आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

कैकयी एक रहस्य भाग ३, (९ ते १२)
कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! कैकयी एक रहस्य !!!
!!! कैकयी !!!
भाग – ९.
हा सर्व भीषण संहार पाहून हळव्या मनाच्या रामाच्या मनाची स्थिती काय झाली असेल? चुकुन एखादा ऋषी,तपस्वी भेटलाच तर तो ही विदारक कहाणी ऐकवी.या राक्षसांवर शासनकर्ता कोणीच नसल्यामुळे रामाचे मन द्रवले आणि अतिशय दुःखी झाले.मदांध राक्षसां ना शासन व्हायलाच हवे.ऋषींची तपोवने मंत्रोच्चाराने पुन्हा दुमदुमायला हवी या विचारांनीच ते उदास व अबोल झाले आहेत.
तीर्थाटनानंतर चारही राजपुत्र राज्य सभेत येईनासे झाले.रामांनी मनाला फारच लावून घेतले होते.भरताच्या सांगण्यावरुन दक्षिणेकडील दंडकारण्यातील मानव,तपस्वी, ऋषीमुनी,त्यांच्या बायकामुलांचे जीवन असुरक्षित झाले होते.संपूर्ण राक्षसांचा उच्छाद करणारे वीर उत्पन्न व्हायला हवेत.भरताने कथन केलेली परिस्थिती महाराजांनी कुलगुरु वसिष्ठांना सांगीतल्यावर ते म्हणाले, राजन् हे सारे मला ज्ञात आहे.या भीषण परिस्थितीची जाणीव भावी राजास व राजपुत्रांना व्हावी म्हणूनच मी तीर्थाटनाची योजना केली होती. राक्षसांचा समूळ नाश करणारा राम-लक्ष्मणा शिवाय दुसरे कोणी नसल्यामुळेच हा सारा खटाटोप केला.
गुरुदेव! या नैराश्याच्या कोशातून माझा राम बाहेर येणार नाही का? राजन्, ती वेळ लवकरच येणार आहे तोवर कांही योग शिकवणार आहे.भविष्यात “योगवसिष्ठ” नावाने प्रसिध्द होईल.त्यासाठी कांही दिवस त्यांना माझ्या आश्रमात राहावे लागेल.
एके दिवशी कैकयीस राजा म्हणाले, आपले चारही पुत्र विवाहयोग्य झालेत.राणी, आपल्या समजदार,सर्वगुणसंपन्न चारही पुत्रांचे विवाह व योग्य पुत्राचा राज्यभिषेक करुन राज्य शकट त्यांचेकडे सुपूर्द केले की, कुलपरंपरे नुसार आपण चौघेही उर्वरित आयुष्य वानप्रस्थाश्रमात ध्यानधिरणेत व ईश्वरभक्तीत घालवावे.
दुसर्या दिवशी राजाने राज्यसभेत हा विषय मांडला आणि सर्वांनी एकमताने अनुमोदन दिले.तेवढ्यात ब्रम्हर्षी विश्वामित्रांचे अयोध्येत आगमन झाल्याचे वृत्त घेऊन दुत आला. बापरे! ब्रम्हर्षी विश्वामित्र? नुसते त्यांच्या नावानेच भल्याभल्यांना धडकी भरते.विश्वामित्र म्हणजे साक्षात आग!धगधगते यज्ञकुंड!कोपले तर सर्वस्वाचा विनाश! पूर्वी क्षत्रिय नृप असलेले विश्वामित्र आपल्या प्रदीर्घ तपस्येने ब्रम्हर्षीपदा पर्यंत पोहोचलेले गाधीपुत्र विश्वामित्र आज अयोध्येत आले होते.ते सहेतूनेच आले असावेत
दुताचा निरोप मिळताच राजा दशरथ, कुलगुरु वसिष्ठ आणि इतर प्रमुख मंत्रीगणांसह विश्वामित्रांना सामोरे गेले.त्यांना सन्मानपूर्वक राज्यसभेत आणून उच्चासनावर बसवले. त्यांच्या चरणांचे पक्षालन व पाद्यपुजा करुन म्हणाले, ब्रम्हर्षी आपण आलात आम्ही धन्य झालो. चारही बंधू त्यांचे चरणावर नतमस्तक झाले. राजांनी त्यांची विश्रामव्यवस्था व भोजन व्यवस्था केली.थोडं निवांत झाल्यावर,एकमेकां चे क्षेमकुशल विचारुन झाल्यावर, राजा दशरथ म्हणाले, मुनीवर! आपण कांही विशिष्ट हेतूने माझ्याकडे आला असलात तर अगदी निःसंकोच सांगावे. होय राजन् ! मनी कामना ठेवूनच तुझ्याकडे आलो आहे. मला माझ्या सिध्दाश्रमात एक यज्ञ करायचा आहे.पण सिध्दाश्रमाजवळील जनपदातील महाभयंकर ताटीका राक्षसी व क्रूर मारीच व सुबाहू त्यांचे राक्षस अनुचर फार पिडा देतात.यज्ञात विघ्न आणल्यामुळे यज्ञ पार पडत नाही.म्हणूनच तुझ्याकडे कांही मागण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे.त्या राक्षसांना परास्त करण्याचे सामर्थ्य फक्त तुझे वीर पुत्र राम-लक्ष्मणातच आहे. तुझे पुत्रप्रेम मी जाणतो. पण त्यांचा मोह व तुझे अज्ञान सोडून दे आणि राम-लक्ष्मणाला माझेसवे पाठव.
विश्वामित्रांची मागणी ऐकून राजाचे अवसानच गळून पडले. तरी धीर एकवटून अजिजीने म्हणाले, मुनिवर्य! ही बालके फार लहान आहेत.त्यांना प्रत्यक्ष लढाईचा अनुभव नाही.त्यांच्याऐवजी सशस्रसेनेसह मी आपल्या बरोबर येतो. राजाचे वक्तव्य ऐकून ब्रम्हर्षी चांगलेच खवळले. अनावर क्रोधीष्ट होऊन कडाडले, रघुकुलाची रीत आहे, प्राण जाये पर वचन न जाए! तू वचन पाळणार नसशील तर मी रिकाम्या हाताने परत जातो.
परिस्थिती हाताबाहेर जात असलेली बघून कुलगुरु वसिष्ठ मधे पडत म्हणाले, राजन् , विश्वामित्रांनी कांही विचार करुनच रामलक्ष्मणा ची मागणी केली असावी.राजन् , विश्वामित्र त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यास असमर्थ आहेत असा का तुझा समज आहे? राजन्, ते एकेकाळचे महापराक्रमी नृप होते.शस्र,अस्र, मंत्र इत्यादी विद्यांनी परिपूर्ण आहेत.दीक्षा घेऊन यज्ञाच्या अनुष्ठानाला बसल्यानंतर ‘होत्याला’ हत्या,अहिंसा करायची नसते.शिवाय तुझ्या पुत्रांचे तसेच कुळाचे हित साधने व पुत्रांची क्षमता बघूनच ते तुझे पुत्र मागायला आलेत. शिवाय तूं वचनबध्द आहेस.कोणताही किंतू मनात न धरतां राम-लक्ष्मणाला खुशाल त्यांच्या सोबत पाठवून दे!
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. २९-३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग -१०.
कुलगुरु वसिष्ठांच्या समजावण्याने राजे निःशंक झाले. आणि राम -लक्ष्मणाला विश्वामित्रा सोबत जाण्याची आज्ञा दिली.जड अंतःकरणाने सर्वांनी त्यांना निरोप दिला. त्याच्या विरहाच्या कल्पनेने, मंथरा सोडून सारेच दुःखी झाले.कैकयी तिच्या महालात एकटी असतांना मंथरेने आपला आनंद व्यक्त करत म्हणाली, आतां राम लक्ष्मणाचे कांही खरे नाही.तुझा पुत्र भरताच्या वाटेतील काटे आपोआपच दूर झालेत.आता राज्याभिषेक भरताचाचा होईल. कैकयी अतिशय क्रोधित होत तिला दटावत म्हणाली,यापुढे जर अभद्र बोलललीस तर जबर शासन केल्या जाईल. ते दोघेही महापराक्रमी आहेत.यश संपादन करुन लवकरच परत येतील.
कैकयीने मंथराला तर गप्प केले परंतु तिच्या मनात विचारचक्र सुरु झाले.गुरु वसिष्ठां च्या म्हणण्यानुसार पुत्रांचे आणि जगकल्याणा करीतां दोघांना विश्वामित्रांबरोबर पाठवले.पण यामागे नियतीचे कांही संकेत तर नसेल ना? राक्षसांच्या परीपात्यासाठीच तर यांचा जन्म झाला असावा कां? स्वामींनी तातश्रींना दिलेले वचन व मला मिळालेल्या दोन वरांच्या अवगुंठनात कांही घोर कर्म तर घडणार नसेल ना? जगाचे नेमके कोणते कल्याण? कैकयीच्या मनात विचार आला, कदाचित मंथरा निमित्य मात्र होईल आणि कांही अघटीत घटना घडली तर सारा दोष माझ्या माथी तर येणार नाही ना? अशा विचारांच्या आवर्तनात असतांना राजे तिच्या महाली प्रवेशले व तिची तंद्री भंग पावली
पुत्रांच्या पराक्रमावर पूर्ण विश्वास असला तरी, महाबलाढ्य,मायावी कपटयुध्दात माहिर असलेल्या ताटिका,सुबाहू,मारीच याचेशी सामना करुं शकतील कां?या बालकांना अजून युध्दाचा अनुभव नाही. सारेच या चिंतेत जळत होते.८-१० दिवसांनी गुप्तहेरांनी वार्ता आणली, हजार हत्तीचे बळ असलेल्या ताटिकेचा व सुबाहूचा वध श्रीरामाने केला व मायावी राक्षस मारीचला शेकडो योजने दूर भिरकावून दिले.ब्रम्हर्षी विश्वामित्रांचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला.एवढ्या बालवयात प्रबळ शत्रूवर मात केली,हे पुत्र दैवी अवतार तर नसेल ना? सर्वत्र पुत्रांचे कौतुक सुरु असतांनाच मिथिलेच्या जनकराजाचे पुरोहित शतानंदमुनी आनंदवार्ता घेऊन अयोध्येत राम-सीताच्या विवाहचे निमंत्रण घेऊन आले.श्रीरामाने पणात ठेवलेले अवजड शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवून ओढले व शिवधनुष्य दुभंगुन मोडून पडले. हे शिवधनुष्य लंकाधिपती रावणासारख्या शक्तीमान साक्षसालाही उचलल्या गेले नव्हते. तिथे इतर राजांना कसे शक्य व्हावे?
जनकराजाने त्यांची अयोनिज कन्या विश्वसुंदरी सीतेच्या विवाहासाठी स्वयंवर ठेवले होते.जनकराजांचे पूर्वज देवारत यांना भगवान शिवांनी एक तेजस्वी धनुष्य ठेव म्हणून दिले होते.बालपणी सीता खेळत असतांना ते अवजड धनुष्य लीलया उचलले होते हे पाहून जनकराजांनी ठरवले की, जो वीर हे शिवधनुष्य पेलून प्रत्यंचा चढवेल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल.आणि हा पण रामाने जिंकला.
राजन्! येत्या पौषात राम-सीतेच्या होणार्या विवाहाचे निमंत्रण देण्यास आलोय! राजन् श्रीरामाने मिथिलेत प्रवेश करण्याआधी या नगरीतील उपवनात असलेल्या गौतमाश्रमा त माझी माता अहिल्यादेवी माझ्या पिताश्री गौतमऋषींनी दिलेल्या शापामुळे खितपत पडली होती, तिचा उध्दार रामांनी करुन माझे पिता गौतमऋषी व व माता अहिल्यादेवीवर अनंत उपकार केले आहे. त्याच राम सीताच्या विवाहाची तयारी करायची असल्याने लवकर जाण्याची अनुमती द्यावी.
दशरथ राजा भरत,शत्रृघ्न,कुलगुरु वसिष्ठ,महामंत्री तथा मित्र सुमंत्र,अष्टप्रधान, ऋषीवर्य आचार्य वामदेव,जाबाली,अशोक, अयोध्येतील प्रतिष्ठित लोकं आपल्या निवडक सेनेसह मिथिलानगरीत पोहोचले.जनकराजाने सर्वांचे यथोचित स्वागत केले.राहण्याची सुंदर व्यवस्था केली. स्थिरस्थावर झाल्यावर दशरथ राजांनी आपल्या तीनही पुत्रांसाठी सीते सारख्याच सुंदर,सुशील,विनयशील कन्या उर्मिला, मांडवी,श्रृतकीर्तीला आपल्या तीन मुलांकरितां मागणी घातली.जनकराजाने मोठ्या आनंदाने स्विकारली. पौष कृष्ण सप्तमीस चारही पुत्रांचे विवाह संपन्न झाले. जनकराजा व राणी सुमतीदेवीने जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या कन्यांना निरोप दिला. योग्य सुरक्षा व लवाजम्यासह चारही नवनधूंना घेऊन राजा दशरथ अयोध्येस पोहोचले.ही सर्वी शुभकार्ये घडवून आणणाले महर्षी विश्वामित्र चारही वधू वरांना आशिर्वाद देऊन तप करण्यास हिमालयाकडे निघून गेले.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. २९-३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग – ११.
एरवी प्रत्येक बाबतीत कैकयीचा सल्ला घेणार्या दशरथ राजांनी पुत्रांचा विवाह परस्पर ठरवल्याने ती थोडी मनातून नाराज होती.पण चारही पुत्रवधू आल्यावर पहिला मान पट्टराणीचा म्हणून त्यांचे ओवाळून स्वागत केले.
विवाहाच्या आनंदाचे कांही दिवस संपल्यावर सर्वजण आपापल्या कार्याला लागले. सैन्य, शस्रागार,कारखान्याकडे लक्ष्मण,तर न्यायदान धान्यादी कोठारं व दानाकडे भरत,शत्रृघ्न आणि राजव्यवहारात राम सांभाळू लागले.नवीन सुनाही तिन्ही राण्यांची सेवा करीत होत्या. सर्व सुरळीत सुरु होते.पण नियतीला मान्य नव्हते.
कैकयीचे पिताश्री वार्धक्यामुळे व प्रकृती अस्वस्थामुळे लग्नाला येऊ न शकल्याने चारही सुनांना भेटण्याच्या इच्छेने त्यांंचा जेष्ठ पुत्र युधाजितला त्यांना आणण्यास पाठवले. महाराजांनी चौघांना तर नाही पण भरत,शत्रृघ्न, मांडवी व श्रृतकीर्तीला नेण्याची अनुमती दिली. आणि हाच प्रसंग कैकयीच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरेल हे तिला काय माहित होते? युधाजित चौघांना घेऊन केकयानगरीकडे प्रस्थान केले.
अलिकडे वृध्दत्वाकडे झुकलेल्या महाराजांना दुःस्वप्ने पडत होती. प्रकृतीही ठीक राहत नव्हती.त्यामुळे त्याना आपला अंतकाळ जवळ आला असावा असे वाटल्याने त्यांनी युवराज्याभिषेकाचा प्रस्ताव सभेपुढे मांडला. या सभेला कैकयनरेश व मिथिला नरेश वगळता सर्व प्रमुख राजांना निमंत्रीत केले होते.एरवी प्रत्येक राजसभेत कैकयीची उपस्थिती असायची पण यावेळी तिलाही दूर ठेवले होते. या आमसभेत सर्वानुमते युवराजपदासाठी रामाची निवड करण्यांत आली ही आनंदवार्ता वायुवेगाने सर्वत्र पसरली.दुसर्या दिवशी गुरु वसिष्ठांनी युवराज्याभिषेक संपन्न करण्यासाठी त्यांनी आपला पुत्र महर्षी शक्ती,आचार्य वामदेव जाबाली यांना आवश्यक सूचना व आज्ञा दिल्या
चैत्र शुध्द नवमी! रात्रभरात राजमहाल व संपूर्ण अयोध्यानगरी सजली.पहाटेच सगळी कडे गुढ्या,तोरणे,दारादारात सडासंमार्जन सुंदर रांगोळ्या काढल्या.सर्वजणं सकाळी होणार्या युवराज्यभिषेकाची आतुरतेने वाट पाहत होते. अनभिन्य कैकयी आपल्या महालात आरामात पहुडली होती. अतिशय क्रोधीत पाय आपटतच मंथराने प्रवेश करुन कडाडली, हे मूर्ख राणी उठ तुझ्यावर मोठे संकट येत आहे आणि तू आराम फर्मावते आहेस. तुझ्या भरताला डावलून महाराज रामाचा राज्याभिषेक करीत आहेत. भरत इथे नाही हा फायदा घेऊन,तुला पट्टराणी समजणार्या तुझ्या पतीने रामाच्या राज्याभिषेकाचा घाट घातला आहे.कैकय नरेशांना त्यांनी दिलेले वचन तूं विसरली असशील पण मी नाही.
मंथरेचे बोलणे जरी द्वेषात्मक असले तरी,तिच्याकडून मिळालेल्या वार्तेने कैकयीला अतिशय आनंद झाला व त्या भरात आपल्या गळ्यातील मौक्तिक कंठा तिला दिला.तो तिने भिरकावून देत म्हणाली, मूर्ख राणी! रामराज्या भिषेकाचे दुःख होण्याऐवजी आनंद होतो तरी कसा? कैकयी म्हणाली! मंथरे, भरतात आणि रामात कधीच भेद केला नाही. हे ऐकून मंथरा जास्तच भडकली. विनाश काले विपरित बुध्दी! तुला इतके परोपरीने सांगूनही समजत नाहीस तर मी काय करुं शकते असं म्हणून रागाने ती कक्षातून निघून गेली.
तेवढ्यात कैकयीच्या कक्षाबाहेर खडावांचा आवाज आला.तिला वाटले, ही शुभ वार्ता द्यायला प्रत्यक्ष कुलगुरुच येताहेत.त्याच बरोबर तंबोरा व वीणाचा मधूर आवाज ऐकून ती आश्चर्यचकित झाली.कांही पळातच तिच्या कक्षात प्रत्यक्ष तंबोराधारक देवमुनी नारद आणि वीणावादिनी ब्रम्हकन्या शारदादेवी प्रकटले. कैकयीने दोघांना आदरपूर्वक प्रणाम केला.आसनस्थ झाल्यावर नारदमुनी अत्यंत मधूर आवाजात म्हणाले, कैकयीदेवी! श्रीरामांच्या होणार्या राज्यभिषकाने तुला आनंद होणे सहाजिक आहे कारण तुझे रामावर भरतापेक्षाही नितांत माया,प्रेम आहे.परंतु हे केकयनंदिनी, तुला फार मोठे कार्य साधायचे आहे,अतिशय कठोर निर्णय घ्यायचा आहे. दक्षिणेत जनपदामधे राक्षसांनी उच्छाद मांडला आहे.तेथील जनता,तप यज्ञ,होमहवन करणारे तपस्वी,ऋषीमुनी,त्यांच्या बायकामुली,वध्द, गायी यांना खाऊन टाकतात,पळवून नेतात. यज्ञामधे विध्वंश आणतात.जनतेच्या बायका मुलींना पळवून त्यांचेवर अनन्वित अत्याचार करतात.राक्षसांनी आपल्या पापाचरणाने सर्व पृथ्वीलाही जेरीस आणले आहे, हे तूं जाणतेस. त्यांचा नाश करण्याचे सामर्थ्य केवळ राम लक्ष्मणामधेच आहे.किंबहुना रामाचा जन्मच मुळी राक्षस नायनाटासाठी आहे.दक्षिणेत राक्षसांचा राजा रावण हा अतिशय उन्मत्त झाला असून त्याने देवदेवतांनाही बंदीवान केले. रावणपुत्र इंद्रजित हा सुध्दा महापराक्रमी आहे. म्हणून हे आर्ये, तुझे खरोखरच रामावर प्रेम असेल तर असे कांही तरी कर की,ज्यायोगे श्रीराम दक्षिणेत जाण्यास उद्युक्त होईल.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. २९-३-२०२२.
!!! कैकयी !!!
भाग – १२.
नारदमुनी पुढे म्हणाले, राम दक्षिणेत गेले की,त्यांचा प्रतिहार व बहीश्वर प्राण असलेला लक्ष्मणही त्यांचेबरोबर जाईल. रामाचा जन्म, अवतारच मुळी संपूर्ण राक्षस नाश करणे आहे.तुला रामाविरुध्द निर्णय घेतांना खूप जड जाईल, मनाला कष्ट पडतील, तुझे मन तयार होणार नाही.पण ही ब्रम्हकन्या सरस्वती तुझे काम सोपे करेल.ती अदृष्य स्वरुपात तुझ्याठायी वास करेल.तुझ्या जिव्हेवर ताबा मिळवेल आणि विध्यात्यास हवे तसे तुझ्या मुखातून वदवून घेईल.आणि हे लक्षात घे राम-लक्ष्मण-सीताच नव्हे तर तुझीही योजना त्या विधात्याने जगकल्याणाकरीतां केलेली आहे. जग तुला खलस्री ठरवेल,तुझा स्वतःचा पुत्र तुझा तिरस्कार करेल,जगभर तुझी नेहमी साठी निंदा होईल. तुला अतिशय मनःस्ताप, क्लेश होतील पण हे सर्व समाज हितासाठी,व जगकल्याणासाठी सहन करायचे आहे. तुझे कल्याण असो! म्हणून अदृष्य झाले.
नारदमुनी निघून गेल्यावर कैकयी विचारांत गढून गेली.रामराज्याभिषेकाची सर्व तयारी झालेली, सर्वीकडे आनंदी, उत्साही वातावरण, प्रत्येकजण आतुरतेने राज्याभिषेका ची वाट बघत आहे.आणि अगदी ऐनवेळेवर सर्वांच्या उत्साहावर विरजण टाकायचे भयंकर दुष्ट कर्म करणे माझ्या माथी आले.त्या ऋषीच्या शापवाणीची आठवण झाली.बालवयात अनाहूतपणे झालेली चुक पूर्ण भविष्य उलथवून टाकेल याची त्यावेळी कल्पनाही नव्हती.पण विधिलिखित असलेलं कर्तव्य तर पार पाडणे भाग आहे. रामराज्याभिषेकाची मंगल वार्ता देण्यासाठी स्वामी येतील तेव्हा त्यांचेशी कशी वागू? रामराज्याभिषेकाचा आनंद लपवून, उसना,लटका क्रोध,कोप,उग्रता स्वामींना कसा दाखवू शकेल?
श्रीरामाच्या ध्येयपूर्तीसाठी विधात्याने माझी योजना केली असे नारदमुनी कां म्हणाले? माझ्या लाडक्या जिवलग रामास दीर्घ काळ दक्षिणेत कशी पाठवू? पाठवायचेच तर काय करावे? कांहीच सूचत नव्हते.कदाचित
मंथरा कांही सुचवेल असे वाटत असतांनाच कोणी नाहीसे पाहून मंथरा प्रवेशली.परत तिने गरळ ओकणे सुरु केले.भरताला निष्कंटक राज्य हवे असेल तर रामाने वनात जाणे तुम्हा माता पुत्राच्या दृष्टीने हितावह राहील.तूं पट्टराणी झाल्याने कौसल्येस दुय्यम स्थान प्राप्त झाले. पण ती राजमाता झाली तर, आजवर तिच्यावर झालेला अन्यायाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही.तेव्हा असा कांही उपाय शोध की, भरतास राज्य रामास वनवास मिळेल.
रामावर अन्याय करणे कैकयीच्या मनाला पटत नव्हते, तत्वातही बसत नव्हते पण नारदमुनींच्या सांगण्यावरुन रामास दक्षिणेकडे अरण्यात पाठवणेही आवश्यक होते. तिला रामाच्या वनवासाचे दुःख होत असले तरी, ते गिळून कठोर निर्णय घेणे आवश्यक होते.तिचे मन आतल्या आत आक्रंदत होते.एक मन म्हणत होते कैकयी तू हे महापाप करीत आहेस खुळे, हे पाप नाही, श्रीरामाचा खरा अभ्युदय पाहायचा असेल तर हे वरकरणी दिसणारे पाप तू शिरोधार्य मान.सार्या जगाने जरी तुझा धिक्कार केला तरी राम नक्की समजावून घेईल भरतास राज्य मागणे हे एक निमित्यमात्र होते हे तो जाणेल.मनातील द्वंद संपले.आणि खर्या लढाईला खंबीरपणे तयार झाली.
मंथरेला म्हणाली, तुझे म्हणणे मला पटायला लागले. मंथरेला वाटले आपण कैकयी चे मन परिवर्तन करण्यात यश मिळवले. पण नारदांनी सांगीतल्या प्रमाणे यापुढे कैकयीला खलपात्र वठवणे क्रमप्राप्त होते.तीने असे म्हटल्याबरोबर मंथरेला अतिशय आनंद झाला. तिने मायेने पाठीवरुन,डोक्यावरुन हात फिरवताच कैकयीत खलस्री संचारली.सरस्वती ने तिच्या मेंदूवर,जिव्हेवर पूर्ण ताबा मिळवला. चेहरा क्रोधाने लाल झाला.म्हणाली,मंथरे,मला असा उपाय सांग,ज्यायोगे रामास वनवासात जाणे भाग पडेल आणि भरतास राज्य मिळैल.
कैकयी असे म्हणताच, पापमार्ग दाखवणारी मंथरा म्हणाली,शंबरासुराच्या युध्दात महाराजांचे प्राण वाचवून त्याचा वध व विजय तुझ्या सारथ्य व बुध्दी कौशल्याने झाल्यामुळे महाराज संतुष्ट होऊन तुला दोन वर दिले त्यावेळी तूं ते राखून ठेवलेस, ते वर आतां मागून घे.एका वरा ने रामाला १४ वर्षे वनवास व दुसर्या वराने भरतास राज्य मागून घे.
तूं कोपलेली आहे हे दर्शवण्यासाठी कोपभवनात जाऊन अंगावरचे सर्व अलंकार काढून फेक.कपडे अस्ताव्यस्त कर.अंथरुणाचा त्याग करुन जमीनीवर अंग टाक.महाराज आल्यावर त्यांचेशी न बोलतां रडत रडत तशीच पडून रहा.तूं महाराजांची इतकी लाडकी आहे की, ते तुझ्यासाठी कोणतेही दिव्य करायला तयार होतील.प्रसंगी प्राणत्याग करण्यासही मागेपुढे पाहणार नाही.तुला अनेक प्रलोभणे दाखवतील पण भुलायचे नाही.ज्यावेळी ते जास्तच काकुळतीला येतील त्यावेळी त्या दोन वरांचा उपयोग कर. निर्भय होऊन राजाला रामाच्या राज्यभिषेक संकल्पापासून परावृत्त कर.रघुकुलवंशीय तुझा पती वचनापासून कधीही फिरुं शकत नाही.ते सत्यवचनी असल्यामुळे तुझा बेत नक्की सिध्दीस जाईल. मंथरा विषबिज पेरण्यात यशस्वी झाली.
क्रमशः
संकलन व © ® मिनाक्षी देशमुख.
दि. ३०-३-२०२२.







