अभिनव रामायण  संपूर्ण भाग ७, (३१ ते ३५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

……रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्‍या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल…..

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

अभिनव रामायण

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  –  ३१.

           हनुमान टोळीसहित पोहचुन,लंके तील सर्व वृतांत व सीतेचा निरोप श्रीरामां ना कथन केला.सीता शोध मोहिम हनुमानाने यशस्वी केल्यामुळे राम रावण युध्द निश्चित झाले.

          हनुमानाचे अद्वितिय कामाची प्रशंसा करुन म्हणाले,सध्या तरी तुला पुरस्कार देण्यासारखी वस्तु नाही.असे म्हणुन हनुमानाला त्यांनी गाढ अलिंगन दिले.हनुमान कृतकृत्य झाला.

          सुग्रीव हनुमान व इतर प्रमुख वानरांना उद्देशुन राम म्हणाले,सीतेचा तर शोध लागला,पण हा अवाढव्य अथांग समुद्र ओलांडुन ससैन्य लंकेत कसे पोहचु याची चिंता वाटते.सुग्रीव धीर देत म्हणाला,आपल्या वानरसैनेने एकदा कां त्रिकुट पर्वतावरची लंकानगरी बघीतली की,आपला विजय निश्चित आहे.पण त्यासाठी वानरसैन्य समुद्र उल्लंघुन जाण्यासाठी समुद्रावर पुल बांधणे आवश्यक आहे.आपण मन स्थिर ठेवुन योग्य योजना आखावी.सुग्रीवाच्या बोलण्याने रामांना धीर आला.स्वतःला सावरुन हनुमानाकडुन लंकानगरीची,दुर्ग रचना,संरक्षण साधणे,त्यांची बलस्थाने, कमजोरी,सैन्याचा आकार ही माहिती जाणुन घेतली.हनुमान पुढे म्हणाला, लंकेच्या प्रवेशदारावर मोठी शक्तीशाली यंत्रे बसवलेली आहे.त्यातुन गोळ्यांचा वर्षाव लंकेवर चालुन आलेल्या शत्रुला रोखण्याची व्यवस्था आहे.लंकेच्या कोटा बाहेर चारही बाजुंनी खोल खंदक असुन या खंदकावर काढते घालते पूल आहेत.शत्रु लंकेवर चालुन आल्यास गोळे मारुन लंकेचे संरक्षण केले जाते किंवा यंत्रांनी पूल उचलुन खंदकातील पाण्यात फेकतां येतो.पर्वत,नदी व कुत्रिम खंदकां नी चारहु बाजुने लंकानगरी सुरक्षित केलेली आहे.सैनिक सतत जागृत असते.

      सैन्य संचालित करतांना रावण फार सावध असतो.लंकेच्या मध्यभागी राक्षससेनेच्या छावण्या असुन त्यांची संख्या कोटीहुन अधिक आहे.एवढे असुनही सीतेच्या शोधानंतर रावणाच्या बलाला जोरदार तडाखा देऊन त्याचे नैतिक धैर्य खच्ची केले.म्हणुन एकदा वानरसैन्य समुद्रपार करुन लंकेत शिरले की,लंकेचा पाडाव निश्चित होईल,तेव्हा उचित मुहुर्त पाहुन सैन्यांना कुचाची आज्ञा द्यावी.

        शुभमुहुर्तावर वानरश्रेष्ठ नीलच्या अधिपत्याखाली वानरसैन्य रावणवधा च्या मोहिमेवर निघाले.सर्वतोपरी काळजी घेत सावधगीरीने मार्ग आक्रमत समुद्राकाठी वानरसेनेचा पडाव पडला. पलिकडच्या तीरावर असलेल्या सीतेच्या आठवणीने श्रीराम व्याकुळ झाले.

        तिकडे वानरसेना पलिकडच्या तीरा वर पोहचल्याची वार्ता रावणाला कळल्या वर तो आपल्या लष्कर प्रमुखांना म्हणाला,थोड्या दिवसांपुर्वी एका साध्या वानराने लंकेची संरक्षण व्यवस्था भेदून, मोठा उच्छाद करुन,बंदोबस्तात असले ल्या सीतेचा शोध लावला.राम लक्ष्मण प्राख्यात धनुर्धर वानरसेने सोबत आहेत. सर्वांनी आपापले स्पष्ट विचार मांडावे. कुणी रावणाची स्तुती,तर कुणी अहंकारा च्या वल्गना करीत म्हणाले,आपण आज पर्यंत अनेक लढाया करुन अनेकांना परास्त केलेत.कुंभकर्ण,इंद्रजीत सारखे वीर योध्दे आपल्याजवळ असतांना या यत्किंचित वानरांचा पराभव करणे फार मोठी गोष्ट नाही.

         रावणाचा भाऊ बिभिषण म्हणाला आपल्या शत्रुजवळ हनुमानासारखे निष्ठावान ताकदीचे योध्दे आहेत,राम लक्ष्मण असाधारण धनुर्धर असुन अस्र शस्र विद्येत प्रविण व असीम  बळ व पराक्रमी आहेत.महापराक्रमी खर दूषण, अयोमुखी,कबंध यांना ठार केले.रामाने आपला कांहीही अपराध केला नसतांना त्यांची पत्नी सीता पळवुन आणली.राम धर्माने वागणारे आहेत.विनाकारण वैर न वाढवतां सीतेला रामाकडे परत पाठवावी  यावर गर्वाने उन्मत्त रावण म्हणाला,जिथे देवांना मी नेस्तनाबुत केले तिथे हे दोघे माझ्यापुढे काय टिकणार?मग कठोर स्वरांत रावण म्हणाला,एकवेळ साप किंवा शत्रुबरोबर राहल्या जाईल,पण शत्रुला मिळालेला आपलाच बांधव सोबत राहिल्यास संकट निश्चित येणार हे बोलणे बिभिषणाच्या जिव्हारी लागले. मोठा भाऊ पित्यासमान म्हणुन आतां पर्यंत तुझा मान ठेवला,समजावण्याचा प्रयत्न केला,गोड बोलणारे खुप असतात पण,सत्यपरिस्थिती,अप्रिय परंतु हित सांगणारे क्वचितच असतात.राक्षसराजा स्वतःला व लंकेला सांभाळ!असे म्हणुन तो तडक सभागृहातुन निघुन गेला.आणि दोन तासातच बिभिषण रामाच्या तळावर दाखल झाला.

                क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
         दि. १२-३-२०२१.

!!!    अभिनव रामायण  !!!

भाग  –  ३२.

            रामाच्या तळावर दाखल झालेल्या बिभिषण आपला परिचय देत म्हणाला,मी रावणाचा लहान भाऊ!अधर्मी व दुराचारी रावणाला सीता परत पाठविण्याबद्दल परोपरीने समजावले, पण मलाच वाटेल तसे बोलुन अपमानीत केले.त्याचा अन्यायाचा पक्ष सोडुन मी श्रीरामांना शरण आलो आहे.बिभिषणा ला आश्रय देण्याचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर  आला,तेव्हा प्रत्येकजण त्याच्या विरोधात आपापले मत मांडु लागला.शेवटी हनुमान म्हणाला,प्रभु!या सर्वांनी बिभिषणाची परीक्षा न घेतांच आपले विचार व्यक्त केले.तो अन्याय,दुराचाराचा पक्ष सोडुन न्याय,सदाचारांच्या मार्गाकडे कर्तव्यतत्पर श्रेष्ठ चरित्र्याच्या सत्तास्थाना कडे आला आहे.त्याचा स्वच्छ,स्पष्ट बोलणे व सोज्वळ,प्रसन्न चेहरा पाहुन त्यात दुष्टता किंवा संधीसाधुपणा असेल असे वाटत नाही.कदाचित जर राज्याच्या लालसेनेही आला असेल,तरी त्याला आश्रय देण्यास कांही हरकत नसावी.

        सर्वांची मतमतांतरे ऐकुन स्मित वदनाने श्रीराम म्हणाले,जो मला शरण  येऊन “मी तुझा आहे” असे म्हणुन सरक्षणाची प्रार्थना केल्यावर,जर कदाचित त्याच्यात कांही दोष असला तरी त्याला सर्वप्रकारचे आश्रय देणे माझे  व्रत आहे.

       श्रीरामांच्या आज्ञेनुसार बिभिषणाला तात्काळ मित्रतापुर्वक शरण देण्यांत आले.बिभिषण श्रीरामांना म्हणाला,मी लंका,सगेसोयरे,धनसंपत्ती सोडुन आपल्या आश्रयाला आलोय,माझे जीवन सुख,दुःख आपल्याच हाती आहे.यानंतर त्याने युध्दोपयोगी सर्व माहिती देऊन प्रतिज्ञेवर म्हणाला,प्रभु!लंकेवरील आक्रमण आणि  राक्षसांच्या संहारासाठी माझी संपूर्ण शक्ती पणाला लावुन सहाय्य करीन,प्रसंगी राक्षससेनेतसुध्दा घुसेन.

         राज्य जिंकण्यासाठी रावणावर आक्रमण केले नव्हते तर,अन्यायी आणि संस्कृती विध्वंशक शक्तीचा पाडाव करुन सुसंस्कृत समाजव्यवस्था स्थिर  करण्या साठी रामाने हे आक्रमक पाऊल उचलले होते.बिभिषणाने स्वजनांची समाजरचना उध्वस्त करणार्‍या लोभी आक्रमकाला मदत न करतां,त्याच्या राज्याला,तत्काली न समाजव्यवस्थेला तत्वनिष्ठ पायावर दृढ करण्यासाठी तो सहभागी झाला होता.बिभिषणाने फितूरी मुळीच केली नव्हती,तर रावणाला स्पष्ट सांगुन पक्ष सोडला होता.

          समुद्र कसा ओलांडायचा या विषयी मसलत सुरु असतांनाच वानर सैन्यदलात नल नावांचा स्थापत्य अभियंता( इंजिनिअर) होता.त्याच्या हुशारीमुळे तो विश्वकर्माचा पुत्र शोभतो. त्याला बोलावुन सेतु बांधण्याचं अवघड काम त्याच्यावर सोपवण्यांत आले.त्याने वानरांच्या सहाय्याने सेतूबांधकामाला जोरात सुरुवात केली.एका दिवसांत १४ योजने पूलबांधणीचे काम पुर्ण झाले.पांच दिवसांत १०० योजने पूल बांधुन सुवेळ पर्वताजवळ आले.नलच्या मार्गदर्शना खाली १० योजने रुंद व १०० योजने लांबीचा पूल तयार झाला.या बांधकामात चमत्काराचा भाग नसुन विषेशतज्ञ नलाच्या स्थापत्यशास्रातील प्राविण्याचा व विशेष ज्ञानाचा उपयोग केला होता.

            सेतू पुर्ण होताच,प्रमुखांसह वानरसेना,राम लक्ष्मण, सर्व सुविधेसह पैलतीरावर पोहचुन डेरा टाकुन पुढील हुकमाची वाट बघत बसले.रावणाला गुप्तहेरांकरवी ही सर्व माहिती मिळाली होती.त्याला आपल्या व शत्रुच्या बळाची पूर्ण जाणीव असल्यामुळे तटबंदीबाहेर असलेल्या वानरसेनेवर हल्ला न करतां सीतेचे मनोधैर्य खचवण्याचा मार्ग अनुसर ला.त्याने श्रीरामाच्या शिरासारखी हुबेहुब प्रतिमा तयार करवुन,ती प्रतिमा सीतेला दाखवुन म्हणाला,खर दूषनांचा वध करणारा तुझा पती समरांगणावर राक्षसांशी लढतांना मारला गेला.ज्याच्या बळावर तूं मला झिडकारत होती.आतां रामाला विसर व माझा स्विकार कर!

      सीतेला आणखी घाबरवण्यासाठी सुग्रीव  व इतर वानरवीर राक्षससैन्या कडुन कसे मारले गेले,हनुमान कसा जखमी झाला,बिभिषणाला बंदी केले, आणि उरलेल्या सैन्यासह लक्ष्मण कसा पळून गेला हा सर्व खोटा वृतांत तीच्पा प्राप्तीच्या आशेने सांगत असतांना,घाई घाईत एक दूत येऊन म्हणाला!प्रहस्त व इतर मंत्रीगण महत्वाच्या कामासाठी आपल्या प्रतिक्षेत असल्याचा निरोप मिळाल्यामुळे रावण त्वरेने निघुन गेला.

       इकडे सीता दुःखात बुडुन गेली. रावणाचे बोलणे तीला खरे वाटेना पण तुटलेल्या शिराचा पुरावा समोर डोळ्या समोर होता.पहार्‍यावरील राक्षसीनीपैकी  सरमा नांवाची, जी बिभिषणाची कन्या होती,तीला सीतेविषयी सहानुभुती असल्याने,ती म्हणाली,रामाचे तुटलेले शीर खोटे असुन ती रावणाची चाल आहे. राम लक्ष्मण दुर्जय आहेत.हे कां सीतेला माहित नव्हते,पण दुःखाने तीचा बुध्दीभ्रंष झाला होता.

                 क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
        दि.  १२-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  – ३३.

           सरमा माहिती देत पुढे म्हणाली, दुष्ट रावणाने हा खोटा आभास तुझे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी निर्माण केला,वास्तविकता अशी आहे की, श्रीरामांनी लंकातीरावर प्रचंड वानरसैन्या सह पाडाव टाकला आहे.यासाठीच तो मंत्र्यांशी सल्लामसलत करण्यास त्वरेने गेला.

        मारीचने सुवर्णमृगाचे रुप घेण्या पुर्वी,उपद्रवी व हीन कृत्यापासुन रावणा ला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.सीते चा शोध घेतांना हनुमानाला बरेचसे राक्षस भेटले,पण बहुसंख्य लंकावासी सीधीसाधीच आढळली होती.सरमाने सत्य सांगुन सीतेचे दुःख कमी केले.सर्व सामान्य माणसें जुलमी,मदांध सत्ताधिशां चा अन्याय सहन करतात,पण त्यांची मने  रावणासारख्या क्रूर,तत्वहीन,लब्धप्रतिष्ठी त शासकाबरोबर कधीच नसतात.पण जुलमी सत्तेला विरोध करण्याचे सामर्थ्य नसते.मारीचा सारखा बलिष्ठ सेवक सुध्दा जुलमी आणि भ्रष्ट सत्ताधरांच्या अधिन असतात,ही वस्तुस्थिती जुलमी,भ्रष्ट,तत्वशून्य लोकं जाणतात, म्हणुनच ते फसवणुकीचा मार्ग जवळ करुन कट कारस्थाने रचुन आपली सत्ता प्रयत्न इतिहासकाळापासुन ते आजपर्यंत करीत आहेत.खोट्या बातम्या,फसवी हूल,एकतर्फी प्रसार माध्यमें,चित्ताकर्षण पण खोट्या घोषणा,भ्रामक व मायावी बोलणे यासारख्या उपायांनी आपले सत्ता स्थान टिकवण्याचा प्रयत्न भ्रष्ट नेते आणि जुलुमशहा करीतच असतात, रावणानेही तेच केले.

        युध्दाचे डंके,भेरी!शंखाच्या नादात वानरसैन्य लंकेच्या दिशेने आगेकुच करुं लागले.रावणाचे आजोबा माल्यवान यांनी रावणाला शेवटचे समजावण्याचा, समोपचाराने वागण्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न करीत म्हटले,रामाबरोबर संधी करुन सीतेला रामाकडे सादर पाठव!पण जुलमी शासक योग्य व नेक सल्ला ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात.रावणा चे तेच झाले.रावणाला त्यांचे बोल तर पटले नाहीच उलट फंदफितूरीचा आरोप केला.मोडेन पण वाकणार नाही.वानर सेनेसहित मी रामाला ठार करण्याचा माझा निर्धार कायम आहे.रावणाचे बोलणे ऐकुन दुःखी अंतःकरणाने माल्यवान सभेतुन निघुन गेले.माल्यवान जातांच मंत्र्यांबरोबर मसलत करुन लंकेच्या बंंदोबस्त करण्याची आज्ञा दिली

        रावणाला वाटत होते,अथांग सागरा मुळे आपण लंकेत सुरक्षित आहोत,पण रामाने समुद्रावर पूल बांधुन रावणाचे मनोधैर्यच खच्ची करुन टाकले.सत्य जर  सामार्थ्यशाली आणि आग्रही असेल तर, असत्य त्याच्यापुढे परास्त होते.सुवेळी पर्वतावरुन निघालेल्या वानर सैन्याने भल्या पहाटे लंकेला वेढा घातला ही बातमी समजतांच रागाने क्रुध्द झालेल्या रावणाने लंकेच्या रक्षणाची व्यवस्था जास्त सतर्क व मजबूत करण्याची आज्ञा  देऊन,प्रासादाच्या उंच मनोर्‍यावर चढुन निरिक्षण करीत असतां,सोन्याची लंका सर्व बाजुंनी वानरांनी वेढलेली दिसली. वानर सेनेच्या हाती हत्यारे कोणती तर, मोठे पत्थर,समुळ उपटलेली झाडे!वानर लंकेच्या कोटातील दरवाजांना वृक्षांच्या मोठ्या खोड्यांनी धक्के मारत होते,तर कांही दगड,माती,गवत,लाकडे टाकुन लंकेभोवतीची स्वच्छ पाण्याची खाई भरत होते.विश्वविजेत्या जुलमी रावणाने पाहिलेले हे दृष्य इतिहासाला नविन नव्हते.फ्रेंच राज्यक्रांतीच्यावेळी अशीच कांहीशी स्थिती लुईस राजाने पाहिली होती.त्याचा राजवाडा,भणंग,कंगाल लोकांनी हातात काठ्या,तलवारी,सुरे, दगडधोंडे घेऊन घेरला होता.अशाप्रकारे रशियन क्रांतीतील झारशाहीचा शेवट झाला होता.

       देवांचाही पराभव करणार्‍या रावणा च्या राजधानीच्या पराकोटाला पदातीत रामाच्या साध्या वानरसेनेने वेढा घातला हे इतिहासाला धरुनच होते.इतिहासाचा अनुभव आहे,क्रुर हुकुमशहा,जुलमी राज्यकर्ताल्या आपली चुक कधीच दिसत नाही.फ्रेंच राज्यक्रांतीच्यावेळी लोकांनी जेव्हा राजवाडा घेरला होता, तेव्हा सर्व युरोप पादाक्रांत करणार्‍या नेपोलियन बोनापोर्ट म्हणाला होता की, राजाने जर जनतेसमोर चुक सुधारण्याची ग्वाही दिली तर हा उद्रेक लगेच शांत होऊ शकतो पण….?श्रीरामांनी वालीपुत्र अंगदला राजदूत नेमुन रावणाकडे पाठवुन युध्द टाळण्याचा शेवटचा केलेला प्रयत्न विफल झाला.  

       वानरांनी लंकेला दिलेला वेढा पाहुन संतापलेल्या रावणाने आपल्या राक्षस सैन्यांना वानरांवर हल्ला करण्याचा आदेश दिला.दोन्ही सैन्यात तुंबळ युध्द सुरु झाले.दिवसभर राक्षस व वानरसैन्या त घनघोर लढाई सुरु होती.रणांगणावर मोडलेले शस्रे,रथं शरीरांचे तुटलेले अवयव,मरुन पडलेले राक्षस व वानर यांचा खच पडला होता.आणि सूर्य अस्त झाला.

              क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी  देशमुख.
        दि.  १३-३-२०२१.

!!!  अभिनव रामायण  !!!

भाग  –  ३४.

         अंधार पडला,रात्र झाली तरी, क्रोधाने वेडे झालेले दोन्ही पक्ष जीवाची पर्वा न करतां लढतच होते.रक्ताच्या नद्या वाहु लागल्या.रात्रीच्या अंधारांत राक्षस उत्साहाने श्रीरामांवर  बाणांची वृष्टी करीत असतांना,रामांनी तेजस्वी बाण सोडल्याने राक्षस पडुं लागले.इंद्रजीतच्या अधिपत्याखालील सैनिक वानरांवर त्वेषाने हल्ले चढवित होते.अंगदने रावण पुत्र इंद्रजीतलाच रथावरुन खाली खेचुन प्रखर तडाख्यांनी घायाळ केले.मग मात्र चिडलेल्या,पुर्वी इंद्राला पराभूत केलेल्या इंद्रजीतने सर्पास्र सोडुन रामाला बांधले व लक्ष्मणाला बेहोश केले.रामलक्ष्मण बेशुध्द पडलेले पाहुन त्याला आणखीनच कैफ चढला.नील,जाम्बुवान,गवाक्ष,शरभ हे वानरवीरही घायाळ झाले,हनुमानांना सुध्दा कांही जखमा झाल्या.बेशुध्द पडलेल्या राम लक्ष्मणला मेलेले समजुन,  युध्द जिंकल्याच्या,ज्या शत्रुमुळे त्याचे वडिल रावणांना कित्येक रात्री सुखाची झोप नव्हती,ज्यांच्यामुळे लंकेत क्षोम माजला,ते राम लक्ष्मण पराभूत होऊन गतप्राण झाले,लंकेच्या अनर्थाचे मुळच नष्ट झाल्याच्या आनंदात इंद्रजीत लंकेत परतला.

        इंद्रजीतने फेकलेल्या सर्पमयी मृत्यु पाशातुन मुक्त होऊन पुन्हा युध्दास उभे ठाकलेल्या रामाचा प्रचंड जयघोषाच्या आवाजाने रावण चपापला.ज्या अग्नी बाणांनी यापुर्वी शत्रुंचे बळी घेतले होते,ते बाणच आज निष्पभ झाले आहेत, अत्यांतिक संतापाने फुत्कारत, धुम्राक्ष राक्षसाला प्रचंड सेनेसहित रामावर हल्ला करण्याची आज्ञा दिली.दोन्ही सैन्यात घनासाम युध्द सुरु झाले.धुम्राक्षाच्या भयंकर शस्रस्रांच्या मार्‍याखाली वानर सैन्य चिरडले जात आहेसे पाहुन,क्रुध्द हनुमानाने एक मोठी शिळा धुम्रासाच्या रथावर भिरकावल्याने रथाचा चकनाचूर झाला.लगेच दुसरी शिळा फेकुन धुम्राक्ष त्या शिळेखाली दबुन गतप्राण झाला.ही बातमी रावणाला कळतांच त्याने राक्षस प्रमुख वज्रदंताला सेनाधिकार देऊन पाठविले. वानर-राक्षसांमधे जोरांत संग्राम सुरु झाला.वज्रदंताच्या बाणांच्या वर्षावाने भयभीत झालेल्या सैनिकांना धीर देत अंगद पुढे सरसावला.वानरसेना प्रमुख अंगद व राक्षससेनापती वज्रदंत यांच्यात आमने सामने युध्द सुरु होऊन एकमेकांवर घात-प्रतिघात करीत,शेवटी अंगदच्या तीक्ष्ण तलवारीने वज्रदंताचे शीर उडाले.

       वज्रदंताच्या वधाची बातमी समजतांच,अस्र शस्र पारंगत,सैनिकांचे रक्षण आणि संचालनांत प्रविण,अकम्पन याला सेनापती नेमुन ससैन्य पाठवले. युध्दाची आग प्रखर झाली होती.अकंपन च्या शस्रमार्‍याने वानरसैन्य माघार घेतसे पाहुन,हनुमान अकंपनावर चालुन गेला.अकम्पानने हनुमानाला घायाळ केले पण,जखमांची पर्वा न करतां वृक्षाच्या एका फटक्यात ठार केले.

      अकम्पनच्या मृत्युने मात्र रावण थोडा विचलित झाला.मंत्र्यांबरोबर विचारविमर्ष करुन सैनिकमोर्च्याची स्वतः पाहणी केल्यावर,मुख्य सेनापती प्रहस्ताला तात्काळ मोठ्या सैन्यासह निर्णायक हल्ला करण्यास रवाना केले.जातां जातां प्रहस्त रावणाला म्हणाला,महाराज!मी निर्णायक  युध्दास निघालोय,परत येईल न येईल,शेवटची एकच विनंती आहे. झाला एवढा विनाश खुप झाला.आतांही लंकावासीयांचे कल्याण,हीत साधायचे असेल तर,सीतेला ससन्मान रामाकडे परत करावे.प्रहस्ता! आतां खूप उशीर झाला.माझ्यासारख्या बलाढ्य राजाने युध्दाच्या मधेच माघार घेणे योग्य नाही. तसंही  सीता अपहरण हे एक निमित्य आहे.मला जर तीचा एवढाच मोह असतां तर,वर्षभर थांबलोच नसतो.रामाने शुर्पण  खाची केलेली विटंबना,अपमान हा एक प्रकारे लंका साम्राजाचा आणि पर्यायाने माझा अपमान होता.आणि त्यासाठी रामाबरोबर युध्द हाच पर्याय होता.युध्दा चा निर्णय मी जाणतो.जा..प्रहस्ता..जा!प्राणांवर खेळुन निर्णायक युध्द लढ..जा!

       जगज्जेत्या रावणाचा सरसेनापती, राजेशाही इतमामाने प्रचंड सेना घेऊन निघाला.भीषण युध्दात तुटलेल्या अवयवांचे,मृतदेहांचे खच पडलेत.प्रहस्ता  चे अनेक सहाय्यक योध्दे मारल्या गेल्या मुळे त्याने आपला हल्ला जास्त प्रखर केलेला पाहतांच,नीलने शालवृक्षाच्या तडाख्याने प्रहस्ताचा रथ भग्न केला. सारथी मारल्या गेला,घोडे घायाळ केले. प्रहस्ताने भयानक मुसळाने नलाला जबरदस्त तडाखे मारल्याने,चिडुन नीलने प्रचंड शिळेच्याफ प्रहराने प्रहस्ताचे मस्तक चिरडुन टाकले.राक्षसांचा सरसेना पती रक्ताच्या थारोळ्यांत मरुन पडला.

             क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि.  १३-३-२०२१.

!!  अभिनव रामायण  !!

भाग –  ३५.

        इंद्रालासुध्दा भारी असलेल्या प्रहस्ताच्या मृत्युने रावणाला विलक्षण धक्का बसला.दुःख,रागाच्या आवेशात रावण मंत्रीगणांना म्हणाला,ज्या वानरांना मी नगण्य समजत होतो,त्यांनीच माझ्या दुर्दम्य सेनापतीस मारले.आतां मात्र या संग्रामात मलाच उतरणे भाग आहे.प्रचंड सैन्यासह विश्वविजेता रावण रामाबरोबर लढण्यास लंकेबाहेर पडला.रावणाला येतांना पाहुन,श्रीराम म्हणाले,देव,दानवां ना दुर्लभ अशी कांती असलेल्या राक्षस राजाचे तेज प्रखर आहे.या सीतेच्या अपहरणकर्त्या पाप्याला योग्य शासन मी देणारच!

       रावण येतअसलेला दिसताच वानर राज सुग्रीवाने पर्वत शिखराएवढी मोठी शिला उचलुन रावणावर धावुन गेला असतां रावणाने बाणांनी वेधून त्या शिळेचे तुकडे तुकडे केले.अग्निच्या ठीणग्या उडवित वेगाने येणारा बाण वर्मी बसुन सुग्रीव घायाळ होऊन पडला.

         आपला राजा पडलेला पाहतांच, गवाक्ष,गवय,ऋषभ,ज्योतीर्मुख आणि नल रावणावर चोहोबाजुंनी चालुन गेले. रावणाने त्या सर्वांना शरसंधानाने परास्त केले.प्रमुख वानरयोध्दे घायाळ होऊन जमीनीवर पडल्यावर,रावणाने मोठ्या प्रमाणावर नाश करण्यास सुरुवात केली.

वानरांचा विनाश पाहुन,क्रोधीष्ट हनुमाना ने रावणाच्या रथावर उडी मारुन,त्याच्या छातीवर जोरदार बुक्का मारला.रावणा च्या डोळ्यासमोर अंधारी आली, पण क्षणभरच!स्वतःला सावरुन रावणाने दिलेल्या तडाखेबंद थापडीने हनुमानाचा जीव कासावीस झाला.लगेच सेनापती नलावर तीक्ष्ण बाणांनी वर्षाव करुं लागला.नलही कांही कमी नव्हता,त्याने सुध्दा रावणाला त्रस्त केले.आग्नेयास्र नलावर सोडल्याने घायाळ होऊन नल जमीनीवर पडला.

      नल परास्त झालेला पाहुन शस्रास्रे घेऊन लक्ष्मण पुढे सरसावला.रावण लक्ष्मणाचे घनघोर युध्द सुरु झालं लक्ष्मण आटोपत नाहीसे पाहुन अग्निस्र शक्ती लक्ष्मणावर सोडल्याने तो घायाळ होऊन जमीनिवर पडलेला पाहतांच, हनुमान रावणाच्या अंगावर धावत जाऊन एक जबरदस्त भीमटोला दिला. क्षणभर जगज्जेत्या रावणाने जमीनीवर गुडघेच टेकले.कांही काळ रावणाला भोवळच आली.तेवढ्या अवधीत हनुमानाने लक्ष्मणाला उचलुन सुरक्षित स्थळी नेऊन ठेवले.लक्ष्मणाला घायाळ करुन शक्ती पुन्हा रावणाकडे परत आली      

         मोठ्या त्वेषाने लढाईसाठी राम पुढे सरसावले.रावणाच्या रथाचे घोडे मारले,सारथी जखमी झाला,ध्वज तुटला रथ खिळखिळा झाला आणि वज्रास्राने रावणाच्या छातीवर आघात केला.अनेक लढाया लढलेला,कुठल्याही शस्राने हतबल न होणारा रावण,रामाच्या बाणाने घायाळ झाला.हातातुन धनुष्य गळुन पडले.नंतर रामांनी उसंत घेतलीच नाही. लगेच रामाने अर्धचंद्राकृती बाण सोडुन रावणाचे तेजस्वी मुकुट उडवले.कळाहीन रावणाला राम म्हणाले,तू थकलेला असल्यामुळे सोडुन देतो,लंकेत जाऊन विश्रांती घेऊन परत शस्रास्रसज्ज होऊन परत माझ्याशी लढायला ये!

          अभिमान गळुन पडलेला,घोडे सारथी मारल्या गेलेला,धनुष्य तुटलेला, विश्वविजयी महान किरिट तुटुन पडलेला, रामांच्या बाणांनी जखमी झालेला पराजित रावण लंकेकडे परत फिरला.

          एकट्या हनुमानाने लंकेत किती गोंधळ घातला हे रावणाला दिसले नव्हते कां?एकट्या पादचारी रामाने खर-दुषणां सारखे प्रबळ राक्षस त्याच्या सैन्यासह नष्ट केले हे रावण विसरला होता कां?ज्या वानरसैन्याला राम घेऊन आले,त्या बळाची कल्पना रावणाला नसेल कां? दुर्लभ समुद्र ओलांडुन,रावणाच्या दुर्गम नगरीला रामाने वेढा घातला,शिवाय गुप्त चरांनी वेळोवेळी दिलेल्या माहीतीवरुन, राम व त्यांच्या सैन्याचे सामर्थ्य रावणाने ओळखले नसेल कां?इतकी अवघड परिस्थिती असतांना,रामाचा पक्ष वरचढ आहे हे उघड असतांना,प्रथम आपले सेनापती रामाबरोबर लढण्यास कां पाठवले?सेनापती मारल्या गेल्यावर, रावण युध्दास आला ही रावणाची सिंहासनाला,खुर्चीला चिटकुन राहण्याची  वृत्ती असेल का?की खोट्या अहंकाराला कुरवाळीत बसला?या खोट्या अहंकारा मुळेच बिभिषण,माल्यवान,पत्नी मंदोदरी  यांचा सीतेला परत पाठविण्याचा सल्ला मानला नाही.एवढेच नव्हे तर,सेनापती प्रहस्त युध्दाला निघतेवेळी,लंकेचे हीत लक्षात घेतां,सीतेला परत पाठविण्याचा दिलेला सल्ला मानला नाही.

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                         

अभिनव रामायण  संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading