गांधारी चरित्र संपूर्ण भाग ४, (१३ ते १६)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       गांधार देशीच्या सुबल राजाला एक सुलक्षणी,अद्वितीयरुप,चारित्र्य संपन्न अशी गांधारी नांवाची राजकन्या होती. ती बालपणापासुनच श्रध्दाळु, धार्मिक असुन भगवान महादेवावर नितांत श्रध्दा होती.महादेवांची भजन पुजन,उपासना करणे हे तिचे नित्याचेच काम! कडक व्रतसाधना केल्याने………………………….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! गांधारी !!!

!!!  गांधारी !!

                भाग – १३.

         ज्याप्रमाणे पराक्रमी वीराला जर कोणी युध्दाचे आव्हान दिले तर तो पाठ दाखवु शकत नाही तद्वतच युधीष्ठीरला द्यूतक्रीडेसाठी कोणी आव्हान दिले तर तो कधीही नकार देऊ शकत नव्हता.हा त्याचा नियम होता.द्यूतक्रीडेसाठी युधीष्ठीर आपले भाऊ,पत्नी द्रौपदी व माता कुंतीदेवीसह हस्तिनापुर राज भवनांत आल्याचे गांधारीला कळल्यावर तीच्या मनाची तगमग सुरु झाली.द्यूत क्रीडा म्हणजे सर्व नाशाकडे नेणारे कपटच! महाविषच! शिवाय दुष्टबुध्दीने रचलेले कपट कारस्थान!या द्यूताचे फासे म्हणजे पांडवांच्या मृत्येचे पाश! या द्यूतात जो पराभूत होईल त्याची आहुती व जो यशस्वी होईल त्याची सुध्दा अंतिम आहुतीच ठरणार आहे.

        द्यूतक्रीडेचा दिवस उजाडला.हा दिवस नसुन भयानक काळरात्रच ठरेल की काय अशी रास्त भीती गांधारीला वाटु लागली.धृतराष्र्टाची सभा भरली. द्रोणाचार्य,भीष्म,विदूर सर्व जेष्ठ मंत्री, दुर्योधन,दुःशासन,शकुनी,कर्ण आणि सर्व कौरव राजकुमार वस्रालंकाराने सजुन आले.पांडव सुध्दा राजवेषात आले.गांधारी,तिच्या सुना, कुंती,द्रौपदी भवनात बसल्या होत्या.गांधारी अत्यंत सुन्नावस्थेत विचारमग्न होती.पांडवांना नामशेष करण्याचा हा एक दुष्ट मार्ग आहे.या कपटनीतेने आज जरी पांडव पराभूत झाले तरी भविष्यात या कपटाचे घोर परीणाम आपल्या मुलांना भोगावे लागतीलच लागतील!गांधारी च्या मनांत विचारांचे काहुर माजलेले असतांनाच एक चमत्कार घडला.धृत राष्र्टाच्या अग्निशाळेत गिधाडे येऊन मोठमोठ्याने हुॅंआsssहुॅंआsss हूॅंआs असे मोठ्याने ओरडु लागले.त्या आवाजा पाठोपाठ आकाशात मोठ मोठ्या घारी आक्रमक होऊन फिरु लागल्या.इतर पक्षी भयंकर विचित्र  कोलाहल करुं लागले.हे आवाज इतके वाढले की! त्यामुळे गाढवे बिचकुन रेंकु  लागली.गांधारी हे सर्व अपशकुनी आवाज ऐकुन अशुभ लक्षणे तिच्या मनाला जाळू लागली.विचारांच्या गर्तेत असतांनाच बातमी आली की,युधीष्ठिर द्यूतामधे सर्वस्व हरुन,सर्व भाऊ कौरवांचे दास तर झालेतच, पण द्रौपदी ला सुध्दा पणाला लावुन तिलाही दासी केली.तेवढ्यात द्रौपदीचा मोठ्याने आक्रोशयुक्त रडण्याचा आवाज येऊ लागला.दुःशासन क्रुरपणे आरडाओरड करीत द्रौपदीचे केसांना धरुन ओढत,तू आमची दासी झालीस असे आचकट विचकट बोलत असलेलं गांधारीने ऐकले. द्रौपदी रजस्वला…एक वस्रा विभित्स बोलत,मुर्दाड हसत तिला भरसभेत ओढत नेले जात होते.

        गांधारीला हे सर्व असह्य होऊन दुःखातिरेकाने डोके धरुन मटकन खालीच बसली द्रौपदीचा आर्तनाद विलापा ऐकुन सर्व राजस्रिया रडु लागल्या.सारे अंतःपुर केविलवाण्या सुरां नी कळवळुन गेले.गांधारीच्या बंद दृष्टी ला भीषण भविष्य स्पष्ट दिसु लागले.ही अभद्र घटना ज्या हातुन घडली…ज्या मनांतुन घडवल्या गेली,त्यांचे हात,शरीरे सपासप कापले जाणार!भीमाची भीषण आरोळी…सूडाची प्रतिज्ञा,हे सर्व असह्य होऊन गांधारी भरसभेत प्रवेश करते,तर सभेत विलक्षण दृष्य सुरु असते. द्रौपदी सर्व श्रेष्ठींना लज्जारक्षणा ची भीक मागत प्रत्येकासमोर जाऊन विनवत आहे,पण कोणीही तिच्या मदती ला येत नाहीसे पाहुन, ती कळवळुन श्रीकृष्णाचा धावा करत आहे तोच एक दैवी शक्ती द्रौपदीभोवती तळपू लागुन एकवस्रा द्रौपदीभोवती अनेक वस्रें गुंडाळली जाऊ लागली.

         गांधारीला हे सर्व असह्य होऊन तरातरा धृतराष्र्टाजवळ जाऊन केविल वाणे,कळवळीने म्हणाली,महाराज! आतांतरी थांबवा,कांहीतरी विचार करा!आपल्या कुळाच्या सुनेची भरसभेत होणारी विटंबना संपुर्ण कुळाचा सर्व नाश घडविणारी घटना आहे. आपल्या च मुलांनी,त्यांच्याच भावांना व पत्निला गुलाम करणे तुम्हाला कितपत योग्य वाटते? द्रौपदीसारख्या पतीव्रतेचा छळ आत्मघातकी ठरणार! तीची हाय लागल्याशिवाय राहणार नाही.दुर्योधना ला आवरा!संपुर्ण कुळाचा,राज्याचा नाश ओढवुन घेण्यापेक्षा त्याचा एकट्या चा त्याग करणे योग्य होईल.

            क्रमशः
     संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गांधारी  !!

                भाग – १४.

        गांधारीने केलेल्या कान उघाडणी ने व घडलेल्या सर्व घटनांनी धृतराष्र्ट मनोमन लज्जित झाला व आपल्याला पश्चाताप झाला असे दाखवुन द्रौपदीला ‘वर’ मागायला सांगतो.द्रौपदी ‘वरानुसार  आपल्या पतींना दास्यातुन मुक्त करावे,एवढीच मागणी करते.धृतराष्र्ट दिलेल्या वराप्रमाणे सर्व पांडवांना दास्या तुन मुक्त करुन त्यांनी हरलेले इंद्रप्रस्थ राज्य परत करतो.युधिष्ठीर आपले भाऊ आई व पत्नी द्रौपदीसह हस्तिनिपुरहुन परत इंद्रप्रस्थला परत जायला निघालेत. गांधारीला हायसे वाटले.सारे अंतःपुर समाधानाने फुलुन उठले.गांधारीने मनोमन हाथ जोडुन इश्वराचे आभार मानले.कुलक्षय होणार हे विधिलिखित टळले असे गांधारीला वाटले.गांधारीचे मन शांत झाले.परंतु अशुभ लक्षणे परत दिसु लागलीत व पुन्हा तिचे मन अस्वस्थतेने तगमगु लागले.

        अश्या मनःस्थितीतच ती राजदर बारांत पोहोचली तर तीला काय ऐकायला मिळाले, दुर्योधनाने पुन्हा धृतराष्र्टाला भरीस पाडले….म्हणाला, पांडव आज दुखावल्या नागाप्रमाणे परत जरी जात असले तरी भविष्यात ते तयारीसह हल्ला करतील,अनुशास्रवेत्ता अर्जुनच तुमच्या सर्व पुत्रांचा वध कर  ण्यास समर्थ आहे,म्हणुन परत द्यूत खेळण्यास बोलावुन त्यांना हरवुन १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासास पाठवावे.अज्ञातवासात ओळखले गेले तर पुन्हा १२वर्षे वनवास,एक वर्ष अज्ञातवास असे चक्र चालु ठेवायचे! शकुनी म्हणाला,महाराज! पांडवांशी समोरासमोर झुंज घेणे अशक्य आहे, म्हणुन हा शेवटचा एकच डाव टाकला तर,तुमच्या मुलांना कायम निष्कंटक राज्य उपभोगता येईल.धृतराष्र्टांनी उपाय विचारल्यावर,शकुनी म्हणाला, पुन्हा युधीष्ठिराला द्यूत खेळण्याचे आव्हान देऊन फक्त एकच द्यूताचा डाव आणि पांडवांना नेहमीसाठीचा वनवास धृतराष्र्टाला हा उपाय पटल्याने तो तयार झाला.

           हा बेत ऐकुन गांधारी स्तब्ध झाली.तिरिमिरितच ती भरसभेत गेली. गांधारी अचानक आलेली पाहुन सर्वजण स्तब्ध झालेत.शोकाकुल संतप्त व व्याकुळ झालेली गांधारी अत्यंत कळवळुन म्हणाली, आर्यपुत्र! पुन्हा पांडवांना द्यूतास बोलावुन अरिष्ट ओढ वुन घेऊ नका.दुर्योधनाचा जन्मतःच मुळी अशुभावस्थेत झालेला,त्यावेळी त्याची केलेली भविष्यवाणी,हा संपुर्ण कुळाच्या नाशाला कारक होईल,पण पुत्रमोहाने त्यावेळी त्याचा त्याग केला नाही.त्याचे पर्यावसन आज याच्या कपट कारस्थानाला बळी पडुन संपुर्ण कुळाच्या विनाशाला कां कारणीभुत होताहात?दोन घराण्याच्या बांधलेल्या पुलाला कां नष्ट करताहात?महाराज! महाराज! कुंतीचे मुलं शांतीपरायण आहेत,वैरभावनेची आग विझत आलेली  आहे,मग त्यांना डिवचुन,भडकवुन आपणच पुनः वडवानल पेटवणे कितपत योग्य आहे?असे केल्यास या कुळाचा अंतच तुम्हाला पहावा लागेल. पुत्रशोकाचे दुःख आपल्याला भोगावे लागले.धृतराष्र्टाने त्यावर उपाय विचार ल्यावर…..

       गांधारी म्हणाली,पुत्रप्रेमापोटी आजवर जे केले नाही ते! दुर्योधनाचा त्याग करुन कुळाचा होणारा संहार वाचवा!तुमची बुध्दी स्थिर ठेवुन नीती धर्मा प्रमाणे वागा,कपटी मार्ग सोडुन द्या धन्य त्या मातेची! कुलक्षय वाचवण्या साठी पुत्रत्याग करायला सुध्दा तयार झाली.पण धृतराष्र्ट? तो अशक्य.. अशक्य.. म्हणत ओरडला! गांधारी गरजली, महाराज! या द्यूताच्या एका डावामुळे कुळाचा संपूर्ण संहार झालेला तुम्हाला पहावा लागेल.शेवटचे एकच सांगते…क्रुरकर्मातुन मिळालेली लक्ष्मी अस्थिर व विनाशशील असते.आणि सत्कर्माने मिळवलेली लक्ष्मी अक्षय राहुन पुत्रपौत्रांपर्यत  टिकुन वाढत राहते गांधारीने पराकोटीचा प्रयत्न केला पण शेवटी ती हतबल झाली.विनाशकाले  विपरित बुध्दी!” धृतराष्र्टासमोर फक्त दुर्योधन सिंहासनधारी झालेलाच दिसत होता.त्याच्या बुध्दीने नशीबाने विनाशा ची वाट पकडल्यावर,गांधारीची धर्मयुक्त शिकवण कशी बरं पटावी?

           क्रमशः
     संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!!  गांधारी  !!!

             भाग – १५.

         गांधारीचे कळवळुन समजावणे, सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर ओतलेले पाणीच! धृतराष्र्ट उन्मतपणे ओरडला,आतां कुळाचा अंत झाला तरी चालेल,पण दुर्योधनाला आता थांबवु शकत नाही.धृतराष्र्टाच्या आज्ञेने प्रतिहारीने हस्तीनापुरच्या वेशीवर पोहो चलेल्या पांडवांना पुनः द्यूत खेळण्याचे आमंत्रण दिले. युधिष्ठीरने जाणले,हे काळाच्या प्रेरणेने होत आहे. भविष्यात भयानक विनाश दडलेला आहे.युधीष्ठी राला सर्वांनी परोपरीने समजावले, हे कपट कारस्थान आहे,तू परत द्यूत खेळु नकोस,पण द्यूताला नकार न देण्याचा युधीष्ठिराचा बाणा होता ना?

       भीष्माचार्य,द्रोणाचार्य,विदूर आदीं नी त्याला द्यूत न खेळण्याबद्दल परावृत्त करण्याचा खुप प्रयत्न केला.गांधारीने सुध्दा युधीष्ठिराला अडवुन म्हणाली,बेटा हा डाव तूं खेळु नकोस,यात सर्वस्वाचा नाश आहे.दुष्ट कपट कारस्थान आहे. गांधारीला प्रणाम करुन गंभीरपणे युधीष्ठिर म्हणाला, माते! मी महाराजांची अवज्ञा करुं शकत नाही,असे म्हणुन तो द्यूत सभेत गेला.सभा कसली? मृत्यु दरबारच तो! सर्व बसल्यावर शकुनीने अट सांगीतली…. जो हरेल त्याने बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास पत्करायचा.अज्ञातवासात जर दिसले तर परत तेच चक्र! अट मंजुर! एकच डाव…. शकुनी जिंकला… कौरव जिंकले….कौरवांनी पांडवांचे राज्य,धन संपत्ती हिरावुन घेतली.पांडवांनी मृगचर्मे धारण करुन,द्रौपदीसह अत्यंत भग्नावस्थेत वनाकडे निघाले.हस्तिनापुर च्या अवकाशातुन पांडवांची गर्जनारी भयंकर शापवाणी धृतराष्र्ट पुत्रांचा संहार….संहार… संहार कानावर आदळत होती.अंतःपुरात असह्य गांधारी अत्यंत उद्वेगाने,विकलतेने ओक्सीबोक्सी रडत होती.

       सभाभवनात पश्चातापदग्ध स्वरांत

धृतराष्र्ट विचार होते, संजया! ही भारतवंशाच्या विनाशाची सुचना तर नव्हे ना?तेवढ्यात  महर्षी नारद प्रगटले व म्हणाले,आज पासुन १४ व्या वर्षी दुर्योधनाच्या आततायी अपराधामुळे भयानक महायुध्द होऊन पांडवांच्या अतुल पराक्रमाणे कौरवांचा संपुर्ण संहार होईल…. संहार होईल…विधिलिखीतावर शिक्का मोर्तब झाले. पुत्रशोक होणार म्हणुन डोके धरुन बसला.गांधारीच्या तर शोकाला पारावारच उरला नाही.ती हुंदके देत रडु लागली.

      भारताची सम्राज्ञी गांधारी फक्त शरीराने वावरत होती,मन मात्र आंतल्या आंत वेदनांच्या वणव्यात अखंडपणे आक्रंदत होते. तो घडलेला द्यूत..द्रौपदी चा दुबळा आक्रोश…घडणारा भविष्य काळ…शंभर विधवा सुनांचा कारुण्य पुर्ण विलाप…..वेदना…विलाप… या  विचारांत असतांनाच,तिला बातमी मिळाली की,

गांधारीचा जावई, तीच्या लाडक्या दुःशालीचा पती ‘जयद्रथ’ काम्यक वनांत एकट्या द्रौपदी ला पाहुन मागचा पुढचा विचार न करतां जबरदस्तीने रथात घालुन तिला पळवुन नेऊ लागला.धौम्य ऋषींचा आक्रोश… द्रौपदीचे केविलवाणे ओरडणे…पांडवां ना कळल्याबरोबर भीमार्जुनाने जयद्रथा वर हल्ला करुन पराजित जयद्रथाला पकडुन युधीष्ठीरासमोर ऊभे केले.भीम अर्जुन त्याला ठार मारणारच होते पण! त्यांना गांधारीची आठवण झाली. गांधारी मातेचा एकुलता एक जावई, बहिण दुःशालीचा पती! त्यामुळे पांडवां नी त्याला प्राणदान देऊन सोडुन दिले.

     गांधारी अतिशय शोकदग्ध,विकल होऊन नशीबाला दोष देत रडु लागली. नाहीतरी दुसरं तिच्या हाती काय होते? डोळ्यासमोर उभी राहिली तिची पोर दुःशाला! एकुलती एक शालीन,सोज्वळ पतिव्रता !या सद्गुणाला जन्मभर वेदनांचीच सोबत असावी का?

           क्रमश
      संकलन-मिनाक्षी देशमुख.

!!! गांधारी  !!

             भाग  –  १६.

     भराभर काळ सरला.बारा वर्षाचा प्रदिर्घ वनवास!एक वर्षाचा अज्ञातवास संपला.विराटराजा बरोबर केलेल्या युध्दात कौरवांचा सडकुन पराभव करुन विजयासह पांडव प्रकट झाले.काळ्या कुट्ट अंंधाराला बाजुला सारुन हजारो तळपत्या किरणांसह सुर्यनारायण जसे प्रकाशित होतात तद्वतच पांडव प्रकटले बलवान,दुर्दम्य,उत्साही आणि प्रखर तेजस्वी आणि त्यांच्या मागे उभी दिव्य शक्ती श्रीकृष्णाची! पांडव सामर्थ्यशाली असुनसुध्दा शांततेने,सुखासमाधानाने  राज्य करण्याच्या हेतुने आपले इद्रष्रस्थ राज्य मागीतले,त्याला नकार मिळाल्या वर,फक्त पांच गांवे मागीतले तर तीही मागणी धुडकावुन,उन्मत,उध्दट दुर्योधनाने सुईच्या अग्रावर मावेल एवढी हि भूमी मिळणार नाही असा निरोप पाठवला.

  दुर्योधनाला समजवण्यासाठी धृतराष्र्टा वर सर्वांकडुन दबाव आल्यामुळे त्यांनी ही दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला,पण अहंकारी,दुर्बुध्दी,दुरात्मा, उद्दाम दुर्योधन कोणाचेही कांहीही ऐकण्यापलीकडे गेलेला! श्रीकृष्णाची शिष्टाई वाया गेली.गांधारीने प्रथम आई या नात्याने,नंतर कठोर सम्राज्ञी म्हणुन त्याला खुप समजावले,उपदेश केला, पण तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले,फोल ठरले.

      कौरव कुळाची जबाबदार स्री,निष्ठा वंत पत्नी,कर्तव्यदक्ष माता, आणि एका मोठ्या साम्राज्याची कर्तबगार महाराणी या नात्याने तिच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली.एका मोठ्या साम्राज्यावर महायुध्दाचे गडद सावट पडले.आतां स्पष्ट व परखडपणे बोलणे तिला आवश्यक झाले.ती पतीला म्हणाली,महाराज! दुर्योधनाच्या जन्म वेळीच निसर्गात अमंगल चिन्हे उमटली होती,हा मुलगा कुलनाशक ठरेल हा संकेत मिळाला होता.पुरोहितांनी व मी आपल्याला त्याचा त्याग करण्याबद्दल वारंवार विनवले होते,पण तुम्हाला अंध पुत्रप्रेम आड आले.एवढेच नव्हे तर त्याच्या अन्यायी,अधर्मी,अनिती,कपट कारस्थाने अश्या सर्व पापाचाराला आवर तर घातला नाहीच,पण प्रोत्साहन देऊन खतपाणी घातल्यामुळे आज ही संकटमय परिस्थिती निर्माण झाली व  या सर्वनाशाला कारणीभूत झालात. दुर्योधन,पापी व मतलबी सहाय्यकांनी वेढलेला असतांना राज्याची धूरा त्याच्या खांद्यावर दिली.पांडुपुत्र व तुमची मुलें यांच्यातील फुटीरतेला तुमच्यामुळेच प्रोत्साहन मिळाले.या सर्व परिस्थीतीला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार  आहात.एवढ्या भरसभेत एका बलाढ्य  सम्राटाला निर्भिड व परखडपणे गांधारी च बोलु शकली.एका पतिव्रतेची जळती निष्ठा सत्य बोलत असलेली सारी सभा द्विगमुढ तठस्थ होऊन शांतपणे ऐकत होती.

         महाविषारी नागाप्रमाणे विष ओकणार्‍या दुर्योधनाला,एक सम्राज्ञी व ऐक माता त्याला उपदेश करत म्हणाली, दुर्योधना! सर्व जेष्ठांचा सल्ला मानलास तर शांतता प्रस्थापीत होऊन सर्वांना सुखाचे दिवस येतील.दुर्योधना! राज्या ची प्राप्ती, रक्षण आणि उपभोग या गोष्टी केवळ आपल्या इच्छेने होऊ शकत नाही,त्यासाठी दुष्ट विकार,क्रोध कपटीपणा काबुत ठेवुन लोकांचे मन जिंकावे लागते.तूं क्रोध आणि कपटी पणाच्या अधीन असल्यामुळे या राज्या चे रक्षण करुं शकणार नाहीस.दुष्ट विका रांचे उदंड घोडे काबुत ठेवले नाही तर, सारथ्याला मार्गातच मारुन टाकतात.जो राजा स्वतःवर,मत्र्यांवर,शत्रुवर वचक ठेवु शकत नाही,काबुत ठेवु शकत नाही तो राजा शेवटी राज्य आणि प्राण दोन्ही गमावुन बसतो.पुढे म्हणाली! बेटा!पांड वांमधील एकी आणि परस्परांमधील जिव्हाळा वाखाणण्यासारखा तर आहेच शिवाय त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उभे आहेत,ते तुमचा पुर्ण संहार करण्यास समर्थ आहेत.युध्दाचा विनाश कारी मार्ग सोडुन त्यांना शरण जा.त्यात च तुझे हित आहे.वास्तविक हे राज्य पांडुराजाने आपल्या पराक्रमाने वाढवले शापग्रस्त झाल्यामुळे तुझ्या वडीलांच्या हातात राज्य सोपवुन वनवासी झाले. तुला कल्याण व सुयश मिळवायचे असेल तर पांडवांचे राज्य  परत कर!

           क्रमशः
     संकलन – मिनाक्षी देशमुख.

गांधारी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading