आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

संत चोखामेळा संपूर्ण चरित्र + अभंग भाग २, (६ ते १०)
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! !
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – ६.
वारकरी आणि चोखोबा एका झाडाखाली बसल्यावर, त्या वारकर्याने भागवत धर्माची, ज्ञानेश्वरांची व त्यांनी खास उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवुन या धर्माचा मोठ्या प्रमाणावर पुनरुध्दार केला. ते स्वतः ब्राम्हण असुनही सर्व जाती धर्माच्या लोकांना उराशी घेतले, हे ऐकुन चोखा आश्चर्याने थक्क झाले, कारण ब्राम्हणांबद्दलचा त्यांना आलेला अनुभव फार विचित्र होता. सावलीही न पडु देणारे, चुकुन पडलीच तर, कुत्र्या सारखे हाडss हाडss करणारे भट ब्राम्हण पाहिले होते, अनुभवले होते. त्यांनी भित भित वारकर्याला विचारले, मला ज्ञानोबा माऊली भेटतील का?प्रसन्न हसत म्हणाला, सध्या त्यांचा मुक्काम पंढरपूरलाच आहे. सोबत त्यांची भावंडे, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताई पण आहेत. तसेच शिंपी जातीचा नामदेवही तिथेच आहे. हे ऐकुन वारकर्याला वंदन करुन झपाट्याने निघाले. मनाची अधिरता त्यांच्या देहबोलीतुन स्पष्ट होत होती. चालता चालतां चोखोंच्या मनांत अनेक विचारांची आवर्तने उठत होती.
त्यांना हे सर्व अशक्य वाटत होते. गोंधळलेल्या मनःस्थितीतच ते पंढरपूरला पोहोचले. तिथेही आधीचेच दृष्य सर्रास दिसत होते. जाती धर्माचा भेदभाव दिसत नव्हता. तिथे त्यांना एक विलक्षण दृष्य दिसले. एक यवन वारकरी नमाज पढतांना बघुन चोखा थक्क झाले. एक यवन आणि वारकरी? तोही विठ्ठलाच्या दर्शनाला?त्यांनी कुतुहलापोटी त्याचा नमाज झाल्यावर त्याच्या जवळ गेल्यावर कांही विचारायच्या आंतच त्या यवनाने चोखांच्या पायावर डोके ठेवले व ह्रदयाशी धरुन मिठी मारली. चोखाच्या डोळ्यातील आश्चर्य पाहुन यवनच म्हणाला, मी मुसलमान असुन, या देवाच्या वारीला कसा जातो? मग ऐक! अरे! या पंढरीचा महिमाच असा आहे की, जात धर्म, पंथ सर्व गळुन पडतात. या पंढरीचं, पंढरीच्या विठोबाचं महात्म्यच तसं आहे.
याचं वर्णन ज्ञानेश्वर, नामदेव आपल्या भजन किर्तनातुन करतात तेव्हा भारावुन इथे येतच राहावेसे वाटते. हा अनुभव तुला येईलच.
आतां मात्र त्याची उत्सुकता शिगेला पोहचली. सर्वात जास्त त्या तरुण शिंपी नामदेव तरुणाला भेटण्याची. अश्या उत्सुकतेची अनेक कवाडे घेऊन पंढरपूर च्या वेशीवर पोहोचले. मधे चंद्रभागा नदी, तिथली गर्दी पाहुन त्यांना डुबकी निदान हातपाय तरी धुवावेसे वाटले, पण धाडस झाले नाही. उन्हात चंद्रभागेचे पाणी चमकत होते, तसे मंदीराचा कळसही चमकत होता. चोखोबांचे समाधानाने डोळे भरुन आले. मिटल्या डोळ्यांतुन अश्रू ओघळले. मनःचक्षूसमोर कर कटेवर विटेवर उभी असलेली विठ्ठलाची सावळी मूर्ती साकार झाली जणुं त्यांची समाधी लागली हे पाहुन एक विठ्ठलभक्त त्यांच्या पायाशी वाकलेला पाहुन चोखा एकदम घाबरुन, अरे बाबा काय करतोस?मी क्षुद्र हे ऐकल्यावर त्या व्यक्तीच्या चेहर्यावर एकदम ओळख पटुन म्हणाला, म्हणजे तू चोखामेळाच ना?चोखा आश्चर्याने म्हणाले, तुला माझे नांव कसे कळले. विठ्ठलानं! त्या पांडुरंगाने सांगीतले. त्याने चोखांच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाले, अरे चोखोबा, मी नामदेव. . . नामदेव शिंपी!
नामदेव? ज्ञानोबा माऊलीचा सखा. . साक्षात आपल्या खांद्यावर हात ठेवुन उभा. . . अंतरात्म्याची ओळख पटली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पांडुरंग भेटल्याचा आनंद चोखाला झाला. दुसर्याच क्षणी चोखोनं नामदेवांच्या पायावर लोटांगण घातले. डोळ्यातील अश्रूंनी त्यांच्या पाया वर अभिषेक केला. देवा, नामदेवाss नामयाss चोखांची भारावलेली स्थिती पाहुन नामदेवांनी त्यांना ह्रदयाशी धरले.
नामदेव चोखांची भेट अपूर्व होती, कवति काची होती. चोखांच्या दृष्टीने ही घटना विलक्षण होती. त्यांच्या आयुष्याला विलक्षण कलाटणी मिळणार होती.
हा अपूर्व भेटीचा सोहळा बघुन विटे वर उभ्या असलेल्या विठ्ठलाला अतिशय आनंद झाला. चोखामेळा त्याच्या परिवारा त सामील होण्यासाठी त्या दोघांची भेट आवश्यक होती. कालच नामदेवांशी विठ्ठलाचे बोलणे झाले होते. म्हणुनच काल विठ्ठलाने वृध्द वारकर्याच्या रुपात धर्मनिरपेक्षतेची अर्धवट माहिती सांगुन चोखाची उत्कट भक्ती आणि नामदेव-ज्ञानश्वरांची नांवे सांगुन अपार उत्सुकता जागवुन नामदेवाची भेट घडवली. चोखांच्या आयुष्याचा इवलासा प्रवाह आतां भक्तीगंगेत मिसळणार होता. दोघांच्या भेटीचा अपूर्व भेटसोहळा डोळे भरुन, भान हरपुन विठ्ठल पाहत होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
! ! ! संत चोखामेळा ! !
भाग – ७.
नामदेवांच्या मिठीत, आजपर्यंत चोखांनी उच्चवर्णीयांकडुन झालेली अवहेलना, अपमान, परंपरेने अंगावर पडलेली कामे, त्यातुन विठ्ठलाबद्दल लागलेली ओढ हे सगळे सगळे घेऊन दुधात खडीसाखर विरघळावी तसे चोखा विरघळले. चोखा स्फुंदत होते, नामदेव निःशब्दपणे त्यांच्या पाठीवरुन हात फिरवत होते मुकपणे! पण त्या स्पर्शातही एक नाद, एक आवाज, एक भाषा, एक लय होती. . विठ्ठल. . . विठ्ठल. चोखामेळा अगदी विठ्ठलमय झाले होते. त्यांचे पालकत्वं, जनकत्व जणूं स्वतः विठ्ठलाने नामदेवाने घेतले होते. जणूं पुर्वजन्मच झाला होता. तीच पुण्याई म्हणुन नामदेवां ची गाठ पडली, त्यांचा सखा झाले. त्यांचे पाय धरत व्याकुळतेने चोखा म्हणाले, देवा! मला शहाणं करा, शिकवुन मार्ग दाखवा. त्यांची घायाळ अवस्था बघुन नामदेव म्हणाले, चोखोबा तुमची योग्यता फार मोठी आहे. माझ्या पायावर डोके ठेवुन लाजवुं नका. चला! आपण त्या वडाच्या पारावर बसु या!
नामदेवांनी चोखोबाला बोलतं करुन त्याची सर्व माहीती काढुन घेतली. चोखा आतांपर्यंतच्या साठुन असलेल्या मनातील सार्या वेदना, व्यथा, शंका त्यांच्या समोर सांडत होते. गहिवरुन नामदेव म्हणाले, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे विठुरायाने सांगीतली आहेत आणि ज्ञानोबामाऊलीने माझेकडुन घोटवुन घेतली आहे. ती सांगण्याआधी थोडा भाकरतुकडा खाण्याराठी या वर्दळीपासुन दूर एका गर्द झाडाच्या सावलीत दोघेही बसलेत. चोखोबाने शिदोरी सोडुन देवाला नैवद्य दाखवावा तसे भाकरीवर कोराडा, कांदा ठेवुन भित भित नामदेवापुढे धरला. प्रसन्नपणे चोखाच्या हातची भाकरी, एका क्षुद्राच्या घरची भाकरी आवडीने, प्रसन्न मनाने नामदेव खात असलेले पाहुन, स्वतः खाण्याचेही भान राहिले नाही. चोखोबा खाताय ना? चोखोबांना आज भाकरीची चव वेगळी, जरा जास्तच गोड लागतीय. . आणि हे सर्व मायला सागायचे त्यांनी ठरविले.
चोखोबा काय काय खदखदतय तुमच्या मनांत?निःसंकोच विचारा. विचारुं की नको अश्या संभ्रमात असतांनाच, मनाचा हिय्या करुन एकदम विचारले, देवा! हा भागवत धर्म म्हणजे काय? या धर्मात जातीभेदाचं वाकडं कसं नाही? शिवाशिव, विटाळ चांडाळ, जात पात नाही, हे कस?आणि माझ्यासारख्या क्षुद्र जातीचा माणुस या भागवत धर्मात सामावुन घेऊन देवाची भक्ती करतां येते? जिथे नुसती सावली पडली तरी हे उच्च वर्णीय आंघोळ करतात, मग या धर्माला तसलं कांही बंधन नाही हे कसं?रस्त्याने येतांना बघीतले, वारकरी दिसला की, जात पात, विटाळचांडाळ कांहीही न बघतां सरळ उरभेट घेऊन मिठी मारतात हे कस? विचार कर करुन डोक्याचा पार भुग्गा झालाय! देवा एवढा हा गुंता सोडवा चोखांच्या सच्चेपणाची साक्ष पटुन, सगळं जाणुन घेण्याची सखोल आस पाहुन, हा माणुस ज्ञानलालसेपोटी खुप मोठा माणुस होणार याची नामदेवांना खात्री पटली. चोखांच्या मनाची घायाळ अवस्था बघुन ज्ञानेश्वर माऊलीचे बोल आठवले
”संमोह विक्रम माझे । गिळीत धैर्याची अविसे । तेथ देव्हडे भोवत वळसे । अज्ञानाचे । ।
किती समर्पक सांगीतले
चोखोबांची या संभ्रम व्याकुळ अवस्थेतुन सुटका करायचे निश्चित केल्यावर, नामदेवांच्या स्निग्ध, आश्वासक स्पर्शाने चोखोबा अंतर्बाह्य थरारुन स्वैरभैर झालेली बुध्दी एका जागी स्थीर झाली. त्यांच्या शरीरांतील कण न् कण अंतर्बाह्य फुलुन सगळ्या शरीराला ऐकण्यासाठी कान फुटले. नामदेवांनी मनोमन विठोबांना दंडवत घालुन सस्मित मुद्रेने बोलायला सुरुवात केली.
चोखोबा! तुमची संभ्रामावस्था, व्याकुळता, ज्ञानलालसा बघुन परंपरे विरुध्द पोहण्याचं सामर्थ्य बहुधा कुणास नसतं, पण तुम्ही विचारण्याचं धाडस केले कौतुकास्पद आहे. . वारकरी जात, धर्म, विटाळचांडाळ मानत नाही हीच भागवत धर्माची शिकवण आहे. देवा! हा भागवत धर्म म्हणजे काय?आतांपर्यत हिंदु धर्म, यवन धर्म ऐकला, पण हा भागवत धर्म कुठुन, कोणी, त्याची तत्वं, त्या तत्वांचे अर्थ
ती तत्वे लोकांपर्यंत कुणी पोहोचवले?देवा! एक प्रश्न सोडवला की, दुसरा तयार मला झोप लागत नाही. विठुरायाचे नामस्मरण केले की, थोडं बरं वाटते. देवा! तुम्ही माझे गुरु होऊन या गुंत्यातुन माझी सोडवणुक करा. चोखोबांची व्याकुळता, काकुळता, उत्कट ज्ञानलालसेची जाणीव, हा क्षुद्र जातीतील असुनही त्यांची ज्ञान पिपासा पाहिल्यावर, ज्ञानदेवांनी भक्ती मार्ग सर्वांसाठी मोकळा केल्याचे सार्थक झाले असे नामदेवांना वाटले. चोखोबांची असीम उत्सुकता, विठ्ठलाबद्दलची भक्ती पाहुन, विठ्ठलाला निष्ठावान भक्त, वारकरी संप्रदायाला एक खंदा पाईक, संतांच्या मांदियाळीत एका अनुयायाची भर पडणार होती. ते जातीचा, कुळाचा उध्दार कर्ता ठरणार होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १४-४-२०२१.
संत चोखामेळा ! ! !
भाग – ८.
चोखोबाच्या विधिलिखितामुळे व गुरुआज्ञेने कां होईना, नामदेव निमित्य मात्र होणार होते. भागवत धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी सारं आयुष्य ते वेचणार होते. समाजाच्या तळागळातील जाती जमातीपर्यंत हा प्रचार पोहोचावाय चा होता. जेवढ्या ऊत्सुकतेने चोखोबा भागवत धर्माची माहिती जाणुन घेण्यास उत्सुक होते, तेवढेच उतावीळ ज्ञान देण्यास नामदेव ऊत्सुक होते.
विठाई आणि ज्ञानदेव माऊलीच्या आज्ञेने तुमच्या सर्व शंकांचे निरसन करायचा प्रयत्न करतो. नामदेवांनी बोलायला सुरुवात केली. सारी चराचर सृष्टी, सारं तेज कानांत प्राण आणुन ऐकत होते. चोखोबांचे सर्व इंद्रीयांनाच जणुं कान फुटले होते. नामदेवांच्या मुखातुन पडणार्या ज्ञानामृतधारा प्राशन करण्यासाठी चोखोबाच्या मनांत भरलेला अंधःकारता प्रकाशात बदलण्यासाठी ते तयार होऊन बसले.
चोखोबा! सगळ्या विठ्ठल भक्तांनी वारकर्यांनी आपलासा केलेला भागवत धर्म सर्वश्रेष्ठ भक्त पुंडलिकाने सुस्थापित केला. पुंडलिकाची विठ्ठलावर जेवढी भक्ती होती. तेवढाच त्याचा अधिकार मोठा होता. म्हणुनच आई वडिलांच्या सेवेत गुंतलेल्या पुंडलिकाला भेटायला विठ्ठल स्वतः जेव्हा त्याच्या घरी गेला, तेव्हा एक वीट विठ्ठलाकडे फेकुन त्यावर वाट धघत उभं राहायला सांगीतले. आणि आजतागायत भक्तासाठी तसाच विटेवर उभा आहे. विठ्ठलभक्तांवर केलेला मोठा उपकार तर आहेच, पण त्याच बरोबर भागवतधर्मासारखा सर्व समावेशक, सर्व व्यापक धर्म संस्थापित करुन पुंडलिकाने सार्या मानव जातीवर उपकार केलेले आहे. हीच विशाल दृष्टी बाळगुन ज्ञानेश्वरां नी या भागवत धर्माचे पुनरुज्जीवन केले. चोखोबा! चंद्रभागेच्या वाळवंटात भागवत धर्माच्या झेंड्याखाली आध्यात्मिक लोक शाहीचं राज्य उदयास आलं. या राज्यातल्या भक्तीच्या पेठेत विठ्ठलनामाचे अमाप पिक येत आहे. चोखोबा! पंढरी हे या भूलोकीचं पृथ्वीतलावरील वैकुंठ आहे तर विठूराया या वैकुंठीचा राणा आहे. भक्तीचा भूकेला, तहानलेला सर्वाच्यांत वसलेला आहे. म्हणजे माझ्यातसुध्दा! होय चोखोबा होय! तुमच्या माझ्यात अगदी चरांचरात वसलेला आहे हेच भागवतधर्म सांगतो, हेच भागवतधर्माचे तत्व आहे.
मग चोखोबाच्या मनांत नवा प्रश्न उद्भवला. एकमेकांची उरभेट कां घेतात?
चोखोबा! विठ्ठल सर्वांच्या ह्रदयात असल्याने आपण सर्व एकाच पातळीवर येतो. म्हणुन एकमेकांच्या ह्रदयांत वसले ल्या परमेश्वराला भेटण्यासाठी ऊराउरी भेटतात, एकमेकांच्या पायावर डोकं टेकवुन परमेश्वराला नमस्कार करतात. त्यावेळी त्यांची एकच जात, एकच धर्म असतो, भागवतधर्म! नामया! तुमचं बोलणं ऐकुन प्रत्यक्ष विठुरायाशीच बोलतोय असा भास झाला.
चोखोबा! भागवतधर्माची, वारकरी संप्रदायाची एक वेगळीच परंपरा आहे. वेद प्रामाण्य, भक्ती प्रामाण्य अशा या भागवत धर्मात विठ्ठल धर्माची मिरासदारी नामाचा महिमा हे मूलतत्व, आत्मा हाच ईश्वर! आणि ईश्वर म्हणजेच आत्मा सांगणारा अद्वैतवाद याचं प्रमाण असुन, महत्वाचं म्हणजे धर्म जाती निरपेक्ष अध्यात्मदृष्टी याची मूळ संकल्पना आहे. सामाजिक समतेची ग्वाही हे या संप्रदाया चं वचन आहे. वारकर्यांचा हा विठ्ठल देव सखा, माऊली व पिताही आहे, ही पंढरी वारकर्यांचं माहेरघर आहे आणि म्हणुन “रामकृष्णहरी” हा या संप्रदायाचा महामंत्र उद् घोष आहे.
“अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ ।
त्याच्या गळा माळ असो नसो । ” अशा कुणालाही सामावुन घेण्याची विशालता या भागवत धर्मात आहे.
चोखोबा! तुम्ही वारकरी आहांत, विठ्ठलभक्त आहांत. आजपासुन अगदी या क्षणापासुन तुम्ही भागवत धर्माचे झालात. ती विठ्ठलमाऊली आपणांसर्वांची आई आहे. आपण जातीहिन, समाजा कडुन उपेक्षेलेले आहोत असं कधीही वाटलं की, या चंद्रभागेच्या वाळवंटात या! इथे तुम्हाला भक्तीचा, जाती धर्माच्या पलि कडे असलेला निर्मळ झरा सांपडेल, त्यात तहान भागवा. त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा. आणि पुन्हा आपल्या गांवाला जा! नामदेवांच्या आमंत्रणाने चोखोबा गहिवरले. भावविवश होऊन त्यांच्या मिठीत शिरले. आईच्या कुशीत शिरल्याची जाणीव झाली.
नामदेवा! मी भागवत धर्मात आलो तर, विठ्ठलाचे दर्शन घेतां येईल? मला. . मला. . पांडुरंगाच्या देवळांत प्रवेश मिळेल आसुसल्या नजरेने ते नामदेवांच्या उत्तराची वाट बघत होते. एक क्षण. . एकच क्षण नामदेवांचा चेहरा उतरला. विलक्षण खंत, घायाळ भाव उमटले, पण दुसर्याच क्षणी स्वतःला सावरुन. . . . .
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – ९.
नामदेव म्हणाले, अहो चोखोबा! या चंद्रभागेच्या वाळवंटात विठुमाऊलीचा गजर दुमदुमत असतांना, या गजरांत देह भान हरपुन नाचणार्या वारकर्यात प्रत्यक्ष विठ्ठल असतांना, लाखो सजीव मूर्ती त्याच्या नामस्मरणांत तल्लीन होऊन नाचतांना आपणही त्यातली सजीव मूर्ती बनायचं सोडुन त्या काळ्या दगडाच्या निर्जिव मूर्तीचं काय दर्शन घ्यायच?तुम्ही कळसाला नमस्कार करतांना प्रत्यक्ष तुम्हाला पांडुरंग दिसत असतांना वेगळ दर्शन हवय कशाला?तुम्ही भागवत धर्माच्या झेंड्याखाली येताहात ना?मग ईश्वर हाच आत्मा, आत्मा हाच ईश्वर असं अद्वैत सांगणारं भागवत धर्माचं तत्व असतांना हे द्वैत कशापायी?देव भक्तीचा भूकेला, तो दर्शन घेणार्यांना तर पावतोच पण ज्यांच्या ह्रदयांत, मनांत आहे त्यांना जास्त पावतो. नामदेवांच्या समजावण्याने चोखोबांचे मन शांतावलं, आकाशासारखं निरभ्र झाल.
नामदेवांनी त्यांना थोपटल्यावर, त्यांच्या उबदार स्पर्शाने चोखा शांत होऊन मंगळवेढ्याला येण्याचे त्यांच्या कडुन वचन घेऊन नामदेवांचा निरोप घेतला. पंढरपूरला आलेले चोखोबा आणि परत जाण्यार्या चोखोबात प्रचंड फरक पडला होता. ह्या घटना आईवडीलांना सांगण्याच्या उत्सुकतेने आत्मविश्वासी वेगळाच चोखोबा मंगळवेढ्यास चालले होते. सर्वांगांनी बदलेले चोखोबा उन्मन्नी अवस्थेत, सदा हसरा चोखोबा कांहीसे गंभीर, विचारी, पोक्त, समंजस मंगळवेढ्या स पोहोचले. त्यांनी समग्र हकिकत आई वडीलांना सांगीतल्यावर ते मोठे झाल्याची जाणीव झाल्याने त्यांच्या लग्नाचे विचार मनांत आले.
चोखोबांचे लग्न! अनेक मुलींचा विचार करतां करतां शेजारच्या गावातील यमाजीची मुलगी सोयरा काळीसावळी निटस बांध्याची, टपोर्या डोळ्याची सोयरा दोघांनाही पसंत पडल्यावर सावित्रीने ८-१० दिवसांनी चोखाजवळ विषय काढल्यावर कांहीसे लाजत म्हणाले, तुमच्या शब्दाबाहेर नाही. सुदामा ने मग वेळ न दवडतां, दोन मण लाकडं फोडुन देण्याच्या कबुलीवर बाळंभटा कडुन मुहुर्त काढुन घेतला. निर्मळाला भावाच्या लग्नावरुन त्याला चिडवु लागली.
चोखोबाचे लग्न ही विठोबाच्या दृष्टीनेही महत्वाची होती. कारण लग्ना नंतर चोखोबा स्थिरावणार होते. अधिक शांत, समंजसपणे भक्तीकडे वळणार होते महान कार्य त्यांच्या हातुन घडणार होते. त्यासाठी लग्न होणे आवश्यक होते.
साखरपुड्याचा समारंभ छान पार पडल्यावर, बाळंभटाने सांगीतल्यानुसार सव्वा महिन्यानंतर तिथी ठरली. साखर पुड्याचा कार्यक्रम आटोपुन ठरवलेल्या बैलगाडीत सारे परतत असतांना, वाटेत समोर भगवी कफणी घातलेला साधु उभा पाहुन सुदामाने बैलाचा कासरा ओढुन गाडी थांबवली. साधुला बघुन सारे खाली उतरुन त्या साधुच्या पाया पडलेत. चोखोबा नमस्कारासाठी वाकली असतां साधुने त्यांच्या खांद्याला धरुन उभे केले.
सगळी दचकली. साधूने स्पर्श केल्यामुळे! दचकलेल्या चोखोबांनी आपली जात, व वस्तुस्थिती सांगीतल्यावर, चेहर्यावर हास्य उमटवीत साधू म्हणाले, मी जाणतो तूं जातीने शुद्र असलास तरी एका महान विभूतीच्या सहवासाने तू कर्माने श्रेष्ठ ठरुन तुझ्या जातीत आजवर कुणी केले नाही असे महान कार्य तुझ्या हातुन घडणार आहे. श्रेष्ठ भक्तांमधे तुझी गणना होणार, सरस्वतीचा पुत्र ठरणार आहेस. प्रत्यक्ष देवालाही तुझ्या संगतीचा मोह पडेल, साधुचे बोलणे ऐकुन चोखोबांचे डोळे पाणावले. सारेच अतर्क्य!
साखरपुडा आटोपुन परततांना, साधुचे भेटणे शुभशकुनच वाटला. पुढे साधु म्हणाला, चोखोबा! तुला आणखी एक विलक्षण गोष्ट आज सांगतो, तूं तुझ्या कर्माने तर मोठा होशीलच, श्रेष्ठ भक्त ठरशील, पण या सर्वांवर तुझा विलक्षण मृत्यु मात करेल. तुझ्या मृत्युनंतर दिगंत कीर्ती पावशील, त्यावेळी तुझी खरी श्रेष्ठता लोकांना कळेल. भक्तीची पुण्याई, विचारांची खोली, शब्दांची समृध्दी यातुन तुझे आयुष्य फळेल, फुलेल हा माझा आशिर्वाद आहे असे म्हणुन तो साधु निघुन गेला. परत नमस्कार करायचे भान ही चोखोबाला राहिले नाही. सुदामा सावित्रीला आपला मुलगा भविष्यात घराण्याचे नांव उज्वल करेल ऐकुन अतिशय आनंद झाला. चोखोबा मात्र अंतर्बाह्य थरारुन गेले. साधुने उच्चारलेला शब्द न् शब्द त्यांच्या जाणीवेची कवाडे उघडुन गेले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १४-४-२०२१.
२८/१०/२१, सायंकाळ ७:३७ – Akola Minakshi Deshmukh: ! ! ! संत चोखामेळा ! ! !
भाग – १०.
साधुंनी सांगीतलेल्या भविष्य वाणीने चोखोबांच्या दृष्टीकोणात बदल तर झालाच पण सर्वसामान्यासारखे सरळ जीवन जगणार्या चोखोबांना आयुष्याचा वेगळा विचार करणही भाग पडले. तत्क्षणी त्यांना नामदेवांची प्रकर्षाने
आठवण आली. मनांतील प्रश्नांचे अन्वयार्थ त्यांच्या भेटीची तिव्र ओढ लागली. पण एक महिन्यावर लग्न आलेले असतांना, आई आपल्याला पंढरपूरला जाऊं देईल कां?अश्या मनःस्थितीत आपण लग्नाला उभे राहुं शकु का?मनांत प्रश्नांचे चक्रीवादळ गरगरत असतांनाच त्यांना एक युक्ती सुचली. नामदेवांचे नांव पंचक्रोशीत गाजत होतेच शिवाय आईला त्यांच्याबद्दल सांगीतले होतेच. तोच आधार घेऊन, नामदेवांना लग्नाचे आवतन देण्याच्या निमित्याने पंढरपूरला जाऊन त्यांची भेट घ्यायचे ठरवल्यावर त्यांना थोडे बरे वाटले.
चोखोबांच्या चेहर्यावरील फेरफार बैलगाडीत बसलेली सावित्री लक्ष देऊन पाहत होती. साधूच्या भविष्य वाणीने चोखांत झालेल्या बदलाने ती थोडी धास्तावली होती, पण त्यांनी नामदेवाना आवतन व त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी पंढरपूरला जाण्याची अनुमती मागीतल्यावर तीने तात्काळ संमती दिली.
चोखोबाचा साखरपुडा आनंदाने बघणार्या विठूरायाला आनंद तर झालाच, पण चोखांनी नुसते संसारांत अडकुन पडु नये म्हणुन, साखरपुड्याच्या आठवणीत दंग असलेल्या चोखोबांना भानावर आणण्यासाठी साधू होऊन भविष्यवाणी सांगीतल्याक्षणी त्यांना नामदेवांची आठवण झाली हे पाहुन विठु रायाला आपली योजना सफल झाल्याचा आनंद झाला. क्षुद्र जातीत जन्मलेल्या या भक्ताकडुन लोकोत्तर कार्य करवुन घ्यायचे होते, म्हणुनच संसारात बुडुन ईप्सित कार्यापासुन ढळणे देवाला मान्य नव्हते. भक्ती आणि संसार या दोन समांतर पातळीवर चालण्यासाठी मानसिक बैठक तयार व्हावी म्हणुनच नामदेवांची सतत संगत लागणं नितांत गरजेचे होते.
आईची संमती घेऊन विचारांच्या आवर्तनात चोखोबा पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेच्या काठावर, विठ्ठलमंदिराच्या समोर ओवरीत वास्तव्य असलेल्या नामदेवासमोर चोखोबा जाऊन उभे राहिले. नामदेवांनी अत्यंत अगत्याने त्यांना जवळ बोलावले. चोखोबानी त्यांच्या पायावर डोके ठेवल्याबरोबर नामदेवांनी त्यांच्या खांद्याला धरुन उठवले व ह्रदयाशी धरले. जणूं जिवा शिवाची भेटच ती! नामदेवांनी आस्थेने चौकशी करुन येण्याचे प्रयोजन विचारले चोखा घुटमळलेले, त्यांच्या हालचालीतील अस्वस्थता पाहुन जमलेल्या मंडळींना उद्देशुन म्हणाले, मंडळी पुढच्या महिन्याती ल एकादशीला ठरलेल्या विठ्ठलनामाच्या सप्ताहाला सावतामाळीचाही सल्ला घेऊ असा प्रेमळ निरोप दिल्यावर मंडळी निघुन गेली. आतां ओवरीत दोघेच होते.
चोखोबाने आणलेल्या शिदोरीतुन बाजरीची भाकरी, तिळाची चटणी व कर्डु च्या भाजीचा गोळा ठेवुन अत्यंत आदराने नामदेवांना दिली. हं! बोला चोखोबा! निःसंकोच बोला! पांडुरंगाच्या आणि आपल्या आशिर्वादाने माझ्या ठरलेल्या लग्नाचे आवतन द्यायला आलो वा! वा! छान! आपल्या विठुरायानेसुध्दा रुख्मिणीमातेशी संसार करतच भक्तांचा हा मेळावा सांभाळला आहे. पण एवढी आनंदाची गोष्ट घडत असतांना चेहर्या वर गोंधळ कां? मग चोखोबांनी साखर पुड्याहुन परतत असतांना अनपेक्षितपणे भेटलेला साधू, त्याने केलेली भविष्यवाणी घडलेला सारा प्रसंग जसाच्या तसा सांगीतला. हे सर्व ऐकल्यावर नामदेव क्षणभर स्तब्ध झाले. दुसर्याच क्षणी आनंदाने म्हणाले, हा तर शुभशकुन झाला. तुमचा संपूर्ण जीवनपट असा विलक्षण आणि विठ्ठलभक्तीच्या तेजाने उजळणार आहे. मृत्युसंदर्भात म्हणाल तर त्याला अजुन कित्येक वर्षे वेळ आहे. आनंदाने व सुखाने खुप वर्ष संसार करा. आणि तितक्याच उत्कटतेने, प्रेमाने पांडुरंगाची भक्ती करा. साधूने सांगीतले ली भविष्यवाणी तर खरी ठरणारच. आनं दाने व प्रसन्न मनाने भाकरी खाणार्या नामदेवांना बघून लोणी खाणार्या कृष्णा ची आठवण झाली. मनांतील सारी किल्मिषं दूर झाल्यामुळे खुल्या दिलाने चोखोबा लग्नाला उभे राहणार होते.
पंढरपूरला जायला चोखोबांना परवाणगी देतांना, सावित्री थोडी धास्तावली होती. पण चारच दिवसांत आनंदी मनाने परतलेल्या चोखोबांना पाहुन तिचा जीव भांड्यात पडला.
उत्साहाने सावित्री लग्नाच्या तयारीला लागली. लग्नाचा दिवस उजाडला. निर्मळा नटून थटून इकडे तिकडे बागडत होती. बाशिंग बांधलेला चोखोबांना दूरुन येणारे नामदेव दिसल्यावर त्यांच्या चेहर्यावर समाधान पसरले. डोळ्यांतुन आनंद ओसरु लागला. पुढे जाऊन त्यांच्या पाया वर डोके ठेवावेसे वाटले, पण जागेवरुन हलायचे नाही अशी सक्त ताकीद असल्यामुळे. . . . .
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख. दि. १५-४-२०२१.










