत आला.तो खलिता तहाचा नसून मृत्युखलिता होता याची जयप्पांना कल्पनाही नव्हती.ते खलिता वाचायला सुरुवात करतांच,मराठ्यांच्या वेशात रजपुत मारेकरी येऊन वार्याच्या वेगाने तलवारीचे घाव जयप्पा शिंदेवर पडले. त्यांचा निर्घृन खून झाला.
जयप्पाच्या चित्तेवर समशेर बहाद्दर,अंताजी मानकेश्वर,दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे यांनी रजपुतांना मातीत मिसळूनच परत फिरायची शपथ घेतली. हरहर महादेवाच्या गर्जनेत अजमेरमधे भयानक कांड सुरु झाले.रजपुतांची कत्तल सुरु झाली.मराठ्यांनी कहर केला. जनसामान्यात आक्रोश असळला.बाया माणसं घोड्यांच्या टापेखाली चिरडू लागली.घरे पेटवल्या गेली.उभे संसार मातीत मिसळले.मराठ्यांनी प्रयत्नांची शर्थ करुन भगव्याची शान राखली.शेवटी राजपुतांनी हार मानुन ५० लक्ष रुपयांचा दंडा भरला.मुलतान,पंजाब,सिंध,अजमेर राजपुताना,आग्राची सुभेदारीही मिळाली मथुरेला राघोबांना ही आनंदवार्ता कळल्यावर त्यांनी मराठ्यांचं कौतुक केले
या मिळालेल्या विजयाने वारं पिल्यासारखे,मराठा फौज परमुलखात बिनधास्त चौथाईच्या वसुलीकरितां फिरुं लागली.परंतु याच वेळी मराठ्यांना संपवण्याचं षडयंत्र दिल्लीत रचल्या जाऊं लागली.दिल्लीच्या बंदोबस्ताचं काम होळकर,शिंदे आणि अंताजी माणकेश्वरांवर सोपवुन रघुनाथराव ८२ लक्ष रुपयांची खंडणी घेऊन पुण्यात परतले.परंतु त्यांच्यासाठी एक दुःखद वार्ता वाट पाहत होती.त्यांची पहिली पत्नी जानकीबाईचा स्वर्गवास झाला होता.ते खिन्न बसले असतां,नानासाहेब आले.राघोबा,आपण मुलुखगिरी करणारी माणसं!ओंजळीत निखार ठेवून राज्य करणं ही आपली कैफियत!तळपत्या तलवारींना शत्रूच्या रक्ताचा अभिषेक घालणं आपलं काम!परंतु या मागची प्रेरणा असते आपल्या प्रिय माणसांची.झाली गोष्ट तर परत आणणे शक्य नाही,पण पुढील वाटचालीसाठी सुंदर पत्नीची साथ आवश्यक आहे. अडखळलेल्या गाडीचं चाक कसं वर उचलायचं ही मेख नानासाहेबांंना बरोबर माहित होती.राघोबांचा स्वभाव माहित असल्याने,राघो महादेव ओक मलठणकरांची आनंदीबाई नांवाच्या सुंदर कन्येशी १७ डिसेंबर १७५५ साली राघोबांचा विवाह लावुन दिला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – २३.
राघोबादादा पुण्यास परत गेल्याचे कळतांच डूख धरुन बसलेला अहमद शहा अब्दाली व साथीला नजीबखान रोहीला दिल्लीत दाखल होऊन प्रचंड लूट सुरु केली.अब्दालीच्या सैन्यांनी दिल्ली, आग्रा,मथुरा शहरांत नुसता हौदोस घातला.जायपोळ,लुटालुट,बेनाम कत्तली केल्यात.यात मराठेही होरपळले.१७५६ मधे पुण्यात पेशव्यांकडे खलिता आला. नानासाहेबांनी राघोबादादांना खलिता वाचून दाखवत म्हणाले,अब्दाली व नजीबखानला मराठ्यांचा हिसका दाखवण्यास तुम्ही ताबडतोब दिल्लीच्या मोहिमेवर निघा.
आज्ञेप्रमाणे राघोबा मोहिमेवर निघाले,ते इंदौरजवळ पोहचताच, एप्रील १७५७ मधे अब्दाली हिंदुस्थान सोडून लूटीसह अफगाणिस्थानात निघून गेला.
राघोबा आग्र्यात पोहोचले तेव्हा वातावरण अतिशय गंभीर होते.संपूर्ण शहर स्मशानवत झाले होते.गुप्त मसलत झाली.अंताजी तुम्ही अंतर्वेदीतल्या नजीबखानाच्या मुलखात धुमाकुळ घाला अंतर्वेदी पार नेस्तनाबूत करा.विठ्ठल शिवदेव विंचुरकर तुम्ही दिल्लीच्या बाजूने मोर्चे बांधणी करा.तो हरामखोर नजीबखान रोहीला दिल्लीतच असेल,सांपडतांच त्याची खांडोळी करा. आणि मल्हारकाका,तुम्ही पंजाबप्रांतावर जातीने लक्ष द्या.
मराठा फौजेने दिल्लीला वेढा दिला तिखडे नजीबखान घाबरला.आपली नक्की कबर खणल्या जाईल हे जाणून त्याने मल्हारराव होळकरांशी संधान बांधून जीविताची भीक मागीतली.या अवधीत विठ्ठल शिवदेव विंचुरकरांनी झडप घालून नजीबखानला दिल्लीत पकडल्याबरोबर राघोबांनी त्याची गर्दन मारायचा आदेश दिला.तेवढ्यात मल्हार राव होळकर पुढे येत म्हणाले,दादासाहेब थांबा!चटकण निर्णय घेऊ नका.नजीब आज जरी वाईट वागला असला तरी भविष्यात उपयोगी पडेल.राघोबांना पटले नाही,परंतु ते वयाने,अनुभवाने मोठे असल्यामुळे,त्यांचा मान राखण्या साठी कांही अटी व मल्हाररांवांच्या हमी वर नजीबखानचा जीव वाचला.
राघोबादादा नंतर पंजाब प्रांताकडे वळले.पंजाब प्रांतात शिखबंधू आणि बादशहाचा सरदारा अहिनबेग अब्दाली चा मुलगा तैमूरशहा व सरदार जहान खानशी लढत होते.राघोबांनी लगेच शीख बांधवांच्या मदतीस्तव मानाजी पायगुडेंना फौजेसह पाठवले.अब्दालीचा मुलगा घाबरुन चिनाब नदीकडे पळून गेला.त्याची बरीच संपत्ती आणि प्रचंड लूट मिळाली.त्याच बरोबर तुकोजी होळकर,सांबाजी शिंदे पायगुडे यांनी अटकेपर्यंतचा प्रदेश हस्तगत करुन पार अटकेपार झेंडे फडकवले.पराक्रमाचा कळस गाठलेल्या मराठ्यांची किर्ती इराण दुराणी पर्यंत पसरली.परंतु या मोहिमेत राघोबादादांना तब्बल एक कोट रुपयांचे कर्ज झाले.पंजाब प्रांताचा बंदोबस्त बादशहाचा माहितगार अदिना बेगवर सोपवून राघोबांनी पुण्याकडे प्रयान केले.
इकडे जीवदान मिळालेला नजीब खान रोहीला सापासारखा उलटला.त्याने अब्दालीशी संधान बांधले.अब्दाली दिल्लीत येऊन मोठा हाहाकार उडवला. मराठा सैनिक व अब्दालीच्या सैनिकांची जबरदस्त झुंज झाली.अब्दालीने दत्ताजी शिंदेचा शिरच्छेद केला.मल्हारराव आले पण तोपर्यंत अब्दाली निसटला होता.
शनिवारवाड्यात गुप्त मसलती चालू होत्या.चिंताक्रांत नानासाहेब आसनावर बसले होते.समोर सदाशिवभाऊ,राघोबा, विश्वासराव,मामासाहेब,सखाराम बापू विसाजीकृष्ण बिनिवाले आणि इतर मातब्बर सरदार खिन्नपणे बसले होते. उत्तर व दक्षिणेच्या कचाट्यात पेशवाई पुरती अडकल्याने वातावरण प्रचंड गंभीर झाले.सावरत नानासाहेब म्हणाले, पेशवाई शत्रूच्या घेर्यात आहे.निजामाला बरेच वेळा ताकीद देऊनही ठरलेली खंडणी देत नाही.त्याचा काटा काढण्या साठी विजासी तुम्ही कोणत्याही नितीने निजामाच्या ताब्यातील अहमदनगरच्या किल्ल्यावर भगवा फडकवा.नंतर २९ वर्षाच्या तरुण सदाशिवभाऊकडे वळून म्हणाले,तुम्ही आणि विश्वासरावांनी बेदर कडे जाऊन निजामाचा फडशा पाडा. आणि राघोबा तुम्ही सदाशिवरावांच्या मागे त्यांच्या सहायार्थ रहा.
१ ऑक्टोबर १७५९ विजयादशमीचे सीमाल्लंघन झाले.आणि मराठी फौजा मोहिमेवर निघाल्या.यावेळी २२ जुलै १७४२ रोजी जन्मलेल्या केवळ १७ वर्षाचे विश्वासरावही होते.नौबती झडल्या नगारे वाजू लागले.आणि फौजेने कूच केले.हुकुमाप्रमाणे विसाजीकृष्ण बिनिवाल्यांनी २८ ऑगस्ट १७५९ रोजी अहमदनगरचा किल्लेदार कविजंगास लाच देऊन नगरचा किल्ला हस्तगत केला.औरंगाबाद,नाशिक,त्रिम्बकेश्वर आणि जुन्नर पेशव्यांच्या ताब्यात आला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – २४.
बेदरकडे निघालेल्या सदाशिव भाऊंची गाठ वाटेत उदगीरला निजामाशी पडली. समोरासमोर मोठी लढाई झाली. भाऊंचा जोश पाहुन निजाम घाबरला.त्याने तहाचे बोलणे
पाठवले.६० लक्ष देण्याचे कबूल केले. याचवेळी दिल्लीत अचानक अब्दालीचं वादळ उठलं.प्रचंड धुमाकुळ घालू लागला.होळकर,शिंदेंनांही आवरेना तेव्हा होळकर,शिंदेंचे पत्रे पेशव्यांना वरचेवर जाऊ लागले.शेवटी श्रीमंतांनी खलिता पिठवून विश्वासराव,सदाशिवराव व राघोबादादांना पटदूर येथे बोलावून घेतले दिल्लीच्या वाटेवरचे पटदूर गांवी नाना साहेबांची छावणी पडली होती.श्रीमंत नानासाहेबांच्या डेर्यात भाऊ आणि राघोबा बसले असतां,दिल्लीवरुन आलेली होळकर,शिंदेची पत्रे दोघांना वाचायला दिली.त्यांच्या चेहर्यावरचे भाव पाहून शांतपणे नानासाहेब म्हणाले, भाऊ दक्षिणेचा मुलुख तुमच्या माहितीतला असल्यामुळे निजामाचे परिपत्य करायला श्रीरंगपट्टणकडे मोहिमे वर जावे.आणि राघोबादादा तुमचा उत्तरेचा अभ्यास चांगला आहे.यासाठी तुम्ही हिंदुस्थानात जाऊन अब्दालीचं परिपात्य करावं!
जरुर श्रीमंत!आम्ही जायला तयार आहो,परंतु एक कोट रुपये नगद आणि ऐंशी हजार फौज द्यावी हे ऐकुन भाऊंना हसू आले.हसायला काय झाले? दादासाहेब!हसु नको तर काय करु?अहो मोहिमेवर निघाल्यावर तिथून खजिना आणायचाचा की,घरातला पैसा बाहेर न्यायचा?मागे अटकेपार झेंडे लावलेत पण घरी मात्र अर्जच आणलत ना?सत्य ऐकून राघोबांचा चेहरा पार पडला.वर्मा वरच बोट ठेवल्याने दादासाहेबांच्या अंगाचा तिळपापड झाला.श्रीमंत म्हणाले आपण आणखी कर्ज घेऊ शकत नाही. नानासाहेब!कर्जापायी पेशवाई बुडवायची कां?दादासाहेबांना विचारा. जिंकलेल्या सुभ्यांचा कोणता बंदोबस्त केला?नजीबखानला तेव्हाच मारला असतां तर आज ही वेळ आली नसती. तिकडे सरकारी मामलतदार सर्रास अफरातफर करताहेत.दादांनी साधी चौकशीही केली नाही.प्रयाग,काशी आजही यवनांपासुन मोकळी नाही.कां? उत्तरेत इतकी वर्षे कामं केली पण सर्वा खेळखंडोबा करुन ठेवला.आज भाऊंच्या शब्दाला धार चढली होती.राघोबांची बोलतीच बंद झाली.राघोबा म्हणाले, श्रीमंत!आम्हाला एक कोट खजिना आणि ऐंशी हजार स्वार मिळत असेल तरच आम्ही अब्दालीवर चालून जाऊं अन्यथा नाही.क्षणभर श्रीमंंत गंभीर झाले राघोबा बाहेर निघून गेले.भाऊ म्हणाले, आपण चिंता नका करुं,आम्हाला आज्ञा द्या.श्रीमंतांनी सरदारांशी मसलती करुन भाऊंना पाठवण्याचा निर्णय पक्का झाला.सोबत विश्वासरावांना पाठविण्याचे ठरले. भाऊ उजळल्या चेहर्याने कारकुनाच्या डेर्यात नाना फडणीसांकडे आले.
नाना फडणीसांचा जन्म १२ फेब्रु. १७४२ ला सातारा येथे झाला.वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी २९ नोव्हेंबर १७५६ मधे घराण्यांत चालू असलेल्या फडणीसी ची वस्रे मिळाली.त्याचवर्षी नाना फडणीस हैदरच्या स्वारीत सहभागी झाले होते.भाऊ फडणीसांना म्हणाले, आपण उत्तर हिंदुस्थानच्या मोहिमेवर लवकरच निघणार आहोत.तेव्हा आम्ही सांगतो त्या लोकांना पटकण पत्रें रवाना करा.तसेच समशेर बहाद्दर,यशवंतराव पवार,हिंगणे,दमाजी गायकवाड आणि सोमाजी भापकर यांना तातडीने आपापल्या फौजा घेऊन पटदूरला यायला सांगा.
सदाशिवभाऊ मोठ्या जिद्दीने कामाला लागले.नारो शंकर,विठ्ठल शिवदेव,महिपतराव चिटणीस,तुकोजी शिंदे,महादजी शिंदे,बळवंतराव मेहेंदळे, नाना फडणीस आणि ज्यांना पत्रे पाठविली ती सर्व मंडळी पटदूरला गोळा झाली.एवढी उंच भरारी शिवराज्यात प्रथमच घडत होती.सर्व सैन्य सदाशिव भाऊंच्या हुकुमाची वाट बघत होती. भाऊ आणि विश्वासरावांनी नानासाहाबांचे चरणस्पर्श केल्यावर त्यांनी दोघांना कवेत घेतले. त्यांच्या तोंडावरुन मायेने हात फिरवित भाऊंना म्हणाले,विश्वासरावांना तुमच्या सुपुर्द करतोय,काळजी घ्या.बाजुलाच बाजीरावांची छबी असलेल्या समशेरला ही त्यांनी मिठीत घेतले.महावस्रे दिली आणि फौजा उत्तरेच्या दिशेने निघाल्या.
तिकडे नजीबखानला गुप्तहेरां कडून बातमी मिळाल्याबरोबर त्याने अब्दालीला अफगाणिस्तानात न जाण्याची विनंती केली.त्याने विनंतीस मान देऊन वचन दिले,अब इस दुनियामे हम रहेंगे या पेशवा!नजीबने त्याला दहा लक्ष रुपये दिले.शिवाय धान्य,शस्रास्रे पुरवण्याची जबाबदारी,सैन्यांना झोपड्या बांधून दिल्या.हुशार अब्दालीने स्वतःची छावणी अलिगडपासून पन्नास मैलावर गंगातीरी थाटली.वाट होती सदाशिवराव भाऊ येण्याची!
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – २५.
सदाशिवरावांची फौज मजल दर मजल करत सिंदखेड,बर्हाणपूर,वेशीस,सिरोज अरुण,नखर, अशी गांवे,शहरें ओलांडत ३० मे रोजी ग्वाल्हेरला पोहचली.परंतु यांना वेगळीच फौज येऊन मिळाली,ती होती बाजारबुगण्यांची,पाहुण्या राऊळ्यां ची,बायकापोरांची,साधुसंतांची!हातात भगव्या पतक्या घेऊन दर्शनासाठी हजारो यात्रेकरु फौजेत मिसळले. त्यातील प्रत्येकाच्या मनी कांही ना कांही हेतू धरुन सामिल झाले होते.सरदारांनीही आपापली कुटुंबे सोबत घेतली होती. इतकेच काय,भाऊ आणि विश्वासरावांनी नाना फडणीसांनीही आई,बायकोला सोबत गेले होते.
कुठल्याही गावांत मुक्काम पडला, वाटेत तिर्थक्षेत्रे लागली की,स्नानसंध्या, देवपुजा,नवस सायास या धार्मिक कृत्यांना उत येत असत.इकडे भाऊ व विश्वासराव गुप्तहेर,सरदारांना आदेश देत फौजेचा बंदोबस्त करीत असत.
तिकडे नजीबखान शुजाउलौदा ला भेटून,काफर मराठ्यांना धडा शिकवुन काटा काढण्याचे मनसुबे ठरत होते.या युध्दाला जातीयतेचं स्वरुप येऊ लागले.
८ जुन १७६० रोजी भाऊंनी फौजेसह चंबळनदी पार केली.आग्रा फक्त ३० मैलावर असतांना वातावरण एकदम बदलले.आणि धो धो पावसाला सुरुवात झाली.बाणगंगा तुडुंब भरुन वाहू लागली.बाणगंगा ओलांडल्या शिवाय आग्रा शहर गाठतां येणार नव्हते.शेवटी ८-१० दिवसांचा मुक्काम बाणगंगेच्या काठावर करावा लागला.मल्हारराव व जानकोजी शिंदेही येऊन मिळाले. सदाशिवभाऊ,बळवंतराव मेहेंदळे,मल्हार राव होळकर,गोविंदपंत बुंदेले,शिंदे आणि इतर सरदार डेर्यात मसलतीत गुंतले असतांनाच,भाऊंचा प्रमुख टेहाळणी गुप्तहेर बाजी हरि देशपांडे येऊन मुजरा घालत म्हणाला,अब्दाली यमुनेच्या पलिकडे ५० फौजेनिशी एकटाच डेरा टाकून बसला आहे.नजीबखान सध्या बिठूर कानपूरला शुजाउद्दैलाकडे थांबला आहे.फार मोलाची माहिती आणली म्हणून गळ्यातील मोत्याचा कंठा बक्षिस दिला.
भाऊंची फौज यमुनेकडे निघाली. पण यमुना दुथडी भरलेली,नदी कशी ओलांडायची?यमुना पार करण्यासाठी ज्यांच्यावर नावा,होड्या बनवण्याचं काम सोपवलं होत,ते सुस्त निघाल्यामुळे नावा मिळाल्या नाही.त्यामुळे डाव फसला. भाऊंचा चेहरा काळवंडला.भाऊ तुडुंब भरलेल्या नदीकडे फक्त बघत राहिले. नावा होड्या मिळाल्या असत्या तर अब्दालीचं ग्रहण सुटलं असतं!पण नियती!आतां सगळ्या फौजेसह दिल्ली मुक्कामास जाण्याशिवाय पर्याय नव्हता. बाजुला उभ्या असलेल्या सुरजमल भाटा ला हेच हवं होतं.त्याला दिल्लीचा बादशहा बनायचं होत.फौज दिल्लीकडे निघाली. १७ जुले १७६० मधे मराठ्यांची फौज मथुरेत उतरली.श्रीकृष्णाची नगरी मथुरा!सर्व यात्रेकरुंनी राधाकृष्णाच्या वृंदावनला भेट दिली.स्नान,तर्पन झाले. कृष्णलिलामृत,गीतरामायण ऐकले.सर्वच तृप्त झाले.
प्रमुख सरदारांसोबत मसलत होऊन दिल्लीवर हल्ला केला.दिल्ली हस्तगत झाली.हाच क्षण मराठ्यांच्या इतिहासातला सुवर्ण कळस होता.बिचारे अब्दाली व नजीबखान हात चोळत बसले.मसलतीत ठरले की,अब्दाली शरण आला तरच जाऊ द्यायचे अन्यथा युध्द अटळ!सुरजमल जाट मधेच म्हणाला,आपल्याला आमची मदत हवी असेल तर आम्हाला दिल्लीचा शहरपन्हा व गाजीउद्दीनास वजीरी द्यावी.असे केल्यास आम्ही शिंदे,होळकरांसोबत गिलच्यावर चालून जाऊ आणि आपण मागे राहुन चंबळवर कुमक करावी.
नाही सुरजमल!आम्ही यासाठी नारो शंकरांचा विचार केला आहे,राहला प्रश्न युध्दाचा!त्यासाठी छातीची ढाल करुन तयार आहोत.रागाने सुरजमल जाट व गाजीउद्दीन आपापल्या फौजेसह निघून गेले.मल्हाररावांना भाऊंचे बोलणे आवडले नाही.बुजुर्ग या नात्याने म्हणाले, आपण सुरजमलचा उपयोग करुन घ्यायला हवा होता.नाही काका!ताकास जाऊन भांडे लपवणे आम्हास जमत नाही.यापुढे दिल्लीवर राज्य असेल ते फक्त मराठ्यांचंच!उद्या दरबारात नारो शंकरांना राजबहाद्दर पदवी देऊन लाल किल्ल्याची जबाबदारी सोपवु!
मोहिमेवर निघालेल्या सदाशिवराव
भाऊंच्या खजिन्यातील पैसा संपल्यामुळे
अन्नाची चणचण निर्माण झाली.माणसं, पोरं,सैनिक,जनावरे अन्नासाठी वणवण फिरुं लागले.पावसामुळे तोफखाने बंद पडले.गोविंदपंत बुंदेल्यांना मदतीसाठी पत्रे पाठवली,पण व्यर्थ!नाना फडणीस ना पुण्यास पत्र पाठवायला सांगीतले. परंतु पैसा आला नाही.शेवटी भाऊंनी लाल किल्ल्याच्या दिवाणखान्याचं रुप्याचं छत फोडलं.टांकसाळीत रुपये पाडले.एक लक्ष मिळाले,परंतु एवढ्या मोठ्या पसार्यात किती दिवस पुरणार?
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.











