आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

भक्त प्रल्हाद संपूर्ण भाग ३, (९ ते ११)
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
भक्त प्रल्हाद
!!! भक्तप्रल्हाद !!!
भाग – ९.
दोघे बहिणभाऊ हिरण्यकश्यप व होलिकाचे ह्रदय किंचितही द्रवले नाही, क्षणभरही वाटले नाही, या अबोध बालकाला जिवंतपणी अग्निच्या स्वाधीन करतोय…चित्ता पेटवण्याचा आदेश दिला गेला.धडाडून चित्ता पेटली.अग्नि ज्वाळा आकाशाला भिडल्यात, होलिका, हिरण्यकश्यपू व इतरांना वाटले आतां प्रल्हाद अग्नित भस्म होईल,पण झाले उलटेच!होलिकाच त्या आगीत भस्म झाली.आणि या सर्वांपासून अंजान, अबोध प्रल्हाद विष्णूंचे नामस्मरण करत हसतमुखाने चित्ताबाहेर आलेला बघून हिरण्यकश्यपूच्या तळपायाची आग मस्तकात गेली.सारे उपाय करुन तो हतबल झाला.जल,अग्नि,वायु,थंडी या पैकी कुणीही प्रल्हादला बाधा पोहचवू शकले नाही.
एवढसा पांच वर्षाचा मुलगा आणि त्याच्या अंगी इतके अचाट सामर्थ्य,शक्ती खरच माझा मुलगा शोभतो खरा,परंतु माझा शत्रू विष्णूचेच नेहमी गुणगाण करतो,ज्या विष्णूने माझा भाऊ हिरण्यक्ष ला ठार केले,राक्षसराज्य नष्ट केले होते, त्याचीच हा कारटा पूजा करतोय,म्हणजे साक्षात माझा काळच की!बरे त्याने हे स्वतःपुरते न ठेवतां,शुक्राचार्यांच्या आश्रमांत शिकायला ठेवले तर तेथील विद्यार्थ्यांना देखील आपल्या विचारांशी समरस करण्याचा प्रयत्न करतो,त्यांना उपदेश देत सांगतो, हे मनुष्यजीवन अनमोल देणगी आहे,फार कष्टाने हा मनुष्यजन्म प्राप्त होतो,या नरजन्माचा सद्पयोग करायला हवा.आपल्याला सुखी व्हायचे असेल,मुक्ती मिळवायची असेल तर,श्रीविष्णूंची भक्ती करणे आवश्यक आहे.जीवनमुल्य मिळवण्या साठी,परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी विष्णूच्या भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही प्रल्हादचे सारे मित्र मंत्रमुग्ध व आश्चर्य चकीत होऊन ऐकायचे!
ही घटना ज्यावेळी त्याच्या गुरुजनां ना कळली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.ते अतिशय क्रूध्द झाले.हिरण्यकश्यपू सुध्दा फार कोपिष्ट झाला होता.सारेच विद्यार्थी विष्णूंच्या भजनी लागले होते,त्यामुळे आतां काय करावे हा मोठा बिकट प्रश्न त्यांना पडला होता.प्रल्हादला बोलावून रागवत म्हणाले अरे मुर्खा,प्रल्हादा हे तूं काय केलेस?याच विष्णूने वराहवतार घेऊन तुझा काका हिरण्याक्षला ठार केले,त्यामुळेच तुझे पिता विष्णूंचे शत्रू आहेत हे माहित नाही का? हे सर्व आठवून त्याचा संताप अनावर झाला.
अग्निही कांहीच करु शकला नाही
चित्तेच्या आगीतून सुखरुप बाहेर आला ह्या सर्व प्रकाराने तो बेभान झाला. झटकण उठून प्रल्हादचा दंड धरुन ओढत त्याला महालात आणले.ओरडून म्हणाला,अरे,ज्याचा वचक सर्व देवांवर आहे,अशा बलाढ्य राक्षसराजाचा पुत्र असून,माझ्या विरोधात जाऊन विष्णूच्या भजनी लागलास? त्याच्या गर्जनेने संपूर्ण पृथ्वी हलूं लागली.हे दुर्भाग्या,एवढे अफाट वैभव उपभोगायचे सोडून त्या विष्णूच्या ध्यानात मग्न झालास? परंतु पित्याच्या आरडाओरडीचा प्रल्हादवर कांहीच परिणाम झाला नाही.शांतपणे म्हणाला,मला तुमचे हे सारे अत्याचार सहन करण्याचे धैर्य विष्णूनेच दिलेत. वेळोवेळी त्यांंनीच माझे प्राणरक्षण केले. त्यांच्यामुळेच मला कांहीही इजा न होता, आपले सर्व प्रयत्न विफल झालेत.विष्णू च सर्वश्रेष्ठ आहे.मी,तुम्ही,संपूर्ण ब्रम्हांड, इतकेच काय…ब्रम्हदेवसुध्दा विष्णूंच्या शक्तीपुढे कमी आहे.ब्रम्हांडाचे खरे स्वामी विष्णूच आहे.
त्रिभूवनावर राज्य करणारा बलाढ्य राजा हिरण्यकश्यपूला त्याचा पांच वर्षाचा लहानसा मुलगा त्यालाच ब्रम्हज्ञान सांगतोय,त्याचा पारा चढला, त्याने कंठशोष करुन ओरडून विचारले, सांग कुठे आहे तुझा तो विष्णू?आकाशात?जमीनीवर?पाण्यात? की पाताळात?सांग…सांग कुठे आहे? शांत पणे प्रल्हाद उत्तरला,पिताश्री!भगवान विष्णू या जगाच्या चराचरांत,कणाकणात अणूरेणूमधे वसलेले असून त्यांनी अखिल ब्रम्हांड व्यापलेले आहे.सर्वव्यापी आहेत.पिताश्री,आपण एवढे संतप्त नका होऊ, भगवान विष्णूंना शरण गेल्यास आपल्या सर्व पापांचे क्षालन होईल.
झाले!त्याच्या क्रोधाग्नित तुपच पडले. भडकाच उडाला.भयंकर चिडून दात ओठ खात म्हणाला,तुझा विष्णू चराचरात भरुन आहे तर मग इथल्या कोणत्याही वस्तूत असायला हवा. या सिंहासनात?या फुलदाणीत? की या खांबात?होय पिताजी!या खांबात देखील भगवान विष्णू आहेत,हे ऐकताच हिरण्य कश्यपूने संपूर्ण शक्तीने त्या खांबाला लाथ मारली.अन् हातातील शस्रांनी खांबावर वार केलेत.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! भक्तप्रल्हाद !!!
भाग – १०.
हिरण्यकश्यपूने सर्वशक्तीनीशी खांबाला लाथ मारली व त्याचवेळी महा भयंकर आवाज झाला.एवढा महा पराक्रमी असूनसुध्दा त्या भयंकर आवाजाने दचकला.भयभित,दिड्ःमुढ होऊन बघत असतांनाच खांबाला मोठा तडा जाऊन भूकंप झाल्यासारखा त्या खांबाचे दोन भाग झाले व त्यातुन नरसिंहाच्या रुपाने भगवान विष्णू प्रकट झाले.त्यांचे शरीर मानवाचे,तर डोके सिंहाचे होते.त्या विशालकाय नरसिंहाचे डोळे निखार्या सारखे चमकत होते.जबडा जोरजोराने हलत होता.जीभ तलवारीच्या पात्या प्रमाणे लवलवत होती.भुवया आंकुचित, कान उभे,जबडा पहाडातील गुहेप्रमाणे, नाकपुड्या खोल विहिरीप्रमाणे भासत होते.शरीर पहाडासारखे धिप्पाड असून जणूं आकाशाला टेकले की,काय असे वाटत होते,त्यांना असंख्य हात होते.असे रुप बघीतल्यावर कितीही धैर्यवान, निर्भिड व्यक्ती असला तरी भयभीत होणारच ना?असे हे भयानक रुप खांबातून बाहेर आले.
परंतु हिरण्यकश्यपू त्यांच्याकडे एकटक बघत होता.अरे वाऽ हा तर महाविष्णू आहे.यानेच तर वराहरुप घेऊन माझ्या प्राणप्रिय बंधुला ठार केले होते.त्याने मनांत विचार केला,जर याला मी ठार केले तर,सगळे देवदेवता हतबल, असाहाय्य होतील,आणि विचार लागली च अमलांत आणला सुध्दा.त्याने नरसिंहा वर उडी घेतली.हिरण्यकश्यपू अचाट साहसी,पराक्रमी राक्षस असूनही भगवान नरसिंहासमोर त्याचे कांहीच चालले नाही
नरसिंहांशी मुकाबला म्हणजे पहाडाला टक्कर देणार्या छोट्याश्या चिमणी सारखी त्याची स्थिती झाली.गरुड सापा ला जसा पकडतो तसे भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूला लिलया पकडले.परंतु तो त्यांच्या तावडीतून निसटला.परत नर सिंहांनी त्याच्या दंडाला पकडून फरफटत दरवाज्याजवळलील उंबरठ्यावर नेले. आतां मात्र हिरण्यकश्यपू भितीने गर्भगळीत झाला.ओरडत क्षमायाचना करीत होता.पण त्याचे कांहीही न ऐकतां स्वतः नरसिंह उंबरठ्यावर बसले व त्याला मांडीवर आडवे झोपवले.त्याच्या पापाचा घडा भरला होता.
तेवढ्यात आकाशवाणी झाली. हे हिरण्यकश्यपा ऐक..नीट ऐक…तुला मिळालेल्या वरदानाप्रमाणे…आतां ना दिवस आहे ना रात्र,ही कातरवेळ म्हणजेच संध्याकाळची वेळ आहे.तू ना घरांत आहेस,ना बाहेर आहेस.तूं ना आकाशात,ना जमीनीवर,ना पाण्यात आहेस.तूं नरसिंहांच्या मांडीवर,उंबरठ्या वर आहेस. तुला मारणारा ना देव ना दानव,ना पूर्ण मानव,ना पूर्ण प्राणी आहे. तुला ना अस्राने,ना शस्राने मारणार,तुला नरसिंह नखाने मारणार आहे.आकाश वाणी पूर्ण होताच नरसिंहाने आपली तीक्ष्ण नखे हिरण्यकश्यपूच्या पोटात खुपसून आतडी बाहेर काढली व माळ करुन आपल्या गळ्यात घातली.अशा प्रकारे हिरण्यकश्यपूचा वध झाला.संपले एक भयानक पर्व!
आपल्या राजाचा असा भिषण अंत झालेला बघून त्याचे सैन्य नरसिंहा च्या अंगावर धावून लढू लागले.परंतु डोळ्याचे पाते लवते ना लवते,नरसिंहाने सर्वांचा संहार केला.सर्व राक्षस शत्रूंचा नाश करुन नरसिंह हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावर बसले.स्वर्गातून देवांनी त्यांचेवर पुष्पवृष्टी केली.गंधर्वांनी दिव्य गीते गायली.अप्सरा अत्यानंदाने नृत्य करुं लागल्या.पृथ्वीवर सगळीकडे आनंदीआनंद झाला.परंतु नरसिंह अजून ही शांत होत नव्हते.प्रत्यक्ष लक्ष्मीसुध्दा त्यांच्याजवळ जायला घाबरत होती.ते भयंकर गर्जनेसह डरकाळ्या फोडीत आणि चित्कार करीत आपला संताप व्यक्त करीत होते.डोळ्यांतून भयानक ज्वाळा निघत होत्या.त्यांना शांत करण्या चे कोणालाही साहस होत नव्हते,शक्य पण नव्हते.देवादिकांनीही माघार घेतली. संतप्त नरसिंहाला कसे शांत करावे हाच सर्वांना पेच पडला.
अखेर इंद्रदेव प्रल्हादला म्हणाले, बाळ प्रल्हादा! नरसिंहाचा राग शांतवण्या साठी आतां तूंच कांहीतरी कर!इंद्रदेवांचे म्हणणे ऐकून छोटासा प्रल्हाद भक्तीभावा ने हळूहळू नरसिंहाकडे गेला आणि नत मस्तक होऊन भगवान विष्णूंचे गुणगान, स्तुती करुं लागला.त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले.त्या गोंडस व सुंदर अबोध प्रल्हादला बघून व त्याच्या कोमल स्पर्शाने नरसिंह हळूहळू शांत तर झालेच पण क्रोधाची जागा प्रेमाने घेतली.त्यांच्या गुरगुरणे डरकाळ्या बंद झाले. त्यांनी अतिशय प्रेमाणे प्रल्हादला जवळ घेतले. मांडीवर बसवून ममतेने त्याच्या मस्तका वरुन,पाठीवरुन हात फिरवला.देवांनी श्री विष्णूंचा जयजयकार करुन स्तुती आरंभली.
ब्रम्हदेवाकडून हिरण्यकश्यपूने जो वर प्राप्त केला होता,त्याचे भगवान नरसिंहांने काटेकोर पालन केले.नरसिंहा च्या प्रेमळ स्पर्शाने प्रल्हाद सद्गदित झाला गालावरुन आनंदाश्रू ओघळू लागले. त्याचे सारे दुःख,कष्ट,भोग संपले होते…
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १०-१२-२०२१.
!!! भक्तप्रलाहाद !!!
अंतिम भाग -११.
सद्गदित स्वरांत नरसिंहाचे स्तवन करुन प्रल्हाद म्हणाला, हे भगवंता!तुम्ही कृपाळू आहांत,सर्व विश्वाचे रक्षणकर्ते आहांत.देवांना सुध्दा तुमचा महिमा अगम्य आहे.तुम्ही अन्याय,अत्याचाराचा नायनाट केलाय,मग आतां क्रुध्द कां?देवा कृपया क्रोध सोडा व न्यायाचे रक्षण करा. प्रल्हादची कळकळीची विनवणी,स्तुती ऐकून नरसिंह संतुष्ट,प्रसन्न होऊन,शांत झाले.आणि नरसिंहांनी विष्णूचे सुमेर रुपात त्याला दर्शन दिले.म्हणाले,प्रल्हादा मी तुझ्यावर प्रसन्न झालोय!तुला वाटेल तो वर माग! अतिशय नम्रपणे प्रल्हाद म्हणाला,परमेश्वरा!मला दुसरे कांहीही नको.माझ्या ह्रदयात सदैव तुझ्याविषयी श्रध्दा आणि भक्ती अधिक दृढ होवो, इतकीच इच्छा आहे.तथास्तु!
नंतर प्रल्हादला राजसिंहासनावर बसवून म्हणाले,काही वर्षे इथे न्यायाचे राज्य कर!प्रजेला पुत्रवत प्रेम देऊन त्यांचे दुःख,दारिद्र्य नाहीसे करुन त्यांना आनंद दे.शेवटी तूं माझ्यात विलिन होशील. असा आशिर्वाद व वर देऊन,भगवान नरसिंह अंतर्धान पावले.
त्यानंतर त्रैलोक्याधिपती प्रल्हादने आपल्या सद्चारणाने व सद्गुणांनी फार लोकप्रिय झाला.अशा पुण्यवान,सात्विक राजाच्या प्रशासनात त्रैलोक्य सुखी झाले. सर्वत्र शांतता व सुव्यवस्था नांदत होती. त्याच्या शुध्द आचरणाने व चारित्र्यामुळे त्याला अफाट शक्ती प्राप्त झाली.इंद्राला जिंकून त्यांची राजधानी अमरावती हिचा ही समावेश प्रल्हादने आपल्या राज्यात केला.इंद्राजवळ कांहीच शिल्लक उरले नाही,तेव्हा देवांचा गुरु ब्रम्हदेवाकडे जाऊन म्हणाले,गुरुदेव! जगांत जे सर्वात चांगले आहे ते मी कसे प्राप्त करु?ब्रम्हदेव म्हणाले,ज्ञान म्हणजेच मुक्तीचा सर्वात श्रेष्ठ मार्ग! मग त्या प्राप्तीकरितां मी काय करावे? राक्षसांचा गुरु शुक्राचार्याकडे जा!
शुक्राचार्यांकडे जाऊन इंद्रदेव मुक्तीचा मार्ग शिकल्यावर त्यांनी विचारले गुरुदेव! याहून एखादी श्रेष्ठ गोष्ट आहे कां शुक्राचार्य म्हणाले,ज्या प्रल्हादने तुझा पराभव करुन तुझे राज्य जिंकले तोच तुला सांगु शकेल.ब्राम्हणरुप धारण करुन इंद्रदेव प्रल्हादच्या राजदरबारात गेले.प्रल्हादने त्यांचे यथोचित स्वागत करुन विचारले, हे विप्रा! आपण काय इच्छा धरुन माझ्यासारख्या पामराकडे आलात?हे राक्षसराज प्रल्हादा!अशी कोणती सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे,ज्यामुळे मला परमश्रेय मिळेल? ते मला शिकव! हे ब्राम्हणश्रेष्ठा!मला त्रिलोकाचे राज्य चालवायचे असते,शिवाय आणखीही बरीच कामे असल्यामुळे,मला वेळ नाही इंद्राने कांही पिच्छा सोडला नाही.शेवटी इंद्राच्या विनंतीला मान देऊन शिकवाय ला सुरुवात केली.अशाप्रकारे इंद्रदेव भक्त प्रल्हादचे शिष्य बनले.इंद्राने आपला गुरु प्रल्हादची अविरत सेवा केल्यामुळे प्रल्हाद प्रसन्न झाला.एके दिवशी प्रल्हादला खुशीत बघून,इंद्राने विचारले,हे राजन!हे त्रैलौक्य कसे जिंकले?याचे रहस्य काय आहे? साध्या सरळ,सालस प्रल्हादला इंद्राला आपले स्थान पटकावयाचे आहे हा धूर्त डाव कळला नाही.
साधेपणाने प्रल्हाद म्हणाला,हे विप्रा ऐक!मी माझ्या विशुध्द चारित्र्या मुळे त्रैलोक्यावर विजय मिळवू शकलो. मी स्वतःची कधीही स्तुती करीत नाही की,गर्वाने फुगतही नाही.गुरुजनांची सेवा करतो,वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करतो. मी सर्व इंद्रीयांवर विजय मिळवला आहे त्यामुळे मला सर्वश्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे आपल्या शिष्याच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानप्राप्ती ची लालसा,जिज्ञासा बघून प्रल्हादला त्याच्याबद्दल ममत्व निर्माण होऊन आदर वाटला.प्रसन्न होऊन इंद्राला वर मागण्यास सांगीतले.
आनंदीत झालेले धूर्त इंद्र म्हणाले, हे राजन!तूं खरोखरच प्रसन्न झाला असशील तर,तुझे शुध्द चरित्र मला दे! हे ऐकून प्रल्हाद स्तब्ध,विचारमग्न झाला. कारण त्याचे विशुध्द चारित्र्य एकदां का दिल्या गेले तर,त्याचे पद,पराक्रम एकदम नाहीसे,नष्ट होईल हे पूर्ण जाणूनही तो दिलेल्या वचनाला बांधील होता.त्याने तथास्तु म्हटले.
ब्राम्हणाला प्रल्हादजवळचे शुध्द चारित्र्य,सद् व्यवहार,सत्य, शक्ती इंद्राला मिळाली.तरी प्रल्हादला विशाद वाटला नाही की,दुःख झाले नाही.अतिशय शांत चित्ताने प्रल्हाद नरसिंहासमोर जाऊन त्यांच्या रुपात विलिन झाला.
भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्मुनही आपल्या उत्कट भक्तीने साक्षात विष्णूला अवतार घ्यायला भाग पाडले.देवांचा राजा इंद्रालाही ज्ञानप्राप्ती साठी प्रल्हादची याचना करावी लागली, शिष्यत्व पत्करावे लागले.भक्त प्रल्हाद एक आदर्श राजा होता.भगवंतावरील निष्ठेपायी प्रत्यक्ष पित्याचाही त्याग केला.
राज्यापासून वंचित व्हावे लागले तरी आपल्या वचनपूर्तीसाठी इंद्राला शील प्रदान केले.
तात्पर्य हेच की,उच्च कुळात किंवा कनिष्ठ कुळात जन्मने महत्वाचे नाही, किंवा आयुष्य किती आहे हेही महत्वाचे नाही तर विशुध्द मन आणि निष्कलंक चारित्र्यच सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्या आचरणाने भक्त प्रल्हादने जगाला दाखवून दिले.
अशा या सद्चरित्र महान भक्ताला कोटी कोटी प्रणाम!
!! समाप्त !!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.




