संत चोखामेळा संपूर्ण चरित्र + अभंग भाग ५, (२१ ते २५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! !

! ! !  संत चोखामेळा ! ! !

भाग – २१.

 चोखोबाने नुसते पंढरपूरात येणे, संतसहवासात जीवन व्यतीत करणे, भक्तीसंप्रदायाची माहिती करुन घेणे, अभंगरचना करणे एवढेच पांडुरंगाला अपेक्षित नव्हते तर चोखोबा त्याच्या आणखी जवळ यायला हवे होते. त्या साठी पांडुरंगाला आणखी कठोर खेळी करावी लागणार होती. या खेळात चोखा कदाचित मनाने कोसळणार होते, पण लौकिकदृष्ट्या ते जितके मनाने कोसळती ल तितकेच पारमार्थिकदृष्ट्या देवाच्या जवळ होतील. आई वडीलांच्या दुःखाने चोखोबा जरी सावरले तरी सोयराला शक्य होत नव्हते. तरीबरं शेजारचे गणा काका व त्यांची पत्नी भागीरथीकाकीचा या दोघांना फार मोठा आधार होता.  त्यांची सून गंगा गोधड्या खुप छान शिवायची. त्यामुळे अनेक घरांतुन शिधा देऊन गोधड्या घेतल्या जात होत्या. गंगा चा नवरा लक्ष्मणाला कांही व्यसने होती, सासु सुनेचा सुसंवाद नसल्यामुळे सतत घरांत भांडणे, कलह मारामारीपर्यत प्रकरण जायचं. मग चोखा व सोयरा त्यांची भांडणे सोडवायचे.

 एक दिवस लक्ष्मण कुर्‍हाड घेऊन गंगाच्या अंगावर धावून गेला असतां चोखांनी कसंबसं भांडण सोडवलं, आणि हा प्रश्न कायमचा सोडवण्याचा निश्चय केला. एक दिवस गणाकाकांच्या घरचे सगळे नीट आहेत हे पाहुन चोखोबांनी त्या सर्वाना खूप समजावले. त्याचा परिणाम होऊन गणाकाकांच्या घरांतील लोकांचा दृष्टीकोण बदलला. एक मोडु घातलेलं घर, एक विस्कटलेला संसार सांधला गेला. भागीरथीचा सोयराला खूप आधार वाटायचा.

 एके दिवशी सकाळपासुनच सोयरा अस्वस्थ होती. आज भागीरथीही गांवाला गेलेली. रात्री किर्तन ऐकुन चोखोबा घरी परतल्यावर सोयराची अवस्था बघुन तेही घाबरले. पण त्यांना घाबरुन चालणार नव्हते. धीर देत म्हणाले पांडुरंगावर विश्वास ठेव. मी लगेच जाऊन सकाळपर्यंत निर्मळाला घेऊन येतो तोपर्यंत हिम्मत ठेवुन विठोबाचे नामस्मरण कर. तो पाठीशी असल्यावर काळजीचे कारण नाही. कृष्णजन्मावेळी जसं वातावरण होतं तसच आज आहे.

आपल्याला अगदी कृष्णासारखा पोरगा होईल बघ!  आतांच्या कठीण प्रसंगी तोच पाठीशी उभा राहिल, त्याने गोरोबाचे बाळ जिवंत केले. जनाबाईसाठी वाटेल ती कामे केलीत, मग आपल्याला नाही कां मदत करणार?मी लगेच जाऊन निर्मळा ला घेऊन त्वरेने परत येतो. असा धीर देऊन चोखोबा बाहेर पडले.

 चोखोबांच्या शब्दांनी खरोखरच सोयराला धीर आला. तिचाही विठुराया वर गाढ विश्वास होता. पावसाचा, व वार्‍याचा जोर वाढला होता, छोटसा दिवा विझला. खोपटात भयान अंधार पसरला.  विठ्ठलाचे नांव घेत पडुन होती. खोलीत सगळीकडे ओल आली होती. तीचा कधी तरी डोळा लागला. जमीनीच्या थंडगार स्पर्शाने तीला जाग आली आणि एक जीवघेणी कळ ओटीपोटातुन आली आणि कळा येतच राहिल्या. कळांचा जोर तिव्रता वाढली. आणि असा एक क्षण आला की, वेदना तीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेल्या, तोंडातुन किंकाळी फुटली.  पांडुरंगाचा आर्त धावा व किंकाळ्या सोयरा ओरडतच होती. कोसळणार्‍या पावसाचा तडतड आवाजाला वार्‍याच्या आवाजाचीही साथ, त्यांत सोयराच्या किंकाळण्याचा आवाज दबुन गेला.  किंचाळण्याबरोबर पांडुरंगाचा धावा सुरु असतांनाच हळुहळु शुध्द हरपु लागली.  शुध्दी बेशुध्दीच्या सीमारेषेवर तरंगत असतांना जोराची कळ आली व मदती साठी देवाचा धावा करुं लागली. पुन्हा शुध्द हरपत होती. असं चालु असतांनाच अचानक झोपडीचा दरवाजा उघडला गेला. अर्धवट शुध्दीत असणार्‍या सोयराला उघडलेल्या दारातुन विलक्षण प्रकाशाची तिरीप आंत येऊन सारी झोपडी क्षणभरासाठी उजळुन निघाली.  आणि परत अंधार पसरला. त्या क्षणभरा च्या प्रकाशरेषेत निर्मळा दिसली. तीला बघुन आतांपर्यंत एकवटलेला धीर कुणी तरी मदतीला आल्याचे पाहुन संपला आणि दुसर्‍याच क्षणी बेशुध्द झाली. त्या नंतर पुढे काय झाले तीला कळलेही नाही.

 सकाळ झाली. आकाश निरभ्र झाले. सूर्याची कोवळी किरणे छताच्या झरोक्यातुन आंत आली. सोयराला कसल्याशा आवाजाने शुध्द आली. जवळ कसलीशी हालचाल जाणवल्याने मोठ्या कष्टाने मान वळवुन बघीतले तर, इवलासा कोवळा जीव कुशीत मुठी चोखता शांतपणे पहुडला होता.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  १७-४-२०२१.

भाग – २२.

 आतांपर्यंत आपल्या कुशीत बाळ निजलय ही जाणीव सोयराला नव्हती, पण आपण आईच्या कुशीत असल्याची जाणीव त्या कोवळ्या जिवाला नक्कीच होती. कुशीत वळवळणार्‍या बाळाला पाहुन ती अंतर्बाह्य थरारली. तीला आठवली ती कालची वादळी रात्र, तो घोंगावणारा वारा, तो प्रलयंकारी पाऊस, भयान अंधार, पोटातुन येणार्‍या त्या जीव घेण्या कळा, मारलेल्या किंकाळ्या, केलेला देवाचा धावा, असहाय्य एकटे पणा, ती हरपणारी शुध्द आणि शुध्द हरपण्यापुर्वी आलेली निर्मळा! निर्मळा? खरच कुठाय निर्मळा?धनी कुठाय? निर्मळा तर एकटीच दिसली. असेल बाहेर काम करत. एवढ्या विचारानेही तिला थकवा आला. कांही वेळ गेला, बाहेर कांहीच चाहुल लागेना. तिला प्रचंड भूक लागली होती. तिने निर्मळा म्हणुन आवाज दिला पण प्रत्युत्तर आले नाही.  तशीच हात टेकत सावकाश उठली. कशी तरी चुलीजवळ जाऊन कालचे अन्न खाल्ले. प्रसुतीवेदनाने शिणलेले शरीर, अन्न पोटात गेल्याने थोडे बरे वाटले. ती कशीतरी अंथरुणापर्यंत आली व तीला झोप लागली. दरवाजा उघडण्याच्या आवाजाने तीला जाग आली, बघते तो काय?दारांत चोखोबा व निर्मळा! श्रांत, क्लांत निजलेली सोयरा, कुशीत पहुडलेले बाळ! चोखोबा व निर्मळा सोयराकडे धावले. सोयरा कशी आहेस?भागीरथी काकी आली होती कां? खुप त्रास झाला कां ग?लवकर येतो म्हणुन गेलो पण, पावसाने वाट अडवली. निर्मळेकडे पोहचायलाच मध्यरात्र झाली. तिथे जराही न थांबतां निर्मळाला घेऊन तडक निघालो पण येतांनाही नदी नाले वैरी बनुन वाट अडवली. येईस्तोवर उजाडलेच बघ! मुलगाच झाला ना ग गोपालकृष्णा सारखा?सोयरा चोखाचे बोलणे ऐकुन भांबावुन गेली. तीला कांहीच कळेना, उलगडा होईना! रात्री निर्मळा आलेली बघीतल्यावर तीची शुध्द गेली. सकाळी शुध्द आली तेव्हा बाळ कुशीत, पण घरांत तर कुणीच नव्हतं. सोयराचे बोलणं ऐकुन चोखोबा व निर्मळा गोंधळले. कारण ते दोघे तर सध्याच आले होते.

 निर्मळाने तिला आंघोळ, जेऊ घातल्यावर सोयरा शांत झोपली. जाग आली तेव्हा उन्ह उतरले होते. एवढ्यात सोयरा सोयरा अशा हाका मारत भागीरथी आली. सोयराच्या कुशीत बाळ बघुन तीला आश्चर्याचा धक्काच बसला.  रात्रीच्या वादळ वार्‍याने कशी अडकुन पडली व आतां आली हे सांगतांना म्हणाली, भटा ब्राम्हणांचे आशिर्वाद कधीच वाया जात नाही. यावरुन सोयरा ला आठवले, लग्नाला ३-४ वर्षे उलटली तरी कुस उजवत नाही म्हणुन सतत हसमुख असणारी सोयरा उदास एकटीच बसली असतां, एक ब्राम्हण तिच्या दारी येऊन भिक्षा मागु लागला, पण आपण क्षुद्र जातीचे असल्यामुळे घरांत अन्न असुनही देण्याचे धाडस होत नव्हते. पण तो ब्राम्हण कांहीच ऐकायला तयार नव्हता. तिथेच बसकण मारत निर्वाणी च्या स्वरांत म्हणाला, माई! मी दोन दिवसांचा उपाशी आहे, खुप लांबुन चालत आल्यामुळे आतां एक पाऊलही चालवत नाही. तूं अन्न दिले नाही व उपासाने माझा मृत्यु झाला तर पातक तुझ्या माथी लागेल. सोयरा घाबरली.  इकडे आड न् तिकडे विहिर!  अन्न द्यावे तर पाप नाही दिले तर शाप! काय करावे तिला कळेना. शेवटी मनाचा हिय्या करुन दहीभात आणुन म्हणाली, पाप लागणार नाही असा आशिर्वाद द्या. माई!  भूकेलेल्याला अन्न दिल्याने पाप न लागता पुण्यच लागेल. मनापासुन आशिर्वाद देत म्हणाला, पुत्रवती भव!  आणि तृप्त मनाने निघुन गेला.

 भागीरथीच्या म्हणण्यानुसार ती व सून गंगा आताच आल्यात, निर्मळा आपल्यासोबत होती. मग?विचार करुन चोखोबाच्या डोक्याचा भुगा झाला, आणि एकदम या सगळ्या महानाट्याचा अर्थ लक्षात आला नी डोळ्यांना धारा लागल्या अनन्यभावे हात जोडत भरल्या मनाने म्हणाला, विठूराया तूं धन्य आहेस. सार्‍या जगाने लाथाडले, त्याला तूं जवळ केलेस.  माझ्या माघारी सोयराचे बाळांतपणही केलेस. खरा भक्तवत्सल, पाठीराखा आहे.  सोयराss अग!  प्रत्यक्ष भगवंताने तुझे बाळांतपण केले. मी करंटा, माझी भक्ती कमी पडली, आपल्या घरी प्रत्यक्ष विठोबा येऊनही मला दर्शन नाही झाले. खरोखर तूं भाग्यवान आहेस. त्याहीपेक्षा आपला हा बाळ! प्रत्यक्ष पंढरीराया, माझा विठूराया घरी आला. सार्‍या घराचं सोनं झालं.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख. .

 दि.  १७-४-२०२१.

भाग – २३.

 चोखोबा, सोयरा! निर्मळाच्या लक्षात बोलण्याचा अर्थ आला नी तिघेही रडायला लागले. भागीरथीला कळेना, मुलगा झाल्याचा आनंद न मानतां कां रडताहेत?ती निघुन गेली.

 चोखोबा आपल्या आणखी निकट यावा म्हणुन पांडुरंगाने नियतीला विश्वासात घेऊन मातापित्याचा वियोग घडवुन आणला. पण त्या वादळी रात्री सोयराचा प्रसुतीकाळ जवळ आला, घरी दारी कुणीच नाही. ती आर्ततेने आपल्या ला हाकारत आहे तेव्हा, भक्तांचा पाठीराखा परमेश्वर निर्मळा बनुन तिच्या सहायार्थ धावुन जाऊन तिची सुटका केली.

 आपल्याला मुलगा झाला या आनंदापेक्षा प्रत्यक्ष विठ्ठल घरी येऊन सोयराचे बाळांतपण केले या गोष्टीचा चोखोबाला अतिशय आनंद झाला. या सार्‍या घटनेमुळे ते दोन दिवस किर्तनाला गेले नाहीत. असे कधी घडले नाही. म्हणुन चौकशीकरीतां गोरोबा घरी आले. मुलगा झाल्याचे कळल्यावर, चोखोबाची पाठ थोपटत म्हणाले, हे मूल तुमच्यासारखं कष्टाळु, विठ्ठलभक्त आणि तल्लख बुध्दीचा होणार बघा! गहिवरुन चोखांनी घडलेली घटना सांगीतल्यावर त्यांच्याही डोळ्यांना धारा लागल्या. धन्य! धन्य! धन्य चोखोबा! तुमच्या भक्तीचे सामर्थ्य मोठे आहे. तुम्हा दोघांपेक्षा नशीबवान तुमचा मुलगा! त्याचा जन्म प्रत्यक्ष इश्वराच्या हातुन झाला. चोखोबा!  लेकराचं नशीब त्याच्या कपाळावर सटवाई लिहिते, पण तुमच्या लेकराचं कर्म तर प्रत्यक्ष देवानेच लिहिले. त्याच्या कर्माचा, कल्याणाचा मेळ प्रत्यक्ष पांडुरंगानेच लिहिले आहे. म्हणुन तुमचा मुलगा साक्षात कर्ममेळा आहे.  चोखोबांना अतिशय आनंद झाला.

 सोयराला पांच दिवस झाल्यावर चोखोबा किर्तनाला गेल्यावर सर्वांनी त्यांचे मनापासुन अभिनंदन केले. नामदेव म्हणाले, प्रत्यक्ष पांडुरंगाने तुम्हाला जवळ केलेय आणि बाप पण झालात, या दोन्ही गोष्टींचा आनंदोत्सव व बारसे तुमच्या घरी सर्वमिळुन सहभोजन करुन साजरा करुया! सध्या ज्ञानेश्वर माऊलीचा मुक्कामही नेवाशात आहे, त्यांनाही तुमच्यावतीने आमंत्रण देतो. चोखोबांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. गदगदुन म्हणाले देवा! खरचं?तुम्ही सगळे माझ्या, या क्षुद्र चोखाच्या घरी जेवायला येणार? माझ्या घरी शिजलेले अन्न खाणार?मी क्षुद्रातिक्षुद्र, अस्पृश्य जातीतला, समाजाने बहीष्कृत केलेला, तुम्ही सारे माझ्या घरी बसुन जेवणार?तुम्ही माझी चेष्टा तर करीत नाही ना?अश्रू भरलेल्या गहिवरल्या आवाजात चोखोबांचे मुखातुन शब्द उमटले. . . . .

“तुम्हासी शरण बहुत मागे आले ।

तयाचे साहिले अपराध ।

तैसा मी पामर यतिही न देवा ।

माझा तो कुढावा करा तुम्ही  ।  ।

नाही अधिकार उच्छिष्टा वेगळा ।

म्हणवोनी कळवळा पाळा माझा  ।  ।

चोखा म्हणे मज कांही ते न कळे ।

नामाचिया बळे काळ कंठी  ।  । “

देवा या समाजामधे अशी अवस्था असतांना आपण सर्व माझ्या घरी जेवायला येणार यापरते भाग्य ते कोणते आपल्या सर्वांच्या रुपाने प्रत्यक्ष देवच जेवायला येणार, माझे पूर्ण घर धन्य पावेल. अत्यानंदाने घराकडे निघाले असतां, त्यांना थांबवत नामदेव म्हणाले, तुम्ही बरेच दिवसांपासुन ज्या गोष्टीची मागणी, हट्ट, आग्रह करीत होता, ती गोष्ट, तुमच्या मुलाच्या जन्माप्रित्यर्थ माझेकडुन प्रेमाची भेट देतोय. आज तुम्हाला माझा शिष्य करुन गंडा व गुरुमंत्र देतो.

 चोखोबांचा आनंद गगनात मावेना.

अनन्यभावे शरण जाऊन आपल्या अश्रूंनी त्यांच्या पायावर अभिषेक करीत राहिले. नामदेवांनाही गहिवरुन आले.  खांद्याला धरुन उठवित म्हणाले, चोखोबा

“वर्म आले नाही हाता । तोवरी वाव सर्वथा

नामा म्हणे चोखासी । खूण कळली नाही तुसी  ।  । ” चोखोबा!  तुम्हाला गुरुमंत्र देतोय, चोखोबाच्या मस्तकावर नामदेवां नी हात ठेवला, डोळे मिटले, मन स्थिर केले. सगळे लक्ष कुंडलिनीवर एकवटले, आपल्यातली सगळी ऊर्जा हातात आणली आणि “विठ्ठल विठ्ठल” हा त्रिक्षरी मंत्र देऊन आपले शिष्यत्व बहाल केले.

 चोखोबांच्या मस्तकावर ठेवलेल्या हातातुन जणूं एक संजीवक ऊर्जा बाहेर पडली आणि चोखोबा नखशिखांत थरारले. देहाचा अणूरेणू जणूं विठ्ठलरुप झाला. नामदेवांनी उच्चारलेल्या “विठ्ठल विठ्ठल” या तीन अक्षरी मंत्रानी त्यांच्या शरीरातल्या सगळ्या चेतनांच्या तारा झंकारल्या. विठ्ठल विठ्ठल हे नांव शरीराच्या प्रत्येक बिंदुतुन निनादत, रक्ताच्या प्रत्येक थेंबातुन वाहत, नख शिखांत शरीरभर पसरले आणि चोखोबां च्या सचेतन शरीराचा प्रत्येक अणूरेणू विठ्ठल विठ्ठल नावाने व्यापला. नामदेवांनी दिलेल्या त्रिक्षरी मंत्राने चोखोबा अंतर्बाह्य बदलले. सारे चैतन्य विठ्ठलमय झाले. धन्य धन्य झाले.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  १८-४-२०२१.

! ! !  संत चोखामेळा ! !

भाग – २४.

 अतिव आनंदाने सगळ्यांना स्नेह भोजनाचे आमंत्रण देऊन भारवल्या देही चोखोबा तरंगतच घरी पोहोचले. विठ्ठल विठ्ठल हा त्रिक्षरी मंत्र त्यांच्या रोमरोमी भिनला होता. मंत्राळलेल्या उन्मनी अवस्थेत सोयराला सारा प्रसंग सांगीतला “धन्य धन्य नामदेवा । केला उपकार जीवा चोखा म्हणे माझा धन्य गुरुराव ।

दाखविला देव ह्रदयी माझ्या  ।  । “

सोयराच्या आनंदाश्चर्याला पारावार राहिला नाही. तिचा मुळी विश्वासच बसेना आपले बाळांतपण करायला निर्मळाच्या रुपात प्रत्यक्ष परमेश्वर आले. आपणही कांहीतरी विशेष आहो अशा मनःस्थितीत तिच्यातली प्रतिभा जागी होऊन तिला स्फुरलेली अभंगरचना केव्हा चोखोबाला ऐकवतो असे झाले. थोडे निवांत झाल्या वर तिने केलेले काव्य. . .

“नाही उरली वासना । तुम्हा नारायणा पाहतां । उरला नाही भेदाभेद । झाले शुध्द अंतर । विटाळाचे होते जाळे । तुटले बळे नामाच्या । चौदेही सुटली दोरी ।

म्हणे चोखाची महारी ।  ।

अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।

मी तू पण गेले वाया । पाहता पंढरीच्या राया । नाही भेदाचे ते काम ।

पळोनी गेले क्रोध काम ।

देही असोणी तो विदेही ।

सदा समाधीस्त पाही ।  ।

पाहते पाहणे गेले दुरी ।

म्हणे चोखाची महारी ।  । “

उत्कट भावनेने भरलेला आणि पांडुरंग भक्तीने भारलेला सोयराने रचलेला अभंग ऐकल्यावर चोखा स्तिमित झाले. आपली बायको समंजस, हुशार, चतूर, शहाणी आहे हे त्यांना माहित होते. तिला सरस्वती चे वरदान आहे असा संकेत नामदेवांनी दिला होता. पण ती उत्कृष्ट अभंग रचना करुं शकेल हे माहीत नव्हते. आपल्या सुखदुःखात खंबीरपणे साथ देणारी, घराण्याला वंशाचा दिवा देणारी, जीवा पाड प्रेम करणारी, आपल्या इतकीच पांडुरंगाची निरामय भक्ती अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्तही करुं शकते हे बघुन चोखोबा अचंभित झाले.

 आज बाळाचे बारसे होते. पंढरपूर च्या आसपासच्या परिसरांतील सगळा संत परिवार त्यांच्या घरी जेवायला येणार होते हे बारश्यापेक्षा जास्त अप्रुप होते.  त्यांत ज्ञानेश्वर माऊलीही येण्याची वदंता होती. नामदेवांना खात्री होती की, गावां तील ब्राम्हणकुळातीलही कुणी येऊन त्यांच्या घरचे अन्न खाणार, जेवणार, स्पृश्य-अस्पृश्यतेचा, विटाळ चांडाळ कसलाही भेदभाव न मानतां, धर्माचा, चातुर्वर्णाचा आणि समाजाचा कायदा धाब्यावर बसवुन, परंपरेच्या रितीरिवाजा चे उल्लंघन करुन सामाजिक नैतिकतेची रुढी मोडुन हे सगळं घडणार होते.  

“न भूतो न भविष्यति” अशी चर्चा इतके दिवस अत्यंत नगण्य, क्षुद्र असणार्‍या चोखोबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरणार होते.

 त्यांतच एक अतर्क्य घटना गेल्या कित्येक दिवसांपासुन प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरांत घडत होती. विठ्ठलाचा परम भक्त सज्जन ब्राम्हण, विठ्ठल मंदिराचा खास पुजारी, त्याच्याकडे विठ्ठल मूर्तीला पंचामृ ताचा अभिषेक घालुन विठ्ठलाची षोडशो पचार पुजा करण्याचे काम गेली कित्येक वर्षे केशवभटांकडे होते. एका मोठ्या पात्रात तयार केलेले पंचामृत मंदिरांत येणार्‍या भक्तांना प्रसाद म्हणुन देण्याचा शिरस्ता होता. पण अलिकडे जे पंचामृत गेले कित्येक वर्षापासुन मधुर लागत होते ते आतां कडू लागु लागले. असे काय घडले की, विठ्ठलाचे तीर्थ कडू बनावे?नक्कीच कांहीतरी पाप घडलं होतं किंवा गांवावर कांहीतरी मोठं संकट कोसळणा र होतं, त्यामुळे लोकं आधीच अस्वस्थ, भयग्रस्त होते, त्यातच ब्राम्हणकुळातील ज्ञानेश्वर, क्षुद्र जातीच्या चोखोबाकडे जेवणार, कदाचित याचमुळे देवाचा कोप होऊन तीर्थ कडू झालंं असावं असा तर्क वितर्क, कुतर्क सुरु होते. चोखोबाच्या घरचे बारसे आणि विठ्ठलाचे कडू होणारे तीर्थ याचा संबंध जोडुन घडणार्‍या गोष्टीचे खापर चोखोबाच्या डोक्यावर फुटणार होते.

 अखेर बारश्याचा दिवस उजाडला.  चोखोबाच्या घरी मोठी धांदल उडाली.  भागीरथी, सून गंगा, निर्मळा, सोयरा सगळीजणं स्वयंपाकाच्या तयारीत गुंतली होती तर चोखोबा, सेना, नरहरी सोनार, गणाकाका, मुलगा लक्ष्मण यांच्या मदतीने संतमेळाच्या आगत स्वागताची तयारी करीत होते. अंणासकट सर्व घर दार सारवुन त्यावर शुभ चिन्ह असणारी हळद कुंकु चुण्याची बोटं भिंतीवर उमटवली होती. अवघा परिसर पताकांनी सुशोभित केला होता. बाळाला जरीची कुंची, काजळाची तीट लावुन सजवले होते. एवढ्यात संतमंडळी आल्याचा पुकारा झाला.  पुढे गोरोबाकाका, त्यांच्या मागे साक्षात ज्ञानेश्वर माऊली सहस्र सूर्याचे तेज घेऊन अत्यंत शांत, स्निग्ध, नजरेने आसपासचा परिसर न्याहाळत धिमी पावले टाकत येत असतांना चोखोबा त्यांना सामोरे गेले.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 दि.  १८-४-२०२१.

! ! !  संत चोखामेळा ! ! !

भाग – २५.

 समोरचे दृष्य पाहुन सत्य की स्वप्न भास की आभास बघतोय असा प्रश्न चोखोबांना पडला. तेजांचा तेजेश्वर साक्षात ज्ञानसूर्य ज्ञानेश्वर माऊली, त्यांच्या समवेत त्यांचे गुरु निवृत्तीनाथ, धाकटे बंधु सोपानदेव आणि आदीशक्ती असं जीचं वर्णन केले जाते ती चिमुरडी मुक्ताई!  चोखोबांचा विश्वासच बसेना. या चार भावंडांच्या रुपाने साक्षात चार वेदच आपल्या घरी चालत येत आहे. चौर्‍यां ऐंशी लक्ष योनीनंतर मिळालेला हा मानव जन्म या एकाच जन्मात पराकोटीची धन्यता मिळाली या भावनेने चोखोबांना भरुन आले. क्षणार्धात ते ज्ञानदेवांच्या पायाशी कोसळले. डोळ्यांतील अश्रूंनी चारही भावांचे पाय धुतले. प्रत्येकाने त्यांना धरुन उठवून अलिंगन दिले. हे विहंग दृष्य पाहण्यास पंचमहाभूतांना डोळे फुटले. क्षणभर सारी सृष्टी निःस्तब्ध झाली. अशा या भारावल्यााअवस्थेत सारी संतमंडळी चोखोबांच्या घरी आली.

 हात जोडुन उभ्या असलेल्या चोखोबाला ज्ञानदेव म्हणाले, चोखोबा! या स्वच्छ सारवलेल्या जमीनीसारखेच तुमचे मन व अंतःकरनही निर्मळ आहे. या निर्मळ अंतःकरणावर विठ्ठल-विठ्ठल या दोन शब्दांची नाममुद्रा अशी कांही उमटली आहे की, अस्पृश्यतेचा पाला पाचोळा, जातीय संघर्षाचा कचरा आणी सामाजिक विषमतेचा काला याचं किती ही सारवण झालं तरी ही नाममुद्रा पुसली जाणार नाही इतकी कोरुन उमटली आहे तुमची विठ्ठलभक्ती धन्य आहे.

बाळाला बाहेर बोलावण्यात आले. प्रत्यक्ष पांडुरंगाने याच्या मातेची प्रसुती केली, याच्या कर्माचा मेळ प्रत्यक्ष विठ्ठलानेचा घातला म्हणुन याचे नांव “कर्ममेळा” ठेवावे. या अत्युच्च आनंदाच्या क्षणी विलक्षण भारावल्या अवस्थेत सोयराच्या मुखातुन उत्स्फुर्त शब्द बाहेर पडले.

“उपजता कर्ममेळा । वाचे विठ्ठल सावळा ।

विठ्ठल नामाचा गजर । वेगे धांवे रुख्मिणीवर ।

विठ्ठल रुख्मिणी । बारसे करी आनंदानी ।  । करी साहित्य सामुग्री । म्हणे चोखाची महारी ।  । “

जमलेल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. फक्त नामदेव अपवाद होते. लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही रुपे असलेली पत्नी चोखोबांना लाभली. एका अस्पृश्या च्या घरी असा देखाणा सोहळा होतांना बघुन गावकर्‍यांनी तोंडात बोटे घातली.

 जेवणाचा बेत मस्त होता. सगळ्यां ची पंगत बसली. हास्यविनोदात जेवायला सुरुवात करणार एवढ्यात, माऊलीss माऊलीss वाचवाss मला वाचवाss संकटss घोर संकटss देव कोपलायss कांही तरी करा माऊलीss असं ओरडत, किंचाळत केशवभट चोखोबाच्या घरांत शिरतां शिरतां, आपण कुठे प्रवेश करत आहो याचे भान आल्यावर उचलेले पाऊल झटक्यात मागे घेतला आणि बाहेर उभा राहुनच आरडाओरडा करायला सुरुवात केली. खोपटाच्या दारा समोरच ज्ञानेश्वर बसले होते. भक्तांना त्यांचे दर्शन घडावे या दृष्टीने नामदेवांनीच अशी व्यवस्था केली होती.

 चोखोबाच्या घरांत पत्रावळीवर जेवण्यास बसलेले ज्ञानदेव केशवभटांना दिसले. स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. कांहीतरी भयंकर बघतोय अशा अविर्भावात त्याने छाती पिटायला व आक्रोश करतांना पाहून क्षणभरच ज्ञानदेवांच्या कपाळावरची शीर टरारली.  पण क्षणभरच!  स्नेहार्द हसर्‍या चेहर्‍याने केशवभटाकडे बघत विचारले, असे आभाळ कोसळल्यागत काय झाले?ज्ञानेशांचा अधिकारवाणी स्वर ऐकुन केशवभट सटपटत, आकांत थांबवत पुढे झुकुन हात जोडीत म्हणाला, माऊली कांहीतरी अघटीत घडणार किंवा गावावर संकट येणार आहे. हे गार्‍हाणे घेऊन गावातील ब्राम्हणवृदांकडे गेलो असतां त्यांनी तुमच्याकडे पाठवले. ते म्हणाले, तो ज्ञानेश्वर व त्याची भांवडे सगळीकडे पातक करीत हिंडत आहे. धर्मबाह्य वर्तन करीत आहे. गावावर त्यांच्यामुळेच संकट येऊ घातले आहे. देव कोपला, तेव्हा त्यांनाच निस्तरायला सांग असं म्हणुन धर्मपंडीतांनी मला हाकलुन दिले.

 केशवभटाचे बोलणे ऐकुन सारेच अस्वस्थ झालेत. आश्वासक स्वरांत ज्ञानदेव म्हणाले, नेमके काय झाले ते निःसंकोचपणे सांग! मग त्याने पंचामृत कसे कडू लागते हे सविस्तर सांगुन म्हणाला, आपणच या संकटाचे निवारण कराल म्हणुन गार्‍हाणे घेऊन आलो खरा, पण या चोखाच्या घरी भोजन करणे हे धर्मबाह्य वर्तन पाहुन मी चुकीच्या जागी आलो की काय असा संदेह निर्माण झाला. तीर्थजलाविषयी बहुतेकांना माहीत होते पण त्याचा एवढा गवगवा होईल असे वाटले नव्हते. त्याने ज्ञानदेवां वर घेतलेला आक्षेप कुणालाच रुचला नाही.

 क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा सर्व भाग पहा

सर्व संत चरित्र पहा

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading