आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

अभिनव रामायण संपूर्ण भाग ८, (३६ ते ४१)
……रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल…..
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
अभिनव रामायण
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ३६.
असा हा रावण रामाबरोबर युध्द करतांना पराभूत झाल्यावर राम सहज त्याला ठार करुं शकले असते!पण जखमी रावणाला विश्रांती घेऊन परत युध्दास यायला सांगीतले.रामांनी जर त्याला सरळ मारले असते तर,रावणाचा अहंकार जोपासल्या गेला नसतां.रामांनी त्याला न मारतां सोडले,कारण त्याला चुक दुरुस्त करण्याची संधी द्यायची होती त्याला हुतात्मा करायचे नव्हते.रावण शंकराचा मोठा भक्त होता.राम सुध्दा तेवढेच मोठे होते.येथे दोन महान व्यक्तीं मधील राजनीतीचा संबंध आहे.सैनिकी संदर्भातुन पाहतां रामांनी लंकेभोवतीचा पाश सैल केला नव्हता.याहुन महत्वाचे म्हणजे,देव,दानवांना परास्त करुन सर्व विश्व जिंकणारा रावण एका पदातीत व्यक्तीकडुन पराभूत झाला नव्हता तर, जगज्जेत्या रावनाची केविलवाणी माघार मृत्युपेक्षा जास्त नैतिक धैर्य खचवणारी होती.हा रावणाच्या अहंकाराचा उपमर्द होता.एवढे होऊनही त्याला सुबुध्दी सुचली कां?उलट झोपलेल्या कुंभकर्णा ला उठवुन त्याला युध्दावर पाठविण्याचे स्वप्ने बघु लागला.
सोन्याच्या उच्च सिंहासनावर बसलेला पराभूत रावण सभेत मोठ्या खेदाने म्हणाला,माझी सर्व तपस्या निष्फळ,विफल झाली.एका साध्या माणसाने मला हरविले.नंतर त्याच्या आज्ञेने लंकेच्या द्वारावर संरक्षणासाठी यंत्रे चढवण्यात आली.परकोटावरील पहारा कडक करण्यांत आला व झोपलेल्या कुंभकर्णाला ऊठवण्यास सांगीतले.कुंभकर्णाला जागे करणे सोपे नव्हते.तो एका प्रशस्त गुहेत झोपलेला होता.त्याच्या कानाजवळ ढोल,ताशांचा भला मोठा आवाज व तो उठल्यावर त्याच्या खाण्यासाठी अनेक प्रकारचे सुगंधी खाद्य पदार्थ आणुन ठेवले.अनेक प्रयत्नांनी एकदाचा उठल्यावर अन्नावर तुटुन पडला.नंतर तीथे जमलेल्या समुदायाला विचारले,एवढी काय आपत्ती आली म्हणुन तातडीने मला उठवले?त्याला लंकेवर असलेल्या संकटाची थोडक्यात माहिती दिली हे ऐकताच त्याने वानरांच्या नाशाची प्रतिज्ञा केली,सेनानी महोदरा च्या विनंतीनुसार तो रावणास भेटाण्यास गेला.
रावणाने कुंभकर्णाला सारी हकिकत सांगीतल्यावर,कुंभकर्ण म्हणाला,राजा!याबाबतीत आम्ही सर्वांनीच तुला या संभाव्य संकटाची कल्पना देऊन सीतेला परत पाठवण्याचा सल्ला दिला होता,पण तूं आपल्या घमंडी स्वभावानुसार कोणाचेच ऐकले नाहीस. अर्थातच रावणाला त्याचे बोलणे रुचले नाहीच.म्हणाला,ती वेळ निघुन गेली.सद्य परिस्थितीत काय करायचे याचा विचार करुन माझ्यामुळे निर्माण झालेला दोष तुझ्या पराक्रमाने दूर कर!
कुंभकर्णासमोर लढण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.पर्वतासारखा धिप्पाड कुंभकर्ण युध्दास आलेला पाहुन वानरसेनेची त्रेधा उडाली.पळणार्या वानर सेनेला अंगदने धीर देत संघटीत केले.राम व कुंभकर्णाचे भीषण युध्द सुरु झाले.साध्या हत्यारांनी तो आटोपत नाहीसे पाहुन,रामाने वायव्य अस्राने कुंभकर्णाचा एक हात उडवला.दुसरा हात सर्पास्राने निष्काम केला.हातं तुटलेला कुंभकर्ण वानरसेनेस तुडवित येतांना पाहुन,रामांनी त्याचे पाय व लगेच अग्निबाण सोडुन शरीर उडवले.
कुंभकर्णाच्या भीषण वधाची बातमी कळल्यावर,रावण हताश व चिंता ग्रस्त झाला.कुंभकर्ण व प्रहस्तचा दारुण बिभिषणाचे बोल आठवुन त्याला स्वतःचीच लाज वाटु लागली,पण आतां खुप उशीर झाला होता.
रामायण हा विषय मानवी मनांतील मूलभूत संघर्षाचा असुन भल्या बुर्या प्रवृत्तीमधील सनातन झगड्यां भोवती फिरत असते.रामायणातील संघर्ष दोन परस्पर विरोधी ताकदीच्या व्यक्तीमत्वाभोवती रंगलेला आहे.रावण अहंकार,गर्व,दुर्गुण आणि भ्रष्ट राजकारणाचे प्रतिक आहे तर,राम सत् प्रवृत्तीचे!समाज बिघडतो तो भ्रष्र्टाचार, अन्यायी,संधीसाधू नेत्यांमुळेच!
रावण विश्रस्वा ऋषींचा पुत्र,देवांचा खजीनदार कुबेराचा भाऊ,सुशिक्षित,वेद पारंगत,शस्रास्राचे उत्कृष्ट ज्ञान,प्रचंड सामर्थ्य,उत्तम कुळ शिवाय शंकरांचा महान भक्त,त्र्यैलोक्य जिंकलेला,पण या गुणांना पाशवी बनविणारा अहंकार, स्व सामर्थ्याचा दर्प,सत्तेचा अपरंपार मोह, भोगवादी(Meterialistic) होता,या उलट रामांना वाजवी अस्मिता,आत्म विश्वास होता.सामर्थ्याचा अनाठायी गर्व, सिंहासनाला चिटकुन राहण्याचा मोह नव्हता.म्हणजेच राम अध्यात्मवादी तर रावण अर्थवादी(Spiritualist) होता. सर्व गोष्टी राम कर्तव्यभावनेतुन बघत होते.त्यांच्या लेखी अर्थापेक्षा कर्तव्य मोठे होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १३-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ३७.
खरी निष्ठा,शुध्दप्रेम संपतीने खरेदी करतां येत नाही हे रावणाला कधी उममगलेच नाही.तो सर्व गोष्टी संपत्तीच्या मापाने तोलतो.रावणाने केलेले सीता अपहरण हे कांही पहिलेच कृत्य नाही. अनेक जाती जमातीच्या हजारो सुंदर स्रीया रावणाने पळवुन आणल्या होत्या. त्या सर्व स्वेच्छेने त्याच्या स्वाधीन झाल्या होत्या.सीता ही पहिली स्री होती की,जीने रावणाचे अफाट ऐश्वर्य तुच्छ मानुन वनवासी रामाबद्दल निष्ठा कायम ठेवली. रावणाची निष्ठा संपत्ती,सत्ता,सुखोपभोगां ना वाहिली होती तर,राम मात्र कर्तव्या साठी राज्य सोडुन वनवास पत्करावा लागला तरी कर्तव्यपाराडःगमुख नव्हते.
कुंभकर्णाच्या मृत्युमुळे रावण, मंत्रीगण व परिवार पार हादरुन गेला. बलाढ्य सेनानी व कुंभकर्णाच्या पराभवा मुळे रावण हतबल,आधारहीन,हताश होऊन आपल्या अविवेकी वृत्तीचा पश्चातापदग्ध असतांना,त्रिशिरा राक्षस म्हणाला,महाराज!आपण त्रिभुवन विजेते सामर्थ्यशाली असुन सामान्य माणसां सारखे दिनवाणे कां होता?आम्ही आहोत ना आपल्याबरोबर..त्रिशुराकडुन स्फुर्ती
मिळुन देवान्तक,नरान्तक आणि अतिकाय व सैन्य जमवुन त्रिशिरासह युध्दक्षेत्राकडे निघाले.रावणाचे दोन भाऊ युध्दोन्तक व मत्त यांच्यासोबत जादा कुमक देऊन त्यांनासुध्दा पाठवले. माणुसकीचे शत्रु वउन्मत्त पाशवी वृत्ती अजुनही माघार घेत नव्हते.
भयानक युध्दात हनुमानाकडुन त्रिशिरि व देवान्तक मारल्या गेले.अंगदने नरान्तकला ठार केले.युध्दोन्मत आणि मत्त या दोघांना नीलने आणि अतिकाय ला लक्ष्मणाने टिपले.या महावीरांच्या बातमीने रावणाची उरली सुरली उभारी नष्ट होऊन सुन्न झाला.इंद्राला जिंकणारा इंद्रजीत पुढे होऊन म्हणाला,पिताजी! माझ्या बाणांपुढे कुणीही टिकाव धरुं शकणार नाही.युध्दावर जाण्याची आज्ञा द्यावी.
इंद्रजीत रणभूमीवर दिसताच राक्षस सैन्यात उत्साह संचारला.तुंबळ युध्द सुरु झाले.इंद्रजीत अदृष्य राहुन अनेक प्रकारची शस्रास्र वृष्टी करीत होता.वानर सेनाही श्रीरामांसाठी जीवाचा मोह सोडुन त्वेषाने लढत होते,हजारों घायाळ आणि मृत वानरांचा खच पडला,तरी झाडे झुडपे,दगड सारखी हत्यार घेऊन धैर्याने वानर लढतच होते.इंद्रजीतने ब्रम्हास्र सोडल्यामुळे लाखो वानरसेना मारले तर गेलेच,पण रामलक्ष्मण सुध्दा घायाळ होऊन निष्र्पभ भासु लागले.इंद्रजीत शत्रुला परास्त केल्याच्या आनंदात लंकेत परत फिरला.
हातात मशाली घेऊन सैन्यांची हालहवाल पाहत बिभिषण व हनुमान रणभूमीवर रात्री फिरत असतां,जखमी वृध्द जाम्बुवान आढळले.थोडी सुश्रूसा केल्यावर शुध्दीवर आलेला जाम्बुवान मोठ्या कष्टाने हनुमंताला म्हणाला,तूं ताबडतोब आकाशमार्गे हिमालयातील ऋषभ व कैलास पर्वताच्या शिखरावर मृतसंजीवणी,विशल्वकरणी,सुवर्णकरणी
आणी संधानी ह्या ओषधी वनस्पती आहेत त्या त्वरेने जाऊन घेऊन ये.त्याच्या
उपयोगाने,सैन्यांच्या जखमा लवकर भरुन येतात व ते पुनर्जिवीत होतात.जाम्बुवानच्या सुचनेने हनुमान उत्साहाने ओतप्रोत होऊन वेळ न गमावतां आकाशमार्गे उड्डान करत निघाला,तो हिमालयावर पोहचल्यावर, औषधी वनस्पतीची ओळख न पटल्याने त्याने डोंगराचा शिखरच उचलुन लंकेत आणला
औषधी वनस्पती मिळताच जाम्बुवानने वेळ न गमावता तात्काळ उपचार करुन प्रथम राम-लक्ष्मण व हजारो घायाळ वीरयोध्देंच्या जखमा भरुन ठीक होऊन तंदुरुस्त झालेत.काम संपल्यावर हनुमानाने परत ते शिखर हिमालयात नेऊन ठेवले.
राम रावणांमधील संघर्ष हा सनातन आहे. सत् असत् प्रवृत्तीमधील हा झगडा सतत चाललेलाच असतो.प्रश्न असा निर्माण होतो की,समजा रावणाने सीतेचे अपहरण केलेच नसते तर, रावण राम युध्द टळले असते कां?राम रावण यांच्यातील भिन्न तरीही मूलभूत असणार्या मानवी प्रकृत्तीचा झगडा टाळता नसतांच आला.सीतापहरण या कारणाने तो प्रखर व तात्काळ उद्भवला इतकेच!विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करतांना राक्षसांच्या संस्कृती व विघातक कृत्यांची रामांना कल्पना आली होती. शरभंगऋषींच्या आश्रमाजवळ अरण्य वासी व ऋषींच्या अस्थींचा ढिगारा रामांनी बघीतला होता.शूर्पणखाच्या निमित्याने रावण राम संघर्षाची ठीणगी पडली होतीच.सीतेच्या अपहरणाने सत् असत् युध्दाला सीतेचे अपहरण हे केवळ निमित्य झाले होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १४-३-२०२१
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ३८.
इंद्रजितच्या मरणप्राय तडाख्यातुन उठलेल्या सैनिकांना सुग्रीवाने पेटत्या मशाली देऊन लंकेत पाठवले.जागोजागी आग लावुन पुनः युध्द पेटुन शोणीताक्ष, कंपन,यूपाक्ष,कुंभक,नित्कुंभ आणि मकराक्ष हे राक्षसवीर मारल्या गेले. हा संहार पाहुन,रावणाच्या आज्ञेने युध्दाची सुत्रे इंद्रजितने आपल्या हाती घेतली. इद्रजीत अदृष्य राहुन अस्रांनी अनेक वानरवीरांना ठार करुं लागला.हाःहाकार पाहुन,लक्ष्मण रामांना म्हणाला,ब्रम्हास्र चालवावे का?नाही लक्ष्मणा!एका इंद्रजीतसाठी सार्या राक्षससुमुहाचा नाश करणे उचित नाही.
इंद्रजीतने सीतेची प्रतिकृती रणांगणात राम-लक्ष्मणासमोर आणुन तीला ठार केले.पण बिभिषणाने सांगीतल्यानुसार त्याचा मायावी खोटेपणा राम-लक्ष्मणाला समजला. शिवाय फार महत्वाची माहिती बिभिषणा ने दिली.आपल्या सर्वांसमोर खोटी सीता मारल्याचे दाखवुन मायेचा रचेता,इंद्रजित निकुंभिलाच्या मंदिरांत विशिष्ट साधना करण्यास गेला आहे.ही साधना जर त्याने पूर्ण केली तर तो अजेय आहे,म्हणुन लगेच इंद्रजितवर हल्ला करुन त्याच्या साधनेचा भंग करावा.
इंद्रजितच्या अफाट शक्तीचे रहस्य कळल्याबरोबर बिभिषणासह लक्ष्मणाला त्वरीत निकुंभी मंदिराकडे पाठवले. लक्ष्मणासह बिभिषणाला मंदिरांत आलेला पाहुन इंद्रजित बिभिषणाला म्हणाला,काका!आपले लोक कितीही गुणहीन,वाईट असले तरी,स्वजनच कामी येतात,परके ते परकेच,ते कधीही आपले होत नसतात.
प्रादेशिक,जातीय,वांशिक व पक्षीय दृष्ट्या इंद्रजितचे म्हणने बर्याच अंशी बरोबर असले तरी,ज्या व्यक्तीने धर्म सोडला,ज्याचे जीवन पापाचरणांच व्यतित झाले,अशा व्यक्तीचा त्याग करणें च योग्य असते.विषारी सापाला नष्ट करुनच निर्भय होता येते.दुसर्याच्या धनाचा अपहार,परस्रीचा लोभ आणि हितैषी सद्हृयांबद्दल अनास्था हे तीन दोषच विनाशाचे कारण ठरतात. आणि म्हणुनच रावणांतील माणुसकी व मानवी संस्कृतीचा अभाव पाहुन बिभिषण रामा च्या बाजुला जाऊन मिळाला.
लक्ष्मणाने इंद्रजितच्या साधनेत विघ्न आणल्यावर दोघांमधे तुंबळयुध्द सुरु झाले.अखेर लक्ष्मणाने वारुणास्र सोडल्यावर इंद्रजितने रौद्रास्राने वारुणास्राला विफल करुन आग्नेयास्र लक्ष्मणावर सोडल्यावर लक्ष्मणाने सुर्यास्राचा प्रयोग करुन इंद्रजितचे आग्नेयास्र शांत केले.आपले अस्र निकामे होसे बघुन इंद्रजितने भयानक संहारक आसुरास्र वापरले.याअस्राच्या निवाराणार्थ लक्ष्मणाने अमोघ माहेश्वरी अस्र चालवले.मग मात्र वेळ न दवडतां, लक्ष्मणाने ऐंद्रांस्र इंद्रजितवर फेकल्या बरोबर सोन्याने रत्नजडीत शिरस्रानां सहित इंद्रजितचे मस्तकच धडापासुन वेगळे झाले.
इंद्रजित ठार झाल्याचे पाहतांच रणांगणातुन राक्षास सैन्य पळुन गेले. इंद्रजित पडल्याचे समजताच प्रक्षुब्ध रावणाने सैन्याची जमवाजमवी करुन, रथात अनेक आयुधे,दिव्यास्रे ठेवुन, मुल्य वान रत्नांनी सुशोभित रथ रणांगणात दोन्ही सैन्यांच्या मधे येऊन उभा राहिला. रावणाचे वैभव,विजेतेपणाचा गौरव आतां फिका पडला होता.सीतेला पळवि णारा दुराचारी,ब्रम्हहत्यारा,देवस्वरुप सज्जनांचा वैरी रावण रामाबरोबर लढायला निघाला.
युध्दातुन वाचलेले महोदर,विरुपाक्ष, महापार्श्व रावणाबरोबर होते. हे राक्षस वानरसैन्यांचा संहार करीत असतांना, सुग्रीवाने विरुपाक्ष व महोदर तर अंगदने महापार्श्वला संपविले.
आपल्या मंत्र्यांच्या वधाने क्रूध्द होऊन राम-रावणाचे घमासान,तुंबळ रणक्रंदन सुरु झाले.दोघेही महान पराक्रमी धनुर्धर,युध्दनिपुन,अस्रविद्येत श्रेष्ठ,बाणांच्या लाटामागुन लाटा एकमेंका वर आदळत होत्या.रामांनी मंत्राने भारीत रौद्रास्र रावणावर सोडले,पण अभेद्य कवचामुळे रावण सुरक्षित राहिला.रामां नी उत्कृष्ट अस्राने रावणाच्या ललाटावर प्रहार केल्यावर,चवताळुन रावणाने महा भयंकर आसुरास्र फेकुन अनेक मुखांच्या विषारी बाणांची वृष्टी रामावर झाल्याने, रामांनी ते अस्र निकामी करण्यासाठी आग्नेयास्र सोडले.एवढ्यात लक्ष्मणाने सोडलेल्या बाणाने रावणाच्या रथाचा ध्वज भग्न केला.दुसर्या बाणाने सारथ्या चे डोके धडावेगळे झाले.बिभिषणाने गदेच्या तडाख्याने रथाचे घोडे घायाळ केलेले पाहुन रावणाने बिभिषणावर शक्ती सोडली,पण लक्ष्मणाने मधेच त्या शक्तीचे तुकडे केले.आपली शक्ती विफल झालेली पाहुन,रावणाने प्रबळ शक्ती बिभिषणावर सोडली असतां,लक्ष्मण त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असतांना ती शक्ती मागे घेऊन लक्ष्मणावर सोडली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १४-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!!
भाग – ३९.
रावणाने सोडलेली शक्ती प्रचंड वेगाने लक्ष्मणाच्या छातीत घुसल्याने शुध्द हरपुन जमीनीवर कोसळला. लक्ष्मण पडलेला पाहुन राम विचलित झाले,पण ही वेळ शोक करण्याची नसल्यामुळे,त्यांनी आपले लक्ष युध्दावर केंद्रित केले.सुषनेने केलेल्या औषधोपचा राने लक्ष्मण शुध्दीवर आला.
इतका वेळ रावण रथारुढ व राम पदाती जमीनीवर असे युध्द सुरु असलेले पाहुन इंद्राने सारथी मतालीसह आपला रथ रामाकडे पाठवला.हुशार मतालीने रामांना अगस्तीऋषींनी दिलेल्या बाणांची आठवण दिल्यावर,रामांनी वज्रासारखा दुर्धर आणि काळासारखा बाण सोडलेला बाण रावणाच्या छातीत घुसुन,पाठीतुन निघुन जमीनीत रुतला.एक जुलमी भ्रष्ट सत्तास्थान कोसळुन पडले,पण इतिहासा ला पुढेही रामबाण पुनः पुनः लागणारच होता.
ज्या प्रबळ रावणाला देव,दानव आणि रावससुध्दा हानी पोहचवु शकत नव्हते,ज्याच्याजवळ उभे राहण्याची भीती देवांनासुध्दा वाटत होती त्याला एका मानवाने परास्त करुन धुळीस मिळविले होते.मरुन पडलेल्या त्र्यैलोक्य विजयी रावणाच्या शवाजवळ त्याची पट्ट राणी मंदोदरी शोक व अश्रू ढाळीत म्हणाली,जो जन्माला येतो,तो एक दिवस मरणारच,प्रत्येकाचा शेवट ठरलेला असतो,पण आपल्या विनाशासाठी नियतीने माया रचली होती.मी स्वतः सुंदर,सार्या गुणांथ सरस असुनसुध्दा, आपल्या ऐश्वर्याचा,स्वजनांचा आणि स्वनाश करुन घेण्यासाठीच जणुं सीतेची अभिलाषा धरली व सर्वनाश ओढवुन घेतला.काम,मायेचा पगडा मनांंवर बसला की,भल्याभल्याची अधोगती होते. रावणाच्या अधोगतीचे विश्लेषण करीत मंदोदरी म्हणाली,महाराज!पूर्वी आपल्या इंद्रियांना जिंकुन त्रिभुवनाचे राज्य जिंकले होते,पण आज त्याच इंद्रियांनी तुम्हाला पराभूत केले.
निसर्गचक्रामधे विधायक(positive आणि विघातक (Negative) अशा दोन शक्ती सतत वावरत असतात.याच शक्तींना लिला आणि माया अशा नांवानी ओळखल्या जाते.मोह,माया,अहंकाराने भरकट नेण्याचे काम माया करते.सुखा च्या आड किंवा अहंकारला दुखवणार्या व्यक्तीचा द्बेष करणे मायाचा धर्म आहे.या उलट संयम,विवेक आणि कर्तव्यनिष्ठा याचा होणारा प्रादुर्भाव म्हणजे लीला!
रावणाचा अंतिम संस्कार करण्या साठी अश्रूपुर्ण नेत्रांनी बिभिषणाने अनुमती मागीतल्यावर,राम म्हणाले,वैर माणसाबरोबर संपले.रावणाचा अंत्य संस्कार सम्राटाच्या इतमामानेच झाला पाहिजे.चंदनकाष्ठे,कापूर,खस यांची वेदी तयार करुन,मृगचर्म अंथरलेल्या चित्तेवर मोठ्या सन्मानाने शव ठेवले.वेदोक्त मंत्रां च्या गजरांत बिभिषणाने चित्तेला अग्नि दिला.अचाट ताकदीचा त्र्यैलोक्य विजेता राखेचा ढीग होऊन पडला होता.रणांगणा वरील आग शमली होती.
त्यानंतर बिभिषणाचा राज्यभिषेक झाला.त्याच्या मस्तकावर लंकेचा राज मुकुट चढविला.राम हनुमानाला म्हणाले, बिभिषण महारांटी अनुज्ञा घेऊन,सीतेला भेट व आमचे कुशल,युध्दाचा शेवट, व रावणवधाची बातमी सांगुन तिचा संदेश घेऊन ये.
रामांच्या आज्ञेनुसार हनुमान अशोकवनांत सीतेसमोर जाऊन,नम्रपणे उभा राहुन,युध्दाचा सर्व वृतांत व श्रीरामा चा निरोप ऐकल्यावर,सीता म्हणाली,मी माझ्या भक्तवत्सल पतीचे दर्शन घेऊ इच्छिते.सीता रामाची पत्नीपेक्षा भक्त जास्त होती.भक्ती म्हणजे निरपेक्ष आत्यंतिक प्रिती!
सीतेचा निरोप कळतांच तीला भेटीस येण्याची रामांनी अनुज्ञा दिली. सीता येत आहे असे कळतांच,तीला पाहण्यासाठी वानरसैनिकांची गर्दी व्हायला लागलेली पाहुन,बिभिषणाने बंदोबस्तासाठी नेमलेल्या अधिकार्यांनी त्यांना हुसकावु लागलेले पाहतांच,रामाने त्यांना मनाई करत म्हणाले,सीता संकटात,आपत्तीत असतांना तिच्यासाठी झालेल्या युध्दात याच लोकांनी मला साथ दिली,त्यांना बघण्याची उत्सुकता असणारच ना?
बिभिषणाने सन्मानाने सीतेला पालखीतुन आणले.सीता मोठ्या प्रसन्नते ने आणि प्रेमाने आपल्या देवतासमान पतीसमोर येऊन त्यांचे दर्शन घेतले,पण शांत चेहर्याने राम म्हणाले,भद्रे!समरांग णावर शत्रूचा पराभव व आवश्यक पराक्रम या माझ्या सर्व मित्रांच्या मदतीने तुझी सुटका केली, पण…
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १५-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!
भाग – ४०.
पण काय स्वामी?थोडे संकोचुन गंभीर मुद्रेने स्थीर स्वरात राम म्हणाले, पण…तुझ्या चारीत्र्याचा संदेह…रामाचे असे विपरित कठोर बोलणे ऐकुन,वानर व राक्षस सेनांना सखेद आश्चर्य वाटले. सीतेच्या चरीत्र्याविषयी कोणाच्याच मनांत कुठलाही किंतु परंतु नसल्यामुळे, रामाचे बोलणे मुळीच रुचले नाही. लक्ष्मणादी सारख्यांना तर भयंकर राग व वाईट वाटल्याने भांबावुन गेले.सीता अश्रू पुसत कांहीशा नाराजीने म्हणाली, हे स्वामी!अशी अनुचित,कर्णकठोर,रुक्ष स्नेहहीन कसे बोलुं शकतां?प्रभु!रावणाने मला हरण करतांना जो कांही स्पर्श झाला,तो विवशतेमुळे,त्यात माझ्या इच्छे चा प्रश्नच नव्हता.माझ्या हातात फक्त माझे मन उरले होते,आणि सदोदीत ते तुमच्यातच लीन होते.पराधीन अवस्थेत जर परपुरुषाचा नुसता स्पर्श झाला तर असहाय्य अबला स्री काय करुं शकते? सीता म्हणाली,आपले एकमेकांवर अतुट प्रेम असुनही तुम्हीच दोषी ठरवायला निघावे तर माझ्या जगण्याला काय अर्थ?
एवढे बोलुनही राम अनुकुल प्रतिक्रीया दाखवत नाही हे पाहुन,उद्वेगा ने लक्ष्मणाला म्हणाली,सुमित्रानंदना! माझ्यासाठी चिता तयार कर,खोट्या कलंकाचा लोकोपवाद घेऊन मी जगुच शकत नाही.
जनकदुलारी सीता,राजप्रासादाती ल सुखासीन ऐशोरामाचे आयुष्य सोडुन, प्रेमाच्या तोरड्या पायात घालुन,श्रीरामा च्या मागे वनारानांत संकटे झेलत फिरली आणि तिच्याच चारित्र्याचा संशय घ्यावा केवढे दुर्देव?रावणाने केलेल्या मानसिक छळाला तोंड देत,रामावर निष्ठा ठेवली, रावणाच्या कैदेत,राक्षसणींच्या पहार्यात असलेल्या आपल्याला बघीतल्याबरोबर न दुखवतां प्रेमाने,आतुरतेने अलिंगन देईन या विश्वासावर तीने दिवस काढले होते आणि आज त्या विश्वासालाच तडा गेला होता.वनवासांतील कष्ट व रावणा चा छळ केवळ आणि केवळ रामांसाठीच सोसले होते,तो रामच दुरावणार असेल तर अश्या जगण्यालाअर्थच काय उरला?
सीतेचा अपमान लक्ष्मणाला सहन झाला नाही.भलतेच वळण लागलेले पाहुन वानर आणि समस्त दुःखी होऊन रामाचा निषेध करुन सीतेच्या चरित्राचा निर्वाळा देऊ लागले.रावणाने सीतेला पळविले यांत तिचा काय दोष?रावणाने पहारा बसवला,अनेक मोहमयी प्रलोभने दाखवलीत,पण एकनिष्ठ सीतेचा अंतःरात्मा सदैव रामाजवळच होता. मैथीली सर्वथा निर्दोष व निष्पाप आहे. तरी सीतामाईचा स्विकार करावा.सर्वांची प्रतिक्रीया ऐकुन राम म्हणाले,सीता माझेशीच संलग्न असल्याने ती वेगळी होऊच शकत नाही.सदैव माझे मन राखुन माझीच इच्छा प्रमाण माणते.असे बोलुन रामाने तीला जवळ घेतले.
स्रीया काय किंवा पुरुष,प्रसंगावश, नाईलाजाने चुकुन किंवा असहाय्य स्थितीत एखादे दुषित कृत्य घडलेच तर, समाजाने अशा लोकांना समजुन घेऊन पुनर्वसन करायला हवे.हेच सीतेवरील प्रसंग दर्शवतो.वानर राक्षसांना,निरपराध सीतेबद्दल जिव्हाळा वाटुं शकतो तर माणसांना कां वाटु नये?
श्रीरामांनी लोकांचा कल जाणण्या साठी थोडे ताणुन धरले व त्यांचा अनुकुल कल पाहुन रामाने सीतेला जवळ केले.छत्रपती शिवाजी महारांजानी सुध्दा धर्मांतर झालेल्या सरसेनापती नेताजी पालकरचे शुध्दीकरण करुन परत आपल्या हिंदु धर्मात व सैन्यात घेतलेच ना?समाज धुरींणांनी व शासन कर्त्यांनी असा उदार दृष्टीकोण दाखवला तर,समाजातील अशा लोकांना आधार, सहारा,मिळु शकेल.
दुसर्या दिवशी पाहुणचार करणार्या बिभिषणाला,श्रीराम म्हणाले, राजा!सुखोपभोगांचा त्याग करुन सन्सस्थ जीवन जगत,राज्य सांभाळणा र्या भरताला सत्वर भेटण्याची आस लागली आहे,तरी आमची अयोध्येला जाण्याची व्यवस्था कर!प्रभु! माझा मोठा भाऊ,देवांचा खजिनदार कुबेराचे पुष्पक विमान सुसज्ज आहे.रामांचा राज्यभिषेक सोहळा पाहण्यासाठी वानर सेना व बिभिषणाने इच्छा व्यक्त केल्या वर श्रीरामाने मोठ्या आंनदाने सम्मती देऊन त्या सर्वांना निमंत्रीत केले.
एवढ्यात पुष्पक विमान आले. सर्वजन नीट आसनस्थ झाल्यावर,ते विमान हंसासारखे अयोध्याच्या मार्गी लागले.सीतेला जमीनीवरची स्थळे,जुन्या आठवणी!नवीन घडामोडी राम सांगत होते.लंका नगरी,युध्दस्थळं,समुद्रावरील नवनिर्मित सेतू,सुग्रीवाची किष्कींधा राजधाणी,ऋष्यमूक पर्व,पंपासरोवर जीथे प्रथम हनुमान रामाला भेटला, जनस्थान,गोदावरी नदी,शरभंग ऋषींचा विंध्यपर्वता पलिकडील आश्रम,चित्रकुट पर्वत,यमुना नदी,भारद्वाज ऋषींचा आश्रम,गुहकाचे शृंगवेरपूर,गंगानदी असा मार्ग आक्रमत विमान अयोध्या नगरी जवळ उतरले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १५-३-२०२१.
!!! अभिनव रामायण !!
अंतिम भाग – ४१.
अयोध्येच्या परिसरांत विमान उतरल्यावर,श्रीरामांनी आपल्या आगमना ची वार्ता देण्यासाठी भरताकडे हनुमाना ला पाठविले.हनुमानाला पुढे धाडण्यांत श्रीरामांचा कांही विशिष्ट हेतू होता.त्यांना वाटले न जाणो,राणी कैकयीचा सहवास आणि राजसत्तेचा दीर्घकाळपर्यतचा उपभोग यामुळे भरतात राज्याची आसक्ती जडली असेल तर,खुशाल भरताला राज्य करुं द्यावे…यावरुन रामां ची राजनीतीतील कुशलता व भरतासाठी राज्य सोडण्याची त्यांची तयारी हे त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शवते.यावरुन राम अर्थवादी नव्हते हेच सत्य आहे.
भरताची चाचपणी करायला गेलेल्या हनुमानाला जगावेगळाच अनुभव आला.राम आगमणाची वार्ता ऐकताच,अत्यानदाने भरताचा उर भरुन आला.लगेच शतृघ्नला बोलावुन,श्रीरामां च्या स्वागताची जय्यत तयारी करण्याची आज्ञा दिली.बर्याच वर्षांनी आज अयोध्यानगरी सजली होती.राम दिसतांच मोठ्या आतुरतेने धावत जाऊन रामाला कडकडुन मिठी मारुन गाढ अलिंगन दिले दोघांच्याही नेत्रातुन आनंदाश्रू वाहुं लागले हे दृष्य पाहुन बाकीचे पण गहिवरले,नंतर भरताने,सीता व लक्ष्मणाला वंदन केले. बिभिषण,सुग्रीव इतर वीरांचे मनःपुर्वक स्वागत केले.प्रजेनी उत्स्फुर्तपणे श्रीरामाचा जयजयकार केला.
राम परत येईपर्यंत सिंहासनावर ठेवलेल्या श्रीरामांच्या पादुका भरताने त्यांच्या पायात घालत,नम्रपणे हात जोडीत म्हणाला,प्रभू!माझ्याजवळ ठेव म्हणुन असलेले आपले राज्य,आज मी आपल्याला परत केले.माझा जन्म कृतार्थ होऊन मनोरथ पुर्ण झाले,तुमच्या आशिर्वादाने राज्याचा खजिना,कोठारे, गृहव्यवस्था आणि सेना सर्वांंचा उत्कर्ष करुन दसपटीने वाढ केली.अयोध्येचा राजा परत आला यापेक्षा माझे सुदैव ते कोणते?आपण माझ्या आईचा मान राखुन हे राज्य मला दिले,तेच राज्य जसेच्या तसे परत करीत आहे.
श्रीरामाचा वनवास काळात श्रीरामांचा प्रतिनिधी,विश्वस्त म्हणुन निष्ठेने व कौशल्याने चालविलेले,साभांळ लेले व भरभराटीस नेऊन ते राज्य पुन्हा रामाला परत करणारा गीताप्रणीत निष्काम कर्मयोगाचे जिवंत प्रतिक भरत आहे.रामाने जसे पित्याच्या वचनपुर्ती साठी कर्तव्यबुध्दीने राज्य सोडुन देणारा राम जेवढा महान आहे,तेवढाच भरतसुध्दा महान आहे.
नंतर राम, लक्ष्मण,भरत यांनी आपला जटाभार उतरवुन व तापसीवेष टाकुन,नेहमीची वस्रे परिधान केलीत. भरत व शतृघ्नाने वानरांच्या मदतीने पवित्र नद्यांचे व सागराचे जल आणवले. सुंमतने उत्तम सजवलेला स्वर्णकांती व तेजस्वी घोडे जुंपलेला रथ घेऊन आला. श्रीराम व सीता रथारुढ झाल्यावर भरताने सारथ्य स्विकारले.शतृघ्नने श्रीरामांच्या डोक्यावर छत्र धरले.लक्ष्मणा ने चवरी धरली.श्रीरामांच्या रथामागुन सुग्रीव,बिभिषण,हनुमान,मंत्रीगण व इतर मान्यवर येत होते.रस्त्याच्या दुतर्फा प्रजा फुले उधळत,जयघोष करीत होते.चौदा वर्षानंतर श्रीरामांनी आपल्या पित्याच्या राजभवनात प्रवेश केला.कौसल्या, सुमित्रा,कैकयी तिन्ही मातांनि वंदन करुन त्यांचे आशिर्वाद घेतले.
नंतर लवाजमा व मान्यवरांसह भव्य सभागृहात श्रीरामांनी प्रवेश केला. एका रत्नजडीत चौरंगावर श्रीराम सीताला पुरोहिताने बसण्याची सुचना केली. त्या नंतर राज्यभिषेकासाठी विविध वनस्पती आणि अनेक नद्यां व समुद्राचे पवित्र जलाने,वसिष्ठ,वामदेव,जाबाली,कश्यप, कात्यायन,सुयज्ञ,गौतम आणि विजय या आठ ऋषींनी राज्याभिषेक केला.ज्ञानी ऋषी,विद्वान,मंत्री,सोळा कन्या,योध्दे आणि व्यावसायिकांनी अभिष्टचिंतन केले.वसिष्ठांनी अयोध्येचा रत्नजडीत राजमुकुट श्रीरामांच्या डोक्यावर ठेवला. शतृघ्नने पांढरेशुभ्र छत्र डोक्यावर धरले. वनराज सुग्रीव आणि राक्षसाधिपती बिभिषण यांनी चवर्या ढाळल्या.
वैयक्तिक अध्यात्मवादी कर्तव्यपुर्ती सामाजिक समतोल समानसत्तेचा आणि राजकीय निष्ठेचा हा आगळा साक्षात्कार बघतांना आलेल्या राक्षसगण व वानरां च्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.
सत् आणि असत् मधील संघर्ष, चांगल्या वाईटांचा झगडा हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हा संघर्ष आधी होता,आज आहे व पुढेही असणारच आहे.चांगल्या वाईटाची जाण सामान्र माणसाला असते,पण सत् तत्वाला उचलुन धरण्याची शक्ती कमी पडते,म्हणुन कुणीतरी प्रचंड ताकदीचा सद्षुरुष येऊन आपल्याला जाचातुन सोडवेल ही आशा धरुन असतात.व प्रत्यक्ष अशी व्यक्ती आल्यावर त्याच्या मागे निर्धाराने उभी राहतात.जसे रामायणात वानरे रामाच्यामागे दगडधोंडे घेऊन उभी राहिली,एवढेच काय पण राक्षस म्हणवणारे,प्रहस्त,कुंभकर्णादी वीरांनासुध्दा सीताहरणाचा निषेध व्यक्त केला होता.बिभिषणाने तर सत्याच्या पक्षातच आला होता,
म्हणुनच सर्व काळांत,समाजांत या ना त्या निमित्याने तारणहार रामाची वाट बघत असतात.म्हणजेच माणुस राम र् राज्याचे स्वप्न उराशी बाळगुन चांगल्या शासनाची अपेक्षा करीत असतो. थोडक्यात राम पूर्वी होता,आजही आहे आणि भविष्यात सुध्दा प्रगट होणारच! चांगल्या तत्वांचे पुनरुत्थान आणि जुलमांचा शेवट हाच रामायणाचा सारांश आहे.
श्रीराम जय राम जय जय राम !!
समाप्त
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १५-३-२०२१.








