संत चोखामेळा संपूर्ण चरित्र + अभंग भाग ७, (३१ ते ३५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! !

! ! !  संत चोखामेळा ! !

भाग – ३१.

 चोखोबा! तुम्ही वारकरी! भागवत धर्मीय असुनसुध्दा देवाचे दर्शन घेण्याचा अधिकार नाही याचे वैश्यम्य वाटुन घेऊं नका. ज्ञानदेव तर ब्राम्हण! प्रत्यक्ष ज्ञानसूर्य असुनही ब्राम्हण समाजाने त्यांची अवहेलना केलीच ना?चोखोबा!  तुम्ही आधीही आमचे होता, आताही आहांत आणि पुढेही राहणार आहात. अशी समजुत काढुन मंडळी निघुन गेली.

 ज्याला आपला लाडका भक्त समजतो, त्याची किती सखोल श्रध्दा आहे?जीवघेण्या प्रसंगातही त्याची भक्ती कायम राहते की, परावृत्त होतो, एवढ्या साठीच हा सगळा मायेचा बाजार त्या पांडुरंगाने मांडला होता. नामदेवांच्या विनंतीवरुन चोखोबांची मारहाण गोविंद भटाने थांबवली खरी पण त्याचे समाधान झाले नव्हते. त्यांनी हद्दपारीची शिक्षा ठोठावली, हे कळल्यावर चोखोबांना प्रचंड धक्का बसला. पंढरपूर सोडुन जायचय? विठ्ठलापासुन दूर जायचाय? ज्या विठ्ठलाचे दर्शन दूरुन कां होईना घेतां यावं म्हणुन संसाराची बसलेली घडी राहतं घर सोडुन ज्या पंढरपूरात आलो ते सोडुन जायचय?नामदेवांच्या सांगण्या नुसार ते पंढरपूर आपली कर्मभूमी आहे, जीथे आपल्या प्रतिमेला अंकुर फुटला, अंभगरचनेचं लोकोत्तर कार्य आपल्या हातुन घडविलं, जिथं विठ्ठल, सखा बनुन आपल्याला भेटला, नामदेवांसारखा गुरु, इतर संतमंडळी समान विचारांचे स्नेही भेटले, ज्ञानदेवांसारख्या ज्ञानसूर्याचे दर्शन घडले, इथल्या संतमंडळींनी माझ्या सारख्या अस्पृश्याला आपलं मानलं, ज्या विठोबा मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतल्याशिवाय आपला दिवस उजाडत मावळत नाही ते सगळं इथे सोडुन जायच?म्हणजे पंचप्राण इथं ठेवुन फक्त हे निर्जिव शरीर फक्त न्यायचय! विठुराया असच जर करायच होतं तर, त्या शिक्षेतुन वाचवलच कशाला?आज जिवंतपणी प्राण गेल्यागत अवस्था झाली तरी नसती नाही. . नाही. .  मी माझ्या सावळ्या विठ्ठलाला, पंढरपूरला सोडुन कुठेही जाणार नाही. चोखोबा आक्रोश करीत होते.  

 खरं तर त्या मारहाणीच्या घटने नंतर त्यांनी स्वतःला विठ्ठलभक्तित झोकुन दिले होते. गावकीनं नेमुन दिलेली काम झाली की, विठ्ठलनामांत दंग असे.

अभंगरचनेला आणखी फुलोरा आला होता. दिवसभरांत सुचलेले अभंग मुखोद्गत करुन संध्याकाळी गोरोबांच्या घरी अनंतभट लिहुन काढत असत.  नामदेवांनी दिलेल्या त्रिशरी विठ्ठल नामाने त्यांना जणुं झपाटुन टाकले होते, आपल्या जीवनाचे साध्य, साधन फक्त विठ्ठल नामच आहे अशी खात्री पटली होती,

‌ चोखोबांना झालेल्या मारहाणी नंतर, , सोयराने मात्र एक केले, तिने निर्मळा व बंकाला बोलावुन घेतले आणि गणाकाकाच्या मदतीने आपल्या शेजारी खोपटे बांधवुन घेतले. गणाकाकाच्या मदतीने झाडलोटीचे काम बंकाला मिळवुन दिले. चोखोबांचे संतमेळ्यातील स्थान, प्रत्यक्ष ज्ञानदेव माऊलीशी असलेले संबंध, यामुळे भारावलेल्या बंकाला आपण अभंगरचना करावी हे त्याचे स्वप्न इथे पंढरपूरात राहयला आल्या मुळे प्रत्यक्षात उतरणार होते.  सहाजिकच लाडकी बहिण व मेहुणा आल्याचा आनंद चोखोबांना मना पासुन झाला.

 सकाळी लवकर उठुन चोखा व बंका गावकीच्या कामावर जात. घरी आले की, शुचिर्भूत झाल्यावर, चोखोबा नामस्मरणास बसत. बंकाही सोबत असे.

बंकाची इच्छेनेनुसार चोखोबांनी त्याला आपला शिष्य केला. तो चोखोबांचे अनुकरण करत. अनेक प्रश्न विचारुन ज्ञान वृध्दींगत करुं लागला. मोडकी तोडकी अभंगरचना करुं लागला.  सोयराच्या संगतीची लागन निर्मळालाही लागली. कर्ममेळाच कसा बरं कोरडा राहिल?चोखाबांचे सगळे कुटुंबच भक्ती गंगेत आणि शब्दगंधेत न्हाऊन निघाले.  अस सर्व सुरळीत सुरु असतांना, साक्षात पांडुरंग पाठीशी असतांना, पंढरपूर सोडण्याची पाळी आपल्यावर यावी याचे त्यांना अतिशय दुःख झाले. अवघे आयुष्य पंढरपूरीच व्यतीत करायचे ठरवणार्‍या चोखोबाला हद्दपारीचा हुकुम मिळाल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कुठे जावे?कुणाचा सल्ला, मदत घ्यावी?गार्‍हाणे कुणाकडे मांडावे?कांही सुचेना. अखेर गुरु नामदेवांकडे धाव घेतली. देवा!  या वैकुंठपुरीलाही आम्ही जड झालो. विठुरायालाही माझी अडचण झाली. तुम्ही माझे गुरु ना?कुठे जाऊ? कुठे राहु?ब्राम्हणांच्या दृष्टीने पाप केले, व जे केलेच नाही त्याची शिक्षा भोगली ना?

विठूरायाला सोडुन कुठे जाऊ?घायाळ स्वरांत चोखोबा आक्रोश करीत होते आणि शब्दांगणिक ओरखडे मात्र नामदेवांच्या मनावर उठत होते. थांबाss चोखोबा थांबाss विलाप आवरा. .  वर्णाश्रम व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणालाच नाही मला सुध्दा. . . .

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  २०-४-२०२१.

! ! !  संत चोखामेळा ! !

भाग – ३२.

 नामदेव म्हणाले, आहे ती परिस्थिती स्विकारुन त्यातुनच मार्ग निघेल. कदाचित पांडुरंगाचीच इच्छा असेल. चोखोबा! चंद्रभागेच्या पलिकड च्या तीरावर जाऊन रहा. तुम्हाला जरी शक्य नसले तरी आम्ही तर भेटीला येऊ शकतो. मंदीराचा कळसही दिसेल.

 वास्तविक हि योजना पांडुरंगाचीच होती. चोखोबाला एकांत मिळावा, दैनंदिन कामापासुन मुक्तता मिळावी, त्यांच्या हातुन लोकोत्तर कार्य घडावे. नामदेव म्हणाले, जास्त विचार न करता चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर संसार मांडा, त्रिक्षरी विठ्ठलांत बुडुन जा. जायच्या आदल्या दिवशी चोखोबांचे किर्तन ठेवले होते. दोन दिवसांनी आषाढी एकादशी होती. चंद्रभागेच्या तीरावर उध्वस्त मनाने भरल्या डोळ्यांनी, दुःखी मनाने चोखोबा बायकोमुलासह खोपटे बांधुन संसाराचा डाव पुनः नव्याने मांडला.

 आज आषाढी एकादशी! विठोबाची षोडपचारे पुजा झाली. महा प्रसाद झाला. चोखोबा किर्तन करणार ही बातमी सगळीकडे पसरली. हा त्या नाम्या शिंप्याच्या नादी लागुन किर्तन कसा करतो, देवाचा रत्नहार चोरणारा, पंचानी तडीपार केलेला हा चोखा कसा किर्तन करतो या कुत्सित भावनेचे व त्यांना मानणारे अशा वेगवेगळ्या भावनेने विठ्ठलमंदिरा मागचे पटांगण गर्दीने फुलुन गेले होते.

 चोखोबांनी भक्तीभावाने नामदेवां च्या पायावर नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतला. कळसाला नमस्कार करुन अनन्य भावे विठ्ठलाला शरण जात, समोरच्या समुदायाला मस्तक झुकवुन नमस्कार केला. हातातील टाळांचा नाद करत गजराला सुरुवात केली. जयजय रामकृष्ण हरी । जयजय रामकृष्ण हरी । विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी । होतो नामाचा गजर । दिंड्या पताकांचे भार ।  । गजर संपला आणि चोखोबांनी भावुक, कातर पण खडा आवाज, भक्तीचा भावतरंग, भावनेनं ओथंबलेल्या स्वरांत बोलायला सुरुवात केली. मी विठ्ठलाची चाकरी करतो. गावा ची घाण उपसुन गाव स्वच्छ करतां करतां माझे मनही स्वच्छ करतो.

 माझ्या या स्वच्छ मनावर पांडुरंगा ची एक अविनाशी मुद्रा उमटवली आहे.  माझ्यासारख्या हीन जातीच्या अस्पृश्य व्यक्तीला भक्तीमार्गाला लावुन माझ्या अचेतन मनाला चेतना देऊन, पंचप्राण ओतुन जिवंत केले. माझे गुरु नामदेवांनी मला भक्तीमार्ग दाखवला. वारकरी संप्रदाय सांगुन त्या विठूमाऊलीला शरण जायला सांगीतले. खरंतर समाजाने नाकारलेल्या, लाथाडलेल्या जातीचा, देव भक्तीच काय पण देवाचं नांव घेण्याची सुध्दा आमची पात्रता नाही. समाजपुरुषा ने तो अधिकार आम्हाला दिला नाही. या जातीत देवाने कां जन्माला घातले? आणि घातलेच तर, विठ्ठलभक्तीचा छंद कां लावला?ज्ञानोबा माऊलीने सांगीतल्यानुसार या चराचर सृष्टीतील प्रत्येक सजीव निर्जिव, प्रत्येक व्यक्तीत, प्राण्यात आहे. जसा तो मूर्तीत आहे तसा तुमच्या माझ्यात आहे. मग तो जर एकच आहे तर, तुमचा विठ्ठल सोवळा व माझा विठ्ठल ओवळा कसा?

 विठ्ठल माझे सर्वस्व आहे. त्यांच्या वर माझा दृढविश्वास आहे. ज्ञानोबा माऊलीने भागवत धर्माचा उध्दार केला.  समाजाने अस्पृश्य म्हणुन वाळीत टाकलेल्या जातीत जन्मलेल्या या भक्ताला भागवतधर्माने आपलसं करुन भक्तीचा मार्ग खुला केला. संत नामदेव.  गोरोबाकाका, जनाबाई या सारख्या संतांच्या संगतीत माझ्या आत्म्याला अस्तित्वाला, विचारांना आकार, शब्दांना सामर्थ्य आणि भक्तीला भावनेची जोड मिळाली. माझ्यासारख्या निरक्षराकडुन वेडेवाकड्या शब्दात होत असलेली अभंगरचना अनंतभट लिहुन घेताहेत.  अशा विठुरायाचं मला वेड लागलेलं, अवघं आयुष्य त्याच्या पायी वाहलं आहे.  उरलेलं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यत त्याच्याच भक्तीत, नामस्मरणांत सरावं असा आशिर्वाद मायबाप हो तुम्ही द्या.

 पंचपरमेश्वरांच्या आज्ञेवरुन माझा संसार चंद्रभागेच्या पैलतीरी नेला आहे.  तुमची गल्ली गटारं साफ करणारा, तुमचे उष्टे खरकटे खाणारा, तुम्ही लाथाडल्यावर ही थुंकी झेलणारा व परत परत दारांत येणारा, गावांने तिरस्कृत केलला व नामदेवादी संतांनी जवळ केलेला हा अस्पश्य चोखा, मायबापहो उद्यापासुन तुम्हाला या पंढरपुरात दिसणार नाही.  वाढत का व माय ही आरोळी ऐकु येणार नाही. या वैकुंठनगरीतील हे माझ पहिलं आणि शेवटचं किर्तन कोणाला उपदेश, प्रबोधन नसुन, फक्त आत्मनिवेदन आहे.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  २०-४-२०२१.

! ! !  संत चोखामेळा ! ! !

भाग – ३३.

 आतांपर्यंत विठुरायानं माझे खुप लाड करुन दया दाखवली. पण आतां त्याच्यापासुन लांब, सोडून जाण्याची वेळ जवळ आली आहे, त्याचा विरह सोसणार नाही पण समाजाच्या नीतिनियमाचे पालन तर केलेच पाहिजे ना?समाजातील या थोर लोकांनी माझ्यातील अस्पृश्यता बघीतली, माझ्यातील भगवद् भक्ती दिसली नाही. अमंगळ देहाच्या शुध्द-अशुध्दतेवरुन परीक्षा करणारी ही श्रेष्ठ मंडळींना माझ्यातल्या आत्म्याची शुध्दता दिसली नाही. धर्मजातीचे भेद देवाने निर्माण केले नसुन मानवनिर्मित आहेत. तसं नसतं तर माझ्यासारख्या अस्पृश्याला जवळ केलं नसत. माझी फक्त या श्रेष्ठ समाजधूरीतांना एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही दिलेल्या शिक्षेचा स्विकार केला. पण विठ्ठलाच्या या राज्यात देहाच्या शुध्दतेची कसोटी लावुन आत्म्याच्या शुध्दतेवर अन्याय करुं नका. हा माझा शेवटचा जोहार!

 चोखोबा जोहार गात होते. ते फक्त किर्तन नव्हतं तर त्यांच्या ह्रदयातील वेदान्त बाहेर पडत होता. रात्रीचा पहिला प्रहर संपला तरी चोखोबांचे किर्तन सर्व लोकं मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. बाया बापड्या स्फुंदुन स्फुंदुन रडत होत्या.  चोखोबांनी शेवटचा जोहार घातल्यावर नामदेवादी संतांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले. नामदेव डोळे पुसत सहज समोर लक्ष गेले आणि पाहतच राहिले. भगवे पागोटे डोक्यावर घालुन वारकर्‍याच्या वेशात साक्षात पांंडुरंग किर्तनाला हजर होते. क्षणभर नजरानजर झाली तसं खुणेने गप्प राहण्यास सांगुन पुन्हा किर्तन ऐकु लागले.

 विठोबांची शेजारती संपल्यावर गोविंदभट, शंकरभटासह मंदिराबाहेर पडले. घरी जातांना चोखोबांच्या शब्दा शब्दातुन वेदना प्रतित होत होत्या. त्यांच्या शब्दात अध्यात्माबरोबरच भावनोत्कटता ही होती. निव्वळ विनम्रता! कुठेही बंडखोरीचा आभास, तक्रारीचा सूर, अन्यायाची चीड, प्रतिकाराची भूमिका नव्हती. होता फक्त वस्तुस्थितीचा स्विकार विठ्ठलनामाचा, भक्तीचा विचारच होता. या पापभीरु निष्पाप विठ्ठलभक्ताला हद्दपार करुन आपण अन्याय तर केला नाही ना?

 चोखोबांना डोळे भरुन पाहत लोकं आपापल्या घरी गेलेत. रडणार्‍या चोखोबांना शांतवुन नामदेवादी संतांनी त्यांना चंद्रभागेच्या पैलतीरी खोपटापर्यंत पोहचवुन परतले. लोकांच्या मनांंतील त्यांना हद्दपार केल्याचे किल्मिष निघुन जावे म्हणुन नामदेवांनी किर्तनाचा प्रपंच मांडला होता. चोखोबांचे किर्तन ऐकुन लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पाहुन त्यांच्या प्रांजळ भक्ती व निष्पाप श्रध्देमुळे ते लोकांच्या स्मरणात चिरकाल राहतील.

 दूसरे दिवशी चोखोबांना जाग आल्यावर क्षणभर आपण कोठे आहोत हेच कळेना. भानावर येऊन मनाशी निश्चय केला, जर भगवंताचीच अशी इच्छा असेल तर, हसतमुखाने स्विकार करणे, त्याच्या आदेशाचे दृढपणे पालन करुनच आपली दिनचर्या बनवणे हेच जीविताचे लक्ष्य असेल. आतांपर्यंत पंढरपूरवासीयांनी भाबडा, सत्शील, हळवा चोखोबा पाहिला, पण आतां पैल तीरी राहणारा चोखा कांहीसा वेगळाच असेल.

 विठोबाचा विरह सोसून पंढरपुर पासुन दूर राहुन जगायचे कसे?या गहन प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळाले. त्यांना बांधकामाचे उत्तम ज्ञान होते. इतके दिवस केवळ विठ्ठलभक्तीतच मग्न असल्यामुळे या ज्ञानाचे विस्मरण झाले होते, त्याचा आतां उपयोग होणार होता. दुसर्‍या दिवशीपासुन प्रसन्न मनाने एकांतवासात ले जीवन व्यतीत करायला सुरुवात केली त्यांनी वीटा तयार करायचे काम सुरु केले कामांत मग्न असतांनाही सतत तोंडात नामस्मरण असायचेच कामं आटोपल्या वर शूचिर्भूत झाल्यावर नामस्मरणांत दंग होऊन बेभानपणे नाचायचे, त्या उन्मनी अवस्थेत मग विठ्ठलाचे, पंढरपूरचे, एकांत वासाचे, समाजाच्या मानसिकतेचे, नामदेवांच्या गुरुभक्तीचे, जातीहीनतेमुळे सोसाव्या लागणार्‍या दुःखाचे होणार्‍या अत्याचाराच्या वेदनेचे वर्णन त्यांच्या रसाळ वाणीचे अभंग उमटु लागले.  नामदेवांच्या सुचनेनुसार अनंतभट त्यांचा प्रत्येक शब्द टिपून घेत. चोखोबांच्या अभंगाला असं लिखित गाथेचं स्वरुप यायला लागलं.

 असेच दिवस महिने, वर्षे सरले, पण चोखोबांच्या कामात खंड पडला नाही.  खोपटाच्या मागे वीटांचा ढीग साचत गेला त्याचबरोबर अभंगाची संख्याही! नामदेव व संतमंडळी भेटायला आल्यावर दीप माळ बांधण्याचा मनोदय चोखोबाने त्यांना सांगीतल्यावर नामदेव प्रसन्न झाले आपल्या अभंगरचनेची पोथी नामदेवांना दाखवल्यावर म्हणाले, चोखोबा! तुम्ही दुःखाने खचुन न जातां, इतकी सरळसोपी शब्दरचना आणि शब्दाशब्दातुन प्रतित होणारी उत्कट भक्तीभाव, तुमचे अभंग युगानुयुगे चिरकाल टिकुन, तुमच्या नावांची पताका वारकरी अभिमानाने खांद्यावर घेतील.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  २०-४-२०२१.

! ! !  चोखामेळा ! ! !

भाग – ३४.

 चोखोबा!  मी आतां तीर्थाटनाला जातोय, परतायला बराच अवधी लागेल.  आतां तुम्हाला कोणाची गरज नाही.  तुमचा एकांतवास असाच व्यतीत करा.  आशिर्वाद देऊन नामदेव संतपरिवारासह परत गेले. हव्या तेवढ्या वीटा जमा झाल्यावर चोखोबांनी दीपमाळेच्या बांध कामाला सुरुवात केली. दीपमाळेचे बांध काम, श्वासागणिक उच्चारले जाणारे विठ्ठलनाम व अधूनमधून रचली जाणारी अभंगरचना असा त्रिमूर्ती कार्यक्रम अविरत सुरु होता. मधुन मधुन पंढरपूर हुन त्यांना भेटायला संतमंडळी आले की, तो दिवस अतिव आनंदात जात असे.  सोयराही त्यांचे आगत स्वागत मोठ्या आनंदाने करीत असे.

 एक दिवस असा प्रसंग घडला की, चोखोबांच्या बुध्दीचातुर्याची आणि अध्यात्माच्या खोलीची झलक सगळ्याना अनुभवायला मिळाली. नामदेव तीर्थाटना वरुन आले त्याच दिवशी संतमेळा चोखोबांना भेटण्यास आले, पण त्यांच्यात नामदेव व जनाबाई दिसले नसल्याने, चौकशी केल्यावर ते मागाहुन येत असल्याचे कळले. सर्व मंडळी त्यांची वाट बघत गप्पा गोष्टी सुरु असतांना, अचानक चोखोबा म्हणाले. . . .

” कैसा हा हाट कवणाची गोणी ।

 वेगळाचि राहिला मालधणी ।

 कवणाचा वाण विकतसे कवणा ।

अवघा पसारा ठेवी झाकोन ।  ।

मावळला दिन झाकलास हाट ।

अवघा बोभाट वाटलासे ।

चोखा म्हणे माप भेटियेले सिंगे ।

आता कोणाचे पदरी देऊ उगे ।  ।

 ही अभंगरचना सुरु असतांनाच जनाबाईसह नामदेव येऊ पोहचले. वाss

 चोखोबा वाss हे नाविन्यपुर्ण हाटाचे आणखी अभंग ऐकवा. मग हाटावर बरेच व्यक्तव्य करुन सुंदर सुंदर अभंगरचना चोखांनी म्हणुन दाखवले. नामदेव म्हणाले हाट संकल्पना ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत अत्यंत समर्पक रीतीने मांडली आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

“एरव्ही त्रैलोक्य हे धनुर्धरा  ।

तिथे गावीचा हा पसारा  ।  ।

तो हा दिनोदयी एकसारा । मांडत असे ।

पाठी रात्रीचा समो पावे ।

आणि आपैताचि साठवे ।

म्हणिजे जेथीचे तेथं स्वभावे । साम्यासि ये

अभंग संपताच सगळ्यांनी भक्तिभावाने हात जोडले. चोखोबा म्हणाले, देवा  । ज्ञानोबा माऊली म्हणजे साक्षात ईश्वराचा अवतार वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या ज्ञानाचं तेज सहस्र सूर्याइतकं होतं. त्यांची विद्वता एवढी मोठी होती की, सारं जग त्यांच्यापायाशी झुकलं असतं, पण पृथ्वी वरचं जिवितकार्य संपवण्याची जाणीव झाल्याने त्यांनी समाधी घेतली. संतांनी कसं जगावं?किती जगाव?कसा या जगाचा निरोप घ्यावा याचा आदर्शच ज्ञानोबा माऊलीने घालुन दिलं. असं अलौकिक कार्य , असं लोकोत्तर जीवन, अशी संजीवनी समाधी हे सगळं, मी यति हीन असुनही मला या सर्वांचा साक्षीदार होता आलं यापेक्षा आयुष्याचं वेगळं सार्थक कोणतं?तुम्हा सर्वांच्या प्रेम, आपुलकीमुळे माझं कचराकुंडीसारखं जीवन तीर्थक्षेत्र बनलं. भावनाविश होऊन चोखोबा बोलत होते. त्यांच्या त्या शब्द वैभवाने ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधीचा प्रसंग जसाच्या तसा सर्वांच्यासमोर उभा राहिला. एकांतवासात चोखोबांच्या बुध्दी ला आणखी धार चढली. भक्तीची तिव्रता वाढली. अभंगरचनेतुनाआत्मज्ञानाची व्याप्ती रुंदावली. माणसांचा भूकेला चोखोबा माणसांपासुन दूर फेकल्या जाऊनही आयुष्य व्यवस्थित सार्थकी लावले. नामदेव तीर्थाटनाला गेल्यावर अदृष्यरुपाने विठोबा त्यांची प्रगती बघत होते.

 ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला समाधी घेतल्यानंतर कांही दिवसांनीच सोपानदेवांनीही सासवडला समाधी घेऊन पंचतत्वात विलीन झाले. पुढच्याच वर्षी ज्ञानदेवांची लाडकी बहिण मुक्ताई जी साक्षात आदीमाया, आदीशक्ती तिने मेहुण येथे स्वतःला पंचतत्वात विलीन केले. या तिघांनंतर ज्ञानदेवांचे गुरु व मोठे बंधु निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे आपला देह ठेवला. आपले कार्य पूर्ण झाल्यावर, प्रत्यक्ष परमेश्वर स्वरुप असलेल्या चारही भावंडांनी स्वतःला परमेश्वरा स्वाधीन केले. चोखोबांना हा विरह तर फार मोठा होताच, पण जास्त दुःख गोरोबाकाकांच्या मृत्युने झाला.  गोरोबांच्या आधी सावतामाळी, विसोबा खेचर, नरहरी सोनार यांचेही मृत्यु झाले.  नामदेवांनंतर चोखोबांवर त्यांची श्रध्दा होती. गोरोबांच्या पाठोपाठ दुसरा मोठा आघात चोखोबांचा लाडका शिष्य व मेहुणा असला तरी त्यांचे बंकाशी एक वेगळे नाते होते. म्हणुनच त्याच्या जाण्याचे दुःख चोखोबाला चटका लावुन गेले.

 एके दिवशी नामदेव व जनाबाई भेटीस आले असतां, समग्र चर्चा झाल्या वर नामदेव म्हणाले, काळ कुणासाठी थांबत नाही. सृष्टीचक्र नियमित चालुच असते. विठोबा व गुरुमाऊलीच्या आज्ञेने तीर्थाटन करुन शतकोटी अभंग लिहिण्या चा संकल्प सोडुन वारकरी संप्रदायाची पताका सार्‍या महाराष्र्टात पसरवली.  आतां पंजाबात जाण्याचा संकल्प आहे.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  २०-४-२०२१.

! ! !  संत चोखामेळा ! ! !

भाग – ३५.

 लवकरच नामदेव पंजाबकडे तीर्थाटनाला निघुन गेले. चोखोबांनी पुन्हा नामस्मरणांत व दीपमाळेच्या बांधकामात स्वतःला झोकुन दिले.  अनंतभटा कडुन विठ्ठल ही तीन अक्षरे लिहायचे शिकुन, दीपमाळेच्या प्रत्येक वीटेवर कोरली होती. विठ्ठल त्यांच्या प्रत्येक श्वासात वसला होता. त्यांना खात्री होती, एक दिवस विठ्ठल आपल्याला भेटायला नक्की येणार! आणि झालेही तसेच. चोखोबा विठ्ठलाचे नामस्मरण करत दीपमाळ बांधण्याच्या कामात व्यग्र असतांना एक वाटसरु चोखोबांकडे येऊन म्हणाला, चंद्रभागेच्या या तीरावर दीपमाळ कशासाठी बांधताहात?कोण बघणार?दिवे कोण लावणार? चोखोबा म्हणाले, या तीरावर नेहमी अंधार असतो.  दीपमाळ बांधुन पूर्ण झाल्यावर या तीरा वरचा सगळा अंधःकार उजळून निघेल.  या दीपमाळेच्या प्रकाशात त्या तीरावर च्या विठ्ठलमंदिराच्या कळसाचे दर्शन रात्रं दिवस होईल. दीपमाळ बांधुन पुर्ण करणे माझ्या जीवनाचे ध्येय असुनअंतिम श्वासा पर्यंत करणारच! वाटसरुने विचारले तूं इथे एकांतात कां राहतोस?माझ्या देवाचा व गुरुंचा तसा आदेश आहे. माझ्याकडुन विठ्ठलाचे नामस्मरण उत्कटतेने, निष्ठेने व्हावे, लक्ष विचलित होऊ नये म्हणुन इकडे राहण्याचा आदेश दिला व त्याचे मी पालन करतोय!

 कांही क्षण स्तब्धतेत गेल्यावर चोखोबांनी मान वळवली आणि भान हरपुन बघतच राहिले. हात कमरेवर ठेवुन सावळ्या चेहर्‍यावर मिष्किल हास्य खेळवत साक्षात पांडुरंग उभा होता.  चोखोबांना कळेना हा भास की सत्य? त्यांनी आपले चिखलाने बरबरटलेले हात गालावर मारुन घेतले. चेहर्‍यावर लागले ला चिखल पाहुन पांडुरंग खदखदुन हसायला लागला. भानावर येऊन त्यांनी विठ्ठलाच्या पायावर लोटांगण घातले.  अविरत ओघळणार्‍या अश्रूंनी चरणावर अभिषेक केला. विठोबाने खांद्याला धरुन उभे करुन मिठीत घेतले. हुंदके देत चोखा म्हणाले, देवा!  तूंं आलास?मी वाटच बघत होतो. तूं आलास? खरच आलास? भान हरपुन चोखोबा नाचायला लागले.  आणि चोखोबांच्या शब्दांची अंगभर प्रभावळ लेवुन विठ्ठलही नाचायला लागला. कवतिकाचं कौतुक, अप्रुपाचे अप्रुप पाहण्यासाठी आकाशांत देवगणांनी एकच गर्दी केली. आणि नाचणार्‍या विठ्ठलाला बघण्यासाठी व बेभान झालेल्या चोखोबांना आशिर्वाद देण्यासाठी सहस्र जलधारांच्या रुपानें लक्षावधी थेंब वेगाने खाली आले.  पडणार्‍या पावसाची जाणीव न झालेला विठोबा, चोखोबांंच्या अभंगाने प्रसन्नचित्त होऊन तसाच नाचत राहिला. चोखोबांना भान आल्यावर स्वतः चिंब भिजले होते पण विठोबाचे पितांबर, उत्तरीय सर्व कांही चिंब चिंब भिजले होते. चोखोबांनी पावसांत नाचणार्‍या विठोबाच्या हाताला धरुन खोपटांत आणले. साठीला आलेला चोखोबा जणूं परत लहान झाला.  भाकर्‍या थापणारी सोयरा एकटाच हसणार्‍या, बडबडणार्‍या चोखोबाकडे बघतच राहिली. तीला म्हणाला, अशी काय बघतेस? अग! देव, पांडुरंग माझा विठोबा आपल्या घरी आलाय! अरे चोखा मला भूक लागलीय, तुझ्या घरची भाकरी उसळ, मिरचीचा ठेचा खायचाय! सांग तुझ्या सोयराला. अग!  भराभर भाकरी, चवळीची उसळ, मिरचीचा ठेचा कर, आज आपला पांडुरंग आपल्या घरी जेवायला आलाय. बोलणं ऐकुन सोयरा बघतच राहिली. चोखोबा!  स्वयंपाक होई स्तोवर कडूलिंबाच्या झाडाखाली बोलत बसु या! स्वयंपाक झाल्यावर तिथेच वाढुन आणायला सांग. चोखोबा, ज्ञानेश्वर त्यांच्या भावंडाबद्दल, नामदेवांबद्दल भरभरुन बोलु लागला. आपल्यावर झालेला अन्याय, शिक्षेबद्दल, ब्राम्हण असुनही ज्ञानदेवांनी कसे जवळ केले, संत मंडळींनी अभंगासाठी कसे उद्युक्त केले असे बोलणे सुरु असतांनाच, नवर्‍या ला दुखवायचे नाही म्हणुन सोयरा दोन ताटं वाढुन घेऊन आली. एका अस्पृश्याच्या झोपडीतील ठेचा, भाकरी विठ्ठल चवीने खात होता. एवढ्यात देवाला ठसका लागला. देवा!  हळू जेवा. तिखट झालं का ?सोयरा अग!  लवकर दही आण! देवाला ठसका लागला. अग!  रोज गोडधोड खाणारा, त्याला एवढं तिखट कसं सोसेल त्यांचे ओरडणे ऐकुन धावतच ती एका वाडग्यात दही घेऊन आली. तीला वाटले, चोखोबाला ठसका लागला असेल असे वाटुन दही वाढायला पुढे आली, तोच आंधळी झालीस का?जरा बघून चल की देवाच्या अंगावर दही सांडशील, या गोंधळात तीचा पाय अडकल्याने वाडगा हिंदकळला आणि थोडेसे दही सांडला, ते बघुन ओरडत म्हणाले, इतकं सांगुनही देवाच्या पितांबरावर दही सांडवलेच ना?

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 

संत चोखामेळा सर्व भाग पहा

सर्व संत चरित्र पहा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading