श्रीमंत रमाबाई पेशवे चरित्र भाग ४, (१६ ते २०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी ” मराठा दौलतीचे वस्त्रे” दादासाहेबांना आणि “…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! श्रीमंत रमाबाई पेशवे !!! 

भाग – १६.

                गोपिकाबाई म्हणाल्या, मोहिमेत तुम्ही आजार अंगावरच काढलेला दिसतो. आईसाहेब स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला सवड होतीच कुठे? कोसळत्या पावसात उभे राहिलो, त्याचा हा परिणाम असावा. पण अशा कोसळत्या पावसात तुम्ही भिजलातच कशाला? आईसाहेब, आम्हाला मिळत असलेले यश उघड्या डोळ्यांनी पाहत होतो.  नुसती शत्रूची लंगडे तोड सुरू होती. ते अपूर्व यश पाहत असताना आम्हाला पावसाचे भानच राहिलं नाही.

         पेशव्यांच्या अंगात चांगलाच ताप भरल्यामुळे, गोपिका बाईंनी ताबडतोब राज वैद्याला बोलावून घेतले. राजवैद्याने औषध देऊन मुजरा करून निघून गेले.

            आठ दिवसात पेशवे हिंदू फिरू लागले. फडावर जाऊन कागदपत्रे तपासून लागले. एक दिवस मेण्यात बसून निजामाने उध्वस्त केलेल्या पुण्याचा फेरफटका मारला. तेव्हा चांगल्या चांगल्या इमारती उध्वस्त झालेल्या दिसल्या. मंदिराचे कळस कापले गेले होते. देवांच्या मुर्त्या भंग झाल्या होत्या. पुण्याचे ते भेसूर रुप पाहून श्रीमंत पेशव्यांना अतिशय दुःख झाले. असह्य वेदना झाल्या. ज्यांच्यावर पुण्याची जबाबदारी सोपवली होती,  त्यांना धारेवर धरले. चौकशी समिती नेमली.  चौकशीचे प्रमुख पद त्रिंबकराव पेठेंना दिले. हे सर्व पाहून पेशव्यांची तब्येत बिघडली. तरी सुद्धा पुण्यातील ज्या गरीब रयतेचे नुकसान झाले, नागवले गेले त्यांना योग्य मोबदला देऊन रयतेचे शांतवन केले.

              दुसऱ्या दिवशी आपल्या महालात प्रमुख सरदारांना बोलावले. त्याबरोबरच आपले सखे मामा गोपीका बाईचे बंधूनाही बोलावले. जाब विचारण्यासाठी. रास्ते श्रीमंतांसमोर येऊन मुजरा करून उभे राहिले. श्रीमंत म्हणाले, आम्ही एवढा राक्षसभुनाचा विजय संपादन करून आलो. म्हटलं मामा म्हणून आमचं कोड कौतुक करायला याल. पण नाही आलात.

       आम्ही नेमलेल्या चौकशी समितीकडून आलेल्या अहवालात आपण दोषी ठरलात. मामासाहेब रास्ते  खाली मान घालून उभ्या जागी थरथरत उभे होते. पेशव्यांचा तो अनोखा अवतार पाहून त्यांची पाचावर धारण बसली. ते स्तब्ध उभे राहिलेले पाहून  पेशव्यांचा संताप अनावर झाला. तुम्ही आमचे आप्त, स्वकीय प्रत्यक्ष मामा आणि आमच्या गैरहजेरीत शत्रूला जाऊन मिळालात.

           श्रीमंत माफी असावी. माफी? रास्ते, तुम्ही उघड उघड राजद्रोह केला. अक्षम्य अपराध केला. निजाम पुणे लुटत होता, मंदिर लुटत असताना तुम्ही निजामाला मदत करीत होता. कुठे गेला तुमचा धर्म? राजनिष्ठा? निजाम तर शत्रूच होता त्याची कृती एक वेळ विसरू शकतो. पण तुमची? नाही.. तुम्हाला आम्ही पाच हजाराचा दंड करीत आहोत. तीन दिवसाच्या आत न भरल्यास तुमची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्यात येईल. शास्त्रीजी, आमच्या हुकमाची अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहायचे काम तुमचे आणि नानाचे आहे.

            रास्ते वयाने, मानाने मोठे होते. त्यांना हा अपमान सहन होण्यासारखा नव्हताच. रिवाजा प्रमाणे मुजरा करून तणतणतच बाहेर पडले, ते थेट गोपिका बाईच्या महाली गेले. बहिणीला उलटसुलत सांगून आपण निर्दोष असताना पेशव्यांनी ५००० रु.चा दंड ठोठावल्याचे सांगितले. म्हणाले, तुम्ही काही केले नाही, व आम्हाला दंड भरावा लागला तर, पुन्हा या वाड्याची पायरी चढणार नाही असे म्हणून रास्ते निघून गेले.

        अस्वस्थ गोपिका बाईंनी माधवरावांना बोलावून घेतले. म्हणाल्या, रास्ते तुमचे मामा आहेत. एवढे तरी भान ठेवायला हवं होतं. आईसाहेब, आम्ही जेव्हा श्रींच्या मसनदीवर बसतो तेव्हाच, सारे नाते, मोह दूर केले. त्याशिवाय न्यायदेवतेशी प्रामाणिक राहू शकत नाही. आईसाहेब, मामांनी निजामाशी हात मिळवणी करून त्याला लुटीच्या जागा दाखवल्या. हा अपराध क्षम्यच नाही. का क्षम्य नाही? इतरांना क्षम्य होऊ शकतो तर आमच्या बंधूंना का नाही? गोपाळराव पटवर्धन निजामाला मिळाले तरी, त्यांना क्षमा करून मिरज दिले. रामचंद्र जाधव तर तुमच्या काकांच्या जीवावर उठले होते तरी, त्यांना सरदारकी बहाल केली. हे कोणत्या स्वामीनिष्ठचे निकष लावले होते?

    आईसाहेब, गोपाळरावांवर आमच्याकडून अन्याय झाला होता. राज्याचे हित लक्षात घेऊन, आम्हाला तसं वागाव लागलं. पण मामा साहेबांचं पुण्याचे रक्षण करणे कर्तव्य होते. ते विसरून त्यांनी निजामास मदत केली. त्यांचे जागी दुसरा कोणी असता तर एखाद्या किल्ल्याच्या अंधार कोठडीत कायमचे डांबलं असतं.

        वास्तविक आपल्या पुत्राचा बाणेदारपणा पाहून, मनोम त्यांना कौतुकच वाटले. पण त्यांना माहेरही  तेवढेच ती प्रिय होते. माहेरची बदनामी त्या कशी सहन करणार होत्या? गोपिकाबाई म्हणाल्या, माधवा, हा आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आईसाहेब, आम्ही फार तर मामासाहेबांचे रक्कम आमच्या खाजगीतून भरू. नको जर रस्त्यांकडून दंड वसून झाला तर, आम्ही या वाड्यात पाण्याचा थेंबही घ्यायला थांबणार नाही. श्रीमंतांना एकदम वीस कोसळल्याचा भास झाला.  आपल्या आईचा करारी स्वभाव त्यांना माहीत होता. पण ते शांतपणे म्हणाले, तसं झालं तर आम्हाला खूप दुःख होईल. मातृवियोगासारखं कठीण दुसरे दुःख नाही. पण आम्ही राजनिष्ठेला बांधील आहोत. राज्य भावनेवर नाहीत तर, निष्ठेवर चालते. आपणच योग्य निर्णय घ्यावा. आम्हाला एकट नका हो टाकू …असे म्हणून मुजरा करून झटकन माधवराव बाहेर पडले.

         नारायणरावांना रमाबाई व माधवरांच्या स्वाधीन करून गोपिकाबाई गंगापूरला निघून गेल्या. आणि महालाची सारी जबाबदारी रमाबाईच्या खांद्यावर येऊन पडली. रमाबाईंची वाड्यातील त्यांची उत्तम गृहिणीची भूमिका निभवतांना पाहून श्रीमंत पेशवे समाधान पावले.

           क्रमशः
संकलन,लेखन व ज्ञ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. २५-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                भाग – १७.

               श्रीमंत माधवराव पेशवेने आपली वेगळीच प्रतिमा निर्माण केली होती. विरोधक, राजकारण्यात वेगळाच दरारा निर्माण करून त्यांना सुतासारखे सरळ केले होते. शेतकऱ्यांना उत्तेजन देऊन बगायती शेतीवर भर दिला. मुळा मुठा नदीवर बंधारे बांधले. विहीर तगाईच्या योजना राबवल्या .अतिवृष्टी किंवा अवर्षणामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई सरकारी कचेरीतून देण्यास सुरुवात केली. जकात पद्धतीत सुधारणा करून व्यापारस उत्तेजन दिले. त्यामुळे राज्याची भरभराट होऊ लागली रयत पेशव्याना दुवा देऊ लागली.

            रात्री रमाबाई माधवरावांचे पाय चेपीत होत्या. दोघेही गप्पा करीत होते. माधवरावांनी केलेल्या स्तुतीने त्या भारावून गेल्या होत्या. बोलता बोलता पार्वतीबाईंचा विषय निघाला. बळवंतराव मेहंदळे यांच्या पत्नी आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागे टाकून सती गेल्याचे दुःख पार्वती काकूंना झाले होते. रमाबाई म्हणाल्या, स्वामी, पती निधनानंतर जिवंतपणे चित्तेवर स्वतःला जाळून घेण्याचा प्रकार भयंकरच आहे. नुसती कल्पना केली तरी मनाचा थरकाप होतो. माधवराव म्हणाले, रोज जिवंत मरण्यापेक्षा सती जाण्याच्या वेदना खूप कमी असतात. म्हणजे? रमा, पती निधनानंतर स्त्रीला घरात, समाजात काही किंमत राहत नाही. इतर पुरुषांची तिच्यावर वाईट नजर पडू नये म्हणून तिला विद्रूप केले जाते. जाडी भरडी लाल वस्त्रे तिच्या अंगावर चढवले जाते. चार भिंतीच्या आत अंधारात कोंबल्या जाते. तिच्या जीवनातला प्रकाश हिरावल्या जातो. तिच्या भावना उद्युक्त होऊ नये म्हणून अळणी अन्न खायला दिल्या जाते. मग अशा विटंबणापेक्षा सती जाण्यातल्या वेदना कमी नाहीत का? थोड्यावेळापूर्वी दोघेही प्रेमाने ओथंबून बोलत होते. मनोननी सुखात होते. बोलता बोलता या दुःखद प्रांतात कधी शिरलं हे देखील दोघांनाही कळले नाही. सुखापेक्षा दुःखच अधिक डोक्यावर असतं.

               यावेळी कर्नाटकच्या मोहिमेत पेशव्यांनी नारायणरावांना सोबत घेतले. रमाबाईंनी नारायण रावांना योग्य सूचना दिल्या होत्या. मोहिमेत पेशव्यांच्या संगतीत नारायण रावांना खूप काही शिकायला मिळत होते. हैदर अली निसटून घनदाट अरण्यात लपून बसला. त्याला उघड्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. सावनूरच्या नवाबाची जबाबदारी गोपाळराव पटवर्धनांवर सोपवली.

         श्रीमंत डेऱ्यात बसून काही महत्त्वाचे कागदपत्र पाहत होते. बाजूलाच नारायणराव बसले होते. तेवढ्यात दोन महत्त्वाचे खलिते घेऊन बापू प्रवेशले. श्रीमंत, एका खलीत्यात उत्तरेत भाऊ साहेबांचा तोतेया निर्माण होऊन सैन्यानिशी दक्षिणेकडे निघाले असल्याचा शिंदेचा खलिता आहे. आणि दुसरा नाना फडणीसांचा आहे. दादासाहेब नाशिकला सरदार मंडळीच्या गाठीभेटी घेत आहेत.

             श्रीमंत म्हणाले, जिथे आकाशच फाटलं तिथे आम्ही कुठे कुठे सांधणार? काकासाहेब असे अधून मधून का वागतात कळत नाही. श्रीमंत, दोन्ही बातम्या ऐकून अस्वस्थ, सुन्न झाले. बापू, तोयाचे प्रकरण वाढण्यापूर्वीच बंदोबस्त करायला हवा. बापू, हा प्रश्न अतिशय नाजूकपणे हाताळायला हवा. हा विषय पार्वती काकूसाहेबांच्या आयुष्याशी निगडित असल्यामुळे आम्हाला ठोस भूमिका घेता येत नाही. तोतयाची खात्री करून घ्या. ते खरंच तर भाऊ काका असतील तर त्यांना मानाने घेऊन या. नसेल तर त्याला जेरबंद करून अटकत ठेवा. आज्ञा श्रीमंत! मुजरा करुन बापू निघून गेले.

           आणि त्याचवेळी महादेव शिवरायनी प्रवेश केला. मुजरा करून, गोपाळराव पटवर्धनांनी हैदरचा बिमोड करून विजय प्राप्त केल्याची बातमी सांगितली.  पण शिवरामचा डाव फसल्यामुळे आतून ते कलमडले. त्यांना वाटले, एकटे पटवर्धन हैदरचा बिमोड करणार नाही. त्यांचा पराभव झाला की श्रीमंतांजवळ आपले वजन वाढेल. डाव उलटल्यामुळे दुःखी मनाने ते डेरा बाहेर पडले. 

                पेशव्यांनी धारवाडकडे कुच केले, तोच जासुदाने बातमी आणली की, रघुनाथराव कट करीत आहे. अस्वस्थ पेशव्यांनी विचार करून त्यांना या कर्नाटकच्या मोहिमेवर ताबडतोब बोलावून घेतले. खलिता रवाना केला.

            पेशव्यांनी आपल्या  फौजा हैदर दडून बसलेल्या जंगलात घुसवल्या. हैदरला सपाटून मार बसला. पण याही वेळी मराठी फौजेला चूकवून निसटून गेला. एवढ्यात तो आपल्या वाटेला जाणार नाही पण आज ना उद्या  डोके वर काढेल याची पेशव्यांना खात्री होती.

            स्वारीसाठी बाहेर पडून वर्षाचा काळ लोटला होता. कंटाळलेली फौजा घरी जाण्यास उतावीळ झाली होती. नारायणरावही कंटाळले होते. पण हैदरचा पडाव कसा करावा या विचाराने पेशव्यांची झोप उडाली होती. रात्र रात्र झोप येत नव्हती. ज्वर वाढत होता. खोकलाही असह्य होत होता. बिळात लपलेल्या सापाला बाहेर काढल्याशिवाय इलाज नव्हता.

          हैदर अनवडीच्या जंगलात दडला होता. त्या घनदाट जंगलाभोवती मराठ्यांचा कडक पहारा बसला. एवढा वेढा आवळला असल्यावरही तो पुन्हा निसटून बिदूनरकरांच्या आश्रयाला गेला. दादासाहेब फौजेनिशी आल्याच्या बातमीने फौजेत उत्साह संचारला. युद्धाची सारी सूत्रे आपल्या हाती देण्याच्या अटीवर दादासाहेब हैदरचा कायमचा बंदोबस्त करण्यास तयार झाले.

             डेऱ्यात दादासाहेब एकटेच असलेले पाहून सखाराम बापूंना प्रवेश केला. मुजरा करून म्हणाले, दादासाहेब, तुम्ही जर हैदरचा पडाव केला तर श्रीमंत पेशव्यांचे महत्त्व वाढेल. मग तुमच्या स्वप्नाचे काय? भोळसटपणा टाकून द्या. दादासाहेब म्हणाले, बरं झालं बापू, तुम्ही वेळीच सावध केले. आता चमत्कार पहा आणि श्रीमंत पेशव्यांच्या मर्जी विरुद्ध हैदरशी तह केला.

            वर्षभर चाललेली कर्नाटक मोहिम आटोपून श्रीमंत माधवराव पेशवे पुण्याला परतले. अतोनात कष्ट आणि मोहिमेच्या ताणाने त्यांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम झाला होता. खूप थकले होते. रमाबाईने प्रसन्न चित्ताने त्यांचे स्वागत केले नारायणरावांची प्रेमाने विचारपूस केली.

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. २५-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                 भाग – १८.

                नारायणरावांनी आपली वहिनी रमाबाईंना कर्नाटक मोहिमेची इत्थंभूत माहिती सांगितली. म्हणाले, पण शेवटी शेवटी खूप कंटाळलो होतो. सारखी तुमची आठवण येत होती. दीर भावजयीच्या गप्पा अशा रंगल्या की संध्याकाळ कधी झाली कळलेच नाही. देवाला व वहिनीला नमस्कार करून नारायणराव बाहेर पडले. आणि रमाबाई मुदपाक खाण्याकडे वळले. एक वर्षानंतर आलेल्या पतीसाठी गोडाधोडाचे भोजन करण्याचा बेत होता.

       रात्रीची भोजने झाली. सगळीकडे निरवता पसरली. श्रीमंत पेशवे आपल्या महाली मंचकावर पडून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या यशापशाच्या गोष्टींचा विचार करू लागले. प्रकृती साथ देत नसल्यामुळे थोडे नैराश्यही आले होते. नियतीने काय वाढून ठेवले दैवात? अंगात थोडा ज्वर होताच. विचारात गर्क असतात पावलांच्या आवाजांनी त्यांची विचारशृंखला तुटली.  २५ वर्षाच्या रूप संपन्न पण, चिंतेने ग्रासलेल्या पार्वतीबाईंना पाहून पेशव्यांना आश्चर्य वाटले. मंचकावरून उतरत म्हणाले, काकी साहेब, आपण? होय तुम्हाला पाहिल्याशिवाय, भेटल्याशिवाय चैन पडत नाही. त्यांनी मग पेशव्यांच्या तब्येतीची, मोहिमेची माहिती विचारली. श्रीमंनी माहिती सांगून म्हणाले, ऐनवेळी दादासाहेबांनी घोटाळा केला. हैदरच्या वकिलाशी तहाची बोलणी करून आतापर्यंतच्या आमच्या कष्टावर पाणी फेरले. त्या म्हणाल्या, कोणीतरी त्यांना गुरु भेटला असेल. आम्हालाही संशय आला होता. माधवा, दादा साहेबांचे असे तऱ्हेवाईक वागणे आम्हाला देखील भोवले. ते तुमच्या काका साहेबांचा खूप द्वेष करायचे आणि म्हणूनच उत्तरेची मोहीम बरोबर त्यांच्या खांद्यावर टाकली. तुमचा सुद्धा त्यांनी असाच घात केला. निजामला, हैदरला खुश केले. तुम्ही सांभाळून पावले उचला. जपून रहा.

              नंतर तोतया भाऊसाहेबांचा विषय निघाला. श्रीमंत पेशव्यांनी पार्वतीबाईंना शब्द देत म्हणाले, काकीसाहेब, आम्ही भाऊकांसाठी आकाश पातळ एक करू हा या माधवराव पेशव्याचा शब्द आहे. मनाचे समाधान होत होऊन पार्वती बाई निघून गेल्या. आणि रमाबाईंनी प्रवेश केला. त्यांचे लावण्य, तारुण्यांने मुसमुसलेल्या रमाबाईकडे अनिमिष नेत्रांनी पेशवे पहातच राहिले. प्रियदर्शनी, आम्हाला वाटले होते, तुम्ही लवकर याल. निघाले होते यायला, पण पार्वतीबाई काकी साहेब असल्याचे कळल्यावर नाही आले. तेवढ्यात मंजिरी दासी दूध घेऊन आली. पेशव्यांनी रमाबाई जेवले की नाही चौकशी केल्यावर कळले की त्यांनी अगदीच थोडे अन्न घेतल्याचे कळल्यावर तिला आणखी दुधाचा प्याला आणायला सांगितले.

              नंतर दोघांनी एकमेकांना आग्रह करून दूध घेतले. श्रीमंतांनी अंग टाकल्यावर त्यांचे पाय रमाबाई चेपीत होत्या. प्रियदर्शनी, तुम्ही दिवसभर धावपळ करून थकून थकल्या असाल. राहू द्या. आता झोपा तुम्ही. स्वामी! तुम्ही सतत मोहिमेवर असता. आज वाड्याला पाय लागले तर आम्ही पती सेवा करू नये  का? नारायणरावांनी सांगितलं आम्हाला या मोहिमेत आपल्याला खूप त्रास झाला. स्वामी! आपण तब्येतीला जपावं ना! निदान आमचा तरी विचार करावा. रडवेल्या होऊन रमाबाई म्हणाल्या. अश्रूंचे थेंब माधवरांच्या पायावर पडताच ते एकदम उठून बसत म्हणाले, रमा, तुमच्या डोळ्यात अश्रू? तुमचे बांधेरुद शरीर पाहून आम्हाला किती कौतुक वाटायचे. अभिमान वाटायचा. आता तेच शरीर, पण ते शरीर खंगत चाललंय!

           स्वामी! आम्हाला पूर्ण जाणीव आहे, बाहेरील शत्रूबरोबरच वाड्यातील गृहकलारामुळे तुमच्या मनावर खूप ताण पडतो. सतत तणावाखाली राहतां. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होतो. स्वामी, तुमच्या जीवनात काही बरे वाईट झालं तर आम्ही कोणाकडे पाहावं? कोणाचा आधार शोधू? कुणाला आपलं म्हणू? स्वामी, स्रीच्या आयुष्यात पती हा परमेश्वर असतो. स्वामी, राजकर्तव्य करताना आमचाही विसर पडू देऊ नका. स्वतःला जपा. आम्हाला तुम्ही हवे आहात. तुम्हीच नसला तर आम्ही संपलो म्हणून समजा. एक क्षणही तुमच्याशिवाय आम्ही जिवंत राहणार नाही.

            रमा, तुम्ही आम्हाला सांगता, पण स्वतःही आमच्यापेक्षा किती तणाव सहन करत आहात? तुमचं हे वय खेळण्या बागडण्याचं.. आणि तुमचं नाही का? रमा, आमचं आयुष्य या दौलतीला बांधल्या गेले. मग या आयुष्याशी आमचं नातं जोडल्या गेले आहे. आपण दोघं एकाच माळेचे मणी आहोत. पण स्वामी, त्या मायेचा धागा तुटणार नाही याची काळजी घ्यावी. घेऊ.. घेऊ.. झोपा आता. त्याचवेळी जबरदस्त खोकल्याची उबळ आली. प्राण कासावीस होऊ लागला. रमाबाई त्यांची पाठ चोळू लागल्या. थोडं पाणी पाजलं. खोकल्याची उबळ कमी झाली. मग हळूहळू पेशवे झोपी गेले.  मात्र रमाबाई विचार करत बराच वेळ जाग्या होत्या. रात्री केव्हा तरी झोपी गेल्या.

                 सदाशिव भाऊंच्या तोतयाला पुण्यात आणल्यावर पेशव्यांना उसंत नव्हती. जुन्याजाणत्या लोकांकडून ओळख तपासणी होत होती. पण ते भाऊसाहेबच आहे असं कोणीच ठामपणे सांगत नव्हते. थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजीअप्पांच्या भगिनी अनुबाई घोरपडे यांच्यासमोर आणले. त्या तर  सदाशिव भाऊंच्या आत्या होत्या. त्यांनी तर भाऊसाहेबांना अंग खाद्यावर खेळवले होते. त्यांनी सुद्धा ठामपणे निर्णय दिला नव्हता. शेवटी रघुनाथ रावांना पाचारण केले, पण त्यांनी तब्येत ठीक नसल्याचा बहाणा करून येण्याबद्दल नकार दिला.

              पुण्यात घरोघरी एकच विषय होता. आज पर्वतीवर भाऊसाहेब खरे आहेत की तोतया हा निकाल लागणार होता. पर्वतीवर प्रमुख सरदार, शास्त्री, पंडित, पेशवे उपस्थित होते. तोतयावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तोतया देत होता. पण श्रीमंत पेशव्यांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत झाली नाही .त्यांने नजर झुकवली. पेशवे समजायचं ते समजले. शेवटी त्याच्यासमोर बेल भंडार ठेवल्या गेला. पेशवे म्हणाले, तू एका महान व्यक्तीचे नाव धारण केलेस. एखाद्यावेळी आम्ही तुला खरे ही मानू. पण एका महान व्रतस्थ राहिलेल्या साध्वीचा विचार करून बेल भांडार उचलून काय खरं ते सांग. या शेवटच्या वाक्याने तोतयाला अश्रू अनावर झाले. सारा देह कंप पावत होता.

           क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. २५-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                भाग – १९.

              तोतयायला सारे असह्य झालं. अगतिक होऊन रडत म्हणाला, श्रीमंत क्षमा करा. मी सदाशिव भाऊसाहेब नसून सुखलाल कनोजा ब्राह्मण आहे. घरच्या गरिबीला कंटाळून घराचा त्याग करून गोसाव्याचा वेष धारण करून भटकत असताना नररचे सुभेदार आणि गणेश संभाजीने मला सदाशिवराव बनवले. सोबतीला फौज दिली. मी नाही नाही म्हणत असताना कोणीच ऐकलं नाही. श्रीमंत मला क्षमा करा. श्रीमंतांनी निकाल दिला, ज्या पुरुषाचं नाव याने धारण केलं हा अपराध अक्षम्य आहे.  याला नगरच्या किल्ल्यातील तळघरात डांबा. एक मोठे अरिष्ट टळल्याच्या समाधानात पेशवे शनिवार वाड्यात पोहोचले.

            शेवटी माधवराव ज्या गोष्टीला भीत होते तीच पुढे आली. पर्वतीबाईंना कटू सत्य सांगणे भाग होते. पार्वतीबाईंना सत्य कळल्यावर त्या मनाने व शरीराने कोलमडल्या. त्यांची कशीबशी समजूत काढून पेशवे आपल्या महाली आले. तोच रमाबाई आल्या. त्यांनीही उत्सुकतेने विचारल्यावर, खरा प्रकार कळल्यावर त्यांनाही अतिशय दुःख झाले.

            या घटनेला एक मास उलट होऊन गेला. या काळात नारायणरावांची मुंज करून घेतली. दोन-तीन महिन्याने विवाहही आटोपला. गंगापूरला दोन्ही कार्यक्रमाचे गोपिकाबाईंना निमंत्रण गेली पण, त्या आल्या नाही. सात वर्षाच्या गंगाबाई नारायणरावांची पत्नी म्हणून माप ओलांडून शनिवार वाड्यात आल्या. रमाबाईची थोरल्या म्हणून त्यांची आणखी एक जबाबदारी वाढली.

        उत्तरेकडचा बंदोबस्त मल्हारराव होळकर व शिंदे करत होते. त्यांच्या साथीला पेशव्यांनी रघुनाथरावांना पाठवले. निजाम आणि पेशवे नागपूरकर भोसलेवर  चालून गेले. त्यामुळे निजाम आणि पेशवे पुष्कळ जवळ आले होते. या संधीचा फायदा घेऊन निजामअलीची भेट कुरुमच्या मैदानात घेण्याचे निश्चित झाले. वेगळ्या नात्याने दोन सत्ताधीशांची भेट झाली. निजाम भेटीचे फलदायी श्रेय पदरात पडले म्हणून पेशवे समाधान पावले. तिथून निघून पेशव्यांनी गोदावरीकाठी तळ ठोकला. टोक्याचे ग्रहण आटोपताच श्रीमंत माधवराव पेशवे पुण्याला परतले.

              हैदरअली वरील चढाईची जोरदार तयारी सुरू झाली. पुण्याच्या कारभार नाना फडणीसांवर सोपवून विजयादशमीच्या मुहूर्तावर पेशवे दक्षिणेच्या मोहिमेवर निघाले. निजामालाही मदतीला बोलावून घेतले. निजाम चालून येत असल्याने हैदरचे धाबे दणाणले. पावसाळा तोंडावर आला होता. पावसाळ्यात छावण्या टिकाव धरणार नव्हत्या. शेवटी पेशव्यांनी त्याच्याकडून खंडणी घेण्याचे ठरवले. गोपाळरावांनी धीर करून पेशव्यांना विचारले, श्रीमंत, एवढी घाई करण्याचे कारण समजले नाही. दाजी आम्ही एकाच वेळी दोन आघाड्यावर लढतो आहोत. कच खाऊन काकासाहेब पुण्यात परतले. त्यांनी पुण्यात अनेक घोटाळे करून ठेवले आहे. राज्य हिताच्या दृष्टीने आम्ही पुण्यात असणं आवश्यक आहे. त्यात आमची ही अशी प्रकृती. ज्वर राहतो. खोकला सहन होत नाही. थकवा अतिशय जाणवत आहे.

        श्रीमंत पेशवे पुण्यात आले. तब्येत ठीक नव्हती. तरी राज्यशकट हाकलतच होते. उत्तरेकडच्या मोहिमेत दादासाहेबांनी यश तर मिळवलं नाहीच, तीस लाखांचं कर्ज डोक्यावर घेऊन परत आले. पेशवे चिडलेले पाहून दादासाहेबांनी सरळ सरळ मराठी दौलतीची वाटणी मागितली. आणि पेशवे भयंकर संतापून कडाडलेऽ, कुणाची दौलत? तुमची की आमची? आम्ही वाटणी देणारे कोण? आम्ही छत्रपतीचे सेवक आहोत. वाटल्यास तुम्ही पेशवे पद घ्या. पण असलेही विचार मनातही आणू नका. असह्य  तणावामुळे पेशव्यांना खोकल्याची मोठी उबळ आली. जीव कासावीस झाला. असह्य वेदना होत असल्यामुळे हात छातीवर आवळत पेशवे आपल्या खाजगी दालनात येऊन मंचकावर कोसळले. खोकल्याची उबळ थांबता थांबत नव्हती. रमाबाई घाबऱ्या झाल्या. त्या पेशव्यांची पाठ चोळू लागल्या. ताबडतोब राज वैद्याला बोलावले. राजवैद्याने श्रीमंत पेशव्यांची अवस्था पाहून एक जालीम मात्रा दिली. मात्रा पोटात जातात उबळ थांबली. थोडे शांत झाले. श्रीमंत मंचकावर पहुडले. रमाबाईंनी राजवैद्याला विचारले, काका, स्वामींना अशी तकलीफ का होते? बाईसाहेब, श्रीमंतांचे मन अतिशय नाजूक झाले आहे. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की त्याचा ताण शरीरावर पडतो. श्रीमंत म्हणाले, वैद्यजी, राज्याच्या जबाबदारीची आम्हाला फिकर नाही. पण आपलीच माणसं आमच्याविरुद्ध वागू लागले की, आम्हाला असह्य होते. राज वैद्यांनी औषधीच्या पुड्या रमाबाईच्या हाती दिल्या व निघून गेले. श्रीमंतानाही झोप लागली. दिवस बराच खाली उतरला तेव्हा त्यांना जाग आली. श्रीमंत लोडाला टेकून बसले. रमाबाई मंचकाच्या कडेला टेकल्या.

        स्वामी आता कसं आहे? आता पुष्कळ बरं वाटते. प्रियदर्शनी, आम्ही फार कमनशीबी आहोत. २१ वर्षाच्या वयात रात्रंदिवस औषध घ्यावी लागते. स्वामी, शरीर स्वास्थ्यासाठी घ्यावी लागतात. रमा, आम्ही मनाशी एक स्वप्न रचले होते. हे स्वप्न विश्वासराव रावसाहेब पानिपतच्या लढाईवर जाईपर्यंत होतं. पानिपतच्या लढाईने आमचं आयुष्यच बेरंग झाले. नियतीने आमचं स्वप्नच उधळून टाकलं. स्वामी काय होत ते स्वप्न?

          रमा, जहागीरच्या गावी हरहरेश्वरला जाऊन तुम्ही आणि मी कोकणाच्या त्या हिरव्यागार सौंदर्यात रंगून जायचे होते. राजकर्ता म्हणून मिरवायची आम्हाला मुळीच हौस नव्हती. पण स्वामी, आपल्या आयुष्याचा बेरंग झाला असं नाही वाटत आम्हाला. म्हणजे? स्वामी, स्त्रीचीही काही स्वप्न असतात. तिला नेहमी वाटते, आपला पुरुष कर्तृत्ववान, कीर्तीच्या शिखरावर आरुढ होऊन नावलौकिक प्राप्त करावा. शत्रूत दरारा निर्माण करावा. तो तुम्ही केला. रयत तुमच्या किर्तीचे पोवाडे गातात. आपल्या दोघांच्या आयुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतात. मग आपले आयुष्य बेरंग झाले असे कसे म्हणता?

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. २५-७-२०२३.

!!!  रमाबाई  !!!

                 भाग – २०.

              श्रीमंत म्हणाले, पण हा आमचा संघर्ष? स्वामी, संघर्षाशिवाय माणसाची प्रतिमा उजळून निघत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्य संघर्षातच गेले. त्यांना सुद्धा सावत्रपणाचा त्रास, गृहकलहाला तोंड द्यावे लागले. थोरले बाजीराव साहेबांना संघर्ष करतच आयुष्य काढावे लागले.

           रमाऽऽ, रमाऽ, पेशवे विस्मयचकित होऊन म्हणाले,  एवढ्याश्या वयात एवढे शहाणपण कुठून आलं? जे भल्या भल्यांना जमत नाही, ते आत्मबळ कुठून आलं? आपल्या पार्वतीकाकूकडून. ज्यांनी आपलं सारं आयुष्य तापल्या तव्यावर काढलं, त्या काकीसाहेबांनी हा शांतीपाठ दिला.

          भावविभोर होऊन पेशवे म्हणाले, म्हणूनच तुम्हाला पाहिलं की सारा थकवा ताण नाहीसा होतो. तुमचा सहवास हवाहवासा वाटतो. साऱ्या काळजा दूर होतात. वाटतं तुमच्यापासून दूर होऊच नये. नाही… नाही.. स्वामी, असं काही करू नका. का? चक्रावून पेशव्यांनी विचारले….

स्वामी, तुम्ही राज्यकर्ते आहात. रयत तुम्हाला पुत्रवत आहे. तुम्ही आमच्यात गुरफटलात तर, रयत आम्हाला दोष देईल. नको स्वामी आपली प्रियदर्शनी फक्त आपल्या दर्शनासाठी वेडी आहे.

         दुसऱ्या दिवशी पेशव्यांच्या कानावर बातमी आली की सकाळीच रघुनाथराव आनंदवल्लीला अचानक निघून गेले. त्याचवेळी इंग्रज  मास्टीन वकील पुण्यात आला. कंपनी सरकारला मालवण आणि रायरी वरून गलबत जायला परवानगी हवी होती. चांगला महिनाभर मुक्काम ठोकून, शेवटी त्याला रिकाम्या हाताने परत जावे लागले. त्याचवेळी दुसरा इंग्रज वकील ब्रोण रघुनाथरावांची वारंवार भेटत घेत असल्याची वार्ता पेशव्यांच्या कानी आली. आणि पेशवे संतप्तत झाले.

         मास्टीनची पुण्यात डाळ शिजली नाही म्हणून कंपनी सरकारने दादा साहेबांशी संधान जोडण्याचा प्रयत्न चालवला. श्रीमंत पेशव्यांनी काका विरुद्ध ठोस निर्णय घेण्याचा निर्धार केला. पेशव्यांना क्षणाची उसंत नव्हती. सरदारांच्या छावण्या पडल्या.

       प्रयाणाचा दिवस उगवला. श्रीमंत जायची तयारी करीत असतानाच रमाबाईंनी प्रवेश केला. त्यांचे मुखमंडल काळजीने ग्रस्त झाले होते. त्या म्हणाल्या, स्वामी, आज पर्यंत इतक्या मोहिमा झाल्यात त्या त्या वेळी आपल्याला आम्ही आनंदाने निरोप ही दिला. पण आजची ही मोहीम मन पिळवटून टाकणारी आहे.

          रमा, आम्हाला का आनंद आहे? आम्हाला किती वेदना होत आहेत हे आम्हालाच ठाऊक. आपल्याच दौलतीच्या विरोधात इंग्रजांशी हात मिळवणे करणे किती लांच्छनास्पद आहे. आजपर्यंत आम्ही काकांना खूप सांभाळून घेतले. पण आता नाही. आता त्यांचा पुरता बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही पुण्याचे तोंड पाहणार नाही. रमाबाईंनी आपले अश्रू टिपले. कोशिश करून चेहरा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला. रमाबाईंचे सांत्वन करून पेशवे दालना बाहेर पडले.

         श्रीमंत माधवराव पेशवे चालून येत असल्याची बातमी रघुनाथरावांच्या कळल्याबरोबर त्यांनी फौजेची जमवा जमव करत घोडपे गावाजवळ आले. पेशव्यांनी त्यांना घोडपे गावाजवळ गाठले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. पेशव्यांचा विजय होतसे पाहून दादासाहेबांच्या फौजेने रणांगणातून फळ काढला. दादासाहेबांनी घोडपेच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. पेशव्यांनी आपल्या सरदारांना किल्ल्याला मोर्चेबंदी करण्याचा हुकूम दिला. आणि गोपाळरावं करवी निरोप पाठवला, आतापासून अडीच घटकेत गडाखाली आले नाही तर, नाईलाजाने गडावर तोफा लावल्या जाईल. जी हत्या होईल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.

          थोड्याच वेळात गोपाळरावांनी निरोप आणला, दादासाहेब आपल्या स्वाधीन होण्यास गड उतरत आहेत. सद्गगदीत होऊन पेशवे म्हणाले, श्री गजाननाने मोठे कृपा केली आमच्यावर. खाली मान घालून दादासाहेब शरणागत होऊन श्रीमंत पेशव्यांसमोर येऊन उभे राहिले. पेशवे अश्रू भरले नयनाने खाली वाकून दादा साहेबाचे पाय धरले. दादासाहेब या त्यांच्या कृतीने विस्मयचक्कीत झाले. त्यांना तर अशा वर्तनाची स्वप्नातही अपेक्षा नव्हती. हा अद्भुत चमत्कार बघून ते भांबावून गेले. कसेतरी म्हणाले, माधवा, आम्ही पराजित झालो. आम्ही शरणागती पत्करून आपल्यासमोर उभे आहोत.

              काकासाहेबऽऽ, काकासाहेब ! पेशव्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. काकासाहेब एवढे हवालदिन होऊ नका. पेशव्यांनी त्यांना अंबारीच्या हत्तीत बसवले. पेशवे चढणार तेवढ्यात मोर्चेबंदीच्या सुभेदाराने वेष पालटून पळून जात असलेल्या गंगोबातात्यांना दोरखंडाने  आवळलेल्या अवस्थेत श्रीमंतांसमोर हजर केले. गंगोबा तात्या जीवाची भीक मागत असतानाच पेशव्यांनी आज्ञा दिली, यांच्या मुसक्या बांधून पुण्याला घेऊन जा. विसाजीपंत, तुम्ही नाशिकला तळ द्या. काका साहेबांच्या जहागिरीचा सारा मुलुख ताब्यात घेऊनच पुण्याला या. पेशवे अंबारीत चढले.

               श्रीमंत माधवरावांची विजयवार्ता पुण्यात वाऱ्यासारखी पसरली. पेशव्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली. रस्त्यावर दुतर्फा गर्दी झाली. मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती. हुजरातीचे मानकरी आणि जरीपटका सर्वात पुढे चालत होता. चौघडे वाजत होते. दिल्ली दरवाजात श्रीमंत पेशवे अंबारीतून खाली उतरले. रघुनाथरावांना खाली उतरायला सांगितले. खाली मान घालून पेशव्यांसोबत रघुनाथराव चालत होते. उभयंता श्रीमंतांच्या स्वाऱ्या हिरकणी चौकात आल्या. त्याचवेळी रमाबाई आणि गंगाबाई पुढे येऊन दादासाहेबांचे पाय शिवले. श्रीमंत माधवराव पेशवे खिन्न नजरेने पाहत होते. रघुनाथरावां सोबत त्यांच्या साथीदारांना कैद करण्यात आले.

             क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.

रमाबाई पेशवे चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading