संत सोपानदेव चरित्र भाग ८, (३६ ते ४१)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न!  सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  संत सोपानदेव चरित्र  !!!    

   भाग – ३६.

       एक दिवस सगळी संतमंडळी जमली असतांना संजीवन समाधीचा विषय निघाला.सिध्दयोगी असल्या शिवाय कुणालाच जमत नाही असं प्रत्येक जण आपापली मतं मांडु लागला. ज्ञानेश्वरांचा भक्त असलेल्या केरोबाच्या डोक्यावरुन ही चर्चा जात होती.माऊली सर्वांचा निरोप घेऊन गुहेत गेली आणि मग सगळीच धाय मोकलुन रडु लागली एवढच त्याला समजलं होतं,बोलावं की, बोलु नये या दुविधेत असलेला केरोबाने  विचारले, हे संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय?सोपानकाका तुम्ही सांगा ना अज्ञानी माणसांना.

‌         निवृत्तीदांनी  सोपानांना आदेश दिला,संजीवन समाधी म्हणजे काय हे यांना समजेल अशा सोप्या नागरी भाषेत सांग.आतां संध्याकाळ झाल्यामुळे उद्या मनांतील शंका निरसावुन घेऊ,रामकृष्ण हरी चा गजर करुन दुसर्‍या दिवशीची उत्सुकता घेऊन मंडळी निघुन गेली. कितीतरी दिवसांनंतर सोपानकाकांना शांत झोप लागली.स्वप्नात प्रसन्न हास्य, डोळ्यात वात्सल्य असलेले ज्ञानदादा दिसले.ते म्हणाले,सोपाना!उद्या तू संजीवन समाधीबद्दल लोकांना सांगणार ना? हे फार मोठं कार्य तूं करतो आहेस.अरे अज्ञान दूर करणं हेच तर आपल्या जीवितांचे उदिष्ट आहे ना? सोपाना!तुझ्या सोपानदेवी मुळे तूं उदिष्टाप्रत  गेला आहेसच,आतां संजीवन समाधीचं शास्र सांगुन त्यावर कळस चढवणार आहेस.तू तुझं जीवितकार्य अंतिम चरणापर्यंत नेलेस,उद्या त्यावर पूर्ण विराम चढेल,बोलतां बोलतां ज्ञानदादा अंतर्धान पावले.

            आज कित्येक दिवसांनंतर सोपान सावरलेले व  आनंदी दिसत होते. सकाळची नैमत्यीक कार्य आटोपली. दुपारी तिघेही जेवायला बसलीत.ज्ञानदां चं चौथं पान ठेवायला मुक्ता विसरली नाही.रिकाम्या जागेकडे पाहुन तिघांच्या ही मनांत कालवाकालव झाली.मुक्ता म्हणाली,ज्ञानदा आपल्यात नाही ही वस्तु स्थिती कठोरपणे स्विकारणे हेच आपल्या योगीजनांचं लक्षण आहे. त्याच्या नसण्याची संवय होणं आपल्या ला गरजेचे आहे.पण ते सुध्दा आपल्याला फार काळ करावी लागणार नाही.ऐहिक लोकांतुन निवृत्त होऊन ज्ञानाचा सोपान चढल्याशिवाय मुक्ती मिळत नाही.प्रत्येक विषयाला वात्सल्या ची झालर जोडत पारमार्थिक तत्वाकडे नेण्याच्या तिच्या कौशल्याचा दोघांनाही कौतुक वाटलं.तिघंही शांत झाली.

          आज सोपानकाका संजीवन समाधीचे रहस्य सांगणार ही चर्चा सार्‍या पंचक्रोशीत वार्‍याच्या वेगाने पसरली. संजीवनी समाधीबद्दल लोकांचे अनेक तर्क-कुतर्क रचले जात होते.नामदेवादी संतमंडळींना सांगीतले ही सुध्दा हटयोगा ची एक परिपुर्ण अवस्था आहे यापलिकडे त्यांनाही कांहीच माहित नव्हते.खरं तर ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्ययात विसृत माहिती दिली होती,पण त्यातील मराठी,सामान्यांच्या आकलना पलिकडची होती.डोळ्यांत मावणार नाही इतकी प्रचंड गर्दी जमली.आळंदीतल्या विठ्ठलमंदिराचं प्रांगण गर्दीनं नुसतं फुलुन गेलेलं होतं.

         सोपानांनी व्यासपीठाला,निवृत्तींना नामदेवादी सर्व संतमंडळींना नमस्कार केला व वीरासन घालुन व्यासपीठावर बसले.मनचक्षूने ज्ञानदादांना नमस्कार केला आणि सोप्या शब्दात,मधूर वाणी कुणालाही समजेल अशा भाषेत संवाद साधत,सोपानांनी बोलायला सुरुवात केली.तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने नाथ पंथातील हटयोगातल्या संजीवन समाधीचं शास्र आणि रहस्य सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

      ज्ञानदादांनी सहाव्या अध्यायात सविस्तर माहिती सांगीतली आहे.त्यांनी स्वतःला पंचमहा तेजाच्या स्वाधीन करुन समर्पण केलं आहे.संजीवन समाधीसाठी स्थान कसं असावं,आसन कसं असावं,हे सांगीतले.त्या आसनावर बसुन मन एकाग्र करुन सद्गुरुचे स्मरण करुन अष्टसात्विक भाव जागृत होऊन अहंकार लोभ,मोह याचा विसर पडुन इंद्रियांना लगाम घालुन अंतर्मन,अंतःकरणाकडे वळते.

        आतां महत्वाचं म्हणजे अशा आसनावर कश्या स्थितीत बसावं?कोणती योगमुद्रा धारण करावी?नाथ पंथात हटयोगाद्वारे सांगीतल्या प्रमाणे योगमुद्रा कशी असावी,मूळ बंधाचं लक्षण सांगुन अपानवायू बाहेर पडण्याचा मार्ग बंद होऊन अपानवायू वर वर सरकू लागतो.नंतर जालंधर बंध, स्वाधिष्ठान चक्राचा जो बंध पडतो त्याला वोढियाणा बंध म्हणतात.अश्या प्रकारे बरेचसे बारीक सारीक वर्णन करुन सांगीतले.

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि.  ९-५-२०२१.

!!!  सोपानदेव  !!!

                    भाग – ३७.

        सोपानकाका संजीवन समाधी बद्दल सांगत होते.त्यांच्या आवाजांतील गोडवा,मोजक्या शब्दात सांगण्याची हातोटी,सुलभ सोपी भाषा हे ऐकतांना समोर बसलेल्या सर्वांची भावसमाधी लागली होती.सर्वात आधी भान आले ते निवृत्तीदादांना!त्यांनी व्यासपीठावर असलेल्या सोपानाला कडकडुन मिठी घातली.काय नव्हते त्या मिठीत?ज्ञानेशा च्या वियोगाचे,विरहाचे दुःख,सोपानाची अस्खलित वाणी,सोपी भाषा,प्रवाही बोलणं याबद्दलचं कौतुक,धाकटा भाऊ व शिष्याबद्दचा अभिमान,गुरु असण्यात ली सार्थकता!सगळा श्रोतृवर्ग भानावर आला.सर्वजण माऊलीचा व सोपानांचा जयजयकार करुं लागली.

        ज्ञानेश्वरमाऊली प्रत्यक्ष ज्ञानसूर्य होते तर ही भावंडे म्हणजे ज्ञानसूर्यातुन ओसंडणारी तेजाची वलयं होती.त्यानंतर बरेच दिवस सोपानाचं हे संकीर्तन लोकांच्या मनांत भरुन राहिलं.माऊलीं च्या संजीवन समाधीनंतर त्यांच्या जागी आतां हा ज्ञानचंद्र सोपानकाकाच सर्वांचे ह्रदयस्थ बनले होते.त्यादिवशीही नेहमी सारखे अंगणांत सारे जमले होते. चोखामेळांनी विचारले,सोपानकाका!मला एक सांगा… माऊलीनं समाधी घेण्याचं,जीवितकार्य पूर्ण झालय हे कुणी ठरवल?आताशी कुठं लोकांना त्यांची योग्यता कळली होती,लोकांच्या ह्रदयात जागा मिळवली होती.समाजाला ते हवेहवेसे वाटत असतांना त्यांच काम पूर्ण  झालं हे कुणी ठरवलं?चोखोबा!मी सांगतो,सोपान म्हणाले,निवृत्तींच्या काळजांत चर्र झालं.चोखोबा!आपण लोकांना हवेहवेसे वाटतो,तेव्हाच या जीवनाचा त्याग करणं योग्य असते. लोकांना नकोसं झाल्यावर केवळ मरण येत नाही म्हणुन जगत राहण्यांत काय अर्थ?लोकांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडण्याचं काम ज्ञानदादाने केलय,आतां त्या कवाडातुन जाऊन ज्ञान संपादन करायच की,अज्ञानी रहायच हा सर्वस्वी लोकांचा,समाजाचा प्रश्न आहे.चोखोबा! लोकांना आयतं मिळालं की,त्यांना तशीच संवय लागते.ज्ञान संपादन करण्यासाठी करावी लागणारी धडपड, प्रयत्न,तपश्चर्या,विचारमंथन,चर्चा,संवादकुणीच स्वतःहुन केलं नसतं आणि म्हणुनच ज्ञान म्हणजे काय याची झलक समाजाला दाखवुन त्यांना उद्युक्त करुन आपलं जीवितकार्य पूर्ण करुन ज्ञानदादा समाधीस्त झाला.हे कुणी ठरवलं?तर देवानेच ठरवलं,तेही आमच्या जन्माच्या आधीच!जीवितकार्य पूर्णत्वास गेल्यावर अवतार कार्याची समाप्ती करायचीय! फक्त ज्ञानदादाच नव्हे तर आम्ही तिघांनी सुध्दा.चोखोबांच्या सगळ्या प्रश्नांचे निरसन झाले.पण सोपानांच्या शेवटच्या वाक्यांनी सगळीच अस्वस्थ झालीत. नानदेवांच्या डोळ्यांतुन अश्रू ओघळु लागले.स्मशान शांतता पसरली.

           त्या शांततेचा भंग मुक्ताने केला. नामदेवकाकका! तुम्ही पांडुरंगाचे लाडके भक्त,जिवलग,परमार्थ्यातला तुमचा अधिकार मोठा,मग हे अश्रू का?१५-१६ वर्षाची मुक्ता समंजस,तत्वचिंतक,आत्म भावानं परिपूर्ण आणि परमार्थाच्या मार्गा वर अधिकार असणारी योगीनीच भासत होती.अनन्यभावानं नामदेव शरण येऊन, मान झुकवुन बोलुं लागले,ही चार भावंड एकाच सुत्रात बांधलेले,एका स्तोत्रानं भारलेले,ज्ञानसंयमतेच्या एकाच पातळी वर असलेले ज्ञानामृताचे कलश आहेत. तेजाचे स्रोत आहेत जणुं ब्रम्हा,विष्णु, महेश आणि आदीमाया!

         आज माऊलींनी समाधी घेऊन सत्तावीस दिवस झालेत.जातांना त्यांनी  सोपानकाकांचा हात पांडुरंगाच्या हातात देऊन सांभाळायला सांगीतले होते.त्याचा अर्थ वेगळाच होता.दोन दिवसांपूर्वी पांडुरंग माझ्या स्वप्नात आला,आणि… आणि!! नामदेवांना पुढे बोलवेना!नामया अडखळु नका.सगळं कांही पूर्ण सांगा! निवृत्तींनी आदेश दिला.त्यांनी धीर एकवटुन म्हणाले,पांडुरंगानं मला आज्ञा केली,ती म्हणजे आपल्या सर्वांवर वज्रघात आहे,ती आज्ञा पाळणे म्हणजे अंधकाराशिवाय कांहीच नाही.आधीच एका ज्ञानसूर्याचा अस्त झालाय.आणि पांडुरंगाची आज्ञा पाळणं म्हणजे दुसर्‍या ज्ञानचंद्राचा अस्त आहे.मी…मी किती पापी करंटा…हे सगळं करण्याच काम माझ्याच नशीबी आलय.नामदेवांसारखा श्रेष्ठ भक्ताची ही स्थिती तर,आपलं कसं होणार? या विचारानच सगळी घायाळ झाली.

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि,  ९-५-२०२१.

!!!  सोपानदेव !!

                    भाग – ३८.

         नामाची घायाळ,विकल परिस्थिती बघुन,सोपानदेव म्हणाले,अहो काका! उत्पत्ती,स्थिती,लय हा तर सृष्टीचा नियम आहे.प्रत्यक्ष परमेश्वरालाही त्याच पालन करावं लागतं.सागा बघु पांडुरंगाचा आदेश!ऐका मंडळी…ह्रदयाचा दगड आणि मनाचा कातळ करुन ऐका…

“देव म्हणे नामया।मार्गशीर्ष गाठ ।।

 जावे सासवड।उत्सवासी।

 सोपानासी आम्ही।दिधले वचन।

 चला अवघे जण। समुदाय ।।” नामदेवांनी देवांचा आदेश सांंगीतला व चेहरा झाकुन घेतला.सर्वांच्या मनातील शंका शेवटी गोरोबाकाकांनी विचारलाच!

नामदेवांनी पांडुरंगाचा आदेश सांगीतला खरं,पण अर्थ मात्र कुणालाच कळला नाही.शेवटी सोपान म्हणाले,हा आदेश माझ्यासाठी आहे.मंडळी!मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सासवडला हा तुमचा सोपान समाधी घेणार आहे.कडकडुन अंगावर वीज कोसळावी तसं सर्वांना झाला. सगळ्यांचंच भान हरपलं,जणुं स्मशान शांतता पसरली.जेव्हा भानावर आले, अर्थ कळला तेव्हा दुःख आवरेनासे झाले कांही गडबडा लोळु लागले.कांही मातीत डोक आपटुन घेऊन लागले.चोखोबा,

गोरोबाकाका,जनाबाई यांनी सोपानाकडे धाव घेऊन त्यांचे पाय पकडुन विनवणी करुं लागले.माऊलीच्या समाधीचा आघात नुकताच सोसला होता.ती जखम  अजुन ओली होती,भरलेली नव्हती तोच हा दुसरा आघात.जनाबाई म्हणाली अरे सोपानकाका!पोरा तूं सुध्दा सोडुन जाणार?अरे!माऊली गेल्याचं दुःख कसं तरी सहन केलं,पण आता तूं पण?आईनं टाकल,बापानं मारल आणि पावसानं झोडलं तर कुणाला सांगायचय?आम्हाला पोरकं करुन जाणार?कुणी कुणाला सावरायचं हेच समजेनासे झाल!पण निवृत्तीदादा आणि मुक्ताई शांत,तटस्थ स्थितप्रज्ञ होते.सोपान नामदेवाना म्हणाले,काका! ज्ञानदादा समाधीस्त झाले तेव्हा तुम्हीच मला सावरले होते ना आतां तुम्हीच असे गलितात्र झालात तर, मला व या सगळ्यांना कोण धीर देणार?

माझं जीवित कार्य पुर्णत्वास गेल्यामुळे या नश्वर जीविताची इच्छा नाही.सासवड ला समाधी घेण्याची इच्छा आहे.काका! सासवडला प्रस्थान करण्याची तयारी करा.सोपानांचा प्रत्येक शब्द नामदेवांच्या ह्रदयावर घाव घालत होते.सोपानकाका ही माऊली प्रमाणे “निश्चयाचा महामेरु” आहेत हे जाणुन थरथरत्या,गहिवरल्या, रडवलेल्या आवाजात म्हणाले,माऊली समाधीस्त झाले तेव्हा मुक्ताईला सांभाळायला तुम्ही होते,आतां तिला कोण आवरणार?स्थितपूर्ण शब्दात सोपानकाका म्हणाले,मुक्ता तर कधीच मुक्त झालीय,अगदी ज्ञानदा समाधीस्त झाले तेव्हाच!ती फक्त माझ्या मुक्तीसाठी थांबलीय!काका!आतां तुम्हीच स्वतःला आवरा.सासवडला कर्‍हेचं पठार,कर्‍हेचं पाणी आमची प्रतिक्षा करतय.नामदेवादी संत मंडळीना वंदन करुन ते निघुन गेले. या ईश्वरी अवतारांचा सहवास मिळाला म्हणुन स्वतःला सुदैवी समजावं की,यांना आपल्यालाच समाधीस्थानी न्यावं लागतं म्हणुन दुर्देवी? या प्रश्नाचं उत्तर नामदेव शोधत राहिले.

          सोपानकाका समानी घेणार ही वार्ता वार्‍यासारखी पंचक्रोशीत समजली आणि लोकांच्या जखमेची खपली पुन्हा निघाली.दुसर्‍या दिवशी अगदी पहाटे पासुनच सासवडच्या रस्त्यावरुन माणसांचे लोंढेच्या लोंढे चालले होते. त्यांच्या तोंडी माऊलीचे अभंग,सोपान काकांचे हरिपाठ,रामकृष्णाचा जप होता. टाळ मृदुंगाच्या गजरांत अवघा आसमंत निनादत होता.सोपानकाकांचा समाधी सोहळा याचि देही याचि डोळा बघण्या साठी अवघी सृष्टी सासवडला धाव घेत होती.नामदेवांनी रात्रीच त्यांची मुलं नारा, विठा,म्हादा व दहा माणसं समाधीस्थाना ची व्यवस्थेसाठी पुढे पाठविले होते.

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि.  १०-५-२०२१

संत सोपानदेव चरित्र

भाग – ३९.

त्यारात्री सोपानांना शांत निश्चिंत स्थिर झोप लागली होती.मुक्ता त्यांच्या अंगावर हात टाकुन जणूं त्याना धरुन ठेवुन निश्चिंत भावनेने शांत निजली होती जागे होते फक्त एकटे निवृत्तीनाथ, या निजलेल्या दोघांकडे अनिमिष नेत्राने एकटक बघत,जणुं या काळजाच्या तुकड्यांना डोळ्यात,मनांत,ह्रदयात साठवुन घेत होते.ज्ञानदेवांनी समाधी घेऊन अजुन पुरता महिनाही झाला नव्हता.आधीच ठरलं होत,एक महिन्याने सोपान आणि नंतर मुक्ता समाधी घेणार हे निवृत्तींना माहित होतं.घडणारं टळणार नव्हतच!हेच तर संचित होतं!पण निवृत्ती दादा?धाकट्या तीन भावडांना निरवल्या नंतरच स्वतचा विचार करायला मोकळे होते.हेच विधिलिखीत,विधिचे विधान होते.सृष्टीचं चक्र उलट्या गतीनं फिरत होतं,निदान निवृत्तींच्या बाबतीत तरी. त्यांच्या डोळ्यांतुन आसवं ओघळत होती फक्त याक्षणीच ते मनसोक्त रडु शकत होते.उद्या तर गंभीर प्रसन्नतेचा मुखवटा धारण करुन सोपाणाला,काळजाच्या तुकड्याला निरोप द्यावा लागणार होता.

त्यांना फुटलेला हुंदका आवरुन शांत निजलेल्या सोपानाच्या केसातुन हात फिरवला.जणूं आईचाच हात फिरत असल्याचा भास होऊन सोपानांना जाग आली.दादांचे ओघळणारे डोळे पाहुन म्हणाले, दादा! तू…तू…सुध्दा?सोपानचा हात हाती घेत म्हणाले,सोपाना!आधी ज्ञानेशा आणि आतां तू आणि नंतर मुक्ता मी थोरला असुन ही उलटी गंगा वाहतांना बघुन काळीज जळतय रे!अरे! मी पण माणुसच आहे ना?थोरला दादा,गुरु, निवृत्तीनाथ म्हणुन स्थितप्रज्ञेचा मुखवटा कितीवेळ आणि कितीदा धारण करुं रे?

सोपाना! या एकांतात रडुन घेऊ दे रे,पोट भर रडु दे रे!आज आतां,या क्षणी तूं माझा मोठा,थोरला दादा हो असे म्हणत त्यांच्या खांद्यावर मान टेकवुन निवृत्तीदा हुंदक्यावर हुंदके देत रडुं लागले.सोपान निःशब्द त्यांच्या पाठीवरुन हात फिरवत, थोपटत राहिले.स्वतःला सावरल्यावर, सोपानच्या चेहर्‍यावचे हास्य बघुन,कारण विचारले असतां,सोपानानी लहानपणी घडलेली घटना सांगीतली.एक दिवस तू व ज्ञानदा जंगलात वनभोजनाला गेले होते.मी लहान म्हणुन खुप हट्ट करुनही नेले नव्हते.म्हणुन मी गोपालकृष्णासमोर बसुन त्याच्या जवळ हट्ट धरला की,एक दिवस तरी मला मोठा कर!आणि आज इतक्या वर्षांनी गोपालकृष्णानं माझा तो हट्ट पुरा केल्याचे आठवुन हसु आलं दादा

तिघही उठुन सगळं आवरुन, योगाभ्यास केला.मग मुक्तानं तेल लावुन सोपानांना आंघोळ घातली,ओवाळलं. आतां निघायचय,या पर्णकुटीचा,झोपडी चा,जागेचा शेवटचा निरोप घ्यायचा होता.अंनत आठवणी इथे गुंफल्या होत्या.धीरगंभीर, स्थितप्रज्ञ,शांतपणे गोपालकृष्णाला मिटल्या डोळ्यांनी हात जोडले.नंतर निवृत्तीदादांच्या चरणावर मस्तक ठेवलं. नंतर मुक्ताकडे वळले तर तीच्या दह्याची वाटी व डोळ्यांत गंगा.सोपान म्हणाले, मुक्ते!अग हे भलतच काम करतेस?अगं दहीसाखर त्याच्या हातावर घालतात ज्यानं लवकर परत यायचं असते,मुक्ते मी समाधीस्त व्हायला चाललोय,सरपण आणायला नाही.वेडी कुठली?मुक्ता दह्याची वाटी घेऊन तशीच ऊभी,डोळ्यां तील पाणी तसचं वाहुं देत म्हणाली,दादा हे दहीसाखर तुझ्यासाठी नसुन माझ्या साठी आणलय.. हे दहीसाखर माझ्या हातावर घाल,म्हणजे…मी..मी लवकरच ज्ञानदा व तुझ्याकडे येईन.

समोर वाटी धरुन..दादा घालतोस ना?निश्चयाचा महामेरु निवृत्ती,स्थितप्रज्ञ सोपान दोघेही तीचे हे रुप पाहुन आवाक झाले व दोघांनीही तिला कवेत घेतले.रडत कुणी नव्हत,पण काय नव्हतं त्या मिठीत?आई बाबांची माया,वात्सल्य अनुभवुन मिठी सोडली.बाजुला ठेवलेली वाटी उचलुन सोपानांनी तीच्या हातावर दहीसाखर घालुन क्षणभर खोलवर तिच्या डोळ्यात बघीतले.त्यात फक्त आणि फक्त निश्चय दिसला.आतां ते निश्चिंतमनाने समाधी घेण्यास मोकळं झाले.निवृत्तीदादा पुढे होऊन सोपानाचा हात धरला आणि झोपडीच्या कवाडाकडे पावलं टाकली.

क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

!!!  सोपानदेव  !!!

                    भाग – ४०.

       या तिघांना बोलावण्यासाठी झोपडी च्या दाराशी आलेल्या नामदेवांनी घडलेला हा सारा प्रसंग डोळ्यांनी बघीतला आणि कानाने ऐकला तरीही आपण प्रत्यक्षात पाहतोय की, स्वप्नात?ही चार भावंड या भूतलावरची आहेत की नाही याबद्दल त्यांना नेहमीच शंका वाटायची.

         घराच्या अंगणांत पुष्कळ मंडळी जमली होती.तिघंही बाहेर येताच जमलेल्या मंडळींनी सोपानांचा जयजय कार केला.त्या सगळ्यांना हात जोडुन नमस्कार केला.शेवटचे आश्रयगृहाला वंदन केले आणि ठामपणे पावलं उचलली.सगळीच निघाली सासवडला. नामदेवांनी डोळे पुसले.आणि मुखातून निघाले.

“आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे ।

 नाममार्गे वळगे निघे राया ।।

 नाम परब्रम्ह नाम परब्रम्ह ।

 नित्य रामनाम जपीजेसू !!

 अंतरिच्यामुखे बाहिरीलिया वेखें ।

 परब्रम्ह सुखे जप तुझे ।।

 सोपान निवांत रामनाम मुखांत ।

 नेणे दुजी मात हरिवीण ।।

रामकृष्णाच्या गजरांत सगळेच गात होते. वेदना मांडत होते,नामदेव हे सगळं मुक पणे पाहत होते,ऐकत होते.पुढे निवृत्तीदा, सोपान,मुक्ताई चालत होते.नामदेवांना आठवलं,सोपान-मुक्ताईंचं गुळपीठ.मुक्ता म्हणायची…तात आणि माति।गेलात येथुन।तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा।

निवृत्ती ज्ञानेश्वर।कोरान्नांचे अन्न

सांभाळी सोपान । मजलागी ।।

        वाटेत लोकं या तिघांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी गर्दी करत होते, धडपडत होतेे.सोपानकाकांसोबत गोरोबा,सावता,सेना!जनाबाई,चोखोबा, परीसा,नामदेव अशी अनेक संत मंडळी  होती.नामदेवांनी सासवडसंबंधी दृष्टांत झाल्याचे सांगीतल्यावर सगळ्याच्याच मनात एकच प्रश्न आला की,समाधीसाठी सासवडच कां?शेवटी गोरोबांनी विचारल्यावर नामदेव बोलण्याआधीच मुक्ता म्हणाली,सगळ्यांनाच या प्रश्नाचे उत्तर सासवडला पोहोचल्यावर मिळेल. सर्व मंडळी दिवस कलेस्तोवर सासवडला पोहोचली.

         आळंदीला इंद्रायणीचा आशिर्वाद तर,सासवडला कर्‍हा नदीचा.जणूं आळंदीला गंगा तर सासवडला सरस्वती.

एरवी शांत असलेल हे छोटसं गांव आज मात्र गजबजलं होतं.सासवडला नदीच्या काठी असलेल्या श्रीनागेश्वर मंदिराच्या पाठीमागची जागा समाधीस्थळ म्हणुन निश्चित केले होते.

         दुसरा दिवस उजाडलाच मुळी गजराच्या प्रतिध्वनीनं!समुदाया समोर सोपानकाका नतमस्तक होऊन,हात जोडुन उभे होते.निवृत्तींनी “सोपानदेवी” ग्रथ उचलुन मस्तकी लावला आणि मुक्ता च्या हाती दिला.आणि समूहाला संबोधीत झाले…आज माझी अवस्था नेत्रहीन व्यक्तीसारखी झाली आहे,ज्याचा एक नेत्र तर आधीच गेलेला,आणि दुसरा जाण्याच्या मार्गावर आहे.

       सासवड मोठं पुण्यश्र्लोक स्थान आहे.भोगवतीसारखी सरीता आणि कर्‍हा सारखी सरस्वती इथे वाहते आहे. श्रीविष्णुंच्या आज्ञेवरुन,सृष्टीनिर्मितीचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणुन ब्रम्हदेवांनी इथे तपश्चर्या करीत असतां,ब्रम्हदेवाचा कर्‍हा  म्हणजे कलश धक्का लागुन लवंडला, त्यातलं सांडलेलं जलतीर्थ म्हणजेच ही कर्‍हा नदी!मंडळी,हा सोपान ब्रम्हदेवांचा अवतार आहे हे त्यानं आपल्या शांत संयमी स्वभावाने आणि अलौकिक बुध्दी मत्तेने सिध्दही केलंं आहे.म्हणुनच जिथं ब्रम्हदेवांनी तप केलं तिथंच सोपानदेव समाधी घेणार आहे.

       सासवड म्हणजे सात वाड्यांनी मिळुन बनलेलं नगर!त्यात एक संवत्सर म्हणुन एक मोठी वाडी होती.म्हणुन याचं नांव संवत्सर नगर असही आहे.या नगरी ला इंद्रनील पर्वत म्हणजे राम-रावण युध्दात लक्ष्मणाला मुर्च्छा आल्यावर, हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलुन आणत असतांना त्या पर्वताचा एक भाग निखळुन इथं पडला,तोच हा इंद्रनील पर्वत!या इंद्रनील पर्वतावरच्या गर्द वनराईत इंद्राने म्हणजे पुरंदरांनही तप केलं होतं म्हणुन तो पुरंदर पर्वत म्हणुनही ओळखल्या जातो.म्हणुन सोपान इथं समाधी घेत आहे.सासवड हे मुळचं पुण्य क्षेत्र,आतां ते तिर्थक्षेत्र होणार!समाधी साठी सासवडच कां?या प्रश्नाचे उत्तर लोकांना मिळाले होते.निवृत्तीनाथांचं बोलणं संपल्यावर त्यांनी सोपानाकडे बघीतलं त्यांच्या नजरेतला आदेश जाणुन सोपान समुदायाला हात जोडुन मस्तक झुकवुन वंदन करुन बोलायला सुरुवात केली.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  १०-५-२०२१.

!!!  सोपानदेव  !!!

                 अंतिम भाग- ४१.

           सोपानदेव म्हणाले,निवृत्तीदादां सारखा गुरु,ज्ञानदेवांसारखा मार्गदर्शक आणि मुक्तासारखी बहिण लाभली.ती अमची माय बनुन सांभाळ करीत आहे. नामदेवकाका,गोरोबाकाका,सावता,सेना चोखोबा,जनाबाई यांच्या सारख्या विभूतींचा,विठ्ठलभक्तांचा सहवास लाभला आणि भक्तीची महती पावलों पावली कळत गेली.वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या निमित्याने भारत भर यात्रा झाली.आणि माझं इवलसं अनुभव विश्व संपन्न झालं.या सर्वांमुळे माझं जीवन धन्य,कृतार्थ झालं या सर्वांचा मी ऋणी आहे.जीवनकार्य संपल्यावर ज्ञानदादांनी समाधी घेऊन आम्हाला मार्ग दाखवला त्या ज्ञानसूर्याची मी सावली,मूळ रुपाला सोडुन राहुच शकत नाही म्हणुन आपण सर्व मला अनुमती द्या.आज्ञा द्या.नकळत कांही चुकलं माकलं असेल तर लेकरुं समजुन पोटांत घाला.माझा पांडुरंग बोलावतोय, निरोप द्या आतां.

      सोपानांचा चेहरा आगळ्या वेगळ्या तेजानं उजाळला होता.सगळ्यांनी त्यांच्या पायावर झोकुन दिले.नामदेवांनी इतकी घट्ट मिठी मारली की,जणूं ते सोपानांना जाऊच देणार नव्हते.काय नव्हतं त्या मिठीत?सोपानांना अडवण्या ची जिद्द,वियोगाचे दुःख,असाह्यता, विरहाची वेदना,इतक्या लहान वयातील स्थित प्रज्ञतेचं कौतुक,अलौकिक बुध्दी सामर्थ्यता,केललं वंदन,सहवास लाभला म्हणुन वाटलेली धन्यता ह्या सार्‍या भावना होत्या.जनाबाईंनी पुढे होऊन मिठी सोडवली.भानावर आलेल्या नामदेवांनी मोठ्या निग्रहाने अश्रू पुसुन गजर सुरु केला.रामकृष्णहरी,रामकृष्ण हरी,रामकृष्ण हरी….

        भोजनाची सिध्दता झाली होती. पंगत बसली.नामदेवांना दिसले,विठ्ठल रुख्माई स्वतः वाढत  होते.निृवृत्तीदादा व मुक्ताई सोपानांना भरवत होती.ज्ञानदेव! ज्ञानेश्वर म्हणजे साक्षात ज्ञानसूर्य! ज्ञानसूर्याचा अस्त झालाच होता,मग त्याची सावली तरी मागे कशी राहणार?

दादा!चलायच ना? भावसमाधीत मग्न असलेल्या निवृत्तीदादांच्या खांद्याला स्पर्श करत सोपान म्हणाले.निवृत्तींनी स्वतःला आवरुन सोपानाचा एक हात धरला व दुसरा मुक्ताईनं धरला.आणि नागेश्वर मंदिरामागे निश्चित केलेल्या समाधी स्थानाकडे तिघांचेही पावलं पडु लागले.

           नामदेवांची चार मुलं म्हादा,विठा, नारा आणि गोंदा व आणखी कांही लोकां मिळून समाधीस्थान तयार केलं.धीमी पण ठाम,निश्चयी पावलं टाकत सोपान समाधीस्थळी जात होते.लोकं फुलं अक्षता उधळत होते,बायाबापडे पायावर लोटांगण घेत चरणधूळ मस्तकी लावत होते.समाधीस्थळ आलं.मुक्ताईच्या हाता तील पंचारतीचं तबक घेऊन गंध,अक्षता अधळुन आकाश,धरणी,नदी,सूर्य,वायुंना ओवाळुन पंचमहाभूतांची पूजा केली. निवृत्तीदादांना गुरु म्हणुन ओवाळलं. पुजा केली.हात जोडुन म्हणाले,गुरु माऊली!तुम्ही माझं जीवन धन्य केलेत. आतां आज्ञा देऊन माझं संजीवन धन्य करा.परमात्म्यात विलिन होईपर्यंत धैर्य कायम राहिल असा आशिर्वाद द्या.धीर गंभीरतेचा मुखवटा गळून आवेगाने सोपानाला कवेत घेतलं.मस्तकावर अक्षतांचं प्रक्षेपणं केलं.आपली सारी ऊर्जा एकवटुन सोपानाच्या मस्तकात सोडली.सोपानांच्या चेहर्‍यावरील निश्चितता पाहुन निवृत्ती समाधान पावले. मुक्ता जणूं पुन्हा लहान होऊन त्यांच्या कुशीत शिरली.त्या दोघांचं एकजीव असणं बघुन,नामदेव,जनाबाई, व मंडळीं च्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या.

          सोपानांनी समुदायाला हात जोडुन मान झुकवुन नमस्कार केला. अखेरचा…अगदी अखेरचा….समाधी स्थानाला सामोरे झाले.निवृत्तीदादांनी सोपानाचा हात धरला.दुसरा हात नामदेवांनी.पायर्‍या उतरुन समाधी स्थानाजवळ आले.दोघांचीही नजरभेट घेऊन नजरेनेच निरोप घेतला.समाधी स्थानाला नमस्कार करुन,समाधीसाठी तयार केलेल्या आसनावर पद्मासन घालुन सोपान बसले.उच्चरवाने ओंकार नाद केला.सोपानांनी पद्मासन सोडुन वज्रासन घातलेलं बघुन निवृत्तीदादा व नामदेव जडशील पावलांनी हलकेच पायर्‍या चढुन वर आले.बाजुला ठेवलेली शिळा विवराच्या तोंडाशी लावली.ओकांर ध्वनी अजुनही निनादत होता.निवृत्ती  दादांच्या कुशीत नामदेव व मुक्ता शिरली. त्यांना अश्रूंचेही भान राहिल नाही.

         निवृत्तीदादा पुटपुटत होते.माझा  सोपान,ज्ञानसूर्याची सावली असणारा माझा सोपान!ज्ञानसूर्याची सावली,  ज्ञानसूर्यात विलिन झाली.या जगाच्या अंतापर्यंत तो ज्ञानसूर्य आपल्या तेजाने तळपणार होता.आणि त्याची सावली सुध्दा!होय! ज्ञानसूर्याची सावली सुध्दा!!!

               समाप्त!!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि.  १०-५-२०२१.

 संत सोपानदेव चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading