आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

भक्त प्रल्हाद संपूर्ण भाग २, (५ ते ८)
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
प्रल्हाद
भक्त प्रल्हाद
!!! भक्तप्रल्हाद !!!
भाग – ५.
आपल्या राजाच्या मनःस्थितीचे कारण ऐकल्यावर सेनापती म्हणाला, महाराज!विष्णूंचा सूड घ्यायचा तर, त्याला त्याच्या विष्णूलोकांतून बाहेर काढणे अगत्याचे आहे.आणि त्यासाठी त्याच्या भक्तांना छळणे,त्रास देणे गरजेचे आहे.आपल्या भक्तांचा होत असलेला छळ,अन्याय बघून विष्णूदेव नक्कीच बाहेर येतील.सेनापतीचा सल्ला पटल्याने हिरण्यकश्यपूच्या आदेशाने विष्णूभक्तां वर अन्याय,अत्याचार करण्याचा सपाटा सेनापतीने सुरु केला.विष्णूभक्त त्याच्या अन्याय,अत्याचाराने पिळले जात होते. त्यांना दहशतीमुळे कुठेही जातां येतां येत नव्हते.एकीकडे हिरण्यकश्यपूचा संपूर्ण पृथ्वीवर आतंक माजला होता.विष्णू भक्तांना अमानुषपणे मारहाण करुन अनन्वित छळ सुरु होता,तर दुसरीकडे मात्र त्याच्याच स्वतःच्या घरांत एक महान विष्णूभक्त त्याच्या व पत्नी कयाधूच्या पोटी जन्माला येणार होता.आपल्याला पुत्र प्राप्ती होणार या नुसत्या कल्पनेनेच तो अतिशय हर्षित झाला होता.
दिवस,महिने जात होते.एकीकडे हिरण्यकश्यपूचे लोकांवरील अत्याचार सुरु होते तर,दुसरीकडे त्याचे जमा झालेले पाप कयाधूच्या पोटी भरत आले होते.यथायोग्यवेळी कयाधूने एका सुंदर, गोंडस बाळाला जन्म दिला.तिने त्याचे नांव प्रल्हाद ठेवले.पुत्रप्राप्तीचा आनंद हिरण्यकश्यपूलाही झाला असला तरी त्याचे लोकांवरील अन्याय,अत्याचार थांबले नव्हते.
हिरण्यकश्यपने आता स्वर्गावर विजय मिळविण्याचे ठरविले.आपल्या राक्षसराज्यावर देवांनी केलेल्या आक्रमणाचा त्याला सूड घ्यायचा होता. ब्रम्हदेवांकडून मिळालेल्या वरदानामुळे उन्मत्त हिरण्यकश्यपची शक्ती शतपटीने वाढली असल्यामुळे,देवांना राक्षसांचा पडाव करणे अशक्य झाले.राक्षससेना देवांवर तुटून पडली.घाबरुन देव पळून गेले.माझ्या अपरोक्ष माझे राज्य नष्ट केले होते,अरे पळपुट्या देवांनो आतां कुठे पळताहात?
देवांवर विजय मिळाल्यामुळे हिरण्यकश्यपूचा गर्व आणखी वाढला. त्याने स्वर्गाप्रमाणेच,पाताळ आणि भूलोकावरही आपले साम्राज्य स्थापित केले.स्वतःला तो प्रतिदेवच समजूं लागला.कयाधू जरी राक्षसपत्नी असली तरी ती अत्यंत सोज्वळ,विनयशील आणि संस्कारी होती.पती हिरण्यकश्यप च्या अपरोक्ष त्याच्या चोरुन ती विष्णूंची भक्ती करीत असे.प्रल्हादच्या जन्मानंतर या भयान राक्षसनगरीत आपल्याला जवळचे कुणी तरी आहे,कुणाचातरी आधार निर्माण झाला असे तीला वाटूं लागले.प्रल्हादवर उत्तम संस्कार करणे, त्याचे संगोपन करीत योग्य रितीने घडविणे,त्याच्याशी खेळणे यांत तीला दिवस अपूरा पडूं लागला.
एके दिवशी पतीचा चांगला मूड बघून,कयाधू म्हणाली, महाराज!आपला प्रल्हाद आतां पांच वर्षाचा झाला.त्याच्या यथायोग्य शिक्षणाची व्यवस्था लावायला हवी ना? होय देवी!बघ पाहतां पाहतां आपला प्रल्हाद पांच वर्षाचा कधी झाला कळलेही नाही.त्याला शिक्षणासाठी पाठवणे गरजेचे आहे.प्रल्हादला बोलावून विचारले, बाळ प्रल्हाद!सांग बरे,या पृथ्वी चा पालनकर्ता कोण आहे?विनाविलंब प्रल्हाद उत्तरला,पिताश्री,या सृष्टीचा पालनकर्ता भगवान विष्णू आहे.हे ऐकून हिरण्यकश्यपूला राग तर अनावर झाला, पण आपला राग आवरुन,प्रल्हादला समजावत म्हणाला, हे बघ बाळा,या सृष्टीचा पालनकर्ता विष्णू नसून मी आहे आणि तुला हेच शिकण्याकरितां शुक्राचार्यांच्या आश्रमात पाठवत आहे.
शुक्राचार्यांच्या आश्रमात प्रल्हाद शिक्षणाकरितां पोहचला,त्यावेळी शुक्राचार्य तपश्चर्येसाठी दुसरीकडे अरण्यात गेलेले असल्यामुळे,त्यांचे पुत्र शुंडी व अर्मक यांचेवर प्रल्हादच्या शिक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली
हे दोघे भाऊ प्रल्हादला शिक्षण देऊ लागले.त्याच्या मनावर,विष्णू कसे राक्षसांचे शत्रू आहेत,त्यांनी तुझ्या काकाचा वध केला,तुझ्या पित्याच्या अपरोक्ष हल्ला करुन राक्षसराज्य कसे नष्ट केले होते,आणि आज सर्वश्रेष्ठ तुझे पिताश्रीच आहे,या सृष्टीचे नियंता तेच आहेत असे विचार सतत बिंबवण्याचा प्रयत्न करीत होते.पण कट्टर विष्णूभक्त प्रल्हादला पटत नव्हते.त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते.ब्रम्हदेवां कडून वरदान प्राप्त करुन घेतले म्हणजे
पिताश्रींना वाईट कृत्ये करण्याचा परवाना मिळाला कां?त्यांना कोणीच शिक्षा करुं शकणार नाही कां?वास्तविक श्रीविष्णू तर ब्रम्हदेवांचे सुध्दा स्वामी आहेत.विश्वकल्याणार्थ ते आपला कृपा वर्षाव सर्वत्र करीत असतात.आणि प्रल्हाद आपले असे विचार गुरुंना व सोबतच्या विद्यार्थ्यांनाही बोलून दाखवत.
त्यामुळे प्रल्हाद आपल्या आटोक्याबाहेर आहे हे शुक्राचार्यांच्या पुत्रांना समजले.ते प्रल्हादच्या विचारांत परिवर्तन करण्यास असमर्थ ठरले.ते प्रल्हादला समजावून समजावून हतबल झालेत.त्याच्यात कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणावे,त्यांना मार्ग सांपडत नव्हता.म्हणून….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ९-१२-२०२१.
!!! भक्तप्रल्हाद !!!
भाग – ६.
अखेर शुक्राचार्यपुत्र शुंडी व अर्मक हिरण्यकश्यपूकडे जाऊन,प्रल्हाद आमच्या समजावण्यापलिकडे आहे, हर प्रकारे त्याला समजावले पण तो विष्णूंना च सर्वश्रेष्ठ मानतो.हे ऐकून हिरण्यकश्यप अतिशय क्रोधीत झाला.
इकडे प्रल्हाद मात्र नेहमीच आश्रमातील एका झाडाखाली बसून, ॐ विष्णवे नमः। ॐ नारायणाय नमः असा जप करीत असे.त्याची ही साधना बघून आश्रमातील इतर शिष्य प्रभावित होऊन, कुतुहलाने त्याच्यासमोर येऊन बसत.मग प्रल्हाद त्यांनाही श्रीविष्णूंचा जप करायला सांगत.मग शिष्यही त्याचे अनुकरण करीत असत.एके दिवशी एका मित्राने प्रल्हादला विचारले,प्रल्हादा!तू सदैव विष्णूंचा जप-साधना करतोस,तुला कधी त्यांचे दर्शन घडले कां?होय मित्रा! जगात प्रत्येक वस्तूमधे विष्णूंचे वास्तव्य आहे.इथल्या चराचरामधे विष्णूंचे दर्शन घडते.मग आम्हालाही दर्शन घडेल का? कां नाही?तुम्हीही मनोभावे विष्णूंचे नामस्मरण केले तर नक्की दर्शन घडेल.
प्रल्हादच्या सांगण्यावरुन आश्रमातील सारे शिष्य श्रीविष्णूंच्या नामस्मरणांत मग्न झाले.कांही दिवसांनी शुक्राचार्य तपश्चर्या संपवून आश्रमात परतल्यावर त्यांना त्यांचे पुत्र शुंडी आणि अर्मकाकडून प्रल्हादचे कारणामे कळले. त्यांना अतिशय क्रोध आला.त्यांनी प्रल्हादला बोलावून ताकीद दिली.आतां पर्यत जे झाले ते जाऊ दे,पण यानंतर तूं या आश्रमात विष्णूंचे नामस्मरण करायचे नाही की नावही घ्यायचे नाही.पण गुरुदेव नम्रपणे प्रल्हादने विचारले,मी श्रीविष्णूंचे नामस्मरण कां करायचे नाही?कारण विष्णू राक्षसांचा शत्रू आहे.त्यांनी तुझ्या काकांना म्हणजे हिरण्याक्षला धोक्याने ठार केले.यावर शांतपणे प्रल्हाद म्हणाला गुरुदेव!काकांनी पृथ्वीलाच विश्वसागरांत फेकून दिल्यावर तीच्या रक्षणार्थ विष्णूंनी त्यांना ठार केले होते,तर त्यांंचा काय दोष काय चुकले?भगवान विष्णू तर पृथ्वीचे पालनकर्ते असल्यामुळे तिचे रक्षण करणासच ना?प्रल्हादच्या सुसंगत बोलण्यावर शुक्राचार्य निरुत्तर झाले.
बरेच दिवसांपासून प्रल्हाद आश्रमात शिक्षण घेत असल्यामुळे, त्याची कुठवर प्रगती झाली हे जाणण्या च्या दृष्टीने हिरण्यकश्यपूने प्रल्हादला बोलावणे पाठविले.
निरोप मिळाल्यानुसार, स्वतः शुक्राचार्य प्रल्हादला घेउन हिरण्यकश्यप कडे आलेत.बरेच दिवसांनी आपल्या पुत्राला बघीतल्यावर,हिरण्यकश्यपूला अतिशय आनंद झाला.त्याने जवळ बोलावून प्रल्हादला कुरवाले.पाठीवरुन प्रेमळ हात फिरवत शुक्राचार्यांना विचारले, गुरुवर!आमचा पुत्र प्रल्हादची आश्रमातील प्रगती कशी आहे?
हिरण्यकश्यपच्या प्रश्नाने शुक्राचार्य बुचकाळ्यांत पडले.काय उत्तर द्यावे या संभ्रमात पडले.खरे बोलावे तर, हिरण्यकश्यपाच्या क्रोधास बळी पडावे लागेल,म्हणून मोघम उत्तरले,महाराज! प्रल्हाद अद्याप लहान आहे.सध्या त्याला नीट आकलन होत नाही,तो थोडा मोठा झाला की,योग्यवेळी कळेल त्याला सर्व!
शुक्राचार्य आश्रमात येण्यापूर्वी शुंडी आणि अर्मकने प्रल्हादचे लक्ष विष्णू नामापासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने नवनवीन विषय शिकवले.राज्यकारभारा विषयीचे सिध्दांत,शत्रूला शांततापूर्वक मार्गाने पराजित करण्याचे तंत्र,दुसर्यांना प्रसन्न करण्यासाठी भेटीदाखल बक्षिसे देण्याची रीत,शत्रूंमधे आपापसांत भांडणे लावण्याचे सूत्र,शिवाय अस्रे चालवण्याचे शिक्षण दिले.आणि मुळातच तल्लख असलेल्या प्रल्हादने अल्पावधित सारे आत्मसात केलेले बघून त्याच्या गुरुजनां ना समाधान वाटले.या सर्व प्रकारच्या अभ्यासात गुंतल्यामुळे प्रल्हादचे चित्त भगवान विष्णूपासून दूर गेले असेल, परावृत्त झाले असेल असे वाटले.तरी त्याला हिरण्यकश्यपूकडे पाठवण्यापूर्वी प्रल्दादची आई कयाधूकडे घेऊन गेले. इतक्या दिवसांनंतर आलेल्या आपल्या लाडक्या पुत्राचे कयाधूने प्रेमभराने स्वागत करुन त्याला प्रेमाने न्हाऊमाखू घातले.योग्य मार्गदर्शन करुन पित्याकडे पाठवण्यास तयार केले.
ज्यावेळी शुक्राचार्य हिरण्यकश्यपू ला म्हणाले प्रल्हाद मोठा झाल्यावर त्याला सर्व समजेल त्यावर हट्टी हिरण्य कश्यपू म्हणाला होता, गुरुवर! प्रल्हाद आमचा पुत्र आहे.त्याची प्रगती कुठवर आहे हे जाणण्याची आताच आमची इच्छा आहे.प्रल्हादला बोलावून म्हणाला, बाळ प्रल्दाद! सांग बरे!तूं सर्वात उत्तम ज्ञान कोणते शिकलास? प्रल्हादने वाकून नमस्कार करत नम्रपणे म्हणाला, बाबा! कानाने विषाणूंचे नांव ऐकणे,मुखात त्यांचेच नांव,अंतःकरणात त्यांचाच ध्यास आणि त्यांचीच पूजा करणे,त्यांच्यासमोर नतमस्तक होणे,त्यांची सेवा करणे,आणि आत्यंतिक श्रध्देने त्यांच्याच पायी समर्पित होणे,हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान होय.या विश्वाचे पालनकर्ते आणि रक्षणकर्ते भगवान विष्णूच आहेत.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ९-१२-२०२१.
!!! भक्तप्रल्हाद !!!
भाग – ७.
आपला पुत्र प्रल्हादच्या तोंडून विष्णूस्तुती ऐकली मात्र,हिरण्यकश्यपू च्या सर्वांगाचा भडका उडाला.क्रोधारिके तेने नुसता वेडापिसा झाला. आपला पुत्र असून,राक्षसकुळाचा असून,आज आपले तिन्ही लोकांवर राज्य प्रस्थापित केलेला सर्वश्रेष्ठ राक्षसराजा असून याने आपल्याला डावलून,अनादर करुन, आपला कट्टर शत्रू विष्णूच्या भजनी लागावे,क्षणभर तो हतबध्द झाला.काय करुं नी काय नको असे त्याला झाले. आणि एकदम कठोर निर्णय घेतला.हा कुलघातक,कुळाला कलंक असलेला कुळनाशकालाच नष्ट करावे.संतापातिरे काने त्याने शुक्राचार्य त्यांच्या दोन्ही पुत्रां ना बोलावून कडाडला,कपटी ब्राम्हणांनो तुम्ही माझ्या मुलाला शत्रूहिताच्या गोष्टी सांगून माझ्याविरुध्द भडकावले.त्याचा सत्यानाश केला.शत्रूपक्षाला सामील झाला असून,माझा धाक,भीती सुध्दा वाटेनाशी झाली ना?गरीब बिचारे दोघेही दुःखाने,भितीने भरुन गेले.कारण त्यांनी शक्य तेवढे आटोकाट प्रयत्न व मत परिवर्ततन केले होते.भीतीने गर्भगळीत होऊन म्हणाले,महाराज!आम्हाला क्षमा करा!अनुग्रह करा.प्रल्हादला आम्ही असे कांहीच शिकवले नाही.उलट विष्णूदेव आपला शत्रू आहे हेच त्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला.त्याचे मन दुसरीकडे वळावे,त्याला विचार करायला वेळ मिळू नये म्हणून इतर अभ्यास शिकवला.पण राजकुमार प्रल्हादचे म्हणने की,हे सर्व ते स्वतःच शिकले. आम्ही आपल्याविरुध्द कपट केले असे म्हणून आमच्या निष्ठेला कलंक नका लावू महाराज!
त्यांचे स्पष्टीकरण ऐकुन हिरण्य कश्यपू थोडा निवळला व आपला रोख प्रल्हादाकडे वळवला.अरे मुर्खा, तूं या सर्वश्रेष्ठ त्रिभूवन विजेता राक्षस राजाचा पुत्र असून ह्या अपवित्र गोष्टी कुठुन शिकलास? पिता एवढे संतापदग्ध असून प्रल्हादच्या मनी भितीचा लवलेशही नव्हता.शांतपणे म्हणाला,पिताश्री, मी जे कांही आतांं बोललो हे मला कुणीच शिकवले नाही.अपवित्र तर मुळीच नाही. मी इतरांहून भिन्न आहे हेच मानने चुक आहे.मला हे ज्ञान भगवान विष्णूंमुळेच प्राप्त झाले आहे.
एवढा बलाढ्य,त्रिभूवन विजेता राक्षसराजाचा पूत्र असून आपले महत्व न जाणतां शत्रूलाच श्रेष्ठ समजतो हे बघून हिरण्यकश्यपचा संताप अनावर झाला.तूं माझा पुत्र असून,माझा कट्टर शत्रू विष्णूं चा जयजयकार करतांना तुला कांहीच कसे वाटत नाही.तू माझा मुलगा असल्या ची लाज वाटते.दूर हो माझ्या नजरे समोरुन…असे म्हणून शिपायांना आदेश दिला,शिपायांनो!या अपशकुनी, कुलक्षणी कारट्याला आताच्या आता जंगलात नेऊन त्याचा शिरच्छेद करा. शरीरांत रोग उत्पन्न झाला की, त्याचा जसा समुळ नायनाट करण्यासाठी उपचार करावा लागतो,तद्वतच हा शापित पुत्र या थोर कुळात उत्पन्न झाल्यामुळे वेळीच उपाय केला नाही तर संपूर्ण राक्षसकुळच नष्ट व्हायचय!
अवाढव्य शस्रसज्ज राक्षसांना ती भयानक राजाज्ञा ऐकून अतिशय आश्चर्य वाटले.राजकुमारची हत्या? परंंतु राजाज्ञा मोडण्याचे धाडस त्यांंच्यात नव्हते.विष्णू नामांत दंग असलेल्या छोट्या प्रल्हादच्या शरीराला त्यांनी भाल्याने टोचले,पण नामस्मरणांत मग्न प्रल्हादवर कांहीच परिणाम झाला नाही की,घायलही झाला नाही.शेवटी हिरण्यकश्यपूच्या आज्ञेनुसार शिपायांनी प्रल्हादला घनदाट अरण्यात नेले.एवढ्या छोट्या बालकाचा वध करण्याचे मन शिपायांचे होईना,म्हणून त्याला एका झाडखाली बसवून प्रेमाने विचारले,राक्षसांचा शत्रू विष्णूंचे सतत नांव घेतोस असे काय आहे त्या विष्णूत?
अरे सैनिका! या विश्वात असे कांहीच नाही जे भगवान विष्णूत नाही. सारे ब्रम्हांड विष्णूत समावले आहे.
हे ऐकून संतापाने ओरडून शिपाई म्हणाला,तुझ्यावर दया दाखवण्यात कांहीच अर्थ नाही.तुला ठार करण्या वाचून गत्यंतर नाही,असे म्हणून,शांतपणे डोळे मिटून नामस्मरण करीत असलेल्या प्रल्हादच्या मानेवर तलवारीचा घाव घातला…अरे हे काय? भक्त प्रल्हादच्या अंगावर साधा ओरखडाही उमटला नाही. शिपायांनी अनेक वेळा प्रयत्न केला पण व्यर्थ!शेवटी कंटाळून भक्त प्रल्हादला परत राजवाड्यात आणून हिरण्यकश्यपू समोर उभे करण्यांत आले.प्रल्हाला जिवंत बघून अतिशय क्रोधाने शिपायांना विचारले हा कारटा अजून जिवंत कसा? मस्तक झुकवून नम्रपणे शिपाई म्हणाला, अनेक वेळा प्रयत्न करुनही याचेवर कांहीच परिणाम न झाल्याने परत आपल्या समोर राजवाड्यात आणले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! भक्तप्रल्हाद !!!
भाग – ८.
हे ऐकून हिरण्यकश्यपूची मती गुंग झाली.पंरतु दुसर्याच क्षणी प्रल्हाद ला हत्तीपायी देण्याची आज्ञा दिली.राजा ची ही क्रूर आज्ञा ऐकून सर्वजण चळाचळा कापू लागले.प्रल्हाद मात्र या सर्व प्रकारापासून अनभिन्न विष्णूनामांत दंग होता.चेहर्यावर भितीचा लवलेशही नव्हता.अवाढव्य हत्ती आणल्या गेला व आणलेल्या हत्तीने प्रल्हादवर झेप घेतली पण काय आश्चर्य!प्रल्हादला कांहीच इजा झाली नाही.हे सर्व पाषाणह्रदयी क्रूर हिरण्यकश्यपू बघत होता.प्रल्हादला जिवंत बघून त्याच्या जीवाचा नुसता तिळपापड झाला.हा स्वतःचा मोठाच अपमान समजून त्याला मोठ्या नदीत खोलवर फेकून देण्याचा आदेश दिला. पण एवढासा प्रल्हाद आनंदाने एवढ्या मोठ्या नदीपात्रात विष्णूचे नामस्मरण करत आनंदाने पोहत राहिला.
हिरण्यकश्यपूला हे सारे असह्य झाले.एवढ्याशा मुलाला आपण मारु शकत नाही याचे त्याला फारच वैष्यम्य वाटले.पण कांही झाले तरी,कोणत्याही प्रकारे प्रल्हादला नष्ट तर करायचेच या निश्चयाने,त्याने शिपायांना आदेश दिला, याला उंच कड्यावरुन फेकून द्या.आदेशा नुसार शिपायांनी प्रल्हादला एका उंच कड्यावर नेऊन ढकलून दिले.त्यावेळी सुध्दा पडतांना प्रल्हादचा विष्णूनामजप ॐ विष्णवे नमःचा जप सुरु होता.हा आतां वाचूच शकणार नाही,या विचारात शिपाई असतांनाच,त्यांना जे दिसले ते पाहून तर त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही.प्रल्हाद जमीनीवर पडण्या आधीच खाली ब्राम्हणरुपात उभे असले ल्या विष्णूदेवांनी त्याला अलगद आपल्या हातावर झेलले.हसतमुखाने परत आणलेल्या प्रल्हादला पाहून तर हिरण्य कश्यपू क्रोधाने वेडापिसाच झाला.
आत्यांतिक क्रोधाने प्रल्हादला एका अंधार्या कोठडीत ठेवून त्याचेवर भयानक विषारी साप सोडण्याचा आदेश दिला.आदेशाचे तात्काळ पालन झाले. केवळ पांच वर्षाचा भक्त प्रल्हाद मात्र एकचित्ताने श्रीविष्णू नामस्मरणांत दंग होता.आणि नामस्मरणाच्या लयीवर ते विषारी साप तल्लीन होऊन डोलू लागले. आणि कांही वेळाने निघूनही गेले.
बराच वेळ झाला तरी प्रल्हादचा रडण्या ओरडण्याचा आवाज न आल्याने शिपायांनी आत येऊन बघीतले असतां, तो नामस्मरणांत दंग ,सुखरुप बघून व साप नाहीशे झालेले पाहुन त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली.त्यांनी प्रल्हादला हिरण्यकश्यपूकडे आणले. विषारी सापांनीही प्रल्हादला दंश केला नाही,हे बघून त्याला अत्यंत जहाल विष पाजण्याचा आदेश दिला.
आज्ञेचे तुरंत पालन झाले.एका वाडगाभर दुधात अतिशय जळजळीत विष मिसळून त्याला प्यायला दिले.भक्त प्रल्हादने श्रीविष्णूंचे नांव घेऊन आनंदाने ते विषयुक्त दुध घटाघटा पिऊन टाकले. त्या जहाल विषाचाही प्रल्हादवर कांहीच परिणाम झाला नाही हे वृत्त ऐकून हिरण्य कश्यप नुसता थयथयाट करुं लागला.
हिरण्यकश्यपूची कोणतीच अघोरी युक्ती प्रल्हादास मारण्यास सफल होत नसल्यामुळे त्याचा संताप अनावर झालेला बघून त्याच्या मंत्र्याने उकळत्या तेलात टाकण्याचा सल्ला दिला.त्या प्रमाणे भल्या मोठ्या कढईत तेल उकळा यला ठेवायची आज्ञा केली.आणि त्या उकळत्या तेलात प्रल्हादला टाकण्यात आले.अविरत विष्णूंच्या नामस्मरणांत गर्क प्रल्हादवर उकळत्या तेलाचाही कांही परिणाम झाला नाही.उकळते तेल त्याला थंड पाण्यासारखे भासले.आगीच्या ज्वाळा त्याला मखमली कमळासारख्या भासत होत्या.शिपायांनाही कमळ दिसले व आग विझली.शिपायांनी हात टेकले. आणि प्रल्हादला परत हिरण्यकश्यपूकडे नेले.
प्रल्हादला मारण्याचे अनेक जालीम उपाय करुनही त्याचेवर कांहीच परिणाम होत नाही.हतबध्द झालेला हिरण्यकश्यपू सुन्न मनःस्थितीत निराशाने ग्रासलेल्या अवस्थेत एकटाच महालात बसला असतां,त्याची बहिण होलीका येऊन म्हणाली,अरे दादा!असा निराश कां होतो तुझ्या निराशेवर माझ्याकडे जालिम उपाय आहे.कोणता उपाय होलीका?
अरे दादा,तूं विसरलास कां?मला अग्नी कांहीही करुं शकत नाही असे वरदान आहे.मी प्रल्हादला मांडीवर घेऊन चित्तेवर बसते.तूं चित्ता पेटव,तुझ्या सर्व समस्यांचे निराकरण होईल.होलिकेच्या युक्तीने त्याला अतिशय आनंद झाला. तात्काळ चित्ता रचण्याचा आदेश दिला. आदेशानुसार रचलेल्या चित्तेवर गोड गोड बोलून प्रल्हादला मांडीवर घेऊन होलिका चित्तेवर बसली.त्या पांच वर्षाच्या अजान निरागस बालकाला काय कल्पना? तो विष्णूनामस्मरण करत आत्याच्या मांडीवर निर्धास्तपणे बसला….
क्रमशः संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.




