दशावतार ८ ( कृष्णावतार ) भाग ८, (१९ ते २३)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

वसुदेव भोजराजाचे मुख्य सल्लागार व राजा उग्रसेनचे मित्र होते. यादवांना राज्याचा अधिकार नाही ही पूर्वपार समजूत असल्यामुळे, यादववंशीय क्षत्रीय सहसा गोपांचा धंदा करीत असत. उग्रसेनच्या कारकीर्दीत मथुरेतील प्रजा सुखी…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  दशावतार ( कृष्णावतार ) !!! 

       

!!!  दशावतार ( कृष्णावतार )  !!!

                   भाग – १९.

               वसुदेव भोजराजाचे मुख्य सल्लागार व राजा उग्रसेनचे मित्र होते. यादवांना राज्याचा अधिकार नाही ही पूर्वपार समजूत असल्यामुळे, यादववंशीय क्षत्रीय सहसा गोपांचा धंदा करीत असत. उग्रसेनच्या कारकीर्दीत मथुरेतील प्रजा सुखी होती.

             उग्रसेनचा पुत्र कंस युवराज झाला. तो शूर, पराक्रमी, तेवढ्याच क्रूर, कठोर, सत्तालोभी होता. मथुराच नव्हे तर आसपासचे राजे सुद्धा त्याला वचकून होते. सात राज्यांपैकी मगध राष्ट्र सर्वात बलाढ्य होते. त्याचा सम्राट जरासंघाचा सर्वीकडे चांगला दबदबा होता. त्याच्या डोळ्यात मथुरा राज्य खूपत होते. त्याने राजकारण घडवून आपल्या दोन कन्या अस्ती आणि प्राप्तीचा कंसाशी विवाह करून भोज घराण्याशी संबंध जोडले. जरासंघाचा पाठिंबा मिळताच कंस उन्मत होऊन बंडाळी व मंत्रांना वश करून पिता उग्रसेनला बंदी वासात टाकून स्वतः राज्य करू लागला.

                कंसाचा जुलमी कारभार सुरू झाला. पण मनातून तो अस्वस्थ होता. कारण वसुदेव त्याच्या पित्याचे जिवलग मित्र, सर्व सरदारांचा प्रमुख, यादवांचा अधिपती व आपल्या सौजन्यपूर्ण स्वभावाने प्रजेतही प्रिय होता. आपल्या विरुद्ध कट करून पित्याला मुक्त केले तर? सगळे यादव बंडाळी करून आपल्याला पदच्युत करेल, यासाठी त्याने विचार केला, वसुदेवांनाच आपल्या स्वाधीन करून घ्यावे.

            भोजवंशीय राजा अहुकांचे दोन पुत्र होते. देवक आणि उग्रसेन. देवकाची कन्या कंसाची चुलत बहीण देवकी ही अतिशय सुंदर होती. तिचा विवाह वसुदेवाशी करुन, वसुदेव सारखा एक शत्रू कायमचा दाबून टाकला टाकता येईल. हा विचार करून प्रस्ताव त्यांनी वसुदेवापुढे ठेवला.

          वसुदेव देवकीचा विवाह मोठ्या थाटात झाला. सजलेल्या सुवर्ण रथात बसलेल्या वसुदेव देवकीच्या रथाचे सारथ्य स्वतः कंसाने केलेले पाहून प्रजेचेही मन त्याच्याविषयी अनुकूल झाले.

         दुसऱ्या दिवशी महर्षी नारद आले. त्यांचा योग्य आदर सत्कार, पाद्यपूजा केल्यानंतर येण्याचे प्रयोजन विचारल्यावर, नारद म्हणाले, कालच वसुदेव देवकीचा विवाह झाला. पण त्यांच्या पोटी येणारे आठवे अपत्य तुझा काळ ठरणार आहे. त्यावर उपाय विचारल्यावर, नारद म्हणाले, देवकीचा प्रत्येक गर्भ नष्ट केल्यास कदाचित तुझे अरिष्ष्ट टळेल. अस सांगून नारद निघून गेले.

             वसुदेव देवकी गोवर्धनातील आपल्या गावी जायला निघाले तोच, कंसाने दोघांनाही कारागृहात टाकले. त्यांचा बाहेरचा संपर्क तोडून टाकला. दोघेही नशिबाला दोष देत बंदिवासाचे जीवन कंठू लागले.

            दिवस जावू लागले. देवकीला होणारा प्रत्येक पुत्राचा कंस वध करीत असे. देवकीचे सहा पुत्र विधात्याच्या योजनेनुसार कंसाने नष्ट करत त्यांना जन्मतःच मारून टाकले. आणि देवकीचा सातवा गर्भ देवाने वासू देवाची दुसरी पत्नी रोहिणी जी, नंदगृही गोकुळात राहत होती तिच्या पोटी गुप्तपणे ठेवून दिला. यथावकाश  झालेला तो पुत्र म्हणजेच बलराम होय. कंसाला वाटले आपल्या धाकाने देवकीचा गर्भ जिरला असावा.

         देवकी आठव्या वेळी गर्भवाशी झाल्याचे कळताच कंसाने त्यांच्यावरील चौकी, पहारे कडक केले. मागील जन्मी वसुदेव देवकीने आपल्या पोटी परमेश्वराने अवतार घ्यावा म्हणून घोर  तपर्श्चा केली होती. श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमी बुधवारला त्यांना सत्यता पटावी म्हणून जन्मल्या बरोबर किरीट, कुंडल  अलंकारयुक्त शंख ,चक्र, गदा, पद्मधारी चतुर्भुज बालमुर्तीच्या रूपाने परमेश्वर त्यांच्या पुढे प्रगटले. हर्षभराने दोघांनीही मनोभावे हात जोडले.

                परमेश्वर म्हणाले, बाबा, मला ताबडतोब गोकुळात न्या आणि तिथे नुकतीच यशोदा मातेच्या पोटी जन्मलेली कन्या घेऊन परत या. व मला कन्येच्या जागी ठेवा. वसुदेवांचे सर्व बंधने गळून पडले. बंदी शाळेचे दार उघडले गेले. निर्विघ्नपणे वसुदेव नंदाघरी पोहोचले. देवाने आपल्या मायेने सर्वांना गुंगवून ठेवल्यामुळे यशोदेला झालेले बाळ पुत्र की पुत्री? हे कोणाला समजले नव्हते. वसुदेवांनी आपल्या बाळाला यशोदेच्या कुशीत ठेवले व तिची कन्या घेऊन बंदी शाळेत परत आले. पूर्ववत सर्व झाल्यावर, बाळ मोठ्याने रडू लागले. आवाज ऐकताच आत येऊन कंस बाळाला शिळेवर आपटणार तोच, ती योग माया त्याच्या हातून निसटून आकाशमार्गे जाताना विजेसारखी कडाडली. कंसा, तुझा वैरी गोकुळात जिवंत आहे.

             पृथ्वीवर माजलेल्या असुरांचा संहार करण्यासाठी भगवान विष्णूंनी मानव रुपात जन्म घेतला. नंदाघरी आपल्या बाल लीलांनी ते सर्वाना आनंदित करू लागले. रोहिणीच्या पुत्राचे नाव राम व तो बलशाही असल्यामुळे बलराम ठेवले. आणि यशोदेचा पुत्र कुष्णवर्णी असल्यामुळे त्याचे नाव कृष्ण ठेवल्या गेले.

         एक दिवस पुतना नावाची राक्षसीन कृष्णाला मारायला आली होती, पण कृष्णाने तिचा अंत केला.

        बलराम कृष्ण कलेकलेने वाढू लागले. कृष्ण फारच खोडकर असल्यामुळे यशोदा ने त्याला उखळाला बांधून ठेवले. आणि घरकामात व्यस्त झाली. थोड्यावेळाने येऊन पाहते तो उखळासहित कृष्ण गायब.

     बलराम कृष्णाची बाल दिशा संपून किशोरावस्थेत आलेत. दिवस जात होते ऋतू बदलत होते.

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. १८-१०-२०२३.

!!!  दशावतार  !!!

                 भाग – २०.

                    बरीचशी वृक्षतोड झाल्यामुळे गोकुळ परिसर उजाड झाला. माणसांचे हाल होऊ लागले. त्यामुळे पूर्ण गोकुळपाडा वृंदावनामध्ये आला. बलराम कृष्ण गोप सख्या सोबत वनात गाईवासरांचे कळप चारायला नेऊ लागले. एक दिवस कृष्ण एकटाच यमुनेच्या काठाने जात असतांना त्याला एक डोह दिसला. नंदाने त्याला सांगितले होते की, या डोहात कालिया नावाचा नागराज आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. डोहाचे पाणी विषारी झाले आहे. कृष्ण कंदबाच्या वृक्षावर चढला आणि डोहात उडी मारली. कालिया नागाने कृष्णाला आपल्या वेटोळ्यात जखडून टाकल्याने त्याला बिलकुल हालता येईना.

                  तेवढात कृष्णाला शोधत गोप आले. समोरचे दृश्य पाहून ओरडत वेगाने व्रजाकडे जाऊन बातमी दिल्याबरोबर नंद, यशोदा, सर्व गोप आले. बलरामाने येऊन कृष्णाला खुणेनेच शब्द बोलल्या बरोबर  कृष्णाने शरीरावरचे वेष्टण तोडून मुक्त झाला. नागाच्या मस्तकावर नाचू लागला. नागराज  कालिया शरण गेल्याने कृष्णाने कालिया नागाला जीवदान दिले.

               कृष्ण बाहेर येऊन म्हणाला, आता यमुनेचे पाणी स्वच्छ, निर्मळ, सदोष झाले. वृंदावनात गोपांबरोबर बलराम कृष्णाचे दिवस आनंदात जात होते.

        तालबान अरण्यात धेनुक नावाचा अति बलाढ्य राक्षस गर्दभाच्या रूपात वावरत होता. त्याचा समाचार  घ्यायला बलराम कृष्ण गेले. सामना झाल्यावर रामाने त्याचा वध केला. एके दिवशी गोप, कृष्ण बलराम बरोबर खेळत असताना, प्रलंब नावाचा राक्षस त्यांच्यात रूप बदलून मिसळला. व संधी साधून बलरामला पाठीवर घेऊन अरण्यात पळू लागला. रामाने त्याचाही वध केला. तेव्हापासून बलरामला      “बलदेव प्रलंबन ” म्हणूनही ओळखल्या जाऊ लागले.

                  नंतर सर्वजण शुक्रोत्सव करण्याच्या तयारीला लागले. गिरीयज्ञानाच्या उत्सव पार पडला. नेहमीच्या रूढीप्रमाणे इंद्रपूजा न झाल्यामुळे इंद्रांनी पर्जनास्त्र सोडले.  वज्राची दुर्दशा होत असलेले पाहून, श्रीकृष्णाने सर्वांना गोवर्धन पर्वताजवळ पोहोचण्यास सांगितले आणि तो प्रचंड पर्वत श्रीकृष्णाने  करंगळी वर उचलला .आणि पर्वताखाली गोप वसाहत करून राहू लागली. सात दिवस इंद्राच्या क्रोधाचे तुफानी पावसाचे थैमान सुरू होते. शेवटी थकून इंद्राने माघार घेतली. तेव्हा सर्वांना बाहेर यायला सांगितले व गोवर्धन पर्वत पूर्वस्थितीत आला. श्रीकृष्णाच्या अशा अनेक दिव्य अचाट पराक्रमाने श्रीकृष्ण विष्णूचा अवतार असल्याची सर्वांची खात्री झाली .

      एके दिवशी कृष्ण नेहमीप्रमाणे गोपा गोपी सोबत रास क्रीडा खेळत असताना एक मस्तवाल बैल जो ऋषभासुर राक्षस होता, त्याने उत्पात माजवल्यावर कृष्णाने त्याचा वध केला.

       श्रीकृष्णाच्या या लोक विलक्षण अद्भुत पराक्रमाची चर्चा कंसाच्याही कानावर गेली. त्याला माहित झाले, कृष्ण हाच आपला शत्रु आहे. कृष्ण आपल्यापर्यंत पोहचण्याआधी त्याला वृंदावनातच ठार करण्याची योजना करून, आपला भाऊ कोशीला एका भयंकर घोड्यावर बसून पाठवले. कृष्णाने दोघांनाही ठार केले    कंसाने अक्रूरलाला दूत म्हणून मल्लयुद्ध खेळण्याचे आवाहन करण्यास कृष्णाकडे पाठवले. बलराम कृष्ण रथात बसून निघाले. काही निवडक गोपही सोबत घेतले. सर्वजण मथुरा नगरीची शोभा पाहत बाजारपेठेत आले. तिथली बहुमूल्य सुंदर वस्त्रे पाहून बलराम श्रीकृष्णाने मागितल्यावर निर्भत्सना करुन, दुकानदाराने नकार दिल्यावर संतापलेल्या श्रीकृष्णाच्या एकाच तडाख्यात दुकानदार गतप्राण झाला.

              असेच चालत असताना रस्त्यात त्यांना कुब्जा दिसती. कृष्णाने तिचा उद्धार केला.

          धनुष्य यज्ञासाठी ठेवलेले प्रचंड अवजड धनुष्य श्रीकृष्णाने मोडून त्याचे दोन तुकडे केले. हे पाहून प्रमुख रक्षक कंसाला खबर देण्यास गेला. कंस आश्चर्यचकित झाला.

      दुसऱ्या दिवशी मल्ल युद्ध पाहण्यासाठी विस्तर्ण पटांगणात लोकांची गर्दी झाली होती. सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न झाल्यावर, बलराम कृष्ण आपल्या गोप मल्लासह प्रवेश करणार, तोच पूर्वीच ठरल्याप्रमाणे कुवल्लापीठ नावाचा हत्ती माहुताने त्यांच्या अंगावर घातला. आणि अर्धा घटका कृष्णाने त्याच्याशी झुंज देऊन शेवटी हत्ती अनंतात विलीन झाला.

       नंतर श्रीकृष्णाची चाणूरमल्ला बरोबर निकराची झुंज सुरू झाली. शेवटी श्रीकृष्णाच्या मुष्टी प्रहाराने चाणूरमल्ल गतप्राण झाला. नंतर तोशरमल्लाचीही तीच गत झाली. तिकडे बलरामने मुष्टिका मल्लाला मारले. तीनही बलाढ्य मल्ल ठार झाल्याचे पाहून, कसं पेटून उठला. त्यांनी नंद, वसुदेवाचा अपमान केल्यावर कृष्णाच्या संतापाचा कडेलोट झाला. कृष्णाने कंसाचे केस पकडून फरफटत खाली आणत असतानाच त्याला वीरगती न मिळताच गत प्राण झाला. एका जुलमी राजाचा अंत झालाय!

           कृष्णाने उग्रसेनांचा अभिषेक करून त्यांना राज्यपद बहाल केले. बलराम कृष्णा ने संदीपान या  प्रसिद्ध ऋषीकडे सर्व विद्या आत्मसात केल्यात. ६४ दिवसात ६४ कला( विद्या) ग्रहण केली. श्रीकृष्णाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या रूपात ऋषींनी  प्रभास तीर्थी एका प्रचंड मस्त्याने गिळलेला आपला पुत्र वापस मागितला. त्यानुसार प्रभास क्षेत्री समुद्रा काठी जाऊन तिथे असलेल्या डोहात पंचजन्य नावाच्या महादैत्य मस्त्यरुपाने गुरुपुत्राला गिळले होते. कृष्णाने त्याला डोहातून शोधून काढून वध केला व  पुत्राला सोडवून संदीपऋषींच्या स्वाधीन करून आपली गुरुदक्षिणा पूर्ण केली. शिवाय समुद्रातून आणलेली रत्नेही अर्पण केली. कृष्ण बलराम मथुरेत परत आले.

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. १८-१०-२०२३.

भाग – २१.

                कंसाचा वध झाला. आपल्या कन्या विधवा झाल्याचे कळतात जरासंघाने मथुरेवर हल्ला केला. २७ दिवस घनघोर युद्ध करून त्याचा पराभव झाला. पण परत चालून येईल ही शक्यता धरून मथुरेत सर्व जय्यत तयारी ठेवली होती.

          बलराम कृष्ण दक्षिणेकडे प्रवासास निघाले. कारण जरासंघाचे वैर श्रीकृष्णाशी होते. त्यामुळे मथुरेचे हित लक्षात घेऊन, श्रीकृष्णाने मथुरा सोडून जाण्याचे ठरवले. दोघेही प्रवास करून सह्याद्रीच्या सानिध्यात असलेल्या करवीर नगरी जवळ पोहोचले. तिथे वेणा नदीच्या तीरावर प्रचंड वटवृक्षाखाली एक तेजपुंःज्य, खांद्यावर परशु, अंगावर वल्कले परिधान केलेले, ज्यांनी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, ते आद्य वेदगुरू भार्गवराम बसलेले दिसले. राम कृष्णाने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले.

          परशुराम म्हणाले, हे कमलनयना, सर्व शक्तीमान कृष्णा, गोकुळातील तुझे सोळा वर्षाचे वास्तव्य, मथुरेतील कंस व इतर दानवांचा केलेला वध  ही सर्व इत्थंभूत माहिती मला आहे. हे पुरुषोत्तमा, तू जगच्चालक असून देवकार्यार्थ पृथ्वीवर अवतारला आहेस. तरीसुद्धा मी सांगतो ते ऐक.

             तुम्हा दोघा भावांचा जरासंघाशी असलेला विरोध जाणूनच मी इथे आलोय. ते म्हणाले, गोमंत (गोवा) शिखराचा आश्रय घेऊन तुम्ही निकराने युद्ध केले तर जरासंघ गर्भळीत होईल. आणि दुर्गयुद्धाच्या पद्धतीने जरासंघाला जिंकू शकाल. या युद्धासाठी श्रीविष्णूंची चार आयुधे प्राप्त होतील. कृष्णा, हा संग्राम  ” चक्रमुशल” संग्राम नावाने प्रसिद्ध होईल. शिवाय  “काळाचा आदेश” असेही नाव प्राप्त होईल.

        कृष्णा, या संग्रामात तुझे मूळ रूप  (विष्णू ) सर्वांच्या दृष्टीस पडेल. चल,  जिथे  आयुधे आहेत ते ठिकाण तुला दाखवतो. त्यानंतर  माझे कार्य संपले. हेच सांगण्यासाठी मी इथे थांबलो होतो. दोघांना  शूर्पारक नगरात सोडून, आशीर्वाद देऊन परशुराम रवाना झाले.

          राहण्यासाठी आश्रमवजा झोपडी बांधून बलराम श्रीकृषाण राहू लागले. तिथे वानरांची वस्ती असल्यामुळे ते वनचर त्यांचे विश्वासू भक्त, सेवक बनले. त्यातील दोन हेरांना जरासंघाच्या आतील गोष्टीची माहिती काढून आणण्यास पाठवले.

       हेरांनी आणलेल्या बातमीनुसार डोंगराच्या चारही बाजूने आग लावून कृष्ण बलरामला जाळून मारण्याचा सल्ला शिशुपालने दिल्याचे कळले. जरासंघाचा बेत कळल्यावर, कृष्णाने तिथल्या रहिवाशांना पलीकडील डोंगरावर तात्काळ स्थलांतर करण्यास सांगितले. आणि पर्वताच्या समोर आग पेटवून दिली. सगळीकडे हाहाकार माजला. मोठे मोठे शिलांचे तुकडे खाली पडू लागले. डोंगरातील धातु वितळून पाट वाहू लागले. मेरू समान सुंदर पर्वत दोन दिवस नुसता धरधगत होता. आपल्यामुळे इतक्या सुंदर पर्वताची दुर्दशा झालेली पाहून बलराम कृष्णाला अतिशय वाईट वाटले. आणि क्रोधायमान होऊन हे विष्णूचे दोन योध्दे आपापली  आयुधे घेऊन शत्रुवर तुटून पडले. पराभूत  जरासंघ व इतर राजे उरलेल्या सैन्यासह पळून गेले.

          दोघेही विजय बंधू क्रोंचपुरला आले. तिथे  शिशुपालचे पिता दमघोष व राजाने त्यांचे अद्वितिय पराक्रमाची प्रशंसा व सत्कार केला. आणि रथ, सैन्य, वस्त्रालंकार देऊन त्यांची रवानगी केली. बलराम कृष्णाची पद यात्रा पूर्ण झाली.

            करवीरच्या शृगल राजाने ” सावित्री व्रत” करून सूर्याकडून दिव्यरथ प्राप्त करून घेतला होता. त्या रथात बसून कृष्णाला युद्धाचे आवाहन केले. श्रीकृष्णाचा सुदर्शन चक्राने तो मरण पावला. मथुरा नगरी निर्भय झाली. उग्रसेनमहाराज उत्कृष्ट राज्यकारभार करू लागले.

        श्रीकृष्णाला आपली आत्या पृथा (कुंती)चा पती पंडुराजाचे निधन झाल्याने तिच्या सांत्वनाला जाण्यास वासुदेवांनी आदेश दिला. या दरम्यान बलराम कृष्णांनी वृंदावन मध्ये नंद, यशोदा, गोप गोपिकांना भेट दिली.

                  दोघांही भावांचे तारुण्यात पदार्पण झाले असल्यामुळे वसुदेव, देवकी, रोहिणीला त्यांच्या विवाहाची काळजी लागली.

                  कौंडण्यपुरच्या भोज राज्याची कन्या रुक्मिणींचे स्वयंवर असल्याची वार्ता कळली. श्रीकृष्णाने रुक्मिणीच्या विनंतीवरून तिचे हरण केले. अपमानित व मगधपती राजा जरासंघ स्वस्थ बसला नव्हता. कालयवणाच्या मदतीने मथुरेवर चाल करायचा बेत असल्याची बातमी गुप्तहेराकडून कृष्णाला कळल्यावर, नुकत्याच भरभराटीस आलेल्या मथुरेचा आपल्यामुळे विध्वंश निर्माण होऊ नये म्हणून ही नगरी सोडून दुसरी नगरी बसवण्याचा विचार पक्का केला. आणि कालयवन, जरासंघ चढाईच्या तयारीने येण्याआधी पूर्ण यादव परिवार सामान गज,घोडे पदाती सैन्यासह पश्चिम द्वाराने बाहेर पडले. आणि रैवतक पर्वताजवळ आले. तिथे श्रीकृष्णांनी ‘द्वारावती’  नगरी बसवण्याचे ठरवले. तोच कालयवण मथुरेवर चाल करून जात असल्याची वार्ता दूताने दिली. कृष्णाने कालयवनाला पळवत नेऊन मुचकुंद ऋषींच्या आश्रमात नेले. आणि मुचकुंड ऋषींकडून भस्मसात झाला.

              आता श्रीकृष्ण निश्चिंत झाल्यामुळे थोड्याच अवधीत इंद्राच्या अमरावती प्रमाणे अतिसुंदर विस्तीर्ण नगरीचे निर्माण झाले. श्रीकृष्णाने पिता वसुदेवांचा राज्याभिषेक करून त्यांना राजा, बलरामला युवराज पद, अशा प्रकारे सर्वांना पदे वाटली, पण स्वतःकडे एकही पद न ठेवता राज्याची उत्तम व्यवस्था लावली. दारामतीचे ” द्वारका ” हे नामकरण केले. श्रीकृष्णाचा विवाह रुक्मिणी व्यतिरिक्त आणखी झाला सात राण्यांशी झाला. या सात राण्या होण्यासाठी प्रत्येकवेळी वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या.सम्यंतक  मणी चोरल्याचा आळ श्रीकृष्णावर आला, तोही आपल्या पराक्रमाने श्रीकृष्णाने दूर केला.

              क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. १८-१०-२०२३.

!!!  दशावतार  !!!

                   भाग – २२.

               एक दिवस श्रीकृष्णालाला बातमी मिळाली की, कुंतीसह पाच पांडव वारणावतात जळून खाक झालेत. श्रीकृष्णाने अंतर्ज्ञानाने जाणले की ते जिवंत आहेत, पण आपणालाही दुःख झाले असेच भासवले.  बलराम कृष्ण धृतराष्ट्राचे सांत्वन करण्यास गेल्याची संधी साधून शतघन्वाने सत्यभामाचे पिता सत्रजीतला  झोपेतच ठार करून त्यांच्या जवळचा संम्यतक मणी घेऊन निघून गेला. शेवटी अक्रुरालाला सम्यतंक म्हणी सर्वांच्या समक्ष देऊन विषय इथेच संपवला .

             धर्मरक्षणार्थ मानवलोकी अवतीर्ण झालेल्या कृष्णाला उसंत कुठली? इंद्राने दूताकरवी निरोप पाठवला की, प्रागज्योतिष्य (आसाम)चा महादुष्ट उन्मत्त राक्षस राजा नरकासुराने वरुणाचे छत्र, इंद्रमाता अदितीचे कुंडले आणि इंद्राचे मणी पर्वत हरण केले. त्याचे पारिपात्य करावे.

             नरकासुर राक्षसाने पृथ्वीवरील गंधर्व, मनुष्य, राक्षस यांच्या सुंदर सुंदर मुलींचे अपहरण करून त्यांना एका पर्वतावर कैद केले होते. त्यांनाही सोडवायचे व इंद्राच्या निरोपाप्रमाणे मदत करायची, या उद्देशाने श्रीकृष्ण येत असलेले पाहून त्याचा प्रतिकार करण्यासाठी नरकासुराने असुरश्रेष्ठ मरू आणि कल्पांत कतुल्व  या सेनापतीस कृष्णाच्या प्रतिकार करण्यास पाठवले. या दोघांनाही हरवल्यावर दुसरा सेनापती निरंसुद व हयग्रीवा यांच्याशी भिषण युद्ध होऊन दोघेही ठार झाले. नंतर कृष्ण प्रागज्योतिष ( आसाम)  या नगराच्या वेशी जवळ येऊन पांचजन्य शंखाचा ध्वनी काढून नरकासुराला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये भीषण युध्द होऊन शेवटी मधुसूदनाच्या दैदीप्यमान चक्राने नरकासुराच्या शरीराचे दोन शकले झाली. श्रीकृष्ण नरकासुराचा जमादार खाण्यातील अपार धन, विपुल मोती, मानके रत्न, स्वर्ण, हिरे तसेच वरुणाचे हरण केलेले मौल्यवान छत्र व इंद्र मातेची कुंडली हस्तगत केली. अफाट धन भंडार द्वारकेस रवाना केले. आणि नरकासुराने गिरीकंदात कैद केलेल्या सर्व कन्यांची मुक्तता करून त्यांनाही द्वारकेस पाठवले. इंद्र माता अदितीचे कुंडले घेऊन देवलोकी कृष्ण इंद्रसभेत गेला. कुंडले आदिती मातेला अर्पण केली.

                    द्वारकेत श्रीकृष्ण नाही हे पाहून  शिशुपालने द्वारकेवर स्वारी केली. व जाता जाता आग लावल्यामुळे द्वारकेचा बरेचसा भाग जळून गेला होता.

                या दरम्यान बऱ्याचशा घटना घडून गेल्या. बलराम करवी रुक्मिणीचा भाऊ  रुक्मिचा वध झाला होता. त्याचीच कन्या रुख्मावतीचा विवाह कृष्णपुत्र प्रद्युम्नशी  झाला. यांचा पुत्र अनिरुद्धचा विवाह बाणासुराची कन्या उषाशी झाला.

               एकदा श्रीकृष्ण इंद्रप्रस्थी केला असताना अर्जुन व श्रीकृष्ण नदी तीरावर  बोलत बसले असता, मानवाच्या रूपात अग्नीदेव समोर येऊन म्हणाले, भगवंता, मी भुकेला आहे. माझी भूक शांत करा. त्यांच्या इच्छेप्रमाणे खांडववन अग्नीला देण्याचे कबूल केले. आणि भयानक आग भडकली की, त्यातून कोणीही बाहेर पडू शकले नाही. मात्र मयासुराला कृष्णाने वाचून बाहेर सुरक्षित जाऊ दिले. तसेच तक्षक नावाचा नागही वाचला.

           जरासंधाने नरमेध यज्ञ करण्यासाठी अनेक राजांना जिंकले. ज्यांनी कारभार दिला नाही त्यांना कैदेत टाकले. नरमेध यज्ञात त्यांचा बळी देणार, म्हणून सगळ्या राजांनी मिळून दूताला आपल्या रक्षण करण्याचा विनंतीसह कृष्णाकडे पाठवलं. तेवढ्यात इंद्रप्रस्थात युधीष्ठीराने राजसुय यज्ञ करण्याचे ठरविले. पण जरासंघ जिवंत असेपर्यंत शक्य नव्हते. त्याला युद्धात हरवणे अवघड होते. त्याला द्वंदयुध्दात हरवूनच मारल्या जाऊ शकत होते. त्यासाठी कृष्णाने त्याच्याशी द्वंद खेळण्यास भीमाची योजना केली. १४ दिवस युद्ध झाले.पण तो हरला नाही. शेवटी युक्तिवादाने भीमाकरवी त्याचा वध करवला.

          श्रीकृष्णाचे वाढते प्राबल्य पाहून पौंड्रिक राजा वासुदेव पेटून उठला. काशीराजही त्याला येऊन मिळाला. कृष्णाने दोघांचाही वध केला.

                युधीष्ठीरने  राजसुय यज्ञ आरंभ केला. अग्रपूजेचा मान कृष्णाला दिल्यावरून शिशुपाल श्रीकृष्णाला वाटेल तसे बोलून आपमान करू लागला. त्याचे शंभर अपराध भरल्यावर शिशुपालाच्या आईला दिलेल्या वचनातून मुक्त झालेल्या श्रीकृष्णाने त्याचा वध केला.

              पांडवांचे सुख दुर्योधनाला सहन झाले नाही. त्याने धृतराष्ट्राच्या संमतीने युधीष्ठीरला दूताचे आव्हान केले व त्यांनी दूतात आपली संपत्ती, राज्य, चार भाऊ व द्रौपदीलाही पणाला लावून हरला. पण लोक लाजेस्तव धृतराष्र्टानै द्रौपदीला वर मागण्यास सांगितल्यावर तिने मागणी केली. ते सर्व पांडव व द्रौपदी दास्यातून मुक्त होऊन परत इंद्रप्रस्थास निघाले असता, पुन्हा त्यांना दूत खेळण्यासाठी बोलावले.  त्यातही युधीष्ठीर हरल्यामुळे बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगण्यास पांडव द्रोपदीसह वनात निघून गेले.

        तेरा वर्षाचा वनवास भोगून संपल्यावर, दुर्योधनाने पांडवांचा वाटा देण्यास नकार दिल्यामुळे कुरुक्षेत्रावर १८ दिवस भीषण युद्ध झाले. सर्व कौरवांचा नाश झाला. दुर्योधनाची शेवटची पूर्ण करण्यासाठी अश्वत्थामाने पाचही पांडव पुत्रांचा भीषण वध केला. श्रीकृष्णाने त्याला शाप दिला.

          गांधारीने कृष्णाला शाप दिला, जसा तू आमचा सर्वांनाश करवलास तसेच तुझे यादवकुळ आपसात लढून नष्ट होईल. अशा प्रकारे युद्ध पर्व संपले

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख
                 दि. १८-१०-२०२३.

!!!  दशावतार  !!!

                  भाग – २३.

                हा  झालेला सर्व संहार पाहून धर्मराज युधीष्ठीरला विरक्ती आली. त्यांना राज्य भोगणे नकोसे वाटत होते. तेव्हा व्यास आणि कृष्णाने केलेल्या उपदेशांनी राज्य स्वीकारण्यास तयार झाले. सिंहासनावर धर्मराज  व द्रौपदीला बसवून श्रीकृष्णाने   गंगाद्योकाने या पृथ्वीच्या सम्राटाचा अभिषेक केला. ही सर्व व्यवस्था लावल्यावर जेथे भीष्म शरपंजरी पडले होते, तिथे श्रीकृष्ण धर्मराजासहित गेले. आणि भीष्मांनी कृष्णाच्या विनंतीवरुन युधीष्ठीरला उपदेश केला. हे सर्व आटोपल्यावर कृष्ण द्वारकेला रवाना झाले.

            काही दिवसांनी अभिमन्यू पत्नी उत्तरेला मृत बालक झाल्याचा निरोप श्रीकृष्णाला मिळाल्याबरोबर सत्वर श्रीकृष्ण उत्तरेच्या कक्षात पोहोचला. आपल्या योगसामर्थ्याने उत्तरेचा मृत बालक जिवंत झाला त्याचे नाव परीक्षित ठेवण्यास सांगितले.

          युधीष्ठीरांचा अश्वमेध यज्ञ झाल्यावर अर्जुनाने जिंकलेली पृथ्वी ब्राह्मणांना दान करून व चार बंधुपत्नीसह वनात जाण्याचा निर्णय घेतला.

           पृथ्वीवर सगळीकडे धर्माचे राज्य सुरू झाले. श्रीकृष्ण बलरामही यादवांसह सुख समाधानाने राज्य करू लागले.

                ज्या कार्यासाठी विष्णूंनी भूलोकी अवतार घेतला ते कार्य भारतीय युद्ध करून पृथ्वीच्या विनंतीवरून तिच्यावरचा भार हलका केला. अधर्माचा नाश करून परत धर्मस्थळ स्थापन केला. नंतर ३६ वर्षे राज्य केले.

            एक दिवस कृष्ण सखा व चुलत बंधू उद्धवाला श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा,  या भूलोकावरचा माझा अवतार लवकरच संपणार आहे. ज्या कार्या साठी मी मानवतार घेतला होता ते कार्य भारतीय युद्ध घडवून पृथ्वीवरचा भार हलका केला. पण हे यादव माझ्यामुळे वैभव शिखरावर पोहोचले. त्यामुळे ते उन्मत झाले.  मद्यसेवन व ब्राम्हद्वेष त्यांचेत शिरल्यामुळे त्यांचा अंतकाळ जवळ आला. ही चर्चा चालू असताना, तिकडे कृष्णपुत्र सांबा स्त्री वेशात जाऊन आपण गर्भवती आहोत, पुत्र होईल की पुत्री?हे सांगावे. कोपिष्ट दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिला…. या सांभाला मुसळ होऊन सर्व यादवांचा नाश होईल. ही वार्ता कृष्णाला समजल्यावर कृष्ण म्हणाला हे क्रमप्राप्तच होते.

                 श्रीकृष्ण अवतार संपवणार म्हटल्यावर, उद्धव अतिशय विव्हल झाला. तेव्हा उद्धवला उपदेश  करून श्रीकृष्ण म्हणाला, तू बद्रिकाश्रमी जाऊन आज पर्यंत माझ्याकडून जे शिकलास ते लिहून काढ. हेच भागवत किंवा उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध होईल.

            .इकडे दुर्वासऋषींच्या शापामुळे सांबाला खरंच मुसळ झाले. वासुदेवच्या सांगण्यावरून त्या मुसळाचे चूर्ण करून समुद्रात फेकण्यात आले. सर्व यादवांमध्ये अनाचार, मदिरापान वाढला. स्त्रिया अनाचारी झाल्या. हे सर्व पाहून श्रीकृष्ण उद्वीग्न झाला. पण हा अनर्थ त्यानेच घडून आणला होता.

                  कार्तिक वद्य अमावस्या व सूर्यग्रहण  असल्यामुळे, कृष्णाने सर्वांना पर्व स्नानासाठी प्रभास तिर्थी जमायला सांगितले. तिथे मेजवाणी, मद्यपान असल्यामुळे सर्वांच्या बुद्धींचा ताबा सुटून बेभान झाले. आपापसात भांडणे जुंपली. मारामारी, कापाकापी सुरू झाली. जवळचे शस्त्र संपल्यावर समुद्रकिनारी उगवलेली लोहयुक्त लव्हाळीने एकमेकावर वार करू लागले. .

                ते उगवलेले लव्हाळी म्हणजे, सांबाला झालेल्या मुसळाचे चूर्ण  समुद्रात फेकले होते ते लव्हाळी रुपाने शस्र तयार झाले होते.   त्या लोहयुक्त लव्हाळ्यांनी आपसात लढून पाच लक्ष यादव मरण पावले. श्रीकृष्णाने स्वतःच्याच यादव कुळाचा पृथ्वीवरचा भार हलका केला. आता अवतार समाप्तीला कुठलेही अवधान, प्रत्यावय राहिला नव्हता. दारूकाला घडलेली हकीकत हस्तीनापुरला कळवायला सांगितली.

        प्रभासक्षेत्री जिवंत राहिलेल्या यादवांना द्वारके कडे पाठवले. बलराम म्हणाले, कृष्णा, मी वनात जाऊन योगबळाने प्राण अवरोध करून हा लोक  सोडणार आहे. ठीक आहे दादा. जा.. मी पण माता पित्यांचा निरोप घेऊन या मानवी देहाचा त्याग करतो. वृद्ध माता पित्यांचे दर्शन घेऊन भालकातीर्थावरच्या अरण्यात एका अश्वत्थ ( पिंपळ) वृक्षाखाली परधामाला जाण्यास व गांधारीचा शाप खरा ठरवण्यासाठी मनाला सर्व बंध घालून ब्रह्मासनात डोळे मिटून शांतपणे कृष्ण बसला होता.

          त्याचवेळी जरा नावाचा व्याध भिल्लाने त्याच्या पायाचा तळवा मृगाचे तोंड समजून बाण मारला. बाण तळव्यात घुसला. शिकारी जवळ आल्यावर त्याने कृष्णाला ओळखले. तो शोकाकुल होऊन  विलाप करू लागला. हे पाहून श्रीकृष्ण म्हणाला, अरे एकलव्या, यादव हे यादवांच्याच हातून मरणार हे विधी लिखित आहे. तू यादव असून माझा चुलत बंधू आहेस. माझ्या एका चुलत्याने त्याचा जिवलग मित्रला हिरण्यगर्भाला जन्मतःच एक मुलगा दिला होता. तोच तू एकलव्य आहे. एकलव्याला आशीर्वाद दिल्यावर तो निघून गेला.

             आणि श्रीकृष्णाने मनासहित निरोध करून समाधीस्थ झाला आणि क्षणात त्याच अवस्थेत अनंतात विलीन झाला.

          यादव संहाराची व बलराम कृष्णाच्या निधन वार्ता दारुकाद्वारे पांडवांना कळल्यावर त्यांना अतिशय दुःख झाले. त्यांनी अभिमन्यू पुत्र परीक्षीताला गादीवर बसवून हिमालयाकडे प्रस्थान केले. मेरू पर्वताकडे  जाताना मार्गात क्रमशः द्रौपदी सहदेव नकुल अर्जुन भीम मृत्यूमुखी पडले. एकटे धर्मराज स्वानासह सदेह स्वर्गात गेले.

         श्रीकृष्ण कोण होता हे कोणालातरी कळले का? ज्यावेळी ज्याला कुणाला थोडा तरी समजेल तो दिवस आर्यवर्तातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील सोन्याचा दिवस ठरेल.

 श्रीकृष्णर्पणामस्तु। ओम श्री परमात्मने नमो नमः !!

क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि. १८-१०-२०२३.

दशावतार ( मत्स्यावतार ) संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading