आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199
3, दत्त जन्माचे अभंग, सर्व संतांचे एकत्रित अभंग
दत्त जन्माचे अभंग
अनुक्रमणिका
१ पैलमेरुच्या शिखरी । एक योगी निराकारी ।
२ धरी अवतार विश्व तारावया
३ अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी
४ जो जो जो जो रे निज आया
५ दत्त वसे औदुंबरी । त्रिशुळ
६ दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं
७ हाती कमंडलु दंड । दत्तमुर्ति
८ आयुष्य जाय माझे व्यर्थ
९ धावे पावे दत्तराजा । महाराजा
१० दत्त माझी माता दत्त माझा
११ वेधोनि गेले माझे मन । हारपलें
१२ ऐसी जगाची माऊली । दत्तनामें
१३ लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा
१४ दत्त माझी माय । आम्हा
१५ दत्त माझी माय । आम्हा सुखा
१६ आमुचे कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज
१७ माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि
१८ तीन शिरे सहा हात । तया माझे
दत्त जन्माचे अभंग प्रारंभ
पैलमेरुच्या शिखरी । एक योगी निराकारी 1
पैलमेरुच्या शिखरी । एक योगी निराकारी । मुद्रा लावुनि खेंचरी । तो ब्रह्मपदी बैसल ॥१॥ तेणे सांडियेली माया । त्याजिलेली कथा काया । मन गेले विलया । ब्रह्मानंदा माझारी ॥२॥ अनुहत ध्वनि नाद । तो पावला परमपद । उन्मनी तुर्या विनोदे । छंदे छंदे डोलतुसे ॥३॥ ज्ञान गोदावरीच्या तीरी । स्नान केले पांचाळेश्वरी । ज्ञानदेवाच्या अंतरी । दत्तात्रेय योगिया ॥४॥
धरी अवतार विश्व तारावया 2
धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनसूया गरोदर ॥१॥
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनी पूर्ण तिथि ॥२॥
तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सव काळ ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारले ॥४॥
अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी 3
अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनिया ॥१॥
पीतांबर पदरे पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥
निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥
एका जनार्दनी दत्त पाळण्यात घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥
दत्त जन्माचा पाळणा
जो जो जो जो रे निज आया 4
जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥ धृ ॥ पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणी ॥१॥ करिता उप्तत्ति शिणलासी । विश्रांति आलासी । निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥ लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वकुंठधामा । प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिले आम्हा ॥३॥ पार्वतीरमण शिवा निज आता । संहारक जीवजंता । निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनी दाता ॥४॥
दत्त वसे औदुंबरी । त्रिशुळ 5
दत्त वसे औदुंबरी । त्रिशुळ डमरु जटाधारी ॥१॥ कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥ गोदातीरी नित्य वस्ती । अंगी चर्चिली तिभुती ॥३॥ काखेमाजी शोभे झोळी । अर्धचंद्रं वसे भाळी ॥४॥ एका जनार्दनी दत्त । रात्रंदिनी आठवित ॥५॥
दत्त माझा दीनानाथ । भक्तालागी 6
दत्त माझा दीनानाथ । भक्तालागी उभा सतत ॥१॥ त्रिशुळ घेऊनिया करी । उभा असे भक्ताद्वारी ॥२॥ भाळी चर्चिली विभुती । रुद्राक्षाची माळ कंठी ॥३॥ जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानुं ॥४॥ एका जनार्दनी दत्त । रुप राहिले हृदयात ॥५॥
हाती कमंडलु दंड । दत्तमुर्ति 7
हाती कमंडलु दंड । दत्तमुर्ति ती अखंड ॥१॥ ध्यान लागो माझे मना । विनवितो गुरुराणा ॥२॥ अंगी चर्चिली विभुती । हृदयी वसे क्षमा शांती ॥३॥ तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥ एका जनार्दनी दत्त । तद्रुप हे झाले चित्त ॥५॥
आयुष्य जाय माझे व्यर्थ 8
आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥ धाव धाव लवकरी । करुणा करी गुरूराया ॥२॥ मी तव अनाथ अपराधी । हीनबुद्धि स्वामीया ॥३॥ काळ घाला पडिलावरी । धाव श्रीहरी लवलाह्मा ॥४॥ दत्ता पतित पावना । शरण एका जनार्दना ॥५॥
धावे पावे दत्तराजा । महाराजा 9
धावे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥ अनाथासी संभाळावे । ब्रीद पाळावे आपुले ॥२॥ तुजविण सोडविता । नाही त्राता दुसरा ॥३॥ महादोषी पतितालागी । करा वेगी उद्धार ॥४॥ एका जनार्दनी दत्ता । अवधुता माया बापा ॥५॥
दत्त माझी माता दत्त माझा 10
दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥ दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशी आधारु दत्तराज ॥२॥ दत्त माझे जन दत्त माझे मन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥ एका जनार्दनी दत्त हा विसावा । न विचारित गावा जावे त्याच्या ॥४॥
वेधोनि गेले माझे मन । हारपले 11
वेधोनि गेले माझे मन । हारपले दुजेंपण ॥१॥ ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥ तयाविण ठाव । रिता कोठे आहे वाव ॥३॥ एका जनार्दनी भरला । सबाह्म अभ्यंतर व्यापिला ॥४॥
ऐसी जगाची माऊली । दत्तनामे 12
ऐसी जगाची माऊली । दत्तनामे व्यापुनि ठेली ॥१॥ जीवे जिकडे तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥ तया सांकडेंचि नाही । दत्त उभा सर्वा ठायी ॥३॥ घात अघात निवारी । भक्ता बाहे धरी करी ॥४॥ ऐशी कृपाळु माऊली । एका जनार्दनी देखिली ॥५॥
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा 13
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥ चरणी घातली मिठी प्रेम दुनावे पोटी । पाहता हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥ मन माझे वेधले परिपुर्ण भरले । एका जनार्दनी सांठविले हृदयी दत्त ॥३॥
दत्त माझी माय । आम्हा 14
दत्त माझी माय । आम्हा अनाथांची गाय ॥१॥ प्रेमपान्हा पाजी वेगी । गुरुमाउली आम्हालागी ॥२॥ आम्हा प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥ आमची जीवींची जीवलगी । आम्हालागी घे वोसंगी ॥४॥ एका जनार्दनी । दत्तराज मायबहिणी ॥५॥
दत्त माझी माय । आम्हा सुखा 15
दत्त माझी माय । आम्हा सुखा उणे काय ॥१॥ नित्य प्रीति दत्तनामी । दत्त वसे गृहरामी ॥२॥ दत्ताविण नसे दुजे । दत्त मायबाप माझे ॥३॥ दत्तात्रय दत्तात्रय । नाही कळिकाळाचे भय ॥४॥ एका जनार्दनी दत्त । नित्य देख हृदयात ॥५॥
आमुचे कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज 16
आमुचे कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥ तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥ हेचि आमुचे व्रत तप । मुखी दत्तनाम जप ॥३॥ तयाविण हे सुटिका । नाही नाही आम्हा देखा ॥४॥ एका शरण जनार्दनी । दत्त वसे तनमनी ॥५॥
माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि 17
माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥ तियेविण मजलागी । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥ दत्त माझा आधार । त्यासी चिंती वारंवार ॥३॥ निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥ एका जनार्दनी दत्त । नित्य देखे ध्याना आत ॥५॥
तीन शिरे सहा हात । तया माझे 18
तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ॥१॥ काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ॥२॥ माथा शोभे जटाभार । अंगी विभूति सुंदर ॥३॥ शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ॥४॥ तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ॥५॥
१०५१.
दत्त दत्त म्हणे वाचे ।
काळ पाय वंदी त्याचे ॥१॥
दत्तचरणी ठेवी वृत्ती ।
होय वृत्तीची निवृत्ती ।॥२॥
दत्तरुप पाहे डोळा ।
वंद्य होय कळिकाळा ॥३॥
एका जनार्दनी दत्त
हृदयी वसे सदोदित ॥४॥
दत्ताच्या आरत्या पहा.
दत्त जन्माचे अभंग समाप्त
दत्त चरित्र
करंजी येथील ‘श्रीदत्तप्रभूंच आजोळ’
स्थान: दिंडोरीजवळ, वणी कडे जाताना नाशिक-वणी मार्गांवर, ओझरखेड धरणाच्या उजव्या बाजूला.
सत्पुरूष: श्री दत्तात्रेय.
विशेष: श्री दत्तप्रभूंची पद्मासन स्थित मूर्ती, कर्दम मुनींचा आश्रम.
त्रेतायुगात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही, महर्षी अत्रि आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या सुपुत्ररुपानं भगवान् श्रीदत्तात्रेयांनी अवतार धारण केला. ब्रम्हदेवांच्या चार मानस पुत्रांपैकी महर्षी भृगू हे ज्येष्ठ पुत्र, दुसरे महर्षी अंगिरस, तिसरे महर्षी अत्रि आणि चौथे महर्षी वैखानस! महर्षी अत्रि आणि महर्षी अंगिरस यांना मानाचं स्थान थेट सप्तर्षींमधेही आहे. साक्षात् श्रीलक्ष्मीमातेचे पुत्र असलेल्या कर्दममुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रिंची पत्नी महासाध्वी माता अनसूया! अत्रिमुनींचं ज्ञान, तपःसामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दममुनी-देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनसूया या सौंदर्यवती-सुशील कन्येचा अत्रिमुनींशी विवाह लावून दिला. ‘अनसूया’ म्हणजे ‘असूयारहित’! अश्या या महान सती श्रीअनसूयेचं माहेर अर्थात् श्रीदत्तप्रभूंचं आजोळ (महर्षी कर्दममुनींचा आश्रम) आहे. दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ ‘करंजी’ या गावी, अगदी भर नाशिक-वणी मार्गावर! वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ ३-४ किमी आत हे पवित्र स्थान आहे. यालाच ‘निर्जल मठ’ असंही म्हणतात. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात् श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन ‘सिद्धानां कपिलो मुनीः’ असं केलंय, त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे.
श्रीदत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही व एकमेव भारतामधून इथे पहायला मूर्ती मिळते. प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्रीशिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरुप दिलेली आहे. मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम एक वित उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे.
इथे आणखी एक आश्चर्य असं पहायला मिळालं की परिसरात असलेली सगळे कुत्रे दुपारी १२ च्या आरतीला देवळाच्या गाभा-याच्या आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात.
:– अवधुत—
दत्तजयंती
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.
दत्त जयंतीचे महत्त्व
दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते.
दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले ….
मन हे न्हाले भक्ती डोही । अनुसया उदरी धन्य अवतार ।।
केलासे उद्धार विश्वाचा या । माहुरगडावरी सदा कदा वास ।।
दर्शन भक्तास देई सदा । चैतन्य झोळी विराजे काखेत ।।
गाईच्या सेवेत मन रमे । चोविस गुरूचा लावियला शोध ।।
घेतलासे बोध विविधगुणी ।




