आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

123.एकादशी संपूर्ण माहिती व प्रश्न उत्तरे
एकादशी संपूर्ण माहिती व प्रश्न उत्तरे
एकादशी अभंग पहा
https://96kulimaratha.com/akadashi-mahatmya-abhang-1/
123.एकादशी संपूर्ण माहिती व प्रश्न उत्तरे
Questions and answers regarding Ekadashi
एकादशी
(माहिती स्मार्त व भागवत एकादशी बद्दल अनेक सदस्यांनी शंका विचारली आहे , त्यामुळे आज त्याबद्दल सर्व माहिती पाठवत आहे – *अशोककाका कुलकर्णी* )
*एकादशी तिथीचा निर्णय*
भोजननिषेधात्मक व व्रतात्मक असे एकादशीच्या उपवासाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकाराला पुत्रवान गृहस्थांना कृष्णपक्षात देखील अधिकार आहे. व्रतात्मक उपवास मात्र अपत्ययुक्त गृहस्थांनी कृष्णपक्षात करू नये, समंत्रक व्रतसंकल्प न करिता यथाशक्ति नियमयुक्त भोजनवर्जन मात्र करावे. याप्रमाणे तिथीचा क्षय असता शुक्लपक्षातही जाणावे. शयनी आणि बोधिनी यांच्या मध्यंतरीची कृष्णपक्षातली एकादशी करण्यास सापत्य गृहस्थादिक सर्वांना अधिकार आहे. विष्णूची सायुज्यमुक्ति व आयुष्य आणि पुत्र यांची इच्छा करणारे यांनी काम्यव्रत दोन्ही पक्षात करावे. काम्यव्रताला मुळीच निषेध नाही. वैष्णव गृहस्थाश्रमी यांनी कृष्णपक्षातल्या एकादशीला देखील नित्य उपवास करावा. हे एकादशीव्रत शैव, वैष्णव, सौर इत्यादि सर्वांना नित्य आहे. केले नाही तर दोष सांगितला आहे. संपत्ति आदि फल प्राप्त होते असे सांगितले आहे. यास्तव हे काम्यव्रत देखील आहे. काहींचे मत असे आहे की, मुहूर्तपरिमित दशमी असता दशमीत भोजन करावे, आणि सूर्योदयाच्या अगोदर आरंभ झालेली जी शुद्धधिकाधिक द्वादशिका तिचे ठिकाणी निरंतर दोन उपवास करावे; याप्रमाणेच तिथिपालनही करावे. परंतु हे मत योग्य नाही. आठ वर्षानंतर ऐशी वर्षापर्यंत एकादशी करण्याला अधिकार आहे. शक्ति असेल तर ऐशी वर्षांच्या नंतर देखील करण्यास अधिकार आहे. सभूर्तृक स्त्रीने भर्त्याच्या अनुज्ञेवाचून अगर पित्रादिकांच्या अनुज्ञेवाचून उपवासव्रतादिकांचे आचरण केले तर व्रत निष्फळ होते, भर्त्याच्या आयुष्याचा क्षय होतो आणि नरक प्राप्त होतो. अशक्तांना नक्त, हविष्यान्न, अनौदन (भात न खाणे), फळ, तिळ, दूध, उदक, तूप, पंचगव्य, वायू ही एकाहून पुढचे श्रेष्ठ आहे. याप्रमाणे आपल्या शक्तीचे तारतम्य पाहून एका पक्षाचा स्वीकार करावा. एकादशीचा त्याग करू नये. द्वादशीला देखील केले नाही तर एकमध्य चांद्रायण (शुक्ल प्रतिपदेपासून दररोज एक घास वाढविणे, वद्य प्रतिपदेपासून कमी करून अमावास्येला उपोषण) प्रायश्चित्त करावे. नास्तिकपणामुळे न केल्यास पिपीलिकामध्य चांद्रायण (वरील प्रमाणेच) प्रायश्चित्त आहे. पति, पिता वगैरे अशक्त असल्यामुळे स्त्री, पुत्र, भगिनी, बंधु इत्यादिकांनी त्यांच्याकरिता एकादशी व्रताचे आचरण केले तर करणाराला शंभर यज्ञांचे पुण्य मिळते.
( क्रमशः )
🌹 *एकादशी* 🌹
*भाग २*
*संक्षेपाने व्रतदिननिर्णय*
एकादशीचे व्रत हे जयन्तीच्या व्रताप्रमाणे काम्य व नित्य आहे.यात अरुणोदयवेध आणि सूर्योदयवेध असे दोन प्रकारचे वेध आहेत. वैष्णव आणि स्मार्त यांचे दशमीचे दोन वेध अनुक्रमे सांगितले आहेत. वैष्णवांना विद्धा त्याज्य आहे आणि आधिक्यसंभवा असता शुद्धा देखील त्याज्यच होय. एकादशी अथवा द्वादशी जर अधिक असेल, तर आधीचा दिवस टाकून पुढचा दिवस घ्यावा, असा जो वैष्णवांचा निर्णय आहे, त्याचा अर्थ असा की, हे एकादशीव्रत केले नसता दोष सांगितला असल्याने, आणि याचे फल नित्य व संपत्ति वगैरे सांगितले आहे म्हणून, हे काम्य असे जे एकादशीचे व्रत; ते जयन्तीच्या व्रताप्रमाणे दोन्ही प्रकारचे आहे. एकादशीला दशमीचे जे एक अरुणोदयवेध आणि दुसरा सूर्योदय वेध असे दोन वेध होतात, ते अनुक्रमे वैष्णव आणि स्मार्त यांचे असतात. यावरून अरुणोदयवेध तो वैष्णवांचा आणि सूर्योदयवेध तो स्मार्तांचा असे जाणावे. जो ५६ घटकांनी परिमित वेध असतो, तो अरुणोदय समजावा. सूर्योदय तर स्पष्टच आहे. वैष्णवत्व किंवा स्मार्तत्व या गोष्टी आपापल्या परंपरेलाच अनुसरून वृद्ध लोक मानतात, आणि म्हणूनच त्या ग्राह्य होत. वैष्णवाने अरुणोदयी वेध असलेली विद्धा एकादशी सोडावी आणि द्वादशीला उपास करावा. एकादशी व द्वादशी या दोहीचे जर आधिक्य असेल, आणि ते जर सूर्योदयानंतर असेल, तर शुद्धा देखील सोडून देऊन दुसर्या दिवशी उपास करावा. फक्त एकादशीचेच जर आधिक्य असेल, तर शुद्ध असलेला असा जो आधींचा दिवस तोही टाकून पुढचाच घ्यावा. त्याचप्रमाणे केवळ द्वादशीचेच जर आधिक्य असेल, तर पहिला दिवस सोडून द्यावा आणि दुसरा घ्यावा. हा वैष्णवनिर्णय झाला. आता स्मार्तनिर्णय सांगतो. ‘एकादशी आणि द्वादशी या दोहींचीही जर वृद्धि असेल, तर स्मार्तांनी पहिल्या दिवसाचा त्याग करून, दुसरा दिवस घ्यावा. केवळ एकादशीचीच जर वृद्धि असली, तर गृहस्थांनी पहिल्या दिवशी उपास करावा, आणि संन्याशांनी तो दुसर्या दिवशी करावा, असा गृहस्थ आणि यति यांच्या बाबतीत निर्णय आहे. द्वादशीचीच जर केवळ वृद्धि असेल, तर पहिली शुद्धा आणि दुसरी विद्धा अशी शुद्धा व विद्धा यांची व्यवस्था समजावी. असा हा स्मार्तनिर्णय आहे.’ याचा अर्थ असा की, एकादशी व द्वादशी यांची जेव्हा वृद्धि असते, म्हणजे या तिथि जेव्हा सूर्योदयानंतर असतात, तेव्हा आधीच्या दिवसाची एकादशी जरी शुद्धा असते, तरी ती स्मार्तांनी पाळू नये; दुसर्या दिवशीच उपास करावा. जेव्हा फक्त एकादशीचीच वृद्धि असते, तेव्हा स्मार्त गृहस्थांनी पहिल्या दिवशी उपास करावा आणि संन्याशी वगैरेनी तो दुसर्या दिवशी करावा. फक्त द्वादशीच वृद्धि असेल, तर द्वादशीलाच उपास करावा. शुद्धा आणि विद्धा यांची अशी व्यवस्था आहे. याप्रमाणे दोन्ही तिथींचे आधिक्य असता आणि याचप्रमाणे केवळ द्वादशीचेच आधिक्य असताना मात्र स्मार्तांनी विद्धा एकादशीचा त्याग करावा; इतर वेळी करू नये. याप्रमाणे येथे स्मार्तनिर्णय संपला.
🌹 *एकादशी* 🌹
*भाग ३*
*एकादशी व्रतदिननिर्णय (वैष्णवांचा)*
वैष्णव आणि स्मार्त असे एकादशीव्रताच्या अधिकार्यांचे दोन भेद आहेत. ‘ज्याने वैष्णवी दीक्षा घेतली तो वैष्णव आणि ती न घेणारा तो स्मार्त होय,’ अशी जरी मोठाल्या ग्रंथांतून व्याख्या केलेली आहे, तरी ‘ज्याच्या त्याच्या कुलपरंपरेवरूनच वैष्णवत्व आणि स्मार्तत्व ही ठरतात, असे वृद्ध मानतात,’ असे जे निर्णयसिंधूचे म्हणणे, तेच सर्वत्र शिष्टसंमत असे मानण्यात येते. अरुणोदयकाली दशमीवेध आणि सूर्योदयकाळी दशमीवेध असे दोन प्रकारचे वेध आहेत. सूर्योदयाच्या आधी चार घटका अरुणोदय समजावा. सूर्योदय स्पष्टच आहे. ५६ घटकांनंतर एक पळभरही जरी दशमीचा प्रयोग झाला असला, तरी तो अरुणोदयवेध वैष्णवांच्या संबंधाने घ्यावा. ६० घटकांनंतर एका पळाचाही जरी दशमीचा प्रवेश झाला असला, तरी तो सूर्योदयवेध स्मार्तींबद्दल घ्यावा. ज्योतिषी लोकांच्या विवादामुळे जर वेधादिकांबद्दल संशय असेल, किंवा निरनिराळ्या मतांच्या वाक्यांच्या विरोधामुळे जर ब्राह्मणांमध्ये मतभेद असेल, तर एकादशी सोडून तिचा उपास द्वादशीला करावा. शुद्धा आणि विद्धा असे एकादशीचे दोन भेद आहेत. अरुणोदयाचा जी वेध करते ती विद्धा. ही वैष्णवांनी सोडून देऊन द्वादशीला उपास-करावा. जी अरुणोदयाचा वेध करीत नाही, ती शुद्धा. या शुद्धेचे जे चार भेद आहेत, ते येणेप्रमाणे –
१. एकादशी मात्राधिक्यवती. येथे आधिक्य म्हणजे दुसर्या दिवशी सूर्योदयानंतर तिथि असणे असा अर्थ समजावा. उदा. दशमी ५५ घटका, एकादशी ६० घ. १ प. द्वादशीचा क्षय ५८, ही एकादशीमात्राधिक्यवती शुद्धा झाली. अशा वेळी वैष्णवांनी दुसर्या दिवशी उपास करावा आणि स्मार्तांनी पहिल्या दिवशी करावा. दशमी ५५ घ., एकादशी ५८ घ. व द्वादशी ६० घ. १ प. द्वादशीचा क्षय ५८ घ. ही द्वादशी मात्राधिक्यवती शुद्धा झाली. अशा वेळी वैष्णवांनी द्वादशीला उपास करावा आणि स्मार्तांनी एकादशीला करावा. दशमी ५५ घ. १ प., एकादशी ६० घ. १ प. आणि द्वादशी ५ घ. ही उभयाधिक्यवती शुद्धा झाली. अशा वेळी वैष्णव आणि स्मार्त या दोघांनी दुसर्या दिवशीच उपास करावा. दशमी ५५ घ., एकादशी ५७ घ. आणि द्वादशी ५८ घ. ही अनुभयाधिक्यवती शुद्धा होय. वैष्णव आणि स्मार्त या दोघांनी यातली पहिलीच उपासाला घ्यावी. याप्रमाणे थोडक्यात वैष्णव निर्णय सांगितला.
🌹 *एकादशी* 🌹
*भाग ४*
*एकादशी व्रतदिननिर्णय (स्मार्तांचा)*
सूर्योदयी वेध असेल ती विद्धा आणि तशी नसेल ती शुद्धा. या प्रत्येकीचे आणखी जे भेद आहेत, ते येणेप्रमाणे
१. एकादशि मात्राधिक्यवती.
२. उभयाधिक्यवती
३. द्वादशी मात्राधिक्यवती आणि
४. अनुबयाधिक्यवती. असे एकंदर मिळून जे आठ प्रकार झाले. त्यांची उदाहरणे पुढीलप्रमाणे-
१. दशमी ५८ घ., एकादशी ६० घ. १ प. आणि द्वादशीचा क्षय; अशा एकादशीला मात्राधिक्यवती शुद्धा म्हणतात.
२. दशमी ४ घ., एकादशी २ घ. आणि द्वादशीचा क्षय अशी जी असते तिला मात्राधिक्यवती विद्धा एकादशी असे म्हणतात. या दोन्ही उदाहरणात, जे गृहस्थ स्मार्त असतील त्यांनी उपासाला पहिली घ्यावी आणि यति, निष्काम, गृहस्थ, वानप्रस्थाश्रमी, विधवा आणि वैष्णव यांनी उपासाला दुसरी घ्यावी. विष्णुच्या कृपेची इच्छा करणार्या स्मार्तांनी दोन्ही दिवशी उपास करावे असे काहींचे सांगणे आहे.
३. दशमी ५८ घ., एकादशी ६० घ. १ प. आणि द्वादशी ४ घ. ही जी, ती उभयाधिक्यवती होय.
४. दशमी २ घ., एकादशी ३ घ. आणि द्वादशी ६० घ. १ प. असल्यास ही द्वादशी मात्राधिक्यवती विद्धा असे समजावे. या दोन्ही उदाहरणात सर्व वैष्णव आणि स्मार्त यांनी शिल्लक असलेली दुसरीच एकादशी पाळावी.
५. दशमी ५८ घ. एकादशी ५९ घ. आणि द्वादशी ६० घ. १ पळ; ही द्वादशी मात्राधिक्यवती शुद्धा होय. ही शुद्धा असल्याने, स्मार्तांनी एकादशीलाच उपास करावा, द्वादशीला करू नये, असे माधवाचे मत आहे. या बाबतीत हेमाद्रि म्हणतो की, सर्वांनी दुसर्या दिवशी द्वादशीलाच उपास करावा. मोक्षाची इच्छा असलेल्या स्मार्तांनी दुसर्या दिवशी उपास करावा. असेही काहींचे मत आहे.
६. दशमी १ घ. एकादशी क्षयाला गेलेली ५८ घ. आणि द्वादशीची वृद्धि ५०घ. १प. ही एकादशी विद्धा झाली असल्यामुळे, स्मार्तांनी द्वादशीलाच उपास करावा. त्याप्रमाणेच उभयाधिक्य आणि द्वादशीमात्राधिक्य अशी जी विद्धा एकादशी, ती स्मार्तांनी पाळू नये व इतर सोडू नये. वैष्णवांनी सहाही प्रकारची आधिक्यवती सोडून द्वादशीलाच उपास करावा.
७. दशमी ५७ घ. एकादशी ५८ घ. आणि द्वादशी ५९ घ. ही अनुभयाधिक्यवती शुद्धा होय. या प्रसंगी सर्वांनी एकादशीलाच उपास करावा. द्वादशीला करू नये. ही विद्धा असल्याने वैष्णवांनी द्वादशीलाच उपास करावा.
८. दशमी २ घ. एकादशीचा क्षय ५६ घ. आणि द्वादशी ५५ घ. असा जेव्हा प्रसंग असेल, तेव्हा देखील स्मार्तांनी एकादशीलाच उपास करावा आणि वैष्णवांनी द्वादशीला करावा. येथे उभयानाधिक्यवती विद्धा एकादशीच्या शेवटच्या भेदात पहिल्या दोन भेदाप्रमाणे-संन्यासी, मोक्षेच्छु आणि विधवा यांनी उपासाला दुसरीच घ्यावी. विष्णूची कृमा इच्छिणार्यांनी दोन्ही दिवशी उपास करावे असे योग्य युक्तिवादाने मला वाटते. सध्या सर्वत्र शिष्ट लोक हेमाद्रीचे मत आणि निष्कामत्वादिक यांचा अनादर करून, माधवाच्या मताप्रमाणेच त्यात तिळमात्रहि फरक न करता- स्मार्त निर्णय सांगतात. दोन उपास करावे. अथवा शुद्धाधिका द्वादशिकेला पुढल्या दिवशी उपास करावा असे कोणीही सांगत नाहीत. याप्रमाणे बहुतेक सर्वत्र माधवाचेच मत प्रचारात आहे असे समजावे. यावरून, वैष्णवांचे जे अठरा भेद आणि स्मार्तांचे जे अठरा भेद, त्यांचा निर्णय या उदाहरणांनी अर्थहीन ठरतो हे स्पष्टच झाले.
🌹 *एकादशी* 🌹
*भाग ५*
*एकादशी व्रतप्रयोग*
उपासाच्या आदल्या दिवशी सकाळी नित्यकर्म करणे झाल्यावर
*’दशमीदिनमारभ्य करिष्येऽहंव्रतं तव । त्रिदिनं देवदेवेश निर्विघ्नं कुरु केशव ।’*
असा संकल्प करून मध्याह्नी एकदाच जेवावे. त्याचे नियम येणे प्रमाणेः –
काश्याचे भांडे, मांस, मसूर, दिवसाची झोप, पोटभर जेवणे, पुष्कळ पाणी पिणे, दुसर्यांदा जेवणे, स्त्रीसंग, मध; खोटे बोलणे, हरभरे, कोद्र, भाजी, परान्न, सोडत, तेल, तीळ, मीठ, विडा वगैरे सर्व वर्ज्य करावीत. एकभुक्त झाल्यानंतर काटक्यांनी दात धुवावेत. रात्री जमिनीवर निजून एकादशीला सकाळी पाने वगैरेंनी दात घासावेत. काटक्यांनी घासू नयेत. स्नानादिक रोजच्या क्रिया आटपल्यावर हाताच्या बोटात पवित्रके घालून उत्तरेकडे तोंड करावे व पाण्याने भरलेले भांडे हाती घेऊन
*’एकादश्या निराहारो भूत्वाहमपरेऽहानि । भोक्ष्यामि पुण्डरीकाक्ष शरणं मे भवाच्युत’ ॥*
असा संकल्पाचा मंत्र म्हणून, विष्णूला पुष्पांजलि द्यावा. अशक्ताने
*’जलाहारः । क्षीरभक्षः । फलाहारः । नक्तभोजी । ‘*
यापैकी शक्त्यनुसार कोणचा तरी शब्द ‘निराहारोच्या ऐवजी उच्चारून संकल्प करावा. शैवांनी रुद्रगायत्री संकल्प करावा आणि सौरांनी नेहमीच्या गायत्रीचा संकल्प करावा. सूर्योदयानंतर जरदशमी असेल, तर स्मार्तांनी हा संकल्प एकादशीच्या रात्री करावा. दशमी जर अर्धरात्रीनंतर असेल, तर सर्वांनी एकादशीला मध्याह्नानंतर करावा. संकल्पानंतर अष्टाक्षरमंत्राने तीन वेळा अभिमंत्रण करून, ते पाणी प्यावे. त्यानंतर, फुलांचा मंडप करून त्यात-फुले, गंध, धूप, दीप, उत्तम नैवेद्य, अनेक प्रकारची उत्तम स्तोत्रे, गाणी, कर्णमधुर वाद्ये, साष्टांग नमस्कार, उत्तम प्रकारचे जयशब्द वगैरेनी विधिपूर्वक हरीची पूजा करून, रात्री जागरण करावे.
एकादशी संदर्भात प्रश्न व उत्तरे
एकादशी के संबंध में प्रश्नोत्तरी
Questions and answers regarding Ekadashi
Ekadashi Sandarbhat Prashna Uttare
१) : 🌹 *एकादशीला सत्यनारायण करावा का?.* 🌹
उत्तर :-
काल खूप फोन आले की एकादशीला सत्यनारायण करावा का ? सत्यनारायण पोथीमध्ये प्रसाद कोणता करावा , किती प्रमाण घ्यावे हे स्पष्ट शब्दात दिलेले आहे . रवा , गूळ किंवा साखर , तूप सर्व सव्वा प्रमाणात घ्यावेत ,असे पोथीत उल्लेख आहेत . आपण पोथीत बदल करू शकत नाही , म्हणजे प्रसाद बदलता येत नाही . व्रत केल्यावर हजर असलेल्या सर्वांना प्रसाद ग्रहण करणे बंधनकारक आहे . प्रसाद न घेतल्यामुळे नौका बुडाली व इतर अनर्थ झाले हे पोथीतच आहे . त्यामुळे ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांना उपवास मोडून प्रसाद घ्यावा लागेल . हे मान्य असल्यास अवश्य करावा .
शिवाय मला एक समजत नाही की प्रत्येकास महिन्यातील पाच उपवास आहेत हे गृहीत धरले तरी इतर २५ दिवसात सर्वजण सत्यनारायण करू शकतात . मग फक्त एकादशीलाच सत्यनारायण का करायचा असतो ?
२) : एकादशी व श्रावणी सोमवार हे दोन्ही उपवास एकच दिवशी आल्यास सोमवारचा उपवास कसा सोडवा?.
उत्तर :-
आज एकादशी व श्रावणी सोमवार हे दोन्ही उपवास एकच दिवशी आल्यामुळे खूप सदस्यांनी शंका विचारली आहे . उपवास सोडण्यासाठी दोन पर्याय आहेत . १) संध्याकाळी शिवाची पूजा करून तीर्थ घेणे व २) रात्री उपवासाची भगर ( वरीचे तांदुळ ) करून ग्रहण करावेत . सोमवारच्या , शिवाच्या उपवासाला भगर चालत नाही , पण एकादशीला भगर चालते . म्हणजे भगर खाल्यावर सोमवार सुटतो पण एकादशीचा उपवास चालूच राहतो . एकादशीचे पारणे मंगळवारी करावे . *अशोककाका कुलकर्णी*
३.) : चांद्रायण व्रत करतांना एकादशी वगैरेंचा उपास आला तर काय करावे ?.
🌹 *प्रायश्चित्तमयूख* 🌹
( मराठी अर्थासह )
*चांद्रायणं*
*घास केवढा घ्यावा त्याचें प्रमाण. चांद्रायणांत एकादशी वगैरेंचा उपास आला असतां निर्णय*
*ग्रासपरिमाणमाह ‘‘याज्ञवल्क्यः’’ तिथिवृध्द्या चरेत्पिंडान् शुक्ले। शिख्यंडसंमितान्। शिखीमयूरः।*
*चांद्रायणप्रकरणे ‘‘पराशरस्तु’’ कुक्कुटांडप्रमाणं तु ग्रासं वै परिकल्पयेत् ‘‘शंखस्तु’’ आर्द्रामलकमात्रास्तु ग्रासा इंदुव्रते स्मृता इति एतेषां च परिमाणानां शक्त्या विकल्पः। एकादश्यादौ नित्यप्राप्त उपवासस्तावच्चांद्रायणविधिना बाध्यते।*
*एतस्य धर्मार्थं यश्र्चरेदेतच्चंद्रस्यैति सलोकतामिति काम्यत्वाल्लशुनभक्षणा दिनिमित्ते विहितत्वेन नैमित्तिकत्वाच्च।* *काम्यस्त्वेकादश्याद्युपवासोऽन्यद्वारा कारणीयः प्रतिनिधिना कृतेऽपि फलप्राप्तेः कात्यायनादिभिरुक्तत्वात्। वचनानि त्वस्मत्कृते समयमयूखे द्रष्टव्यानि। अयं चैकादृश्याद्युपवासबाधः सामान्य चांद्रायणभिन्नेष्वेव। तत्र प्रतिदिनं ग्रासग्रहणं नियमाभावात्।*
घासांचें प्रमाण ‘‘याज्ञवल्क्य’’ सांगतो—शुक्लपक्षांत तिथींच्या वृद्धीप्रमाणें मोराच्या अंड्या एवढे घास करावे. ‘‘चांद्रायणप्रकरणांत’’ ‘‘पराशर तर’’—कोंबड्याच्या अंड्या एवढा घास करावा. ‘‘शंख’’ तर—चांद्रायणांत ओल्या आवळ्या एवढे घास सांगितले’’ याप्रमाणें सांगतो. या सांगितलेल्या घासांच्या प्रमाणांचा शक्तीप्रमाणें विकल्प समजावा. एकादशी वगैरे दिवशी नित्य प्राप्त होणार्या उपासाला चांद्रायणविधीनें बाध येतो. कारण, याला (चांद्रायणाला) ‘‘जो धर्मासाठी हें चांद्रायण करील तो चंद्राच्या लोकास जाईल’’ असें काम्यत्व आहे आणि लसुण वगैरे पदार्थांच्या भक्षणाचे निमित्त घडलें असतां त्याविषयी याचा विधि असल्यानें याला नैमित्तिकत्व आहे. काम्य असा एकादशी वगैरेंचा उपास दुसर्याकडून करवावा. कारण, ‘‘कात्यायनादिकांनी’’ ‘‘(एखादें कर्म) प्रतिनिधीकडून केलें असतां फळाची प्राप्ति होते’’ असें सांगितलें. (याबद्दलची) वचनें म्यां केलेल्या ‘‘समयमयूखांत’’ पहावी. हा एकादशी वगैरेच्या उपासाचा प्रतिबिंध सामान्य चांद्रायणावाचून इतर चांद्रायणांतच होतो. कारण, त्यांत (सामान्य चांद्रायणांत) दररोज अमुकच घास घ्यावे असा नियम नाही.
४) : एकादशीचे काही व्रते
🌹 *दिनविशेष व्रते* 🌹
*भाद्रपद शु. एकादशी*
1. *कटिपरिवर्तनोत्सव*
भाद्रपद शु. एकादशीला भगवंताचा कटिपरिवर्तन ( कूसबदल ) उत्सव करतात. त्या दिवशी ‘देवप्रबोधिनी’ एकादशीप्रमाणे सर्व विधी करतात. देवाला स्नान, रथयात्रा वगैरेसह समारंभाने आणून सायंकाळी महापुज व नीरांजनांनी आरती करून रात्री देवास उजव्या कुशीवर निजवावे व जागरण करावे. दुसरे दिवशी सकाळी ‘
‘वासुदेव जगन्नाथ प्राप्तेअयं द्वादशी तव ।
पार्श्वेन परिवर्तस्व सुखं स्वापिहि माधव ॥’
अशी प्रार्थना करून पारणे सोडावे. राजपुतान्यात या उत्सवाला’ जलझूलनी’ असे नाव असून सामान्यपणे अथवा विशेष प्रकाराने हा साजरा करतात.
2. *विष्णुपरिवर्तनोत्सव* 🌹
भाद्रपद शुक्ल एकादशीला अथवा द्वादशीला पारणे झाल्यावर विष्णूचा परिवर्तनोत्सव करावा. श्रवणाच्या मध्यभागी विष्णुचे परिवर्तन म्हणजे एका कुशीवरून दुसर्या कुशीवर वळणे होते. असे वचन आहे. यास्तव श्रवण नक्षत्राचे तीन भाग करून मध्यभागाचा योग जर एकादशीला येत असेल, तर एकादशीला व तसा योग जर द्वादशीस येत असेल तर द्वादशीला किंवा दोन्ही दिवशी जर श्रवणनक्षत्राचा अभाव असेल, तर द्वादशीलाच परिवर्तनोत्सव करावा, अशी या बाबतीतली व्यवस्था समजावी. सायंकाळी विष्णूची पूजा करून,
*वासुदेव जगन्नाथ द्वादशीतव । पार्श्वेन परिवर्तत्व सुखं स्वपहि माधव॥’*
या मंत्राने प्रार्थना करावी.
———————————
3. *कर्मावर्मा*
हे व्रत उत्तरभारतात प्रचलित आहे. हे व्रत भाद्र. शु. एकाद्शीस सायंकाळी करतात. या दिवशी बायका आपल्या परसात दोन खळगे करून एकात पाणी व दुसर्यात दूध ओततात. त्या दोन खळग्यांच्या मध्यभागी कुशतृणाचे रोप लावतात. जितके भाऊ असतील, तितकी कुशाची पाती आपल्या केसात खोचतात. विष्णूची पूजा करून केवळ फलाहार करतात. दुसर्यादिवशी खळग्यातले दूधपाणी, कुश, निर्माल्य सर्व नदीत नेऊन सोडतात. ब्राह्मणाला शिधा देतात व व्रताचे पारणे करतात. या व्रतामुळे स्वत:च्या व बंधूंच्या सर्व आपत्ती दूर होतात, अशी समजूत आहे.
————————————-
4. *शुक्लैकादशी*
भाद्रपद शु. पद्मा एकादशीला पहाटे प्रात:स्नानादी कृत्ये झाल्यावर भगवंताची यथाविधी पूजा करावी. उपवास करून रात्री हरिजागरण करावे व दुसरे दिवशी पूर्वान्ही (सकाळी) पारणे करावे जर सकाळी श्रवणनक्षत्राच्या मध्याच्या २० घटिका असतील तर भोजन करू नये. तसेच, जर मध्यान्हीच्या पुर्वी श्रवणाचा मध्य अंश नसेल, तर पाणी पिऊन पारणे करावे.
जर या दिवशी श्रवणनक्षत्र असेल तर या एकादशीला ‘विजया एकादशी’ म्हणतात. या व्रताने सर्व मनोरथ पूर्ण होतात. या दिवशी ‘श्रीवामना’ची पूजा करतात. व्रत करणार्याने त्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर ‘श्रीवामना’ची सोन्याची मूर्ती करून तिची गंधफुलांनी यथाविधी पूजा करावी व त्यावेळी *’मत्स्य, कूर्म, वराह’* आदी नामांचा उच्चार करावा. रात्री जागरण करावे. दुसरे दिवशी असलेले देय द्रव्य ब्राह्मणांना दान देऊन, त्यांना भोजन घालून नंतर आपण स्वत: जेवावे व व्रताची सांगता करावी.
५. वामन जयंतीला जर एकादशी आली तर काय करावे ?.
भाद्रपद शुक्लपक्षी श्रवणयुक्त द्वादशीचे दिवशी मध्याह्नकाली वामनाचा अवतार झाला. याकरिता मध्याह्नव्यापिनी द्वादशी मध्याह्नकाली अथवा इतर काली श्रवणयुक्त असेल ती घ्यावी. दोन दिवस श्रवणयोग असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. द्वादशीचे दिवशी श्रवणयोगाचा सर्वथा अभाव असेल आणि एकादशीचे दिवशी श्रवणयोग असेल तर मध्याह्नव्यापिनी द्वादशी देखील टाकून एकादशीचे दिवशी व्रत करावे. शुद्धाएकादशीचे दिवशी श्रवणाचा अभाव असेल तर दशमीने विद्ध असलेल्या व श्रवणयुक्त एकादशीला देखील व्रत करावे. पूर्व दिवशीच मध्याह्नव्यापिनी द्वादशी दुसर्या दिवशी मध्याह्नाहून इतर काली श्रवणयुक्त द्वादशी असे असेल तर पूर्व दिवसाचीच घ्यावी. दोन्ही तिथीचे दिवशी श्रवणयोगाचा अभाव असेल तर मध्याह्नव्यापिनी द्वादशीचे दिवशीच व्रत करावे. दोन दिवस मध्याह्नव्याप्ति असेल अथवा दोन्ही दिवस नसेल तर एकादशीने युक्त असेल ती घ्यावी. पारणा पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोहोंच्या अंती अथवा एकाच्या अंती करावी. या दिवशी मध्याह्नकाली नदीच्या संगमावर स्नान करून सुवर्णमय वामनाचे प्रतिमेची पूजा करून सुवर्णपात्राने अर्घ्य द्यावे. पूजेविषयी मंत्र –
“नमस्ते पद्मनाभाय नमस्ते जलशायिने ।
तुभ्यमर्घ्यं प्रयच्छामि बालवामनरूपिणे ॥
नमः शार्ङधनुर्बाणपाणये वामनाय च ।
यज्ञभुक्फलदात्रे च वामनाय नमो नमः ॥”
नंतर दुसर्या दिवशी सपरिवार वामनाची मूर्ति ब्राह्मणाला दान करावी; दानाचा मंत्र-
*”वामनः प्रतिगृह्णाति वामनोहं ददामि ते ।
वामनं सर्वतोभद्रं द्विजाय प्रतिपादये ॥”*
याच द्वादशीचे दिवशी रात्री देवपूजा करावी; रात्री असंभव असेल तर दिवसास करावी; आणि दधिव्रत निवेदन करून दधिदान करावे व दुग्धव्रताचा संकल्प करावा. या पयोव्रताविषयी दुधापासून होणारे व दुधामध्ये शिजविलेले पदार्थ वर्ज्य करावे. दही इत्यादि वर्ज्य करू नयेत. याप्रमाणे दधिव्रतामध्ये ताक इत्यादि वर्ज्य नाहीत. प्रसूत झालेल्या गायीचे दहा दिवसांमधील दूध आणि संधिनी (वृषभाने आक्रमलेली) गायीचे दुध यांचा ज्या ठिकाणी निषेध सांगितला आहे तेथे त्या दुधापासून होणारी दही, ताक इत्यादि सर्व वर्ज्य करावी.
६. एकादशीला श्राद्ध येत असल्यास काय करावे ?.
7. एकादशीला महालय श्राद्ध तिथि असेल तर काय करावे?.
उपासाच्या दिवशी जर श्राद्धतिथि असेल तर श्राद्ध करून, उरलेले सर्व अन्न एका ताटात वाढून, त्या सर्व अन्नाचा वास घ्यावा (अवघ्राण) श्राद्धाचे अन्नपदार्थ केवळ हुंगून (वास घेऊन) गायीला पान द्यावे.आणि ते सर्व अन्न गाईसारख्या जनावरास खाऊ घालावे. कंद, यूळ, फळ वगैरे वस्तु खाऊन उपास करणार्याने, स्वतः जी फळे वगैरे खावयाची ती, पितरांच्या जागी योजिलेल्या ब्राह्मणांच्या पानांवर वाढून, त्यातून शिल्लक राहिलेली खावीत. ‘ एकादशीला जर श्राद्धतिथि येईल, तर तो दिवस टाकून, द्वादशीला श्राद्ध करावे’ वगैरे वचने वैष्णवांनी परंपरेच्या आचारानुसार पाळावीत. वैष्णवांना जर सोळा महालये करणे असेल, तर ती
*एकादश्यधिकरणकं द्वादश्यधिकरणकंच महालयं तंत्रेण करिष्ये’*
असा संकल्प करून द्वादशीला दोन महालये करावीत.
8. आश्विन शु. एकादशी आकाशदिवा लावतात हे खर आहे का?.*
उत्तर :- होय आकाशदिवा आश्विन शु. एकादशी उभारतात. सविस्तर माहिती पहा.
*आकाशदिवा*
आश्विन शु. एकादशी ते कार्तिक शु. एकादशीपर्यंत, घराच्याबाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्यास आकाशदिवा असे म्हणतात. त्याचा विधी पुढीलप्रमाणे – घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी. तीवर चंदनयुक्त जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमल काढावे. मध्यभागी वीस हात, नऊ हात किंवा पाच हात लांबीच खांब पुरावा. तो वस्त्र, पताका, अष्टघंटा, कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर अष्टदलाकृती दीप करून अडकवावा. त्या दीपात मोठा दिवा लावावा. त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूती, दामोदर, धर्मराज, प्रजापती, पितर व प्रेत यांना उद्देशून लावावे. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा.
*दामो ऽ दराय नभसि तुलायां लोलयासह ।*
*प्रदीपं ते प्रयच्छामि नमोनन्ताय वेधसे ॥*
याचे फल लक्ष्मीप्राप्ती हे आहे.
*दिनविशेष व्रत*
८. देवतुल्य दीर्घायुषी पुत्र कोणत्या एकादशी व्रताने लाभतो
उत्तर :- पुत्रप्राप्ती व्रत आश्विन शु. एकादशीचे व्रत केले असता देवतुल्य दीर्घायुषी पुत्र लाभतो.
*पुत्रप्राप्ती व्रत*
आश्विन शु. एकादशीला स्नान करून उपवास करावा आणि भगवान विष्णुची पूजा करावी. रात्री दूध देणार्या सवत्स गाईची पूजा करावी. दुसर्या दिवशी दिवसभर व्रतस्थ राहून रात्री भोजन करावे. अशा तर्हेने दर आश्विन शु. एकादशीस याप्रमाणे बारा वर्षे किंवा दर महिन्याच्या शु. एकादशीस याप्रमाणे बारा महिने हे व्रत करावे. द्वादश वर्षीय व्रताच्या दरवर्षी किंवा एकवर्षीय व्रताच्या दर महिन्यात क्रमश: (पहिल्या वर्षी / महिन्यात पहिला याप्रमाणे) पुढील नामजप करावा –
*अपराजित, अजातशत्रू, पुराकृत, पुरंदर, वर्धमान , सुरेश, महाबाहू, प्रभू , विभू , सुभूती, सुमन, सुप्रचेता*
या नावाने हरिस्मरण केले असता देवतुल्य दीर्घायुषी पुत्र लाभतो.
9. पापी माणसाचे पाप नष्ट करण्यासाठी कोणती एकादशी करावी ?.
उत्तर :- *आश्विन शु. एकादशीचे (पापाङ्कुशा) व्रत केले असता पाप नाहीसे होते.*
*शुक्लैकादशी*
पापपरायण पुरुषांच्या पापनिर्मूलनासाठी आश्विन शु. एकादशीचे व्रत म्हणजे रामबाण उपाय होय. म्हणूनच या एकादशीला पापाङ्कुशा एकादशी म्हणतात. या व्रताने स्वर्गप्राप्ती व मोक्षप्राप्ती होते. आरोग्य टिकून राहते, सुंदर व सुशील पत्नी लाभते, सदाचारी पुत्र लाभतो आणि अक्षय धन प्राप्त होते. त्या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करावे आणि रात्री त्याचेच भजन, चिंतन, नामगुणसंकीर्तन करण्यात काल घालवावा. दुसर्या दिवशी पूर्वाह् णसमयी पारणे करून व्रताची समाप्ती करावी.
*पाशांकुशा एकादशी कथा*
युधिष्ठिराने विचारले,
‘हे भगवंता मधुसूदना, आश्विन शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय व तिचा व्रतविधि कोणता हे मला कृपा करुन सांगा.’
श्रीकृष्ण म्हणाले,
‘हे धर्मराजा, आश्विन शुक्ल पक्षाच्या एकादशीचे माहात्म्य सांगतो ते ऐक. हे माहात्म्य पाप नष्ट करणारे आहे. ही एकादशी पाशांकुशा या नावाने प्रसिध्द आहे. ही श्रेष्ठ एकादशी सर्व पापांचा नाश करते. या एकादशीच्या दिवशी व्रत करणाराने आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून स्वर्ग व मोक्ष मिळवून देणार्या पद्मनाभ भगवंताची पूजा करावी. मनुष्य इंद्रिये स्वाधीन ठेवून व चिरकाल तपश्चर्या करुन जे फल मिळवतो, तेच फळ गरुडध्वज भगवंताला नमस्कार केल्याने मिळते. एखाद्या मनुष्याने अज्ञानामुळे खूप पाप केले तर नंतर त्याने पापनाश करणार्या विष्णूला पश्चात्तापपूर्वक नमस्कार केल्यास तो नरकाला जात नाही. पृथ्वीवर जितकी तीर्थे आहेत व पुण्य़स्थाने आहेत, तेथील सर्व पुण्य भगवान विष्णूचे नामस्मरण केल्याने प्राप्त होते. शारंग धनुष्य धारण करणार्या व दुष्टांना शासन करणार्या विष्णूला जे शरण जातात, त्यांना कधीही यमलोक प्राप्त होत नाही. मनुष्याने भयंकर पाप केले असले तरी देखील जर त्याने या एकादशीचे व्रत केले तर त्या मनुष्याला यमलोकातील यातना कधीही भोगाव्या लागणार नाहीत. जो मनुष्य वैष्णव असून शिवाची निंदा करतो, किंवा जो शैव पंथाचा असून वैष्णवांची निंदा करतो, तो अवश्य नरकाला जातो. हजारो अश्वमेध यज्ञ व शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या हिश्याइतकीही योग्यता नसते. एकादशी सारखे पुण्य या भूलोकावर दुसरे कोणतेही नाही. पद्मनाभ विष्णूचा एकादशीचा दिवस पापनाशक आहे. एकादशीच्या व्रतासारखे पापनाशक व्रत त्रैलोक्यात दुसरे नाहीच. मनुष्य जोपर्यंत कल्याणकारक एकादशीचे उपोषण भक्ती भावाने करीत नाही, तोपर्यंत त्याच्या देहात पातके राहणारच. एखाद्याने ढोंग करुन जरी एकादशीचे उपोषण केले तरीही त्याला यमाचे दर्शन होत नाही व तो विष्णुलोकालाच जातो. ही पाशांकुशा एकादशी स्वर्ग व मोक्ष मिळवून देते. ती शरीराला आरोग्य मिळवून देते. ही एकादशी केल्याने उत्तम पत्नी मिळते. ही एकादशी धनधान्याची समृध्दी करणारी आहे. या पाशांकुशा एकादशीच्या व्रतापेक्षा गंगा, गया, काशीक्षेत्र पुष्कर तीर्थ व कुरुक्षेत्र हे जास्त पुण्यकारक नाहीत. धर्मराजा, या एकादशीच्या दिवशी उपोषण करुन जागरन केल्यास वैष्णवपद अनायासे मिळते. हे राजा, पाशांकुशा एकादशीचे व्रत करणारा मनुष्य आपल्या आईच्या कुलातील दहा पुरुष, पित्याच्या कुलातील दहा पुरुष आणि पत्नीच्या कुलातील दहा पुरुष अशा तीस पुरुषांचा उध्दार करतो. हे सर्व तीस पुरुष दिव्यरुप धारण करतात. ते पीतांबर परिधान करतात व गळ्यात माळा घालून गरुडावर बसून वैकुंठाला जातात. धर्मराजा, बालपणी, तरुणपणी किंवा वृध्दपणी जो पाशांकुशा एकादशीचे उपोषण करतो, तो कितीही पातकी असला तरी दुर्गतीला जात नाही. पाशांकुशा एकादशीचे उपोषण करणारा सर्व पापांतून मुक्त होऊन हरीलोकाला जातो. जो या दिवशी सोने, तीळ, भूमी, गाय, उदक, जोडा, वस्त्र, छत्री अशी दाने देतो, त्याला यमाचे दर्शन कधीही घडत नाही. जो मनुष्य पुण्यकर्म केल्याशिवाय आयुष्याचे दिवस घालवतो, तो श्वासोच्छ्वास जिवंत असला तरी लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याचे जीवन व्यर्थच म्हटले पाहिजे. धर्मराजा, एखादा मनुष्य दरिद्री असला तरी त्याने आपल्या शक्तीनुसार स्नान-दान वगैरे पुण्यकर्मे करुन आपले आयुष्य सफल करावे. जे लोक तलाव, उद्याने, देवालये बांधतात व अन्नछत्रे चालवतात, त्या सर्व पुण्य करणार्या धैर्यवान लोकांना यमयातना कधीच सहन कराव्या लागत नाहीत. अशी पुण्यकर्म करणारे लोक या भूलोकी दीर्घायुषी, ऐश्वर्यवंत, कुली व निरोगी झालेले पाहायला मिळतात. धर्मराजा, आणखी काय सांगू ? अधर्म करणारे दुर्गतीला जातात आणि धर्म करणारे स्वर्गारुढ होतात, हे तर सर्वांना माहीतच आहे. तू विचारल्याप्रमाणे मी तुला पाशांकुशा एकादशीचे माहात्म्य सांगितले आहे. तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा असेल, ते विचार.
॥ याप्रमाणे ब्रह्मांडपुराणातील पाशांकुशा एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( खालील संपूर्ण लिखाण *श्री अशोककाका कुलकर्णी* यांचा WHATSAPP ग्रुप वरून साभार घेतलेले आहे.)













