121.दसरा सणाची संपूर्ण माहिती

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

दसरा अभंग, महात्म्य, कथा, विधी, पूजा, संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी
Dasara Abhang, Mahatmya, Katha, Vidhi, Puja, Sampurn Mahiti Ekach Thikani

दसरा अभंग

दसरा दिवाळी तोची आम्हा सण ।
सखे संत जन भेटतील ।।
अमूप जोडिल्या सुखाचिया राशी ।
पार या भाग्यासी नाही आता ।।
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा ।
पिकली हे वाचा रामनामी ।।
तुका म्हणे काय होऊ उतराई ।
जीव ठेऊ पायी संताचिया ।।

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जयजयकार हरि ह्र्दयी धरा । आळस नका करू लहाना सांगतो थोरा ॥१॥
या हो या हो बाइयानों निघाले हरि । सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं ।
ओवाळू श्रीमुख वंदू पाऊले शिरीं । आम्हा दैव आले येथे घरिच्या घरीं ॥२॥
अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते । मग येरी गर्जे जैसें तैसे होत जाते ।
म्हणोनि मागे पुढे कोणी न पहावे येथे । सांडा परते काम जाऊ हरि सांगाते ॥३॥
बहुतां बहुतां रीतीं चित्तिं धरा हे मनीं । नका करू आइकाल ज्या कानी ।
मग हे सुख तुम्ही कधीं न देखाल स्वप्नी । उरेल हाय हाय मागे होईल कहाणी ॥४॥
ऐसियास वंचतां त्याच्या अभाग्या पार । नाही नाही नाही सत्य जाणा निर्धार ।
मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळले असो द्या मग पडतील विचार ॥५॥
जयासाठी ब्रम्हादिक झाले ते पिसे । उच्छिष्टाकारणें देव जळीं झाले मासे ।
अर्धांगीं विश्वमाता लक्ष्मी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासें ॥६॥

धन्य आजि दिन । झाले संताचे दर्शन ॥१॥
झाली पापा तापा तुटी । दैन्य गेलें उठाउठी ॥२॥
झाले समाधान । पायी विसावलें मन ॥३॥
तुका म्हणॆ आले घरां । तोचि दिवाळी दसरा ॥४॥

194
भेटिलागीं माझा फुटतसे प्राण ।
काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥
जया देखे तया पुसें हेंचि मात ।
कैं मज अनंत बोलावील ॥२॥
संतसमागमें दसरा दिवाळी ।
ठेवूनि निढळीं बाहे सदाअ ॥३॥
सखे पंढरीचे येती वारकरी ।
आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥
नामा म्हणे ऐसें करी दंडवत ।
आमुतें पुनीत करी बापा ॥५॥

195
भेटीची आवडी उत्कंठित चित्त ।
न राहे निवांत एके ठायीं ॥१॥
जया देखे तया हेंचि पुसे मात ।
कां मज पंढरिनाथ बोलविना ॥२॥
कृपेचा सागर विठो लोभपर ।
माझा कां विसर पडिला त्यासि ॥३॥
माहेरींची आस दसरा दिवाळी ।
बाहे ठेवुनि निढळ वाटे पाहे ॥४॥
मखे वारकरी पंढरीस जाती ।
निरोप त्या हातीं पाठवीन ॥५॥
निर्बुजला नामा कंठीं धरिला प्राण ।
करीतसे ध्यान रात्रंदिवस ॥६॥

नवरात्र

दसरा महात्म्य

🌹 विजयादशमी 🌹


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

विजयादशमीच्या दिवशी अपराजिता देवीचे पूजन, सीमोल्लंघन, शमीपूजन व देशान्तरी यात्रा करण्यास निघण्याचे प्रस्थान ही करावीत असे सांगितले आहे. या पूजेचा प्रकारः- अपराह्णकाळी गावाच्या ईशान्येला जाऊन, शुद्ध स्थानी जमीन सारवून, गंधेत्यादिकांनी त्यावर अष्टदळ कमळ काढावे. मग

‘मम सकुटुंबस्य क्षेमसिद्ध्यर्थं अपराजितापूजनं करिष्ये’

असा संकल्प करावा, नंतर अष्टदळ कमळाच्या मध्यभागी अपराजिता देवीचे ‘अपराजितायै नमः’ या मंत्राने आवाहन करावे. तिच्या दक्षिणभागी जया देवीचे ‘क्रियाशक्त्यै नमः’ या मंत्राने आवाहन करावे. वामभागी विजयादेवीचे ‘उमायै नमः’ या मंत्राने आवाहन करावे. नंतर

‘अपराजितायै नमः । जयायै नमः । विजयायै नमः ।

या नाममंत्रांनी षोडशोपचारांची पूजा करून, प्रार्थना करावी. ती येणेप्रमाणे –

‘इमां पूजां मया देवि यथाशक्तिनिवेदिताम् ।
रक्षार्थं तु समादाय व्रजस्व स्थानमुत्तमम् ॥’


राजाने संकल्पात – ‘यात्रायां विजयसिद्ध्यर्थं’ असा विशेष म्हणावा. पूजा करून नमस्कार केल्यानंतर

‘हारेण तु विचित्रेण भास्वत्कनमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं ममं’


इत्यादि मंत्रांनी विजयाची प्रार्थना करून, पूर्ववत् विसर्जन करावे. याप्रमाणे संक्षेप जाणावा. नंतर सर्वजनांनी गावाच्या बाहेर ईशान्य दिशेला असलेल्या शमीच्या वृक्षाजवळ जाऊन, त्याची पूजा करावी. सीमोल्लंघन करणे ते शमीपूजनाच्या आधी किंवा नंतर करावे. राजाने घोड्यावर बसून, पुरोहित, आमात्य यांसह शमीवृक्षाच्या तळवटी जाऊन वाहनावरून खाली उतरावे. पुण्याहवाचन करून शमीची पूजा करावी. पूजेचा प्रकार –

‘मम दुष्कृतामङ्लादिनिरासार्थं क्षेमार्थं यात्रायां विजयार्थंच शमीपूजां करिष्ये.’

शमी न मिळेल तर,

‘अश्मंतकवृक्षपूजा करिष्ये’

असा संकल्प करावा. राजाने शमीच्या वृक्षाच्या मूळी दिक्पालांची व वास्तुदेवाची

‘अमङ्लानां शमनी शमनी दुष्कृतस्य च ।
दुःखप्रणाशिनी धन्यां प्रपद्येऽहं शमी शुभाम् ॥’


या मंत्राने पूजा करावी. नंतर

‘शमी शमयते पापं शमी लोहितकंटका ।
धरित्र्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ॥
करिष्यमाणयात्नायां यथाकालं सुखं मया ।
तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ॥’


अशी प्रार्थना करावी. अश्मंतकाचे जर पूजन असेल तर,

‘अश्मंतक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि शत्रूणां च विनाशनम् ॥’

अशी प्रार्थना करावी. राजाने शत्रूची प्रतिमा करून, तिला शस्त्राने छेदावी. प्राकृत लोक जे शमीच्या फांद्या तोडून आणतात, त्याला कोठे आधार नाही. ‘शमीच्या मुळाजवळची ओली माती अक्षतायुक्त घेऊन ती गीतवाद्यांच्या निर्घोषांत आपल्या घरी आणावी. नंतर अलंकारवस्त्रादिक स्वजनांसह धारण करावीत. सौभाग्यवती स्त्रियांना नीरांजन ओवाळल्यावर घरात यावे. देशांतराला जाणारांनी विजयमुहुर्तावर चंद्रादिकांची जरू अनुकुलता नसली, तरी बेलाशक गमन करावे. हा विजयमुहूर्त दोन प्रकारचा आहे.

१ किंचित संध्याकाळ उलटल्यावर, नक्षत्रे थोडी जरी दिसू लागली तरी जो काल येतो, तो विजयकाल होय. हा सर्व कार्यांची सिद्धि देणारा आहे.

२. अकरावा मुहूर्त हा देखील काल होय. सर्व विजयेच्छूंनी या मुहूर्तावरच प्रयाण करावे. या दोहोंपैकी दशमीने युक्त अशा एका मुहूर्तावर प्रस्थान करावे; एकादशीयुक्त मुहूर्तावर करू नये आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणतात. ही सर्व कर्मांना शुद्ध आहे. या प्रयाणासाठी तर ही विशेषच शुभ आहे. श्रवणनक्षत्रयुक्त असेल तर महान योग होय, असे ज्योतिषग्रंथात वचन असल्यामुळे जी कर्मै अमुकच महिन्यात करण्याबद्दल करण्याचा निर्बंध नाही अशी इतर कर्मे देखील चंद्रादिकलांची अनुकूलता नसतांही या तिथीवर करावीत. चूडाकर्म, विष्णु वगैरे देवतांचे प्रतिष्ठापन वगैरे जी कर्मे काही विशिष्ट मासात करावयाला सांगितले आहे, ती मात्र या दिवशी करू नयेत. राजाच्या पट्टाभिषेकाविषयी, नवमीविद्ध अशी जरी दशमी असली, तरी ती न घेता सूर्योदयी व्याप्ति असणारीच घ्यावी.


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते.
दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र यांनी याच दिवशी रावणावर विजय मिळवला . पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.
शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.

आपट्याच्या पानांचे महत्व का ?

फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, “मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? तुम्ही मागाल ते मी देईन. ” ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.
कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.
कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्यास विनंती केली. परंतु ऋषींनी आनंदाने ते घेण्यास नकार दिला . ते सोने परत घेण्यास राजाने पण नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकानीं त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.

🌹 नवरात्र होम 🌹


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

होमाविषयीं विशेष प्रकार –
डामरतंत्रांत – ” घृतयुक्त पायस , शुक्लतिलांनीं मिश्रित करुन भक्तीनें यथाविधि जपाचे दशांशानें होम करावा . रुद्राध्यायाचा होम जसा एका मंत्रानें होतो तसा स्तोत्रजपाचा होम एका श्लोकमंत्रानें करावा . अथवा सप्तशतीचा जप करुन नवाक्षर मंत्रानें होम करावा . ‘ ऐंर्‍हींक्लींचामुंडायैविच्चे ’ हा नवाक्षर मंत्र असें केचित् ‍ म्हणतात . पूर्वी सांगितलेला पूजेचा नवाक्षर मंत्र घ्यावा हें तर योग्य होय . रुद्रयामलांत ही ” पायसान्न व तिळ हें प्रधानद्रव्य सांगितलें आहे . पळसाची फुलें , सर्षप ( राई ), पूग ( सुपार्‍या ), लाह्या , दुर्वांकुर , यव , श्रीफल ( नारळ ), उत्तम नानाप्रकारचीं फळें , रक्तचंदनाचीं खंडें , सुंदर गुग्गुळ ह्या सर्व द्रव्यांचा अनुक्रमानें दर एक श्लोकमंत्रेंकरुन होम करावा . अथवा नवाक्षरमंत्रानें किंवा ‘ नमोदेव्यै० ’ या मंत्रानें होम करावा . ” रहस्यांत तर – ” दरएक श्लोकमंत्रानें तिल व घृत यांनीं युक्त पायसाचा होम करावा ” असें सांगितलें आहे . दुर्गाभक्तितरंगिणींत तर – जयंती – मंत्रानें तिळांचा होम सांगितला आहे . ” पुरश्चरण कार्याचे ठायीं तर बिल्वपत्रयुक्त तिलांनीं होम करावा . ” ह्या कालिकापुराणावरुन बिल्वपत्रांनींही होम करावा , असें स्मार्त म्हणतात . तें बरोबर नाहीं . कारण , येथें तो ( बिल्वपत्र होम ) करण्याविषयीं प्रमाण नाहीं .
11/10/2024, 6:40 pm – Ashok Kaka Kulkarni: 🌹 बलिदान 🌹
( निर्णय सिंधूनुसार)


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

बलिदानाविषयीं घोडा , मेंढा , बकरा , महिष व स्वशरीरमांस हें पूर्वपूर्वाहून उत्तरोत्तर प्रशस्त व त्यांचीं विशेष फलें अन्य ग्रंथांवरुन जाणावीं . ही दिशा समजावी . बलिप्रकार तर देवीपुराणांत – ” पशुबलिदानास समर्थ असेल त्यानें कन्यासंक्रांतीस सूर्य असतां शुक्लपक्षांत अष्टमीचे दिवशीं द्रोणपुष्पें , बिल्व , आम्र , जाई , पुन्नाग , चंपक , या पुष्पांनीं [ देवीची ] पूजा करुन सर्व लक्षणांनीं युक्त व गंधपुष्पांनीं युक्त पांच वर्षांचा पूर्वोक्त अश्वादि पशु ” कालिकालि० “ या मंत्राचा यथाविधि जप करुन खड्गानें मारावा . ” ॐ कालि कालि यज्ञेश्वरि लोहदंडायै नमः “ हा मंत्र होय . त्या पशूचें रक्त व मांस घेऊन पूतना , चरकी , विदारी , पापराक्षसी यांना द्यावें . आणि महाकौशिकीमंत्रानें मंत्रित असें रक्त मांस राक्षसांना द्यावें . ” मंत्र पुढें सांगूं . तसेंच – ” त्या पशूच्या पुढें राजानें स्नान करावें आणि पिठाची शत्रूची मूर्ति करुन खड्गानें ती तोडून स्कंद व विशाख यांस द्यावी . ” क्षत्रियादिकांस शक्ति नसतां कूष्मांडादिकानें बलिदान करावें . ब्राह्मणानें कूष्मांड , माषमिश्रित अन्न यांचें बलिदान करावें . तें सांगतो – कालिकापुराणांत ” कूष्मांड , इक्षुदंड , सारस पक्ष्याचें मांस , हे बलिसमान असून तृप्तीविषयीं छागसमान सांगितले आहेत . ” रुद्रयामलांतही ” छागाच्या अभावीं कूष्मांड किंवा सुंदर श्रीफल वस्त्रवेष्टित करुन सुरी इत्यादिकानें छेदन करावें . ” तसेंच ” ब्राह्मणानें बलिकर्माचे ठायीं सदा कूष्मांड द्यावा , अथवा श्रीफल द्यावें , छेद करुंच नये . ” यावरुन छेदाविषयीं विकल्प म्हणजे छेद करावा किंवा न करावा . ” ब्राह्मणानें माषान्नानें बलि द्यावा . ” कालिकापुराणांत – ” साधकानें आपण उत्तराभिमुख होऊन पूर्वाभिमुख बलि करुन त्याजकडे पाहून नंतर हा पुढील मंत्र म्हणावा . तो मंत्र :- पशुस्त्वं बलिरुपेण ममभाग्यादुपस्थितः ॥ प्रणमामि ततः सर्वरुपिणं बलिरुपिणं ॥ चंडिकाप्रीतिदानेन दातुरापद्विनाशनं ॥ चामुंडाबलिरुपाय बले तुभ्यं नमोस्तु ते ॥ यज्ञार्थे बलयः सृष्टाः स्वयमेव स्वयंभुवा ॥ अतस्त्वां घात याम्यद्य तस्माद्यज्ञे वधोऽवधः ॥ कालिका म्हणते – ” ऐं र्‍हीं श्रीं “ या मंत्रानें तो बलि मत्स्वरुपी आहे असें चिंतन करुन त्याच्या मस्तकावर पुष्प ठेवावें . देवलोकाचा साधक तूं चंडिकेची जिव्हा आहेस , असें ध्यान करुन ‘ र्‍हीं र्‍हीं खड्ग ’ या मंत्रानें खड्गाचें पूजन करावें . या प्रकारें खड्गाची पूजा करुन ‘ ॐ हुं फट ’ या मंत्रानें खड्ग घेऊन उत्तमबलीचें छेदन करावें . मंत्रः – ” ॐ र्‍हींऐंर्‍हीं कौशिकीति रुधिरेणाप्यायतां . “ दुर्गेच्या बलिदानाविषयीं सर्वत्र हा विधि सांगितला आहे . ” मत्स्यसूक्तांत – ” ऐश्वर्य इच्छिणारानें नवमीस पूर्वीसारखी पूजा करावी आणि दक्षिणा व दोन वस्त्रें आचार्यास द्यावीं . “

🌹 घट उस्थापन व मूर्ती विसर्जन 🌹


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

दशमीचे ठायीं देवीचें विसर्जन करावें . तें सांगतो – दुर्गाभक्तितरंगिणींत देवीपुराणांत – ” नंतर दशमीस प्रातः काळीं यथाविधि पूजन करुन गायन , वाद्यें यांच्या शब्दांनीं देवीचें संप्रेषण ( विसर्जन ) करावें . प्रार्थनेचे मंत्र – रुपं देहि यशो देहि भगं भगवति देहि मे ॥ पुत्रान् ‍ देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥ महिषघ्नि महामाये चामुंडे मुंडमालिनि आयुरारोग्यमैश्वर्यं देहि देवि नमोस्तु ते ॥ अशी देवीची प्रार्थना करुन नंतर उत्थापन करावेम . उत्थापनाचा मंत्रः – उत्तिष्ठ देवि चंडेशि शुभां पूजां प्रगृह्य च ॥ कुरुष्व मम कल्याणमष्टाभिः शक्तिभिः सह ॥ गच्छ गच्छ परं स्थानं स्वस्थानं देवि चंडिके ॥ व्रज स्रोतोजलं वृद्ध्यै स्थीयतां च जले त्विहे ॥ असें उत्थापन करुन उदकाजवळ नेऊन – दुर्गे देवि जगन्मातः स्वस्थानं गच्छ पूजिते ॥ संवत्सरे व्यतीते तु पुनरागमनाय वै ॥ इमां पूजां मया देवि यथाशक्त्योपपादितां ॥ रक्षार्थं त्वं समादाय व्रज स्वस्थानमुत्तमं ॥ या मंत्रानें उदकांत वाहवावी . “
संकलन :- अशोककाका कुलकर्णी


शमी पूजन 🌹
( निर्णयसिंधुनुसार)

या विजयादशमीचेठायीं विशेष सांगतो भार्गवार्चनदीपिकेंत भविष्यांत – ” भक्तांना अभय करणार्‍या अशा शमीयुक्त भगवंताचें पूजन करुन नंतर शमीवृक्षाचें पुनः पूजन करावें . ” शमीच्या पूजनाचा मंत्र हेमाद्रींत गोपथब्राह्मणांत आहे तो असाः – ” अमंगलानां शमनीं शमनीं दुष्कृतस्य च ॥ दुःखप्ननाशिनीं धन्यां प्रपद्येऽहं शमीं शुभां ॥ “ तसेंच भविष्यांत मंत्रः – ” शमी शमयते पापं शमी लोहितकंटका ॥ धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ॥ करिष्यमाणयात्रायां यथाकालं सुखं मया ॥ तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ॥ “ या मंत्राने पूजन करुन नंतर ” शमीवृक्षाच्या मुळांतील ओली माती अक्षतासहित घेऊन गीतवाद्यें वाजवीत आपल्या घरीं आणावी . नंतर भूषणें व वस्त्रें स्वजनांसहित धारण करावीं . ” या दशमीचे दिवशींच सैन्यास नीराजनविधि सांगतो – कृत्यरत्नांत – नीराजनमंत्रः – ” चतुरंगं बलं मह्यं निररित्वं व्रजत्विह ॥ सर्वत्रविजयोमेस्तु त्वत्प्रसादात्सुरेश्वरि ॥ “ गौडनिबंधांत ज्योतिषांत ” राजानें सैन्यवृद्धीकरितां अनुक्रमानें नीराजनविधि करुन शुभकारक खंजनपक्ष्याचें दर्शन , उदकाजवळ किंवा गाईंच्या गोठ्याजवळ करावें . ” या खंजनपक्ष्याच्या दर्शनाचीं फळें व शुभाशुभ प्रदेश गौडनिबंधांतच पाहावे .

संकलन :- अशोककाका कुलकर्णी


दुर्गादेवीचें स्वागत !

आश्विन शुद्ध ८

आश्विन शु. ८ हा दिवस भारतांत दुर्गा अष्टमी म्हणून पाळण्यांत येतो. जगांत जेव्हां आसुरी संपत्ति प्रबळ होते तेव्हां आदिशक्ति देवीरुपानें अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, असा भारतीय जनेचा विश्वास आहे. या विश्वव्यापक आदिमायेनें अनेक अवतार घेतले असल्यामुळें तिला अनेक नांवे प्राप्त झालीं आहेत. महिष नांवाचा अस्रुराचा वध करणारी महिषासुरमर्दिनी, चण्डमुण्ड राक्षसांना
मारणारी चामुंडा, दुर्गम नांवाच्या दैत्यांना मारणारी दुर्गा, इत्यादि देवीचीं रुपें दिसून येतात. याच देवीची महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशीं तीन स्वरुपें आहेत. भारतीयांची अशी श्रद्धा आहे कीं, याच आदिमायेनें मत्स्यकूर्मादि दशावतार घेतले, रामरुपानें रावण-कुंभकर्णास मारलें, कृष्णरुपानें कंसशिशुपालादिकांचा नाश केला. बिभीषण, मारुति, अर्जुन या वीरभक्तांच्या अंगांत हिनेंच प्रवेश केला. व्यक्तींत किंवा समाजांत दुर्गुण व दुर्व्यसनें संचरलीं, कामक्रोधादिकांचें बंड माजलें म्हणजे हीच अव्यक्तांतून प्रकट होऊन दुष्टदमन व सुष्टसंरक्षण करते. ही परमेश्वरी शक्तिच विश्वासा उद्धार करते. महाराष्ट्रांत ही माहूर,सप्तशृंगी, तुळजापूर, औंध, कोल्हापूर या ठिकाणीं प्रकट झाली असून महाराष्ट्राची ती कुलदेवता आहे. निंबाळकर, भोसलें ही प्राचीन क्षत्रिय घराणीं भवानीच्या उपासकांची आहेत. याच ‘जगदात्मा जगदीश्वरी’ ला, ‘रामवरदायिनी माते’ ला समर्थांनीं शिवरायासाठीं प्रार्थना केली होती –

-“येकची मागणें आतां, द्यावें तें मजकारणें ।
तुझा तूं वाढवी राजा, शीघ्र आम्हांचि देखता ॥”
आणि या देवीचें स्वरुप त्यांनीं असें वर्णन केलें आहे:-
“प्रसन्नमुख सुंदरा । तुझेनि हे वसुंधरा ॥
तुझेंच नांवरुप हो । दिसे तुझें स्वरुप हो ॥
तुझेनि सर्व बोलणें । तुझेनि सर्व चालणें ॥
तुझेनि योगधारणें । तुझेनि राजकारणें ॥”

आश्विन शुद्ध ९

ऐतिहासिक दिनविशेष 🌹
संकलन :- अशोककाका कुलकर्णी


“वासुदेव बळवंतांचें ” सीमोल्लंघन” !

शके १८०२ च्या आश्विन शु. ९ रोजी भारतांतील पहिल क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीं एडन तुरुंगातून सुटण्याचा धाडसी प्रयत्न केला. अत्युच्च उराशीं बाळगणारा हा खंदा वीर एडनच्या तुरुंगांत काळ्या पाण्याची जन्मठेप भोगीत खितपत पडला होता. परंतु मुक्त असणारा आत्मा सारखी तडफड करी. हातांतील शृंखला तोडाव्यात, खोलीच्या भिंती पाडाव्यात, तुरंगाचे तट ओलांडावेत, असे विचार त्यांच्या मनांत वारंवार येत. आणि आश्विन शु. ९ या दिवशीं त्यांच्या या इच्छाशक्तीनें साकार रुप धारण केलें. दुर्धर रोगाकडे लक्ष न देतां वासुदेव बळवंतांनीं आपल्या अचाट शक्तिसामर्थ्यानें हातांतील शृंखला खळकन्‍ तोडिल्या. बंदिवान्‍ गरुड आतां मुक्त झाला होता. त्याच्या भरारीची झेप आतां अत्यंत मोठी अशीच असणार. कोठडीच्या दाराशीं मोठें थोरलें कुलूप आहे ! तें पाहून या मुक्त सिंहाला जास्तच चेव आला. त्यांचे बाहुं स्फुरण पावूं लागले. लागलीच त्यांनीं दोनहि हातांनीं तीं दारें उखडून काढिलीं; आणि तीं तशीच घेऊन ते तटापर्यंत आले. तटावरुन उतरण्यासाठी शिडी पाहिजे होती ना ! या उखडलेल्या दाराची शिडी झाली. वासुदेव बळवंतांनी ताडकन्‍ तटावरुन उडी झोंकली. रोगग्रस्त झालेल्या मुखावर स्वातंत्र्य धांवण्यास सुरुवात केली. अविरतपणें धांवता धांवता यांना दम लागला; आणि दुर्दैवानें पहारेकर्‍यांना ही गोष्ट समजली. सरकारी घोडेस्वार त्यांचा पाठलाग करुं लागले. त्यांची आणि फडके यांची लहानशी चकमक झाली. परंतु एकटे फडके कोठवर प्रतिकार करणार ? पुन: त्यांना पोलिसांच्या स्वाधीन व्हावें लागलें. त्यांचें दिव्य स्वप्न क्षणार्धात नाहींसें होऊन त्यांना कठोर अशा सरकारी यंत्रांत जखडून घ्यावें लागलें. आतां तर पहिल्यापेक्षां जास्त त्रास होणार होता. आणि फडके सर्व भोग भोगण्यास तयार होतेच.-१२ आँक्टोबर १८८०


विजयादशमीचें रहस्य !


🌹 ऐतिहासिक दिनविशेष 🌹

आश्विन शुद्ध १०

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

आश्विन शु. १० हा दिवस सर्व भारतांत ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतीयांच्या मूर्तिमंत पराक्रमाचा इतिहासच ‘विजयादशमी’ त दिसून येतो. हिंदु समाजांतील चारहि वर्णांच्या दृष्टीनें या दिवसाला महत्त्व आहे. विद्येची आराधना आणि जोपासना करणारा ब्राह्मण-वर्ग याच दिवशीं सरस्वतीची पूजा करुन ज्ञानाचे पाठ घेत असतो. आपल्या अद्वितीय बाहुबलानें पराक्रम करणारे क्षत्रिय वीर विजयादशमीलाच आपल्या शस्त्रास्त्रांचे पूजन करुन देशरक्षणासाठीं, शत्रूंचा नि:पात करण्यासाठीं सीमोल्लंघन करीत असतात. नवीन धन निर्माण करणें हें ज्या वैश्यांचे कार्य त्यांच्याकडून याच वेळीं शेतांतून नवीन नवीन धान्यें निर्माण झालेलीं असल्यामुळें सृष्टीस ‘सुजला सुफला’ असें स्वरुप प्राप्त झालेलें असतें. शत्रुपक्षाचा पराभव करुन आणलेली धनदौलत स्वकीयांना या दिवशी वांटण्याची प्रथा आहे. याचा उगम रामायणाच्या पांचव्या सर्गात सांपडतो. आपल्या गुरुस चौदा कोटी सुवर्ण-मुद्रांची दक्षिणा देतां यावी म्हणून कौत्स नांवाचा ब्राह्मण-पुत्र रघुराजाकडे आला. त्याच वेळीं रघुराजानें नुकताच विश्वजित्‍ यज्ञ केलेला असल्यामुळें तो दरिद्री झाला होता. पण आलेल्या याचकास विन्मुख न पाठवितां रघूनें कुबेरावर स्वारी करुन त्याच्याकडे सुवर्ण-मुद्रांची मागणी केली. बिचार्‍या कुबेरानें भयभीत होऊण अयोध्या नगराबाहेर एका शमीच्या वृक्षावर सुवर्णवृष्टि केली. त्यांतील चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौत्सास मिळाल्या. उरलेलें सुवर्ण रघुराजानें नागरिकांना वांटून टाकिलें. हा दिवस सुद्धां आश्विन शु. १० हाच होता. या वेळपासून सोनें लुटण्याची प्रथा रुढ झाली असावी. असें सांगतात कीं,याच दिवशीं प्रभु रामचंद्रांनीं रावणाचा नाश करण्यासाठीं लंकेवर स्वारी केली. अशा प्रकारें हा दिवस पराक्रमाचा, विद्यार्जनाचा, म्हणून भारती यांना अत्यंत उत्साहदायक वाटतो. तीनचार महिने पावसाळ्यांत विश्रांति घेतल्यानंतर मराठ्यांच्या फौजा याच दिवशीं शत्रूचा पराभव करण्यासाठीं ‘सीमोल्लंघन’ करीत असत.

ऐतिहासिक दिनविशेष 🌹

आश्विन शुद्ध १०

संकलन :- अशोककाका कुलकर्णी


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म !

शके १८४७ च्या आश्विन शु. १० या दिवशीं नागपूर येथील मोहित्यांच्या वाड्यांत, भारतांत विख्यात असलेल्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या संघटनेचा जन्म झाला. विजयादशमीला सीमोल्लंघन करावयाचें असतें. आत्मविस्मृतीच्या सीमा ओलांडून स्वाभिमानाकडे मोहरा बळकावयाचा असतो. या दृष्टीनें शके १८४७ मधील आश्विन शु. १० हा दिवस भारतीयांच्या इतिहासांत अनेक दृष्टींनीं महत्त्वाचा आहे. या दिवशी नागपूर येथें डाँ. हेडगेवार यांनीं ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या संघटनेची स्थापना केली. भ्रांत मार्गावर असणार्‍या हिंदु समाजाला संजीवनी देण्यासाठीं काय करावें याचा विचार डाँक्टर अनेक दिवस करीत होते. शेवटीं एका विचारानें, एका ध्येयानें, एका मनानें, सर्व हिंदु समाज संघटित झाल्याशिवाय तरणोपाय नाहीं असें निश्चित वाटल्यावर डाँक्टरांनीं मोठ्या धडाडीनें कार्यास आरंभ केला. पैसा गोळा करण्याअगोदर त्यांनी माणसांचीं मोठ्या धडाडीनें कार्यास आरंभ केला. पैसा गोळा करण्याअगोदर त्यांनी माणसांची मनें गोळा केलीं. पहिल्या दिवशीं मोहित्यांच्या पडक्या वाड्यांत अवघे पांचच स्वयंसेवक उपस्थित होते. परंतु थोड्याच अवधींत या मोहरीएवढ्या बीजाचा मोठा वटवृक्ष निर्माण झाला. लक्षावधि तरुण या पवित्र कार्यात आपण होऊन सामील झाले. त्याग, शिस्त, चारित्र्य यांचे धडे तरुणांना याच संघटनेंत मिळूं लागले. अनेक प्रकारच्या संकटांतून संघानें मार्ग काढिला. “राष्ट्राचें खरें चैतन्य व बल ध्येयनिष्ठ तरुणांच्या प्रभावी संघटनेंत असतें हें त्रिकालाबाधित सत्य डाँक्टरांनीं पुन्हा एकदां प्रत्ययास आणून दिलें. हिंदु समाजांतील सर्व अव्यक्त व निद्रित शक्तींना व्यक्त व जागृत करण्याची महनीय कामगिरी त्यांनीं पार पाडली. ” या विख्यात संघटनेच्या शाखा भराभर सार्‍या भारतांत निघाल्या. कानाकोपर्‍यांतून संघाचें नांव दुमदुमुं लागलें. प्रसिद्धीची विशेष चाड न धरितां पंचवीस वर्षांच्या अवधींत संघानें मोठीच कामगिरी केली. म. गांधींच्या भीषण हत्येनंतर कांहीं काळ संघाला वनवास भोगावा लागला होता; परंतु लवकरच संघाचें कार्य पुन्हा पहिल्याच जोमानें सुरु झालें.
-२७ सप्टेंबर १९२५


🌹 रामलीला 🌹

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

रामलीला हा उत्तर भारतातील एक पारंपरिक लोकनाट्योत्सव आहे . दरवर्षी नवरात्रात (अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. दशमी) हा उत्सव साजरा केला जातो. गुजरात, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा, बंगाल, राजस्थान इ. राज्यांतही रामलीला साजरी होते. काही विद्वानांच्या मते दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाने लंकाधिपती रावणावर विजय मिळविला होता. त्या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करीत असावेत.
रामायणात रस्त्यावरून लव कुश रामायण गात चालल्याचा जो उल्लेख आहे, त्यामध्ये रामलीलेची मूळ प्रेरणा असावी. अनेक लहानमोठ्या शहरांतून रामलीला विविध ठिकाणी आणि प्रकारे सादर केली जाते. सीतास्वयंवर, रामाचे वनवास गमन, रावण जटायू युद्ध, लंकादहन इ. प्रसंग रामलीलेत प्रामुख्याने अंतर्भूत असतात. राम, लक्ष्मण, सीता यांच्या भूमिकांसाठी १४ वर्षांखालील मुलांची निवड करतात. रावण, कुंभकर्ण, विभीषण, हनुमान इत्यादींसाठी तांब्या-पितळेचे मुखवटे वापरतात. या भूमिका स्थानिक मंडळी वर्षानुवर्षे करताना दिसतात. हनुमानाच्या भूमिकेला विशेष महत्त्व असते. कधी कधी वानरसेनेच्या मुखातून रामायण गातानाही दाखविले जाते.
तुलसीदासाने रामलीलेच्या धार्मिक उत्सवाची सुरुवात केली, असे म्हणतात. यासाठी दिल्ली शहर फार प्रसिद्ध असून १९२० मध्ये मुद्दाम याच उत्सवासाठी तयार केलेल्या रामलीला मैदानावरच अजूनही हे कार्यक्रम होतात. महंत राधोदासाने बहादुरशाह जफरच्या कारकीर्दीत (१८३७ – ५७) दिल्लीतील रामलीला सुरू केली. १९३८ मध्ये या कार्यक्रमासाठी एक समिती स्थापण्यात आली. तेव्हापासून या समितीमार्फतच हा उत्सव साजरा होतो. दिल्लीत जवळजवळ ५० ठिकाणी रामलीला सादर केली जाते. अधिक उंच रावण तयार करण्याचीही अहमहमिका असते.
अयोध्येत आश्विन वद्य नवमीला रामलीला सुरू होऊन ती पुढे सतरा दिवस चालते. येथील लंकादहनाचा प्रसंग उल्लेखनीय असतो. त्यासाठी रावणाचा महाल सु. १८ ते २१ मी. उंच बनवितात. हनुमान दोरीच्या साहाय्याने त्या महालावर जाऊन आग लावतो. काही ठिकाणी रावणाच्या पुतळ्याला एका वर्तुळात दहा तोंडे आणि मध्यभागी गाढवाचे तोंड लावलेले असते.
काशीजवळील रामनगरची रामलीला सुप्रसिद्ध असून ती तीसचाळीस दिवस चालते. साधारणतः १२ किमी.च्या परिसरात ही सादर केली जाते. त्यासाठी रामायणातील अयोध्या, मिथिला, पंचवटी, लंका इ. स्थाने आधीच तयार करतात. असे खुले रंगमंच माळवा, बुंदेलखंड या भागांत आढळतात. रामायणातील प्रसंग सादर करताना दृश्यानुरूप रंगमंच बदलतात. तेव्हा प्रेक्षकही आपापल्या जागा बदलतात. रंगमंचावर तुलसीदासाच्या
रामचरितमानसातील चौपाया गातात. त्यानंतर कलाकार स्थानिक बोलीत आपले संवाद बोलतात. लंकादहनाची आतषबाजी पहाण्यासाठी हजारो प्रेक्षक येतात.
ताडमाड उंच रावण आणि त्यापेक्षा कमी उंचीचे इतर राक्षस (मेघनाद, कुंभकर्ण) तयार करून मैदानावर उभे करतात. हे कागदाचे व पोकळ असून त्यांत बाण व इतर प्रकारचे दारूसामान भरून ठेवतात. उत्तम अभिनय करणाऱ्या मुलांना राम-लक्ष्मणादिकांची सोंगे देऊन मोठ्या थाटामाटाने आणतात. लंकानगरीची सजावटही प्रेक्षणीय असते. रात्र पडताच उभय पक्षांकडून बाण सुटतात व सु. एका तासातच सर्व लंकानगरीची आणि राक्षसांची राखरांगोळी होते. राक्षस जळू लागताच त्यांतून शेकडो तऱ्हेची शोभेच्या दारूची चक्रे, फुले वगैरेंची नयनरम्य आतषबाजी पहावयास सापडते. काही ठिकाणी दसऱ्यानंतर दोन दिवसांनी भरतभेटीचा सोहळाही समारंभपूर्वक पार पाडतात.

🌹 खंडे नवमी 🌹


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

नवरात्रातील नवव्या दिवसाला (आश्विन शुद्ध नवमीस) खंडे नवमी म्हणतात. या दिवशी लढाऊ जाती विधिपूर्वक शस्त्रपूजन करतात, तसेच विविध शिल्पकार व कारागीर आपापल्या उपकरणांचेही पूजन करतात. शस्त्रास व उपकरणास या दिवशी देव मानून पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात व राजस्थानात विशेषत्वे आढळते. ह्या दोन्हीही प्रांतांत खड्‌गपूजेस विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात या दिवशी शस्त्रपूजा केल्यावर दुसऱ्या दिवशी (विजया दशमीस) सीमोल्लंघन करून मोहिमेवर निघत. निर्णयसिंधूत निरनिराळ्या शस्त्रपूजेचे मंत्र दिलेले आहेत.

सण आणि उत्सव संपूर्ण माहिती

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading