आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

महाराणी पद्मिनी चरित्र भाग ४ , (१४ते १७)
राजमातेच्या महालात बसल्यावर राजमाता म्हणाल्या,राणाजी,तुमच्या मनातील खळबळ आम्हाला समजते, पण निर्णय घेतांना भावनेपेक्षा अधिक महत्व कर्तव्याला द्यायला हवे.महाराज समरसिंगांच्या सिंहासनावर तुम्ही आसनस्थ झालात आणि सारा कारभार जागृततेने पाहू लागलात तेव्हाच आम्ही राजकारणाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
14
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – १४.
राजमातेच्या महालात बसल्यावर राजमाता म्हणाल्या,राणाजी,तुमच्या मनातील खळबळ आम्हाला समजते, पण निर्णय घेतांना भावनेपेक्षा अधिक महत्व कर्तव्याला द्यायला हवे.महाराज समरसिंगांच्या सिंहासनावर तुम्ही आसनस्थ झालात आणि सारा कारभार जागृततेने पाहू लागलात तेव्हाच आम्ही राजकारणाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली.तुमच्याकडून आगळीक होणार नाही,चुकीचा निर्णय घेणार नाही हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
राणीमां प्रश्न नाजूक आहे.अपराधी केवळ आमच्याच नाही तर तुमच्याही जवळचा आहे.तो गुन्हेगार आमच्या इतकाच तुम्हालाही प्रिय आहे.कठोर आवाजात राजमाता म्हणाल्या, राणाजी, चितोडच्या इतिहासात आजपर्यंत अपराध्याला क्षमा केलेली नाही,तुम्हीही करुं नये.आता आम्ही निश्चिंत झालो.
राघवने गुन्हा कबूल केला का? तुमचा जिवलग मित्र असूनही कां हल्ला केला? कां आणी कसे? त्याने मौन स्विकारले.कांहीही सांगण्यास तयार नाही. ज्या मित्राला आम्ही शुध्द सुवर्ण समजत होतो,त्यानेच असा घात केल्याने मन अस्वस्थ झाले.उद्या भर दरबारांत त्याला कठोर शिक्षा सुनावण्यास बळ येण्यासाठी दरबारात तुमची उपस्थिती आमचे मनोबल वाढवेल.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत राणा.न्याय सर्वासाठी समान आहे.न्याय नाते,गरीब,श्रीमंत जाणत नाही.आज एक गुन्हेगार पाठीशी घातला तर उद्या असंख्य गुन्हेगार निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
चितोडच्या दरबारात पंडित राघव चेतनचा न्याय झाला.राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला.त्याचे घर आणि संपत्ती सरकारजमा झाले.त्याची आजवरची सेवा लक्षात घेतां देहदंडाची शिक्षा न देता सूर्य मावळण्यापूर्वी चितोड सोडून जाण्याचा आदेश राणाजींनी व्यथित मनाने दिला. राणांजीवर हल्ला करणार्या राघव चेतनबद्दल प्रजेत संताप आल्यामुळे,ही शिक्षा त्यांना अपूरी वाटली.तो बाहेर आल्याबरोबर त्याला घेरुन त्याच्या चेहर्याला काळे फासून गाढवावर उलटे बसवून सार्या चितोड मधून धिंड काढली.लज्जेने आणि क्रोधाने त्याचे मन जळत होते.कालपर्यत ज्या चितोडगडामधे सन्मानाने फिरत होता,पालखीतून हिंडत होता,सर्वांच्या कौतुकाच्या नजरा झेलत होता,आज त्याच रस्त्यावर मरणाहून भयंकर अपमान सोसावा लागत होता.
त्याच्या मनात राणा रतनसिंह व चितोडगडाविषयी अतिशय तिरस्कार निर्माण झाला.अचानक जलमहालाच्या सज्जावर राणी पद्मिनी उभ्या दिसल्या, आणि त्याच्या क्रोधाग्नित तुपाचं काम झाले.हे अलौकिक सौंदर्य राणाचा मानबिंदू,सार्या चितोडला हिचा अभिमान,बुध्दीमत्ता व कर्तृत्व चितोडचा गौरव,हा अभिमान मी ठेचून काढीन. या सौंदर्यपुतळीचे रुप असे पणाला लावीन की, सारे चितोड लज्जेने मान खाली घालतील.राणाला जगणे नकोसे होईल. राणा मला जिंवत सोडून तुम्ही आयुष्यात फार मोठी चुक केली.
एवढ्या दुरुनही राघवच्या डोळ्यात पेटलेला भयंकर विखार पद्मिनींना जाणवला.त्या शहारल्या.धिंड संपल्यावर लोकांनी त्याला गावाबाहेर घालवून दिले. सूड…सूड घेईन मी.मला अपमानित करणार्या रतनसिंहाचा,गर्विष्ठ पद्मिनीचा आणि माझी धिंड काढणार्या या चितोडचा…रस्ता दिसेल तिकडे,पाय नेतील तिकडे तो चालत राहिला.पण मन मात्र चितोडच्या सर्वनाशाची योजना मनात साकार होत होती….
राणी नागमती व दासी कुंजरी देव दर्शनाहून बोलत येत होत्या.राणीसाहेब, राघवने महाराणी पद्मिनींवर हल्ला करण्याऐवजी प्रत्यक्ष महाराजांवर कां केला? तुम्ही त्याचा अत्यंत गुप्तपणे राज उद्यानात प्रवेश करवला,त्याचा त्याने गैर फायदा घेतला.जर महाराजांना कांही झाले असते तर,मी माझे जीवनच संपवले असते.पद्मिनींमुळे महाराजांचे व पर्यायाने आमचेही प्राण वाचले.तेवढ्यात राणाजींचा लाडका हत्ती विरुपाक्ष संतापून माहुताला फेकून सैरावैरा धावत मार्गात जो येईल त्याला तुडवत धावत होता.वाटेतील दुकाने,झाडे मोडत,कर्कश किंचाळत होता.त्याला आवरण्यासाठी माहुत त्याच्यावर बरच्या फेकून मारत होते,पण तो जखमी होत असल्याने अधिकच खवळून वाटेल तसा धावत होता.
प्रत्यक्ष मृत्युच समोरुन येत आहे या जाणीवेने नागमती जागीच खिळून उभ्या राहिल्या.मृत्यु क्षणाक्षणाने जवळ येत होता.आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचे स्मरणचित्रे क्षणांत त्यांच्या डोळ्यासमोरुन सरकली.कांही क्षणांतच सारे संपणार होते.विरुपाक्षाची भयंकर किंकाळी त्यांच्या कानांत घुमली आणि नेणीवेच्या जाणीवेने न संपणार्या अंधारात नागमती विरघळून गेल्या.
मी कुठे आहे?स्वर्गात तर नाही ना देवी, तुम्ही अगदी सुरक्षित आहात.अरेऽ हा आवाज तर पद्मिनींचा.निश्चितच! त्या उठून बसल्या…
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
२६-१-२०२२.
15
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – १५.
राजमाता म्हणाल्या,राणी पद्मिनीं नी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवले नागमती!त्या भगवान एकलिंगजींचे दर्शन घेऊन येत असतांना, हत्ती तुमच्या अंगावर धावून येत असतांना सारेच जागीच गोठले,पण पद्मिनी पुढे धावून सेवकाची तलवार घेऊन क्षणाचाही विलंब न लावतां हत्तीची सोंड कापली.व सपासप वार करतच राहिल्या.गजराज क्षणांत मृत झाला.
राणी नागमतीचे डोळे सजल झाले.तुम्ही मला जीवदान देऊन कायमचे उपकृत केले.कांही दिवसांपूर्वी महाराजां चे प्राण वाचवून आपले सौभाग्य राखले. देवी, तुम्ही माझ्या जेष्ठ भगिनी आहांत. महाराज व तुमच्याशिवाय माझे अस्तित्व शून्य आहे.तुम्ही दोघेही माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग आहांत.
पद्मिनींच्या डोळ्यातील स्वच्छ, निर्मळ भाव पाहून नागमती म्हणाल्या, पद्मिनी मला माफ करा. गैरसमजाने स्वतः व सर्वांच्या दुःखाला कारण झाले. दोघींच्या डोळ्यातून पाऊसधारा वाहून गैरसमजाचे सारे धूके त्यात वाहून गेले आणि उरले फक्त निखळ प्रेमाचे सुंदर नाते…एकमेकांच्या सुखाचा विचार करणारे तीन प्रेमी जीव, एकमेकांच्या सुखासाठी धडपडणारे!प्रत्येक दिवस उगवत होता आणि मावळत होता.कांही दिवसांनी नागमतीला नागसेन आणि पद्मिनींना कवंलसेन येण्याने,त्यांच्या बाल लिलात सारा राजप्रसाद आनंदित झाला. दोघे भाऊ राम लक्ष्मणासारखे राहत होते
दोघीही कृष्णकुंजात बसून त्यांच्या गप्पा रंगल्या असतांनाच राणाजीं च्या विशेष सेवकाने, महाराजांनी त्वरीत बोलावल्याचा निरोप आणला.पद्मिनी आल्यावर, राणाजींनी एका कक्षाचे दार उघडले आणि समोरचे दृष्य बघून पद्मिनींच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही.समोर त्यांचे पिताश्री राजा गंधर्वसेन आणि माता चंपावतींना बघून त्या आवाक् झाल्या. आपण असे अचानक? नातवांना भेटण्यासाठी आम्हीच तुम्हाला कळू न देता इथे येण्याची विनंती केली आणि यांनीही आमची विनंती मान्य केली.आम्हा सर्वानाच माहित होते,नागमती म्हणाल्या. पण तुम्हाला कळू न देण्याची राणाजींची सक्त ताकिद होती.रावळप्रासादातील त्या रात्रीच्या भोजन समारंभाची शोभा कांही औरच होती.कांही दिवस थांबून पद्मिनीं च्या माता पित्यांचे मेणे सिंहलद्वीपकडे रवाना झाले.कितीतरी वेळ पद्मिनी त्या वाटेकडे भरल्या नजरेने एकटक बघत होत्या.
रणथम्बोरच्या सजलेल्या सिंहासनावर अल्लाउद्दीन खिलजी बसला होता.सेनापतीऽ महंमद शाह को हमारे सामने पेश करो। कांही क्षणांतच जड साखळदंडांनी जखडलेल्या महंमद शहाला दरबारात पेश करण्यात आले.
महमंदशहाच्या हातापायात साखळदंड असूनही चेहर्यावरची गुर्मी तशीच होती. त्याची बेडर नजर बघून, अल्लाउद्दीनच्या संतापांत भरच पडली.याच महमंद शहाने बादशहा जलालुद्दीनचा काटा काढण्यास मदत केली होती.याच्याच पराक्रमामुळे अल्लाउद्दीनने जालंदर आणि कीलीला झालेल्या मोगलांविरुध्दच्या लढाया जिंकल्या होत्या.याच महमंद शहावर संपूर्ण विश्वास टाकुन राजमहालात कुठेही फिरण्यास त्याला मज्जाव नव्हता.
त्याला बघून अल्लाउद्दीनच्या डोळ्यात रक्त साकाळले.यानेच त्याचेवर टाकलेल्या विश्वासाचा घात केला होता. प्रत्यक्ष अल्लाउद्दीनची हिंदु पत्नी चिमणा राणी बरोबर सबंध प्रस्थापित करुन अल्लाउद्दीनला ठार करण्याचा कट केला होता.आणि कट उघडकीस आल्यावर, जीवाच्या भीतीने दिल्लीहून थेट रणथम्बो चा राजा हमीर देवचा आश्रय घेतला. महंमद शाह, तुम्ही ज्याच्यासाठी माझा विश्वासघात केला,त्याची सजा तर त्याला मिळाली,पण तुम बच गये.केवळ तुमच्या मुळेच रणथम्बोवर आक्रमण करावे लागले.तुम्हाला फक्त बहाणा हवा. तुमच्या महत्वाकांक्षा,कपटनीती माझ्या पेक्षा कोण जाणतो?तुम्हाला ठार करुन कदाचित या देशाचे भलेच केले असते.
अल्लाउद्दिन खदखदुन हसला. त्या शांत दरबारात त्याचे क्रूर हसणे घुमले.बोला महमंदशहा,तुम्हारी आखरी ख्वाईश जरुर पुरी करेंगे!
महमंद शहा क्षणभर गप्प बसला. त्याला आठवण झाली, हमीर देवची.त्या पराक्रमी राजपुताने महमंद शहाला दिलेला शब्द पाळला.अल्लाउद्दीनच्या प्रचंड सेनेला झुलवत ठेवून,त्याचा अनेक वेळा पराभव केला होता.महमंदशहाने विनाश टाळण्यासाठी त्याला बादशहाच्या स्वाधीन करायला सांगीतले तरी,शेवटपर्यंत दिलेला शब्द पाळला. जेव्हा पराभव समोर दिसला तेव्हा शांत पणे राजस्रीयांना जोहार करायला सांगून त्याच शांतपणे राजा हमीर देव मृत्युला सामोरे गेले.
क्रमशः
संकलनाव ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-१-२०२२.
16
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – १६.
त्या आठवणीने महमंद शाहच्या डोळ्यात पाणी तराळले.थेट अल्लाउद्दीन च्या नजरेला नजर देत गरजला, अल्लाउद्दीन!सत्तेसाठी स्वतःच्या काकाला ठार मारणारा तूऽऽ..तुझ्यात माझी आखरी इच्छा पुरी करण्याची ताकदच नाही.तरीही मागतो..राजा हमीर देवच्या जिवंत राहिलेल्या मुलाला शोधून या सिंहासनावर बसवावे..ही माझी शेवटची इच्छा पुरी करायची आहे हिंमत ते लोक प्रामाणिक व कष्टाळू असून त्यांनी मेहतीने ही संपती मिळवली आहे. तुझ्यासारखी लुबाडुन नव्हे.
महमंद शहाऽऽऽ खामोशऽऽ! तरी महमंद पुढे बोलतच राहिला, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्याचा जीव घेण्यापेक्षा, दुसर्यासाठी जीव देण्याचा आनंद फार मोठा आहे अल्लाउद्दीन..आणि तो मी या राजपुतांच्या डोळ्यात बघितला आहे, अनुभवला आहे.आणि पुढच्याच क्षणी जवळच उभ्या असलेल्या हशमाच्या कमरेची कट्यार ओढून डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच स्वतःच्या छातीत खुपसुन घेतली.जय एकलिंगजी!! जय राजा हमीरदेव की! महमंद शहाचा निष्र्पाण देह दरबारातून बाहेर नेल्या गेला
सुलतानसाब राजा हमीरदेवचे हे सरदार धनाच्या लालचेने आपल्याला गुप्तपणे आपल्याला मदत करीत होते, त्यांचे काय करायचे? हंऽ तुच्छतेने खिलजी म्हणाला,कुठे आपल्या वचना साठी प्राणार्पण करणारा राजा हमीरदेव? आणि धनाच्या व पदाच्या आशेने स्वतः च्या राजाशी बेईमान होणारे सरदार कुठे त्या फितूरांबद्दल त्याच्या मनात तिरस्कार दाटला.आणि त्याच्या आज्ञेने त्या सरदारां चे मस्तके धडावेगळी केली.रक्ताच्या थारोळ्यात कोसळतांना,त्यांच्या किंकाळ्या दरबारात घुमल्या.परंतु अल्लाउद्दीनचे स्वास्थ्य हरवले ते कायमचेच!
शिकारीचा आनंद घेण्यासाठी अल्लाउद्दीन अनेकवेळा यमुनेच्या किनारी घनदाट जंगलात येत असे.हरिणां सारख्या निष्पाप प्राण्यांना छळून छळून मारणे त्याचा आवडता छंद!त्याच्या खुशमर्या मलिकला म्हणाला,जसे मरणा चे भय हरिणांच्या डोळ्यात दिसते तसेच भय इथल्या राजपूत सुंदरींच्या डोळ्यात दिसते.त्यांना माहित नसते की,या सुंदर युवत्या फक्त अल्लाने माझ्यासाठीच बनवल्यात!
आणि अचानक सुंदर गीतांचे स्वर त्याच्या कानी पडले.मलिक तुरंत जाओ.. इतना मधूर गीत गानेवालेको शोधून आण.थोड्याच वेळात एका अत्यंत क्रुश, फाटक्या कपड्यांमधल्या युवकाला अल्लाउद्दीनसमोर हजर केले.कौन हो तुम? सुलतानसाब मी राघव चेतन गायक व गीतकार आहे.तुमची कीर्ती ऐकून तुमच्या चरणाशी आलो.तुमच्यासाठी कांहीही करायला तयार आहे,प्रसंगी जान नौछावर सुध्दा.स्तुतीने खुश झालेल्या सुलतानाने त्याला आपल्या पदरी ठेवून घेतले.
अल्लाउद्दीनला सावध करत, मलिक म्हणाला, राघव चेतन हा कुणी सामान्य माणूस नसून चितोडच्या राणा रतनसिंहांच्या अतिशय जवळचा मित्र आहे.राणाचे व हमीरदेव चे मैत्रीपूर्ण संबध असल्यामुळे, होऊ शकते, राघव चेतनला रणथम्बोच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी पाठवले असेल.गडगडाटी हसत अल्लाउद्दीन म्हणाला,सेनापती मलिक काफूर,युध्दाचे डावपेच आखणं वेगळं आणि माणूस ओळखणे वेगळे. चौकशीअंती मला समजले,त्याला राणा रतनसिंहाने अपमानित करुन राज्या बाहेर घालवले आहे.सुडाने पेटलेला राघव चेतन माझी मदत घेऊन राणाचा सूड घेण्याच्या विचाराने आलाय, पण मी मात्र त्याचा उपयोग करुन घेणार आहे.
किलीच्या लढाईत पराक्रम गाजवणारा मलिक काफूर अल्लाउद्दीनने अचूक हेरला.आणि साधा गुलाम असलेला मलिक अल्लाउद्दीनचा सेनापती झाला.त्याचा प्रत्येक शब्द मलिकसाठी अल्लाचा शब्द होता.त्याच्या साठी प्राण द्यायला नी घ्यायला तो सदैव तयार असे,कारण आज तो जे कांही होता ते केवळ अल्लाउद्दीनच्या मेहरबानी ने. कुर्निसात करुन,पाठ न दाखवतां मलिक बाहेर पडला.तोच राघव चेतन सुलतानला भेटायला आला.आलिशान सजलेल्या अल्लाउद्दीनच्या कक्षात राघव चेतनने प्रवेश केल्यावर, अल्लाउद्दीनने त्याचे स्वागत केले.तो सुवर्णतारांच्या सुंदर नक्षीने सजवलेल्या उंची आसनावर बसला होता.त्या वैभवाकडे भान हरपून पाहणार्या राघव चेतनला पाहून अल्लाउद्दीन स्वतःशीच हसला.आणि राघवने विचार केला,आपल्या इच्छापूर्ती चा नेमका क्षण आताच पकडायला हवा. त्याने सुलतानची वारेमाप स्तुती केली. रतनसिंहाचा सूड घेण्यासाठीच तर याच्या कडे तो आला,त्याच्याशी मैत्री केली.रतन सिंहाचा,चितोडने केलेल्या अपमानाचा
सूड आणि पद्मिनी…सत्ता,संपत्ती आणि स्री या तिन्ही गोष्टींचा लोभी अल्लाउद्दीन ला आपल्या जाळ्यात फसवणे त्याला फारसे कठीण वाटले नाही.आणि त्याने..
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-१-२०२२.
17
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – १७.
आणि राघव चेतनने पद्मिनींचे वर्णन असे कांही आपल्या गीताद्वारे केले की,भान हरपून अल्लाउद्दीन म्हणाला, तुम्ही गायणात वर्णन केल्याप्रमाणे खरोखरच ती स्वप्नातील सुंदरी आहे कां? बादशहासाब!ही कल्पना स्वप्न नसून वास्तव्य आहे.ही सुंदरी मी प्रत्यक्ष बघीतली आहे.तिचे वर्णन करायला शब्द अपूरे पडतात.जगातील सार्या गोष्टी देवा ने एकत्रीत करुन त्या सुंदरीची निर्मिती केली.छे! अशक्य! आपला माझ्यावर विश्वास दिसत नाही.त्याने अंगरख्यात लपवलेली कागदाची गुंडाळी बादशहा च्या समोरच्या आसनावर पसरवली.डोळे विस्फारुन बादशहा बघतच राहिला.
राणी पद्मिनी जेवढी सुंदर आहे तेवढीच बुध्दीमान व पराक्रमी आहे.राणा रतनसिंहाबरोबर पुरुष वेषात त्यांच्याशी लढत दिली होती.ती युध्दनीतीची उत्तम जाणकार आहे.राजकारणाचे उत्कृष्ट ज्ञान आहे.सुलतानसाब आमच्या हिंदु धर्मात अशा स्रीला देवीचा अवतार समजतात.महाराणी पद्मिनीला साक्षात देवी पद्मावतीचे रुप मानल्या जाते.नंतर अल्लाउद्दीनची स्तुती तोंड फाटेस्तोवर करुन आपले कमावलेले हसू हसत राघव म्हणाला,जिच्या रुप,गुणांची तुलना सार्या जगात कुणाशीही होऊ शकत नाही अशी ती पद्मिनी तुम्हाला मिळायला हवी.आणि ती सुलक्षणी सौंदर्यवती तुमची सेवा करतांना बघणे माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.अल्लाउद्दीन चे डोळे वासनेने लकाकले.अगर ऐसा है तो,चितोडका वह चंद्रमा इस महलमे जरुर आयेगा,हमारी चरणोंमे…राघव कधी उठून गेला,सुलतानला कळलेही नाही.
राघव चेतनला हवे ते घडत होते नव्हे घडवुन आणले होते.पद्मिनीविषयी ऐकल्यापासून दिवसरात्र सुलतानच्या डोक्यात पद्मिनींचेच विचार घोळत होते. त्याची तहानभूक नाहीशी झाली.राघव आम्हाला किसी हालत मे पद्मिनी चाहिये सुलतानसाब,महाराणी पद्मिनींची एक झलक दृष्टीस पडणे अशक्यप्राय आहे. हम भारतके बादशाह,या देशाचे सत्ताधीश आहोत.चितोडसारख्या छोट्या राज्याला जिंकणे आमच्या प्रचंड सेनेला कठीण नाही.सुलतानसाब, राणा रतनसिंह म्हणजे साक्षात पराक्रम!एकाच वेळी हजारो वीरांना कंठस्नान घालण्याचे कसब त्यांच्यात आहे.आजवर एकही लढाई राणा हरले नाही.त्यांत महाराणी पद्मिनी चितोड प्रजेची लाडकी राणी! आम्ही तिला कोणत्याही प्रकारे जिंकुच!
आपण एका स्रीसाठी,पद्मिनीसाठी चितोडवर स्वारी करणार?हजारो लोकांचे प्राण पणाला लावणार?राघव,जगातील बहुतेक युध्दे,मोठ्या लढाया,केवळ स्री मुळे व स्रीसाठीच झाल्या आहेत. रामायण,महाभारत हेच सांगतात. खदखदून हसत सुलतान म्हणाला, पद्मिनीसारखे स्री रत्न आणि चितोड सारखा रत्नस्वरुप देश माझ्या ताब्यात आलाच म्हणून समज!
राघवच्या चेहर्यावर समाधान पसरले.त्याच्या कल्पनेपेक्षाही त्याचा हेतू लवकर सफल होणार होता.अल्लाउद्दीन ची प्रचंड सेना चितोडगडला वेढा घालून बसणार होती.एकाच दगडात दोन पक्षी मारण्यात राघव यशस्वी झाला.राज्या बाहेर घालवणार्या रतनसिंहाचा सूड, त्याची गाढवावरुन धिंड काढणार्या प्रेजेचा सूड,आणि..आणि पद्मिनींच्या गर्विष्ठ सोंदर्याचा सूड…
स्वतःच्या मनावर कितीही ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तरी अल्लाद्दीनला शक्य होत नव्हते.राणी पद्मिनींची प्राप्ती त्याच्यासाठी आव्हान बनले होते.राघवसारख्या एका सामान्य कवीने, एका बलाढ्य,पराक्रमी सुलतान ला दिलेले आव्हान…मला जे हवे ते मिळवतोच.राणी पद्मिनीला मिळवणारच जसे इतर राजे रजपूत सर्वनाशाच्या भयाने अल्लाउद्दीनशी तह करुन त्याला खुश करण्यासाठी,त्याने न मागताच आपली कन्या अथवा पत्नी त्याच्या स्वाधीन करत.चितोडचा राणाही तसच करेल असं त्याला वाटले.
मलिक काफूर हमे चितोड चाहिये सुलतानला समजावत,मलिक म्हणाला, स्वतःचा बदला घेण्यासाठी,चितोडवर स्वारी करण्यास तुम्हाला उद्युक्त करणे हाच तर राघव चेतनचा डाव,उद्देश होता. आणि त्याला जे हवे तेच तुम्ही करत आहात.मलिक आपल्या बादशहाला नसिहत देनेकी गुस्ताफी फीर कभी मत करना।सेनापती हो,आदेश का पालन करो.अल्लाउद्दीनचा आवाज कठोर झाला.कुर्निसात करुन मलिक निघून गेला.सिंहलद्वीपच्या राजकन्येच्या आयुष्यात एका रावणाचा प्रवेश झाला, तिच्या ध्यानीमनी नसतांना…
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २६-१-२०२२.








