दशावतार २ ( कासव/कूर्म ) भाग २, (३ ते ५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले. द्रविड राज्यात हाकार माजला. जे लोक वाचले…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  दशावतार ( कासवातार ) !!! 

                 

!!!  दशावतार ( कासवातार ) !!!

                     भाग – ३.

             स्वर्गामधे देव देवता भोग विलासात मग्न झालेत. ते सारे आळशी बनले. परिणामी शरीर व मन दुर्बल झाल्यामुळे त्यांचे तेज नष्ट झाले. राहिला केवळ दांभिकपणा.  कोण श्रेष्ठ? कोण कनिष्ठ? यावरून त्यांच्यात सतत कलह निर्माण झाला.

         इकडे पाताळात असूर शास्त्र, दान, ध्यान, कला, वाणिज्य, कृषी या कार्यात अग्रेसर असल्यामुळे ते लोक महाशक्तिमान बनले.

             देवांची दुर्बलता त्यांच्या लक्षात आली. आणि त्यांनी स्वर्गावरील देवावर आक्रमण केले. आळशी आणि दुर्बल झालेल्या देवांचा शक्तीमान असुरांपुढे टिकाऊ लागलं नाही. स्वर्गातून पळून जाऊन जिथे जागा मिळेल तिथे लपून राहू लागले. असूरांकडून अपमानित, प्रताडित होऊ लागले. असुरांचे स्वर्गावर अधिपत्य स्थापित झाले.

               प्रजापती ब्रह्मदेव देवतांच्या दुःखाने खूप व्यथित झाले. असुरगण स्वर्गावर शासन करू लागले. धार्मिक आणि ज्ञानी लोकांचा काही मान राहिला नव्हता. असूर लोक मौज, मस्ती,खाने पिणे यातच मग्न असल्यामुळे देश उन्मत झाला. स्वार्थासाठी असत्याचा आश्रय घेणे नित्याचे झाले. त्यामुळे असक्ती वाढली. मनुष्याचे मन वासनाग्नीत दग्ध होऊ लागले.

          प्रजापती ब्रम्हांनी मोठ्या मुश्किलने देवराज इंद्रांना शोधून काढले. आणि त्यांना घेऊन ते वैकुंठ वासी  श्रीहरी समोर उपस्थित झाले. खरं तर श्रीहरी पासून भूत, भविष्य, वर्तमान काही अज्ञात नव्हते. देवांची झालेली दुर्दशा, असुरांनी स्वर्गावर मिळवलेला विजय सर्व काही त्यांना विदित होते. त्यांनी ब्रम्हदेवांना  व इंद्रांना प्रणिपात करून आसनस्थ  होण्याची विनंती केली. इंद्रदेव लज्जीत झाल्यामुळे नजर मिळवू शकत नव्हते ब्रह्मदेवांनी श्रीहरींना झालेल्या सर्व गोष्टी सांगितल्या.

          श्रीहरांनी सर्व ऐकून देवांची झालेल्या दुर्दशे बद्दल खेत व्यक्त करून इंद्रदेवांना म्हणाले, देवराज, जीवन म्हटले की, उलथापालथ होणारच. जय असो वा पराजय, देहधारी व्यक्तीसाठी कर्मा शिवाय दुसरा मार्ग नाही. कर्माच्या फळामुळेच देवांची दुर्दशा झाली. आणि हेच कर्म दैत्यांचे उत्थान करण्यास कारणीभूत ठरेल. परंतु नुसते कर्म करून कार्यसिद्ध होणार नाही, तर त्यासाठी सत्यपरामर्शाचीही आवश्यकता आहे. तुम्ही माझ्या सल्ला घेण्यासाठी आलात यातच देवतांच्या उत्थानाचे बीज निहित आहे. आता तुम्ही माझ्याकडे आलात तर, समजा तुमचे संकटाचे दिवस संपले. मी नेहमीच शरणागतांचे रक्षण करीत असतो.

             मी कर्म फळाचा दाता आहे.  तुम्हा लोकांना कठोर परिश्रम करून असूरांच्या कर्माला पराजित करावे लागेल. यावेळी असुरांबरोबर युद्ध करून जिंकण्याची क्षमता देवांमधे नसल्यामुळे, तुम्ही जाऊन असुरांशी संधी करा. देव आणि असुर मिळून समुद्रमंथन करा. त्यातून निघालेल्या अमृतप्राशनामुळे देवलोक अमर होतील आणि असुरांवर विजय मिळवण्याची क्षमता प्राप्त होईल.

          देवराज जाणून होते, हे काम इतके सोपे नाही. पराजित इंद्राने संधीसाठी दैत्यराजाला भिक मागावी लागेल. नंतर समुद्रमंथनातून मिळालेल्या अमृतातला काही भाग असुरांनाही द्यावा लागेल. असुर अमृत पिऊन अमर झाले तर देवांवर ते भारी पडतील. असे असले तरी इंद्राचा भगवान विष्णूवर दृढ श्रद्धा होती. ते जाणून होते, विष्णू शिवाय दुसरा तारणहार कोणी नाही. देवराज इंद्रांच्या सिंहासनावर बसून असुरराज तिन्ही लोकांवर शासन करीत होता.  असुरांचा दरबार  भरलेला होता. तेवढ्यात राज्यहीन, मानहीन, अस्त्रहीण देवेंद्र संधी प्रस्ताव घेऊन दैत्यराजाच्या समोर उभे होते. दैत्यराज आश्चर्यचकित होऊन इंद्राकडे बघत होते.

                देवराज म्हणाले, दैत्यराज, इर्षावश आपण आपसात उगीचच शत्रुत्व करत आलोय. जेव्हा की, दैत्य आणि आदित्य ( देवता) एकाच पित्याची लेकरे आहोत. स्वर्गातल्या सिंहासनावर तुमचा आणि माझा सारखाच अधिकार आहे. आपण भाऊ भाऊ असल्यावर सिंहासनासाठी लढाई झगडे मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आपसात झगडत राहिलो तर बाहेरील शत्रूला मौका मिळू शकतो.

          मला आता या सिंहासनाची लालसा नाही. मी आलोय देव आणि दैत्यात्याचे कल्याण व्हावे आणि ह्या घृणित भातृ कलहाचे निवारण व्हावे यासाठी संधी प्रस्ताव घेऊन आलो आहे. इंद्राची प्रभावशाली, मधुर प्रेमपूर्व भाषणाने असुरगण गदगद झाले. दैत्य राजाने मोठ्या सन्मानाने इंद्राला आपल्या शेजारी आसनावर बसवून त्यांचे प्रति आपला आदर व्यक्त केला.

            इंद्र म्हणाले, मी वैकुंठात नारायणाकडे गेलो. त्यांनी सल्ला दिला की,  देव आणि दैत्यांनी आपसातील तेढ मिटवून समुद्रमंथन करावे. त्यातून अमृत निघेल. अमृताचे गुणधर्म तर सर्वांना विदित आहे.

          हा अद्भुत प्रस्ताव ऐकून दैत्यराज आनंदविभोर  झाला. उपस्थित दैत्यगण हलकल्लोळ करू लागले. असुर राजाने त्यांना मोठ्या मुश्किलने शांत केले. सर्व दैत्य या संधी प्रस्तावावर सहमत झाले. समुद्रमंथनाचे नेतृत्व त्यांनी इंद्राकडेच सोपवले. इंद्र पुढील व्यवस्था करण्यास निघून गेले.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. १७-१०-२०२३.

!!!  दशावतार  !!!

                 भाग – ४.

                देवराज इंद्राने बरीच यातायात करून सर्व देवांना एकत्रित करून सभा भरवली. सभेत त्यांनी भगवान विष्णूंचे सल्ल्यानुसार आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा देवांसमक्ष ठेवला. समुद्र मंथनांसाठी देवगण दोरी आणि रवीची व्यवस्था करण्यास बाहेर पडले. सर्व पर्वतांना मंथनासाठी रवी होण्याचा अनुरोध केला पण कुणीच तयार झाले नाही. शेवटी मंदारगिरीने स्वीकृती दिली. अमृताच्या लोभाने वासुकीने दोर व्हायचे कबूल केले. एका शुभ मुहूर्तावर देव आणि असुर सेनेने मोठ्या उत्साहाने मंदारगिरी पर्वत उखडून समुद्राकडे नेऊ लागले. पण काही अंतर गेले नाही तोच ते इतके थकले की समुद्रापर्यंत मंदारगिरी पर्वत नेणे त्यांना अशक्य वाटू लागले. देवतागण श्रीविष्णूचे स्मरण करू लागले. त्यांची आर्त हाक ऐकून आकाशात गरुडावर विराजमान विष्णू प्रगट झाले. देवगण हर्ष, उत्साहाने त्यांचा जयजयकार करू लागले.

          दोन्ही पक्षांची पर्वत नेण्यास असमर्थता पाहून नारायणांनी सहजच एका हाताने तो पर्वत उचलून गरुडाच्या पाठीवर ठेवला. गुरुडाने तो समुद्राच्या मध्यभागी नेऊन ठेवला. काही अडचण आल्यास आपले स्मरण करायला सांगू श्रीविष्णू अंतर्धान पावले.

                अमृताच्या मोहाने वासुकी नागाने दोरखंडासारखे आपले शरीर मंदारगिरी पर्वताला  गुंडाळले. एका बाजूने शेपटी व दुसऱ्या बाजूने मूख ठेवले. पुन्हा मुख कोणी पकडावे यावर वाद सुरू झाला. शेवटी असुरगण विजयी असल्यामुळे नागाचे मुख त्यांनी पकडायचे ठरवले. बुद्धिमान इंद्राने त्यांचे म्हणने मान्य केले. अहंकारी असुरांच्या पतनास सुरुवात झाली. हरिहरच्या महाध्वनीत अति उत्साहात मंथनास सुरुवात झाली. थोडा वेळ घुसळण झाल्यावर वासुकी दीर्घश्वास सोडू लागला. त्याच्या विषयुक्त श्वासाने असुरगण दग्ध होऊ लागले. त्यांनी अहंकाराने स्वतःच वासूकीचे मुख पकडल्यामुळे शिकायत पण करू शकत नव्हते. त्यामुळे ते चुपचाप कष्ट सहन करत राहिले.

             तोच एक संकट समोर आले. मंदारचल घुसळून घुसळून सागराच्या तळातील चिखलात रुतू लागला. देवतांचे स्थापत्य शास्त्रज्ञ (इंजिनियर) विश्वकर्मा ने आपल्या बुद्धीने बराच प्रयत्न केला पण शक्य झाले नाही. आतापर्यंतची सगळी मेहनत वाया जात असलेले पाहून देव- असुर पुन्हा श्रीविष्णूचे स्मरण करू लागले. भक्त वत्सल भगवान विष्णू प्रकट झालेत. भक्तावर आलेले संकट पाहून भगवान विष्णूंनी विशाल कासवाचे रूप घेऊन सागराच्या तळ्यात प्रविष्ट होऊन मंदाचल पर्वत आपल्या पाठीवर धारण केला. देव-असुरगण हा चमत्कार पाहून उत्साहाने पुन्हा समुद्रमंथन कार्याला लागले.

          देव-असुरांची शक्ती मिळून तो विशाल पर्वत कासवाचे पाठीवरती  तीव्र गतीने फिरू लागला. पाण्याच्या प्रचंड गडगडाटाच्या आवाजाने ब्रम्हांडाचे समस्त जीव स्तंभित झाले. आकाशातील ग्रह कापू लागले. देव असुरांच्या कानाचे पडदे जणू फाटते की काय असे वाटू लागले.

        तेवढ्या एक तीव्र वास पसरल्यामुळे देव असुरांना चक्कर येऊ लागली. पाहता पाहता समुद्रावरील पाण्यावर एक काळाकभिन्न पदार्थ आला. त्याच्या तीव्र वासाने जवळजवळ सर्वचजण मुर्च्छित झाले.  इंद्राला विष्णू म्हणाले, तुम्ही तात्काळ कैलासला जा. कैलासपती शिवाय हे काळकुट विष कोणीच पिऊ शकत नाही.  इंद्र ताबडतोब रवाना झाले.

            इंद्र कैलासला पोहोचले तेव्हा कैलासपती बेलाच्या झाडाखाली समाधीस्थ झाले होते. महामाया त्यांची सेवा करीत होती. इंद्राने जगदंबेला नमस्कार करून सगळे हकीकत कथन केली. करुणामयी गौरीने महादेवाच्या कानात शंख ध्वनी करून त्यांची समाधी भंग केली. देवांच्या संकटाची गोष्ट ऐकून आशुतोष शिवानी इंद्राला आश्वस्त करून नंदीवर स्वार होऊन क्षीरसागर कडे निघाले. समुद्र पाण्यावर कालकूट विष तरंगत होते. शंकर भगवान तेथे पोहोचवून ते विष प्राशन केल्यावर  सर्व देवतागण शुद्धीवर येऊ लागले. इतके जहाल विष प्राशन केल्यावरही शंकराची हानी काहीच झाली नाही. फक्त त्यांचा कंठ नेहमीसाठी निळा पडला. तेव्हापासूनच त्यांचे “निळकंठ” नाव पडलं. शिवानी  देव असुरांना आशीर्वाद देऊन नंदीवर स्वार होऊन कैलासाकडे रवाना झाले. मंथन कार्य पुन्हा सुरू झाले.

          श्रीहरी सर्वांना प्रोत्साहित करत होते. आणि सुरभी नावाची बिना वासराची गाय बाहेर आली. तिची विशेषता होती की, ती कितीही दुध देऊ शकत होती. विष्णूंच्या आदेशानुसार ती सुरभी गाय यज्ञकर्त्या ऋषींना दान केल्या गेली. समुद्रातून एकेक अद्भूत गोष्टी निघू लागल्या.

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. १७-१०-२०२३

!!!  दशावतार  !!!

                भाग – ५.

               सुरभी गाईनंतर ऐरावत नावाचा विशाल सुंदर शुभ्र हत्ती, उच्चैःश्रवा नावाचा घोडा अशा अवलौकिक वस्तू सागरातून निघू लागल्या. नारायणांनी  त्या सर्व वस्तू इंद्राला प्रदान केल्यात. त्यानंतर निघालेले दिव्य कौस्तुभ मणी नारायणांनी स्वतःच्या गळ्यात घातला. त्यानंतर सुंदर रूपमती तरुणी समुद्रातून प्रगटली. तिच्या सौंदर्याकडे देव असुर मंत्रमुग्ध होऊन पाहू लागले. तिने पाण्याबाहेर येऊन सुंदर कमल पुष्पांची माळ विष्णूच्या गळ्यात घालून त्यांचा पती म्हणून स्वीकार केला.

         विष्णूच्या भीतीने असुरगण हे सर्व देवांना देत असलेले पाहून चूप होते. त्यांनी विचार केला विष्णू काही नेहमीच आपल्याबरोबर राहणार नाही. ते गेल्यानंतर देवांकडून हे सर्व हिसकवून घेता येईल. यावेळी जर आपण गडबड केली तर अमृत मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकेल.

       महिनो नी महिने समुद्रमंथन चालू होते. एवढा विशाल पर्वत फिरवता फिरवता देव असुर इतके थकले की त्यांचे हात चालेनासे झाले. शरीर साथ देईनासे  झाले. चकरा येऊ लागल्या. विशेष म्हणजे वासूकीला रक्ताच्या उलट्या करून तो अक्षरशः मृतप्राय झाला.

           असुरगणांना समुद्रातील निघालेल्या वस्तू न मिळाल्याने व वासुकीच्या विशाक्त श्वासाने त्यांना अगदी निरुत्साही वाटू लागले. आता त्यांना संशय येऊ लागला देवांचे काही षडयंत्र तर नाही? ते आपसात कुजबुजू लागले. तेवढ्यात अतिशय थंड सुगंधी हवा प्रवाहित होऊ लागली. सर्वांना नवीन बळ, नवी चेतना, उत्साह शरिरात संचारला. पाहता पाहता एक दिव्यप्रकाश प्रकट झाला. देव असुर समजले की, आपले श्रम सार्थकी लागले. अमृत प्रकट झाले. एक धन्वंतरी नावाचा पुरुष हातात अमृताचा कलश घेऊन बाहेर आला. धन्वंतरी बाहेर आल्याबरोबर, असुरांमध्ये लोभ निर्माण होऊन त्यांनी तो अमृत कलश हिसकावून घेतला. देवगणांनी त्यांच्यावर आक्रमण केले. पण नारायणांनी संकेत केल्यानुसार देवगण शांत झाले. आसुरांमध्ये मात्र भयंकर युद्ध सुरू झालं. प्रत्येक जण अमृत पिण्यास उत्सुक झाला. त्यांच्यात कलह सुरू असताना आकाशातून एक सुंदर युवती असुरांमध्ये येऊन पोहोचली. त्या रमणीय युवतीला पाहून सारे असुर स्तब्ध झाले.

           ती युवती रत्नजडीत सुवर्णांलंकारांनी मढलेली होती. शुभ्र वस्त्र परिधान केले होते. स्वर अत्यंत मधूर होता. तिने असुरांना लढाईचे कारण विचारल्यावर, ती देवी अट्टाहास करत म्हणाली, इतक्या शुल्कक कारण्यासाठी इतकी लढाई झगडा? असे म्हणून तो  कलश तिने उचलून घेतला. देव असुर तिचे क्रियाकल्प पाहू लागले. ही अगंतुक  कुठून आली याचा विचार सुद्धा मनात त्यांच्या मनात आला नाही.

                  ती देवी देव असुरांना म्हणाली, तुम्ही दोन्ही पक्ष दोन रांगा करून बसा. मी योग्यतेनुसार सर्वांना अमृताचा वाटप करते. सूर असूर रांग करून बसल्यावर देवीने असुरांना आपल्या शब्दजालात, हास्य व्यंग करत व्यस्त केले. आणि देवतांना अमृत वाटा वाटप करू लागली. असुरांना तिच्या मनमोहक वार्तालापाने मंत्रमुग्ध झाले व अमृताचा विसर पडला.

              परंतु असुरा मधील चतुर राहू नावाच्या असुराच्या लक्षात आल्यावर तो चुपचाप उठून हळूच देवांच्या रांगेत चंद्र आणि सूर यांच्यामध्ये जाऊन बसला. त्याला अमृत मिळते न मिळते तोच सूर्याने विष्णूला त्याच्या बाबत संकेत केला. विष्णूने तात्काळ सुदर्शनाने त्याचे शीर घडावेगळे केले. परंतु या दरम्यान राहूने अमृत प्राशन केले असल्यामुळे दोन भागात झाल्यावरही तो अमर होता. आणि देवांच्या नवग्रहात तो सामील झाला. याचमुळे तो अधून मधून चंद्र सूर्यांना गिळण्याचा प्रयत्न करतो. त्याचमुळे ग्रहण लागते.

               या दरम्यान मोहिनी देवतांना अमृत वाटतां वाटतां संपले. ती  लज्जीत होऊन असुरांना म्हणाली, अरे बोलण्याच्या नादात अमृत समाप्त झाले. तिने अशा काही करूण दृष्टी व चेहरा केला की असुरांना अमृत न मिळाल्याच्या गोष्टीच्या विसर पडला. त्यांनी विचार केला, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तिला कशाला दुखवा? देवीने देवगणांना प्रसन्नतेने मातृत्व भरलेला वरदहस्त ठेवून आकाशात विलीन झाली. आणि असुरगण भानावर आले. पण वेळ निघून गेली होती.

         मोहिनीरूपी श्रीहरीच्या माया शक्तीचा देवतांनी जय जयकार केला. त्यामुळे असुरांनी देवतावर आक्रमण केले. पण अमृत प्राशन केलेल्या देवापुढे ते निष्फळ झाले. सर्व मृत्युमुखी पडले. जे थोडे बहुत वाचले ते जीव वाचवून पाताळात पळून गेले. आणि देवराज इंद्र  परत सिंहासनाधीष्ट होऊन विश्वात शांतीपूर्वक साम्राज्याची स्थापना केली.

           जगत चालक श्री विष्णूंनी आपल्या भक्तांच्या कल्याणार्थ कासव शरीर धारण केले होते त्या स्मरणार्थ आपण भक्त कासवाच्या रूपात त्यांची पूजा करतो.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. १७-१०-२०२३.

दशावतार ( मत्स्यावतार ) संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading