आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

सारदामाता चरित्र भाग ३, (११ ते १५)
रामचंद्र मुखर्जी आणि शामसुंदरीच्या पोटी जयरामवाटी या गावी सारदाचा जन्म झाला. जन्मा पासूनच सारदाचे वेगळेपण दिसून येत होते. कधी जास्त रडणे नाही, की आकांडतांडव नाही. लाडा कौतुकात सारदा सहा वर्षाची झाली. आणि तिच्या विवाहाचा प्रस्ताव कामारपुकुरच्या रामेश्वर मुखर्जींचा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! सारदामाता !!!
भाग – ११
शामा देवींनी जगध्दात्रीची पूजा केल्यानंतर सारदा देवीच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली त्यांना दक्षिणेश्वरी जायची ओढ लागली तोच दुसऱ्या दिवशी त्यांची सासू चंद्रमणीच्या निधनाची बातमी आली त्या लगेच दक्षिणेश्वरी पोहोचल्या रामकृष्णांची कृश झालेली तब्येत बघून, सारदांनी चौकशी केल्यावर, ते म्हणाले, जेवावेसेच वाटत नाही खाल्लेले पचत नाही आता मी आपल्याला स्वतःच्या हाताने आवडीचे पदार्थ बनवून खाऊ घालेन त्यांना जाणवले यांना मातेच्या वियोगाचा जबरदस्त आघात झाला सारदाने विचारले, सासूबाईंना काय झाले होते? पुत्र वियोगाचे दुःख, म्हातारपण आणि आजार हे सांगतानाही त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या म्हणाल्या, खरंतर मला लवकर यायचे होते पण उठण्या बसण्याचीही ताकद नव्हती कशी येऊ?
रामकृष्ण म्हणाले, पुत्र असूनही मी क्रीया करू शकलो नाही म्हणून व्यथित आणि सून असून सेवा घडली नाही म्हणून तुम्ही दुःखी असं का? मी विवाहानंतर तिच्या नकळत संन्यास घेतला होता संन्यासाला श्रद्धादी कर्म वर्ज्य म्हणून गंगेच्या पाण्याने तर्पण करण्यासाठी ओंजळीत पाणी घेऊन उभा राहिलो, तर सर्व पाणी गळून गेले अखेर अंतःकरणाच्या दुःखाला वाट करून, माझ्या अश्रूंनी तर्पन केले
शंभू बाबू रामकृष्णांचे परम भक्त होते ते रामकृष्णांना बाबा आणि सारदा देवीला माताजी म्हणत इतरही त्यांचे अनुकरण करुं लागले शंभू नाथांची पत्नीही रामकृष्णांची भक्त होती त्यांना नमस्कार केल्याशिवाय पती-पत्नी भोजन करीत नसत सारदा देवी आल्यापासून त्यांनाही नमस्कार करीत असत सारदा देवींची स्वयंपाकाची जागा अतिशय लहान असून कोंदट होती शंभू व पत्नी यांना सारदांची तब्येत बिघडल्याचे कारण काय ते लक्षात आले ते रामकृष्णांना म्हणाले, बाबा, या छोट्याशा जागेत माताजींची घुसमट होते म्हणून मंदिराजवळ थोडी जागा घेऊन झोपडी बांधायचा विचार आहे ठीक आहे पण माताजींना विचार शंभुनाथ पत्नीसह आले नमस्कार करून म्हणाले, शिष्यांना तुमच्या दर्शनाला यायची इच्छा असते, पण या लहानशा कोठडीत त्यांना येणे जमत नाही शिवाय खोली हवा बंद असल्यामुळे तुमची तब्येतही बिघडत राहते म्हणून अगदी जवळच झोपडी बांधतो तिथे तुम्ही राहावे बाबांची परवानगी आहे मग हरकत नाही खटपट करून, शंभूबाबुंनी झोपडी तयार केली त्यात त्या ह्रदयरामच्या पत्नीसह राहू लागल्या
एकदा पौर्णिमेचे रात्री बाबा आणि माताजी बोलत बसले असता, ते म्हणाले, चंद्र हे प्रेमाचे प्रतीक आहे, तसेच तुम्हीही जनमानसात स्थान प्राप्त करा प्रेममयी माता व्हा त्यांनी मनोमन हात जोडून चंद्राला म्हणाल्या, तुझ्या शीतल स्वच्छ प्रकाशासारखं माझं अंतःकरण निर्मळ ठेव माझ्यात कोणताही दुर्गुन ठेवू नकोस तथाऽस्तु तथाऽस्तु शब्द बासरीच्या मधुर स्वरात ऐकू आले आणि तिथेच त्या भाव समाधीत गेल्या
पतीसेवा,जपजाप्य, भावसमाधीत माताजींचे दिवस जात असताना ठाकूर पोटदुखी आणि वारंवार शौचास जाण्याने त्रस्त झाले ते इतके दुर्बल झाले की पाऊल टाकणेही कठीण झाले
मातीजींना नवीन घरातून वारंवार येणे जमत नव्हते ठाकूरांनी आजारामुळे जेवण बंद केले त्याच दरम्यान बनारसवरुन एक वृद्ध स्त्री काली मंदिरात आली व बाबा आजारी असल्याचे कळल्यावर त्यांच्या खोलीत जाऊन त्यांची सेवा करू लागली माताजी पतीसाठी लापशी घेऊन आल्यावर, मृदु स्वरात वृध्दा म्हणाली, बाबा आजारी असल्याने तुमचं त्यांच्याजवळ राहणे आवश्यक आहे त्यांच्याने उठवत नाही तुम्ही इथं का नाही राहात? मला खूप वाटते मग काय अडचण आहे? माझ्यासोबत ठाकुरांचा भाचा हृदयरामची पत्नी असते तिला एकटी कशी ठेवू?
तुम्ही पूर्वी राहत होते तिथे राहायला जा असं सांगून वृद्धा निघून गेली दुसऱ्या दिवशी माताजी पूर्वीच्याच ठिकाणी राहायला आल्या त्या रात्रंदिवस पतीची सेवा करू लागल्या ठाकुराच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली अशक्तपणा दूर झाला दैनंदिन काम करू लागले आलेल्या शिष्यांबरोबर चर्चा करू लागले
एक दिवस बाबांचा भक्त लक्ष्मीनारायण बाबांकडे आला त्यांचेसमोर दहा हजार रुपये ठेवून म्हणाला, याचा स्वीकार करावा बाबा स्वतःशीच हसले क्षणभर थांबून त्यांनी माताजींना बोलावणे धाडले माताजी येताच ठाकूर म्हणाले, या लक्ष्मीनारायणांनी दहा हजार रुपये देण्यासाठी आणले ते घ्या माताजी म्हणाल्या, तुम्ही आणि मी दोन नाही तुम्ही निस्वार्थी, त्यागी आहात म्हणूनच जनसामान्यात स्थान प्राप्त केले मलाही तुमच्यासारखेच राहू द्या
पत्नीचे बोलणे ऐकून त्यांना फार समाधान वाटले थैलीकडे इशारा करून म्हणाले, लक्ष्मीनारायण, उचला ती थैली त्याने नाईलाजाने उचलली दोघांनाही भक्तीभावाने नमस्कार करुन निघून गेला
प्रसन्नाचा विवाह निश्चित झाल्यामुळे सारदादेवी जामवाटीला आल्या
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – १२
माताजी माहेरी आल्याने सर्वांनाच खूप आनंद झाला त्यांच्या आईला विशेष आनंद झाला
विवाहाची आवश्यक तयारी करून सर्वजण बुधवारी कामारपुकुरला निघाले दुसऱ्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर प्रसन्नाचा विवाह कलापिनिशी झाला दोन दिवसानंतर कलापिनी माहेरी गेली प्रसन्न म्हणाला, दीदी, दक्षिणेश्वरी जाताना एक दिवस माझ्याकडे मुक्काम कर मी पोहोचवून देईल पण माझ्या समवेत काही स्त्रिया गंगा स्नानाला येणार आहेत येऊ देत प्रसन्नासह सर्व मंडळी निघाली वाटेत तारकेश्वरिचे मंदिर येताच, माताजी म्हणाल्या, मागच्या आजारपणात नवस बोलल्याप्रमाणे नख व केस अर्पण करायचेत तारकेश्वरीच्या मंदिरात जाऊन सोपस्कार झाल्यावर मंडळी निघाली एक दिवस प्रसन्नाकडे राहून मार्गस्थ झाले सर्वजण दक्षिणेश्वरी पोहोचले गंगा स्नानाला दुसऱ्या दिवशी जायचे ठरवून त्या गप्पागोष्टी करू लागल्या तेवढ्यात ह्रदयराम येऊन रागाने म्हणाला, मामी, ही मंडळी इथे कशाला आणली? इथे त्याची व्यवस्था कशी होईल? शामसुंदरीला हृदयरामांचे बोलणे आवडले नाही ती म्हणाली, चला ग! जाऊया आपण सारू, तू पण चल इथे कोणाच्या भरोशावर तुला सोडू?
सर्व जणींनी काली मातेला नमस्कार केला गंगा नदीत उभ्या राहून झालेला अपमान गिळला रामलालने त्यांना जाण्यासाठी नावेची व्यवस्था केली हृदयरामने केलेल्या अपमानाने माताजींना फार दुःख झाले त्या कालीमातेजवळ उभ्या राहून पुटपुटल्या माते, या मंडळींबरोबर अपमानीत होऊन जात आहे यापुढे तुझी इच्छाच मला इथे आणेल नाराज झालेली मंडळी निघून गेली
दुसऱ्या दिवशी हृदयराम रामकृष्णांना भेटायला आला त्यांचा म्लान चेहरा पाहून त्याने विचारले, मामा, काय झाले? असे उदास का दिसता?
ह्रदु, काल तू त्या सर्वांचा अपमान केल्याने मी रात्रभर तळमळत होतो तू मला काहीही बोलला असतास, तरी मी तुला क्षमा केली असती पण तू सारु व तिच्यासोबत आलेल्या मंडळीचा अपमान करायला नको होता ह्रुदु, सारदेचा अंतरात्मा रागवला तर, तुला कोणताही देव वाचवू शकणार नाही हृदयरामला बोलण्यातला आशय न समजल्यामुळे मान उडवून निघून गेला
हृदयराम फार पूर्वीपासूनच काली मातेच्या मंदिरात पुजारी होता त्याच्याच आग्रहाने रामकुमारने गदाधरला काली मातीच्या मंदिरात पुजारी बनवले होते रामकृष्णांची भक्ती, भावमय समाधी पाहून, त्यानं त्यांना श्रेष्ठत्व प्रदान केले होते पण सारदा देवीला तो अगदी सामान्य स्री समजून फटकून वागत असे बऱ्याच वेळा अपमानही करत होता सारदेतल्या देवत्वाची त्याला कल्पना नव्हती त्याचमुळे तो रामकृष्णाच्या बोलण्याची उपेक्षा करून आपल्या खोलीकडे निघाला त्याच वेळी विधाता त्याचं नशीब लिहित होता
सारदा देवी अपमानीत होऊन जयरामवाटीला गेल्यावर, काही दिवसांनी मंदिराच्या व्यवस्थापक मंडळाने अक्षम्य कारणावरून ह्रदयरामला पुजारी पदावरून बरखास्त केले त्याच्या जागी रामलालची पुजारी म्हणून नियुक्ती झाली रामलाल पगार वाढेल या कल्पनेने सुखावला थोडा अहंकारही निर्माण झाल्यामुळे धुंदीत वागू लागला
रामकृष्णांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले ते दिवसभर ध्यानावस्थेतच राहू लागले त्यामुळे जेवणाकडे लक्ष नसे प्रसादाचे ताट तसेच पडून राहत असे उपवासामुळे देहावर परिणाम झाला फक्त हाडांचा सापळा राहिला सारदादेवी असतांना त्या त्यांना गोष्टी सांगत जास्त वेळ समाधीस्थ राहू देत नसत त्यांच्या पसंतीचे पदार्थ करून आग्रहाने खाऊ घालत
कांही दिवसांनी शंभूबाबु दर्शनाला आले आणि रामकृष्णाची अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला म्हणाले, बाबा, माताजींना बोलावून घ्या त्याशिवाय तुमची प्रकृती सुधारणार नाही ते म्हणाले, घे कागद पेन मी सांगतो तसा मजकूर लिही आणि कामारपुकुरच्या लक्ष्मणच्या हस्ते पाठवून दे एवढेही श्रम त्यांना सहन झाले नाही डोळे मिटून स्वस्थ पडून राहिले नमस्कार करून शंभू बाबु निघून गेले
जयरामवाटीत आल्यापासून सारदा देवी फार बेचैन होत्या त्या विचार करत होत्या, हृदयरामने आपला बर्याच वेळा अपमान केला आपण दुर्लक्ष केलं पण माझ्या आईचा केलेला अपमान सहन होणे शक्यच नाही ठाकूरांनी त्याला समज द्यायला हवी होती पण कदाचित त्याला शिक्षा व्हावी म्हणून कालीमातेने माझ्यावर हा प्रसंग आणला असावा हे सर्व ठीक आहे पण ठाकुरांची काळजी कोण घेत असेल? त्यांची समाधी कोण उतरवत असेल? या विचाराने त्या अस्वस्थ होत तरी पण दक्षिणेश्वरला जाण्यासाठी त्यांचे मन तयार होत नसे
अशा मनःस्थितीत असतानाच एका घरी नामकरण संस्कार होता शामसुंदरीला निमंत्रण होतं पण वैधव्यात समारंभाला जाणे योग्य न वाटल्यामुळे, सारदा देवीला जायला सांगितले त्या छान तयारी करून गेल्या नामकरणाचा कार्यक्रम सुरू झाला बाया ओट्या भरू लागल्या सारदादेवीही ओटी भरायला गेली तर, एक बाई म्हणाली, सारु, तुला ओटी भरता येणार नाही ते शब्द तापल्या तेलाप्रमाणे त्यांच्या कानात गेले त्यांच्या कोमल हृदयावर जबरदस्त आघात झाला त्या तशाच घरी परत आल्या
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – १३
सारदादेवी अपमानित, दुःखी होऊन घरी आल्या त्यांना उदास पाहून आईने काय झालं म्हणून विचारल्यावर, त्यांचा बांध फुटला ओक्सीबोक्सी रडत म्हणाल्या, मी वांझोटी म्हणून ओटी भरू दिली नाही सारू, असे दुःखी होऊन कसे चालेल? बोलणाऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करायचे आणि पुढे जायचे याच लोकांनी ठाकूरांना वेडे ठरवून त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलत असत आज तेच लोक त्यांची पूजा करतात तू त्यांची पत्नी आहेस हे लक्षात ठेवून वागायचे रात्रीचे जेवण झाल्यावर दोघीही झोपेच्या स्वाधीन झाल्या
पहाटे सारदा देवीला स्वप्न पडले रामकृष्ण त्यांच्यासमोर उभे होते त्यांचा अस्थिपंजर देह पाहून, त्या गलबलल्या तोच कानावर शब्द आले, तुमच्या नसण्याने बघा माझी काय अवस्था झाली? मी ताबडतोब दक्षिणेश्वरला निघते बोलणे चालू असतानाच, बाहेरच्या दाराची कडी खणखणली यावेळी कोण असेल असा विचार करीतच दरवाजा उघडला काका आपण? होय! हे पत्र द्यायला आलोय पत्र घेऊन त्यांना घरात बोलावून चहा दूध वगैरे देऊन आदर सत्कार केला ते निघून गेले
त्यांनी दिलेल्या पत्रावर नजर फिरवली त्यातील मजकूर वाचून गालावर अश्रू वाहू लागले शामसुंदरीने विचारले काय झाले? ठाकूरांची तब्येत फारच खराब आहे मी त्वरित दक्षिणेश्वरीला निघते जायच्या आधी भानुआत्याकडे जाऊन सर्व हकीगत सांगीतली त्या म्हणाल्या, सारू, हिऱ्याची शोभा कोंदणातच असते जा बेटी जा तुझं खरं स्थान तेच आहे
सारदा देवी घरी आल्या देवीला व आईला नमस्कार केला डोलीतून दक्षिणेकडे रवाना झाल्या सारदादेवी एक वर्षानंतर दक्षिणेश्वरी आल्या होत्या प्रथम ठाकुरांच्या खोलीकडे धाव घेतली ते पहुडले होते त्यांचा देह फक्त हाडांचा सापळा उरला होता आपण इथे नसल्यामुळे त्यांची झालेली दशा पाहून, स्वतःला दोष देत म्हणाल्या, मी आले आता आठ दिवसात तुमची तब्येत सुधारेल त्यांनी करून आणलेली लापशी घेतल्यावर त्यांना जरा बरे वाटले नंतर त्यांना अंघोळ घालून दिली म्हणाल्या, काही दिवस माझ्याबरोबर रहायला तिकडेच चला चालेल त्यांना आवडीचे पदार्थ करून खायला घालणे, सतत त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणे, स्नान घालून देणे यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आठ दहा दिवसांनी ते आपल्या खोलीत गेले खरं म्हणजे त्या छोट्या खोलीत सारदादेवीची घुसमट होत होती परंतु पतीसाठी जेवण देणे, वारंवार त्यांच्याजवळ जाऊन बोलणे सोयीचे होत असल्यामुळे त्रास सहन करून त्या तिथेच राहत होत्या रामकृष्णांची शिष्या योगेंद्र मोहिनी त्यांच्या खोलीत राहायला आली तिचं स्वागत करून आपल्याजवळ ठेवून घेतले इतकेच नव्हे तर तिला मातेचे प्रेमही दिले
एका रात्री कोणाच्यातरी बासरीच्या स्वरांनी सारदा देवींना मंत्रमुग्ध केलं त्या भाव समाधीत लिन झाल्या त्या अवस्थेत त्या खळखळून हसू लागल्या ते पाहून योगेंद्र मोहिनी आत येऊन बसली स्वतःशीच म्हणाली, मी घरगृहस्थीत फसलेली आहे माझा स्पर्श माताजींना होणे अनुचित आहे असे वाटून तिने टाळ्या वाजवून कालीमातेचा जप करण्यास सुरुवात केली माताजींची समाधी उतरली
माताजी, बासरीचे सूरऽ? अग! मला भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले
एक दिवस दुपारच्या वेळी माताजी तांदुळ निवडत बसली असतांना, शेजारच्या पांडेच्या घरी ओटी भरण्याच्या समारंभाचे निमंत्रण आले तेवढ्यात रामकृष्ण आले, म्हणाले, मी इथे थांबतो तुम्ही जाऊन या तेवढाच तुमचा वेळ मजेत जाईल
काही नको वांझ म्हणून अपमानाचे दारूण
दुःख सहन करणे कठीण जाते त्यापेक्षा न गेलेले बरे रामकृष्ण म्हणाले, अहोऽ! ती सामान्य माणसं त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका अहो! उग्र तपश्चर्या करूनही प्राप्त होणार नाही असे पुत्र कन्या, माताजी माताजी म्हणून तुमच्याजवळ येतील लोकांना आज नाही पण तेव्हा समजेल टाकीचे घाव सोसल्याशिवाय पत्थराची मूर्ती बनत नाही त्यांचे बोलणे ऐकून त्या पांड्याकडे निघाल्या
दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढू लागली दुःख कष्टातून मुक्त होण्यासाठी स्त्री-पुरुषांची गर्दी होऊ लागली षोडशी पूजेनंतर सारदादेवी खऱ्या अर्थाने रामकृष्णांची अर्धांगिनी झाल्या होत्या माता होऊन भक्तांच्या सोयीकडे लक्ष देऊ लागल्या
साधना शिकण्यासाठी प्रेमानंद आणि राखाल आणि असेच काही शिष्य रामकृष्णाकडे आले होते अधिक जेवण झालं की साधनेत बाधा येते म्हणून, ठराविकच चपात्या खाण्याची रामकृष्णांची परवानगी होती रामकृष्णाची कडक शिस्त आणि माताजींच्या मायेचे आच्छादन घेऊन शिष्य वावरत होते एकदा भाजी चांगली झाली म्हणून शिष्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या चपाती पेक्षा जास्त खाल्ल्या, म्हणून रामकृष्ण नाराज झाले
माताजी रामकृष्णांचे ताट घेऊन गेल्या जेवता जेवता रामकृष्णांनी विचारलं, आज बाळूला आणि राखालला जास्त चपात्या का वाढल्या? त्यांना साधना करायची आहे त्यांना मनावर ताबा करायला शिकायचे आहे त्या म्हणाला, ती मुलं घरदार, आई वडील सोडून इथे आले त्यांच्या भोजनावर टीका झालेली मला आवडणार नाही मी स्वतः त्यांच्या भविष्याची काळजी घेईन आपण चिंता करू नये
संकटातून, दुःखातून रामकृष्ण लोकांना मुक्त करतात असा त्यांचा लौकिक पसरल्यामुळे बरीच मंडळी दर्शनाला येऊ लागली
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – १४
एक दिवस एक स्त्री रामकृष्णांना नमस्कार करुन म्हणाली, महाराज, माझा नवरा वेडा झालाय काही औषध पाणी, तंत्रमंत्र करून त्याला दुरुस्त कराल या अपेक्षेने इथे आले रामकृष्णांनी क्षणभर विचार केला सारदादेवीच्या ईश्वरी शक्तीचे प्रकटीकरण होण्याच्या दृष्टीने, त्या बाईला सारदा देवीच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाले, तिथे एक बाई आहे त्यांच्याजवळ दैवी शक्ति आहे त्या तुम्हाला या संकटातून मुक्त करतील माझ्यापेक्षा त्यांचे सामर्थ्य अधिक आहे त्या बाईला काहीच माहित नव्हते त्यांना नमस्कार करून ती बाई माताजीकडे आली माताजींना सर्व हकीगत सांगितल्यावर, माताजींनी ओळखले, ही ठाकुरांची खेळी आहे त्या म्हणाल्या, बाई, मला यातलं काहीच माहित नाही त्यांनाच सगळी माहिती आहे तुम्ही त्यांच्याकडेच जा बावरलेली स्त्री रामकृष्णांकडे गेली का आलात? त्यांनीच तुमच्याकडे पाठवले ती म्हणाली, महाराज, तुम्हा दोघांचा खेळ होतो माझा जीव मात्र दुःखाने होरपळतोय! बाई आता तसे होणार नाही जाऽऽ
ती स्री पुन्हा माताजी समोर आली माताजींनी अंतर्ज्ञानाने सगळे जाणले त्यांनी तिला संकटविमोचन मार्ग सांगून, एक बेलपत्र दिले ती स्त्री नमस्कार करून निघून गेली
एका दुपारी रणरणत्या उन्हात ठाकुरांसाठी जेवण्याचे ताट घेऊन जात असताना, त्यांचा लालबुंद झालेला चेहरा पाहून, एक भक्त स्री म्हणाली, माताजी, थाळी घेऊन मी जाते तुम्ही आराम करा त्या स्त्रीची विनंती त्यांना डावलता आली नाही ती स्त्री ठाकुरांसमोर ताट ठेवून निघून गेली
थोड्यावेळाने माताजी त्यांच्या खोलीत आल्या तर ताट तसेच पाहून, जेवणाची विनंती केली पण ते जागचे हलले नाही अश्रू भरल्या नेत्रांनी पुन्हा पुन्हा विनंती केल्यावर, ते म्हणाले, तुम्ही इथं असल्याशिवाय आम्ही जेऊ शकत नाही पुन्हा कोणाच्या हाती ताट पाठवू नका
पत्नीच्या विशाल मनाचा परिचय झाल्याने ते प्रसन्न मनाने जेऊ लागले
एकदा सुरेंद्रनाथ नावाच्या भक्ताने रामकृष्णांना आग्रह करून कलकत्त्याला आपल्या घरी नेले त्यांच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली अशा आनंदोत्सव प्रसंगी कीर्तन व्हावे असे वाटून सुरेंद्रनाथने कीर्तनकार शोधला पण न मिळाल्यामुळे त्यांना वाईट वाटले तेवढ्यात कोणीतरी सुचवले, शेजारच्या विश्वनाथ दत्तांचा मुलगा नरेंद्र उत्तम गातो त्यालाच बोलवा खरंच की माझ्या लक्षातच आलं नाही त्यांनी विश्वनाथांच्या घरी जाऊन, त्यांना नरेंद्रला पाठवण्याची विनंती केली तो १८ वर्षाचा तरुण नरेंद्र रामकृष्णांना खूपच आवडला त्याचे आपले काहीतरी गूढ नाते असल्याची रामकृष्णांना जाणीव झाली ते त्यांच्याकडे क्षणभर पाहतच राहिले
सुरेंद्रनाथ म्हणाले, नरेंद्र, हे रामकृष्ण परमहंस त्यांना आग्रह करून आणले आज कीर्तन व्हावसं वाटत होतं परंतु नाही जमलं आज तूच भजन गावस अशी इच्छा आहे ठीक आहे सर्व ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून नरेंद्रने गायला सुरुवात केली त्यांनी मधुर आवाजात गायलेली भजने रामकृष्णांना फार आवडली त्यांनी नरेंद्रला दक्षिणेश्वरी येण्याचे निमंत्रण दिले त्यानंतर अध्यात्मावर चर्चा झाली नरेंद्रच्या मनात काही प्रश्न आले पण विचारले नाही सर्वांच्या आग्रहाने दोन दिवस राहून रामकृष्ण दक्षिणेश्वरी परतले
रामलालचा विवाह निश्चित झाला रामकृष्णांना जबाबदारी सोडून कामारपुकुरला जाणं शक्य नसल्यामुळे त्यांनी माताजींना जायला सांगितले शुभमुहूर्तावर रामलाल विवाहबद्ध झाला जावेच्या आग्रहास्तव माताजी सात-आठ दिवस राहिल्या एके दिवशी दुपारी काही बायका त्यांना भेटायला आल्या त्यातील एक दोघी म्हणाल्या गंगास्नान करावेसे खूप वाटते पण दोन दिवस कुठे राहावे? चला माझ्याबरोबर दक्षिणेश्वरला ऐकून त्यांना आनंद झाला
जाऊ रामेश्वरी, लक्ष्मी, चार-पाच शेजारच्या बायकांना घेऊन सारदादेवी निघाल्या यापूर्वी सारदादेवी पायीच दक्षिणेश्वरला जात असे परंतु आजारा पासून तितकं चालवल्या जात नव्हते, म्हणून त्या डोलीत जात परंतु या बाया पायी चालत जात असताना आपण डोलीतून जाणे योग्य दिसणार नाही म्हणून त्यांच्या बरोबर पायी जायचं ठरवलं
दोन दिवसांनी सर्वजणी कामारपुकुरहुन निघाल्या चालता चालता सारदादेवी इतक्या थकल्या की त्यांच्याने एक पाऊल टाकण्याचीही हिंमत राहिली नाही तरी कशातरी फरपटत चालत होत्या त्यांच्यामुळे बायांना थांबावे लागे त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास सांगितले टेलोभोलो भागात शारदा देवी एकट्याच होत्या कालीमातेवर भरोसा ठेवून त्या कशा तरी चालत होत्या तेवढ्यात एक दांडगा काळाकुट्ट माणूस समोर आलेला पाहून त्या भयभित झाल्या तो चोर असल्याचे त्यांनी जाणले तेवढ्यात त्या माणसाचं लक्ष माताजींच्या चेहऱ्यावर जाताच, त्याच्यात एकदम परिवर्तन झाले तो अत्यंत स्निग्ध आवाजात म्हणाला, घाबरू नका इतक्यात माझी बायको येईल खरोखर एक स्त्री येताना पाहून, त्यांचे मन निर्भय झाले त्या म्हणाल्या, बाबा, माझ्याबरोबरची मंडळी पुढे गेलीत मला त्यांच्याजवळ पोहोचवून द्याल? ती स्री जवळ येताच, माताजींनी तीचा हात हाती घेत आर्जवी स्वरात म्हणाल्या, माॅं, मी तुझी लेक सारदा दक्षिणेश्वराला काली मातीच्या मंदिरात तुमचे जावई पुजारी आहे मला तिथे पोहोचवून द्याल तर फार उपकार होतील मी मोठ्या संकटात सापडले होते पण कालीमातेच्या कृपेने तुम्ही दोघे आल्यामुळे मला आता फिकीर नाही
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – १५
शारदा देवींनी त्या दोघांशी माता पित्याचं नातं जोडल्याने त्यांची कठोर हृदये कोमलतेत परिवर्तित झाली खरेच ही आपली मुलगी असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली त्या खूप थकल्याचे लक्षात आल्यावर, ती रात्र त्यांच्याकडे राहण्याचा आग्रह केला
दुसऱ्या दिवशी सकाळी तारकेश्वराला पोहोचले ती स्री पतीला म्हणाली, आम्ही तारकेश्वराची पूजा करेपर्यंत, तुम्ही या आपल्या लेकीला भेट देण्यासाठी काही वस्तू बाजारातून घेऊन या ठीक आहे असे म्हणून तो माणूस निघून गेला
सारदादेवी तारकेश्वराची पूजा करत असतानाच, लक्ष्मी,शिवराम वगैरे मंडळी त्यांना शोधत तिथे पोहोचले सारदादेवी सुखरूप असल्याचे पाहून त्यांना आनंद झाला सारदादेवीने त्या स्त्रीची सर्वांना ओळख करून दिली दोघांनाही दक्षिणेश्वराला येण्याचे निमंत्रण दिले तेवढ्यात तो मनुष्यही आला त्या दोघांचा निरोप घेताना सारदा देवीच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून, दोघांनीही सारदेला प्रेमाने जवळ घेतले त्यात जात-पात, उच्च-निचता गळून पडली
दक्षिणेश्वरी आल्यावर सारदा देवींनी पतीला सगळी हकिकत सांगितली रामकृष्ण म्हणाले, ही मातेची कृपा आहे परमेश्वर भक्ताच्या साह्याला नेहमीच धावून जातो
आलेल्या मंडळींनी गंगास्नान करून, कालीमातेचे दर्शन घेतले आणि निघून गेले
नरेंद्रनी कलकत्ता विद्यापीठाची एम ए ची परीक्षा उत्तम रित्या दिली नरेंद्र देखणे, उंचपुरे असल्यामुळे, वधुपित्यांची त्यांच्यावर नजर पडली कलकत्त्यातील एका श्रीमंत गृहस्थांनी आपल्या कन्येच्या विवाहासाठी १५,००० रुपये देण्याचे कबूल करून प्रस्ताव पाठवला विश्वनाथ दत्तांनी व माता भुवनेश्वरीनी नरेंद्रंना विवाहासाठी परोपरीने समजावले पण ब्रह्मचारी राहण्याचा आपला ठाम निश्चय सांगितल्यावर त्यांचा नाईलाज झाला अखेर सुरेंद्र नाथांनी त्यांच्या डॉक्टर असलेला चुलत भाऊ रामचंद्र याला समजावण्यास सांगितले त्यांनी खूप समजावले पण नरेंद्र आपल्या निर्णयावर कायम होते रामचंद्र डॉक्टर असूनही ब्राह्म समाजाचे काम करीत होते नरेंद्रचा नकार केवळ धर्म भावनेच्या प्रेरणेने असल्याचे जाणून ते म्हणाले, नरेंद्र, तुला धर्म लाभ घेण्याची इच्छा असेल तर, तू दक्षिणेश्वराला जाऊन रामकृष्णांची भेट घे ते तुला योग्य मार्ग दाखवतील
नरेंद्रांनी विवाहास नकार दिल्यामुळे, घरातील वातावरण तंग होते आपण यावेळी घरी नसलो की, हे सर्व विसरून जातील, असा विचार करून त्यांनी दक्षिणेश्वरला जाण्याचे ठरवले दोन-चार वर्ग बंधू समवेत मातेला सांगून, नरेंद्र दक्षिणेश्वरी पोहचले
सर्व रामकृष्णांच्या खोलीत प्रवेशले सर्वजण आसनस्थ झाल्यावर, रामकृष्णांच्या इच्छेनुसार नरेंद्राने ब्राम्हो समाजाचे एक भजन म्हटले भजन संपल्यावर रामकृष्णाने त्यांना पडवीत नेले व काही बोलू लागले माताजींना रामकृष्णांनी बोलावणे धाडले माताजी आल्यावर, त्यांनी नरेंद्रकडे पाहिले हा तेजस्वी तरुण आपला पुत्र असल्याचे त्यांचे अंतर्मन सांगू लागले रामकृष्ण म्हणाले, यांना काही खायला द्या हे सर्व जेवतीलच
नरेंद्र म्हणाले, तोवर आम्ही देवदर्शन करून येतो ते काली मातेच्या दर्शनास गेले अत्यंत श्रद्धेने नमस्कार केला तिथेच नरेंद्रांना रामकृष्णांबद्दल खरं ज्ञान प्राप्त झाले ते परम पवित्र महान त्यागी असल्याचे जाणवले
जेवणाचा सांगावा आला ते प्रवेशले तेव्हा माताजी समोरच होत्या या तेजस्वी तरुणाला पाहून ठाकुरांचा उत्तराधिकारी हाच होईल असं त्यांचं मन सांगू लागले जेवण झाल्यावर ते रामकृष्णांच्या खोलीत आले तेव्हा, रामकृष्ण ध्यानस्थ होते नरेंद्रांना हेच आपले गुरु असल्याची जाणीव झाली तसा मनाने कौलही दिला पुढे जाऊन आसनस्थ झाले
एके दिवशी सकाळी सारदांना वनात भेटलेले बागडी दाम्पत्य आले माताजींनी त्यांचे स्वागत केले कालीमातेचे दर्शन घडवून रामकृष्णांच्या खोलीत आणले दोघांनी त्यांना नमस्कार केलेला पाहून, माताजी म्हणाल्या, बाबा हे तुमचे जावई आहेत असू द्या जावयाला नमस्कार केल्याने पूण्यच मिळते त्यांनी आणलेल्या बहुमूल्य वस्तू सारदा देवीला भेट केल्या त्यांच्या मुखावरचा संभ्रम पाहून ती बागडी स्री म्हणाली, तुला आम्ही लेक मानलं मग लेकीकडे खाली हात कसे जाणार? घेऽऽ जेवण झाल्यावर, पती-पत्नींनी निरोप घेतला
एके दिवशी माताजी, योगेंद्र मोहिनी व गौरी गप्पागोष्टी करीत बसले असताना, गौरीने विचारले, माताजी, ठाकूरांशी तुमचा फार कमी संपर्क येतो दर्शन दुर्लभ असते तरीही तुम्हा दोघात इतकं गाढ प्रेम कसं? एकदा तुमचं डोकं दुखत असल्यामुळे तुम्ही आराम करत होत्या, त्याच वेळी ते रामलालला म्हणाले, तुझ्या मामीला मस्तक शूळाचा त्रास होतो का पाहून ये बरे
माताजी हसून म्हणाल्या, गौरी, ठाकूर आणि मी एकच आहे आमच्यात स्त्री पुरुष भेद असला तरीही आम्ही अद्वैत आहोत दोघीही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहिल्या
एक दिवस गौरीने विचारले, माताजी, एकाग्रता कशी साधायची? नेहमी नामस्मरण करावं त्यात खंड पडू देऊ नये त्यामुळे इतर विचार मनाला स्पर्श करत नाही एकाग्रतेने नामस्मरण करत राहिले की मन त्यातच गुंतून राहते
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख








