संत सोपानदेव चरित्र भाग ४, (१६ ते २०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न!  सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा …………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  संत सोपानदेव चरित्र  !!!      

           

        भाग –  १६.

        सोपानांच्या मनातील सार्‍या शंका, संदेह,भावनांचा उद्रेक,कोंडमारा,जीवाची घुसमट,उद्भवलेला संभ्रम,अनामिक भिती हे सगळं डोळ्यांतुन वाहणार्‍या पाण्याबरोबर गंगेत मिसळले,वाहुन गेले. तिघांचेही अश्रू इंद्रायणीत मिसळत होते. जणुं गंगा,यमुना,सरस्वतीच!निवृत्ती, ज्ञानदेवांनी सोपानांना हाताला धरुन वाळवंटात आणले.निवृत्तींनी सोपानाचे डोळे पुसले आणि त्यांना घेऊन पुनः इंद्रायणीच्या गुडघाभर पाण्यात उभे राहुन ओंजळीत पाणी घेऊन सोपानांच्या ओंजळीत सोडत म्हणाले,हे जगन्नियंता! आज या ब्रम्हमुहुर्तावर माझे गुरु गहनी नाथांच्या आदेशावरुन सोपानाचं गुरुत्व स्विकारत आहे.आजन्म या वचनाला बांधील राहुन,माझ्याजवळचं असलेलं सगळ ज्ञान मी सोपानाला देत आहे. निवृत्तीनाथांच्या ओंजळीतील पाणी थेंब थेंब सोपानांच्या ओंजळीत पडत होतं  आणि त्या प्रत्येक थेंबासरशी सोपानदेव विरघळत होते.प्रत्येक शब्द सोपानांच्या मनावर,शरीरावर रोमांच उभे राहत होते.

           सोपानदेवा! आजपासुन तूं या गहिनी शिष्य निवृत्तीचा शिष्य झालास. तुझं अध्ययन सुरु झालं की,नाथपंथाची दीक्षा देईन पण,नाथपंथी होणं सोप नाही त्यासाठी अविरत परिश्रम,घोर तपश्चर्या आणि सरावात सातत्य असणे फार गरजे चे आहे.याक्षणापासुन तुझं अध्ययन सुरु होईल.निवृत्तीदादा वेगळाच दिसत होता. त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी कठोर व मृदु भाव,आवाजात मार्दव तसेच गर्भित आदेशही होता.सोपानाला ते शिवसांबा सारखे वाटत होते.सोपान शिष्य होण्यास सज्ज झाले होते.सोपानांनी त्यांना साष्टांग दंढवत घातला.निवृत्तींनी दोघांना ही मिठीत घेतले.सरस्वतीमातेच्या दरबारातील दोन रत्ने पैलु पाडुन घेण्यास  सिध्द झालीत.स्वतेजाने झळझळणारी ही दोन रत्ने स्वयंभू होतीच,पण ज्ञानाच्या कोंदनानं त्यांचे तेज अधिकच उजळणार होतं.अध्ययन दोघे करणार होते पण, कसोटी होती निवृत्तींची.शिकणार दोघं होते पण परीक्षा होती निवृत्तीची.आपण उचलेलं हे शिवधनुष्य पेलायचं होतं, त्या साठी गुरु गहिनीनाथांशी सल्लामसलत केली पाहिजे.सोपान उत्साहानं,आनंदानं नुसते सळसळत होते.निवृत्तीदादा कडुन ज्ञानाची दीक्षा मिळाल्यावर सोपान आपला ठसा चराचरावर उमटावणार होते.तीघेही घरी आलेत.आनंदाने मुक्ताला गोलगोल फिरवत सोपान म्हणाले,मुक्ते! गेल्या कित्येक दिवसां पासुन ज्या क्षणाची मी वाट बघत होतो तो क्षण आज मला गवसला.   

         दुसर्‍या दिवशी तिघेही पहाटे उठुन गंगा घाटाच्या पुढे असलेल्या गर्द झाडीत आलेत.तिथे तीन मोठ्या शिळा होत्या. उंच शिळेवर,निवृत्ती व दुसर्‍या दोन शिळांवर ज्ञानदेव व सोपान पद्मासनात बसले.बघतां बघतां ओंकारानं अवघं अवकाश व्यापलं.निवृत्तींनी ओंकार लावतांंच डोळे मिटुन घेतले.सोपानांना निमिषार्धात अभूतपुर्व दृष्य दिसले. निवृत्तीदादाच्या जागी व्याघ्राजिनावर विराजमान झालेले साक्षात शिवशंकर ओंकाराचा नाद लावतांना दिसले.आपण बघत आहो ते स्वप्न की भास?वास्तव की दृष्टीभ्रम?साक्षात की संभ्रम? सोपानांना प्रश्न पडला.कदाचित आपण अर्धजागृता वस्थेत असु म्हणुन त्यांनी ज्ञानदेवांकडे बघीतले तर,ज्ञानदेव पद्मासन घालुन बसलेले दिसले.निवृत्तीदादांकडे नजर टाकली तर,अजुनही तिथे शिवशंकरच होते,त्यांच्याभोवती गर्जणार्‍या ओंकारा ची आवर्तन घेऊन एक तेजोवलय फिरत होते.सोपानांनी डोळे मिटले ओंकाराचं प्रत्ययकारी आवर्तन ह्रदयात भरुन घेतले.डोळे उघडले तेव्हा समोर प्रसन्न चेहर्‍याचे निवृत्तीदादा बसले होते.

        सोपाना! मी काय सांगतो यावर लक्ष केंद्रीत कर!ओंकाराचा मूलस्रोत सांगतो.ओंकार म्हणजे इश्वराचा प्रत्यक्ष रव,इश्वराचा साक्षात स्वर!या ओंकारात ‘अ’ ‘उ’ आणि ‘म’ हे तीन स्वर येतात.’अ’ ‘उ’ हे स्वर आहेत तर ‘म’ हे व्यंजन आहे.

इश्वर संजीवन,चिरंतन,अविनाशी आहे म्हणुन ओंकारातील ‘म’ स्वर अविनाशी स्रोताचं,म्हणजे इश्वराचं अधिष्ठान आहे.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि.  ४-५-२०२१.

!!!  सोपानदेव  !!!

                   भाग – १७.

        निवृत्तीनाथ सोपानांना ओंकार समजावत पुढे म्हणाले,ओंकारातला दुसरा स्वर आहे ‘ऊ’ऊ हे उच्छावारनाचं, त्यागाचं,समर्पनाचं,समर्पनशीलतेच तत्व आहे.अविनाशी तत्वाशी समरस होण्या साठी आत्म्याचं अधिष्ठान ‘ऊ’ या स्वराला लाभलं आहे.ओंकारांतील तिसरं अक्षर आहे ‘म’ म हे व्यंजन आहे.’म’ चा उच्चार करतांना वरचा ओठ खालच्या ओठाला स्पर्श करुन प्राणतत्व कोंडलं जातं आणि ते प्राणतत्व ह्रदयाकडे जाते.’म’ हा महा मंडलाचा अधिदाता असुन महानता, विशालता हे त्याचं तत्व आहे.या विशाल तेजोवलयाचं सगुन,साक्षात रुप म्हणजे ओंकार!या सगळ्यांतुन स्रवत निवृत्तींचा आवाज सोपानांच्या मस्तकातल्या संवेदनाच्या तारा झंकारत होत्या आणि सोपान ज्ञानामृतांचे कण ग्रहण करीत होते.ज्ञानदेव सुध्दा मिटल्या डोळ्यांनी निवृत्तीदादांच्या मुखातील शब्द नी शब्द जीवाचे कान करुन ऐकत होते.मुक्ता एकटीच घरी असल्याची जाण आल्याने तिघेही घराकडे लगबगीने निघाले.

          दुपारी जेवणं सुरु असतांना भीत भीत मुक्ता निवृत्तींदादांना म्हणाली,दादा! आईने शिकवलेली भगवद् गीता माझी मुखोद्गत आहे.मला पण सगळं शिकायच, शिकवशील?तिघांनाही तीचे कौतुक वाटले.जेवणं झाल्यावर,चौघेही अंगणातील शेवग्याच्या झाडखाली बसले.ज्ञानदेव तिघांना उद्देशुन बोलायला सुरुवात केली. गुरुशिवाय जशी ज्ञानसाधनेला दिशा नाही तसेच उपनयन सस्काराशिवाय ज्ञानसाधनेला अधिकार,आकार नाही. आपल्या बाबांचीही तीच इच्छा होती व त्यासाठी त्यांनी देहान्त प्रायश्चित घेतले. तेव्हा उद्या विनायकबुवांना सोबत घेऊन धर्मसभेत गार्‍हाण मांडुन न्याय मागु. निवृत्तींनी दुजोरा दिला.सोपान म्हणाले, पण!धर्ममार्तडांनी न्याय दिलाच नाही तर दोघांनाही ही शंका होतीच!मुक्ता म्हणाली, मग आपण त्याहीपेक्षा वरच्या धर्मसभेत जाऊन न्याय मागु.

          दुसर्‍या दिवशी धर्मसभेत जायच ठरलं. कसं आणि काय काय बोलायचं यावर चर्चा झाली.अचानक निवृत्तींनी विचारले,ज्ञानेशा!खरच आपल्याला मोंजीबंधना सारख्या संस्काराची गरज आहे?सध्या जसं समाजापासुन अलिप्त राहतो तसच जन्मभर राहीलो तर?कशाला हवेत समाजाभिमुख संस्कार? समाजाची स्विकृती?ज्ञानदेवांच्या लक्षात आलं दादा परीक्षा पाहताहेत.क्षणभर विचार करुन ज्ञानदेव म्हणाले,दादा!आपण सन्यस्त वृत्तीने राहणार ते या समाजातच ना?ज्या समाजांत अज्ञान अंधश्रध्दा पसरली आहे,त्या समाजाला आपण शहाणं,डोळस करण्याचा प्रयत्न करणार आहोत ना?मग त्या समाजाचे कांही नीतिनियम,आचारसंहिता पाळायला नको?

        दादा! ही मौजीबंधनाची अनुमती आपण आपल्यासाठी घेत नसुन, समाजा त मिसळुनच समाजमन जाणता आलं पाहिजे तरच मळ आपल्याला स्वच्छ करतां येईल.डोळे मिटुन ऐकत असलेल्या सोपानांचे मत विचारल्यावर ते म्हणाले,

“भक्ती हे हरति।जाती न सरती।ञु

 ऐसी आत्मस्थिती। स्वसंवेद्या।।”

असं असतांना भक्तीचं अधिष्ठान मानुन अज्ञानाला उद्बोधन करण्यासाठी समाज स्विकृती जरुरीची असेल तर अवश्य घ्यावी.तीघेही आश्चर्यमुग्ध झाले.निवृत्तीं नी सोपानांना मिठीत घेत विचारले,ओवी बध्द शब्दरचना कधीपासीन करतोस रे? कधी आणि कुठे शिकलास?गदगदल्या स्वरांत निवृत्ती म्हणाले,सोपाना मी धन्य झालो.माझे दोन्हीही शिष्य लोकोत्तर, युगोत्तर ठरणार!उद्यापासुन वेदाभ्यासाचं अभिवचन मिळाल्याने,सोपानांचा नव संजीवनी,प्रेरणा,स्फुर्ती,आत्मविश्वास दुणावला.त्या छोट्या झोपडीत भर माध्यन्हीला प्रसन्नतेच चांदणं अवतरलं..

           तेवढ्यात बाहेरुन विनायक बुवांची हाक ऐकु आली.बोला बाळांनो! काय काम आहे? निवृत्ती म्हणाले,भूदेव!  ज्यासाठी आमच्या आईबाबांनी देहान्त प्रायश्चित घेतलं,तरी अजुनपर्यंत आमच्या वरचं ग्रामण्य उठवलं नाही,ते उठवावं, समाजात सामावुन घ्यावं,आमच्या मौंजी बंधनाला अनुमती मिळावी,यासाठी आम्ही चौघे विज्ञप्ती पत्र घेऊन आपल्या सवे धर्मसभेत जावे,त्यासाठी आपली मदत हवी म्हणुन बोलावले.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि.  ४-५-२०२१.

!!!  सोपानदेव  !!!

                  भाग  – १८.

      दुसरा दिवस उजाडला तोच मुळी उत्साहवर्धक!चौघांनीही आपली सकाळची सर्व कामे,आन्हिक आटोपली. तेवढ्यात विनायकबुवा आलेच.त्यांना वंदन केले.गोपाळकृष्णाला साकडं घालुन, मनोमन आईबाबांनाही नमस्कार करुन बुवांसोबत चौघेही बाहेर पडले.धर्म सभेत आज धर्मपंडीतांची गर्दी होती. पैंठणहुन धर्मसभेचे दोन आचार्य,पंडीत मोरेश्वरशास्री आणि आचार्य बोपोदेवाचार्य आले होते.आळंदीचा सगळा ब्रम्हवृंद धर्मपीठात हजर होता. विनायकबुवांनी चौघा भावडांना सोबत घेऊन धर्मगारात प्रवेश करतांना पाहुन अनेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या, नाकं मुरडल्या गेली तर कांहीनी ही घाण इथ कशाला आणली असं विनायकांना विचारण्यात आले.

       विनायकबुवांनी धर्ममंडपातील एका रिकाम्या कोपर्‍यात चौघांना उभं राहण्यास सांगीतले.कुणास स्पर्श होणार नाही ही दक्षता घ्या,असं हळुच सांगायला विसरले नाही.चौघानांही खुप अपमानीत व वाईट वाटले पण पर्याय नव्हता.समोर येईल ते सोसावे लागणार होते.समाजा च्या कठोर नियमांच पालन मनात असो वा नसो करावं लागणारच होतं.

        धर्मसभा सुरु झाली.आचार्य बोपदेव आणि पंडीत मोरेश्वर शास्रींच्या मार्गदर्शनाखाली नव नवीन मुद्दे मांडल्या जात होते.नवीन संकेत ठरत होते.सामा जिक शास्राचे मुद्दे समजावल्या जात होते सर्व मुद्दे संपल्यावर कोणाला कांही शंका असल्यास,पुढे येऊन विचारावं असं मोरेश्वर शास्रींनी म्हटल्यावर,विनायक बुवा पुढे येऊन नमस्कार करत म्हणाले, कांही गार्‍याणे आपल्यासमोर मांडु इच्छितो,अनुमती असावी.अनुमती मिळताच त्यांनी चौघा भावंडांना समोर बोलावले.इतका वेळ निरामय शांतता असलेल्या धर्मसभेत या चौघांचा प्रवेश झाल्याबरोबर एकच गदारोळ उठला. धर्मसभेत जमलेल्या रुढीप्रिय ब्रम्हवृदां च्या तळपायाची आग मस्तकांत गेली. आक्षेप घेतल्या जाऊ लागले.विनायक बुवांनी त्या चौघा भावंडाना आणले म्हणुन त्यांच्यावरही बहिष्काराची भाषा बोलु लागले.धर्मसभेत एकच हल्लकल्लोळ माजला.अखेर धर्मपीठ प्रमुख,आचार्य शंकरशास्री सोमणांनी आवाज उंचावुन सर्वांना शात राहण्याचे आव्हान केले.पैठणच्या मोरेश्वर शास्रींनी हा काय प्रकार म्हणुन सोमणशास्रींना विचारल्यावर,हळु आवाजांत सारं कथन केल्यावर,मोरेश्वर शास्रींनी सभेची सुत्र आपल्या हाती घेऊन तिव्र स्वरांत सर्वांना शांत राहण्यास सांगीतले.या धर्मसभेत गार्‍हाणे मांडण्याचा अधिकार कोणाला ही अगदी ग्रामाण्य असले तरी सुध्दा आहे.ही विद्वान विठ्ठलपंतांची मुलं ना? तेव्हा त्यांचे म्हणणे ही धर्मसभा नक्कीच ऐकेल असे म्हणुन विनायकबुवांना पुढे बोलावुन गार्‍हाणे मांडण्यास सांगीतले.ते बोलण्यास सुरुवात करणार तोच,भूदेव! थांबाव!आमचं गार्‍हाणं आम्हालाच मांडु द्यावं अशी धर्मसभेला विनंती आहे. ज्ञानदेवांनी विनायकबुवांना थांबवलं. मोरेश्वर पंडीत आणि आचार्य बोपदेवांनी आवाजाच्या दिशेने बघीतलं.साधारण सहा ते बारा वर्षापर्यंतच्या वयोगटातील चार मुलं एकमेकांचा हात घट्ट धरुन उभी होती.चौघांचेही चेहरे तेजःपुंज, पण चंद्राची शीतलता,डोळे अत्यंत तेजस्वी! पण बालकाची निरागसता,निर्व्याजता, आवाज खणखणीत,उच्चार स्पष्ट पण स्वरांत अवघ्या विश्वाचं मार्दव भरलेलं, उभं राहण्याची ऐट,लक्षवेधी नम्रता अशा या चार लेकरांना पाहुन पैठणचे जेष्ठ आचार्य व पंडीत स्तिमित झालेत.

       त्या चार बालकांत त्यांना ब्रम्हा, विष्णु,महेश व चिमुकल्या कन्येत आदी मायेचे बालरुप दिसले.नतमस्तक उभ्या असलेल्या या कपाळकरंट्यांना,धर्म बुडव्यांना धर्मसभेबाहेर घालवायचे सोडुन ही दोन्ही आचार्य त्यांच्याकडे नुसते बघत काय बसले हेच ब्रम्हवृंदांना कळेना.धर्मगारांत निरव शांतता पसरली होती.त्या निरव शांततेचा भंग करत विचारले,बाळांनो कोण तुम्ही?काय हवय  आचार्य आम्हाला न्याय हवाय!एवढ्या निरागस मुलांवर कोणी अन्याय केला? निःसंकोचपणे सांगा!आचार्यदेव आमच्या वर या धर्मसभेनच अन्याय केला आहे. नम्रतेने नतमस्तक होऊन निवृत्ती म्हणाले

                   क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           दि.  ४-५-२०२१.

!!!  सोपानदेव  !!!

                     भाग – १९.

       निवृत्तीनाथांच्या स्वरांतील मार्दव्याचं कौतुक वाटुन आचार्य म्हणाले,सांग बाळ अनुमती आहे.मान झुकवुन पुढे येत म्हणाले,आचार्यदेव!मी विठ्ठलपंत व रुख्मिणीबाई कुळकर्णीचा जेष्ठ पुत्र, आणि गहिनीनाथांचा शिष्य निवृत्ती!मी द्वितिय पुत्र, निवृत्तीदादाचा धाकटा बंधु व शिष्य ज्ञानदेव!जेमतेम ७-८ वर्षाचं चंद्रासारखा शितल चेहरा,डोळ्यात निरागस भाव,किंचित कावरीबावरी झालेली नजर असलेले सोपानदेव पुढं येऊन म्हणाले,मी कनिष्ठ पुत्र,आणि निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांचा कनिष्ठ बंधु व शिष्य सोपानदेव!नंतर मुक्ता पुढे येऊन, जमीनीवर डोकं टेकवुन नमस्कार करीत म्हणाली,मी सर्वात धाकटी कन्या,मुक्ता! तिचा तो निरागस,निष्पाप,निर्वाज्य मुद्रा पाहु बोपदेवांना गलबलुन आले.अरे बाळांनो!तुमच्या सारख्या अबोध बालकां वर कुणी रे अन्याय केला?शास्री पंडीतांनी ?की, धर्मपंडीतांनी?त्यांनी तिव्र स्वरांत पृच्छा केली.

          निवृत्तीनाथ म्हणाले,माझ्या वडीलांनी आईची मूक संमती गृहित धरुन सन्यास घेतला.सद्गुरु श्रीधरपंत स्वामींच्या आज्ञेने परत गृहस्थाश्रमी बनले.त्यामुळे त्यांना समाजात बहिष्कृत केले.त्यानंर आम्हा चार भावाडांचा जन्म झाला.त्यांच्यावर ग्रामण्य घातलं.माझ्या पित्याने तीन कृच्छे,तीन चद्रायणे,जात कर्मादि विधी व गुरुंच्या आज्ञेनुसार प्रायश्चितही केले.पण बहिष्कार उठला नाही.समाजाकडुन अवहेलना,अत्याचार अपमान,तिरस्कार सोसतच आम्ही मोठे होत आलो.माझं मौंजीबंधनाचं वय झाल्यावर वडील धर्ममार्तडांना भेटुन हात पाय जोडुन उपनयानाची अनुमती मागीतली,पण अनुमती न देतां त्यांचे कडुन घडलेल्या धर्मबाह्य वर्तनासाठी त्यांना देहान्त प्रायश्चिताची शिक्षा सुनावली.बोलतां बोलतां निवृत्तींनाथांचा आवाज कापरा झाला म्हणुन ज्ञानेश्वर पुढे येऊन बोलु लागले.

          भर्मसभेच्या आदेशानुसार माझ्या आईबाबांनी देहान्त प्रायश्चित घेतलं,त्या वेळी हा निवृत्तीदादा केवळ १०,मी ८, सोपान ६ व ही मुक्ता केवळ चार वर्षाची होती हे सांगतांना ज्ञानदेवांच्या डोळ्यांतुन अश्रू ओघळु लागले.त्यांचा कंठ दाटुन आल्याने सोपान पुढे होऊन म्हणाले, आचार्यदेव!आम्हा अजान,अज्ञान चार भावंडांना पोरकं,अनाथ करुन नेहमी साठी आमचे आईबाबा देहान्त प्रायश्चित घेऊन निघुन गेले.त्यांनी धर्माचा,धर्म शास्राचा,धर्मसभेचा मान ठेवुन व आमच्या पुढील भविष्यात कल्याण व्हावे म्हणुन दिलेली शिक्षा मुकाट भोगली. शिक्षा भोगत असतांना आम्हा लेकरां साठी त्यांचं काळीज तिळतिळ तुटल नसेल?एवढी लहान,अजान मुलं कशी जगतील?कशी वाढतील?काय खातील? कसे राहतील?त्यांना कांहीच वाटले नसेल?पण आमच्या उज्वल भविष्याचा विचार करुन उरावर मणामणाचा दगड ठेवुन देहान्त प्रायश्चित घेतले.सोपानांना बोलवेना,अविरत अश्रू वाहु लागले. निवृत्ती पुढे येऊन म्हणाले,आचार्यदेव! आमच्या आईवडीलांनी आम्हाला अनाथ पोरकं करुन प्रायश्चित घेतल्यावरही या धर्मसभेने आमच्यावरचा बहिष्कार, ग्रामण्य उठवलं नाही,उलट समाजाने जेवढा जास्त अन्याय,अत्याचार करतां येईल तेवढा केला.अवहेलना,तिरस्कार, झेलत,अर्धवट मिळत असलेल्या माधुकरीवर जीवन जगत आहोत.

        सोपान म्हणाले,आचार्यदेव!मृत्यु नंतर वैर संपते ना?प्रायश्चितानं पापं धुतली जातात ना? मग आईवडीलांच्या मृत्युनंतरही आमच्याशी मांडलेलं वैरत्व कां संपवलं नाही?आणि हे जर बरोबर असेल तर त्यांच्या देहान्त प्रायश्चीताला कांहीच अर्थ नसेल तर,त्यांचा मृत्यु म्हणजे हत्या ठरणार असं नाही कां वाटत आपल्याला?सोपान जरी अत्यंत संयमानं,मार्दवतेनं,नम्रतेने बोलत असले तरी त्यांच्या अंतःकरणात ज्वालामुखी भडकला होता.मस्तकावरची शीर ताड ताड उडत होती.चेहरा लाल झाला होता. त्यांची ही अवस्था बघुन ज्ञानदेवांनी मुक्ता ला खुणावुन सोपानचा हात तिच्या हातात दिला.आणि स्वतः बोलायला सुरुवात केली.आचार्यदेव!आम्हा चौघा भावंडांना बहिष्कारांतुन मुक्त करुन आमच्यावरच ग्रामण्य काढुन समाजात सन्मानाने सामावुन घ्यावं व उपनयन संस्काराला अनुमती द्यावी एवढंच आमचं मागण आहे.त्या चौघांचे दिनवाने चेहरे बघुन बोपदेवांचं काळीज तुटलं.त्यांनी तिथल्या तिथे धर्मसभेचे प्रमुख शंकर शास्री सोमणांना सगळे शास्रास्र शोधुन या मुलांना परत समाजात सामावुन घेण्याचा आदेश दिला.आम्हीही पैठणला गेल्यावर शास्रपुराणे शोधतो.बाळांनो निश्चिंत रहा.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि.  ४-५-२०२१.

!!!  सोपानदेव  !!!

                    भाग – २०.

         शंकरशास्रींना व सार्‍या धर्मसभेला बोपदेवांनी आज्ञा केली,दोन दिवसांत या मुलांना योग्य न्याय देण्यात यावा.झाल्या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये.असे सांगुन ते उभे राहिले.धर्मसभा संपल्याची ती खुण होती.विनायकबुवा चौघांना पुढे घालुन झपट्याने धर्मगाराच्या बाहेर पडले माघारी मात्र शास्री पंडीतात जोरदार चर्चा सुरु झाली.या सर्वांपासुन अनभिज्ञ चौघे मात्र त्याच निष्पाप,निरागस मनाने झोपडीकडे परतले.त्यांच्या मनांत खदखदणार्‍या प्रश्नांना वाचा तरी फुटली होती.उद्भवणार्‍या वादळाचा निचरा तरी झाला होता.निर्णय कांहीही लागो,निदान आपल्यावर होत असलेला अन्याय चार चौघांसमोर मांडला गेला.मनाचा होणारा कोंडमारा,घुसमट या सर्वापासुन मुक्तता मिळाली याचेच समाधान त्यांना वाटले.

        रोजच्या दैनंदिन कामात दोन दिवस निघुन गेले.तिसर्‍या दिवशी चौघेही भावंडे धर्मसभेत गेल्यावर सोमणशास्री म्हणाले,तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला कोणत्याही धर्मग्रंथात न सांपडल्याने आणि ज्याला शास्राधार नाही असा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही तो अधिकार पैठणच्या धर्मपीठाला आहे.तिथल्या आचार्य बोपदेवांना तुमची सारी पार्श्वपिठीका विदित आहेच.तेच कांही तोडगा काढु शकतील,तेव्हा पैठणला जाणे उचित राहिल.निराश मनाने घरी परतले.

         सोपान म्हणाले,असच कांही तरी घडणार याची अटकळ होतीच.अरे ज्ञानदादा!तुम्ही साक्षात ज्ञानसूर्य असल्या वर आळंदीच्या ब्रम्हवृंदाकडुन अनुमती मागणे म्हणजे साक्षात सूर्याने उगवण्या साठी चंद्राची अनुमती मागण्यासारख आहे.

         दुसरे दिवशी सर्वांच्या आधी उठुन सोपान एकटेच निरव शांततेत अभ्यासा च्या नियोजित स्थानी नेहमीच्या दगडावर जाऊन बसले.आजपासुन त्यांची वेदांशी ओळख होणार होती.वेदांतील ओळींना, श्लोकांना “ऋचा” म्हणतात.ही ऋचा आज दादा शिकवणार,त्यापुर्वी उजळणी ला गायत्रीपठणाने सुरुवात केली.त्या उच्चारणातले स्वरांघात,आरोह,अवरोह, उदात्त,अनुदात्त,स्वरीत,स्वरसंकोच हे सारंं ते नेमकं आणि शुध्दतेने उच्चारत होते.नंतर त्यांनी गायत्रीपठणाला सुरुवात केली.

“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।

 मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय।। दृष्टवा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा।

आचार्य मुपसंगम्य राजा वचनमव्रवीत्।।

गीतेच्या शुध्द स्वरांनी अवघं वातावरण गीतामय झालं.

          सोपानाचं गीतेचं उच्चारण संपत आलं आणि निवृत्ती-ज्ञानदेव तिथं पोहचले.तोवर गीतेचा अठरावा अध्याय संपला होता.डोळे उघडले तेव्हा समोर निवृत्तीदादा व ज्ञानदादा दिसल्यावर त्यांच्या चरणावर मस्तक टेकवले.दादा मला सारं सारं लवकर शिकाययचय!निवृत्तीनाथ आसनस्थ झाले व अध्ययना ला सुरुवात झाली.वेद मुखोद्गत होणार अर्थ अन्वयांसह वेद म्हणजे ज्ञानाचं भांडार,आज त्याची कवाडं उघडली जाणार होती.

        निवृत्तीचं ऋचा उच्चारण आणि सोपानांचं अनुकरण यांतुन ध्वनीसंमेलन घडत होतं.अवघं चराचर,गगनमंडळ रोमांचित होत होतं.

        पैठणक्षेत्री जायची तयारी सुरु झाली.उद्या ब्रम्हमुहुर्तावर निघायचे ठरले. मुक्ताला आज सोपान अस्वस्थ,अशांत वाटत होतं.कांहीतरी विपरीत घडेल. संकट येईलसे वाटत होते आणि अचानक….

       वावटळीसारखा ज्ञानदादा तडक झोपडीत शिरुन झोपडीचं कवाड लावुन घेतलय.सोपान,मुक्ताला काय झाले समजेना.तेवढ्यात,अरे ज्ञानेशाsss  ज्ञानेश्वरा ऐक असे ओरडतच निवृत्ती आले आणि बंद दारावर थापा मारुन ज्ञानदेवांना हाकारुं लागले.सोपानही आर्ततेने हाका मारुं लागल्यावर ज्ञानेशांनं आतुनच उत्तर दिलं,मला आतां जगायचं नाहीय,जीविताचा शेवट करायचाय! सहनशक्तीचा अंत झालाय!आईबाबांनी प्रायश्चित घेतल्यावरही आपला छळ झाला,बहीष्कृत केलय,दगड मारले, तिरस्कार,अपमान,केला,माधुकरीत शेण गोळे वाढले,तरी सर्व विनातक्रार सहन केलं पण आज मात्र हद्द झाली.आज आपल्या आईच्या शीलावर,बाबांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले,हे मी सहन करुं शकत नाही.या जीवनाचा अंत करायचाय,बोलतां बोलतां ज्ञानेश्वरांना भरुन आलं.कोणाला कांहीच सुचेना.

              क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
          दि.  ५-५-२०२१.

 संत सोपानदेव चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading