“२६ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 26 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २६ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३२१७ ते ३२२८ चे पारायण आपण करणार आहोत.
२६ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ४०१ ते ४२५,
401-16
आणि अभिचारावेगळे । विपाये जे अवगळे । तया टाकिती इटाळे । पैशून्याची ॥401॥
आणि कोणी कदाचित् ह्या अभिचारांतून गळले तर त्यांच्यावर नीचतेचे आरोप करितात. (आणि त्यास छळतात) 1
402-16
सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक । तपस्वी अलौकिक । संन्यासी जे ॥402॥
सती, सत्वशील पुरुष, दानशूर पुरुष, याज्ञिक, अलौकिक तपी असे संन्यासी जे असतील. 2
403-16
का भक्त हन महात्मे । इये माझी निजाची धामे । निर्वाळली होमधर्मे । श्रौतादिकी ॥403॥
किंवा भक्त आणि महात्मे, ही माझी श्रौतादि यज्त्रयागाने शुद्ध झालेली निवास संस्थानेच होत. 3
404-16
तया द्वेषाचेनि काळकूटे । बासटोनि तिखटे । कुबोलांची सदटे । सूति कांडे ॥404॥
अशा पवित्र जनांवर व्देषरूपी कालकूट विषाचे जे तीक्ष्ण वाग्बाण, यांचा वर्षाव करितात. 4
तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥16. 19॥
405-16
ऐसे आघवाचि परी । प्रवर्तले माझ्या वैरी । तया पापिया जे मी करी । ते आइक पा ॥405॥
याप्रकारे जे सर्व प्रकारांनी मजपाशी वैर करण्यास प्रवृत्त होतात, त्या पाप्याना मी जे शासन करितों, तो ऐक. 5
406-16
तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा । ते पदवी हिरोनि पै गा । ऐसे ठेवी ॥406॥
तरी, जगात मनुष्याच्या जन्माला येऊन जे त्या देहाची कर्तव्ये मात्र करीत नाहीत, त्यांचा तो देह हरण करून अशा स्थितीत ठेवितो, 6
407-16
जे क्लेशगावीचा उकरडा । भवपुरीचा पानवडा । ते तमोयोनि तया मूढा । वृत्तीचि दे ॥407॥
क जी योनि अत्यंत क्लेशदायक, घाणेरडी, जन्ममरणरूप यातनेची पायवाट असून अंधकारमय (अज्ञानरूप) असते तशी योनि त्यांना देतों. 7
408-16
मग आहाराचेनि नांवे । तृणही जेथ नुगवे । ते व्याघ्र वृश्चिक आडवे । तैसिये करी ॥408॥
मग क्षुधा लागली तर गवतही उपयोगी पडू नये अशा व्याघ्र वृश्चिकादि जातींचा त्यास अरण्यात जन्म देतों. 8
409-16
तेथ क्षुधादुःखे बहुते । तोडूनि खाती आपणयाते । मरमरो मागुते । होतचि असती ॥409॥
तेथे अत्यंत क्षुधित झाले असता, आपल्याच शरीराचे लचके तोडून खाण्याची पाळी येते आणि मरून पुनःपुनः त्याच योनीत जन्म घेतात. 9
410-16
का आपुला गरळजाळी । जळिती आंगाची पेंदळी । ते सर्पचि करी बिळी । निरुंधला ॥410॥
किंवा ज्याचा आपल्या विषाच्याच दाहाने साऱ्या अंगाचा दाह होतो अशा सर्पयोनीत घालून त्यास बिळात कोंडून ठेवितो. 410
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-16
परी घेतला श्वासु घापे । येतुलेनही मापे । विसावा तया नाटोपे । दुर्जनांसी ॥411॥
परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका थोडा वेळ लागतो तितकीही मी त्यास विश्रांति लाभू देत नाही. 11
412-16
ऐसेनि कल्पांचिया कोडी । गणितांही संख्या थोडी । तेतुला वेळु न काढी । क्लेशौनि तया ॥412॥
अशा अगणित कल्पांच्या कोडीच्या कोडी लोटेपर्यंत मी त्यास त्या योनींतून बाहेर काढीत नाही. 12
413-16
तरी तयांसी जेथ जाणे । तेथिचे हे पहिले पेणे । ते पावोनि येरे दारुणे । न होती दुःखे ॥413॥
तरी त्यांना पुढे जेथे जावयाचे आहे त्यातील हा पहिला मुक्काम होय; तर मग त्यापुढील योनीत दारुण दुःखे होणार नाहीत काय ? 13
आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥16. 20॥
414-16
हा ठायवरी । संपत्ति ते आसुरी । अधोगती अवधारी । जोडिली तिही ॥414॥
त्या आसुरी संपत्तीच्या योगाने त्यांना अशी दुर्दशा प्राप्त होत असते हे लक्ष्यात ठेव. 14
415-16
पाठी व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा । देहाधाराचा उसासा । आथी जोही ॥415॥
पण, व्याघ्रादि तामस योनींमध्येही देहाच्या आधाराने त्यास अधूनमधून तरी थोडी विश्रांति मिळते. 15
416-16
तोही मी वोल्हावा हिरे । मग तमचि होती एकसरे । जेथे गेले आंधारे । काळवंडैजे ॥416॥
तेवढी थोडी विश्रांतीही हिरावून घेऊन जेणे अंधारही काळिमेच्या दृष्टीने कमी पडेल अशा केवल तमोरूप योनीमध्ये मी त्यांना घालतो. 16
417-16
जयांची पापा चिळसी । नरक घेती विवसी । शीण जाय मूर्च्छी । सिणे जेणे ॥417॥
ज्या तमोयोनीचा पापालाही किळस येतो किंवा नरकही जिला भितो, किंवा जेथे श्रमही श्रमून मूर्च्छित होतो. 17
418-16
मळु जेणे मैळे । तापु जेणे पोळे । जयाचेनि नांवे सळे । महाभय ॥418॥
जेथे मलही मलिन होतो, तपालाही ताप होतो, किंवा ज्या योनीचे नुसते नांव घेतले असता महाभयही भयभीत होते. 18
419-16
पापा जयाचा कंटाळा । उपजे अमंगळ अमंगळा । विटाळुही विटाळा । बिहे जया ॥419॥
जेथे पापही कंटाळते, अमंगलव देखील अमंगल होते व विटाळही आपण विटाळू अशी भीत बाळगतो. 19
420-16
ऐसे विश्वाचेया वोखटेया । अधम जे धनंजया । ते ते होती भोगूनिया । तामसा योनी ॥420॥
अर्जुना, साऱ्या विश्वांत अधमांतील अधम अशी जी ही तामस योनी तिच्यात त्यांची अशा भोगांनी अशी दुर्दशा होते. 420
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-16
अहा सांगता वाचा रडे । आठविता मन खिरडे । कटारे मूर्खी केवढे । जोडिले निरय ॥421॥
तिचे वर्णन करितांना वाणीला कष्ट होतात, मन कच खाते आणि असे वाटते की केवढा रे घोर अनर्थ ह्यांनी ओढवून घेतला ! 21
422-16
कायिसया ते आसुर । संपत्ति पोषिती वाउर । जिया दिधले घोर । पतन ऐसे ॥422॥
जिच्यामुळे असा घोर पतनप्रसंग प्राप्त होतो ती आसुरी संपत्ति हे मूर्ख कशाला रे अशी वाढवितात असे वाटू लागले. 22
423-16
म्हणौनि तुवा धनुर्धरा । नोहावे गा तिया मोहरा । जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता ॥423॥
म्हणून, अर्जुना, तू त्या संपत्तीकडे किंवा जेथे आसुरी संपत्तिमान वास करतात त्या योनीकडे नुसते ढुंकूनही पाहू नको. की त्यांचे नांवही घेऊ नको. 23
424-16
आणि दंभादि दोष साही । हे संपूर्ण जयांच्या ठायी । ते त्यजावे हे काई । म्हणो कीर ? ॥424॥
मग, दंभादि सहा दोषांची खाण जी आसुरी संपत्ति तिच तू त्याग कर, हे काय निराळे सांगावयाची आवश्यकता आहे ? 24
नरकाचे तीन दरवाजे
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ॥16. 21॥
425-16
परी काम क्रोध लोभ । या तिहीचेही थोंब । थांवे तेथे अशुभ । पिकले जाण ॥425॥
परंतु, काम, क्रोध आणि लोभ ह्यांच्या एकीचा वृक्ष जेथे जोरावतो जेथे शुभफलनिष्पत्ति होत असते हे लक्षात असू दे. 25
दिवस २६९ वा. २६, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३२१७ ते ३२२८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३२१७
भागल्याचे तारू शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥१॥
ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाचीच राशी पांडुरंग ॥धृपद॥
सकळा सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळा ॥२॥
तुका म्हणे येथे आता उरे कैचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥३॥
अर्थ
ही विठाबाई माऊली संसारसमुद्रामध्ये भागलेल्या भक्तांची नौका शिणलेल्या भक्तांची सावली आणि भुकेल्या भक्तांना प्रेम पान्हा पाजणारी आहे. अशी ही कृपाळू अनाथांची सखी पाडूरंग माऊली सुखाची राशीच आहे. अहो ही विठाबाई माऊली सगळयांवर कृपादृष्टी करण्यासाठी भक्तांच्या सन्मुखच उभी राहते त्यांच्या दृष्टीपुढेच राहते आणि भक्तांची भेट होण्यासाठी ही फार उतावीळ होते भक्तांशी फार उतावीळपणाने वाट पाहात असते. तुकाराम महाराज म्हणतात, “मग असेही असताना अनेक जन्मीचा शीणभाग तरी कसा राहील ? ”
3:29
अभंग क्र. ३२१८
काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुम्हापे ॥१॥
आमुची तो न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकी ॥धृपद॥
कैसी तुम्हा होय सांडी । करुणा तोंडी उच्चारे ॥२॥
आश्चर्यचि करी तुका । हे नायका वैकुंठिच्या ॥३॥
अर्थ
हे पाडूरंगा तुमच्याजवळ काय कमी आहे ? देवा अहो आमच्या इच्छा पूर्ण होऊ नये तेही तुमच्यासारखा पिता आमच्या मस्तकी असताना ? अहो देवा आम्ही आमच्या तोंडाने तुम्हाला करुणावचने भाकतो तरी देखील तुम्ही आमची हेळसांड करता हे तुमच्याच्याने कसे करणे होते ? तुकाराम महाराज म्हणतात, “हे देवा हे वैकुंठनायका मी या गोष्टीचे फारच आश्चर्य करीत आहे. ”
3:30
अभंग क्र. ३२१९
परि आता माझी परिसावी विनंती । रखुमाईच्यापती पांडुरंगा ॥१॥
चुकलिया बाळा न मारावे जीवे । हित ते करावे मायबापी ॥२॥
तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आता आहे लाज हेचि तुम्हा ॥३॥
अर्थ
हे रुक्मीणीच्या पती पाडूरंगा माझी एक विनंती तुम्ही ऐकाच. आपले लेकरु लहान बाळ जर चुकले तर त्याला मायबापाने जीवेच मारु नये तर त्याचे हित होईल असेच त्यांनी करावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा लोक म्हणतात की, मी तुमचा आहे मग याचीच लाज तुम्हाला असू दयावी. ”
3:30
अभंग क्र. ३२२०
पापाचिया मुळे । झाले सत्याचे वाटोळे ॥१॥
दोष झाले बळिवंत । नाही ऐसी झाली नीत ॥धृपद॥
मेघ पडो भीती । पिके सांडियेली क्षिती ॥२॥
तुका म्हणे काही । वेदा वीर्य शक्ति नाही ॥३॥
अर्थ
पापामुळेच सत्याचे वाटोळे झाले आहे. अहो या कलीयुगामध्ये पाप अतिशय बलवान झाले आहे आणि त्यामुळे नीती राहिलीच नाही. अहो पाप कलीयुगामधे फारच वाढले त्यामुळे मेघ वर्षाव करण्यसाठी देखील भीत आहे पृथ्वीने तर धान्य पिकवणेच सोडून दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “असे अधर्म वाढत आहेत त्यामुळे वेदामंत्रामध्ये देखील काही सामर्थ्य शक्ती राहिली नाही. ”
3:30
अभंग क्र. ३२२१
ऐसा दुस्तर भवसागर । नेणो कैसा उतरू पार ॥१॥
कामक्रोधादि सावजे थोर । दिसताती भयंकर ॥धृपद॥
मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥२॥
वासनेच्या लहरा येती । उद्योग हेलकावे बैसती ॥३॥
तरावया एक युक्ति असे । तुका नामनावेमधे बैसे ॥४॥
अर्थ
हा भवसागर फारच कठीण आहे आणि तो पार करुन कसा जावा हे मला काही कळेनासे झाले आहे. अहो मला या ठिकाणी कामक्रोधादीरुपी भयंकर प्राणी दिसत आहे. या भवसागरामध्ये माया ममतेचे भोवरे भयानक फेरे घेत आहेत. वासनेच्या लहरी सारख्या सारख्या येतात व त्यामुळे अनेक कर्माचे हेलकावेही बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, “या भवसागरातून तरुन जाण्यासाठी एकच युक्ती आहे ती म्हणजे हरीनामरुपी नौकेत आपण बसावे आणि या नौकेत मी बसलो आहे. ”
3:30
अभंग क्र. ३२२२
हरीदासाचिये घरी । मज उपजवा जन्मांतरी ॥१॥
म्हणसी काही मागा । हेचि देगा पांडुरंगा ॥धृपद॥
संता लोटांगणी । जाता लाजो नको मनी ॥२॥
तुका म्हणे अंगी । शक्ती देई नाचे रंगी ॥३॥
अर्थ
देवा जन्मजन्मांतरी मला हरीदासांच्याच घरी जन्म दयावे. हे पाडूरंगा तुम्ही जर मला म्हणत असताल की काहीतरी मला माग तर मला एवढेच तुम्ही दयावे. अहो देवा संतांना मी लोटांगणी जात असताना माझ्या मनामध्ये लाज येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी नाम रंगात नाचो अशी शक्ती माझ्या अंगात तुम्ही दयावी. ”
3:30
अभंग क्र. ३२२३
लटिक्याचे आंवतणे जेविलिया साच । काय त्या विश्वास तोचि खरा ॥१॥
कोल्हांटिणी लागे आकाशी खेळत । ते काय पावत अमरपद ॥धृपद॥
जळमंडप्याचे घोडे राउत नाचती । ते काय तगती युद्धालागी ॥२॥
तुका म्हणे तैसे मतवादीयांचे जिणे । दिसे लाजिरवाणे बोलताचि ॥३॥
अर्थ
नेहमी खोटे बोलणाऱ्या माणसाने आपल्याला जेवणाचे आमंत्रण दिले तर ज्यावेळी तो आपल्याला जेवू घालील त्यावेळीच त्याचे बोलले खरे समजावे कारण तो नेहमी खोटे बोलतो त्यामुळे त्याचा विश्वास कसा धरावा ? कोल्हाटीण उंच तारेवर नाचण्याचा खेळ खेळते म्हणून तिला काही इंद्रपद मिळणार आहे काय ? अहो आपल्याला आकाशामध्ये घोडे नाचल्यासारखे शिपाई, असल्यासारखे ढगे दिसतात मग ते युध्दामध्ये काही टिकणार आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे चार्वाकादी मतवादयांचे जगणे आहे अहो ते नुसते बोलले जरी तरी त्यांचे बोलणे लाजिरवाणे असल्याचे दिसून येते. ”
3:30
अभंग क्र. ३२२४
एक म्हणती आम्ही देवची पै झालो । ऐसे नका बोलो पडाल पतनी ॥१॥
एक म्हणती आम्ही देवाची पै रूपे । तुमचिया बापे न चुके जन्म ॥धृ॥
देवे उचलिली स्वमुखे मेदिनी । तुमचे गोणी नुचवले ॥२॥
देवे मारियेले दैत्य दानव मोठे । तुमचेनि न तुटे तृनमात्र ॥३॥
राया विठोबाचे पद जो अभिळासी । पातकाची राशी तुका म्हणे ॥४॥
अर्थ
काही मनुष्य म्हणतात की, आम्ही देवच झालो आहोत परंतू तसे म्हणू नका कारण तसे बोलून उगाच तुम्ही नरकाला जाल. अहो काही तर म्हणतात की आम्ही तर देवाचीच रुपे आहोत, मग तुमच्या बापाला देखील जन्ममरण चुकले नाही तर तुमचे आणि देवाचे रुप एकच कसे ? अहो देवाने वराह अवतार घेऊन पृथ्वी आपल्या मुखाने वर उचलली होती तुमच्याने तर एक गोणी देखील उचलणार नाही. अहो देवाने तर वेगवेगळे अवतार घेऊन मोठमोठे दैत्य मारले तुमच्याने तर साधी गवताची मोळी देखील उचलणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्या राया विठोबा याच्या पदाची जो अभिलाषा करील तो पातकांची राशीच आहे. ”
3:31
अभंग क्र. ३२२५
काय आम्ही केले ऐसे । नुद्धरीजेसे सांगावे ॥१॥
हरण कोल्हे वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥धृपद॥
गजा नाड्या सरोवरी । नाही हरी विचारिले ॥२॥
तुका म्हणे गणिका नष्ट । माझे कष्ट त्याहूनि ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही आमचा उध्दार करीत नाही मग आम्ही काय करावे ते आम्हाला सांगावे. देवा अहो तुम्ही हरीण कोल्हे यांना देखील वैकुंठात नेले सांगा त्यांचा असा अधिकार तरी काय होता ? अहो हरी ज्यावेळी गजेंद्र पशू सरोवरामध्ये अडकला होता नक्राने त्याचा पाय धरला त्यावेळी त्याने एकच हाक मारली त्यावेळी तुम्ही त्याच्या मदतीला लगेच धावून आलात मग त्याचा मागचा पुढचा दोष पाप याचा काहीच विचार तुम्ही केला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अहो गणिका वेश्या होती ती तर पापी होती तिने केवळ अंत:काळी पोपटाला उद्देशून “राघोबा राघोबा” असे तुझे नाम उच्चारले तरी तू तिचा उध्दार केलास मग तिच्यापेक्षा माझ्या भक्तीचे कष्ट तर जास्तच आहे. ”
3:31
अभंग क्र. ३२२६
गुणा आला विटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥१॥
डोळे कान त्याच्या ठायी । मन पायी राहो हे ॥धृपद॥
निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥२॥
तुका म्हणे समध्यान । हे ते चरण सुकुमार ॥३॥
अर्थ
निर्गुण निराकार असलेला हरी आज गुणाला आला असून सगुण साकार होऊन विटेवर अवतरला आहे पितांबरधारी हरी अतिशय सुंदर दिसत आहे. अशा या हरीच्या ठिकाणी माझे डोळे कान राहो व त्याच्या पायाच्या ठिकाणी माझे हे मन राहो. या हरीची कृपेची छाया अशी आहे की ती भ्रम उत्पन्न करणारी जी माया आहे तिचेच निवारण करते. तुकाराम महाराज म्हणतात, “या हरीचे दोन्हीही चरण विटेवर समान आहेत व या सुकुमार चरणांचे ध्यान करण्यास अगदी योग्य आहे. ”
3:31
अभंग क्र. ३२२७
रंगी रंगे नारायण । उभा करितो कीर्त्तन ॥१॥
हाती घेउनिया वीणा । कंठी राहे नारायणा ॥धृपद॥
देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥२॥
तुका म्हणे देवा । देई कीर्तनाचा हेवा ॥३॥
अर्थ
मी उभा राहून कीर्तन करत आहे व नारायणाच्या रंगात मी रंगून जात आहे व हे नारायणा तू देखील या रंगात रंगून जावे. हे नारायणा मी हातात वीणा घेऊन हरीकथा करीत आहे कीर्तन करीत आहे त्यामुळे तू माझ्यात येऊन राहा जेणेकरुन तुझा उपदेश मी लोकापर्यंत पोहोचवेन. हे नारायणा मी तुझी मूर्ती पाहिली आणि माझ्या ह्दयाला एक विश्रांतीच मिळाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा असाच माझ्या मनाला कीर्तनाचा हव्यास असू दयावा. ”
3:31
अभंग क्र. ३२२८
तुझा भरवसा आम्हा । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥
भवसागरसंकटी । तारिशील जगजेठी ॥धृपद॥
नाम आदित्याचे झाड । त्याचा न पडे उजेड ॥२॥
सिलंगणीचे सोने । त्यासी गाहाण ठेवी कोण ॥३॥
नामा सारखी करणी । कोठे नाही त्रिभुवनी ॥४॥
तुका म्हणे देवा । ब्रिद सोडोनिया ठेवा ॥५॥
अर्थ
पुरुषोत्तमा तुझा आम्हाला फार भरवसा होता. की तू या भवसागराच्या संकटातून हे जगजेठी मला तारशील. अहो जरी झाडाचे नांव सूर्यफुल असले तरी देखील त्याचा उजेड सूर्यासारखा पडत नाही. सीमोल्लंघन करण्याच्यावेळी आपटयाची पाने सोने म्हणून वाटतात मग त्या आपटयाच्या पानांना कोणी गहाण ठेवील काय आणि ठेवले तरी कोणाला त्याचे धन मिळणार आहे काय ? म्हणजेच नामासारखी करणी त्रिभुवनामध्ये कोठेही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी तुमचे अनेक ब्रीदे ऐकले आहे पतितपावन, दीनानाथ, अनाथांचा नाथ परंतू त्या नावाला साजेसे कार्य दिसत नाही त्यामुळे तुम्ही तुमचे ब्रीद सोडून ठेवा. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

