आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

संत चोखामेळा संपूर्ण चरित्र + अभंग भाग ६, (२६ ते ३०)
केशवभटाच्या कांगाव्यावर सावतामाळ्याने आक्षेप घेत म्हणाले, क्षुल्लक गोष्टीला भयंकर रुप देऊन गवगवा करण्याची या लोकांना जुनी खोड आहे. यांत कसला आलाय देवाचा कोप?प्रसंगाचे गांभीर्य, ब्राम्हणवृदांचा रोष लक्षात न घेता, सावतामाळी मधे बोलल्या मुळे केशवभट संतापाने ….
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! !
! ! ! संत चोखामेळा ! !
भाग – २६.
केशवभटाच्या कांगाव्यावर सावतामाळ्याने आक्षेप घेत म्हणाले, क्षुल्लक गोष्टीला भयंकर रुप देऊन गवगवा करण्याची या लोकांना जुनी खोड आहे. यांत कसला आलाय देवाचा कोप?प्रसंगाचे गांभीर्य, ब्राम्हणवृदांचा रोष लक्षात न घेता, सावतामाळी मधे बोलल्या मुळे केशवभट संतापाने भान हरपुन त्यांंना अपमानकारक बोलुन पानउतारा केला. प्रसंगाचा रागरंग बघुन हस्तक्षेप करुन घडणारा प्रसंग थांबवला पाहिजे हे लक्षात आल्यावर ज्ञानदेवांनी आपली नजर उर्ध्व लावली. दुसर्याच क्षणी प्रसन्न चेहर्याने ते केशवभटाला म्हणाले, चोखां च्या घरी जेवण केल्याने धर्मबाह्य व महा पातक माझेकडुन घडल्यानेच विठ्ठलाचं तीर्थजल कडु व अशुध्द झालय अशी सर्व धर्मवृदांची धारणा झाली ना?तर त्याचा इलाज आतांच करु या! तेव्हा विलंब न लावतां तीर्थजलाचं मोठं पात्र आणने शक्य नसल्यामुळे त्यांतील तीर्थ जल एका छोट्या कलशात आणुन तो शुध्द करुन न्या. ते देवाचे तीर्थ असल्या मुळे सगळ्या समष्टींचा त्यावर अधिकार आहे. ब्राम्हणवृदांना हरकत घेण्याचे कारण नाही.
केशवभट त्वरेने मंदिरात जाऊन एका कलशात मोठ्या पात्रातील थोडे तीर्थजल कलशात ओतले व चव बघीतली तर अजुनही तेवढच कडूशार होते. तो छोटा कलश घेऊन ते साक्षीदारां सह तो चोखोबांच्या घरी परत आला. वाढुन ठेवल्याला पानावर मंडळी अजुन ही तिष्ठत बसली होती. केशवबरोबरच्या गर्दीबरोबर पंढरपूरचे कांही धर्मकांड व ब्राम्हणवृंदही होते. केशवभटाने कलश आणलेला पाहुन ज्ञानेश्वरादी भावंडांसह पानावरुन उठुन सारे संत त्याला सामोरे गेले. कलशाला मनोभावे नमस्कार केला.
केशवभट तुम्ही स्वतःच तो कलश आंत आणा. माझा स्पर्श झाला तर कांही जादु टोणा करुन लोकांना फसवतो असा आरोप नको यायला. कलश घेऊन केशव भट चोखोबांच्या दाराशी आला, आंत जायला मात्र त्याचे मन धजवेना. त्याचा जास्त अंत न पाहतां म्हणाले, एकदा पुन्हा तीर्थ कडू असल्याचा पडताळा पहा केशवभटने चव बघीतल्यावर तीर्थ तसेच कडू होते. त्यांनी चोखोबांना समोर बोलावुन त्या तीर्थजलात बोटं बुडवुन चव घ्यायला सांगीतली. जर तुम्हाला कडु लागले तर नक्कीच त्या पांडुरंगाचा कोप आहे. चला पुढे व्हा. . . पांडुरंगावर असलेल्या माझ्या भक्तीची ही कसोटी आहे, आपण वारकरी, भक्तीसंप्रदायाचे पाईक आहोत. देव एकच आहे यावर आपला विश्वास आहे. या सर्व गोष्टींचा आज कस लागणार आहे. बोलतां बोलता ज्ञानदेवांचा आवाज चढला. हा क्षण त्यांच्याच नव्हे तर सर्वांच्याच कसोटीचा परीक्षेचा होता. कसोटी होत त्यांची विठ्ठलावरच्या अधिकाराची, परीक्षा होती त्यांच्या भगभद् भक्तीची आणि सत्व पणाला लागणार होतं सार्या संतमंडळींच!
हे काय भलतच! तीर्थपात्राचं दर्शन ही ज्यांना दुर्लभ अशा अस्पृश्याला तीर्थात बोटं बुडवायला सांगताहेत, चोखोबांची अवस्था मोठी विचित्र झाली. ज्ञानदेवांच्या आज्ञेने ते अंतर्बाह्य थरारले, घाबरले. आदेश मोडवतही नव्हता व पाळवतही नव्हता. त्यांची स्थिती पाहुन म्हणाले, कसला विचार करतां?आपण पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहोत हे सिध्द करण्याची वेळ आली आहे. कसलीही भिती न बाळगतां कलशात बोटं बुडवुन तीर्थ चाखुन बघा. धाडस एकवटुन चोखोबांनी कलशाला हात जोडत, विठ्ठलाचे नामस्मरण करुन उजव्या हाताची बोटं कलशात बुडवुन बाहेर काढली व तोंडात घातली.
आss हाss हा ss अत्यंत मधूर चव! साक्षात अमृतच! हे ऐकुन आपण काय करतो हे भान विसरुन केशवभटाने बोट बुडवुन चाखुन बघीतले, काय आश्चर्य! खरोखरच तीर्थाची चव अमृतासारखी मधूर होती. केशवभटाचा विश्वासच बसेना तो वारंवार तीर्थ चाटु लागला, त्याचे बघुन सोबत आलेल्या चिंतोपंतानीही चाटुन बघीतल्यावर, आश्चर्य, चमत्कार. . चमत्कार तीर्थ मधुर झाले म्हणुन ओरडत इकडे तिकडे पळुं लागला. जमलेला जमाव आश्चर्यचकीत झाला. खरे भगवद्भक्त सर्व जातीधर्माच्या पलीकडे असतात हे परत एकदा सिध्द झाले. समुदायाने ज्ञानेश्वरादी भावंडांचा जयजयकार तर केलाच, पण चोखोबांचाही जयजयकार करुं लागले. लोकांच्या उत्साहाला नुसते उधाण आले. तीर्थकलश वाजतगाजत मिरवणूकीने नेण्याची तयारी होईस्तोवर सर्वांनी जेवणं उरकली. सहाजिकच कर्ममेळाचे बारसे अत्यंत आनंदात पार पडले
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-४-२०२१.
! ! ! संंत चोखामेळा ! ! !
भाग – २७.
चोखोबाच्या बाळाचे कर्ममेळाचे बारसे असे थाटात झाले. गावकर्यांनी वाजतगाजत नेलेले तीर्थ मंदिरांतील मोठ्या पात्रात ओतल्यावर ते तीर्थही मधुर झाले. त्यामुळे संत मंदियाळात चोखोबांचे स्थान वरचे झाले. चार महिन्या पासुन कडु होत असणारे तीर्थ चोखोबां च्या स्पर्शाने मधुर झाले ही सगळी योजना पांडुरंगाचीच! कांही धर्ममार्तंड सोडले तर चोखोबांची भगवद्भक्ती आणि श्रेष्ठत्व, ते अस्पृश्य असुन सर्व जन सामान्यांना कळली होती. त्यांच्या बोटं बुडवल्याने कडु तीर्थ मधुर झाले ही घटना “याची देही याची डोळा” शेकडो डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिली. आणि एकमता ने ठरवल्या गेले, अस्पृश्य वस्तीत रोज तीर्थ यावे व सर्वांनी प्राशन करावे. हा ठराव गांवच्या ब्राम्हणवृंद व पंचायत समोर ठेवल्यावर अर्थातच बरीच खळखळ झाली पण, अखेर तीर्थपात्र चोखोबांच्या घरी ठेवुन पुर्ण पावित्र्य राखणाच्या अटीवर, पांचामुखी परमेश्वर या न्यायाने सर्वांना हा निर्णय मानावाच लागला.
हा विजय अस्पृश्य वस्तीचा, चोखोबांच्या भगवद्भक्तीचा, ज्ञानदेवांच्या क्रांतीकारी विचारांचा होता. आणि दोनच दिवसांनी केशवभटाच्या हस्ते छोटा तीर्थ कलश वाजतगाजत चोखोबांच्या घरी आला. नेमकी जागा निश्चित करुन कलशाची प्रतिष्ठापना करण्यांत आली. शरीराचि अणूरेणू विठ्ठलमय झालेल्या चोखोबांना कलशाच्या जागी, कटेवर हात हात ठेवुन उभा असलेला विठ्ठल दिसला. आणि उत्स्फुर्त शब्द उमटले. . .
विठोबा पाहुणा आला आमुचे घरा ।
निंबलोण करा जीवे वावे ।
पंचप्राण ज्योती ओवाळुन आरती ।
ओवाळीला पती रखुमाईचा ।
षडरस पक्वान्नाने विस्तारले ताट ।
जेवू एकवट चोखा म्हणे । ।
तो कलश आपल्या घरी राहणार म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलच आपल्या घरी येतोय! हा पांडुरंगाने आपल्यावर दाखवले ला विश्वास व बाळ कर्ममेळाचा पायगुण आहे या भावनाने, भक्ती करण्याचे व संघर्षाला सिध्द होण्याचे बळही मिळाले.
सगळं सुखनैवं चालले असतांना,
परमेश्वराच्या मनांत वेगळेच चालले होते. आपल्या भक्तांना छळण्यांत त्याला विशेष आनंद वाटतो. भयंकर घटना पंढरपूरांत घडली. अस्पृश्य चोखोबांचे वाढलेले प्राबल्य समाजांतील किंही घटकांना सहन होत नव्हते. चोखोबांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरु होते. नेहमी प्रमाणे त्या दिवशीही नामदेवांच्या विलक्षण रंगलेल्या किर्तनात मध्यरात्र कधी उलटली कुणाला कळलंही नाही. किर्तन संपल्यावर चोखोबा घरी येत असतांना वाटेतील समोरच्या विठ्ठल मंदिराच्या पायर्या चढुन महाद्वार बंद असल्याने तिथुनच दर्शन घेऊन घरी आले व निद्राधिन झाले.
दुसर्या दिवशी गावकीची नेमलेली कामे आटोपल्यावर शुचिर्भूत झाले. इकडे केशवभट शंकरभटाच्या मदतीने विठ्ठलाची षोडोपचारे पुजा आटोपल्यावर, विठ्ठलाला एकएक दागिना चढवायला सुरुवात केली. आणि अस्सल तेजाने लखलखणारा नवतरत्नाचा हार गायब! सर्वीकडे शोध घेऊनही चंद्रहार न दिसल्याने दोघेही खुपच घाबरले. आणि शंकरभटाने हार चोरीला गेल्याची बोंब ठोकली. दोघांचा आरडाओरडा ऐकुन देवाळाबाहेर गर्दी उसळली. कोणीतरी मुख्य पुजारी गोविंदभटाला बोलावुन आणले. हे निंद्य कृत्य ज्याने केले त्याला शिक्षा झालीच पाहिजे. गोविंदभटाने तातडीने मंदीराच्या विश्वस्तांची बैठक बोलावली. कसुन चौकशी सुरु झाली. सर्व दागिने, उपकरण, भांडी सर्व सोडुन फक्त रत्नहारच कां चोरला असावा?
तेवढ्यात नागेश बडवा अचानक म्हणाला हे काम त्या चोखोबाचेच! मध्य रात्री मी चोखोबाला मंदिरासमोर बघीतले त्यानेच कांहीतरी क्लुप्ती करुन, नेमका रत्नहार घेऊन पसार झाला असावा. मंगळवेढ्यातही तो असाच बेभान होऊन मंदिरांत शिरलेली भूतकाळातील घटना आठवली, त्यात तीर्थप्रकरण सगळ्यांच्या डोळ्यात सलत होतेच. ज्ञानदेवांची मध्यस्थी असल्यामुळे नाईलाजाने चुप होते, पण देवाचं तीर्थ अस्पृश्य वस्तीवर नेण्यास सर्वांचा विरोधच होता. चोखोबाने नुसता हारच चोरला नाही तर, देवालाही स्पर्श झाला असेलच! या गुन्ह्याबद्दल त्याला जबर शिक्षा देण्याचे एकमताने ठरवुन बैठक संपली.
इकडे चोखोबा नेहमीप्रमाणे आज पण पात्रातील तीर्थ हलवले तर तळाशी कांहीतरी दिसले म्हणुन दोन बोटाच्या चिमटीने धरुन वर काढले तर चक्क विठ्ठलाच्या गळ्यातील रत्नहार! त्यांचा विश्वासच बसेना. रात्री त्यांना स्वप्न पडले की, खोपटाबाहेर ब्राम्हणवेशातील एक व्यक्ती त्यांना हाकारत. . चला चोखोबा. . . पांडुरंगाने तुम्हाला बोलावले आहे. भारावल्या अवस्थेत त्या व्यक्तीबरोबर चोखोबा चालत मंदिराच्या महाद्वाराबाहेर थांबल्यावर. . . .
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – २८.
चोखोबा महाद्वाराजवळ थांबल्या वर ती व्यक्ती त्यांना गाभार्यात चलण्या चा आग्रह करुं लागल्यावर चोखोबा तयार होईना, तेव्हा विठ्ठलानेच तुम्हाला भेटीस्तव आतं बोलावले असे म्हणुन त्यांचा हात धरुन गाभार्यात नेले. चोखा भान हरपुन देवाला मिठी मारली. ते उन्मानी अवस्थेत असतांना देव म्हणाले,
झाली ना माझे दर्शन घेण्याची इच्छा पुर्ण मलाही तुला भेटायचे होते, चोखोबा! आतां घरी जा , . कुणी बघीतले तर. . तुम्ही माझे लाडके भक्त म्हणुन हा माझ्या गळ्यातील रत्नहार तुम्हाला देतो. चोखां ना त्या हारापेक्षा देवाचे जवळुन दर्शन झाल्याचा जास्त आनंद झाला. पहाटे जाग आली तो स्वप्न आठवतच. अवधाना ने त्यांचा हात गळ्याकडे गेला पण तिथे हार नव्हता. तीर्थकलशातील हार देवानेच पाठवला या समजुतीने त्यांनी तो गळ्यात घातला आणि नामस्मरणांत स्वतःला झोकुन दिले.
आपलं अभिषेकाचं तीर्थ रोज चोखोबाच्या घरी पोहचनं हा आनंद होता पण भक्ताने केलेल्या भक्तीच फळ व पुण्य सहजी मिळु देईल तर तो देव कसला?कसोटीस उतरल्याशिवाय भक्ताचा कस लागत नाही म्हणुनच चोखोबांची सत्वपरीक्षा पाहण्याचे त्याने ठरविले. त्याची भक्ती किती पराकोटीची आहे?चांगल्या वाईट, अत्यंत वाईट, महा भयंकर परिस्थितीतही त्याची भक्तीवर निष्ठा कायम राहील का?हे एकदा देवाला बघायचे होते, म्हणुनच रत्नहार त्यांच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था केली. रात्री स्वप्न दाखवल्यावर चोखा रत्नहार गळ्यात घालेल याची खात्री होती. ही परीक्षा फक्त चोखोबाचीच नव्हती तर, त्यांच्या भक्तीच्या सखोलतेची, श्रध्देची, अढळ विश्वासाची व प्रत्यक्ष पांडुरंगाचीही होती. एकंदरीत ही कसोटी सगळ्या मांगल्याची सत्वपरीक्षा होती.
चोखोबांनी गळ्यात रत्नहार घातल्यावर आपण जणूं विठ्ठलाच्या अलिंगनात बध्द असल्याच्या विलक्षण अनुभुतीने ते नामस्मरणांत दंग झाले होते. विठ्ठलनामाची उर्जा नसांनसातुन वाहत होती. पंढरपूरात आल्यावरसुध्दा आपल्या चोख वागण्याने, प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करणारा असा नावलौकी क मिळवला होता. सरकार दरबाराचे कितीही जोखमीचे काम असो, जिन्नस, गुपिते असो, कोणत्याही प्रलोभणाला बळी न पडतां, राजकर्त्याशी एकनिष्ठ, खाल्ल्या अन्नाला जागणारा असा नाव लौकिक चोखोबाने मिळवला होता. एक आगळी ओळख निर्माण केली होती. इकडे नामस्मरणांत दंग चोखोबा शांत होते आणि गावांत मात्र कोलाहल माजला होता. देवळात घडलेल्या घटनेची चर्चा केल्यानंतर, केशवभट, शंकरभट, गोविंदभट, नागेश बडवे, दहा बारा पुजारी असा शंभरएक लोकांचा समुदाय चोखां च्या दारासमोर पोहचला. त्यांच्या दारा बाहेर उभे राहुन शिव्यांची, अपशब्दांची लाखोली वाहत, भडीमार करत चोखाला बाहेर बोलावले. पण चोखोबा भान विसरुन नामस्मरणांत दंग!
बाहेर एवढा कशाचा गोधळ म्हणुन सोयराने डोकावुन बघीतले असतां, शंभर एक लोकं हातात लाठ्या काठ्या आणि शिविगाळ देत, ओरडत असलेला जमाव व बाहेरचा रागरंग पाहुन भितीने, व जिवाच्या आकंताने तिने मारलेली हाक नामस्मरणाचे अभेद्य कवच फोडुन चोखोबांच्या कानांवर आदळल्यावर ते निष्पाप भावनेने आले आणि जोहार घालुन येण्याचे प्रयोजन विचारले, पण त्यांच्या गळ्यात रत्नहार दिसल्यावर, संतापाने बेभान झालेल्या जमावाने एकदम त्यांना दगड धोंडे, वाहणे, लाठ्या काठ्या ने मारायला सुरुवात केली. चोखां ना कळेना की हे लोक कशासाठी मारताहेत?कोण वाचवणार?विठ्ठला शिवाय होतच कोण?वेदनेने, दुःखाने पिचलेल्या आणि झालेल्या मारहानीने दुखावलेल्या आर्त स्वरांत त्यांनी टाहो फोडला. त्यांचा तो वेदनेने भरलेला टाहो सगळ्या पंढरपूरचंं काळीज चिरत गेला. देवाच्या पायाखालची वीटसुध्दा थरारली.
आपल्या नवर्याला कां मारताहेत हे न कळुन त्यांचा मार चुकवण्याचा प्रयत्न करुं लागली, पण तिला ते शक्य होईना. मग मात्र आर्त स्वर निघाले. . . .
” येई वो विठ्ठले येई लवकरी ।
धावे तू सत्वरी मजलागी ।
आमुचा विचार आता काय देवा । सांभाळी केशवा मायबापा । ।
आता कवणाची पाहू मी वास ।
अवघेंचि वास दिसतसे ।
सोयरा म्हणे अहो पंढरीच्या राया ।
आमुची ती दया येऊ द्यावी । ।
अशा शब्दात सोयराने गहिवर घातला पण चोखोबाला होणारी मारहाण चालुच होती. जीव गेला तरी चालेल पण अद्दल घडवायचीच या उद्देशाने, आवेगाने मारहाणीबरोबर शिव्यांचा भडीमार चालुच होता. कुणी अंगावर थुंकत, लघवी क्रुरतेची परिसीमा गाठली होती. क्रूर जनावरालाही लाजवेल इतके पशुवत विभित्सता सुरु होती.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-४-२०२१.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – २९.
अखेर मारणार्यांचे हात थकले. चोखोबांच्या डोक्याला खोक पडुन रक्त वाहत होते. सर्वांगावर लाठ्या काठ्यांचे वळ उमटले होते. मनसोक्त मारहान झाल्यावर गोविदभट म्हणाले, रत्नहार चोरला, स्पर्श करुन देवाला बाटवले, गळ्यात हार घालण्याचा ऊध्दटपणा केला. पांडुरंगाच्या भक्तीचं संतपणाचं हे ढोंग, इमानीपणाचा कांगावा सगळंसगळं पंचासमोर येईलच.
पंचाची बैठक बसली. शंभराहुन अधिक लोकांनी चोखांच्या गळ्यात हार बघीतला होता. हारचोरीच्या आरोपास एवढा पुरावा पुरेसा होता. पंचानी शिक्षा सुनावली, ती ऐकुन भल्या भल्याच्या रक्ताचं पाणी पाणी झालं. चंद्रभागेच्या वाळवंटात चोखोबाला बैलाच्या पायी जुंपुन वाळवंटातुन फरफटत न्यावे. . चोखोबांना कळेना , त्यांच्याकडुन कधी, केव्हा काय चुक झाली?स्वप्नात देवाने दिलेला रत्नहार प्रत्यक्षात आलाच कसा? निरपराध असल्याचा कोणताही पुरावा ते देऊ शकत नव्हते. मुकपणे शिक्षा भोगणे क्रमप्राप्तच होतं. शिक्षेची बातमी वार्या सारखी गावात पसरल्यामुळे कुणी हळहळत, तर कुणी आनंदाने वाळवटा कडे धाव घेतली.
नामदेवादी संतांच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. चोखोबा आणि चोरी? अशक्य. यातुन निरपराध व प्रामाणिक चोखोबाला वाचवायलाच हवे. नामदेव, गोरोबा, जना बाई आदी मंडळी वाळवंटाकडे धावली. चोखोबाला काढण्या घालुन उभे केले होते. पायाशी सोयरा केविलवाणी रडत होती. नामदेवादी मंडळी तिथे पोहचुन पंचमंडळींना नमस्कार करुन म्हणाले, चोखोबासारखा श्रेष्ठ भगवद्भक्त, तेही देवाच्या रत्नहाराची चोरी, कदापी शक्य नाही. कुठेतरी कांहीतरी गैरसमज झाला असावा. त्यांना स्वतःचं मत मांडायची एक संधी द्यावी. पंचप्रमुख म्हणाले, ही धर्मकार्याची बाब, वर्णाश्रमाचा मामला आहे. धर्मग्रंथानुसारच सजा सुनावली आहे. गावाने बहिष्कार टाकु नये व अपमान होऊ नये असे वाटत असेल तर यात कुणीही हस्तक्षेप करुं नये. गोरोबाने ही विनंती केली पण व्यर्थ!
मोठ्या निष्ठेने गावकीची कामे करणारा, कुणाच्याही अध्यामधात नसणारा, कामं आटोपली की, विठ्ठलाची भक्ती करत अभंगरचना करणारा सरळ मनाचा प्रांजळ चोखोबा. . त्यांच्यावर नसते कुभांड आले होते. त्याकरतां दिलेली सजा तितकीच अमानवी, पशुवत क्रूर होती. नामदेवांची रदबदलीही वाया गेली. सोयरा धाय मोकलुन रडतां रडतां दीनवाने पांडुरंगाचा धावा करत होती. तो येत नाहीसा पाहुन आपल्या अभंगातुन साद घालत. . . .
” देखोनी आंधळे का बा जन होती ।
न कळे या गती मज लागी ।
एकाते मरता आपणचि देखति ।
तयासी रडती आपणची । ।
हा कैसा नवळाव न कळे यांचा भाव ।
कोण घाव डाव आम्हालागी । ।
यचिये संगती अपायची मोठा ।
दुःखाचा शेलवटा भाग आला । ।
आता पुरे हरी आता पुरे हरी ।
सोडवी निर्धारी यातोनिया । ।
बहुतची खंती करितसे मन ।
दाखवा चरण मज लागी । ।
गहिवर नावरे उदास अंतरी ।
म्हणतसे महारी चोखियाची । । “
असे पुन्हा पुन्हा विठ्ठलाला आळवत जमीनीवर अंग टाकुन छाती पिटत आक्रोश करत होती. पण कुणालाही पाझर फुटला नाही. अखेर क्लांत होऊन १०-१२ वर्षाच्या कर्ममेळाला जवळ घेऊन उदासवाणी, पुढे काय होईल या शंकेने धडधडत्या काळजाने, थरथरत्या शरीराने, उध्वस्त मनाने बसुन राहिली. या सर्व गदारोळापासुन अलिप्त चोखा मात्र स्तब्ध, निश्चल, ठामपणे, निर्धारिने उभे होते मनांत मात्र द्वंद. . . सत्याचं-असत्याशी, अस्तित्वाचं-अचेतनाशी, श्रध्देचं-अधिकाराशी, विश्वासाच-सत्येशी, धर्माचं-अधर्माशी, प्रांजलपणाचं-अत्याचाराशी! कसोटी होती चोखोबाची पांडुरंगावरचा विश्वास, अस्तित्व व श्रध्देवरची! “भक्ताचा पाठीराखा” या नामोनिधानाबद्दल त्यांना वाटत असलेली खात्री, श्रध्दा, भक्ती आणि विश्वास या अधिष्ठानावर चोखोबा शांत उभे होते.
शिक्षेची तयारी झाली. काढण्या बांधलेल्या अवस्थेत फळीपर्यत नेत असतांना चोखोबा अगदी शांत होते. शिक्षेस न जातां विठ्ठलाच्या मंदीरांत जात आहोत असे भाव चेहर्यावर होते. ते स्वतःच फळीजवळ येऊन उभे राहिले. मंदिराच्या शिखराला, सगळ्या जनसमुदा ला, संतमंडळींना नमस्कार व पंच व ब्राम्हणादी मंडळींना जोहार घातला. एक कटाक्ष विलाप करणार्या सोयराकडे टाकला. कदाचित ही नजरभेट शेवटचीच
पांडुरंगावर त्यांचा दृढ विश्वास होता. अत्यंत शांतपणे धीमी पावले टाकत बैला जवळ येउन मायेने वशिंडावरुन हात फिरवुन शांतपणे फळीवर जाऊन झोपले
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-४-२०२१.
भाग – ३०.
गोविंदभटाच्या आज्ञेने केरबाने बळकट दोरीने चोखोबांना फळीस बांधले. आणि शंकरभट व नागेश बडव्या स आसुड बैलाच्या पाठीवर मारण्यास सांगीतले. आसुडाचा सपकारा मारला. सपss या आवाजासरशी सगळ्यांचे काळीज चिरत गेले. विठ्ठलमंदिरांच्या भिंती थरारल्या, वारा स्तब्ध झाला. चंद्रभागा वाहायची थांबली. प्रतिध्वनी गाभार्यात उमटले. सपसपसप शंकरभट व नागेश बडवे आसुडा मागुन आसुड, फटक्यामागुन फटके बैलांच्या पाठीवर मारत होते. बैलांच्या पाठी रक्ताळल्या, पाय जमीनिला खिळल्यागत, इतके भयंकर फटकारे बसुनही बैल तसुभरही हलले नाही. काय चाललय कुणालाच कळेना. वाळवंटांत जमलेले शेकडों डोळे बघत होते. डोळ्यात प्राण आणुन अत्यंत दुःखी अंतकरणाने नामदेवादी संतमंडळी
चोखोबाला होणारी शिक्षा बघत होते. इतका मार खाऊन बैल तसुभरही हलले नाहीत म्हणुन नामदेवांनी उर्ध्व दृष्टी लावली. काय दिसले त्यांना?दोन्ही बैलांच्या समोर निळे वलय पसरले होते
आणि त्या वलयात प्रत्यक्ष पांडुरंग कमरे वरचे दोन्ही हात काढुन बैलाची शिवळ धरलेली दिसले. मस्तवाल व माजलेले बैल मान खाली घालुन दीनपणे स्तब्ध उभे होते.
नामदेवांनी मनोमन त्या सावळ्या मूर्तीला वंदन केले. नामदेवांना जे दिसले ते फळीवर झोपलेल्या चोखोबालाही दिसले. आपली श्रध्दा, विश्वास, भक्ती सार्थ ठरल्याचा अभिमान त्यांच्या मुद्रेवर चमकत होता. फळीवर बांधलेल्या दोर्या आपोआप सुटल्या, मंदिरांतील घंटा जोरजोरांत वाजायला लागल्या. सगळ्या लोकांनी विठ्ठलाचा व चोखोबांचा जयघोष केला हे पाहुन गोविंदभट संतापाने पिसाळले. डोळ्यातुन ठीणग्या उडाल्या, अंगाचा नुसता तिळपापड झाला चिडक्या आवाजांत शकरभटाला म्हणाले बैल हलले नाही तर काय झाले?पायाशी पडलेल्या चोखोबाला फटके मारुन सोलुन काढा. शंकरभट आसुडाचे फटकारे चोखोबांना मारु लागले. चोखोबा दुःखाने, वेदनेने आर्त किंकाळ्यांनी अवघे वाळवंट भरुन गेले. सहनशक्तीचा अंत झाल्यावर, टाहो फोडुन विठ्ठलाचा धावा करुं लागले. त्याही अवस्थेत धावा करत त्यांच्या तोंडुन अभंग बाहेर पडला.
चोखोबांच्या स्वरांतील आर्तता, अपार करुणा, वेदनेने भरलेल्या आकाश फाडुन जाणार्या किंकाळ्या आणि घायाळ होऊन केलेला देवाचा धावा ऐकल्यावर मात्र नामदेवांना राहवले नाही
त्यांच्यासह सर्व संतमंडळींनी आणखी न मारण्याची विणवणी केली. लोकांतील चुळबुळ व अस्वस्थता पाहुन, जर मारणे असेच सुरु ठेवले तर लोकक्षोम वाढु शकेल हा विचार करुन, गोविंदभटाने मारणे थांबवण्याचा इशारा केला. वेदनेने तडफडणार्या चोखोबांना वाळवंटांत तसेच टाकुन सारेजन निघुन गेले, पण जाता जाता खणखणीत आवाजातील अभंग त्यांच्या कानी पडला.
“चोखामेळा संत भला । तेणे देव भुलविला
भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटी । ।
चोखामेळ्याची करणी । तेणे देव केला ऋणी । ।
लागा विठ्ठल चरणी । म्हणे नामयाची जनी
जनाबाई अत्यंत तल्लीन होऊन अभंग गात होती. वेदनेने कळवणार्या चोखोबांना नामदेवांनी आधार देऊन उठवले. सगळ्यांनी आधार देऊन खोपटात आणले. आसुडाच्या फटक्यांनी सोललेली पाठ सोयराने गरम पाण्याने हळुवार शेकुन जखमांना तेल हळद लावली. शुध्दीवर आल्यावर सारे संत मंडळी आपल्या भोवती दुःखी चेहर्याने बसलेली पाहुन त्यांना भरुन आले.
डोळ्यांत पाणी आणुन कापर्या आवाजांत नामदेवांना म्हणाले, देवा! पांडुरंगाची शपथ! मी रत्नहार चोरला नाही, मंदिरांत गेलो नाही. स्पर्शही केला नाही. मी जर चोरला असता तर राजरोस पणे गळ्यात घातला असतां कां? देवा! तुमचा विश्वास आहे ना?गुरुमाऊली तुमच्या नजरेत जर मी चोर असेल तर मला जगायचा अधिकार नाही. खरचं मी रत्नहार चोरला नाही. . . . चोरला नाही. . असे पुनः पुनः म्हणत चोखोबा स्फुंदुन स्फुंदुन रडु लागले. त्यांचा आकांत पाहुन सर्वांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. नामदेवांनी त्यांचे हात हाती घेत म्हणाले, तुम्ही कधीच चोरी करुं शकत नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे. चोखोबा! तुमच्या श्रध्देची, भक्तीची, विश्वासाची तो पांडुरंग परीक्षा घेतो आहे. आवडत्या भक्तांची कसोटी घेणे त्याचा लाडका छंद आहे. त्याच्या दृष्टीने कुठल्याही जाती धर्माचा, जर तो भगवद्भक्त, वारकरी असेल तर त्याला प्रिय व पवित्रच असतो. चोखोबा! पुंडलकानं स्थापन केलेला हा भागवत धर्म, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीनं पुनरुज्जीवित केला. ज्ञानेश्वर माऊली व त्यांची भावंडे ब्राम्हण! पण भागवतधर्माचे दुर्दैव की, एका ब्राम्हणाने त्याचं पुनरुत्थापन केल्यावर फारच कमी ब्राम्हणांनी स्विकारला. सगळ्या जाती धर्माला एकत्र आणणारा हा धर्म ब्राम्हांणांनी नाकारला आणि बहुजन समाजाने स्विकारला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.










