कैकयी एक रहस्य भाग ६, (२१ ते २४)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

              

!!! कैकयी एक रहस्य !!!

!!!  कैकयी  !!!

                   भाग – २१.

          ऋषीने दिलेल्या शापाची फळं कैकयीला एकटीलाच नव्हे तर, तिच्याबरोबर कौसल्यादेवी व सुमत्रादेवीसही भोगावे लागणार, तिघीही विधवा होणार नुसत्या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा आला,ददरदरुन घाम फुटला.मन आतल्या आत आक्रोशत होते हे कुणी जाणून घेईल का?

            तिघांनासहित रथ निघून गेल्यावर, महाराजांची स्थिती अतिशय शोचनीय झाली. ते पुन्हा कोसळले तेव्हा कौसल्यादेवी व कैकयी पुढे धावल्याबरोबर,कैकयीला पाहतांच अति संतापाने कडाडले, दुष्टे, तू मला स्पर्शही करुं नकोस.तुला त्यागले आहे .याक्षणापासून तुझा माझा संबंध संपला.अशा परिस्थितीत त्यांना कैकयीमहालात ठेवणे उचित नसल्यामुळे सुमित्राच्या मदतीने त्यांना कौसल्यादेवीच्या महाली आणले.सारखा विलाप करत रामाच्या नावाचा अखंड जप महाराजांचा सुरु होता. अर्ध्या रात्री दचकुन उठले, म्हणाले, कौसल्या मला कांहीच दिसत नाही ग!माझी दृष्टीही रामा बरोबर निघून गेली की काय? कौसल्यादेवी व्याकुळतेने त्यांचा हात धरुन बसली होती. तिला कळून चुकले, महाराज कांही काळाचेच सोबती आहेत.त्यांचा एकेक अवयव चेताना  शून्य होत असल्याचे जाणवू लागले.

           प्रथम दृष्टी क्षीण झाली.कोणालाच कांही सूचत नव्हते.कौसल्याला अंधुक आशा वाटत होती,कदाचित रथाबरोबर गेलेले लोकं आग्रह करुन रामाला परत आणतील.परंतु सुमंत्र एकटेच रथ घेऊन परत आले.आज अयोध्यानगरी स्मशानवत भासत होती.सारे व्यवहार बंद होते,जी नगरी सदैव आनंदाने बहरलेली असायची ती आतां भयान भासत होती.नगरवासी वाटेल तसे कैकयीला दुषणे लावत होते.

           सुमंत्र येऊन महाराजांना कथन करत होते, रामचंद्रांनी आपल्याला व तिन्ही मातांना प्रणाम सांगीतला.पुढे सागु लागले, रात्रीचा मुक्काम तमसा नदीकाठी  केला.थकलेले अयोध्यावासी गाढ झोपले असतानाच रामाने मला रथ जुंपायला सांगीतला आणि निषादराज गुहकाच्या राज्यात प्रवेश केला.गंगानदीकाठी ऐका विशाल अंगुदाच्या वृक्षाखाली मुक्काम केला.दुसर्‍या दिवशी गुहकराजाने गंगानदी पार करण्यासाठी नौकांची व्ववस्था केली.आणि रामाच्या आदेशाने मी व नगरवासी अयोध्येत परत आलो. मी रामाला सोडून एकटाच परत आल्यामुळे सारे माझ्याकडे शत्रुवत बघत होते. ऐकुन महाराज व कौसल्यादेवी फारच शोकमग्न झाले.सुमित्राने स्वतःला सावरल्याने ती थोडी शांत वाटत होती.सुमंत्र प्रसंगावधान साधून युक्तीने शांतवण्याचा प्रयत्न करीत होते. पण कौसल्या दुःखावर नियंत्रण ठेवू न शकल्याने ती महाराजांना अनेक दुषणे लावत  म्हणाली, नारीसाठी तीनच आश्रय असतात, पहिला पती..तो कधीच माझा झाला नाही तर आताच कसे मानु? दुसरा असतो पुत्र, त्याला तुम्ही वनात धाडले, आणि तिसरा आश्रय.. पिता..ते तर कधीच परलोकी गेले.पत्मीधर्मा नुसार आपल्या अशा अवस्थेत टाकून पुत्रा सोबत वनातही जाऊ शकत नाही.आपण मला पुत्रासहित मारले आहात.सारी अयोध्या शोक सागरात बुडलेली आहे.कोणीही आनंदी नाही.

            कौसल्येचे बोलणे ऐकून राजांना अतिशय दुःख झाले. थोडे सावरल्यावर म्हणाले देवी! माझ्या कर्माची फळं मला भोगावी लागत आहे.तो शाप खरा होतोय. कोणता शाप स्वामी? मग त्यांनी श्रावणाच्या नकळत झालेल्या हत्तेचा वृतांत कथन केला.आज तो शाप खरा होत आहे.त्यांनी कौसल्या-सुमित्राची माफी मागीतली. हे देवी! माझे प्राण जात आहे दृष्टी तर आधीच गेली.आतां स्मरणशक्ती लुप्त होत आहे.आणि कौसलेला त्यांचा देह एकदम थंड झाल्याचे जाणवले.महाराजांचा प्राण निघून गेला.

         अंतःपुरात आक्रोशाचे थैमान सुरु झाले. महाराजांच्या साडेतीनशे स्रीया आक्रोश करुं लागल्या.कौसल्या व सुमित्राच्या शोकाला तर पारावारच नव्हता.वृत्त ऐकून दुःखी,शोकमग्न कैकयी कौसल्यामहालात आली. आजपर्यंत ताठ कण्याने वावरणारी कैकयी चांगलीच वरमली होती.अपराधबोध तिच्या मुखावर स्पष्ट जाणवत होता. संशययुक्त नजरेने सारीच कैकयीकडे पाहत असल्याने तिची अवस्था फारच अवघडल्यासारखी झाली होती.पश्चाताप दग्ध वाटत होती. कौसल्या तिला म्हणाली, बघितले तुझ्या हट्टाचे परिणाम? राम वनात गेला.पतीचा स्वर्गवास झाला.एकाच दगडात तुं दोन पक्षी मारलेस.मी सुध्दा जगणे अशक्य आहे.आतां एकटी भरतासह राज्याचा उपभोग घे. आतां असैच वाक् बाण कैकयीला झेलावे लागणार होते. तिची आंतरिक मनस्थिती कोणी जाणू शकणार नव्हते. आणि ती उघड करुं शकत नव्हती.

  संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
              दि. ६-४-२०२२.

!!!  कैकयी  !!!

               भाग – २२.

           राजमहालाची व राज्याची सुत्रे कुलगुरु वसिष्ठांनी हाती घेतली.कोणताच पुत्र उपस्थित नसल्यामुळे महाराजांचा अग्निसंस्कार होऊ शकत नव्हता. म्हणून शवरक्षणासाठी त्यांचे पार्थिव तैलपात्रात ठेवण्यात आले.सर्व स्रीया आक्रोश करीत राग कैकयीवर काढत होत्या. एव्हाना महाराजांची निधनवार्ता वार्‍यासारखी अयोध्येत पसरली. सर्वत्र अंधकारमय व शुन्यवत भासत होते. या शोकमग्न परिस्थितीत सूर्यास्त कधी झाला कळलेच नाही.सारी अयोध्या पोरकी झाली होती.रात्र रडण्यात, शोकात गेली.सकाळी वसिष्ठांनी ब्राम्हण,ऋषीं एकत्रित बसून विचार विनिमय झाल्यावर असे ठरवण्यात आले की, सिंहासन फारवेळ रिक्त ठेवता येत नाही तसेच अग्नीसंस्कारही जास्त लांबवता येणार नाही. सत्वर दूत पाठवून भरत शतृघ्नला जल्दीने बोलावून घ्यावे.कुलगुरु वसिष्ठांनी  सिधार्थ,विजय,जयंत,अशोक आणि नंदन असे पांच शिघ्रगतिक राजदूतांना भरत, शतृघ्नास आणण्यास रवाना केले.त्याचबरोबर ही दुःखदवार्ता न कळू देण्याची, व चेहरा आनंदी ठेवण्याची आज्ञा दिली.

            केकयनगरीत असलेल्या भरत-शत्रुघ्न मांडवी,श्रृतकीर्तीचे दिवस मजेत जात होते.पण अलिकडे भरतला दुःस्वप्ने पडत होती,अशुभ चिन्हे होत होती.भरत मांडवीला म्हणाला, आपण अयोध्येला परत जावे.तिच्याही मनात भीतीची पाल चुकचुकली.

             आणि दुसर्‍या दिवशी अयोध्येहुन पांच मंत्रीदूत केकयनगरीत दाखल झाले.मोठ्या प्रयासाने चेहरा आनंदी ठेवत दूत नमस्कार करीत म्हणाले,अयोध्येत महत्वाचे काम असल्यामुळे आपण आमच्यासोबत त्वरीत निघावे. दूतांच्या घाई करण्याने भरत बेचैन झाला.भरत,शत्रुघ्न,मांडवी,श्रुतकीर्ती या सर्वांनी केकयनरेश आणि मामांचा निरोप घेऊन  निघाले.सात दिवसांचा अथक प्रवास करुन आठव्या दिवशी अयोध्येत पोहोचले.

        ररस्ताभर भरत बेचैन होता.महत्वाचे असे कोणते काम ते दूत सांगत नव्हते.अयोध्येत नक्कीच कांहीतरी अप्रिय घटना घडली असावी शिवाय महाराजाबाबत पडलेले अशुभ स्वप्न, त्यामुळे अयोध्येत कधी पोहोचतो असे झाले.

अयोध्यात पोहोचल्यावर तिथली नारव शांतता, त्यांच्या स्वागतास कोणीही समोर आले नाही, रस्त्यावर वर्दळ दिसत नाही,सारे वातावरण कसे शुन्यवत,खिन्नता दिसत असल्याने त्याच्या मनात नाना शंका येऊ लागल्या.राजमहालाच्या

प्रवेशदारावरही कुणी स्वागताला नसल्यामुळे भरत तडक दशरथ महाराजांच्या महालात प्रवेश केला,ते तिथे न दिसल्याने कैकयीमातेच्या  महालात पोहोचला.तिथेही महाराज न दिसल्याने मातेला विचारायला मातेकडे बघीतले आणि येवढ्या तातडीने कां बोलावले याचा उलगडा झाला.महाराजांच्या निधनाबद्दल कळल्याबरोबर असह्य दुःखाने तो मटकण खालीच बसला.कसेबसे स्वतःला आवरत विचारले, माते, असे एकाएकी तातमहाराज कसे गेलेत?मी आल्यावरही रामदादा,लक्ष्मण भेटीस कां आले नाहीत,कुठे दिसलेही नाहीत. माते अंतिम समयी तातांनी कांही संदेश दिला कां?

         कैकयी म्हणाली, भरता शांत हो!तुला दुःख झाले असले तरी,असा शोक करणे तुला उचित नाही.तुझ्यावर आतां फार मोठी जबाबदारी आहे.राज्याची धूरा सांभाळायची आहे. कां? रामदादा असल्यावर मी राज्य सांभाळण्याचा प्रश्नच कुठे येतो? राम,लक्ष्मण, सीता चौदा वर्षासाठी वनवासला गेलेले आहे. कां? त्यांचे हातून असा कोणता अपराध घडला म्हणून त्यांना वनात जावे लागले.नाही पुत्रा, त्यांचे हातून कोणताच अपराध घडला नाही, आणि घडूही शकत नाही.

            पण जेव्हा मला विश्वासात न घेता!तू इथे नसतांना,महाराजांनी रामराज्याभिषेक करण्याचे घोषित केले, ते मला सहन न होऊन, त्यांचेकडून पूर्वलक्षी प्रभावाने मिळालेल्या दोन वरांपैकी एका वराने तुला राज्यपद व दुसर्‍या वराने रामाला चौदा वर्षे वनवास मागून घेतला. पित्याचे वचन सत्य करण्यासाठी राम चौदा वर्षे साठी दंडकारण्यात गेला असून लक्ष्मण,सीता त्याचेबरोबर स्वखुशीने गेले आहेत.

           रामवियोगाने अतिशय दुःखी व शोकाकुल अवस्थेत महाराजांनी प्राण सोडला.

आतां या निष्कंटक राज्याचा राजा हो!आणि वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पित्याचे अंत्य संस्कार करुन, अभिषेक करवून घे.

                क्रमशः
  संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
                   दि. ६-४-२०२२.

!!!  कैकयी  !!!

                   भाग – २३.

          कैकयीचे बोलणे ऐकून भरताला अतिशय संताप आला.एरवी शांत असलेल्या भरताला क्रोधावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले मला तुला माता म्हणण्याचीही लाज वाटत आहे तुझ्या या दुष्कृत्यामुळे मी कायमचा दुरावलो. पितृसमान बंधूपासून विलग झालो. पितृ,भातृ विरहित राज्य घेऊन मला काय करायचे? तूं माझ्या पित्याचा घात करुन,श्रीरामदादांना वनवासात पाठवले आणि आता माझ्या जखमे वर मीठ चोळतेस! माझ्या पित्याने तुझ्यावर अतोनात प्रेम केले.पत्नीचाच नाहीतर पट्टराणी चा दर्जा दिला आणि तूंऽ? आणि तूं माझ्या पित्याची हत्या केलीस.माझ्या थोर दादाच्या वियोगात तातश्रींनी देह ठेवला. कां केलेस? थोरल्या व मधल्या मातांना पुत्रसुखापासून कां वंचित केलेस? रामदादाचे स्वतःच्या मातेपेक्षाही तुझ्यावर अधिक प्रेम असतांना कां घात केलास तूं काळसर्पिनी असून कुलघातकी आहेस.

                तूं माता नसून वैरीण आहेस.तुला निक्षून सांगतो हे राज्य रामदादाचे आहे.मी कधीच राज्यभार स्विकारणार नाही.तुझी मनोकामना कधीही पूर्ण होऊ देणार नाही. तुला त्यागण्यात मला मुळीच संकोच वाटणार नाही. तूं, पापी,कलंकिनी,दुराचारी,दुष्ट,क्रूर आहेस.तूं पवित्र केकय कुळात जन्म घेऊनही असा बुध्दी भ्रंश झालाच कसा? काही केल्या त्याचा संताप कमी होत नव्हता.कैकयीला दुषणे देऊन राग कमी करण्याचा प्रयत्न करुनही कमी होत नव्हता.हे दुष्ट माते, तूं या राज्यातून चालती हो! पिताजींनी तर धर्माने तुझा त्याग केला म्हणून त्यांच्या अंत्यविधिस थांबण्याचा तुला अधिकार नाही.मी सुध्दा या क्षणापासून तुला मेलो असे समज आणि जन्मभर पुत्रशोक मनवत रहा.

             तुझ्या आचरणाने मीही कलंकित झालो.कोणाच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही.पवित्र अशा केकयवंशात जन्म घेऊनही राक्षसी बनलीस व आमचा पवित्र वंश उध्वस्त करणारी तूं पापीन आहेस.तुझ्या पापाचे ओझे मी सहन करुच शकत नाही.तू, आत्मघात कर, वनात जा,अग्निप्रवेश केला तरी मला कांहीही वाटणार नाही.जेव्हा रामदादांना अयोध्येत परत

आणिन तेव्हाच माझ्यावरचा हा कलंक दूर होईल.आणि त्राग्याने मूर्च्छा येऊन कोसळला.

              आणि कैकयी? तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल.तिची मूक व्यथा कोणाला सांगूही शकत नव्हती.अक्षरशः खरोखर  नाकतोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत होती.वास्तविक असेच कांहीतरी घडेल याची पूर्वकल्पना होती,पण प्रत्यक्षात स्वतःच्या मुलाच्या तोंडून अशी मुक्ताफळं,लांच्छणे ऐकतांना तिची काय स्थिती झाली असेल ही कल्पनाही करवत नाही.

             भरत आल्याचे कळताच,कौसल्या माता व सुमित्रामाता त्याला भेटायला आल्यात. आणि भरताला बघताच कौसल्यामाता मूर्च्छित   झाली.तिचे डोके भरताने आपल्या मांडीवर घेतले. थोड्या वेळाने शुध्दीवर आल्यावर रडत म्हणाली, पुत्रा, तुला राज्य हवे होते ना?मग आतां हे निष्कंटक झालेल्या राज्याचा उपभोग घे. भरता वाईट याचेच वाटते,की यासाठी हे कैकयीने क्रूरकर्म  करुन आम्हाला विधवा बनवले.माझ्या लाडक्या सुकुमार रामाला वनवासी बनवले. आतां तूं आम्हालाही त्याच्या जवळ पोहचवून, आपल्या मातेसह सुखाने राज्य उपभोगा!

          मातेऽऽऽ मातेऽऽ  हे तूं काय बोलतेस? तू हेच ओळखले का तुझ्या भरताला? मातेऽ मी आधीच का कमी घायाळ आहे आणि तू मीठ चोळतेस.तू  चांगलेच जाणतेस रामदावरचे माझे प्रेम, तरीही तू अशी बोलतेस? मातेऽ जे घडले त्याबद्दल मी अगदी  अनभिज्ञ आहे गंऽ!

मी निरपराध असून, कां ग दोष देतेस?माझ्या मातेने, नाही नाही, माता नाही, वैरीणीने जे पाप कर्म केले त्याची फळे तिला भोगावीच लागेल. ज्या व्यक्तीच्या सहाय्याने तिने हे अघोरी कृत्य केले त्यालाही भोगावेच लागेल.मातेऽ मी शपथ पूर्वक सांगतो, मला राज्याचा मोह कधीच नव्हता आणि नाहीही. हे राज्य माझ्या रामदादा चे आहे.त्यांचा दास होऊनच राहीन.स्वप्नातही राज्यावर बसण्याचा विचार मनांत येणार नाही. भरताच्या आश्वासित बोलण्यावर कौसल्या म्हणाली, मला ह्यातच समाधान आहे की, तुझे चित्त धर्मापासून विचलित झाले नाही.तूं धर्मात्मा, सत्यप्रतिज्ञ आहेस. असे म्हणून त्याला जवळ घेतले आणि दोघेही गळ्यात गळा घालून अश्रू ढाळू लागले.त्याच्या प्रमाणेच शत्रृघ्न सुध्दा अतिशय शोकाकुल झाला होता.तो मधल्या मातेस भेटायला गेला असता, त्याला समजजले की,या सर्वाला मंथरा जबाबदार आहे आणि…..

                     क्रमशः
  संकलन व © ®  मिनाक्षी देशमुख.
                    दि. ७-४-२०२२.

!!!  कैकयी  !!!

                     भाग – २४.

              मंथरेबाबत ऐकून शत्रुघ्न अतिशय क्रोधीत होऊन अतःपुरात गेला.तिथे आभुषणा ने नटलेल्या मंथरेचे केस धरुन ओढत,ताडण करतच भरतासमोर आणले.लक्ष्मणासाखाच शिघ्रकोपी शत्रुघ्नला आवरणे कठीण. मंथरा कैकयीच्या नावाने टाहो फोडू लागली.भरत मधे पडला नसता तर, त्याने तिचा वधच केला असतां. शत्रुघ्ना, स्री अवध्य आहे आणि मंथरे सारख्या वृध्द स्रीवर हात टाकल्याचे रामदादाला कळले तर त्यांना आवडणार नाही,असे भरताने म्हणताच शत्रुघ्नने हात आवरला आणि म्हणाला, दुष्टे, ज्या रामचंद्रांना तू दुखावलेस त्यांच्याच कृपेने तुझे प्राण आज वाचले.

               ती रात्र शोकातच गेली.दुसरे दिवशी कुलगुरु वसिष्ठ येऊन म्हणाले, भरता, तुला शोक करायलाही सवड नाही.समयोचित कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे.महत्वा चे पहिले काम महाराजांची अंत्यसंस्काराची तयारी करणे.

‌              महामंत्री सुमंत्रांच्या मदतीने अंत्यसं स्काराची तयारी भरताने करवली.महाराजांचे पार्थिव तैलद्रोणातून काढून, स्नान घालणे, नवे वस्रे परिधान करुन उत्तम शय्येवर त्यांना झोपवले त्यावेळी त्याला शोक अनावर झाला नंतर ऋत्वजांनी विधिवत हवन करुन शव         स्मशानात नेण्यात आले.  चंदन,गुगुळ,अगरु, सरल, देवदार साहित्याने तयार केलेल्या चित्तेवर महाराजांचे पार्थिव ठेवण्यात आले. वेदोक्त मंत्रात भरताने चित्तेला अग्नि दिला.मातांनी चित्तेस प्रदक्षिणा घातल्या.पश्चातादग्ध कैकयीमातेच्या डोळ्यांना धारा लागलेल्या  

बघून भरताला संभ्रम पडला,हीच का ती माता जिने कठोरपणे वरदान मागीतल्याने महाराजां चे प्राण गेले. ११,१२,१३ व्या दिवशी त्या त्या दिवसांचे श्राध्दकर्म करण्यात आले.

             विधिवत सर्व क्रीयाकर्म आटोपल्यावर कुलगुरु वसिष्ठांनी सर्व प्रमुखांची सभा भरवली. सभेत भरताचा राज्यभिषेकाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर भरत म्हणाला, कुलपरंपरेनुसार हे राज्य  जेष्ठपुत्र रामदादाचे आहे.त्यांच्याऐवजी चौदा वर्ष वनवास मी भोगेन.त्यांना परत आणण्यास चतुरंग सेनेसह जात आहे.

            दुसर्‍या दिवशी सकाळी तयारीनिशी वनप्रवास सुरु झाला. सोबतच्या रथात कौसल्यामाता,सुमित्रामाता बसल्या आणि कैकयीमाताही येऊन बसली, भरत व मातांच्या रथापुढे मंत्रीगण,पुरोहित आणि सुमंत्रांचाही रथ निघाला.रथांच्या मागे सर्व सेना,अश्व,गज, प्रजाजन होते. श्रीरामाच्या गजरात सर्वजण श्रृंगवेरपुरात गंगातीरी येऊन पोहोचले.

            येवढ्या प्रचंड सेनेसह भरत येत असलेला पाहून श्रुंगवेरपुरचा राजा निषादचा गैरसमज झाला.त्याला वाटले,अयोध्येचे राज्य निष्कंटक करण्यासाठी रामावर चालुन येत आहे.भरताने गुहकराजाची भेट घेऊन आपल्या येण्याचा उद्देश स्पष्ट केल्यावर संशय निराकरण झाले.नंतर गुहकाने सर्वांचा आदरसत्कार, फलाहार करुन गंगानदी पार करण्यासाठी ५००  नौकांची व्यवस्था केली.गंगापार करुन सर्वजण भारद्वाज ऋषींच्या आश्रमात पोहोचले.त्यांनाही  गुहकांप्रमाणेच शंका आली.त्यांचे बोलणे ऐकून  भरताला अतिशय वाईट वाटले, म्हणाला, ऋषीवर्य,आपल्यासारखा श्रेष्ठ मुनीही माझ्यावर शंका घेत असतील तर,मला जीवंत राहण्याचा अधिकारच नाही.मी श्रीरामाचे राज्य त्याला परत करण्यास्तव व त्याला अयोध्येला परत नेण्यास आलेलो आहे.त्यांचा ठावठीकाणा सांगावा.गुरु वसिष्ठांनीही भरताचे समर्थन केल्यावर, भारद्वाजऋषी प्रसन्न होऊन म्हणाले, वत्सा, तुझ्या मनातील भाव मी आधीच जाणत होतो.तो भाव दृढ व्हावा,तुझ्या कीर्तीचा विस्तार व्हावा म्हणून शंका घेतली.सध्या राम,लक्ष्मण, सीता यांचे वास्तव्य चित्रकुट पर्वतावर आहे. आजची रात्र इथे थांबून उद्या सकाळी चित्रकुट पर्वताकडे प्रस्थान करा.

              दुसर्‍या दिवशी प्रातःकाळी प्रस्थान करण्यापूर्वी सर्वांनी त्यांना प्रणिपात केला.दोन्ही मातांनीही त्यांना नमस्कार केला. कैकयी लज्जित होऊन एका बाजूने ऊभी होती.तिची कठोर शब्दात भरताने निर्भत्सना केल्यावर भारद्वाजमुनी म्हणाले…

       वत्सा, तुझी माता कैकयी निर्दोष आहे. तिच्यावर दोषारोपण करुं नकोस.तिची कांहीही चुक नाही.जे घडले ते नियतीने आधीच ठरवले होते.ती फक्त माध्यम झाली. श्रीराम,लक्ष्मण, सीता यांचा वनवास भविष्यात देवलोक, मृत्युलोक,आणि पाताळलोक या त्रैलोकासाठी कल्याणकारी ठरणार आहे.त्या अनुषंगानेच हे सारे घडत आहे तसे विधिलिखित आहे.म्हणून तू तुझ्या मातेवरचा रोष करण्याचे सोडून दे.

                 क्रमशः
  संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
                   दि. ७-४-२०२२.

                            

 

कैकयी एक रहस्य संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading