आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

24. महाराणी पद्मिनी चरित्र भाग 1, (१ ते ४)
पद्मिनी… चितोडगडचा मानबिंदू,मानदंड त्यागमूर्ती!पद्मिनी…एक धगधगती शलाका,स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा!महाराणी पद्मिनीत आणि झाशीच्या राणीमधे बरेच साम्य आढळून येते.झाशीच्या राणीने स्री सेना तयार करुन शत्रूशी मुकाबला केला तसेच पद्मिनीनेही स्रीसेना तयार करुन स्रीला स्वावलंनाचे धडे शिकवले.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! प्रस्तावना !!!
!!! प्रस्तावना !!!
नमस्कार!
आतांपर्यंत ४४ व्यक्तीचरित्र्ये वेगवेगळ्या विषयांवर लिहिले आहेत. त्यात काही रामायण, महाभारतातील, तर कांही ऐतिहासिक,कांही संत चरीत्र्ये व इतरही व्यक्तीरेखा आपल्यापुढे प्रस्तुत केल्या आहेत.आपण सर्वांनी माझे भरभरुन,कांहीनी वाॅट्स्पवर,तर कांहीनी प्रत्यक्ष फोन करुन कौतुक केल्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होत गेला. मनोबल वाढत गेले आणि मी लिहित गेले
आतां आपल्या समोर घेऊन येत आहे,चितोडगडची महाराणी पद्मिनी!
पद्मिनी… चितोडगडचा मानबिंदू,मानदंड त्यागमूर्ती!पद्मिनी…एक धगधगती शलाका,स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा!महाराणी पद्मिनीत आणि झाशीच्या राणीमधे बरेच साम्य आढळून येते.झाशीच्या राणीने स्री सेना तयार करुन शत्रूशी मुकाबला केला तसेच पद्मिनीनेही स्रीसेना तयार करुन स्रीला स्वावलंनाचे धडे शिकवले.
पद्मिनी सिंहलद्वीपची राजकन्या! सिंहलद्वीप सातद्वीपांनी बनलेला,रावणा ची वैभवशाली सोन्याची लंका,श्रीरामा च्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी! या सिंहलद्वीपचे राजा गंधर्वसेन व पत्नी महाराणी चंपावतीची एकूलतीएक कन्या पद्मिनी! पद्मिनी एकूलती असली तरी तिला राजनीती,अचूक निर्णायकशक्ती, वेदाभ्यास,शस्रविद्या यात पारंगत होती. स्वयंवरात चितोडगडचा राणा रतनसिंहां नी सर्व परीक्षा पार केल्यावरही स्वतः त्यांच्याशी दोन हात केले.एवढे असामान्य कर्तृत्व तिच्यात होते.विवाहा नंतर तिची सवत नागमती सुरुवातीला दुःसाहाने वागली.तिच्या इच्छेनुसार कितीतरी दिवस व्रतस्थ राहिली.पण जेव्हा बेभान झालेल्या हत्तीपासून नागमतीचे रक्षण करुन जीव वाचवला, तेव्हापासून तिला आपली धाकटी बहिण मानूं लागली.
चितोडचा राज्याचा गायक राणाचा जिवलग मित्र हा जेव्हा राणांजींच्या जीवावर उठला तेव्हा पद्मिनीने समय सूचकतेने त्यांचे प्राण वाचवले.वेष पालटून अचूक वेध साधून सिंहाची शिकार एकटीच्या बळावर केली.ती कुरुप व्हावी या उद्देशाने पद्मिनीवर विष वल्लीचा प्रयोग केला,पण त्यातूनही ती देवी पद्मावतीच्या कृपेने ठीक झाली.
प्रत्यक्ष चितोडच्या राजावरच राघव चेतनने हल्ला केल्यावर त्याला हद्दपारी ची शिक्षा केली आणि तो अल्लाउद्दीन खिलजीला जाऊन मिळाला.खिलजीच्या मनात पद्मिनीच्या अलौकिक सौंदर्याची स्तुती करुन त्याच्या मनात तिच्याविषयी ची अभिलाषा जागृत केली.आणि खिलजी पद्मिनीला प्राप्त करण्यासाठी इरेला पेटला.राणी पद्मावती त्याच्यासाठी आव्हान बनली.ध्यानीमनी नसतांना सर्व सुरळीत,आनंदात सुरु असतांना,नियती च्या एका फटकार्यानिशी सर्वांच्या चेहर्यावरील हसू,इच्छा आकांक्षा आणि आयुष्यातील आनंद पुसल्या गेला.सिंहल द्वीपच्या राजकन्येच्या आयुष्यात एका रावणाचा प्रवेश झाला.
चितोडगडपासून जवळच अल्लाऊद्दीनने अफाट सैन्यतळ ठोकला. महाराणांना मैत्रीचा संदेश पाठवून, पद्मिनीच्या दर्शनाची अभिलाषा व्यक्त केल्यावर सारेच संतापले,पण संयमी पद्मिनीने चितोडगड वाचवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून,तोडगा काढला.आपले प्रत्यक्ष दर्शन न देता सरोवरातील पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहून समाधान मानावे असा निरोप त्याला दिला.त्याप्रमाणे त्याने पद्मिनीचे
प्रतिबिंब बघितल्यावर त्याची लालसा आणखीनच चेतली.त्या दरम्यान त्याने राणाजीचे अपहरण केले,आणि चितोड ला निरोप पाठवला,राणा जिवंत हवे असतील तर,महाराणीने स्वतः खिलजी च्या तळावर यावे.यावरही पद्मिनीने बुध्दी चातुर्याने व अचाट धैर्याने विश्वासघाताचे उत्तर विश्वासघाताने देऊन स्वतःच्या पालखीत स्वतःच्या जागी महासेनापती गोराकाकांना पाठवून राणाजींची सुटका केली.
राणाजींना सोडवून नेल्यावर, अल्लाउद्दीन पिसाळला.त्याने युध्द पुकारले.एवढ्या अफाट सैन्यापुढे चितोड चे मुठभर सैन्य कितीकाळ टिकाव धरणार? शेवटी पराभव निश्चित आहे हे कळल्यावर,उरलेल्या पुरुषांनी केसरिया व सुलतानाच्या हाती चितोडमधील कोणतीही स्री किंवा कन्या जिवंत सांपडू नये म्हणून महाराणी पद्मिनी आपल्या राजपरिवारासह संपूर्ण चितोडगडमधील स्रीया,मुलींनी निर्भिडपणे जोहार पत्करला.आपल्यामुळे चितोडचा संहार झाला ही खंत तिला अखेरपर्यंत होती.
जिच्याप्राप्तीसाठी अल्लाउद्दीनने एवढा सर्वनाश घडवला ती चितोडची महाराणी कधीच त्याच्या हातून निसटली आपले पावित्र्य व पतिव्रत्य जपत,त्या अलौकिक रणरागिनीने साक्षात अग्निला आव्हान केले.स्वतःचे अग्नितेज सार्या जगाला दाखवून स्वतःच अग्निरुप झाली एखाद्या अग्निरेखा,अग्निशीखा सारखी..
माझ्या अल्पबुध्दीने इतिहासाशी प्रामाणिक राहून बरेच ग्रंथ व पुस्तकांचा अभ्यास करुन आपल्यापुढे पद्मिनीचे चरित्र प्रस्तुत केले.नेहमीप्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!काही चुका, त्रृटी आढळल्यास मोठ्या मनाने क्षमा करालच!
क्रमशः
मिनाक्षी देशमुख.
1
!! महाराणी पद्मिनी !! भाग – १.
सिंहलद्वीप हा सात देखण्या द्वीपां नी मिळून बनलेला अत्यंत संपन्न असा सागरी देश!रावणाने कुबेरकडून हिसकावून घेतलेली ती सोन्याची लंका! त्या समृध्द राज्याच्या खुणा आजही बघायला मिळतात.श्रीरामाच्या पदस्पर्शा चे पावित्र्य आजही तिथे जाणवते.प्रशस्त रस्ते,सुंदर सदने,मोठमोठे चौक,मनोरंज ना साठी नाट्यगृहे,खेळासाठी मैदाने, उत्तम अतिथीशाळा,धर्मशाळा,सराय, समृध्द बाजारपेठ,असंख्य देखणे मंदिरं, मधूर जलाच्या नद्या या सर्वांमुळे सिंहल द्वीपचे सौंदर्य अधिक खुलुन दिसत होते.
सिंहलद्वीपमधे प्रजा अतिशय सुखी समाधानी होती.सुवर्ण,रत्न,हिरे,मोत्यांनी खजिना भरलेला आहे.आजुबाजुच्या सर्व देशांशी सिंहलदेशाचे संबंध उत्तम आहेत. गुरुकुलं विद्यार्थ्यांनी भरलेली असून विद्यादान करणारे गुरु विद्यार्थ्यांना देशप्रेम आणि उत्तम संस्कार करताहेत. महाराज गंधर्वसेन राज्याला स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे सांभाळून प्रजेवर पुत्रवत प्रेम केल्यामुळे प्रजेला आपल्या राजा विषयी अत्यंत आदर,प्रेम आहे.लोकं या राज्याची तुलना रामराज्याशी करतात.
एक दिवस महामंत्री म्हणाले, महाराज, राजकुमारी पद्मिनीच्या विवाहा साठी अनेक प्रस्ताव येत आहेत.सार्या हिंदुस्थानातून अनेक महाश्रेष्ठ राजपुत्र विवाहोत्सुक आहेत.त्यासाठी मोठमोठे नजराणेही आले आहेत.महाराज, ज्यांचे कडून प्रस्ताव आलेत,त्या राज्यात आपले गुप्तहेर व नजरबाज योग्य माहिती काढण्याकरीतां रवाना केले आहे.
अगदी योग्य केलेस.पण पद्मिनी सारख्या असामान्य राजकुमारीसाठी सुयोग्य वर निवडणे म्हणजे अथांग सागरांंत हरवलेला मोती शोधण्यासारखे आहे.विवाहोत्सुक राजपुत्राला प्रथम स्वतःला सिध्द करावे लागेल.असंख्य बदकांमधे राजहंस जसा वेगळेपणाने उठून दिसतो तसा….पण महाराज हे सारे कसं कळणार? महामंत्री राजेंद्रसिंगनी चिंतेने विचारले.
महामंत्री राजकुमारीच्या स्वयंवरा ची तयारी करा.देशोदेशीच्या राजकुमारां ना आंमत्रणे पाठवा.विशाल मैदानांत स्वयंवर नगरी उभारा.विविध देशातील ज्ञानपंडितांना बोलवा.सर्वप्रकारच्या वाद स्पर्धा व शस्रस्पर्धांचे आयोजन करा. विविध द्वंदयुध्दासाठी हौदांची आणि स्पर्धासंकुलाची व्यवस्था करा.सिंहलद्वीप चे वैभव या निमित्याने सर्वांना कळूं द्या. महामंत्री,या सार्या निकषातून जो पार होईल तो निखळ बावणकशी सुवर्ण असेल.राजकन्या पद्मिनीसाठी ईश्वर निर्मित जणूं स्वयंप्रकाशी रत्नकोंदण असेल.महाराजांना प्रणाम करुन महामंत्री बाहेर पडले.
राजकुमारीची दासी म्हणण्यापेक्षा जिवलग सखी मनजीत धावत येत म्हणाली, राजकुमारी,पद्मावतीदेवीच्या मंदिरात एक वयोवृध्द,तपोवृध्द,तेजस्वी महान तपस्वी आले आहेत.अगऽ या सीतामाईच्या अस्तित्वाने आणि श्रीरामा च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या लंका नगरीत कुणीही आल्यावर,प्रत्यक्ष प्रभू रामाची भेट झाल्याचे समाधान वाटत असल्यामुळे,आपल्या राजधानीत सतत अनेक साधुसंत येतच असतात.परंतु, राजकुमारी!हे सिध्दपुरुष वेगळे आहेत. मितभाषी,कुणालाही सहज दर्शन देत नाही.अर्पन केलेल्या फळाफुलांना स्पर्श करीत नाही.त्यांचा अध्यात्मचा विशेष अभ्यास असून,त्यांना भूतभविष्याचे ज्ञान आहे.राजकुमारी,तुम्हाला नेहमी जे प्रश्न पडतात त्याची उत्तरे मिळूं शकतील.अनिच्छेनेच पण प्रिय सखी
मनजीतचे मन राखण्यासाठी त्या सिध्द पुरुषाची भेट घेण्यास तयार झाली.
मनजीतला झालेला आनंद लपवता आला नाही.म्हणाली,मी खरच भाग्यवान आपल्यासारखी निर्मळ मनाची सखी लाभली.खरच अभिमान वाटतो.
राजनगरीच्या उत्तर व्दाराजवळ जुन्या पध्दतीचं स्फटीक पाषाणापासून बांधलेलं ते देउळ महायुध्दानंतर बिभिषणाने मनःशांतीसाठी बांधून घेतले होते.गाभार्यात देवी पद्मिनीची नितळ काळ्या पाषाणाने चार हातांची स्वयंभू कमलासनावर बसलेली मूर्ती होती.राज कुमारीने मनोभावे,भक्तीभावाने नमस्कार करत,महाराज,राणीमां,प्रजाचे सुखा साठी प्रार्थना केली.तथास्तू! तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.देवीच्या पायाशी एक वृध्द तेजस्वी तपस्वी डोळे मिटून बसलेले होते.त्यांच्या मिटल्या डोळ्यांनी तिच्या अस्तित्वाची जाणीव आश्चर्य कारक होती.तू मोठी सौभाग्यशाली आहेस.तूं कुणी साधी सुधी नसून,साक्षात पद्मावतीदेवीनेच तुझ्या रुपाने या भूतला वर जन्म घेतलास.चौदा चौकड्यांच्या राजाची राणी होशील.सारा हिंदुस्थान तुझ्या कर्तृतावाने भारावेल, पण….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-१-२०२२.
2
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – २.
मनजीतने चिंतित स्वरात विचारले, महाराज असे काय घडणार आहे, राजकुमारीच्या आयुष्यात?
राजकुमारीचे नशीब देवीपद्मावतीने च निश्चित केले आहे.अग्निची जळती ठीणगी,साक्षात अग्निरेखा आहेस. भडकलीस तर स्वतःही जळशील आणि सार्या विश्वालाही जाळशील.महाराज, आपल्या शब्दातील संकेत आम्हा सामान्यांना कसे कळणार?जरा स्पष्ट सांगाल कां? मुली,तुझ्या ललाट रेषे विषयी सांगण्याची आज्ञा मला पद्मावती देवीची आहे असे समज.सुखदुःख सदैव तुझ्या समवेत राहणार आहेत.आयुष्या च्या प्रत्येक वळणावर घोर संकटाचा सामना करावा लागेल.साधूमहाराजांचे नेत्र अद्यापही बंद होते.
महाराज!आपल्या जगण्याच्या पाऊलवाटा आपणच निश्चित करायच्या असतात ना?स्वतःचे भविष्य आपल्या कपाळावर,हातांच्या रेषावर नसून आपल्या हाती असते.पराक्रम आणि निश्चयाच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करतां येते हे साक्षात प्रभू रामंचंद्रां नी सिध्द केल आहे.तरीही माझ्या भविष्यात संकटे असतील तर ते अटळ असणार,देवी पद्मावती सोसण्याची शक्ती देईल हा अढळ विश्वास आहे.
धन्य आहेस मुली,कल्याणमस्तु! त्यांनी डोळे उघडल्यावर त्यांच्या डोळ्यां तीला तेज बघून राजकुमारी त्यांच्यापुढे नतमस्तक झाली.महाराज,माझे शब्द अनुचित तर नव्हते ना?मुळीच नाही. केवळ आत्मविश्वास असावा,त्याला अहं भावाचे बोचरेपण असू नये इतकेच!नंतर बाजूला बसलेल्या तरुणाची ओळख करुन देत म्हणाले,सिंहलद्वीपच्या वाटेवर याची ओळख झाली.अत्यंत अभ्यासू, बुध्दीमान आहे हा माझा शिष्य!
बेटी,आत्मविश्वास आणि ईश्वरावर ची अढळ श्रध्दा ही ज्याच्याजवळ असते त्याला जीवनांत सारे गवसते.श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे आपले कर्तव्य नीट समजून घेणे आणि नेमकेपणे पुरे करणे हीच ईशपुजा असून सामान्य लोकांसाठी खुला असलेला हा सोपा मार्ग आहे.बाहेर दर्शनासाठी गर्दी खोळंबली असल्यामुळे पुन्हा भेटीस येईन असे सांगून राज कुमारीने निरोप घेतला.नकळतच स्वामीं जवळ उभ्या असलेल्या त्या युवकाकडे नजर गेली,तशी त्याच्या गहिर्या डोळ्यात गुंतुन पडली.मनजीतच्या हाकेने ती भानावर आली.पण भगव्या वस्रा मधील तो शिष्य मात्र तिच्या नजरेसमोरु न हलत नव्हता.अलगदपणे तिच्या तना मनावर पररुन राहिला.
मन मोठे विचित्र असते.स्वामीं च्या त्या शिष्याने पद्मिनीचे मन अगदी व्पापून टाकले.त्या युवकाचे भगव्या वस्रा तूनही मर्दानी देहसौंदर्य,मनाचा ठाव घेणारी बोलकी नजर,राजस राजबिंडे रुप बघून,कां कुणास ठावूक सिंहलद्वीपमधे वावरणारा विरक्त सन्याशाच्या रुपातील कुणी पराक्रमी राजकुमार असावा असे तिला राहून राहून वाटत होते.पण शंकेचे समाधान कोण करेल?स्वतःच्याच मना चा तिला राग येत होता.पण उधान वार्या गत उधळणार्या मनाला आवर कसा घालावा तिला कळत नव्हते.तिच्या या वर्तनलहरीमुळे तिच्या सख्याही गोंधळून गेल्यात.
त्या तरुणाच्या पूर्नभेटीच्या उत्सुकतेने मनजीतला म्हणाली,मला स्वामीं च्या गूढ शब्दांचा अर्थ समजून घेण्या करितां पून्हा भेटायचे आहे. पण राजकुमारी,स्वामी तर कालच हिमालया कडे निघून गेल्याचे कळले.तिच्याही न कळत मन काबिज करणार्या तरुणा विषयीची उत्सुकता तशीच राहिली.
या मनःस्थितीतून सुटका करण्या साठी राजकुमारीने मनजीनतच्या सहाय्याने आपले नांव आणि वेष बदलून सर्वांच्या नकळत शिकारीचा बेत आखला.आपल्या अचूक निशानाने,एका निरागस,निष्पाप हरणाचे प्राण सिंहा पासून वाचवले.राजकुमारी,तुमचा हा पराक्रम महाराज व राणीमांच्या कानावर गेला तर माझी धडगत नाही.कुणालाही न सांगता तुम्ही रचलेला हा शिकारीचा बेत माझ्या जीवावर नक्की बेतणार! मी आहे ना? नको काळजी करुस!
बोलतां बोलता राजकुमारीनं छातीत घुसलेला भाला खेचला.एवढ्यात ही शिकार व भाला माझा आहे.आलेल्या अनोळखी आवाजाकडे राजकुमारीनं दचकून पाहिलं.भरपूर उंची,मर्दानी देखणा चेहरा,राजघराण्याशी नातं सांगणारा, डोक्यावर हिरेजडीत शिरपेच, तेजस्वी हे डोळे पूर्वी कुठेतरी पाहल्या सारखे वाटले.राजकुमारी म्हणाली, आपण या मुलखात नवखे दिसता म्हणून असे बोलण्याचे धाडस केले.पण या शिकारीवर माझा अधिकार आहे.खरय! पण,आपला परिचय?मनजीत म्हणाली हे अत्यंत पराक्रमी,युध्दनिपून राजकुमार पद्मसिंह आहेत.पण…असे म्हणून सिंहा च्या मस्तकात रुतलेल्या भाल्यावर, चितोडगड राणा राजवंशाचं चिन्ह असले ला भाला बघून…आपण.. होय मी चितोडगड राजकुमार राणा रतनसिंह…
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २३-१-२०२२.
3
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – ३.
पण राणाजी चितोडगड तर फार लांब आहे ना? होय! इथे दक्षिण टोकास येण्यास कित्येक दिवसाचा प्रवास व विशाल समुद्र ओलांडून यावे लागते.या प्रवासांत भारताचे दर्शन घडले.इथली सारीच संस्कृती वेगळी आहे.वेषभूषा, राहणीमान,घरे! पद्मसिंह वेषातील पद्मिनी त्या चितोडगडच्या देखण्या राणा कडे मोठ्या औत्सुकतेने बघत होती.पण महाराज,आपण एकटेच इतक्या दूरवर? तसच खास कारणास्तव आलोय!हे द्वीप म्हणजे ईश्वराने पृथ्वीला दिलेले वरदान आहे.निसर्गरम्य,तृप्त,समृध्द सागराच्या पोटातून उमलून आलेलं…
अगदी खरय!या बेटावर पूर्वी कुबेराचं समृध्द राज्य होत.याच द्वीपावर रावणानं सीतामाईला आणलं होत.इथेच राम-रावण सर्वविनाशी युध्द झालं होत. बिभीषणाला हे राज्य सोपवून इथूनच सीतेसह राम लक्ष्मण अयोध्येला परतले होते.होय!चितोडगडपेक्षा आगळावेगळा देश आहे हा…इथे अहंकाराचे पदर आपो आप गळून पडतात.मन स्वच्छ निर्मळ होते.
सागरातील सात सुंदर बेटांनी मिळून हा जंबूद्भीप तयार झाला.राजा गंधर्वसेनांच्या सजग राज्यकारभारामुळे सिंहलद्वीप धनसमृध्द होत आहे.मित्रा, रतनसिंह थेट पद्मसिंहकडे पाहत म्हणाले इथल्या राजकुमारीचे स्वयंवर असल्याचे ऐकून इथे आलोय.राजकुमारीला जिंकण्यासाठीच!आणि दुर्देवाने तसे घडलेच नाही तर पद्मावतीदेवीच्या मंदिरा त आजन्म उपासनेत घालवेन आणि रतनसिंह झटकन निघून गेले.
राजकुमारी तुमचं हे साहस आम्हाला मुळीच रुचलं नाही.महाराज गंधर्वसेन क्रोधाने म्हणाले,आणि मनजीत तूऽ? तु ही सामील झालीस हे आणखीन खेदजनक.पिताश्री,यात तिचा कांहीही दोष नाही.ही कल्पना आणि हट्ट आमचा आहे.दोघींच असं एकटे जाणं,कोणता धोका पत्करताहात याची कल्पना तरी आहे कां?
पिताजी,भालाफेक,तलवारबाजी आणि अचूक लक्षवेध यात माझा हात कुणीही धरुं शकत नाही हे अपण जाणतां ना? होय,तुझे हे कौशल्य वादाती त आहे,पण आज्ञाभंगाचं काय?महाराणी चंपावती म्हणाल्या,महाराज खरं शासन या राजकुमारीलाच करायला हवे.
राणीमाॅं, विवाहानतर तुमच्यापासून कायमचे दूर होण्याची केवढी मोठी शिक्षा होणार आहे,यापेक्षा दुसरे कोणते मोठे शासन असणार माझेसाठी?दोन दिवसां नी होणार्या स्वयंवराचे स्मरण झाले आणि राणीमांचे मन भरुन आले.तिच्या अलौकिक सौंदर्याकडे पाहून त्यांना वाटले,कुणा अप्सरेने नव्हे तर साक्षात देवी पद्मावतीनेच राजकुमारी पद्मिनीच्या रुपात जन्म घेतला.
महाराज गंधर्वसेनांनी आपल्या एकुलत्याएक लाडक्या लेकीला कोणते ही बंधन न घालतां एखाद्या राजपुत्रा सारखे शस्रविद्येचे शिक्षण दिले. राज कारण,धर्मकारणाचे ज्ञानही तिने मिळव ले.तसेच माता चंपावतीकडून पौराणिक गोष्टीतून बरीचशी माहिती मिळाली.व त्यावर अखंड प्रश्न विचाराची.माताजी, एकीकडे स्री ला देवी मानायचे तर दुसरी कडे तिचा अपमान,अन्याय करायचा हे कसे?देवी सीतेवर तर प्रत्यक्ष रामांनीच अन्याय केला.मग न्याय मागायचा तरी कुणाला?पांच बलवान पतींची पत्नी महाराणी द्रौपदीच्या वस्राला भर सभेत हाता घालायचे धारीष्ट्य दुर्योधनाला कसे झाले?तिच्या सर्वच प्रश्नांना उत्तर देणे चंपावतीला अशक्य होत असे.ती पद्मिनी च्या बालपणींच्या आठवणीत मग्न झाली
राणी म्हणाली,महाराज आठवते आपल्याला? एकदा तुम्ही शिकारीला पद्मिनीला नेले नव्हते तर,चार दिवस तिने नुसता रडून गोंधळ घातला होता. ती विवाहानंतर आपल्याशिवाय सारे आयुष्य कसे काढणार?पद्मिनी अस्वस्थ पणे म्हणाली,या स्वयंवर परंपरेची आम्हा ला भीती वाटते.भीती आणि भय हे शब्द ह्या सिंहलद्वीपच्या राजकन्येच्या तोंडी शोभत नाही.इथली सामान्य कन्याही विरांंगणा असते.ती जन्माबरोबरच शौर्य आणि धैर्य घेऊन येते.
तसं म्हणायचं नव्हतं रानीमां! एका अनोखा परिवार आणि राज्याचा स्विकार करणे किती अवघड असेल?नाही बेटा.. विवाहानंतर सार्या अपरिचित बदलांचा स्विकार करण्याची आंतरिक शक्ती प्रत्येक स्रीमधे असते.चिंता करुं नको.हे स्वयंवर म्हणजे शौर्यचं,पराक्रमाचं, बाहू बलाची,बुध्दीची,ज्ञानाची,निर्णय क्षमतेची परीक्षा आहे.आणि या सर्व कसोटींना उतरणारा वीर निश्चितच सामान्य नसेल. पद्मिनीच्या नजरेसमोर रतनसिंहाचा चेहरा तरळला.पण मोठ्या कष्टाने दूर सारले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. २४-१-२०२२.
4
!!! महाराणी पद्मिनी !!!
भाग – ४.
पिताश्री माझा एक हट्ट पुरवाल? स्वयंवरात विजयी झालेल्या वीराची शेवटची परीक्षा मी घेईन.महाराणी म्हणाल्या,हा कसला भलताच हट्ट?स्वयं वरांत हजारो राजे महाराजे जमलेले असतील,त्या सर्वांसमोर तूं एका अजिंक्य वीराशी लढणार?कांही अनपेक्षित घडले तर?
रानीमां,जर मी हरले तर,आनंदाने त्या वीराला शरण जाईन.आणि तो हरला तर?एका स्री कडून पराभूत होणारा योध्दा कसला?तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. महाराजांनी आश्वास्त केले.महाराणीने चिंता व्यक्त केल्यावर,गंधर्वसेन म्हणाले, आपली कन्या ही साक्षात देवी पद्मावती चे रुप आहे.सर्व ठीक होईल.
सिंहलद्वीप नगरीबाहेरच्या प्रशस्त मैदानात जणूं सारा हिंदुस्थान जमा झाला होता.आपल्या लाडक्या राजकुमारीच्या स्वयंवरासाठी सिंहलचे सारे प्रजाजन उत्सुकतेने मैदाणावर हजर होते.राज कुमारी पद्मिनीच्या असाधारण सौंदर्याची कीर्ती सार्या हिंदुस्थानभर पसरली होती. त्यामुळे कांही तिचे सौंदर्य पाहण्यासाठी, कांही स्वयंवर अनुभवण्यासाठी,तर कांही आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने आले होते.
महाराज गंधर्वसेनांनी स्वयंवर सोहळ्याकरितां मैदानावर विशेष व्यवस्था केली होती.जणूं एक मोठे शहर वसवले होते.रेशमी कापडांच्या भिंती, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून,ठीक ठीकाणी वाळ्याचे पडदे,त्यावर सतत सुगंधी जलाचे फवारे,मोठमोठी थंड पाण्याची कारंजी,सर्व प्रकारची दुकाने, देशोदेशीतून येणार्या राजे महाराजां साठी,योग्य निवासस्थाने,मनोरंजनासाठी क्रीडा संकुले,या सर्वांवर महाराजांचे परम मित्र व राज्याचे महासेनापती राजेंद्रसिंहा ची पूर्ण देखरेख होती.
स्वयंवरासाठी बनवले गेलेले सभागृह म्हणजे,सिंहलद्वीपच्या राज दरबाराचे प्रतिरुपच! एकाचवेळी हजारो लोक बसूं शकतील अशी व्यवस्था, स्वयं वरात भाग घेण्यार्यासाठी विशेष प्रकार ची आसने,अणि राजपीठावर महाराज व महाराणीकरितां भव्य सिंहासन व राज कुमारीसाठी त्यांच्या शेजारीच अत्यंत देखणे आसन, तसेच राजपरिवार, व मंत्री सरदारांसाठी सुशोभित आसने घडवून घेतली होती.व्यासपीठाच्या अगदी समोर बाहुयुध्द,मल्लयुध्द,तलवार युध्द अश्या वेगवेगव्या प्रकारच्या युध्दा साठी आवश्यक हौद्यांची योजना केली होती.ठीकठीकाणी उभे असलेले सुरक्षा रक्षक सगळीकडे लक्ष ठेवून होते.आज सकाळपासूनच प्रचंड सभामंडप गर्दीने फुलुन गेला होता.विशेष सभागृह ज्ञान पंडितांच्या वेदचर्चा रंगल्या होत्या.
सर्वजन आपापल्या आसनावर स्थानापन्न झाले होते.थोड्याच वेळात चंडप्रतापी सिंहलद्वीपचे अधिपती महाराज गंधर्वसेन व महाराणी चंपावती व्यासपीठावरील सुवर्णासनावर स्थानाप न्न झालेत.ज्यावेळी राजकुमारी पद्मिनीने व्यासपीठावर प्रवेश केला आणि सार्यांचे श्वास थांबलेच जणूं…तिघांच्या जयघोषा ने सभामंडपात एकच जल्लोष उसळला. सरदार राजेंद्रसिंहांनी सर्वांना शांत होण्या चे आव्हान केले.थोडक्यात आजच्या स्वयंवराची व पद्मिनीची माहिती देत रुपरेषा सांगीतली.
आणि त्या सभामंडपात सुरु झाली पराक्रमाची परीक्षा.बघतां बघतां अनेक राजे महाराजे पराभवाने लज्जित होऊन माना खाली घालून आपापल्या आसना वर येऊन बसले.कांहींनी काढता पाय घेतला.जखमी योध्यांना तातडीने औषधो पचार केला.
आतांपर्यंतच्या सर्वच लढतीत राज कारण,वादस्पर्धा,वेदचर्चा या सर्वांमधे वर्चस्व सिध्द झालेला महावीर चितोडगड चे राजकुमार,रावळ राजवंशाचे सुपुत्र, राणा रतनसिंह!महाराणा समरसिंहाचे पुत्र,मेवाडला नवे रुप मिळवून देणार्या बाप्पा रावळसिंहाचे वंशज,महाराणा समरसींहाच्या मृत्युनंतर चितोडगडचा सारा कारभार राणा रतनसिंह सांभाळत असून अत्यंत पराक्रमी आणि प्रजाप्रिय, अत्यंत उदार,विविध कलांचे चाहते आहे. जिंकलेल्या राणा रतनसिंहाचा परिचय महामंत्री राजेंद्रसिंहांनी दिल्यावर, राजा गंधर्वसेनच्या मुखावर समाधानाचे प्रसन्न हसू पसरले,परंतु अद्याप या महावीराची मोठी परीक्षा बाकी आहेच….
राणा रतनसिंहाची अखेरची लढत राजकुमार पद्मसिंह बरोबर होणार हे जाहीर केल्यावर,कोण हा राजकुमार पद्मसिंह?आतांपर्यत तर या वीराचे अस्तित्वही नव्हते,मग अचानक याला संधी कां दिल्या जाते?उपस्थितांच्या मनां त असंख्य प्रश्न निर्माण झालेत.
संकेतासरशी राजकुमार पद्मावत पांढराशुभ्र अंगरखा,लेहंगा,कमरेला बांधलेल्या केशरी पट्ट्यात रत्नजडीत खोचलेली तलवार,मस्तकी केशरी साफा, अशा वेषात स्पर्धास्थानी येताच त्याने महाराज व महाराणीह प्रणाम केला. तलवार उंचावत प्रेक्षकांना अभिवादन केले.त्या साध्याश्या कृतीने पद्मसिंहने क्षणार्धात सार्या प्रेक्षकगृहाला जिंकून घेतले.आणि पुढच्याच क्षणी पद्मसिंह व रतनसिंहमधे स्पर्धा सुरु झाली…
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
दि. २४-१-२०२२.



















