दशावतार ७ ( रामावतार ) भाग ७, (१६ ते १८)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले. द्रविड राज्यात हाकार माजला. जे लोक वाचले…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  दशावतार ( रामावतार ) !!! 

दशावतार ( रामावतार )

भाग – १६.

                सगळीकडे राक्षसांनी उत्पात माजवला होता. ऋषीमुनींना आपले अनुष्ठान, याग यज्ञ करणे कठीण झाले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत होते. सगळीकडे हाहाकार  माजला होता. त्यांची हाक देवाने ऐकली.  दुष्कर्मीयांच्या विनाशार्थ दशरथ राजाच्या पोटी श्रीहरींनी मानवाच्या रूपात राम म्हणून अवतार घेतला.  योग्य वेळी चारही पुत्रांचे शिक्षण झाले.

          एके दिवशी विश्वामित्र दशरथराजाकडे येऊन रामाला आपल्यासोबत न्यायची अनुमती मागितली. इतक्या छोट्या वयात रामाला पाठवण्याची दशरथ राजाची इच्छा तर नव्हती. पण त्यांना वशिष्ठ ऋषींनी समजावल्यावर शिवाय विश्वामित्राच्या कोपाच्या भीतीने राम लक्ष्मणाला राक्षसांच्या परिपत्यासाठी त्यांच्याबरोबर पाठवण्यास तयार झाले.

  त्या रात्री रामाला विश्वामित्रांनी बलजिबाली विद्या शिकवली. दुसऱ्या दिवशी तिघेही एका निबिड अरण्यात प्रवेशले. पूर्वी हा प्रदेश मलद  व कुरुष म्हणून समृद्ध, भरभराटीस आलेली दोन्ही नगरे होती. इच्छेनुसार वेगवेगळे रुप धारण करून ताटका नावाची राक्षसीनने प्रवेश करून दोन्ही नगरांचा पूर्ण नाश केला. हे रामा, तू ताटिकेचा वध करून हा प्रदेश निष्कंटक कर.

         दुसऱ्या दिवशी तिघेही गंगा शरयूच्या संगमावर पोहोचले. विश्वामित्राचे आज्ञावरून रामाने ताटिकेचा वध केला. विश्वामित्रांनी आपल्या जवळची सारी शस्रे रामाला देऊन त्याचा वापर कसा करायचा हे सांगितले.

           राम लक्ष्मणासह विश्वामित्र सिद्धाश्रमात आले. इथेच विश्वामित्रांचा सिद्ध प्रयोग संपन्न होणार होता. यज्ञ सुरू होताच दुष्ट राक्षस मारीच व सुबाहू आश्रमावर चालून आले. रामांच्या अग्निबाणाने सुबाहू सहित सारे राक्षस मारले गेले. आणि मानवास्त्र सोडल्याने मारिच कित्येक योजने दूर समुद्रात जाऊन कोसळला. विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला.

          विश्वामित्र राम लक्ष्मणासह मिथीला नगरी जवळ असलेल्या एका जुन्या निर्जन आश्रमात पोहोचले. हा आश्रम कोणाचा? रामाने विचारल्यावर, विश्वामित्राने अहिल्या व इंद्राची गोष्ट सांगितली. गौतम ऋषींच्या शापाने अहिल्या पाषाणवत होऊन अनेक वर्ष फक्त वायुभक्षण करून वर्षांनुवर्षे इथे एकटीच राहात आहे. त्यांच्या उःषापानुसार तुझ्या करवी अहिल्याचा उद्धार होईल. तेव्हा तू अहिल्याचा उद्धार कर. विश्वामित्राचे आज्ञेनुसार अहिल्या शाप मुक्त झाली. व गौतम ऋषी बरोबर तिचा संसार सुरू झाला.

           त्यानंतर राम लक्ष्मणासह विश्वामित्र मिथिलेत जनक राजांच्या यज्ञ मंडपात पोहोचले. जनक राजा व त्यांचे पुरोहित शतानंदांनी विश्वामित्राचे यथोचित स्वागत केले. विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाची ओळख सांगून ताटिका, सुबाहू, मारीच यांचा कसा निःपात केला, अहिल्याचा उध्दाराची  गौतम व अहिल्याच्या  मिलापाची सविस्तर हकीगत जनक राजाला सांगितली. अहिल्या शाप मुक्त झाल्याचे एकूण पुरोहित शतानंदांना अतिशय आनंद झाला. कारण ते अहिल्या पुत्र होते.

        काहीच दिवसात जनक राजाने सीता स्वयंवराचे आयोजन केले. अवजड शिव धनुष्य ठेवले होते. पण ते कोणत्याही राजाकडून साधे हलले देखील नव्हते. विश्वामित्रांच्या आज्ञावरून श्रीराम उठले व त्यांनी त्या धनुष्याचे दोन तुकडे केले. सीतेने वरमाला रामाच्या गळ्यात घातली. जनक राजाची दुसरी पुत्री उर्मिलाचा विवाह लक्ष्मणाशी व जनक राजाचा भाऊ  कुशध्वजाच्या दोन मुली मांडवी व श्रुतीकीचा विवाह भरत शत्रूघ्नाशी झाला. चारही बंधू आपापल्या पत्नीसह अयोध्येस परतले.

        दशरथ राजाने राज्य रामावर सोपवून संन्याश्रम स्वीकारण्याचे ठरवले.त्यानुसार मंत्र्यांशी सल्लामसलत करून पुष्य नक्षत्रावर ज्येष्ठ पुत्र रामाचा अभिषेक करायचे निश्चित झाले. ही आनंद वार्ता सगळीकडे वाऱ्याच्या वेगाने पसरली. तसेच मंथराकरवी कैकयीलाही समजली. मंथरेने कैकयीचे कान भरले.

          वास्तविक कैकयी रुप संपन्नच नव्हती तर सर्व विद्येत, विशेषतःराजकारण व शस्त्रविद्येत प्रवीण होती. मंथराच्या सांगण्यावरून तिचे मन बदलणे इतकी लेचीपेची नव्हती. पण रामाचा साधा भोळा सरळ स्वभाव, पराक्रमी असले तरी काही वेळेस कठोर निर्णय घ्यावेच लागतात. या सर्व दृष्टीने विचार करून राम पूर्णपणे सक्षम व्हावा म्हणून स्वतःची आहूती देण्याचा कठोर निर्णय तिने घेतला. आणि कोपभवनात जाऊन बसली.

           फार वर्षांपूर्वी राजाचे एका युद्धात प्राण वाचवले होते. म्हणून त्यांनी तिला दोन वर दिले होते. त्या वरांची राजाला आठवण करून दिली. एका वराने रामाला १४  वर्षे वनवास व दुसऱ्या वराने भारताला राज्य मागितले. राजाने परोपरीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण कैकयी ठाम राहिली.

             शेवटी राम, लक्ष्मण, सीता वल्कले परिधान करून वनाकडे जाण्यास निघाले. तिघांनाही रथातून आणलेल्या सुमंताला श्रीरामांनी निरोप दिला. प्रवास करत तिघेही भरद्वाज ऋषींच्या आश्रमात पोहोचले. श्रीरामांचा यशोचित सत्कार झाल्यावर भारद्वाज ऋषींच्या सल्ल्यानुसार चित्रकूट पर्वतावर वास्तव्य केले .

           इकडे राजा दशरथांना पुत्र शोक असह्य होऊन राजा अनंतातत विलीन झाले. त्यावेळी भरत शत्रूघ्न आजोळी होते. त्यांना तात्काळ येण्याबद्दलचा निरोप पाठवला गेला. भरत शत्रुघ्न दोघेही परत आले. इथे आल्यावर भरताला सर्व हकिकत कळल्यावर तो कैकयीवर अत्यंत संतप्त झाला. गुरु वसिष्ठांनी त्याला शांत केल्यावर पित्याची अंत्यष्टी केली.

           क्रमशः
संकलन,लेखन ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. १८-१०-२०२३.

!!!  दशावतार  !!!

                 भाग – १७.

                गुरु वसिष्ठांनी राज्यसभा भरवली. आणि भरतांना राज्यकारभार सांभाळण्यासाठी अभिषेक करून घ्यायला सांगितले. भरताने राज्य स्वीकारण्यास ठामपणे नकार देऊन श्रीरामला परत आणण्याचे सारे प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.

      भरत चतुरुंग सैन्य, मंत्री गण, राजपुरोहित वशिष्ठ मुनी, तिन्ही माता, प्रतिष्ठित नागरिक श्रीरामाला परत आणण्यास निघाले. चित्रकुट पर्वताजवळ भरत मोठ्या सैन्यांशी येत असलेला पाहून लक्ष्मणाला भरत आक्रमण करण्यासच येत आहे असे वाटले पण रामाने त्यांचा गैरसमज दूर केला.

 भरत पर्णकुटी जवळ पोहोचताच भरताने कुटीजवळ असलेल्या रामाकडे धाव घेऊन त्यांच्या पायावर लोटांगण घालून त्यांचे चरणावर आपल्या अश्रूंचा अभिषेक घालू लागला. थोडा शांत झाल्यावर, पिताश्रीच्या निधनाची वार्ता रामाच्या काली घातली. म्हणाला, पिताजींचे श्राद्ध कर्म आटपून आपण अयोध्येस येऊन आपले राज्य सांभाळावे. रामांनी त्याला पुष्कळ प्रकारे समजावले पण भरत ऐकेच ना. शेवटी ऋषीमुनींनी विचार केला की वनात राहून रामाने रावणाचे निर्दालन करावे. म्हणून ते भारताला म्हणाले, पिताजींच्या इच्छेचा मान ठेवून रामाने पितृऋण चुकवावे व भरताना राज्य करावे. नाईलाजाने भरताने श्रीरामाच्या पादुका घेऊन म्हणाला १४ वर्षे ह्या पादुका सिंहासनावर ठेवून मी अयोध्या नगरी बाहेर राहून कंदमुळे खाऊन राहील. १४  वर्षानंतर तुम्ही परत आले नाही तर मी अग्नीकाष्ट भक्षण करेन. रामांनी मान्य केले. आणि भरत आपल्या लवाजम्यानीशी अयोध्येस परत आला.

          त्यानंतर रामाने विराज राक्षसाचा वध करून शरभंग ऋषीच्या आश्रमात पोहोचले. रामाचे दर्शन घेऊन शरभंग ऋषिंनी देहत्याग करून ब्रह्म लोकात गेले. शरभंग ऋषींच्या सल्ल्यानुसार राम, लक्ष्मण, सीता सुतीक्ष्ण ऋषीच्या आश्रमात पोहोचले. ऋषीची भेट घेऊन संरक्षणाचे आश्वासन देऊन, दुसऱ्या दिवशी पुढील प्रवासास निघाले. अनेक ऋषींच्या आश्रमाला  भेटी देत अगस्ती ऋषींच्या आश्रमी पोहोचले. भोजनोत्तर अगस्ती ऋषींनी अनेक आयुधे, प्रत्यक्ष  विश्वकर्माने निर्माण केले रत्नाजडीत धनुष्य, विष्णूनी दिलेला तेजस्वी बाण, तीक्ष्ण बाणांचा कधीही न संपणारा अक्षय भाता आणि रत्नजडित मुठीची  सुवर्णाच्या दोन तलवारी अशी आयुधे रामाला दिलीत. आणि म्हणाले, तापसांच्या संरक्षण हेतू तिथून जवळच गोदावरी काठी पंचवटी आहे, तिथे वास्तव्य करावे. अगस्ती ऋषींच्या निरोप घेऊन राम, लक्ष्मण, सीता पंचवटीच्या दिशेने निघाले. मार्गात त्यांना जटायू नावाचा पक्षी मिळाला. त्यांच्याशी मैत्री प्रस्थापित करून सीतामाईच्या संरक्षणाची जबाबदारी त्याने स्वतः घेतली. तिघेही पंचवटीत पोहोचले. तिथे लक्ष्मणाने सुंदर पर्णकुटी बांधली.

           एक दिवस राम पर्णकुटी बाहेरच्या ओट्यावर बसले असता, रावणाची बहिण शूर्पणखा सुंदर तरुणीचे रूप धारण करून रामासमोर आली. आणि त्यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. राम म्हणाले, मी विवाहित आहे. पण माझा भाऊ लक्ष्मणाला विचार. लक्ष्मणाने तिचे नाक कान कापून उत्तर दिले.

                 शूरर्पणखेच्या झालेल्या विटंबनाने खर- दुषण भयंकर संतापून राम लक्ष्मणावर चालून गेले. परंतु दोघेही रामाकडून वधले गेले. शूरर्पणखेची विटंबना, खर दूषणाचा वध ही हकीगत ऐकल्यावर रावणाने रामाचा सूड घेण्याचे ठरवले. आणि मारीचच्या साह्याने रावणांनी सीता हरण केले. व आपल्या लंकेत आणले. सीतेचे जीवन अशोक वनात सुरू झाले.

                    राम-लक्ष्मण सीतेच्या शोधात भटकत असताना आयोमुखी राक्षसीशी सामना झाला. लक्ष्मणाने तिचा वध करून थोडे पुढे जात नाही तोच कबंध राक्षसाशी मुकाबला केला. व त्याला संपवले. मरताना त्यानेच पंपा सरोवरावर राहणाऱ्या सुग्रीवाबद्दलची माहिती दिली. राम लक्ष्मण पंपा सरोवरावर जाताना त्यांना शबरीचा आश्रम लागला. शबरीने यथोचित सत्कार केला.

           सुग्रीव ऋष्यमूक पर्वतावर आपला सहाय्यक वानरश्रेष्ठीसह बसला होता. तोच दुरून त्यांना दोन तपस्वी येताना दिसले. ते कोण आहे त्याचा तपास करण्यास दूत म्हणून हनुमानाला पाठवले. दोघांच्याही ओळखीचे आदान-प्रदान झाल्यावर हनुमानाने राम लक्ष्मणाला ऋष्यमूक पर्वतावर मलगिरीवरील सुग्रीवाच्या निवासस्थानाकडे घेऊन आले व हनुमानाने राम लक्ष्मण व सुग्रीवाची ओळख करून दिली. दोघांची मैत्री झाली.  दोघेही एकमेकांना मदत करण्याचे वचन दिले.

            वचन दिल्यानुसार रामाने वालीचा वध केला. सुग्रीव किष्किंधाचा राजा झाला. आणि रामाला दिलेले वचन विसरून भोग दिलासा दंग झाला. लक्ष्मणाने त्याची कडक शब्दात कान उघडणी केल्यावर, सुग्रीव सक्रिय झाला.

          सुग्रीवाच्या आज्ञेनुसार वानरांच्या चार तुकड्या करून सीतेच्या शोधासाठी चारही दिशेने रवाना केले. हनुमान सीतेचा शोध नक्की लावेल हा विश्वास असल्याने रामाने खुणेसाठी आपली अंगठी हनुमानाला दिली. समुद्र ओलांडून हनुमान लंकेत पोहोचले. लंकेत शोध घेत घेत हनुमान सीता असलेल्या अशोक वनात पोहोचले. ज्या वृक्षाखाली सीता बसली होती, त्या मोठ्या झाडावर लपून बसले. काही वेळाने रामाने दिलेली अंगठी तिच्या पुढ्यात टाकून मी रामाचा दूत असल्याचे सांगितले. सीतेने सुद्धा खूण म्हणून आपला चुडामणी हनुमानाला दिला. परत जाता जाता हनुमानाने लंकेला आग लावून रामाकडे परतले व रामाला लंकेतील सर्व हकिकत  कथन केली.

              क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. १८-१०-२०२३.

!!!  दशावतार  !!!

                भाग -१८.

              लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांघण्यास सुरुवात झाली. बिभीषणाने रावणाला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या अपमान करून त्याला सभेतून बाहेर हाकलून दिले. विभीषण रामाला येऊन मिळाला.

       सेतू पूर्ण होताच, वानरांनी लंकेला वेढा दिल्याचे पाहून रावनाने आपल्या सैन्याला वानरावर हल्ला करण्याचा आदेश दिला. दोन्ही पक्षात घनघोर युद्ध झाले. अंधार पडला तरी युध्द सुरूच होते. प्रहस्त पडल्याने रावण संतप्त झाला. त्याने मोठ्या प्रमाणावर वानरांचा नाश करण्यास सुरुवात केली. ते पाहून हनुमानाने सरळ रावणावरच हल्ला केला.

         नंतर राम रावण युद्ध झाले. दोघेही महान पराक्रमी,धनुर्धर, युध्दनिपून अस्त्र विद्येत श्रेष्ठ, बाणांच्या लाटावर लाटा एकमेकावर आदळत होत्या. शेवटी रामाला अगस्ती ऋषींनी दिलेला बणाने रावणाचा वध झाला. एक जुलमी भ्रष्ट सत्तास्थान कोसळून  पडले.

      रावणाचा अंतिम संस्कार झाल्यावर, विभीषणाला लंकेचा राजा  बनवण्यात आले. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागल्यावरच रामाने तिचा स्वीकार केला. पुष्पक विमानाचे बसून मार्गातील अनेक ऋषीमुनींना भेट देत विमान आयोध्या नगरीजवळ उतरले कळताच भरत मोठ्या आतुरतेने धावत येऊन रामाला दृढ अलिंगन दिले. आयोध्या नगरी सजली. अयोध्याचा राजा राम परत आले. रामाचा १४ वर्षांनी राज्याभिषेक झाला.  सुरळीत राज्यकारभार सुरू असलेला  नियतीला कसे बघवेल? सीता गर्भार असताना एका धोब्याने आरोप केल्यावरून सीतेला अरण्यात सोडून देण्याची कामगिरी लक्ष्मणावर सोपवली. लक्ष्मण जगला रामासाठी आणि मृत्यूही पत्करला तोही रामासाठीच. आयुष्यभर ज्याने आपल्या ज्येष्ठ बंधूची आज्ञा पाळली, त्यांनी सर्वनाश टाळण्यासाठी अवाज्ञा केली म्हणून मृत्यू स्विकारावा लागला.

              विद्ध झालेल्या सीतेने स्वतःला भूमी मातेला  अर्पण केले. जीवनभर सावली होऊन राहिला त्या लक्ष्मणाच्या मृत्यूचे दुःख रामाला असह्य झाले. लवकुशावर राज्यकारभार सोपवून रामाने शरयू मध्ये जलसमाधी घेतली. भरत शत्रुघ्ननेही रामाचे अनुकरण केले.

               राम गेले. रामराज्य गेले. सत्य, धार्मिकता नष्ट होऊ लागली. लोक स्वैराचारी झाले. राजमंडळ आपापसात लढाई झगडे करून प्रजेचा नाश करू लागले. समाज, परिवार, धर्मापासून माणसे दूर होऊ लागली.

             नाही तर युधीष्ठीर सारख्या धार्मिक, सत्यवान व्यक्ती द्यूत खेळून सर्व राज्य, बंधू व पत्नी द्रोपदीला दावावर लावलेच नसते. भरल्या सभेत द्रौपदीची विटंबना झाली आणि भीष्म, द्रोण,भीम, अर्जुन सारखे धनुर्धारी चुपचाप तमाशा पाहत राहिले. जेव्हा की, हे सर्व भारत वर्षातील विश्वात वीर पुरुष होते.

             यादव वंशाचे काय झाले? त्यांनीही आपसात लढून संपूर्ण यादव वंश नष्ट करून टाकला. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की पुन्हा समाजाची दुर्गती थांबवण्यासाठी एका अवताराची आवश्यकता निर्माण झाली. आणि श्रीहरींनी बलराम आणि श्रीकृष्णाच्या रूपात पुन्हा मानव रुपात धरणीवर जन्म घेतला.

         काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की, बलरामाला अवतार म्हटले जाते. श्रीकृष्णाची दशावतारात गणना नाही. दोघांचीही लीला अगाध होती. असे असले तरी आपण प्रचलित मताप्रमाणेच अनुकरण करूया.

        फार पूर्वी मथुरेचा भाग घनदाट अरण्याने वेढला होता. तिथे मधु राक्षसाचे राज्य होते. मधु राक्षस असूनही वृत्तीने देवसमान होता. त्याच्या या राज्याला मधुपुरी किंवा मधुवन म्हणून ओळखले जात असे. अनेक ऋषीमुनी निर्विघ्नपणे तपश्चर्या, याग यज्ञ  करीत असे. प्रजाही सुखी, आनंदी, समाधानी होती.

         मधुच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र लवण राजा झाला. तो अत्यंत दुष्ट, जुलमी, अन्यायी होता. तो ऋषी मुनींच्या तपश्चर्येत, यज्ञ याग कार्यात विध्वंश करु लागल्यामुळे काही ऋषी गार्‍हाणे घेऊन अयोध्येत रामचंद्रांकडे गेले. श्रीरामांनी शत्रुघ्नला ससैन्य लावण्याचे परिपात्य करण्यास पाठवले. शत्रुघ्ननाने लवणचा वध करून मधूवनाचा सर्व भाग निर्भय केला. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेनुसार शत्रुघ्ननाने तिथे आपले राज्य स्थापन केले. तेथील घनदाट जंगल तोडून सुंदर वसाहत निर्माण करून त्या वसाहतीला “शूरसेन” नाव देऊन मथुरा राजधानी केली.

           पुढे वंश परंपरा लयाला जाऊन यादव, अंधक, भोज इत्यादी सोमवंशीय क्षत्रियांची वस्ती झाली. भोजकुलातील शूरसेनने आपले राज्य स्थापन केले मथुरा नगरी पुन्हा भरभराटीस आली. त्यावेळी भौम, कुकर, अंधक, दार्शाह, यादव वृष्णी आणि भोज या सात जाती आपापला व्यवसाय करीत वसाहती करून गुणागोविंदाने राहत होते. या सात जातींमध्ये यादव प्रमुख असून यादवांची वंशावेल थेट ययातीपुत्र यदु पर्यत पोहचली होती. ” वसुदेव” यादवांचा मुख्य सरदार, भोजराजाचा मांडलिक होते. गोवर्धन टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या ब्रह्मगिरीच्या गावी रहात होते. शिवाय मथुरेतेही त्यांचा मोठा वाडा होता.

               क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                  दि. १८-१०-२०२३.

दशावतार ( मत्स्यावतार ) संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading