आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

सारदामाता चरित्र भाग २, (६ ते १०)
रामचंद्र मुखर्जी आणि शामसुंदरीच्या पोटी जयरामवाटी या गावी सारदाचा जन्म झाला. जन्मा पासूनच सारदाचे वेगळेपण दिसून येत होते. कधी जास्त रडणे नाही, की आकांडतांडव नाही. लाडा कौतुकात सारदा सहा वर्षाची झाली. आणि तिच्या विवाहाचा प्रस्ताव कामारपुकुरच्या रामेश्वर मुखर्जींचा …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! सारदामाता !!!
भाग – ६.
कामारपुकुरची हवा, स्वादिष्ट जेवण आणि मुक्त वातावरणामुळे रामकृष्णांचे व्याधीने खंगलेले शरीर पुष्ट दिसू लागले. ते उत्साही बनले. एका रात्री काली माता त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाली, दक्षिणेश्वरला चला. मातेने लेकराची किती वाट पहावी? पूजा सुरू करा. त्यांनी कालीमातेला नमस्कार केला. सकाळी मातेजवळ येऊन म्हणाले, माॅं, आपल्याला दक्षिणेश्वरी निघायचे आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळीच रामकृष्ण मातेसह निघाले त्यांच्या मागून पिशव्या घेऊन निघालेल्या हृदयराम ने विचारले, मामी येताय ना? सारदेने मानेनेच नकार दिला. पतीने दक्षिणेश्वराला जात असल्याची साधी कल्पनाही दिली नाही. सोबत जाणे तर दूरच. सारदेने रामेश्वरीच्या हाताखाली स्वयंपाक शिकून घेतला.
आठ दिवसांनी सारदा माहेरी जयरामवाटीला आली. बऱ्याच कालावधीनंतर आल्यामुळे सर्वांनी तिला घेरले. एक दोन दिवसानंतर काही मैत्रिणी तिला भेटायला आल्या. त्या आपापल्या पतींचे रसभरीत वर्णन करू लागल्या. एकीने सारदेला तिच्या पती बद्दल विचारले. बिचारी काय सांगणार? ना पतीचा रोमंचकारी स्पर्श, ना लज्जा फुलवणारे बोलणं. ती काहीच बोलली नाही. त्यातील एक जण म्हणाली, हिचा पती संन्यासी झाला. त्याच्याकडे पाहून समाधान मानल्याशिवाय काय आहे हिच्यापाशी? त्यांचे बोलणे एकूण सारदा नाराज झाली. पण बोलली काही नाही. काही वेळाने त्या निघून गेल्या.
संध्याकाळी काही बायका आल्या. गप्पा गोष्टींना उत आला. नंतर सारदाबद्दल चौकशी केली. सवयीनुसार कुजकं बोलून निघून गेल्या.
त्या स्त्रियांनी आपल्या पतीचा केलेला उपहास सारदेला सहन झाला नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. ती स्वतःशीच बोलू लागली… या स्त्रिया वाटेल ते बोलतात. ठाकूर संन्याशी असते तर, माझ्याशी इतक्या प्रेमाने, आत्मीयतेने बोलले असते का? त्यांनी नसेल माझ्या देहाला स्पर्श केला, पण ज्ञान देऊन मनाला स्पर्श केला ना? मी त्यांच्या समवेत सावलीसारखी होते. पण इतक्या दिवसात त्यांनी बोलावले नाही, त्यामुळे लोकांना वाटेल तसे बोलण्याची संधी मिळते. मला ऐकून घ्यावे लागते. कारण त्यांना उत्तर द्यायला शब्दच नाही. तेवढ्यात मातेच्या हाकेने तिची तंद्री तुटली. श्यामादेवीला लेकीचं दुःख दिसत होतं. तिने लेकीला जवळ घेऊन विचारले, सारू, तू सासरहुन आल्यापासून पूर्वीसारखी मनमोकळी हसत, बोलत नाही. तिथे काही घडलं का?
नाही माॅं, तिथं काही घडलं नाही, पण इथे आल्यापासून या बाया माझ्याकडे पाहून कुजबूजतात. त्यांच्याविषयी वाटेल ते बोलतात. मला वाईट वाटते. उद्यापासून मी भानू आत्याकडेच राहायला जाते. जा.. तुझं मन हलकं होईल.
दुसऱ्या दिवशी सारू भानू आत्याकडे गेली. दोघीही बसल्यावर, आत्याने विचारले, सारू, तू अशी निस्तेज का? तिने सर्व हकीगत सांगितल्यावर, भानू आत्या म्हणाली, सारू, रामकृष्ण कालीमातेचे उपासक आहेत. त्यांच्या भक्तीत ते लीन असल्यामुळे ते गातात, नाचतात. लोकांना खरं कारण माहीत नसल्यामुळे काहीतरी बोलतात. सारू, डोळे आणि कानामध्ये चार बोटाचं अंतर आहे.
सारु, तू त्यांच्या बोलावण्याची वाट न बघता सरळ दक्षिणेश्वरी जावे. सारू, सागर नदीपाशी येत नाही. नदीला जाऊन सामाविष्ट व्हावे लागते. तू मुक्त मनाने दक्षिणेश्वरी जा. ती घरी आली. दोन दिवस तिने विचारात घालवले आणि दक्षिणेश्वरी जाण्याचा निर्णय पक्का केला. सकाळी आपला निर्णय मातेला सांगितल्यावर तिलाही आनंद झाला. श्यामादेवीच्या मनावरचे दडपण दूर झालं.
दुसऱ्या दिवशी तयारी करून पित्यासोबत सारदा दक्षिणेश्वरला निघाली. जयरामवाटी पासून दक्षिणेश्वर खूप लांब. इतक्या दूरचा प्रवास… सारुला चालण्याचे श्रम सहन झाले नाही. मध्ये तिला ताप चढला. तिची अवस्था पाहून वाटेतल्या धर्मशाळेत कन्येची व्यवस्था केली. तापामुळे सारुच्या अंगाची लाहीलाही होत होती. हातपाय, डोके दुखत होते. घशाला कोरड पडल्यामुळे तिला पाणी प्यावेसे वाटत होते. रामबाबू गाढ झोपल्यामुळे त्यांना आवाज ऐकू आला नाही. तेवढ्यात कोणीतरी तिला पाणी पाजले. तिच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवू लागले. त्या शितल स्पर्शाने शारदेला बरे वाटले. तिने डोळे उघडून पाहिले तर, समोर काळी सावळी युवती होती. तिच्या डोळ्यातल्या तेजाने सारु दिपून गेली. तू.. तू.. कोण आहेस? कुठून आलीस? दक्षिणेश्वराहून….
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख.
!!! सारदामाता !!!
भाग -७.
त्या काळ्या सावळ्या मुलीने दक्षिणेश्वर हून आल्याचे सांगितल्यावर, शारदा म्हणाली, मला पण तिकडेच जायचे आहे. त्यांना पाहायचे आहे, त्यांची सेवा करायची. पण… पण या तापाने सारा खेळखंडोबा केला. त्यांचे दर्शनही होते की नाही….
तू निराश होऊ नकोस. केवळ तुझ्यासाठी मी त्याला अडवून ठेवले आहे. पण तुम्ही आहात कोण? तुझी बहीण समज. खूप थकलेली दिसतेस. झोप आता. सारू झोपली. मध्यरात्रीनंतर तिचा ताप उतरला. सकाळी उठून म्हणाली, दादा, मला खूप बरं वाटते. आता आपण निघूया.. थोड्या वेळाने सर्व आवरून वाटेला लागले. काही अंतरावर त्यांना पालखी दिसली. रामबाबू ने तिला पालखीत बसवले. मार्गात पुन्हा तिला ताप आला. पण तिने सांगितले नाही. ते गंगा नदी जवळ आले. स्नान करून नावेतून पैलतीरी उतरले. आपण येत असल्याचा निरोप रामबाबू ने जावयाला पाठवला होता. जवळ येताच ठाकूरांचे शब्द तिच्या कानावर पडले. ह्रुदू, मुहूर्त चांगला आहे ना रे? प्रथमच ती दक्षिणेश्वराला येत आहे. पतीच्या शब्दातील कळकळ,, आत्मीयता, प्रेम तिला जाणवलं. तिला समाधान वाटले.
ठाकुरांनी सासर्याचे योग्य स्वागत करून नमस्कार केला. बसल्यावर ठाकूरांनी विचारले, प्रवास कसा झाला? काही त्रास? रामबाबू म्हणाले, त्रास फारसा नाही झाला. पण हिला ताप आल्यामुळे खोळंबा झाला.
रात्र बरीच झाल्यामुळे खाण्यापिण्याची काही व्यवस्था करण्यासाठी हृदयराम व रामबाबू निघून गेले. रामकृष्ण म्हणाले, माझा उजवा हात मयूर बाबू गेल्यामुळे माझी पंचायत झाली. त्यांच्यामुळेच मी इथे राहिलो. तोच माझं सर्व करीत होता. पतीचे आत्मियतेचे बोलणे ऐकून, जनप्रवादाने खिन्न झालेले सारदेचे मन आनंदित झाले. ती त्यांच्याकडे पाहतच राहिली. जणू त्यांची मूर्ती हृदयात कोरून ठेवत होती. त्यांनी तिच्या झोपेची व्यवस्था करून दिली.
नेहमीच्या सवयीप्रमाणे सारुला पहाटेच जाग आली. देवाला नमस्कार करून, ती पती समोर आली. म्हणाले, झोप चांगली लागली ना? थोड्या विश्रांती नंतर बर वाटेल. त्यांच्या मृदू बोलण्याने अंगावर मोरपिसे फिरल्यागत वाटले. स्वतःशीच पुटपुटली… ठाकूर तर देवासारखे शुद्ध आहेत. मी उगीच शंकीत, खिन्न झाले होते. मी आता त्यांची आणि सासूची सेवा करणार.
पतीने ठरवून दिल्याप्रमाणे, सारदा देवीचा दिनक्रम ठरून गेला. पहाटे सासू बरोबर जाऊन गंगा स्नान करून, काली मातीची पूजा करणे, प्रार्थनेनंतर सासूला स्वयंपाकात मदत करणे, आणि उरलेला वेळ पतीसोबत घालू लागली. त्यांच्या सान्निध्याने तिची प्रकृती सुधारली.
दोघे पती-पत्नी बोलत होते. तिचे प्रगल्भ विचार ऐकून जगन्मातेनेच तिला आपल्यापाशी पाठवले असावं, अशा विचारात असताना, त्यांच्या कानी शब्द आले, ती केवळ तुझी पत्नीच नाही तर, सखी आहे. तुम्ही दोघं जगत कल्याणाचे काम करणारे प्रेषित आहात. आवाज सारदा देवींनीही ऐकला. पण आजूबाजूला कोणीच दिसले नाही.
रात्री पतीचा बिछाना तयार करून त्यांना झोपायला सांगितले. ती त्यांचे पाय चेपू लागली. ठाकूरांनी सहज स्वरात विचारले, “जीवनाची पार्श्वभूमी कोणती असावी? त्यागाची. स्पष्ट कराल? ती बोलू लागली…. फुल दुसऱ्यांना सुगंध देण्यासाठी फुलतात. मुलांनी मारलेल्या दगडाचा आघात सोसून आम्रवृक्ष गोड फळ देतात. आई मुलांना जन्म देऊन, त्यांच्यासाठी खस्ता खाते. त्यांच्या कल्याणाकरता मृत्यूलाही जवळ करते. म्हणून जीवन त्यागाच्या पार्श्वभूमीवर उभं आहे. तिचे विचार ऐकून रामकृष्ण समाधान पावले.
एका दुपारी रामकृष्ण भोजन करीत असताना, म्हणाले, मी न बोलावताच, तुम्ही इथे आलात. तुमचा इरादा मला संसारात ओढण्याचा आहे का? नाही.. नाही… मी तुमच्या इष्ट प्राप्तीत तुम्हाला मदत करण्यासाठी आले.
विद्याध्ययन न केलेल्या १९- २० वर्षांच्या तरुणीने दिलेल्या उत्तराने त्यांना तिच्यात अमानवित्व, असामान्यत्व प्रकर्षाने जाणवले.
एके रात्री त्यांचे पाय चुरत असताना, सारदेने विचारले, तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून तुमच्या सानिध्यात राहते. तुम्हाला आवडते की नाही याबद्दल साशंक आहे. माझ्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कोणता आहे? क्षणभर थांबून म्हणाले, जन्मदात्री मातेने मला जन्म दिला. तिच स्वयंपाक करते. तीच मला खाऊ पिऊ घालते. आणि काळजी करते. आता यावेळी सुद्धा अत्यंत प्रेमाने माझे पाय दाबत आहे. तुम्ही त्याच आनंदमयी आहात. तिच्याच रूपात तुम्हाला बघतो. सर्व स्त्रियांना मी माता स्वरूपिनी मानतो. सारदादेवीचे मन भरून आले. तुम्हा दोघांचे मिलन शिवशक्तीचे आहे ही दैवी वाणी पुन्हा कानात निनादली.
आतापर्यंतचा परिपाठ असा होता की, पतीची वामकुक्षी होईपर्यंत थांबून ती तिच्या खोलीत येत असे. एका दुपारी भोजन झाल्यावर रामकृष्ण म्हणाले, तुम्ही इथे माझ्याजवळ झोपलात तर बर वाटेल. सारु चमकली. नंतर स्वतःवर ताबा मिळवून, अतिशय निर्विकल्पपणे म्हणाली, ठीक आहे. इथे एक बाज जोडायला सांगा…..
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख.
!!! सारदामाता !!!
भाग – ८.
रात्रीची आवरावर झाल्यावर, सारदा म्हणाली, सासुबाई, आज तिकडे झोपायची ठाकूरांची आज्ञा झाली आहे. चंद्रमणीच्या हृदयात आशेचा किरण उमटला, म्हणाली जेवण तिकडेच घेऊन जा. बरं! तिने सासूला ताट वाढून दिले. व डबा घेऊन रामकृष्णकडे आली. त्यांना वाढुन दिले. जेवता जेवता रामकृष्णांनी विचारले, तुम्ही माझ्याबरोबर का नाही जेवत? देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय भक्त काही खातो का? म्हणजे मी तुमचा देव आहे. असं म्हणून खळखळून हसले. तिने विचारले, माझे काही चुकले का? नाही… नाही.. तुम्ही मला देव म्हणालात म्हणून हसलो.
आपल्याकडे पतीला देव मानतातच. पण तुम्ही तर माझे गुरु. मला घडविणारे शिल्पकारही आहात. या अशिक्षित पत्नीच्या बोलण्याने ते फार प्रभावित झाले. कालीमातेने माझ्यावर सोपवलेले कार्य माझ्यानंतर ही उत्तम प्रकारे सुरू ठेवेल. शिष्य परंपरा वाढवेल, याबद्दल त्यांची खात्री पटली. जेवण आटोपल्यावर थोडा वेळ अध्यात्मावर चर्चा झाली. दोघेही निद्रेच्या अधीन झाले.
मध्यरात्री रामकृष्णांना जाग आली. जवळच पत्नी शांत झोपली होती. अंधुक प्रकाशात ती अतिशय सुंदर, मोहक दिसत होती. ते पत्नीकडे पाहत असताना, कानात शब्द निनादले, स्त्री ही भोग्य आहे. आणि ही तर तुझी पत्नी आहे. तिच्या स्पर्शाने तुझ्या देहात अनुभूत लहर निर्माण होईल. शरीर सुख म्हणजे काय कळेल. तिला जवळ घे. शब्द थांबले. आणि त्यांचे हात पुढे सरकले, तोच पुन्हा आवाज ऐकू आला….
काय करतोस? तुला देह बंधनात अडकायचे का? प्रत्येक स्त्री तुला मातेच्या रूपात दिसते असं म्हणतोस, याचा अर्थ मुखात एक आणि मनात एक असा आहे का?
त्यांनी चटकन हात मागे घेतला. त्यांना आपल्या गुरु तोतापुरींचे शब्द आठवले. पती-पत्नी एकत्र राहूनही ज्याचा त्याग, वैराग्य, विवेक, ज्ञान अक्षुण्ण राहतो तोच खऱ्या अर्थाने ब्रह्मनिष्ठ! जो स्त्री-पुरुषात भेद करतो तो साधक असूनही ब्रह्मज्ञानापासून दूर असतो.
क्षणभरात रामकृष्ण समाधिस्त झाले. सकाळी सारदेला जाग आल्यावर, ध्यानस्थ पाहून, हळूच स्नानासाठी बाहेर निघून गेली. सारदा देवी स्वयंपाक घरात प्रवेशली. चंद्रमणीने निरखून तिच्याकडे पाहिले. पण नेहमीच विलसणार स्मित पाहून, रात्र निर्विकारपणे गेली हे तिने आपल्या अनुभवी नजरेने जाणले.
दुपारचे घेऊन घेऊन शारदा देवी पतीच्या खोलीत प्रवेशली. जेवतां जेवतां रामकृष्णांनी विचारले, रात्री स्वस्थ झोप लागली का? अगदी शांत आणि गाढ. जाग आल्यावर पाहिलं तर तुम्ही समाधिस्त होता. मग मी चटकन निघून गेले.
आपली पत्नीही या परीक्षेत यशस्वी झाल्याचे पाहून, त्यांना समाधान वाटले. तिच्यात जर वैषयिक भावना निर्माण झाली असती तर, माझा निभाव लागला नसता. खरोखर आपली पत्नी अतिशय सात्विक, नीतिसिद्ध, अतिमानवी आहे. या अग्नी परीक्षेत दोघेही भाजलो नाही ही माताची कृपाच!
एके दिवशी सकाळीच ह्रदयराम आलेला पाहून, चंद्रमणीने विचारले, एवढ्या सकाळी कसा काय आलास? का ? आजीला भेटायला येऊ नको का? सरळ सांग. अग! आजी, आज मंदिरात काम नसल्यामुळे तुला व मामीला भेटायला आलोय. मामी कुठे आहे? पूजा करतेय. इथे आल्यापासून ती मामामय झाल्यामुळे, तिची भेटच होत नाही. तेवढ्यात पूजा आटोपून सारदा देवी बाहेर आल्या. सासूला व ह्रदयरामला प्रसाद दिला. सासूला नमस्कार केल्यावर हृदयरामांना करू लागताच, तो मागे सरकून म्हणाला, मामी हे काय करताय? अरे तू माझ्यापेक्षा मोठा असून पूजारीही आहेस. म्हणून मी नमस्कार केला. बऱ्याच आहात कीऽऽ!
तिघेहि हसू लागले. हृदयराम म्हणाला, मामी, गजाई मामाला लोक बाबा म्हणतात. तुम्ही त्यांना बाबा म्हणू शकाल? हो तर! ते माझे बाबा असून सर्वस्व आहे. परमपूज्य आहेत. त्यांच्यात मला ईश्वराचे दर्शन घडते. ह्रदयराम तिच्याकडे पाहतच राहिला.
त्या अग्नी परीक्षेत दोघे यशस्वी झाल्यावर, रामकृष्णांना वाटले, आपल्या पत्नीत देवत्व असून, ती ज्ञानदायीनी शारदा आहे. तिची पूजा केली पाहिजे. भूतकाळात झालेल्या पापाचा नाश करणाऱ्या ‘फलहारिणी’ देवीची ज्येष्ठ अमावस्याला पूजा करतात. त्याच दिवशी पत्नीची पूजा करण्याचे त्यांनी ठरवलं. त्यांनी सारदा देवीला सांगितले. तिने निर्विकारपणे ऐकून घेतले. तिचे मौन हीच संमती ग्राह्य धरून, हृदयरामला त्याबाबत काही सूचना केल्या.
ज्येष्ठअमावसेचा दिवस उगवला. रामकृष्णांची खोली ह्रदयरामने स्वच्छ करून घेतली. कोणालाही कळणार नाही याची व्यवस्था केली. ह्रदयरामला रात्री काली मातेची खास पूजा करायची असल्यामुळे, तो थांबू शकणार नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी दिनु पुजार्याला बोलावून त्याने सूचना दिल्या. दिनुने पूजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची जुळवाजुळव केली. सारदा देवीसाठी पाट मांडला. सर्व तयारी केल्यावर दिनू निघून गेला.
पतीच्या सूचनेनुसार, सारदा देवी त्या खोलीत प्रवेशल्या. दरवाजा बंद केला. सारदादेवीने लाल किनारीची पिवळी साडी परिधान केली होती. पदर अंगभर लपेटला होता. कपाळावर लाल चटूक-कुंकू व भागात सिंदूर. पाठीवर ओलसर मुक्त केससंभार होता. त्यांचा चेहरा एका वेगळ्या तेजाने तळपत होता.
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख.
!!! सारदामाता !!!
भाग – ९.
पतीच्या इशाऱ्यानुसार सारदा देवी पाटावर बसल्या. रामकृष्णांनी फुलपात्रातील मंत्रित जल तिच्यावर शिंपडले. सारदेला काही समजत नव्हते. फक्त पाहत होत्या. आकलन होत नव्हते. त्यांच्यात दैवी शक्ती प्रवेशत असल्याचं रामकृष्ठांना तीव्रतेने जाणवलं. त्यांनी त्यांच्या पायाला आळता लावून कपाळी कुंकवाचा टीळा रेखाटला. साडी नेसवून मुखात मिठाईचा तुकडा घातला. नंतर विडा चारला. मंत्रोच्चार करीत असता, तेही समाधीस्थ झाले. दोघेही आत्म स्वरूपात एकरूप झाले. मध्यरात्री त्यांची समाधी उतरली. त्यांनी सारदा देवीची षोडोपचारेङ पूजा केली. जपमाला चरणावर ठेवून हात जोडले. आणि मुखातून स्तवन बाहेर पडले…
” सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोऽस्तुते।
सर्व मंगल मांगल्ये…. पूजा समाप्त झाली. कल्याणदायीनी त्रिपुरा सुंदरी जगदंबेने त्यांना दर्शन दिले. काहीच वेळात सारदा देवीही स्व-स्वरूपात प्रवेशल्या. रामकृष्णांनी दिव्य मातृत्वाला जागृत केले. सारदा देवीच्या ह्रदयात विश्वमातृत्वाची भावना निर्माण केली. रामकृष्ण भाव समाधीत लीन झाले. क्षणात हसू लागले तर लगेच ओक्साबोक्सी रडू लागले. सारदादेवींनी यापूर्वी त्यांची अशी अवस्था पाहिली नसल्यामुळे भयंकर घाबरल्या. ह्रदयरामला बोलावणे पाठवले. येताच त्यांने ” शिव शंभो, शिव शंभोऽऽ असा मोठ्याने जयजयकार सुरू करताच त्यांची भाव समाधी उतरली. सारदादेवीचे भय कमी झाले. पतीला नमस्कार करून आपल्या खोलीकडे निघाल्या.
रामकृष्णांची भावावस्था दिवसें दिवस वाढतच होती. त्याच अवस्थेत रात्रभर राहत. कधी गात, कधी मोठ्याने हसत, कधी रडत. षोडशी पूजेनंतर हा प्रकार खूपच वाढला. त्यांची अशी अवस्था पाहून सारदादेवी भयाने थरथरत बसून राहत. एकदा त्यांनी हे पतीला सांगताच, रामकृष्ण म्हणाले, तुम्ही मोठ्या आवाजात परमेश्वराचा नाम घोष करीत जा. माझी समाधी उतरेल. घाबरण्याचे कारण नाही.
एके सकाळी नित्य नियमाप्रमाणे रामकृष्ण मातेच्या दर्शनासाठी त्यांच्या खोलीत आले. तेव्हा कामारपुकुरहून मुले आली होती. त्यांना पाहून ठाकूरांना आनंद झाला. मातेला नमस्कार केल्यावर मुलांना जवळ घेतले. त्यांचे अभ्यासाची चौकशी केली. रामलालला पाहून, चंद्रमणीला आपल्या दिगंवत पुत्र राजकुमारची व त्यांचा मुलगा अक्षयची आठवण आली. तिचे डोळे भरून आले. मातेची अवस्था पाहून रामकृष्ण म्हणाले, कालीमातेने त्यांना तेवढेच आयुष्य दिले होते. आतां मन शांत कर. व या मुलांचे स्वागत कर. त्यांना गंगेचे दर्शन घडव. इतकं बोलून ते चालू लागले. जाता जाता सारदा देवींना म्हणाले, मुलांना दुपारी मंदिरात घेऊन या.
दुपारचे जेवण रामकृष्णांनी मुलासोबत घेतले. दक्षिणेश्वराला मजेत सुट्टी घालून मुलं कामारपुकुरला परत गेली. रात्रीची जागरण, वेळ अवेळी भोजन, अविश्रांत श्रम यामुळे सारदादेवीची तब्येत इतकी बिघडली की, त्यांना उठणेही अशक्य झाले. रामकृष्णांनी वैद्याकडून औषधोपचार केला पण तब्येत अधिकच बिघडली. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, तुम्ही काही दिवस विश्रांतीसाठी कामारपुकुरला किंवा जयरामवाटीला जा. मी गाडीची व्यवस्था करतो. तुम्ही तयारी करून उद्याच निघा.
दुसऱ्या दिवशी दिनूने गाडी आणली. गाडीत अंथरुण टाकून सारदा देवीला झोपवले. गाडी हळूहळू चालवत कामारपुकुरच्या घरासमोर आली. रामेश्वरीने दिनूच्या मदतीने सारदादेवीला हात देऊन उतरवले. थोडसं खाऊन दमलेल्या सारदा लगेच झोपी गेल्या.
औषध, काढा नियमित जेवण आणि विश्रांती यामुळे सारदा देवींची तब्येत सुधारली. आठ-दहा दिवसांनी जयरामवाटीत माहेरी आल्या. लेकीची अवस्था पाहून, मातापिता घाबरले. श्यामा देवीला वाटले, तिला डोहाळ्याचा त्रास होत असेल. तिने लेकीला विचारल्यावर, असे काही नाही सांगितल्यावर, ति निराश झाली. तब्येत सुधारल्यावर, साजरादेवी दक्षिणेश्वरला परत आल्या.
त्या दिवशी सारदा देवींना खूपच हुरहुर वाटत होती. कारण मात्र समजत नव्हते. रामनवमीच्या दिवशी रामभक्त रामचंद्र बाबू मुखर्जी रामाचे नाव घेत स्वर्गस्थ झाल्याची बातमी आली. पित्याच्या निधन बातमीने सारदादेवींना अतोनात दुःख झाले. आपल्याकडून त्यांची काही सेवा न घडण्याची खंत वाटली. त्यांचं सांत्वन करून रामकृष्ण म्हणाले, आमची चिंता न करता हृदयरामला बरोबर घेऊन जयरामवाटीला जाऊन काही दिवस राहा.
त्या जयरामवाटीला पोहोचल्या तेव्हा पित्याचे क्रिया कर्म, पिंडदान वगैरे सुरू होते. पित्याचे अंतिम दर्शन न झाल्यामुळे सारदा देवींना खूपच दुःख झाले.
शामसुंदरी निर्वाहाकरितां अपरिमीत कष्ट करत होती. तिने आपले तीनही मुलं तीन मामांकडे पाठवले. आपल्यामुळे आईला आणखीन कष्ट नको म्हणून मातेच्या निरोप घेऊन त्या दक्षिणेश्वरला परत आल्या.
पावसाळ्याच्या दुषित वातावरणामुळे रोगराई पसरली. आधीच दुर्बन झालेल्या सारदादेवीची तब्बेत पुन्हा बिघडली. त्यांची ती अवस्था पाहून रामकृष्ण भयंकर घाबरले. त्यांनी शंभू बाबूंना बोलावून, औषधींचे व्यवस्था केली. तब्येतीत फारसा फरक पडला नाही. तरीही त्या पती व सासूची सेवा करतच होत्या. जवळजवळ वर्ष त्यांनी त्याच अवस्थेत काढले. शेवटी रामकृष्णाने त्यांना माहेरी पाठवले. शामसुंदरी निर्वाहासाठी अतिशय कष्ट करताना पाहून, सारुचे ह्रदय कळवळले. त्याही मातेला मदत करू लागल्या. पण प्रकृतीने साथ दिली नाही. अमांशाने त्रस्त झाल्या. अंथरुणावरुन उठण बसण कठीण झाल्यामुळे त्या तळ्याकाठी असलेल्या एका झाडाखाली पडून राहू लागल्या.
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख.
!!! सारदादेवी !!!
भाग – १०.
एक दिवस सारदादेवी हात, पाय, तोंड धुत असताना पाण्यात पडलेले स्वतःचे प्रतिबिंब पाहून त्या दचकल्याच. फक्त हाडं आणि कातडी राहिलेली अवस्था पाहून, स्वतःलाच म्हणाल्या, या तुच्छ देहासाठी कशासाठी जगाव? या पार्थिव शरीराला सोडणेच योग्य आहे.
पोटात जबरदस्त मुरडा आला. केव्हा ग्लानी आली कळलेच नाही. सर्व शरीरावर सूज आली. नाका डोळ्यातून सारखं पाणी वाहत होते. काय करावे कुणालाच कळेना. त्यांचा धाकटा भाऊ कालीचरण म्हणाला, दीदी सिंहवाहिनी देवी जवळ बसून उपवास करशील? देवी तुझा आजार बरा करेल. ठीक आहे. हा ही उपाय करून पाहू.
दुसऱ्या दिवशी शामसुंदरीने त्यांना स्नान घातले. साडी नेसवली. मेण्यात बसून उमेश सोबत निघाल्या. डोळ्यातून सतत पाणी वाहत होते. समोरचे काहीच दिसेना. आपण आंधळे झालो. या विचाराने फार व्यथित झाल्या. उमेशने त्यांना उचलून देवीसमोर आणून झोपवले. सारदा निपचित ग्लानीत पडून होत्या. तेवढ्यात बारा तेरा वर्षाची काळ्या रंगाची मळक्या कपड्यातील मुलगी त्यांच्यासमोर येऊन म्हणाली, दुधी भोपळ्याचे फुल व त्यात थोडे मीठ घालून त्याचा रस करून ताबडतोब डोळ्यात घाल. तुझे डोळे बरे होतील. जा.. आता घरी जा…
त्यांनी आजूबाजूला पाहिले तर, आसपास कोणीच नव्हते. हा देवीचा साक्षात्कार असावा असा विचार करून, उमेशला म्हणाल्या, मला घरी घेऊन चल. मी हळू हळू चालेन. तुला त्रास देणार नाही…
सिंहवाहिनी देवीला नमस्कार करून, हळू हळू पावले टाकीत घरी पोचल्या. आईला सगळी हकिकत सांगितल्यावर आई म्हणाली, त्या मुलीच्या रुपात तुला सिंह वाहिनीनेच दर्शन दिले. लगेच देवीने सांगितलेले औषध तयार करून घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या अंगावरची सूज उतरली. नाका डोळ्यातून वाहणारे पाणी कमी झाल्यामुळे त्यांना चांगले दिसू लागलं. तिथली माती आणून डबीत भरून ठेवली व ती माती कपाळाला लावून, तोंडात टाकू लागल्या. सिंहवाहिनीच्या कृपेने सारदांचा आजार पळाला.
शामसुंदरी अतिशय धार्मिक होती. पतीनिधनानंतर तिला उदर भरण्याकरता कष्ट करावे लागत होते. पण देवाला दोष दिला नाही. ती नेहमी कालीमातेची पूजा करीत असे. गावातल्या उत्सवासाठी तांदूळ आणि पैसे देत असे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिने तांदूळ पाठवले. पण गावात भांडण सुरू असल्यामुळे नवीन मुखर्जीने तांदळाच्या तबकाला स्पर्शही केला नाही. उमेशने सर्व सांगितल्यावर तिला अतिशय वाईट वाटले. त्या रात्री तिने भोजनही केले नाही. मध्यरात्री स्वप्नात शामसुंदरीला दरवाजा जवळ देवी बसलेली दिसली. देवी म्हणाली रडतेस कशाला? काली करता पाठवलेले तांदूळ मी खाईन. चिंता करू नकोस. आश्चर्याने शामसुंदरीने विचारले, तुम्ही कोण आहात? मी जगन्माता असून जगद्धात्री प्रमाणे मी तुझी पूजा स्वीकारेन. देवीने दिलेले आश्वासन ऐकून तिला स्वस्थ झोप लागली.
सकाळी सारदा देवीने डोळे उघडले तर, समोर रामकृष्ण उभे दिसले. ती काही विचारणार तोच ते अदृश्य झाले. स्वतःशीच पुटपुटल्या. ठाकूर इथे कसे आले? आवाज कानात निनादला. तू आणि ते एकच आहात. तूं त्यांच्यात समाविष्ट असल्यामुळे ते दिसले.
शामसुंदरी म्हणाली, सारु, मी जगध्दात्रीची पूजा करणार आहे. जगदंबेला कबूल केले. मी तयारीला लागते. सारदादेवी काहीच बोलल्या नाही. या पूजेला जावयाची उपस्थीती आवश्यक असते. म्हणून तिने त्यांना आणायला प्रसन्नाला पाठवले. दक्षिणेश्वरी पोहोचल्यावर, प्रसन्ना म्हणाला, जगदध्दात्रीच्या पूजेसाठी आपल्याला न्यायला आलोय.
रामकृष्ण म्हणाले, मी तिथेच आहे. तुम्ही पूजा करा. सर्वांचं कल्याण होईल. दोन दिवसांनी जगध्दात्री ची पूजा संपन्न झाली. देवीची पूजा व्यवस्थित पूर्ण झाल्यामुळे श्यामसुंदरी समाधान पावली. सारदा देवीची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या माहेरीच होत्या. एके दिवशी शामसुंदरी म्हणाली, सारू, मी जगाईची पूजा करणार आहे. तू पण भाग घे.नापसंती दर्शवत सारु म्हणाल्या एकदा पूजा झाली ना? परत कशासाठी? माझ्याकडून काही होणार नाही. रात्रीचे भोजन वगैरे उरकल्यावर दोघी मायलेकी झोपी गेल्या. मध्यरात्री जगध्दात्रीदेवी जया- विजयासह सारदा देवी समोर येऊन, त्यातल्या एका अत्यंत तेजस्वी स्रीने विचारले, आम्ही जाऊ का? तुम्ही कोण आहात? ओळख विसरलीस? मी जगध्दात्री आणि ह्या माझ्या सख्या जया, विजया. तुझी इच्छा नसेल तर …नाही… नाही.. तुम्ही नाही जायचं. इथेच रहा. दरवर्षी तुमची पूजा निश्चित होईल. त्या देवी अंतर्धान पावल्या. सारदाने भक्तीभावाने हात जोडले. सकाळी सर्व हकीगत मातेला कथन केली.
सारदादेवी माहेरी जयरामवाटीला गेल्यापासून चंद्रमणीला स्वयंपाक व इतर कामे करावी लागत होती. ती दमून जाई. वास्तविक रामकृष्ण पुजारी असल्यामुळे, प्रसादाचे ताट यायचं. पण त्यांना अपचनाची तक्रार असल्यामुळे, त्यांच्यासाठी चंद्रमणीला स्वयंपाक करावा लागत असे.
त्या दिवशी रामकृष्ण मातेच्या भेटीस आले असता, मातेची अतिशय खालावलेली तब्येत पाहून फार अस्वस्थ झाले. तिचं थोडं मनोरंजन करून आपल्या खोलीत परतले. नित्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मातेच्या भेटीस गेले तर, मातेचा दरवाजा बंद पाहून त्यांना आश्चर्य वाटले. खूप आवाज देऊनही दार उघडले नाही. म्हणून शेवटी सेवकांकडून दरवाजा उघडवला. समोर मरणासन्नावस्थेत मातेला पाहून त्यांना वास्तवतेची कल्पना आली.
चौथ्या दिवशी तिचा आत्मा अनंतात विलिन झाला. उत्तरक्रीया रामलालने केली. मातेच्या निधनाने रामकृष्नांना अतिव दुःख झाले.
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख.








