सती सावित्री चरीत्र भाग ५, (२१ ते २५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


            नारदमुनींकडुन सत्यवानाचे भविष्य ऐकुन अश्वपती, मालवीदेवी व महामंत्री दुःखाने व्याकुळ झालेत. ते सावित्रीला म्हणाले वृथा शोक करु नकोस. पुनः यात्रा करुन गुणवान दुसरा “वर” शोध! पुर्ण स्थीर झालेल्या सावित्रीची धर्मबुध्दी जागृत होऊन ती म्हणाली, धर्मानुसार, शास्रानुसार कायावाचा मनोभावे मी सत्यवानाला वरले आहे, त्यामुळे दुसरा विचार करणेसुध्दा पाप आहे.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! सती सावित्री चरित्र !!!

!! सावित्री  !!

भाग  – २१.

             नारदमुनींकडुन सत्यवानाचे भविष्य ऐकुन अश्वपती, मालवीदेवी व महामंत्री दुःखाने व्याकुळ झालेत. ते सावित्रीला म्हणाले वृथा शोक करु नकोस. पुनः यात्रा करुन गुणवान दुसरा “वर” शोध! पुर्ण स्थीर झालेल्या सावित्रीची धर्मबुध्दी जागृत होऊन ती म्हणाली, धर्मानुसार, शास्रानुसार कायावाचा मनोभावे मी सत्यवानाला वरले आहे, त्यामुळे दुसरा विचार करणेसुध्दा पाप आहे. दोघांनीही तिला समजावण्याचा खुप प्रयत्न केला, पण दृढनिश्चयी सावित्री निश्चयापासुन टस की मस झाली नाही. तोच नारदमुनी म्हणाले, सावित्री ही स्थीरबुध्दी, दृढनिश्चयी असल्यामुळे तिच्या धर्ममार्गातुन परावृत्त करणे शक्य नाही. सत्यवानातले गुण दुसर्‍या कोणत्याही पुरुषात नाही. दोघेही एकमेकांस अगदी अनुरुप आहेत. हा विवाह करणेच योग्य आहे. असे म्हणुन नारदमुनी गुप्त झालेत.

         गौतमत्रृषींच्या तपोवनातुन आनंदात आलेले सावित्री आणि महामंत्री सत्यवानाच्या भविष्यकथनाने

दुःखसागरांत बुडून गेले. लवकरच महामंत्रींनी स्वतःला सावरुन सर्व सेवक, दास-दासींना या वार्तेची गुप्तता राखण्याची ताकीद दिली. सावित्री तपसाधनेसाठी वनांत गेली असा प्रचार प्रजाजनांत करावा. रात्री महाराज व महामंत्रीची गुप्त चर्चा झाली. दुसर्‍या दिवशी साध्या वेशातील चार सैनिक घेऊन पहाटेच गौतमसंकुलाकडे प्रस्थान केले.

       महामंत्रीचे गौतममुनींनी स्वागत करुन त्यांच्या मुखावर असलेल्या चिंतीत भावाचे कारण विचारले असतां, नारदमुनींनी केलेले भविष्य कथन करुन नम्रपणे निवेदन केले की, सत्यवान सावित्रीचे उर्वरीत जीवन आनंदात व्यतीत व्हावे या दृष्टीने या वार्तेची गुप्तता पाळण्यात यावी. भोजनोत्तर महामंत्री जसे आले तसे निघुन गेले.गौतमांनी चार दिवसांनंतर अश्वपती महाराज सावित्रीसह विवाहाकरितां येत असल्याचा संदेश द्युमत्सेनांना पाठविला ठरल्याप्रमाणे  अश्वपती, मालवीदेवी, महामंत्री, सावित्री तयारीनिशी तपोवनां त पोहोचले.आश्रमांत विवाहाची एकच गडबड उडाली. सर्वजन हिरीरीने व आनंदाने  कार्यात भाग घेऊ लागले. मंत्रोच्चाराच्या जयघोषात देवी मालवी व महाराज अश्वपतींनी कन्यादान केले. विवाहविधी आनंदात पार पडला. अहेरा ची देवाण घेवाण झाली. सावित्रीसाठी आणलेल्या दोन दासी तीने नम्रपणे परत पाठवल्यात.

      अश्वपती, मालवीदेवी व इतर सर्वानी मद्रदेशी प्रस्थान केले. नंतर आश्रमातील कुटीत सावित्रीने माप ओलांडुन लक्ष्मीच्या पावलाने गृहप्रवेश केला. शैब्यादेवींनी दोघांची दृष्ट काढली. थोडा हास परिहास, थट्टा झाली. अनेक वर्षानंतर तिघांच्या जीवनांत आनंद बहर ला. गप्पा टप्पा झाल्यावर मातेच्या आज्ञेने सत्यवान सजलेल्या कक्षात सावित्रीला घेऊन आला. सावित्रीचा सांपडलेला नूपुर त्याने सावित्रीच्या पायात घालुन तीच्या रुपागुणांचे कौतुक करत दीप मालवला. सावित्रीने स्वतःला पतीच्या स्वाधीन केले.

         दूसरे दिवशी ब्रम्ह मूहुर्तावर सावित्रीला जाग आल्यावर, तृप्त, सुहास्य मुद्रेने निद्रिस्त सत्यवानाकडे बघीतले व बाहेर आली. मुखप्रक्षालन करुन कुटी समोर सडा संमार्जन, रांगोळी काढली. तेवढ्यात आश्रमाच्या झालेल्या शंखनादाने जागा झालेला सत्यवान बाहेर आला.दुध काढण्यासा ठी कासंड्या घेऊन सावित्रीला येण्याची खुण करुन गोशाळेत गेला. ८-१० दिवसांतच सावित्रीने सर्व कामें आत्मसात केले. मधुर बोलणे व नम्र वागण्याने सासुसासर्‍यांना संतुष्ट करुन आपलेसे केले. तसेच मधुर संभाषण, शांतवृत्ती, एकांतातील सेवा अशा आचरणाने पतीलाही संतुष्ट केले, त्यांची कुटी स्वर्गीय नंदनवन बनली.

                        क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

 !! सावित्री !!

भाग  –  २२.

      सावित्री सत्यवानाचे गृहस्थजीवन अत्यंत आनंदात चालले होते. एक महिना कधी  उलटला कळले सुध्दा नाही. पुण्य पर्वणी आषाढ अधीकमास सुरु झाला.मासारंभी मुनी गौतमांनी नारदमुनींनी  सत्यवानाचे केलेले भाकी त सांगण्यासाठी दालभ्य, सुवार्च, भारद्वाज आदी प्रमुख त्रृषिजनांना बोलावुन त्यांना कथन केल्यावर  सर्व विषण्ण झाले.सावित्रीविषयी कणव दाटुन आली.ही वार्ता जर सर्वश्रृत झाली तर सगळीकडे दुःखद वातावरण निर्माण होईल म्हणुन सर्वांना गुप्तता पाळण्याची शपथ देववली.

           दाल्भ्य त्रृषीनी येत्या पोर्णिमेला सत्यवान सावित्रीच्या हस्ते लक्ष्मीनारायण पुजन करण्याचा मनोदय व्यक्त केला. गौतमनुनींनी इतर मुख्य त्रृषींना व सावित्री सत्यवान यांना पोर्णिमेला पुजेस येण्याचे आमंत्रण दिले. रात्रीच्या भोजनोत्तर सासु सासर्‍यांना सावित्री म्हणाली, माझ्या विवाहात मिळालेले सर्व दागदागीने, सुवासिनी व कुमारीकांचे पुजन करुन त्यांना अर्पन करावे, तशीही मला श्रृंगाराची आवड नाहीच! सत्यवानने सुध्दा त्याला मिळालेले दागीने, भरजरी शेले, सुवर्णाच्या पोटल्या बटुपुजन करुन आश्रमविद्यार्थ्यांना अर्पन करण्याची माझीही मनिषा आहे असे मत त्यानेही व्यक्त केले.

            दोघांही पती-पत्निचे मनोगत ऐकुन द्युमत्सेन प्रसन्नतेने म्हणाले, आपण येथे गेल्या २१ वर्षापासुन राहतो आहोत. या सर्वांनी आपल्याला अत्यंत प्रेमपुर्वक, आपुलकीने, आदराने वागवले.कशाचीही उणीव भासु दिली नाही. या उपकाराची परतथफेड तर होऊ शकत ना नाही पण असे पुजन केल्याने थोडी तरी कृतज्ञता व्यक्त होऊन थोड्याफार प्रमाणांत त्यांच्या त्रृणातुन उतराई होऊ शकु!

    बोलतां बोलतां दिवस सरले आणि पोर्णिमेचा दिवस उजाडला. सर्वीकडे उत्साही वातावरणात गडबड सुरु झाली सर्व सजावट झाली. पुजेची वेळ झाली.  दोघांनी  चौरंगावर बसुन क्षत्रिय नृपाला साजेसा पुजन सोहळा झाला. सर्वांनी प्रसन्नतेने सत्यवान सावित्रीला आशिर्वाद दिला. यशकिर्त व्हा! कल्याणमस्तु!!”

       सावित्री घरकाम आवरुन उरलेल्या वेळात आश्रमकुमार व कुमारीकांना आपल्या तर्कशुध्द बुध्दीने त्यांना शिकवणे सुरु केले. आश्रमातील कुणा स्रीयांना कुंचुकी, वीणकाम, भरतकाम, शिवाय शिक्षणाचे महत्व समजावुन सांगत असे, याच बरोबर शस्रांचे, अश्वावर मांड टाकणे, शस्र चालवणे पण शिकवत होती. स्रीयां सुध्दा वेगाने  शिक्षण आत्मसात करीत होत्या. दिवस आनदांत सरत होते. इतके प्रेमळ, गुणसंपन्न कुटुंब लाभल्याबद्दल सावित्री ला धन्यता वाटत होती. अशा आनंदात विवाहाचे तीन महिने भराभर संपले,पण तीला प्रत्येक जाणार्‍या दिवशी सत्यवानाच्या मृत्युदिनाचे स्मरण होत असे.

      सत्यवान सावित्रीचे प्रेम दिवसेंदिवस फुलतच होते.आतां त्यांच्या विवाहाला सहा मास पुर्ण झालेत आणि सत्यवानाचा मृत्युदिन तीला स्पष्ट दिसुं लागला. मनोमन ती अस्वस्थ होती. नेहमीप्रमाणे कलश घेऊन ती पाणी आणण्यासाठी जात असतां वाटेत असलेल्या वटवृक्षाखाली थोडा वेळ डोळे मिटुन प्रार्थना करीत बसली असतांनाच तीचे ध्यान लागले. तिच्या अंतर्यामी विलक्षण स्फुरण होऊं लागले. पतीप्राणसंकट सहा महिन्यावर आले, त्यासाठी स्फुरणारुप साधना उद्यापासुन सुरु करण्याची तीला स्फुर्ती झाल्याने तीची अस्वस्थता जरा कमी झाली.

                        क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

!!!   सावित्री   !!!

भाग  –  २३.

       एक महत्वाची वार्ता सांगण्यासाठी गौतममुनींनी द्युमत्सेनला आश्रमात बोलावले,ते आसनस्थ झाल्यावर त्याचे गुणगान करु लागले, ते ऐकुन द्युमत्सेन म्हणाले, प्रथम महत्वाची काय वार्ता आहे ती लवकर कथन करावी. त्यावर गौतममुनी म्हणाले, आतापर्यंत आपण केलेली तपःसाधना एकत्रीत करुन, मन घट्ट करुन ऐकावे….. सहा महिन्यापुर्वी सत्यवान सावित्रीचा विवाह संपन्न झाला  पण त्याआधी  नारदमुनीने सत्यवानाचे मृत्युभविष्य सांगीतल्यावर सुध्दा सावित्रीने त्याला मनाने वरल्यामुळे धर्माचारनानुसार त्याच्याशीच विवाह करण्याचा दृढनिश्चय केला. सत्यवानाचा मृत्युदिन माहित असुनही सावित्रीने विवाह केला हे ऐकुन द्युमत्सेनला गहिवरुन आले, तीच्याविषयीची अपार माया त्यांच्या मनांत दाटुन आली. पण त्यांनी मोठ्या प्रयासाने स्वतःला सावरले

          मुनी पुढे म्हणाले, हे दुःख अश्वपती व मालवीदेवीला पण आहेच. सावित्रीच्या मनःस्थीतीची तर कल्पनाच करवत नाही. पण तीने कणभरही दुःख न दर्शवता, उलट हसतमुखाने तुम्हा सर्वांना आनंदी समाधानी ठेवले. म्हणुन आपले कठोर कर्तव्य  आहे की, या पुढे सावित्री सत्यवानाला अधिकाधीक सुख कसे मिळेल, दोघांचे उर्वरीत सहा महिने कसे आनदांत जाईल यासाठी सावित्रीच्या मागे दृढतेने ऊभे राहणे आपले कर्तव्य आहे. द्युमत्सेनांनी अश्रु पुसुन म्हणाले, आतां दुःखाच्या डोहातच वाटचाल करायचीय, पण! पण हसत मुखाने! असे बोलुन त्रृषींच्या सहाय्याने कुटीत प्रवेशले.

                दुःखाचे मूळ कारण द्युमत्सेन व सावित्रीला माहित होते पण ते कोणालाच दाखवु शकत नव्हते. रात्री भोजन व प्रार्थना आटोपल्यावर सावित्री आणि तीच्या सासर्‍याने उद्यापासुन येणार्‍या सहा महिने जपसाधना करण्याचा निश्चय  शैब्यादेवी व सत्यवानाला सांगीतले.

      दुसर्‍या दिवसापासुन सावित्रीने ध्यानसाधनेस सुरुवात केली. थोड्याच वेळात ती सहस्रार चक्रात लीन झाली. द्युमत्सेनही ब्रम्हमूहुर्तावर सुचिर्भुत होऊन जपतपस्येत पुर्ण एकाग्र झालेत, असा एक महिना संपला. नेहमीप्रमाणे सावित्री ध्यानमग्न असतांना तीच्यासमोर पिवळाधमक नाग फणा उभारुन एकटक पाहत होता.पण सावित्रीला बाह्यभान नव्हतेच. तेवढ्यात शैब्यादेवींनी हे विलक्षण दृष्य पाहिल्यावर त्यांनी हळुच सत्यवानाला खेचत आणले…… बघतात तर काय? नाग फणा भुमीला टेकुन त्रिवार वंदन करुन सरसर निघुन दिसेनासा झाला.

          इकडे अश्वपती, मालवीदेवी व महामंत्री विवेकमणी यांना सावित्रीची चिंता सतावत होती, म्हणुन तीचे क्षेमकुशल ज्ञात करुन घेण्यासाठी प्रति महिन्याला वेगवेगळ्या वेशात गुप्तचरां ना पाठविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे अतिथी बनुन आलेल्या दोघा गुप्तचरां ची शैब्यादेवी, सत्यवान व सावित्रीने चांगलीच आवभगत केली. सावित्री आनंदात असल्याची वार्ता महाराजांना कधी एकदाची सांगतो असे त्या दोघांना झाले.

      सावित्रीच्या व्रताला दोन महिने पुर्ण झाले. ती थोडी कृश दिसत असली तरी मुख मात्र तेजोमय झाले होते. दर महिन्याला गुप्तचर वेगवेगळ्या रुपात येऊन तीचे क्षेमकुशल कळवित होते. पण चाणाक्ष सावित्रीला हा कावा महामंत्री व पिताश्रीचा  असल्याचे लक्षात आले.

       दुसर्‍या दिवशी नित्याप्रमाणे तुळशीवृंदासमोर ध्यानस्थ असतांना तीची बैठक भूमीपासुन एक वीत उंचावर गेलेली पाहुन शैब्यादेवी व गुप्तचर चकीत झाले.

                 क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

!!!   सावित्री   !!!

भाग  –  २४.

        सावित्रीच्या विवाहाला नऊ महिने पुर्ण झालेत. द्युमत्सेन व सावित्रीची तपस्या दिवसेंदिवस तिव्र होत होती. क्लेश खुप होत होते पण त्यांचा निर्धार आणि श्रध्दा अपरंपार होती. वेगवेगळ्या वेशात गुप्तचर येतच होते, अशातच वेश पालटुन सावित्रीचे माता पिता  तीला भेटायला आलेत. पण फक्त तीनेच त्यांना बरोबर ओळखले. तीने त्यांचे मनोभावे अदरतिथ्य केले. तेवढ्यात सत्यवान रानातुन फळंफुलं घेऊन आला. अतिथींना त्याने वंदन केल्यावर आयुष्यमान भव! असा आशीर्वाद त्यांनी दिला. त्यांचे जेवण वगैरे झाल्यावर वरकरणी आनंदाने पण जड अंतकरणाने निरोप घेऊन त्यांनी प्रस्थान केले.

        आज रात्री महाराज अश्वपती व  मालवीदेवींना निद्रा आलीच नाही कारण आजपासुन चौथ्या दिवशी जेष्ठ पोर्णिमा! देवर्षी नारदांनी सांगीतलेला दुःखद दिवस! मनाला धैर्य मिळावे म्हणुन कळकळीने प्रार्थना, धावा करत त्रिकाळ सावित्रीदेवीची विशेष साधना करुन तीन दिवसाचा कडकडीत उपवास केला.

      इकडे द्युमत्सेन महाराजांनी मृत्यूंजय मंत्राची जपसाधना व सावित्रीने कडक तपाचरण सुरु ठेवले. महाराज व सावित्रीशिवाय सत्यवानाचे  भाकीत कोणालाही माहित नसल्यामुळे गुप्तपणे येते चार दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी गौतमत्रृषींच्या आश्रमांत प्रमुख त्रृषीमुनींनी जमुन चर्चा केली.

           नेहमीप्रमाणे सावित्री नदीवर जल आणण्यासाठी निघाली. मनांत विचारांचे वादळ उठले होते म्हणुन वाटे वरच्या वटवृक्षाखाली बसुन नेत्र मिटुन सावित्रीदेवीच्या ध्यानात स्थीर झालेली असतांनाच “त्रिरात्र व्रत” हे शब्द अंतरंगात उमटले. ती विचार करुं लागली आज पासुन चवथ्या दिवशी पतीचा घातवार! तेव्हा उद्यापासुन “त्रिवार व्रत” करण्याचा मनाच्या निश्चयाने आणि निर्धाराने रोमरोम थरारुन गेली. अंगी बळ सामर्थ्य दाटुन आले. या व्रताबद्दल भोजनोत्तर सर्वांना सांगण्याच्या निश्चयाने कुटीच्या दिशेने ती जलदगतीने निघाली.

         सर्व कामं आटपुन सर्वजन बसले असतां तीने सांगीतले, उद्यापासुन मी तीन दिवस “त्रिरात्र व्रत” करुन जेष्ठ पोर्णिमेला या व्रताची सांगता करण्याचे ठरविले. द्युमत्सेन म्हणाले, कन्ये! हे व्रत अत्यंत कठीण आहे. तीन दिवस तीन रात्र निराहार राहणे अतिशय कठीण कर्म आहे. सत्यवान व शैब्यादेवीही म्हणाल्या, कशासाठी एवढे कठीण व्रत? ती म्हणाली चिंतीत नका होऊ  नका. माझा दृढ निश्चय झालेला आहे. तीन रात्री तीन दिवस एका पायावर उभे राहुन निराहार व्रतसिध्दी करेन. ध्यानावस्थेत स्थीर झाल्यावर सामार्थ्य आपोआपच प्राप्त होते. या अवस्थेत भुक तहान लागत नाही. तुळशीवृंदावना समोर हे व्रत करण्याचे निश्चीत झाल्यामुळे, ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणुन सत्यवानाने सुंदर मंडप बांधला.

        ब्रम्हमुहुर्तावर सावित्री सुचिर्भुत होऊन नित्यध्यान, पुजा, प्रार्थना आटोपुन सासु सासरे व पतीला वंदन केले. मनोमन कुलदेवता, सावित्रीदेवी आणि माता पितांना स्मरण करुन नियोजीत तुळशीवृंदावनाकडे निघाली. सर्याला, तुळशीमातेला व आसनाला नमस्कार करुन आसनावर वाम पायाच्या गुडघ्याजवळ दक्षिण पाय ठेवुन दोन्ही हात जोडुन नमस्कार केला. शांतपणे डोळे मिटुन व्रताला शुभारंभ केला. शनै शनै सावित्री इतकी स्थीर की, जणुं संगमरवरी मुर्तिच भासु लागली.

                        क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

……………………………………………………………………………………………………………………

 !!!  सावित्री  !!!

भाग  –  २५.

       सत्यवान मात्र तिथेच बसुन राहिला कुटीत जाण्यास त्याचे मनच होत नव्हते शेवटी शैब्यादेवीने त्याला बळेच आंत नेऊन दुध व अल्पोपहार करण्यास भाग पाडले. हलक्या आवाजांत त्याला समजावत म्हणाली, ज्याअर्थी या व्रता ला तुझ्या पित्याची अनुमती  आहे, तर निश्चितच कांहीतरी विशिष्ट अर्थ आहे. तेव्हा सावित्रीचे बाह्य रक्षण करण्याची सर्वतोपरी काळजी घ्यावयास हवी. ती देहभानावर नाही. तुला दक्ष राहुन तिचे व्रत निर्विघ्न पार पडण्यासाठी स्वतःकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शांतता राखण्यासाठी सुक्ष्म लक्ष तुला ठेवावे लागेल. 

         ध्यानावस्थेत सावित्रीचे मुख अधिकच प्रसन्न दिसु लागले. अशा प्रकारे तीन दिवस सरले. आज चौथा दिवस! सर्व जन नित्यकर्मे उरकवुन तुळशीवृंदावनाजवळ एकत्रीत शांत बसले होते. सुर्यदेवाचे आगमण झाले, तिथी बदलली. सावित्रीने हलकेच नेत्र उघडुन दक्षिण पाय अलगद आसनावर ठेवला. थोडी स्थीर झाल्यावर सत्यवाना सह कुटीत प्रवेश करुन प्रथम देवघरांत जाऊन मनोभावे नमस्कार केला.

       द्युमत्सेन म्हणाले, कन्ये! शास्राप्रमाणे तुझे व्रत पुर्ण झाले तेव्हा पारणे करुन भोजन कर! ती म्हणाली, तात! सुर्यास्तानंतर माझे मनोरथ पुर्ण झाल्यावरच भोजन करण्याचा माझा संकल्प आहे. तेवढ्यात खांद्यावर परशु व पाठीवर करंडा घेऊन सत्यवान रानांत जायला निघालेला पाहुन सावित्रीने त्याच्यासोबत जायचा मनोदय व्यक्त केला. पण ती आधीच व्रत व उपवासाने अशक्त झाल्यामुळे सत्यवानाने विरोध केला. पण तीने विनवणी करीत व सासु सासर्‍यांना वंदन करुन त्यांचीही अनुज्ञा मिळवली. तिचा दृढनिश्चय बघुन  दोघेही वनात निघाले. लग्नानंतर प्रथमच दोघे एकत्र बाहेर पडले होते. थोडे पुढे गेल्यावर त्याने सावित्रीचा मृदु हात हातात घेऊन अत्यंत आनंदाने भावविभोर होऊन वनातील अपुर्व सौंदयाचे वर्णन करीत होता. आणि सावित्री मात्र त्याच्यावर लक्ष ठेवुन होती. त्याच्या सहवासाने एकीकडे ती सुखावत होती, तर नारदवचन आठवुन ‘हाच आजचा दिवस’ या कल्पनेने दुःखी होत होती. तीचे मुख म्लान झाले होते.

           तीचे कोमेजलेले व म्लान वदन बघुन सत्यवान विचारता झाला, सावित्री! मी एवढे भरभरुन बोलतो आहे, कुठे व कोणत्या विचारात मग्न आहेस? असे म्हणत ते निर्झराजवळ आले. तो निर्झरझरा ओळखीचा वाटला

आणि तिच्या समोर तो प्रसंग सरकन उभा राहिला. निर्झराजवळ जाऊन हातपाय मुख धुतले पण पाणी मात्र प्यायली नाही. व्रत सुरुच ठेवले. 

       स्वामी हीच ती जागा,  इथेच आपण शौर्याने त्या गर्विष्ठ राजाचे गर्वहरण करतांना पाहुन मी प्रवावित झाले व ह्रदयांत स्थान मिळविले, आपल्या निरागस, मुक्त हास्यावर इथेच मोहित झाले होते. आज हेच हास्य माझे प्राण घेत आहे नाथ! या हास्यात मी विरुन जाईलसे वाटते. कृतकोपाने तीला चुप करत, वेगवेगळ्या विशाल वृक्षांचे, पुष्प ताटीकेचे! मोठ्या उत्साहाने वर्णन करण्यात तल्लीन होत मधेच फळझाडां वर चढुन फळे काढीत होता. वरवर जरी सावित्री हसत होती तरी सत्यवानावर सुक्ष्म लक्ष ठेवून होती. एका वृक्षाजवळ जावूत सत्यवान म्हणाला, या वृक्षाची समिधा गौतमत्रृषींना प्रिय असल्यामुळे याची काष्ठे परशुने तोडतो. तोपर्यत या शिळेवर बैस!

                  क्रमशः

!!! सती सावित्री !!!

*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे

सती सावित्री चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading