आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

राजा छत्रसाल चरित्र भाग ५, (२१ ते २५)
सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २१.
माधांत चौबे आपल्या सैन्यासह पराक्रमाची शर्थ करून मोगल सैन्याचा संपूर्ण पाडाव केला. एवढेच नव्हे तर, मोगल सेनापती शाहकुलीनला जखमी करून त्याचे अपहरण करून तळावर आणले. बुंदेलांनी विजय संपादन करून संध्याकाळपर्यंत मऊला येऊन पोहोचले.
छत्रसालने स्वामी प्राणनाथांना साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, महाराज, आज आपल्या कृपेमुळे हा दुर्लभ विजय प्राप्त झाला. आपली अशीच कृपादृष्टी असू द्यावी.
छत्रसालांनी मऊची सुरक्षा व्यवस्था मजबूत करून पंधरा दिवसांनी राजधानी पन्नाला आले. स्वामींसाठी आग्रहाने पालखीची व्यवस्था केली. स्वामीजी आपल्या ठिकाणावर मंदिर परिसरात पोहोचले. जाता जाता स्वामींनी माधांत चौबेला बोलवून भरभरून आशीर्वाद दिला. आणि छत्रसालना आदेश दिला, सैनिक, पदाधिकारी यांना योग्य परितोषक व बढती द्यावी.
छत्रसाल आपल्या महालात प्रवेशले तेव्हा देवकुवारीने त्यांना औक्षण केले. विजय साजरा करण्यासाठी दरबार भरवला. स्वामी प्राणनाथांना आमंत्रित केले. त्यांची राहण्याची व्यवस्था चोपडे महालात केली. स्वामी प्राणनाथ आपली पत्नी बाईजू तेजकुवरीसह पालखीत बसून आले. त्यांचा मान राखण्यासाठी छत्रसाल आणि त्यांच्या राण्यांनी पालखीला खांदे दिले. या स्वागताने स्वामी अभिभूत झाले. स्वामीजी व पत्नी लगेच पालखीतून खाली उतरले. सगळ्यांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला. देवकुवरीने पूजा आरती केली. स्वामीजींना दरबारात आणून उच्चासनावर विराजमान केले.
पुढची कार्यवाही सुरू होण्याआधी स्वामीजींनी घोषणा केली, रितीप्रमाणे राजदरबारात आधी छत्रसालांचा अभिषेक करणे आवश्यक आहे. ताबडतोब आवश्यक ती सामग्री आणल्या गेली. स्वामीजींनी आपल्या हाताने छत्रसालांचा विधिवत राज्याभिषेक करून घोषणा केली, आज छत्रसाल विधिपूर्वक बुंदेलखंडाचे राजा झाले. राजाची राजधानी पन्ना असेल.
दरबारात राजा छत्रसालांचा जयजयकार झाला..
आपापल्या मानाप्रमाणे दरबारी आसनस्थ झाले. स्वामीजींच्या अनुमतीने दरबाराची कार्यवाही सुरू झाली. सैनिकांच्या बढतीची घोषणा झाली. माधांता चौबे, लच्छे रावत आणि बागराज परिहार यांना सेनापतीपद दिले. योग्यतेनुसार काहींना नायक, उपनायक, सुभेदारी, फौजदारी दिली. काहींना जमीन, गावे इनाम दिली. जनतेला करात सूट दिली. ब्राह्मणांना जमिनी दिल्या.
नंतर कैद केलेल्या मोगल फौजदार शाहकुलीनला दरबारात आणल्या गेले. छत्रसालांनी त्याच्यावर आरोप ठेवल्यावर तो म्हणाला, राजेसाहेब, मी मोगलांचा शिपाई. आमच्या बादशहाने दिलेल्या हुकमाचे पालन करावेच लागते. आम्ही तर हुकमाचे ताबेदार. म्हणूनच तुम्हाला बेड्या घातल्या नाही. पण शिक्षा तर होणारच. तेवढ्यात त्यांना सूचना मिळाली, मोगलाचे दोन सैन्याधिकारी राजे साहेबांना भेटायला आलेत. त्यांना दरबारात आणल्या गेले. ते म्हणाले, आमची विनंती आहे आमचे फौजदार शाहकुलींच्या सुटकेसाठी दंड भरायला तयार आहोत. यापूर्वीही आपण दंड घेऊन मोगल फौजदारांना सोडून दिले होते. यावेळी त्याच औदार्याची अपेक्षा करतो. छत्रसालने स्वामी प्राणनाथांकडे पाहिले.
छत्रसाल म्हणाले, ठीक आहे. युद्धाची भरपाई म्हणून सव्वा लाख रुपये भरा. आम्ही त्यांना सोडून देऊ. रतनशाहने शंका काढली. हा पुन्हा सैन्य घेऊन आला तर ? त्या दोघां सैन्यापैकी,पहिला फौजी म्हणाला, ती काळजी नको. दक्षिणेकडची स्थिती फार वाईट आहे. बादशहाने आपली सगळी शक्ती तिकडे लावण्याचा विचार केला आहे.
छत्रसालने अंगद, रतनशहाशी विचार विनिमय करून मोगल शिपायांना सांगितले तुम्ही सव्वा लाख रुपये राजाच्या राज्याच्या खजिन्यात जमा करा. रक्कम जमा झाल्यावर शाहकुलीना मुक्त करण्यात येईल.
छत्रसालसाठी चांगली बातमी होती की, बादशहाचे सारे लक्ष दक्षिणेकडे लागल्यामुळे, काही दिवस तरी मोगलांपासून निश्चिंत राहिल्या जाईल. स्वामीजी म्हणाले, आपल्याजवळ वेळ फार थोडा आहे. तेवढ्यात मोघलांच्या ताब्यात असलेले आसपासचे प्रांत सोडवून बुंदेलखंडांचा विस्तार करावा. धन,जन, बळाने आपली शक्ती वाढवा. आपली आज्ञा शिरोधार्य!
नंतर स्वामींनी राजधर्म कसा असावा, राजाचे आचरण, धनाचा योग्य उपयोग, विनिमय, सैन्य संघटन वगैरेची सगळी माहिती देऊन उपदेश केला. पुढे म्हणाले, जसे सम्राट अकबराच्या दरबारात नवरत्न होते, शासन व्यवस्था चांगली आणि मजबूत ठेवण्याची ती एक रीत होती. त्यांचे तुम्ही अनुकरण करा. दरबारात निवडक विद्वानांची नेमणूक करा. ते राज्यकारणात तुमची मदत करतील. मग त्यांनी दोन्ही हात वर करून आशीर्वाद देऊन म्हणाले,
” छत्ता तेरे राज में धकधक धरती होय!
जिन जिन घोडा मुख करे, तित तित फत्ते होय।।”
दरबार समाप्त झाला .
छत्रसालांनी स्वामी प्राणनाथांचा उपदेश प्रत्यक्षात उतरवला. बुंदेलखंड राज्याच्या विस्ताराचे काम हाती घेतले. सैन्याची पुनर्रचना केली. सर्व जाती, धर्म, वर्ण, तरुणांची सैन्यात भरती केली. मोठ्या संख्येने तरुण सैन्यात सैन्यात भरती झाली. छत्रसालांनी मोगलांची सर्वात मजबूत छावणी धामोनीवर आक्रमण केले. आसपासचे प्रांत उध्वस्त केले. गावे व जहागिऱ्यांवर कब्जा केला. भेलसा आणि उज्जैन वर आक्रमण केले. या सगळ्या प्रदेशात आपला दरारा बसवला. असा दरारा बसवला की, जहागीरदार मोगलांना सोडून छत्रसालांना खंडणी, कर, नजराने देऊ लागले, त्यावेळी औरंगजेबाचे सारे लक्ष दक्षिणेकडे असल्यामुळे बुंदेलखंडात मोगल सैन्य अगदी नगण्य होते. त्यामुळे मोगलांचे ठाणे, सुभे ताब्यात घेण्यास जास्त अडचणी आल्या नाहीत.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २२.
छत्रसालांच्या कामाने प्रभावित होऊन शहाबादचा मोगल फौजदार पहाडसिंगने मोघलांशी बंड करून त्याचे दोन मुलं भगतसिंग आणि देवीसिंग सह छत्रपलांशी हात मिळवणी केली. आणि कायम निष्ठा ठेवली. त्यांनी एरच इलाका हस्तगत करण्यात मदत केली. छत्रसालांनी हमीदपूर घेतल्यावर त्यांची नजर कलींजरकडे गेली. हा किल्ला सर्वात मजबूत आणि अजय होता. त्यांनी माधांता चौबेसह कलिंजर कडे कुच केले. चौबेच्या आग्रहाने त्याला आघाडीवर ठेवण्यात आले. तो किल्ला डोंगरावर असल्यामुळे उभा चढ होता. अनेक अडचणी पार करून एकदाचे सर्व किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्याचे दार भक्कम असल्यामुळे दोराच्या साह्याने माधांता व सैनिक शत्रूंचे बाण झेलत किल्ल्याच्या भिंतीवरून आत प्रवेश करू लागले. त्यात अनेक सैनिक घायल झाले. काही मृत्युमुखी पडले.
किल्ल्याच्या आत दोन्ही सैनिकांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. सेनापती माधांता एकटा पडलेला पाहून त्याला शत्रूंनी घेरले. तरी त्याचे तलवारीचे दोन्ही हात चालत होते. तेवढ्यात एक बाण छातीत घुसला. त्याला एवढाही अवधी नव्हता कि, रुतलेला बाण काढून टाकावा. त्याच्या वेगात जराही फरक पडला नाही. सारे शरीर रक्तबंबाळ झाले. तरीही माधांता त्वेषाने लढतच होता. छत्रसालने घेरा फोडून माधांताकडे धाव घेतली शत्रूला कापत ते माधांताच्या जवळ पोहोचले. त्याच्या छातीत घुसलेला बाण उपटून काढला. त्याच्या शौर्यने गदगदीत होऊन त्याला हृदयाची धरले. त्या बाणाचे टोक मोडून आपल्या पगडीत खोचत म्हणाले, वीर माधांता आज पासून हे बाणाचे टोक माझ्या पगडीची शोभा वाढवेल. त्यांनी कलिंगजरचा किल्ला माधांताला भेट देत म्हणाले, ,या किल्ल्याबरोबर जवळपासचा प्रांतही तुमच्या नावाने करुन देतो. तुम्ही इथे स्वतंत्र राज्य करावे.
नाही…. नाही राजन्! मला हा सन्मान नको. आपण ज्या स्वतंत्र बुंदेलखंडाचे स्वप्न पाहिले, त्यात माझा एक सैनिक म्हणून सहभाग असू द्या. मातृदेवाचे चरणी मस्तक वाहणाऱ्यांची जेव्हा यादी केली जाईल, तेव्हा माझे नाव सर्वात वर राहावे अशी इच्छा आहे.
किल्ल्याची व्यवस्था लावून छत्रसाल पन्नाला परत आले. राजधानीत आठवडाभर विजयोत्सव साजरा करण्यात आला.तिसऱ्या दिवशी विजयादशमी त्या दिवशी शस्त्रसाल आपल्या कुटुंबीयांसह स्वामी प्राणनाथांच्या दर्शनाला मंदिराच्या आवारात पोहोचले. सर्वांनी स्वामींची पूजा अर्चा केल्यावर, स्वामींनी बोध प्रवचन केले. सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. प्रवचन संपल्यावर छत्रसालांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी आशीर्वाद दिला… यशस्वी व्हा! धर्माचे रक्षण करा ! प्रजावत्सल राजा बना! इतिहासात नाव कमवा! त्यानंतर भंडाऱ्यात सगळ्यांची जेवण झाली. घोषणा दुमदुमत होत्या… स्वामी प्राणानाथांचा जय असो… महाराज छत्रसालांचा जय असो…
औरंगजेब दक्षिणेच्या राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकला असल्यामुळे छत्रसालांना थोडी उसंत मिळाली. हा वेळ त्यांनी शासन व्यवस्था मजबूत करण्यात लावली. जिथे जिथे मोघलांचे ठाणे होते, तिथे तिथे आपल्या सैनिक चौक्या स्थापन केल्या. तिथे आपले नातेवाईक आणि निष्ठावंतांना सुभेदार नेमले. तिथे पुरेसे सैनिक ठेवले. सध्या मोगलांकडून त्रास नव्हता. पण मोगलांच्या अधिनस्थ असलेले ओरछा, दतिया चंदेरीच्या राजांची भीती होतीच. ते आपल्या जातीचे म्हणून छत्रसालाने त्यांच्यावर काही कार्यवाही केली नव्हती. पण त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन ते मोगल सरदारांना छत्रसाल विरुद्ध भडकत होते .
छत्रसाल आपल्या दोन मोठ्या भावांच्या मान सन्मानाची काळजी घेत असे. दरबारात त्यांची सिंहासने होती. त्यांनी अनेक कवींना दरबारात स्थान दिले .लाल कवीने “छत्रप्रकाश” शिर्षकाचे राजाचा काव्यात्मक इतिहास लिहिला. छत्रसाल स्वतः कवी असल्यामुळे ते कवींचा आदर करीत होते. लाल कवीच्या खालोखाल बक्षी हंसराज कवी छत्रसालांचा आवडता कवि होता. त्याने स्वामी प्राणनाथांच्या जीवनावर “मेहराज चरित्र” नावाचे काव्य लिहून छत्रशहालांना प्रसन्न केले.
स्वामी प्राणथांच्या निर्देशाप्रमाणे छत्रसाल शिक्षण, धर्म, ज्ञान, कला, साहित्य वगैरे विविध क्षेत्रातील विद्वानांना पन्ना दरबारात आणण्याचा प्रयत्न करीत होते. चर्चासत्र भरवत. स्वतः कवी असल्यामुळे कवितेच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करीत असत.
अशाच एका चर्चासत्रात छत्रसालांनी धर्म, नीती, दंडनीती या वरची कविता वाचून दाखवत असताना, द्वारपाल्याने मऊहुन आलेल्या दोन सैनिकांना त्याच्यापुढे त्यांच्यापुढे हजर केले. त्यांनी बातमी दिली की, मोगल फौजदार शेर अफगाण प्रचंड सेनेसह वादळी वेगाने मऊवर आक्रमण करण्यास येत आहे. सध्या मऊमध्ये फारच थोडे सैन्य असल्यामुळे या प्रचंड लाटेचा सामना करू शकणार नाही.
छत्रसाल आश्चर्यचकित झाले. त्यांना बातमी होती की, औरंगजेब सध्या दक्षिणेकडे गुंतला असल्यामुळे, इकडे कसे काय सैन्य पाठवले? बल दिवाण म्हणाले, अशीही शक्यता असू शकते की, बादशहाला खुश करण्यासाठी फौजदाराने हा निर्णय स्वतः घेतला असेल. ते काहीही असो,
त्याने मऊवर हात घालण्याआधी आपले सैन्य मऊला पोहोचले पाहिजे. मग एका दिवाणाला सांगितले, तुम्ही राण्या, मुलांना घेऊन कलिंजर किल्ल्यावर जा. माधांताच्या संरक्षणात हे सुरक्षित राहतील. पन्नाच्या सुरक्षेतेसाठी काही सैन्य ठेवून छत्रसालांनी सैन्यासह मऊकडे कुच केले. पण त्यापूर्वीच फौजदार शेर अफगाण मऊला पोहोचून मऊच्या गढीला घेराव घातला होता.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २३.
बुंदेले संकटात सापडले होते. ७०० बुंदेले सैनिक धारातीर्थी पडले होते. छत्रसालांनी थोडी माघार घेऊन मोगलावर हल्ला करण्याची तयारी सुरू केली, पण गरजच पडली नाही. शेर अफगाण आर्थिक अडचणीत पडला. बादशहा दूर तिकडे दक्षिणच असल्यामुळे मदत येण्याची अपेक्षा नव्हती. म्हणून त्याला घेराव उठवावा लागला. मऊचा ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा प्रकाशित झाला.
तिथली व्यवस्था लावून छत्रसाल पन्नाला आले. तोच आणखी एक संकट उभे राहिले. शत्रसाला मऊ मध्ये अडकल्याची संधी साधून इटावाचा फौजदार खैरन्देशखानने कलिंजरवर आक्रमण केले. कलिंगजरला छत्रसालाचा परिवार होता. माधांतासारखा शूर किल्लेदार तिथे असला तरी, गप्प बसता येणार नव्हते. दुसऱ्याच दिवशी सैन्य कलींजर कडे रवाना झाले. माधांता चौबेसाठी ही घडी मोठी परीक्षेची होती. राज परिवार किल्ल्यात अडकला असल्यामुळे परिस्थिती नाजूक होती. काहीही झाले तरी किल्ला शत्रूच्या हाती जाऊ द्यायचा नाही. मोगल सैन्याने किल्ल्याला तिन्ही बाजूने घेराव घातला होता. सिंहद्वार तोडण्याचा प्रयत्न केला, पण द्वार अतिशय मजबूत असल्यामुळे मोडू शकले नाही. फौजदार खैरन्देशखानने दोरीच्या साह्याने किल्ल्यात उतरायचा आदेश दिला. माधांता सावध होताच. त्याला कल्पना होती की शत्रुसैन्य दोराच्या साह्याने येऊ शकतील. त्यांनी सगळ्या बुरुजावर तिरंदाज सैनिकांना तैनात केले. तो स्वतः खाली असलेल्या शत्रूंवर बाणांचा वर्षाव करीत होता. कोणी मदतीला येऊ शकतील की नाही, पण त्याला अंतिम क्षणापर्यंत किल्ल्याचे रक्षण करायचे होते.
पाच-सहा दिवसांनी छत्रसालचे बुंदेल सैन्य किल्ला चढत असलेले दिसते. माधांताच्या सैनिकात उत्साह पसरला. हर हर महादेवाच्या घोषणांनी किल्ला दणाणून गेला. छत्रसालचे सैनिक व माधांताच्या सैनिकापुढे मोगल सैन्यांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. खैरन्देशी जीव वाचवून पळून गेला. मोठ्या संख्येने त्याचे सैन्य मारले गेले. हर हर महादेव आणि छत्रसालांच्या जयघोषाने वातावरण दुमदुले. पुढे होऊन महाराज छत्रससालांनी माधांताला हृदयाशी धरले. म्हणाले, माधांता, तुम्ही पुन्हा एकदा पराक्रमाचा परिचय दिला. तुम्ही राज परिवाराचे रक्षण करून फार मोठे उपकार केले.
कलिंजरची सुरक्षा व्यवस्था करून छत्रसाल कुटुंबासह पन्नाला आले. दोन्ही राण्यांनी आपल्या दोन्ही पुत्र हिरदेशहा आणि जगतरायाचा विवाह करण्याचा आग्रह धरला. चांगल्या मुली बघून दोन्ही मुलांचे विवाह करून दिले. सध्या कोणताच संघर्ष नसल्यामुळे सगळ्यांनीच विवाह उत्साहाचा निर्भेळ आनंद घेतला.
एके दिवशी सूचना मिळाली, स्वामी प्राणनाथांनी इहलोकाचा निरोप घेतला. ऐकून छत्रसालांना अतिशय दुःख झाले. ताबडतोब राज परिवारासह धामणघरकडे गेले. सगळ्यांच्या उपस्थितीत स्वामींना समाधी दिल्या गेली. समाधीवर एक ओटा बांधला. समाजाला जागृत करणारे, भारतीय समाजाच्या एकतेच स्वप्न पाहणारे आज चिरनिद्रा घेत होते. पण त्यांची शिकवण जिवंत होती. छत्रसालांनी समाधीपुढे शपथ घेतली, ते धर्म, जात, वर्गामध्ये भेदभाव करणार नाही. आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत व सैन्यात सर्वच प्रकारच्या लोकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल. एका आम्रवृक्षा खाली बसून छत्रसाल आपले गुरु प्राणनाथांचे ध्यान करीत बसत असे.
काही दिवसांनी छत्रसाल धामणघर मधून पन्नाला परत आले. रतनशहाने बातमी दिली की, अहमदनगर मध्ये बादशहा औरंगजेबाचा मृत्यू झाला. सुस्कारा टाकून छत्रसाल म्हणाले, चला एका मोठ्या संकटातून सुटका झाली. अनेक वर्ष आपण त्याच्या दहशती, भीती खाली वावरत होतो.
आता उत्तराधिकारासाठी संघर्ष सुरू होईल. प्रत्येक शहजादा उत्तराणधिकारी बनण्याचा प्रयत्न करतील. या युद्धात फर्मान काढून त्यांचे बाजूने लढण्याचे फर्मान कधीही येऊ शकेल की, फौज घेऊन तयार रहा. आणि आमच्या बाजूने लढा. छत्रसाल चिंतित स्वरात म्हणाले, कोणताही निर्णय घाईने घेण्यापेक्षा आपण अलिप्त रहावे.
छत्रसालांचा अंदाज खरा ठरला. दोन्ही शहजाद्यांनी छत्रसालला आपल्या बाजूने येण्याचा संदेश पाठवला. पण छत्रसाल तटस्थ राहिले.
तेवढ्यात एक अतिशय वाईट घटना घडली. छत्रसालांची मोठी राणी देवकुवर आजारी पडली. केलेल्या उच्चारांनी काहीच फरक पडला नाही. आणि तिकडे सूर्यास्त झाला आणि इकडे छत्रसालाच्या जीवनात अंधकार पसरला. राजमहाल दुःखात बुडाला. शहरात बातमी कळल्याबरोबर झुंडीने लोक राजवाड्याकडे येऊ लागले. छत्रसाल रात्रभर त्यांच्या सर्वात आवडता राणीच्या शवाजवळ बसून अश्रू ढाळत होते. हा त्यांच्यासाठी फार मोठा आघात होता. दोघांचे आचार विचार जुळत होते. त्यांचे तिच्यावर निरतिशय प्रेम होते. मिळालेला रिकाम्यावेळी ते तिच्यासोबतच घालवीत असत. इतर राणांच्या सवती मच्छराकडे ते दुर्लक्ष करीत असत.
छत्रसालांना दुःख करीत बसायलाही वेळ मिळाला नाही. शेवटी मन घट्ट करून आपल्या परिवारासह पत्नीचे अंतिम संस्कार केले. दहावा, तेरावा केला. राजधानी पन्ना मध्ये सगळे वातावरण गंभीर झाले होते.
कदाचित ही दुःखद स्थिती काही दिवस राहिली असती पण, मोगल सिंहासनासाठी संघर्ष तीव्र झाला. कोणत्याही पक्षाचे छत्रसालला बोलावणे येऊ शकत होते. राजाने आपल्या सैन्याची जुळवाजुळ करायला सुरुवात केली.
सैन्याची पुनर्गठण करून छत्रसाल महालात आले. तर त्यांची मधली राणी दानकुवारी उदास होऊन बसली होती. छत्रसालांनी उदासीचे कारण विचारल्यावर ती तिरकस भाषेत बोलू लागली….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २४.
मधल्या राणीचे तिरकस बोलणे एकू छत्रसालांना मोठी राणी देवकुंवरची तीव्रतेने आठवण झाली. ते बाहेरून येताच ती किती तत्परतेने त्यांचे स्वागत करत होती. आणि ही मधली राणी? तिचा रुक्ष व्यवहार पाहून ते मनोमन दुखी झाले. म्हणाले, बोला.. काय ते स्पष्ट. माझ्याकडे वेळ नाही.
तुमच्याकडे वेळ फक्त मोठ्या राणीसाठीच होता. मला महालाचा एक कोपरा दाखवला. तसं नाही. तू बुंदेलखंडाची राणी आहेस. तुझे वागणे आदर्श असायला हवे. होतकरू तरुण निर्मळ मनाच्या जगतराजची तू आई आहेस. त्याची आईला शोभेल असे बोल.
त्याच्याबद्दलच बोलायचे आहे. त्याच्याबद्दल काय विचार केला आहात? छत्रसाल म्हणाले, दोन्ही पुत्र युद्ध कलेत निपुण झालेत. पुढच्या लढाईत हिरदेशहा बरोबर त्यालाही पाठवू. राणी म्हणाली, त्यांचे वर राज्याची जबाबदारी टाकायची तर हिस्सेवाटणीचा विचार करायला हवा .छत्रसाल म्हणाले, ठीक आहे. राज्याच्या देखरेखेसाठी बुंदेलखंडाचे दोन सुभे करतो. रिवा इलाहाबाद पासून पन्ना नौगाव पर्यंतचा पूर्व इलाका हिरदेशाहाच्या अख्त्यारीत राहील आणि पश्चिमेकडचा दौंस पर्यंतचे सर्व इलाके जगतराजच्या देखीरेखेखाली राहतील. राणी म्हणाली, हे आजची झाले. उद्याचे काय? तुमच्या नंतर बुंदेलखंडाचे दोन भाग विभाजित होईल? एका भागाचा राजा हिरदोसशहा आणि दुसऱ्याचा जगतराज होईल? नाही.. कधीच नाही. बुंदेलखंड एक आणि अखंडच राहील. छत्रसाल म्हणाले.
राणी भडकून म्हणाली, असे कसे? परंपरेनुसार जेष्ठ पुत्रच राज्याचा उत्तराधिकारी असतो. नाही राणी. जगतराज मोठा असला तरी, मोठ्या राणीचा पुत्र हिरदेशाहाच राजा होईल. असा निर्णय कसे करू शकता? कसं करू शकतो? बिलकुल करू शकतो. आतापर्यंत तुझा पती म्हणून बोलत होतो. आता राजा म्हणून निर्णय ऐक. माझ्या नंतर बुंडेलखंडाचा राजा हिरदेशहाच होईल. आणि राजाचा निर्णय अंतिम असतो.
राणी अतिशय संतप्त झाली. पण पुढे वाद घालण्याची हिम्मत तिच्यात नव्हती. शेवटी राणीचे पद या राजामुळेच मिळाले. ते तिला घालवायचे नव्हते. नंतर छत्रसालने तिची समजूत घालत म्हणाले, दोन्ही पुत्रावर सारखे प्रेम कर. तुला काही कमी पडणार नाही.
छत्रसाल दिवाणखान्यात निघून गेले तोच, अंगद आला. छत्रा, काळजीत दिसतोस. काय झाले? अरे दादा! आतापर्यंत तटस्थ राहण्याचा निश्चय होता. पण आता औरंगजेबचे दोन्ही शहजादे दबाव आणत आहे. एकाची बाजू घेतली तर, दुसरा नाराज होईल. ज्या शहाद्याची बाजू घेऊ तो त्याच्या लढाईत सामील होण्याचा हुकूम करेल. आणि आमच्या सैनिकांचा र्हास होईल. म्हणून तटस्थ राहणार होतो. पण तेही शक्य नाही. आपली इच्छा नसताना आपल्याला दुसऱ्यासाठी युद्ध करावे लागेल. तटस्थ राहावे तर दोन्ही पक्ष नाराज होतील. कोणत्या पक्षात जावे? अंगद म्हणाले, पुढे बहादूर शाह बादशहा होण्याची शक्यता आहे. त्याचेच पारडे जड आहे. तसे त्याने स्वतःला बादशहा घोषित केले आहे. त्यांची अशी चर्चा सुरू असतानाच, द्वारपालाने सूचना दिली. मोगलांचे नायक मुनीरखान आपल्या भेटीस आले आहेत. क्षणभर विचार करून त्याला घेऊन यायला सांगितले.
मुनीरखान बैठकीत आला. अभिवादन करून म्हणाला, बादशहाने आपल्याला अनेक वेळा भेटीस बोलवूनही आला नाही. ते तुम्हाला प्रत्यक्ष भेटू इच्छितात. म्हणून मला पाठवले आहे. तुम्ही त्यांना भेटून निराश होणार नाही.
छत्रसाल म्हणाले, आम्हाला अंगरक्षक किंवा शस्त्र घेऊन भेटता येणार नाही. अशात जर बादशहाची नियत फिरली तर? औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कसा व्यवहार केला होता हे जगजाहीर आहे. मुनिरखान म्हणाले, पूर्वी हिंदुस्थानात एकाच बादशहाचे वर्चस्व होते. आता शहजादांना सिंहासन मिळण्याची काळजी आहे. त्यांना आपली शक्ती वाढवायची आहे. अशावेळी ते असं काहीही करणार नाही. त्याने व्यवस्थित शंकेचे निरसन केल्यावर नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांचे सोबत उभे राहिले तर बुंदेलखंड त्यांच्या प्रकोपातून तरी वाचेल. हा विचार करून अंगद म्हणाले, आम्ही त्यांची भेट घेऊ पण सोबत अंगरक्षक व शस्त्र राहतील.
मुनीरखानने तोडगा काढला. म्हणाला, त्यांना राजधानीत भेटण्याऐवजी छावणीत भेटा. मी तसे बादशहाला सांगेल की, छत्रसाल आपल्या सैन्यासह मदतीला आले आहेत. मग सैनिकी वेशात शस्त्रासह त्यांना भेटू शकता. ठीक आहे. तुम्ही भेटीची व्यवस्था करा. आम्ही कुठे व केव्हा यावे ते कळवा. तुम्ही माझे म्हणणे मान्य केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. असे म्हणून म्हणून मुनीरखान सलाम करून निघून गेला.
काही दिवसांनी मुनिरखानचा निरोप आला. बादशहा कामबक्षविरुद्ध मोहिमेवर दक्षिणेत जात आहे. रस्त्यात एका मुक्कामात त्यांनी बादशहाला भेटावे.
छत्रसाल मुलगा हिरदेशाह सोबत ठरलेल्या ठिकाणी छावनीत पोहोचले. मुनिरखानने त्यांची भेट बादशहाशी घालून दिली. छत्रसारासारखा प्रभावी राजाला आपल्या अधीन पाहून बादशहा खुश झाला. छत्रसालाच्या सन्मानार्थ त्याने छत्रसालला “राजाची” पदवी बहाल केली. अप्रत्यक्षपणे त्याने छत्रसालांना बुंदेलखंडाचा राजा म्हणून स्वीकारले. ५००० जात आणि ४००० स्वारांचा अधिकारी केले. त्यांचा मुलगा हिरदेशहाला सुद्धा अधिकार व उपहार दिले. छत्रसाल मनोमन खुश होते की, बादशहाने त्यांना दक्षिणेत चालण्याविषयी किंवा युद्धाविषयीची जबाबदारी टाकली नव्हती. तरीही त्यांना पुन्हा बादशहाला भेटावे लागणार होते.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २५.
दोन वर्षांनी बादशहाला भेटण्याचा प्रसंग आला. कामबक्षाला पराजित करून, बादशहा उत्तरेत जात असताना मुनीमखानचा निरोप मिळाला. छत्रसालांनी आपला मुलगा पदमसिंहाला पाठवून आपण येत असल्याचे बादशहाला कळवले.बादशहाने त्यांचा सन्मान करण्यासाठी बक्षी उल मुल्कला पाठवले. यावेळी छत्रसालने बादशहाला नजराना म्हणून शंभर अशरफी, १००० रुपये, पाच बंदुका आणि एक रत्नजडी तलवार भेट दिली. छत्रसालांच्या औदार्याने बादशहा प्रसन्न झाला. बादशहाने छत्र सालाला सोन्याच्या भिकबाळ्या दिल्या. छत्रसाल सैन्यासह पन्नाला परतले.
युद्धात जगत राज जखमी झाल्यामुळे छत्रसाल त्याच्याजवळ बसून होते. त्याची आई ही होती. तिने पुन्हा जुना विषय काढला. तुम्ही जगतराज बद्दल काय विचार केला? छत्रसाल म्हणाले, तुला मागे सर्व स्पष्ट सांगितले. माझे सर्व मुलांवर सारखेच प्रेम आहे. सर्व पुत्रांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्यात. मात्र बुंदेलखंडाचा राजा हरदोसच होईल.
जगत राज सारे ऐकत होता. आपल्या आईची वागणूक त्याला बिलकुल पसंत पडली नाही. तो म्हणाला, आई, बाबा समर्थ आहेत. आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे, आज्ञाचे पालन आपण केले पाहिजे. फणकार्याने ती निघून गेल्यावर, जगतराज म्हणाला, बाबा खूप दिवसांपासून मला एक गोष्ट बोलायची होती. आज्ञा असेल तर…
अरेऽ, वडिलां जवळ कशाला संकोच? आज्ञा? आग्रह करायचा असतो. सांग.. काय सांगायचं? तू पूर्ण बरा होईपर्यंत नवीन काम हाती घेणार नाही. सांग… बाबा, तुमचा भूतकाळ जाणून घ्यायची इच्छा आहे. तुम्ही शिवाजी महाराजांना भेटायला गेले होते, त्यांच्या विषयी जाणून घ्यायचे आहे. सांगेल. नक्की सांगेन. सांगायला खूप वेळ लागेल. आधी तू बरा हो. नाही… तुम्ही फार मोठे साहित्यकार आहात. तुमचे चरित्र तुम्ही लिहिले तर ,जगासाठी ते अमूल्य ऐतिहासिक साहित्य ठरेल. जगतराज आग्रह करत म्हणाला. हे बघ जगत. सध्या तरी वेळ नाही. डोक्यात अनेक विचारांची गर्दी आहे. मोगल शहाजादे शक्तिप्रदर्शन करीत आहे. ते आपल्याला दरबारात कधीही हजर राहायला सांगतात. आपले अस्तित्व कायम ठेवून, निष्ठा प्रदर्शित करण्यात सगळी शक्ती व्यर्थ जात आहे. नाही बाबा…. मी आता नाही म्हणत. मी तुमच्यापासून लांब सुभेदारी सांभाळेल तेव्हा तुम्ही पत्राद्वारे तुमच्या जीवनातील प्रसंग कळवत जा.
काही दिवसांनी जगत राज बरा झाला. पण आकाशात संकटाचे ढग जमले होते. छत्रसालाचा तिसरा मुलगा पदम सिंह धामौनी मध्ये फौजदार होता. तो काही सूचना घेऊन आला. बादशहा बहादूर शहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहांदारशाह गादीवर बसला. शहजादा फारूक सिअरने त्याला पराजित करून, स्वतः दिल्लीच्या सिंहासनावर बसला. तो सगळ्या राजांना दरबारात हजर होण्याचा आदेश देईल, म्हणून आपल्याला सावध करण्यास आलो.
निर्णय टाळता येणार नाही म्हणून, छत्रसाल उदास झाले. पद्म, मोघलांना निष्ठा दाखवणे, फार महागात पडते. त्यांच्या सतत अपेक्षा असतात, दरबारात हजेरी लावणे, त्यांच्या युद्धात आपल्या सैन्यासह सामील होऊन लढाई जिंकून दाखवावी लागते. देखावा करून चालत नाही. मोगल फार धूर्त आहेत. ते आमच्या सैन्याला आघाडीवर ठेवतात. जेणेकरून आम्ही व आमचे सैन्य मारले जावे. नियमित कर द्यावा लागतो. लढाईसाठी झालेल्या खर्चाच्या वेगळा संदेश. आणि या खर्चाच्या बदल्यात ते काय देतात तर, फक्त आश्वासन. आम्ही तुमच्या राज्याला हात लावणार नाही.
मोठ्या कष्टाने बुदलांसाठी एक एक राज्य स्थापन केले. मोगलांनी ते घेऊ नये म्हणून, मन मारून त्यांच्या दारात उभे राहतो. छत्रसालने आपली व्यथा, विवशता व्यक्त केली .
शेवटी बादशहा फारूक सिअरचे राजा छत्रसालने दरबारात उपस्थित राहण्याचे फरमान आलेच. छत्रसाल आपल्या सैन्यासह आग्र्याजवळील मोगल छावणी हजर होऊन बादशहाला काही सुवर्ण मुद्रा भेट देऊन सहयोग करण्याचे आश्वासन दिले. त्यांना दरबारात आलेले पाहून बादशहा खूप झाला. त्याने ५००० जात आणि चार हजार स्वरांच्या अधिकाराने सन्मानित केले. व आदेश दिला की, माळव्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजा जयसिंहाला मदत करा.
बादशहाच्या आदेशानुसार छत्रसाल माळव्यात आले. आणि तिथेच अडकून पडले. त्या चक्रव्यूहातून त्यांना बाहेरचा पडता येईना. अफगानांना हाकलून लावण्याची जबाबदारी जयसिंगाने छत्रसालावर सोपवली. त्यांचा बंदोबस्त करेपर्यंत मराठी फौजा येऊन पोहोचले. त्यांनी उज्जैन, धार आणि मांडूच्या आसपास धुमाकूळ घातला.जयसिंग आणि छत्रसालने त्यांना घेरुन त्यांना माळव्याच्या बाहेर घालवले. इकडे दिलेरखान आणि अफगाणांनी बाबू जाटा बरोबर भेळसाच्या जवळ उपद्रव सुरू केला.
धामौनी आणि आसपासचा इलाका छत्रसालाच्या ताब्यात होता. त्यांनी हीरदेशला या विद्रोही लोकांना बाहेर काढण्याचा आदेश दिला. मराठी आणि अफगाण विरुद्ध छत्रसालने केलेल्या मोहिमामुळे बादशहा प्रसन्न होऊन त्यांनी छत्रसालांना पुरस्कार दिलेत.
छत्रसारालांनी त्यावेळी बादशहाला विनंती केली, आमचे काही परगाण्यावर बुंदेलांची हुकमत आहे. ते परगाणे आपण मुहमद बंगषला दिल्यामुळे आपसात लढाया होऊ शकतात. तरी …
बादशहा म्हणाला, साऱ्या हिंदुस्तान वर मोगलांची सत्ता, हुकमत आहे. काही लोकांनी काही प्रांतात स्वतःला सत्ताधारी मानने चुकीची आहे. तुमच्यासारख्या लोकांनी मोगलांशी प्रामाणिक राहिल्यामुळे आम्ही दुर्लक्ष केले. तरी मुहम्मद बंगषला सांगू, तुमच्या इलाख्याला तोशीस देऊ नये.
बादशहाच्या आश्वासनाने छत्रसाचे समाधान झाले नाही. फारूक सियरच्या दरबारात आल्याचा त्यांना पश्चाताप झाला. पण सध्या इतके झाले की, बादशहा प्रसन्न असल्यामुळे बुंदेलखंड मुक्त राहील. अनुमती घेऊन ते पन्नाला परत आले.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.







