आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

राजा छत्रसाल चरित्र भाग ४, (१६ ते २०)
सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! राजा छत्रसाल म.!!!
भाग – १६.
दानकुंवरची पालखी सैनिक तुकडीसह राजवाड्याच्या दारात पोहोचली. दानकुवारी बाळाला घेऊन पालखीतून उतरली. देवकुंवरने त्या दोघांना औक्षण केले. त्या रात्री नातेवाईक, गावकरी, सैनिक जेवण करून तृप्त झाले. बारसे झाले. बाळाचे नाव जगतराज ठेवले.
दुसऱ्या दिवशी पूजाअर्चा झाली. नंतर नजराणे देण्याचा कार्यक्रम झाला. सर्वात शेवटी आपला मुलगा विक्रमसह बासांची राणी आली. रत्नांचा चंद्रहार बाळाच्या गळ्यात घातला. वस्त्र, आभूषणे दानकुंवरला भेट केली. सोन्याची जाड माळ छत्रसालला दिली. शेवटी गळ्यातला रत्नहार काढून देवकुंरच्या गळ्यात घातला. नंतर छत्रसाल जवळ येऊन म्हणाली, आपण जो बुंदेलखंड स्थापनेचा संकल्प केला तो पूर्ण होईल असा माझा मनापासून आशीर्वाद आहे.
छत्रसाल राणीच्या वर्तणाने प्रभावित झाले. आसनावरून उठून घोषणा केली की, राजमाता ह्या राजमाताच राहतील. बासांची ही जहागीर विक्रमजीतच्या नावे परत करीत आहोत. तुमचा सेनापती आमच्या देखरेखेखाली या जहागिरीची व्यवस्था व संरक्षण करेल. आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी जवळपासची शंभर गावे या राज्याला जोडण्याची मी घोषणा करतो. राजमाताला बोलायचे खूप होते. पण गहीवरल्यामुळे शब्द उमटत नव्हते. अधोवदन त्या उभ्या होत्या.
रतनशहा व अंगदला जिंकलेला प्रदेश परत करणे पटले नाही. त्यांना हे माहीत नव्हते की, राज्यासाठी जेवढे शौर्य, धाडस, पराक्रम महत्त्वाचे आहे, तेवढेच दया आणि करूणाही आवश्यक आहे .
फेब्रुवारी १६७३ मध्ये मोहिमेवर जाण्यास सैन्य सज्ज झाले. धामौनीच्या बचावासाठी मोगलांनी सर्व शक्ती एकवटली होती. या त्याच्या मजबूत असलेल्या छावणीला हात न लावता, लहान-मोठे ठाणे, कमकुवत सुभे यावर आक्रमण करायचे ठरले. सर्वात आधी पठारीला लुटून सागर जिंकून पठाणकोट वर ताबा मिळवला. हा किल्ला मजबूत असल्याने, तात्पुरते सैनिक मुख्यालय केले. तिथे देवकुवर व
दानकुवरला बोलावून घेतले. देवकुवर बरोबर थोडा वेळ घरगुती बोलणे झाले. तोच रतनशहा येऊन म्हणाले, आपल्या आक्रमणामुळे सगळीकडे खळखळ माजली आहे. औरंगजेबने धामौलीला पाठवलेल्या सहेल्लाखानला आदेश दिला की, छत्रसालने जिंकलेला सारा प्रांत जतिया आणि चंदेरीच्या राजाच्या सहाय्याने पुन्हा जिंकून घ्यावा.
दुसऱ्या दिवशी बैठक बोलावण्यात आली. आक्रमणाची रूपरेषा आखण्यात आली. एक महिन्याच्या आत कुच करायचे ठरले. तेवढ्यात बातमी आली सहेल्ला खान मोठी फौज घेऊन गढकोटाकडे निघाला. त्याच्याशी मुकाबला करून त्याचे बळ कमी झाले. तो स्वतःचा जीव वाचून पळून गेला. छत्रसालच्या हाती मोठा खजिना लागला. नंतर ते ग्वाल्हेरकडे वळले. आधी त्यांनी नरवर जिंकले.
तेवढ्यात त्यांना बातमी मिळाली, मोगलांचा मोठा खजिना शहांजहानाबादहुन दक्षिणेकडे जात आहे.
छत्रसालने योजना बनवून मोगल तांड्यावर आक्रमण केले. बरीचशी फौज मारल्या गेली. जे जिवंत राहिले ते पळून गेले. वीस घोड्यावर लादलेला मोठा खजिना छत्रसालच्या हाती लागला. संध्याकाळी सर्व सैनिकांना गोडा धोडायचे जेवण दिले. आणि घोषणा केली की. खजिन्यातील एक तृतीयांश भाग सैनिकांचा पगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या पालन पोषणासाठी वेगळा ठेवला जाईल. या गोष्टीने सैनिकांमध्ये अधिकच उत्साह संचारला. सैनिकांच्या मनात छत्रसाल बद्दलची निष्ठा वाढली. मोगलांचा खनिजा लुटणे साधारण घटना नव्हती.
छत्रसालच्या नशिबाने साथ दिली. मोघलांचा तोफखान्याला आग लागली. सगळी छावणी स्फोटांनी हादरली. सगळीकडे आग पसरली. सैनिक, घोडे, हत्ती, युद्ध सामग्री आगीच्या भस्म स्थानी पडू लागली. वरून बुंदेली सैनिकांच्या बाणांचा, बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव. उरले सुरले मोगल सैनिक पळून गेले. छत्रसालची हिम्मत वाढली. विजयाची घोडदौड करत गरौठ, जीरोन, जतारा आणि कचनना पुरच्या जहागिरी जिंकल्या. आणि ओरछाच्या पश्चिमेकडे मुक्काम केला.
ओरछाचा राजा इंद्रमणीने मैत्रीचा संदेश पाठवून मोठी खंडणी पाठवली. व यापुढे छत्रसालला मदत करण्याचे आश्वासन दिले. रतनशहा आणि अंगदने छत्रसालला म्हणाले, इंद्रमणि विश्वासू नाही. सध्या त्याच्या मदतीला मोगल नसल्यामुळे या संधीचा फायदा घेऊन ओरछा आपल्या ताब्यात घेतला तर, चंदेरी आणि दतीयाचे राजे घाबरतील.
छत्रसाल विचार करून म्हणाले, घाई करणे योग्य नाही. चंदन दतिया, ओरछाचे राजे कसेही असले तरी ते बुंदीले आहेत. त्यांना आपण जिंकले तरी त्यांना ताब्यात ठेवून शकणार नाही. तेवढे सैन्य साधनसामग्री आपल्याजवळ नाही. ते आपल्या कचाट्यातून जातील कुठे? त्यांनी खंडणी पाठवली म्हणजे त्यांनी आपली अधिनता स्वीकारली आहे. नाईलाजाने छत्रसालाच्या निर्णयाला सहमत व्हावे लागले.
आता त्यांचे लक्ष होते पन्ना. पन्नाचा गौड राजाला मोगलांचे संरक्षण नसल्यामुळे, त्याला सहज ताब्यात घेता आले. त्याचा मान राखण्यासाठी जवळची लहान जहागिरी दिली. नाही दिली असती तर त्याने गेलेला प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न केला असता.
छत्रसालने पन्नाला आपले मुख्यालय बनवले. त्यांनी आपल्या दोन्ही राण्यांना बोलावून घेतले. देवकुवर आई बनणार आहे या बातमीने त्यांना आनंद झाला. योग्य वेळी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात केला. एकांता दोघे बसले होते. हास परिहास चालू होता. देवकुवर लाजेने चूर होत होती. छत्रसाल म्हणाले, माझी फार दिवसांची इच्छा पूर्ण होत आहे. आता दुप्पट जोमाने बुंदेलखंड राज्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामाला लागेन. देवकुंवर म्हणाली, आता मग सगळे लक्ष पन्ना सुरक्षित ठेवण्याकडे दिले पाहिजे. तसेच जिंकलेली ठिकाणांची सुरक्षित व्यवस्था करायला हवी. बरोबर आहे तुझे म्हणणे. पुढे पाठ मागे सपाट असे व्हायला नको. जिंकलेल्या प्रदेशात आपल्या सैन्याची मोर्चेबंदी आवश्यक आहे. ती म्हणाली, शत्रूला तुम्ही औदार्य दाखवता, पण तुमच्या भाऊबंदालाही जहागिरीची अपेक्षा असेल, याचाही विचार व्हावा.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – १७.
छत्रसाल आणि देवकुवर बोलत असतानाच शिपायाने निरोप दिला की, एक तरुण खूप लांबून येऊन आपली प्रतिक्षा करीत आहे. छत्रसाल बाहेर आल्याबरोबर त्या तरुणाने नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम केला. आपला परिचय देत म्हणाला, माझे नाव गोरेलाल. दक्षिणेकडे आंध्र प्रदेशाच्या महेंद्री प्रदेशात वास्तव्य आहे. आपल्या नावाचा बोलबाला ऐकून दर्शनासाठी आलो. छत्रसालच्या लक्षात आले तो तरुण आश्रय शोधायला आला. छत्रसालने विचारले, तुम्ही काय करू शकता? सैन्यात भरती व्हायचे की आणखी काही? तो तरुण म्हणाला, मला कविता करण्याची हौस आहे. आपल्यासारख्या वीर स्वाभिमानीनाचा आश्रय मिळाला तर, माझी काव्य यात्रा सुरू होईल. आपण समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांचे प्रोत्साहन घेऊन बुंदेलाची अस्मिता आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करत आहात. आपला संघर्ष यात्रेचा इतिहास काव्यात लिहावा अशी इच्छा आहे. अर्थात आपली आज्ञा असेल तरच. आपण विजयाचा इतिहास घडवा. मी त्याला वाणी देईल. प्रत्येक मोहिमेत मी आपल्या सोबत असेल. आपल्या सर्व हालचाली कवितेत उतरवेन.
छत्रसाल म्हणाले आम्ही तुम्हाला “लाल कवी” नावाने संबोधू. छत्रसालांनीनी त्यांना “दरबारी कवी” म्हणून मान्यता दिली. व त्याच्या राहण्या खाण्या पिण्याची, पगाराची व्यवस्था केली.
मोठी राणी देवकुंवरला पुत्ररत्न प्राप्त झाले. सव्वा महिना उत्सव चालला. जेवणावळी उठल्या. बाळाचे नाव “हिरदेशाह” ठेवण्यात आले. पन्नाच्या राजवाड्यात दोन बाळांच्या बाल लींलाने सर्वांना प्रफुलित केले.
रतनशहा आणि अंगद छत्रसालच्या कक्षात प्रवेशले. छत्रसाल म्हणाले, आता आराम खूप झाला. आता मोहिमेचा विचार करायला हवा. सध्या तू युद्धात उडी घ्यायची नाही. आम्ही दोघे भाऊ पुरेसे आहोत. रतनशहा म्हणाले, एक आनंद वार्ता आहे. पृथ्वीराज, अमरदिवाण कटेरा आणि शहागडचे जमीनदार ससैन्य आपल्या मदत करायला तयार आहे. आणखी एक बातमी आहे. साबरचे जागीरदार किरतसिंहांनी आपल्या मुलीचा प्रस्ताव तुझ्यासाठी पाठवला आहे. हे काय बोलता? माझी दोन लग्न झाली आहे. अरेऽ, छत्रा, या प्रकरणाकडे फक्त व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहू नकोस. या नातेसंबंधांमुळे आपली सत्ता आणि शक्ती मजबूत होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय दृष्टीने अनेक विवाह केलेच होते ना? शिवाय किरण सिंह अतिशय झुंजार आणि स्वाभिमानी आहेत. किरण सिंहाकडे २५-३० बहादूर शस्त्रधारी आणि अडीच हजारच्या जवळपास सैनिक आहेत. ते मुलीकडचे असल्यामुळे आपल्याशी आयुष्यभर निष्ठावान राहतील. एका लग्नाने हे सर्व घडत असेल तर विचार करायला हवा.
हे बघ छत्रा, दतिया चंदेरी ओरछाचे राजे आपले शत्रू आहेत. त्यात बादशहाने तहव्वर खान सारखा झुंजार युद्धाला बुंदेलखंडात नियुक्ती केले आहे. आज ना उद्या त्याच्याशी सामना करावा लागेलच. तेव्हा या सर्व दृष्टीने विचार कर. छत्रसाल म्हणाले, मोठ्या राणीला विचारून सांगतो. ठीक आहे. संध्याकाळपर्यंत कळव, म्हणून दोघे भाऊ निघून गेले. तोच शेजारच्या दालनातून देवकुंवर येऊन म्हणाली, स्वामी, मी सारं ऐकलं आहे. तुम्ही विवाहाचा निर्णय घ्यायला हरकत नाही. हे तू काय बोलतेस देवी? एक सवत कमी पडली का? परिणाम तुझ्यावरच होईल. स्वामी, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची ही वेळ नाही. आपली शक्ती वाढवण्यासाठी अशी संधी सोडायची नाही. जोवर स्वतंत्र राज्य होत नाही तोवर तुमचा संघर्ष चालू राहणार आहे. त्या साठी मोठ्या सैन्याची गरज आहे. देवकुवरच्या बलिदानाने छत्रसाल भारावून गेले.
विवाह साबरला करायचे ठरले. दोन्ही पक्षी लग्नाची तयारी सुरू झाली. तेवढ्यात गुप्तहेराने बातमी आणली, तहव्वरखान मोठ्या फौजेनेशी तुफान वेगाने साबरकडे येत आहे. छत्रसालने आपल्या सैनिकांना सावध केले. त्यांनी युद्धात भाग घेतो म्हटल्यावर, दोन्ही भावांनी निक्षून मनाई केली. छत्रसाल द्विधामुळे मनःस्थितीत असताना, किरण सिंह समोर येऊन अतिशय विनयाने म्हणाले, आम्ही मुलीकडचे. लग्नाची सारी तयारी झाली. काही विधीही झाल्यात. हा आमच्या मानसन्मानाचा, मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे. एकदा सप्तपदी होऊन जाऊ द्या. बराच खल झाल्यावर असे ठरले की, सप्तपदी होईपर्यंत किरतसिंहाचे २५ जांबाज योध्दे आणि २५०० सैनिक साबरगढीचे रक्षण करतील. लग्न झाल्यावर वर हे सर्व लढाईत सामील होतील.
दुसऱ्या दिवशी रतनशहाच्या नेतृत्वात बुंदेले सैन्याने साबर सोडले. दुपारी मोगलांशी सामना सुरू झाला. रतनशहाने पुढून, बागराज परिहार आणि अंगदने दोन बाजूने असे मोगल सैन्य तिन्ही बाजूने घेरले गेले. संध्याकाळपर्यंत बुंदिले सैन्यांना विजय मिळाला. तहव्वरखान जीव वाचवून पळून गेला.
विजयी सैन्याचे साबर मध्ये भव्य स्वागत झाले. तोवर छत्रसालचे लग्न आटपले होते. दोन्ही कारणाने विजयोत्सव साजरा होत असतानाच, गुप्तहेराने बातमी आणली, तहव्वरखान ससैन्य रामनगरला आला असून, साबरवर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. या बातमीने अंतःपुरात खळबळ माजली. त्यांना भीती वाटत होती कंकण सोडण्याआधीच छत्रसालने युद्धात उडी घेतील आणि त्यांची भीती खरी ठरली.
छत्रसालनेने सैन्याला तयार राहण्याचा आदेश दिला. यावेळी संपूर्ण तयारीने छत्रसाल रामनगरला पोहोचले. त्यांनी तहव्वर खानला सावरण्याची संधी दिली नाही. तहव्वर खानच्या सैन्याला माघार घ्यायला लावण्यात यशस्वी झाले. पण काही महत्त्वाचे मोहरे कामी आल्यामुळे छत्रसालना अतिशय दुःख झाले. त्यांचा क्रोधाग्नि भडकला .सर्व शक्तीनिशी तहव्वर खानला पळवून लावले. पवनारीची मोगली ठाणे उध्वस्त केली. त्यांच्याशी जोडलेला प्रांत ताब्यात घेतली. या मोहिमेमुळे औरंगजेब फारच चिडला. त्याने आदेश……
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मीनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – १८.
चिडलेल्या औरंगजेबाने अलाहाबादचे सुभेदार हिंमत खान, पहाडसिंग गौड आणि ग्वाल्हेरचे सुभेदार अमानततुल्ला खान या सर्वांनी एकदम छत्रसालावर आक्रमण करण्याचा आदेश दिला.
एकाच वेळी तीन बलाढ्य सुभेदार येत असल्याचे संकट सगळ्या बुंदेल प्रांतावर आले. तातडीने बुंदेले सरदारांची बैठक बोलावण्यात आली. प्रत्येक सरदाराने आपापले मत मांडले. सर्वांचे बोलणे शांतपणे ऐकल्यावर छत्रसाल औरंगजेबला भेटण्याचा आपला निर्णय जाहीर केला ऐकून, सारेच आश्चर्यचकित झाले .कारण संधी किंवा समझोता बरोबरीच्या लोकात होतो. कुठे देशाचा सम्राट आणि कुठे दहा-वीस प्रांताचा मालक? देशाचा शहंशाह असलेली व्यक्ती आपल्यापेक्षा कमी योग्यतेच्या माणसाला कशी भेट देईल? छत्रसाल ठामपणे म्हणाले, भेटेल, नक्की बादशहा भेट देईल. आपण सुरू केलेली मोहीम बंद करण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल. छत्रा, तुला आम्ही एकट्याला त्याच्या दरबारात जाऊ देणार नाही. शिवाजी महाराजांचे उदाहरण समोर असताना जीव धोक्यात घालणे योग्य नाही. अशी काळजी करीत बसलो तर पुढे कसे जाणार? सध्या औरंगजेब अजमेर जवळ पागळमध्ये मुक्कामाला आहे. मी तहव्वरखानाशी बोलणे करून सगळं ठरल्यावर, त्याच्याबरोबर बादशहाच्या भेटीला जाईन. तो बादशहाला युक्तिवादाने समजावून सांगेल की, छत्रसालशी समझोता केल्याने शांतता प्रस्थापित करता येईल. सगळीकडून होणाऱ्या उपद्रवाने तो त्रस्त झाला आहे. म्हणून तो तयार होईल. तसे झाले तर काही दिवस आपल्याला मोगला पासून मुक्ती मिळेल. त्या वेळात आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करू.
छत्रसालच्या योजनेनुसार त्यांनी दोन घोडे स्वार तहव्वरखानकडे पाठवल्याबरोबरच त्याने भेटण्याची संमती दिली. दुसऱ्या दिवशी छत्रसाल भेटायला तहव्वरखानच्या शिबिरात प्रवेशले. दुवा सलाम झाल्यावर, छत्रसालाने विचारले, बादशहाची भेट कधी होईल? मंजूरी मिळाल्याबरोबर तुम्हाला कळविण्यात येईल. मग त्यांने बादशहाला भेटण्याबद्दलचे सगळे नियम सांगून, शेवटी म्हणाला, रत्नजडित तलवारीबरोबर पगडी भेट द्यावी लागेल. आणि असे काही बोलायचे नाही ज्यामुळे बादशहाचा अपमान होईल.
हे सगळे माझ्याकडून होणार नाही. मला आज्ञा द्या. तहव्वरखानाला कळून चुकले, याला समजावून सांगण्यात काही फायदा नाही. हताश स्वरात म्हणाला तुम्हीच काय ते ठरवा. परवीदगार तुमचे रक्षण करो.
तिसऱ्या दिवशी फगलवालच्या शाही दरबारात तहव्वत खान छत्रसालला घेऊन पोहोचले. बादशहा भव्य उंच सिंहासनावर बसला होता. वकिलाने औरंगजेबाला छत्रसालची ओळख करून दिली. छात्रसालने चांदीच्या ताटात हिरेजवाहर व सोन्याचे नाणे भरलेले ताट वकिला पुढे दिले. वकील ताटात पगडी ठेवण्याची वाट पाहू लागला. शेवटी वकिलाने बादशहा तर्फे नजरांना स्वीकारून चौरंगावर ठेवला. बादशहाने विचारले, तुम्हीच छत्रसाल आहात का ?बुंदेलखंडात तुम्हीच खळबळ वाजवली ना? तुम्हाला मोगलांच्या शक्तीचा अंदाज दिसत नाही. अंदाज आहे हुजूर. इथे येण्याचा उद्देश? छत्रसाल गप्प राहिलेला पाहून तहव्वरर खान बोलू लागला… आले हुजूर, गेले काही दिवसापासून बुंदेलखंड लूटमार, दंगे, लढायाने त्रस्त झाले आहे. त्यांची आपल्या पायाशी विनंती आहे की, तिथे कायम मेहरबानी करावी.
बादशहा म्हणाला, आम्हाला असे कळले की, तेथील शांततेचा भंग बुंदेलखंडानीच केला आहे. त्यासाठी तुम्हालाच कारणे शोधावी लागतील . छत्रसाल म्हणाले, मोगल शिपाई बुंदेल्यावर अत्याचार करतात. त्यांच्याकडून फुकट कामे करून घेतात. जबरदस्तीने खंडणी वसूल केल्या जाते. अपमानित केल्या जाते. मग याविरुद्ध बुंदेल्यांनी शस्त्र उचलले तर विद्रोह कसा होईल? प्रत्येक व्यक्तीला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार आहे ना? निर्भयपणे छत्रसाल बोलत होते.
बादशहाचा आपल्या प्रजेवर पूर्ण हक्क असतो. तो प्रजेशी कसाही वागू शकतो. मी या आपल्या विचारांशी बिलकुल सहमत नाही. राजा प्रजेचा संरक्षक असतो. त्याने नेहमी प्रजेची हित पाहायचे असते. बादशहाला हे असे उपदेशात्मक बोलणे आवडले नाही. बादशहा ने तीव्र स्वरात ताकीद दिली, यापुढे तुमच्या हालचाली थांबवा. जाऊ शकता. तहव्वरर खानला आज्ञा केली, याचेवर करडी नजर ठेवा. तीन वेळा कुर्निसात करून तो छत्रसालबरोबर दरबाराच्या बाहेर निघाला.
दोघेही बाहेर गेल्यावर, बादशहाचा वकील म्हणाला, याला जमिनीशिवाय सोडायला नको होते. याने तलवार, पगडी आपणांसमोर भेट केली नाही, हात बांधून उभा राहिला नाही. मान खाली घातली नाही. तो बुंदेलखंडात खळबळ माजवेल. बादशहाने तात्काक्ष आदेश दिला, पुढचा हुकूम होईपर्यंत याला छावणीत ठेवून घ्या.
छावणीत आपल्या सैनिका बरोबर छत्रसाल बसले होते. त्यांच्या तंबूला मोगल सैन्याचा गराडा पडला. त्यांनी विचार केला, बादशहाने जर नजर कैद केले तर, या पंधरा शिपायांसह ते काहीच करू शकणार नाही. आज रात्रीच आपल्या शिपायांबरोबर पळून जाण्याचा बेत केला. त्यांनी गुपचूप पहाटेच्या वेळी पोबारा केला. मोगल सैनिकांच्या लक्षात येईपर्यंत आपल्या सैनिकासह ते बरेच दूर निघून गेले होते. मुक्काम करत तीन दिवसानी पन्नाला सुखरूप पोहोचलेले पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. सिंहाच्या जवळ्यातून निष्टून येणे सोपे नव्हते.
आता त्यांचे एकच ध्येय होते बुंदेलखंडात असलेली मोगलांची ठाणी उध्वस्त करणे….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
९४२१००८३९९.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – १९.
छत्रसालांनी यावेळी वेगळ्या पद्धतीने मोहीम राबवली. ठाणे जिंकले की तो भाग बुंदेलखंडाचा म्हणून घोषित करायचा. तिथे पुरेसे सैनिक ठेवायचे, जेणेकरून तो भाग मोगल ताब्यात घेऊ शकणार नाही. ठरलेल्या तारखेला पूर्ण तयारीने मोहीम सुरू केली. कालपिवर आक्रमण केले. नंतर खैरागड जवळ मोगल सैन्याला पराजित करून सेनापतीकडून दोन लाखांची खंडणी वसूल केली. मग चिल्गा नौरंगाबाद मध्ये मोगलांशी युद्ध करून सेनापती सरुद्दीन कडून मोठे खंडणी घेतली. नंतर मोगल सेनापती कोटराचा फौजदार सय्यद लतीफ याचे कडून भारी दंड वसूल केला.
मोगल सेनापती बहलोल खान भडियादौल कडे निघण्याची बातमी आली. तिथे असलेल्या जगत सिंह बुंदेलेला मदत करण्यासाठी छत्रसाल ससैन्य निघाले. तोपर्यंत बहलोलखानने मडियादौलला घेराव घातला होता. छत्रसालने चौफेर मारा करून. विजय संपादन केला. बहलोलखान अतिशय जखमी होऊन मरण पावला. छत्रसालची हिम्मत वाढली. त्यांनी आक्रमणाचा धडाका लावला. बरेचसे प्रांत आणि राज्यावर ताबा मिळवला. बुंदेलखंडाच्या सीमा वाढवल्या. प्रत्येक ठिकाणी चौका पक्क्या केल्या. सुभेदार नेमले. आपले अधिकार कायम केले. त्यांची मुख्य छावणी मऊ मध्ये होती.
माऊच्या छावणीत छत्रसालने आपला कुटुंबा बरोबर काही दिवस घालवायचे ठरवले. एक तृतीयांश सैन्याला विश्रांतीसाठी रजा दिली. या काळात छत्रसालने धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी दहा अंगरक्षकासह घनदात झाडीत शिरले. त्यांना वाघाची शिकार करायची होती. वाघाचा शोध घेत जात असताना, रस्त्यात लागलेल्या नदीकाठी त्यांना दोन छोट्या व मोठी झोपडी दिसली. उत्सुकताढवश ते त्या झोपडीकडे निघाले. झोपडीजवळ एक साधू मृगजिनावर बसले असून समोर सात-आठ लोक बसलेले दिसले. छत्रसालने जोडे काढून त्यांना प्रणाम केला.
या राजन् इकडे या.. एक गंभीर आवाज आला. छत्रसाल पुढे होऊन साष्टांग नमस्कार घातला. साधू म्हणाले, माझ्याजवळ बसा राजन! महाराज, मी राजा नाही. साधा सैनिक आहे. साधू म्हणाले, तुमच्या व्यक्ती महत्त्वातूनच तुमचे ऐश्वर्या झळकत आहे. भविष्य तुमच्या डोळ्यात दिसत आहे. छत्रसाल विनयाने म्हणाले, महाराज, यापूर्वी आपणाला पाहिले नाही, आपला परिचय मिळाला तर स्वतःला भाग्यवान समजेन.
लोक मला प्राणनाथ आणि महेराज नावाने ओळखतात. आम्हाला गुजरातच्या जामनगरचे स्वामी देवचंदजीने आश्रय दिला. तेच निरंजन महाराज नावाने गुजरात आणि राजस्थानमध्ये धर्मकार्यासाठी प्रसिद्ध होते. तेच आमचे गुरु. त्यांनी धार्मिक मतांचा प्रचार करण्याचा मला आदेश दिला. त्या संदर्भात माझ्या शिषासह देश, प्रदेशात हिंडत हिंडत बुंदेल प्रांतात आलो इथे. आल्यावर कळले की, कोणी छत्रसाल नावाचा तरुण राजा बुंदेण्यासाठी स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी मोघलांशी झुंज देत आहे. आज अचानक पाहून, तुमच्यावर चेहऱ्यावरचे तेज पाहून तुम्हीच छत्रसाल असावेसे वाटले.
महात्मन्, आपण त्रिकालज्ञानी, भूत, भविष्य, वर्तमान जाणता. मी एक सामान्य माणूस. माझी एकच इच्छा आहे, बुंदेलांचा स्वाभिमान जागृत राहण्यासाठी बुंदेलखंड नावाचे स्वतंत्र राज्य व्हावे. तुमची इच्छा पूर्ण होईल. पण तुम्हाला आयुष्यभर संघर्ष करावा लागेल. कठीण परीक्षा देत मोठ्या साम्राज्य शक्तीला झुंज देत रहावे लागेल. हे काम सोपे नाही.
महाराज आपला आशीर्वाद हेच माझे कवच असेल. महाराज, माझ्याकडे पुरेसे साधन नाही. एखादी सुरक्षित जागा नाही, जिथे राहून शत्रूला तोंड देता येईल. साधू म्हणाले, धीर धरा. सर्व मिळेल. सर्वात आधी पन्नाला आपली राजधानी बनवा. पन्ना? तिथे माझी लहानशी छावणी आहे. मऊमध्ये मी मजबूत गढी बनवली आहे. सैन्याचे मुख्यालय बनवले आहे. आता हा बदल?
तर्क करू नका. माझे वर विश्वास ठेवा. काही दिवसांनी माझ्या शिष्यासह तेथे येऊन कायमचा मी मुक्काम करेन. स्वतः आपणच तिथे राहणार असल्याने मला काळजी करण्याचे कारण नाही. आपले उपकार कसे फेडू म्हणत छत्रसाल हात जोडून उभे राहिले. तुम्ही आता सूर्यास्तापूर्वी आपल्या ठिकाणावर पोहोचा. जशी आज्ञा!
प्राणनाथ म्हणाले, आम्ही एक महिन्याच्या आत पन्नाला पोहचू. तुम्ही विजयादशमीच्या दिवशी सकाळी सहसैन्य, परिवारासह तिथे पोहोचा. यात चूक होता कामा नये. आपल्या आज्ञाप्रमाणे सर्व होईल. नमस्कार करून छत्रसाल आपल्या सैन्यासह मुक्कामावर पोहोचले.
मऊला पोहोचल्यावर छत्रसालने आपल्या कुटुंबीयांना साधू महाराजांबद्दल सांगितले. पुढचा एक महिना अतिशय गडबडीत गेला. कुटुंबकबिला, सैन्य, सामानासह ५० मैल जाणे सोपे नव्हते. पण छत्रसालने ठरलेल्या वेळात पूर्ण केले. सगळी व्यवस्था झाल्यावर, प्राणनाथांच्या सूचनेची प्रतीक्षा करू लागले. एका आठवड्यात त्यांना सूचना आली. प्राणनाथ आपल्या शिष्यांसह तिथल्या आमराईत मुक्कामाला आले आहेत.
विजयादशमीच्या दिवशी सहकुटुंब स्वामींकडे पोहचले. छत्रसालसह सगळ्यांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला. स्वामीजींचे उत्तुंग व्यक्तिमत्व पाहून सगळेच मंत्रमुग्ध होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिले….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.
!!! राजा छत्रसाल !!!
भाग – २०.
स्वामींनी सगळ्यांना बसायला सांगून, त्यांनी आपला परिचय देत म्हणाले, आम्ही आमचे गुरुंनी ” निजानंद संप्रदाय। सुरू केला आहे. हा संप्रदाय म्हणवत असला तरी, इतर संप्रदायासारखा संकुचित दृष्टिकोन ठेवलेला नाही. आमचा मार्ग राजमार्ग आहे. सर्व धर्म, पंथ, वर्ण, जातीचे लोक आमच्या संप्रदायात येऊ शकतात. आमचा धर्म मानवधर्म. मानवतेवर आमचा विश्वास आहे. छत्रसालचे आणि स्वामीजींचे विचार किती समान आहेत? त्यांनी देखील आपल्या सैन्यात सर्व जाती, धर्म, वर्णाच्या लोकांची भरती केली होती. त्यांनी मनोमन संकल्प केला, ते सर्व धर्म समभावाच्या सिद्धांतावरून वाटचाल करतील.
स्वामींनी आदेश दिल्यानुसार छत्रसालांनी पन्नाला बुंदेलखंडाची राजधानी घोषित केली. तसेच त्यांनी स्वामीजींना विनंती केली, त्यांनी या राज्यावर नेहमी अनुकंपा व छत्रछाया ठेवावी. या घोषनेनंतर बराच वेळ जय जयकार होत राहिला. स्वामींचा विजय असो… बुंदेलखंडाचा विजय असो…
स्वामीजींनी हात उंचावून आशीर्वाद दिला. त्यानंतर स्वामी प्राणनाथांनी तलवार छत्रसालच्या कमरपट्ट्यात खोचून त्यांचा मस्तकावर कुमकुम तिलक लावला. त्यांची जुनी पगडी काढून, हिरे जडीत फलगी लावलेली लाल सोनेरी रंगाची नवीन पगडी घातली. विडा देऊन देवालयाला तीन प्रदक्षिणा घ्यायला सांगितल्या. प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांचा हात हातात घेऊन घोषणा केली, मी प्राणनाथ! छत्रसाला या बुंदेलखंडाचा राजा घोषित करीत आहे .ही गोष्ट झाल्यावर जयजयकारांच्या घोषणांनी सारे वातावरण दुमदुमले. हे सर्व आटोपल्यावर…
स्वामींनी छत्रसालना बाजूला घेऊन म्हणाले, राजा, राज्य चालवण्यासाठी मोठ्या धनाची गरज असते. त्यासाठी एक रहस्य सांगतो, ऐका.. येथून दक्षिण- पश्चिमेला ५-१० मैल जमिनीच्या खाली मोठी हिऱ्याची खाण आहे. ते हिरे इतके आहेत की, तुमच्या सात पिढ्यांना पुरून उरेल. पण एक काळजी घ्या, जमीन खणण्याचे काम अत्यंत गुप्तपणे व्हायला हवे. मोगलांना जराही सुगावा लागता कामा नये. छत्रसाल आश्चर्यचकित होऊन बघतच राहिले. एवढे मोठे रहस्य आणि त्याची सूचना अगदी सहजतेने दिली. स्वामीं बद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करावी त्यांना सूचेना. त्यांनी साष्टांग नमस्कार घालून गुडघ्यावर बसून राहिले. स्वामीजींनी त्यांना उठवून त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. एक प्रकारे सुरक्षा कवचच घातले.
राजधानी म्हणून पन्नाची घोषणा झाली. आता राज्याची व्यवस्था आणि प्रशासन मजबूत करायचे होते. त्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. त्यांना स्वामींनी सांगितलेल्या खजिन्याची आठवण झाली. त्यांनी मोठे भाऊ अंगदला विनंती केली ५० विश्वासू सैनिक घेऊन स्वामीजींनी सांगितल्या ठिकाणी खणण्याचे काम सुरू करावे. दर पंधरा दिवसांनी कामाच्या प्रगतीची सूचना द्यावी. एक महिन्याच्या परिश्रमान नंतर परिणाम दिसला. छत्रसालने जवा हिऱ्यांना बोलावून सांगितले, त्यांनी सैनिक संरक्षणात बाहेर देशात जाऊन हिराचा व्यापार करावा. व्यापारी आनंदाने तयार होऊन १०० सुवर्ण मुद्रा राजाला भेट दिल्या. ती भेट घेऊन छत्रसाल स्वामींना भेटण्यासाठी त्यांच्या देवालयाकडे गेले. त्यांचा प्रणाम स्वीकारल्या वर स्वामींनी सहज प्रगती बद्दल चौकशी केल्यावर, छत्रसाल म्हणाले, आपल्या निर्देशाचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे. आज व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या शंभर सुवर्णमुद्रा आपल्या चरणी अर्पण करतो. नाही.. नाही याची आम्हाला गरज नाही. याची गरज तुम्हाला आहे. याचा उपयोग राज्याच्या कामासाठी करा. क्षमा करा. पण ही पहिली तुच्छ भेट स्विकारून मोठे देऊळ बांधा. शिष्यांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था करावी. स्वामी म्हणाले, तशी आम्हाला या कशाचीच आवश्यकता नाही. तरी तुमच्या विनंतीचा मान ठेवून अतिथीकक्ष, धर्मशाळा, राहण्यासाठी खोल्या बांधल्या जाऊ शकतात. स्वामींनी भेटीचा स्वीकार केल्यामुळे अत्यानंदाने छत्रसालाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला.
स्वामीजी म्हणाले काल माझे काही अनुयायी माऊच्या जंगलातून येताना त्यांना कळले की, मोगलांचे मोठे सैन्य राठ आणि एरचचा फौजदार शाहकुलीनच्या नेतृत्वाखाली मऊवर आक्रमण करण्यासाठी निघाले आहेत. ही जर गोष्ट खरी असेल तर, मोठी काळजीची बाब आहे. स्वामी म्हणाले, गोष्ट खरी असावी. मऊच्या सुरक्षिततेतील कमतरता हेरून मोगल मऊवर आक्रमण करण्याचा विचार करीत असावा. मऊला अजूनही तुमची छावणी आहे. तो प्रांत तुमच्या ताब्यात आहे. त्याचे रक्षण झालेच पाहिजे. सैन्यासह तुम्ही तात्काळ कूच करा. हा स्वामींचा आदेश होता. त्यांनी स्वामींना वाकून नमस्कार केला व निघाले तोच स्वामी म्हणाले, या मोहिमेत मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे. हे युद्ध कठीण आहे. शत्रू जवळ आला आहे. सूचना उशीरा मिळाली. छत्रसाल अत्यंत विनयाने म्हणाले, आपण त्रास घेऊ नये. आपला आशीर्वादच पुरेस आहे. तेच आमच्यासाठी ढाल तलवार आहे. तेच कवच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मी लवकर सैन्याची जुळवाजुळव करतो.
असे म्हटले तरी, छत्रसालांना माहीत होते, हे लवकर होऊ शकत नाही. त्यांनी आपले सैन्य ठीक ठिकाणी तैनात केले होते. त्यांना पन्नाला बोलावून मऊ कडे कुच करण्यास वेळ लागणार होता. आणि झालेही तसेच. ते ससैन्य मऊला पोहोचले तेव्हा त्यांना बातमी मिळाली की, मोगलांनी मऊवर आक्रमण केले होते. ५०० बुंदेले धारातीर्थी पडले होते. दुसऱ्या प्रांतावर अधिकार करण्यासाठी मोगल डोंगर चढत होते. ते पाहून छत्रसाल, रतनशहा, बलदिवाण व इतर बुंदेले सरदार निराश झाले होते. ते पाहून स्वामी प्राणनाथांनी गर्जना करून उकसावत असतानाच माधांता चौबे नावाचा सैनिक पुढे आला….
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २८-७-२०२३.







