श्रीमंत रमाबाई पेशवे चरित्र भाग ५, (२१ ते २५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी ” मराठा दौलतीचे वस्त्रे” दादासाहेबांना आणि “…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! श्रीमंत रमाबाई पेशवे !!! 

भाग – २१.

                दुसऱ्या दिवशी दादासाहेबांच्या बोलण्यावरून, श्रीमंत त्यांच्या महाली गेले. संतापून दादासाहेब म्हणाले, आमचा उपमर्द करण्यासाठी अंबारीत बसवून आणलं का? तुमच्या कारकूनाने आमच्या आज्ञाचा भंग केला. आमचे आश्रिताला वाड्यावर जाऊ दिले नाही. आमचा असाच अपमान होत असेल तर आमची आनंदवल्लीला जाण्याची तजवीज करा.

               काकासाहेब, आपण घोरपेला शरणागती पत्करल्याचा विसर पडलेला दिसतो. दादासाहेब म्हणाले, आम्हाला नजर कैदेतच ठेवायचे होते तर, आम्हाला अंबारीतून मिरवत कशाला आणले? या शनिवार वाड्यातील गृहकलह रयतेला दिसू नये म्हणून. काका पुतणे लढत असल्याचा आम्हाला रयतेने  दोष दिला असता. तुम्हाला अंबारीतून केवळ एवढ्यासाठी आणले की पेशव्यांची इज्जत साबूत रहावी. तुम्ही  मात्र उलटा अर्थ घेतला. आम्ही तुमचे कैदी आहोत तर? मग आम्ही काय करायला हवं? तुम्हाला वेळोवेळी सांभाळून घेतले. त्याचे तुम्ही चांगले पांग फडले. आणि मग श्रीमंत पेशव्यांचा संताप अनावर झाला. कपाळाच्या शिरा ताडताड उडू लागल्या.

       आणि गेल्या दहा वर्षात त्यांनी दिलेल्या त्रासाचा पाढा पेशव्यांनी वाचला. नाना, आज पासून यांच्यावर चौकी पहारे जारी करा. नजरकैद कशी असते ते यांना कळू द्या. यांना इथे हवे ते द्या पण आवश्यकतेपेक्षा जादा सवलत देऊ नका. आमच्या परवानगीशिवाय यांना कुणीही भेटता कामा नये. त्यांच्या आश्रितांच्या याद्या तयार करा. यात कोणताही भंग होता कामा नये. ताडताड पावली उचलीत श्रीमंत माधवराव पेशवे त्या महालातून बाहेर पडले.

              घोडपेच्या लढाई नंतर शनिवार वाड्यात कडक बंदोबस्त करण्यात आला. दादासाहेबांच्या साथीदारांचा समाचार घेणे सुरू झाले. गंगोबा तात्यावर तीस लाखाची खंडणी लागली. त्यांनी खंडणी  न दिल्यामुळे त्यांना पेशव्यांच्या समोर हजर करण्यात आले. गंगोबा तात्या अदब सोडून  पेशव्यांशी बोलल्यामुळे, माधवराव पेशव्यांचा संताप अनावर झाला. गंगोबा तात्या आणि त्यांच्या पुत्राच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. पेशव्यांनी स्वतः वेताचे फटके गंगोबातात्यावर बरसवू लागले. रक्तबंबाळ लोळागोळा झालेले  तात्या क्षमा याचना करत श्रीमंतांच्या पायाशी लोळण घेवू लागले .

          रामशास्त्रींनी पुढे होऊन पेशव्यांचा हात धरून भारावल्या आवाजत म्हणाले, श्रीमंत, क्रोध आवरा. हीन प्रवृत्तीच्या माणसावर हात टाकून स्वतःला बाटवून घेऊ नका. श्रीमंतांनी स्वतःला आवरून म्हणाले, यांनी ३० लाख खंडणी दिल्याशिवाय सोडू नका. तोपर्यंत नगरच्या किल्ल्यात अंधारात सडू द्या. मग सखाराम बापूंकडे वळून श्रीमंत म्हणाले, बापू, आज तुमचा निरपेक्ष सल्ला हवा आहे. तुम्ही दादासाहेबांना दिलेल्या सल्ल्यामुळे हैदर अलीचा पाडाव आम्हाला करता आला नाही. अशा घरभेद्यापासून आम्ही निर्भय कसे होऊ शकतो? बोला बापू…

           सखाराम बापू म्हणाले, श्रीमंत आपला रोख लक्षात आला. आपल्याला माझा निरपेक्ष सल्ला असा आहे, अशा घरभेदला घरी बसवले तरच आपण निर्भय होऊ शकाल. छानऽ! मोरोबा आज पासून बापूंच्या घरावर सख्त पहारा जारी करा. काकासाहेबांसारखाच यांचा बंदोबस्त व्हायला हवा. दरबारात एका पाठोपाठ एक एक प्रसंग घडत असल्याने सारा दरबार सुन्न झाला.

         रघुनाथराव आणि सखाराम नजर कैदेत असल्यामुळे हैदर अलीचा सोक्षमोक्ष लावण्याचा श्रीमंतांनी निर्धार केला. कटाच्या मुळाशी असलेल्या जानोजी भोसलेंना अद्दल घडविण्याच्या दृष्टीने पेशव्यांनी त्यांना बोलावणे केले. भोसले आले नाही. त्यांनी इंग्रजांशी संधान बांधल्याचे पेशव्यांच्या कानी आले.  संतापलेल्या श्रीमंतांनी भोसल्यांच्या प्रांतावर आक्रमण केले. भोसलेची जहागिरी, देशमुखीचे हक्क जप्त केलेत. नागपूर लुटले. भुईकोट किल्ला ताब्यात घेतला. शेवटी जानोजी भोसलेने आपला कारभारी देवाजीपंताना तह करण्याचे अधिकार देऊन, कनकपुरला बारा कलमी  तह पुरा झाला.

           या सर्व प्रकाराने श्रीमंत माधवरावांची प्रकृती बिघडली. राज वैद्यच्या औषधाने थोडे बरे वाटताच त्यांनी पुन्हा राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली. दक्षिणेत हैदर अलीच्या पुन्हा हालचाली वाढल्या. त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक होते.

              सायंकाळी श्रीमंत पर्वती वरून जगदेश्वराचे दर्शन घेऊन परतत असताना, रामसिंग नावाच्या गाडद्याने श्रीमंतावर तलवारीचा वार केला. पेशव्यांना निसटता वार खांद्यावर झाला. रक्त वाहू लागले. रक्षकांनी पळून जाणाऱ्या रामसिंगाला ताब्यात घेतले.

         श्रीमंत पेशव्यांवर प्राण घातक हल्ला झाल्याची बातमी पुण्यावर वाऱ्यासारखी पसरली. बातमी शनिवार वाड्यातही आली. आणि शनिवार वाडा थरारून गेला. रमाबाई व पार्वतीबाईचे चित्त श्रीमंत येईपर्यंत थाऱ्यावर नव्हते. श्रीमंतांनी आपल्या महाली प्रवेश केला. दोघीही अधीरतेने पेशव्यांकडे झेपल्या. श्रीमंत म्हणाले, आम्हाला फारसं लागलं नाही. आज देवबाने वाचवले. आमच्यावर पडणारा तलवारीचा घाव त्याने आपल्या तलवारीवर झेलला. आम्ही घोड्यावरून खाली आलो तर रस्त्यावरच्या  दगडाची इजा आमच्या खांद्याला झाली.

          रमाबाईंनी विचारले, कोण होता तो? आमच्या सुरक्षा दलातील एक गाडदी होता. म्हणजे रक्षकच भक्षक व्हायला लागल्यावर विश्वास तरी कोणावर ठेवावा? रमाबाईच्या डोळ्यातील अश्रूंना खंड नव्हता. या हल्ल्याने त्या खूपच घाबरून गेल्या होत्या.

         पार्वती बाई म्हणाल्या,  माधवा, सांभाळून राहत चला. दुष्ट  बुद्धीच्या लोकांचे छक्केपंजे बंद पडलेत ना? म्हणून अशा खालच्या थराला जाण्याची मजल गेली. राज वैद्य औषधाचार करून निघून गेले. दोन दिवसानंतर शास्त्रीबुवा पेशव्यांना भेटायला त्यांच्या महाली आले…..

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. २५-७-२०२३.

!!! रमाबाई  !!!

                भाग – २२.

              रामशास्त्रांनी पेशव्यांना मुजरा करून, आसनस्थ  झाले. गंभीर स्वरात म्हणाले, त्या मारेकर्‍याने रडत रडत एक लक्ष रुपयांच्या लालचीने हे घृणित कार्य करण्यास तयार झालो अशी कबुली दिली व बिचकत बिचकत दादासाहेबांचे नाव सांगितलं. पेशवे म्हणाले, शास्त्री बुवा रक्ताच्या नात्यावर, सख्या पुतण्यावर मारेकरी घालताना काकांना काहीच वाटले नाही? शास्त्रीजी, या नावाची बाहेर वाच्याचा होणार नाही ही दक्षता घ्या. पेशवे कुळाची बदनामी व्हायला नको.

                    रात्रीचे भोजन घेऊन श्रीमंत माधवराव आपल्या दालनी आले, तोच रमाबाई आल्या. मंचकाच्या कडेला टेकत म्हणायला, स्वामी, तुम्ही आमच्यापासून काही लपवत आहात. त्या किंचित रोषाने  म्हणाल्या. मारेकर्‍याला हत्तीच्या पायी दिले खूपच छान झाले. मेला आमच्या कपाळीचं सौभाग्य चिन्ह पुसायला निघाला होता.

                श्रीमंत म्हणाले, पण तो नाहक मेला. म्हणजे?  बोलवता धनी वेगळाच होता. होय! तुम्ही कुठे वाचता करू नका. रमा, काही बाबी फार नाजूक असतात. तुम्ही काय लपवत आहात कळत नाही. रमा, पिळवटल्या स्वरात श्रीमंत म्हणाले, तुम्हाला काका साहेबांचे नाव सांगितले तर ?अग बाई! काय सांगता? त्या भीतीने व्याकूळ झाल्या. आपली रक्ता मासाची माणसं एवढी पाषाण हृदयी होऊ शकतात?

                 रमा, सत्तेची हाव माणसाला पशु बनवते. रमाबाईचा हात हाती घेत हळव्या स्वरात माधवराव म्हणाले, तुम्ही किती काळजी घेता? किती जपता? एवढ्या लागल्याने किती व्याकुळ झालात? स्वामी, तुम्ही आमचं सौभाग्य आहात.  त्यामुळे स्त्री कोणताही त्याग करून आपल्या सौभाग्याला जपत असते. रमा, आम्हाला एक खंत फार आहे. तुम्हाला एखादा मूल झालं असतं तर तुमचे जीवन थोडे तरी आनंदी झाले असते. स्वामी, ह्या दैवाधीन गोष्टी आहेत. आम्ही दुःखी नाही स्वामी.  नंतर दोघे कितीतरी वेळ सुखदुःखाच्या गोष्टी करत झोपी गेलेत.

                   दिवसे न दिवस श्रीमंतांचे प्रकृती बिघडत चालली होती. राज वैद्याची औषधे, फिरंगी वैद्याची औषध सुरू होती. पण कशानेच फरक पडत नव्हता. उलट दिवसेंदिवस अशक्तपणा, शरीराचा दाह वाढतच होता. हवा बदल म्हणून दोन महिने सिद्धटेकला जाऊन राहिले. रमाबाई सावली सारख्या त्यांच्याबरोबर असायच्या. दोन महिन्यांनी पेशवे, रमाबाई पुण्यात परतले. श्रीमंत माधवराव आपल्या महाली विश्रांती घेत, विचार करत होते. राजयक्ष्मा सारखा दुर्धर आजार जडण्याइतके आपण कोणते पाप केले? आम्हाला जेवढं आठवते त्यानुसार एकही दुष्कृत्य आपल्याकडून घडले नाही. मग या मरणप्राय यातना, नरक यातना, या दुर्धर आजाराचा नरकवास का? ते असे विचार करीत असतानाच, रमाबाई आत आल्या. म्हणाल्या, स्वामी, तुम्ही फिरंग्याची औषधी का बंद केली? होय! आमची मंडळी नाराज होती. त्यांचे म्हणणं की फिरंगीच्या औषधीने अनाचार माजतो. आणि तो तुम्ही ऐकला? रमा, सर्वांचे मन सांभाळावी लागतात. रमाबाई रागाने म्हणाल्या,  औषध बंद करताना आम्हाला एका शब्दांना देखील विचारले नाही. रागावलात? रागावू नको ?आमची काहीच किंमत नाही?

         प्रियदर्शनीऽऽ, पेशव्यांच्या डोळ्यात पाणी तराळले.  स्वामी, आपल्या नेत्रात अश्रू?  रमा आमची मनःस्थिती विलक्षण नाजूक झाली आहे. थोडं देखील सोसवत नाही. तुम्हीच आमच्यावर रागावला तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पहावं? तुम्ही आम्हाला सांभाळून घेत चला. वाघासारखी गर्जना करणाऱ्या आपल्या पतीची ही विकल अवस्था पाहून रमाबाईंना अगदी भडबडून आले. म्हणाल्या, स्वामी, आम्ही तुमच्यावरील प्रेमापोटी, श्रद्धेपोटीच रागावलो. या नंतर कधीच रागावणार नाही. फुलासारखं जपू तुम्हाला. माफ करावे आम्हाला.

              म्हणूनच वेळोवेळी तुमची आठवण येते. कुठे कुठे प्रकर्षणाने आठवण येते हे सांगायचे झाले तर, कठीण प्रसंगी तुमच्या धीराच्या शब्दांची, जिथे जिथे आम्हाला सौंदर्य दिसते, तिथे तिथे तुमची उत्कट आठवण येते. शीतल चांदण्यात तुमचा भास होतो. एवढेच काय प्रत्यक्ष युद्धभूमीवर आमच्या तलवारीच्या पात्यावर साकार झाल्याचा भास होतो. श्रीमंत असेच कवित्व करत बराच वेळ बोलत होते. मग एकाएकी आठवूण म्हणाले, रमा, या कामाच्या गडबडीत एक महत्त्वाची गोष्ट राहूनच गेली. ती सारखी मनाला टोचते. कोणती?

           हरिहरेश्वर आमचं कुलदैवत. त्याच्या दर्शनाला जायची जबर इच्छा होती. हरिहरेश्वराचे महात्म्य इतके आहे की, मृत्यू योग आला तरी टळतो. पण आमची कितीही इच्छा असली तरी जाता येत नाही. आता दगदग नाही सोसवत. रमा, तुम्ही आमचे प्रतिरूप आहात. आमच्या वतीने तुम्ही हरिहरेश्वरला जाऊन याल? तुम्ही दर्शन घेऊन आला तर, आम्हीच प्रत्यक्ष दर्शन घेतल्यासारखे होईल.    

                आपली इच्छा आहे तर नारायणराव व गंगाबाईंना सोबत घेऊन जाईल.. त्यांनाही कुलदेवतेचे दर्शन घडेल. पार्वतीकाकूंची परवानगी मिळाली की जाऊन येऊ. आता आपण आराम करावा. रमाबाई त्यांच्या दालनातून बाहेर पडल्या.

 कटोऱ्याला श्रीमंत बाजारांची सुवर्ण तुला झाली. त्यांच्या भारोभार सोने गोरगरिबांना वाटण्यात आले. त्यांची दुवा मिळावी म्हणून दुधाळ गाई दान करण्यात आल्या. पण कशाचाच श्रीमंतांच्या प्रकृतीला आराम पडत नव्हता. रमाबाईची हरिहरेश्वरला जाण्याची तयारी सुरू झाली. श्रीमंतांना एवढं बरं नव्हतं तरी ते स्वतः यात्रच्या तयारीत जातीने लक्ष घालत होते.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. २५-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                भाग – २३.

               हरिहरेश्वर यात्रे संबंधी श्रीमंत माधवराव पेशव्यांनी जंजिराच्या नवाबला आणि इतर किल्लेदारांना कळविले होते. यात्रेला निघायच्या आधी रमाबाई माधवरांचा निरोप घ्यायला त्यांच्या महाली आल्या. भरल्या गळ्याने रमाबाई म्हणाल्या, आपली तब्येत अशी तोळामासा. आमचे मन जायला होत नाही. तिकडे गेल्यावर आमचे मन सारखे आपल्या भोवतीच घोटाळात राहील.

            रमा, तुम्ही देव दरबारी जात आहात. सारा भार हरिहरेश्वर टाकून जा. तो सर्वांनी निभावेल. तुम्ही हरिहरेश्वरला संकल्प सोडल्याबरोबर, आम्हाला इकडे बरं वाटू लागेल. तसं झालं तर आमचं साता जन्माचे पुण्य फळाला आलं असं समजू. पुसा ते डोळे आणि हसतमुखाने बाहेर पडा. रमाबाईने पदराच्या टोकाने अश्रू टिपले. वास्तविक श्रीमंताचा अंतस्थ हेतू होता, या वातावरणातून रमाबाईंना थोडा विरंगुळा मिळावा. तशा त्या गेल्या नसत्या म्हनून दर्शनाचे निमित्य पुढे केले होते.

           श्रीमंत म्हणाले, तुम्ही अजून कोकणचा निसर्ग पाहिला नाही. समुद्राचा अनोखे दर्शन झाल्यावर, तुमच्या चित्तवृत्ती प्रसन्न होतील. समुद्रातून मनुष्याला पुष्कळ शिकायला मिळते. संघर्ष कसा करावा, रौद्ररुप कसं व केव्हा धारण करावं…प्रसंगी विनयशील कसं व्हावं, हे सारं काही समुद्र शिकवतो. आम्ही समुद्रापासून बरेच काही शिकलो. निसर्गाचे हे पुस्तक मन लावून वाचलं तर, माणूस खूप काही शिकत असतो. या तुम्ही.

             रमाबाई पेशव्यांचा निरोप घेऊन बाहेर पडल्या. शनिवार वाड्याच्या चौकात सज्ज असलेल्या मेण्यात रमाबाई, गंगाबाई आपापल्या मेण्यात बसल्या. नारायणरावांसाठी व दासींसाठी स्वतंत्र मेणे होते. रक्षक दल सज्ज् होते. इशाराती बरोबर मेणे उचलले गेले. पिलखानाचा हत्ती समोर होता. मागेपुढे घोडेस्वरांचे पथक दौडत होते.

              रमाबाई हरिहरेश्वरला गेल्या. पण श्रीमंत माधवरांच्या प्रकृतीत काही आराम पडला नाही. सारे उपाय निष्फळ ठरत होते. वैद्य, हकीम, फिरंग्यांची औषधे चालू होती. पण श्रीमंतांची प्रकृती दिवसागणिक  ढासळतच होती. ते मात्र आजाराशी  बेफिकीरपणे एकाकी झुंज देत होते. आजाराची भयंकर स्वरूप त्यांना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी कारभारात जास्त जारीने लक्ष घातले होते. पेशव्यांच्या दालनाला फडाची स्वरूप प्राप्त झाले होते.

               दोन महिन्यानंतर रमाबाई शनिवार वाड्यात परत आल्या. त्यांची समजूत होती, आतापर्यंत श्रीमंतांच्या तब्येतीत फरक पडला असेल. त्यांना बरं वाटलं असेल. पण त्यांची ढासळलेली तब्येत बघून त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. त्या वाड्यात शिरल्याशिरल्या पेशव्यांच्या दालनी आल्या होत्या. त्यांना अचानक आलेल्या पाहून त्यांच्याकडे विस्मयाने पहात श्रीमंत म्हणाले, केव्हा आलात प्रियदर्शनी? वाड्यात शिरल्याबरोबर लगेच आले. रमा हवा पालट झाल्यामुळे तुम्ही प्रसन्न दिसता. तब्येत पण सुधारली. आणि आपली? आमची तब्येत जशीच्या तशीच आहे. काही सुधारणा नाही. मग आम्हाला आशेचे गाजर कशाला दाखवले? आमची इच्छा होती कुलदेवतेचे दर्शन व्हावं. निदान हरिहरेश्वरांच्या दर्शनाने तरी प्रकृतीत आराम पडेल. शिवाय तुम्हालाही थोडा हवापालट होईल. प्रयत्न करणे आपल्या हाती, यश येणं दैवाधीन असतं.

           पेशव्यांना नुसती अवकाळी आली होती. डोळे खोल गेले होते.  सतेज कातडी करपली होती. कळवळून रमाबाई म्हणाल्या, स्वामी, फार त्रास होतो ना? झोप तरी लागलत होती का? कशी लागणार? तुमच्या वाटेकडे डोळे लागले होते. स्वामी, या आजारामुळे अलीकडे आपला स्वभाव फार हट्टी व लहरी झाला. हे मात्र खरं! पण आपल्या प्रिय माणसाकडूनच हट्ट करून घ्यायचा असतो ना?

          खचून गेलेले श्रीमंत म्हणाले, तुम्ही गेल्यापासून आम्ही कुठेही बाहेर पडलो नाही. मोहिमेचं नाव देखील काढलं नाही. आज ना उद्या बर वाटेल म्हणून एकही दिवस औषध टाळले नाही. आता हा आजार हटतच नाही त्याला आम्ही तरी काय करणार?

                 रमाबाई बाहेर पडताच, आतापर्यंत दाबून ठेवलेली खोकल्याची उबळ उफाळून आली. मोठमोठ्याने ठसकू लागले. एवढी तब्येत बिघडली असताना देखील श्रीमंतांनी कर्नाटकाची चौथी मोहीम आखली. श्रीमंतांनी मोहिमेवर जाऊ नये म्हणून राज वैद्य व  फिरंगी वैद्याने मनाई केली. तरी देखील श्रीमंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले .रमाबाई खूप अट्टहासाने त्यांच्याबरोबर मोहिमेवर गेल्या. पण श्रीमंतांची तब्येत वेळोवेळी बिघडत होती. तब्येत बिघडली की मुक्काम हलवता येत नव्हता. मिरजच्या मुक्कामात श्रीमंतांची प्रकृती फारच बिघडली. प्रवासाची दगदग सहन करण्याची ताकद राहिली नाही. शेवटी मिरची जबाबदारी त्र्यंबकरा मामा पेठेवर सोपवून श्रीमंत पुण्याला परतले होते.

               फिरंगी वैद्यच्या सल्ल्यानुसार हवा पालट करण्यास श्रीमंत कटोऱ्याला गेले. काही दिवसांनी पेशवे शनिवार वाड्यात परत आले.

               तिकडे दादासाहेबांचे अघोरी अनुष्ठान,व्रत वैकल्ये, भानामतीचे प्रकार जोरात सुरू होते.

            श्रीमंतांची थेऊरच्या गजाननावावर अगाध श्रद्धा होती. त्यांनी आपले प्रस्थान थेऊरला केले. श्रीमंत पालखीतून उतरून नगारखान्यासमोर आले. इच्छाराम पंतांनी सामोरे येऊन पेशव्यांना मुजरा घातला.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. २५-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                 भाग – २४.

              पेशवे आणि इच्छारामपंत गजाननाच्या मंदिराकडे आले. मंदिराच्या पायऱ्या चढून श्रीमंत पेशवे ओवरीत आले. गाभाऱ्यात शिरताच श्रीमंतांची नजर गजाननावर खिळली. श्री गजाननाची ती बैठी विशाल मूर्ती कडे श्रीमंत मोठ्या भक्ती भावाने पाहत होते. ती पवित्र मूर्ती आपल्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात साठवून घेत होते. मोठ्या श्रद्धेने ओंजळीतली फुले गजाननाला अर्पण केली.  पुजाराने दिलेले तीर्थ प्राशन केले. मंदिराला तीन प्रदक्षिणा पुऱ्या करत नाही तोच त्यांना प्रचंड थकवा आला. इच्छारामपंत चटकन पुढे होऊन त्यांना आपल्या खांद्याचा आधार दिला. पुन्हा गाभाऱ्यात येऊन गजानना समोर गुडघे टिकून थरथरते हाताने गजानना वंदन करून प्रार्थना करत म्हणाले, देवा आता तूच समर्थ आहे आहेस. आमचे सारे उपाय थकले आहे. आता सारा भार तुझ्यावर. तुझ्या वरदहस्तामुळे, तुंगभद्रे पासून अटकेपर्यंत पुन्हा राज्य उभे राहिलं. पण अजून स्थिरता आली नाही. या दौलतीसाठी आणखी तीन-चार वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर,

 आम्ही यशस्वी झालो असतो. ही मराठी दौलत तुझीच आहे. तुलाच तीची काळजी. आता सारं काही तुझ्या हाती आहे.

          श्रीमंत माधवराराव कसेबसे उठले. इच्छारामने त्यांना आधार दिला. त्या आधाराने ते माडीवरील मंचकावर लेटले. श्रीमंत म्हणाले, पंत आमचे किती दिवस उरले सांगता येत नाही. आम्ही लवकरच हा नश्वर देह सोडू याची खात्री वाटू लागली. पण अजून खूप महत्त्वाच्या गोष्टी राहून गेल्या आहेत. बोलता बोलता त्यांना ठसका लागला. थोडे शांत झाल्यावर, पुन्हा बोलू लागले, आम्ही सतत मोहिमेत असल्यामुळे नारायणरावांकडे म्हणाव तसं लक्ष देता आलं नाही. ही खंत आम्हाला सतत छळत राहते. आमच्या नारायण रावाला तुमच्या हाती सोपवत आहे. आमच्या नंतर त्यांना आधार द्या. श्रीमंत, गजाननाची शपथ घेऊन आपल्याला वचन देतो, मी आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाही. श्रीमंतांच्या  निर्वाणीच्या बोलल्याने अस्वस्थ झालेले इच्छ रामपंत मुजरा करून बाहेर पडले.

          रमाबाईच्या स्वागतासाठी इच्छारामपंत दाराशी उभे होते. रमाबाई उतरताच इच्छारामपंतांनी त्यांना मुजरा केला. रात्रीचे  भोजन झाल्यावर, रमाबाई श्रीमंतांच्या महाली आल्या. मंचकाच्या कडेला टेकत रमाबाईंनी विचारले, स्वामी आता तुम्ही गजाननाच्या परिसरात आलात. अंगात जर नाही ना? ज्वर नाही पण थकवा फार आहे. म्हणाले, एवढ्या तातडीने आलात?  स्वामी तुम्ही समोर नसलात की माझे मनच लागत नाही. आम्ही असं अचानक आल्याने राग आला का?

         छे! छे! तुमच्या बाबतीत आम्ही रागाच्या पलीकडे गेलो आहोत. तुमच्या हळव्या मनाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही आता आपलं मन खंबीर करायला हव. आम्ही या दुर्धर आजाराला बांधले गेलो आहोत. केव्हाही काहीही होऊ शकते. स्वाऽऽमी, हे काय अभद्र बोलणे? उलट तुम्ही आमच्या मनाला उभारी द्यायला हवी. रमाऽ, आतापर्यंत आम्ही तेच केले. आता मात्र आम्हीच हतबल झालो. तुम्ही मात्र घाबरू नका…

            मन खंबीर करून ऐका …आम्ही काय सांगतो ते.  रमाऽ, मृत्यू काय सर्वांनाच येतो. पण आम्ही मृत्यूला लाजवला आहे. आम्ही आमच्या अल्पशा आयुष्यात राज्याला गती दिली. मती दिली.  मनुष्य जीवनाचे सार्थक करून एक प्रतिमा निर्माण केली. मृत्यूलाही शरमेने खाली घालायला लावली. आम्ही मृत्युंजय आहोत. म्हणूनच मृत्यू आला तरी भीती वाटत नाही.

      प्रियदर्शनी, मागे तुम्ही एकदा तुम्ही पार्वतीकाकींनी  बळवंतराव मेहंद्यांची स्त्री सती गेल्याचे सांगितले होते. स्वामी, आताच तो विषय कां? श्रीमंत म्हणाले, रमाऽ, सहगमन करणं हे भाग्यवंत स्रीचे लक्षण आहे. मग? जर कदाचित….

             स्वामीऽऽ, रमाबाई एकदम करूण आवाजात किंचाळल्या. रमा शांत हो. रमा सत्य कधी लपून राहत नाही. आणि आम्हाला नियोजन करण्याची आधी पासूनच सवय आहे. स्वामीऽ, स्वामीऽ आज काय झाले तुम्हाला? का असे अशुभ बोलत आहात? कारण… कारण आम्हाला आमचं भवितव्य कळून चुकले आहे. मृत्येचे वेध आम्हाला लागले आहे. रमाऽ, रमाऽ, आम्ही गेल्यावर तुम्ही सती जाल?

          रमाबाई अबोल होऊन नुसत्या बसून राहिल्या. त्यांचे डोळे पाझरत होते. श्रीमंतांनी रमाबाईचा हात प्रेमाने हातात घेऊन म्हणाले, प्रियदर्शनीऽऽ हे आम्ही यासाठी म्हणत आहोत की, आमच्या नंतर तुमचे हाल होऊ नये. रोज सती जाण्यापेक्षा एकदाच गेलेले चांगले. शनिवार वाड्यातील स्त्रियांची आम्ही उघड्या डोळ्यांनी होणारी दशा पाहिली आहे. आमच्या मोठ्या वहिनी साहेबांची दशा पाहिली आहे. ज्या शनिवार वाड्यात तुम्ही फुल वेचलीत तिथं गोवर्‍या वेचण्याची पाळी तुमच्यावर येऊ नये. जिथे फुलांची शय्या केली तिथे काट्यांची शय्याया येऊ नये. कीड्या कीटका प्रमाणे चार भिंतीच्या कैद खान्यात जाडेभरडे वस्त्र परिधान करून सडत पडू नये असं आम्हाला वाटते. आमच्या निधनानंतर तुम्ही सती गेल्या नाही तर, आमच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही.

        स्वामी आपल्या मनी अशी शंका आलीच कशी? स्वामी, तुमच्या मृत्यूचे नुसतं नाव निघालं तरी मन पिळवटून निघते. रमा, तो अटळ आहे. प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा त्याचे मिठीत समावेच लागते. आम्हाला तो लवकर मिठीत घ्यायला उतावळा झाला एवढेच .श्रीमंतांनी आपली नजर रोखीत विचारलं, आम्ही व्यक्त केलेल्या इच्छेचे काय?…

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. २५-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                  भाग – २५.

               पेशव्यांनी आपल्या निधनानंतर रमाबाईने सहगमन करावे ही इच्छा व्यक्त केल्यावर, रमाबाई म्हणाल्या, स्वामी, उभ्या आयुष्यात आम्ही आपली कोणतीच इच्छा, आज्ञा कधीच मोडली नाही. मग आताच कशी मोडणार? आपल्याला खात्री असायला हवी होती. सुटलो आम्ही. दिवस-रात्र याच विचाराने त्रस्त होतो. आमच्यानंतर तुमची होणारे परवडीच्या कल्पनेनेच नुसता जीव व्याकुळ होत होता. आता मृत्यू केव्हाही आला तरी त्याच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत.

          औषध घ्यायची असतील ना? द्या. त्याचीच आता सोबत करायची आहे.

             दुसऱ्या दिवशी नाना फडणीस श्रीमंतांच्या भेटीला आले. पुण्यात सर्व ठीक असल्याचे सांगितल्यावर, श्रीमंत म्हणाले, नाना, नारायणरावांचा स्वभाव थोडा चंचल, हट्टी, संतापी आहे. त्यांना सांभाळून घेऊन तयार करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवतो आहे. पार पाडाल? श्रीमंत, आपली आज्ञा कधीच मोडणार नाही.

          श्रीमंत, एक वाईट बातमी आहे. पण आपली तब्येत नाजूक पाहून आपल्या कानावर घालावी की नाही या उहापोहात होतो. नाना, आता आम्ही या सर्व गोष्टीच्या पलीकडे गेलो आहोत. सांगा.. नाना, काय वाईट बातमी आहे? श्रीमंत, गोपाळराव पटवर्धन आपल्याला सोडून गेले .श्रीमंतांना अतिशय दुःख झाले. म्हणाले त्यांचे वडील हरिभाऊंचे प्रत्यक्ष जाऊन सांत्वन करायचे आमचे कर्तव्य. पण आता आमच्यात काहीच त्राण नाही.

           बरं! नाना, आता तुम्ही निघा. इथली चिंता करू नका. काकांवर लक्ष ठेवा. पण त्यांची कोणत्याही प्रकारे अवहेलना व्हायला नको. नारायणरावांना नजरेआड होऊ देऊ नका. पुणे सोडून कुठे जाऊ नका. जशी आज्ञा म्हणून मुजरा करून नाना फडणीस निघून गेले .

                उत्तरेतून विजयाच्या येणाऱ्या बातम्यांनी थेऊरच्या वातावरणात काही अंशी बदल झाला होता. श्रीमंतांचा अशक्तपणा सोडला तर ते आजारी आहेत असे वाटत नव्हते. दप्तरचे कामकाज खलिते तयार होत होते. हुकुम सुटत होते. श्रीमंतांच्या सही शिक्क्यासाठी कागद पुढे होत होते. पेशव्यांचा उत्साह भरभरून ओसंडत होता. अशाच उत्साहात५-६ दिवस गेले. आणि एक दिवस श्रीमंतांना ताप चढला. स्वर्वांग घामाने भिजून निथळू लागले. काही क्षणात वाड्यातील वातावरण बदलले. धावपळ सुरू झाली. राज वैद्याला पाचरण करण्यात आले. गंगा शास्त्री साक्षात अश्विनी कुमार, सोबत हेमंत शास्त्रीही होते. त्यांनी श्रीमंतांना तपासले. आणि दोघे वैद्य दालना बाहेर आलेत. पाठोपाठ रामशास्त्री, त्र्यंबक मामा पेठे,  सखाराम बापू ही होते.

             रामशास्त्रींनी विचारले, वैद्यराज, एकाएकी श्रीमंतांना असं काय झालं? अचानक ज्वर का आला? वैद्यराज म्हणाले, तुम्हा सर्वांना माहित आहे, श्रीमंतांची प्रकृती विकोपाला गेलेली आहे. केव्हा देगा येईल सांगता येत नाही. त्यासाठी संपूर्ण विश्रांती आणि पथ्य पाळले गेले तरच काही दिवस जगण्याची आशा आहे. राजयक्ष्म्यावर अजून तरी रामबाण औषध नाही. श्रीमंत अशीच दगदग करत राहिले तर, मात्र कठीण आहे.

     पण हे श्रीमंतांना कोणी सांगावं? तुम्ही. तुमचा शब्द श्रीमंत मानतात. मानत होते. पण आता त्यांचा स्वभाव फार बदलला आहे. फार हट्ट झालेत. व्यथित होऊन रामशास्त्री म्हणाले.  हेमंतशास्त्री म्हणाले, मग सगळ काही श्रींच्या हाती आहे. हेमंत शास्त्रींनी काही भस्माच्या पुड्या देऊन कडक पथ्य सांगून दोघे वैद्यराज निघून गेले.

          दोन प्रहर टळली तरी श्रीमंतांचा ज्वर कमी झाला नव्हता. घाम फुटत होता. ठसका सुरू झाल्या. शरीराचा दहा वाढला. रमाबाई त्यांच्या उशागत बसून त्यांचा घाम टिपत होत्या. श्रीमंतांच्या शरीराची सारखी तगमग सुरू होती.

      रमाबाईच्या चिंतेने ग्रासलेला चेहरा पाहून, श्रीमंत म्हणाले, तुम्ही कशाला एवढी चिंता करता? आता आमच्या शरीराला सवय जडली आहे. उत्तरेतील विजयामुळे आम्हाला आणखी जगायला हवंय! स्वामी, आपल्याला जास्त बोलल्याने ताण पडतो. स्वस्थ पडून राहावे.

         त्याचवेळी नाना फडणीस आत आले. कातर आवाजात म्हणाले, श्रीमंत आपल्या अशा स्थितीत मनस्ताप देण्याचे पाप करावे लागत आहे. सांगा नाना, आम्ही ऐकतो आहोत. श्रीमंत, उत्तरेच्या विजयोत्सव पुण्यात साजरा होत असताना त्या गडबडीचा फायदा घेऊन दादासाहेबांनी नजर कैदेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला.. कट लक्षात आल्यावर त्यांना पकडून नाईलाजाने आपल्यासमोर हजर करावे लागत आहे.

              काकासाहेब, आम्ही मृत्यू शय्येवर असताना देखील तुम्हाला राज्य लोभ सुटत नाही. तुम्ही आमचे… बोलता बोलता त्यांना जोराचा ठसका लागला. जीव कासावीस झाला. पतीची अशी अवस्था झाल्याची पाहून, रमाबाई एकदम कडाडल्या. शांत व्हा स्वामी! रघुनाथ रावांकडे पाहून रणमर्दीनी सारख्या गरजल्या…

             मामंजी, आपण वडीलधारी म्हणून आज पर्यंत आम्ही आपला आदर करीत आलो. आमच्या  स्वामींनी देखील हेच केले. पेशवे घराण्याचा रिवाज बाजूला ठेवून आज बोलायचे धाडस करीत आहोत. बारा वर्षांपूर्वी तुम्ही आमच्या स्वारींना पेशवाईची वस्त्रे देववली. पण केवळ लोक लाजेस्तव. तुम्हाला ती वस्त्रे हवी होती. त्यासाठी तुम्ही अनेक कटकारस्थाने करून आज आमच्या स्वारीची ही अवस्था केली. तरी तुमचा राज्य लोभ सुटत नाही. स्वार्थाने बरबटून अंतर्गत गृहकलन माजवला. त्यांचे वर मारेकरी घातले. त्यांची मानसिक शांतता बिघडून टाकली. त्यांना झोपेला पारखे केले. मृत्यूशय्येवर ढकलले आहे तुम्ही त्यांना. बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातल्या शत्रूच बलाढ्य ठरला.

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

रमाबाई पेशवे चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading