आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

सार्थ हरिपाठ :- संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ, हरिपाठ पहा वाचा ऐका
Sant Dnyaneshwar Maharaj Sarth Haripath, Watch Haripath Read Listen
Sant Dnyaneshwar Maharaj Haripath
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १ ला
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणे ।
द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥४॥
देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्याने सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटते, परंतु द्वारी उभे असणे म्हणजे ‘सेवकाच्या नात्याने तत्पर असणे’ असा अर्थ घेतला पाहिजे. श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावे नाम । भेदाभेद काम सांडोनिया ॥ ) परमप्रितीने भगवन्नामोच्चार करणे हीच हरीची सेवा आहे असे सांगितले आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत ‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा’ असे द्विरुक्तीने सांगण्यात हरीचे नामस्मरण हेच देवाचे द्वार असे सुचविले आहे. ‘क्षणभर या पदाचा अर्थ ‘अति अल्पकाल’ असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चारणरूप सेवा केली असता चारी मुक्तीचा लाभ होतो, असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे.
देवाचे मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचे तादात्म्य सोडणे व अंतर्मुख वृत्तीने नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणे म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेच देवाचे द्वार सुचविले त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्यावाचून चित्तशुद्धि होणार नाही, व चित्तशुद्धि झाल्यावाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेंच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. ” क्षणभर ” ह्याचा लाक्षणिक अर्थ घेतला, तर अनंत जन्मजन्मांतरीच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणभर या समानच आहे. अशा दृष्टीने क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा. म्हणून जन्मभर हरिनामस्मरणाचा आश्रय करणारा जो साधक त्याला चारी मुक्तीचा लाभ होतो. ॥१॥
(हरिनामोच्चार करण्यात रत राहण्याविषयी ध्रुवपदांत मोठ्या अट्टाहासाने सकळ जनास बोध करीत आहेत) मुखाने ‘हरिनाम घ्या हरिनाम घ्या’ असे द्विवार सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असे सांगतात ॥२॥
देह-स्त्री-पुत्र-गृह रूपी संसारात राहूनही जिव्हेला हरिनामाचे प्रखर व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्रादिक हात उंचावून सांगत आहेत ॥३॥
श्रीमहाराज म्हणतात की, अशा प्रकारचे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी द्वारकाधीश श्रीकृष्णपरमात्मा कसा राबत होता हे श्रीमत् व्यासकृत महाभारतावरून दिसूने येईल. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २ रा
चहू वेदी जाण साहिशास्त्री कारण ।
अठराही पुराणे हरीसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम ।
वाया तू दुर्गमी न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
अर्थ:
चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणे ही हरीचेच वर्णन करीत आहेत. ॥१॥
ज्याप्रमाणे दही घुसळून त्यांतील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात, त्याप्रमाणे चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणे ह्यामध्ये सारभूत असणार्या हरीचे तू विचाराने ग्रहण कर, आणि त्यांतील ताकाप्रमाणे असणार्या वांझट कथांचा मार्ग टाकून दे ॥२॥
हरि जो एक आत्मा त्याची व्याप्ति मायोपाधिक शिवामध्ये व अविद्योपासक जीवामध्ये एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसर्या समजण्यास कठीण अशा साधनांमध्ये तू आपले मन घालूं नको. (भज गोविंदम् भज गोविंदम भज गोविंदम् मूढ मते ? ) ॥३॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरि म्हणजेच वैकुंठ. हरि हे त्या वैकुंठाचे नांव आहे. त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग ३ रा
त्रिगुण असार निर्गुण हे सार ।
सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण ।
हरिविणे मत व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
जेथुनी चराचर त्यासी भजे ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
त्रिगुणात्मक जगत् अशाश्वत व असार आहे. तीन गुणांचे पलिकडे असलेले निर्गुण निराकार परब्रह्म तेच शाश्वत व सार होय. ह्या सारासाराचे रहस्य निरंतर हरिचिंतनांत रत असणे हेच होय. ॥१॥
जे गुणसहित साकार आहे ते सगुण, जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण. म्हणजे सगुण तेच निर्गुण व निर्गुण तेच सगुण – फक्त गुण तेवढे अधिक वा उणे. कारण हरीची व्याप्ति दोहीतही समानत्वेकरून आहे. त्या दृष्टीने कोणत्याही सगुण वस्तुस निर्गुण असे निश्चयाने म्हणण्यास काही हरकत नाही. श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधि नसल्यामुळे त्याच्या स्वरुपाचे ज्ञान नेत्रादिक जड इंद्रियास होणे शक्य नाही, ह्यासाठी भगवत देहाची मीमांसा करीत न बसता, भगवत चिंतन करण्यातच गढून जा. त्यावाचून अन्य विषयात जर तू आपले मन गुंतविशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असे समज. ॥२॥
जे व्यक्त नसून अमूर्त आहे, ज्यास आकार नाही, व ज्याच्यापासून चर (चेतनयुक्त) व अचर (जड) अशा उभयभावात्मक जगताची उत्पत्ति झाली, त्या हरीचे तू भजन कर. ॥३॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानांत व मनात निरंतर रामकृष्ण आहे व त्यायोगाने या जन्मात अनंत पुण्याईची जोड आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग ४ था
भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।
बळेवीण शक्ति बोलू नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहे निवांत शिणसी वाया ॥२॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी ।
हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।
तुटेल धरणे प्रपंचाचे ॥४॥
जन्ममृत्युरूप संसारदुःखापासून एक हरीच सोडविणारा आहे, असा दृढ विश्वास असल्यावाचून हरीवर आत्यंतिक म्हणजे निःसीम प्रेम बसणार नाही, व अशा निःसीम भक्तीवाचून संसारांतून मुक्तता केव्हांही होणार नाही असा नियम आहे. ह्यास्तव हरीच्या ठिकाणी भाव असल्यावाचून भक्ति होईल व भक्तीवाचून मुक्ति मिळेल असे जे म्हणतात त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगांत काही एक बळ नसतांना मी अमूक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय, म्हणून तसे बोलू नये ॥१॥ देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर काहीएक व्यर्थ शीण न करता आपल्या चित्तास विषयवासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थीर कर आणि निजबोधाने शांत रहा ॥२॥ देह, पुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस, व हरीचे भजन मात्र मुळींच करीत नाहीस ते का बरे ? ॥३॥ हरीचे भजन कर म्हणजे तू या संसारसागरांतून तात्काळ तरून जाशील, असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग ५ वा
योग याग विधी येणे नोहे सिद्धि ।
वायाचि उपाधि दंभधर्म ॥१॥
भावेवीण देव न कळे निःसंदेह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेवीण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरुणोपाय ॥४॥
अष्टांगयोग व यज्ञ याचे यथाविधि आचरण केल्याने हरीची प्राप्ति होणार नाही. कारण ही सर्व हरि प्राप्तीविषयी बहिरंगे – दूरची साधने – आहेत. याचे अनुष्ठान करणारामध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याति व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेने तो योग, यज्ञ वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिकधर्म मात्र होतो. ॥१॥ भावावाचून साधकास देव केव्हांही निःसंशय कळावयाचा नाही, म्हणजे देववचन, गुरुवचन, याच्यावर दृढ विश्वास असल्यावाचून देवाचे निःसंशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेंच होतो; आजपर्यंत सर्वाना देवाचा अनुभव गुरूद्वाराच मिळालेला आहे, म्हणून त्यावाचून देवाचा अनुभव कसा कळेल ? ॥२॥ तपावाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्यावाचून काही मिळणार नाही, म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळतें. हित सांगणारांमध्ये जर गूढ आत्मज्ञान (गुज) नसेल, तर तो काय सांगेल ? कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वाचे हित आहे. गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणारांमध्ये जर प्रेम नसेल, तर तो काय जे सांगेल ते कोरडेच. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय, साधूची संगत करणे हाच होय असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग ६ वा
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ।
ठायीच मुराला अनुभवे ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योती ।
ठायीच समाप्ती झाली जैसी ॥२॥
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।
साधूचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।
हरि दिसे जनी आत्मतत्त्वी ॥४॥
साधनचतुष्टय अधिकार्यास श्रीगुरुरूपी साधूनी ‘तत्त्वमसि’ ह्या वाक्याचा बोध केल्यावर देहेंद्रियातीत मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो, पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप ब्रह्मामध्ये नाहीसा होतो, मग तो अधिकारी देहबुद्धीने, अथवा देहातीत जीवबुद्धीने, अथवा जीवातीत शिवबुद्धीनेही न उरून अवशेष ज्ञानाज्ञानातीत सहज निर्धर्म ब्रह्मस्थितीने असतो. ॥१॥ जसे कापूररूपी वात अग्नीच्या ज्योतीने पेटली म्हणजे कापूर व अग्नि ह्यापैकी काही एक शिल्लक रहात नाही. ॥२॥ त्याप्रमाणे साधूंच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची, विद्या अविद्येची निवृत्ति होऊन नित्य निर्धर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम ऐश्वर्यरूप मोक्षाने सुशोभित होतो. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला साधुसंतांच्या संगतीत असण्यात गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्त्वरूप हरि दिसत आहे ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग ७ वा
पर्वताप्रमाणे पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्तांसी ॥१॥
नाही ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त ।
हरीसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्या कैचा दयाळ पावे हरी ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वाघटी पूर्ण एक नांदे ॥४॥
ज्यांनी पर्वतासारखी मोठमोठी पातके केली असून जे हरिविषयींच्या आत्यंतिक प्रेमरूपी भक्तीविषयी विन्मुख आहेत म्हणजे जे अभक्त आहेत, त्यांचे ते पातक कोणत्याही अन्य उपायांनी नाहींसे होत नाही. ॥१॥ ज्याला हरीची प्रेमलक्षणा भक्ति नाही तो पतित अभक्त आहे. तो करंटा हरीचे भजन कसे करील ? ॥२॥ जे वायफळ बडबड करणारे, झोपेंत बरळळ्याप्रमाणे अमर्याद बडबड करतात, असल्यांना दीनदयाळ हरी कसा प्राप्त होईल ? ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व देहामध्ये एक परिपूर्ण असणारा आत्मा हाच कोणी ठेवा मला मान्य आहे, हाच माझे सर्वस्व आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग ८ वा
संतांचे संगती मनोमार्गगती ।
आकळावा श्रीपति येणे पंथे ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्त्वी नाम साधिती साधन ।
द्वैताचे बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली ।
योगिया साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
आपल्या मनोवृत्तीची धाव संताच्या संगतीकडे लाव, व या साधनाने तू लक्ष्मीपतीस वश करून घे, म्हणजे संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे ती गोष्ट मनावर धरून देहाने मनाने तसे वाग. हरीला वश करून घेण्याचे साधन हेच होय ॥१॥ वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप करणे हाच जीवाचा धर्म होय. म्हणून मायोपाधिक शिवाचा आत्मा जो राम त्याचे तू भजन कर; अथवा रामजप हाच शिवाचाही आत्मा आहे. अर्थात् जीवाने त्याचे भजन करणे अवश्यच आहे. ॥२॥ एकतत्त्व हरि, त्यास त्याच्या नामरूपी साधनाने जे कोणी प्राप्त करून घेतात, त्यास मी आणि तू इत्यादिक द्वैतबंधनाची बाधा होत नाही. ॥३॥ योग्यांना सतराव्या जीवनकलेच्या प्राप्तीमध्ये जे सुख व जी आवड आहे, तेच सुख व तीच आवड वैष्णवांना हरीचे नामामृत सेवनामध्ये आहे. ॥४॥ बाळपणीच प्रल्हादाचे जिव्हेवर हरीच्या नामाचा उच्चार ठसला व कृष्णासारखा उदार ज्ञानदाता उद्धवाला मिळाला. ॥५॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीचे नाम सर्व पारमार्थिक साधनात सोपे असून ते सर्व मनुष्यांना दुर्मिळ झाले आहे, कारण हरीचे नाम कोणी घेत नाही. त्याची सुलभता व योग्यता जाणून ते नाम सदोदित घेणारा असा पुरुष विरळा आहे. ॥६॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग ९ वा
विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।
रामकृष्णी मन नाही ज्याचे ॥१॥
उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
त्या कैचे कीर्तन घडे नामी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
विष्णूचे नामस्मरणावाचून इतर जप करणारा आणि रामकृष्णस्वरूपी ज्याचे मन नाही त्याचे ज्ञान व्यर्थ आहे. ॥१॥ जन्माला येऊन द्वैतभावरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग ज्यास माहीत नाही तो हतभागी होय. त्याची वस्ती रामकृष्णस्वरूपी कशी होईल ? म्हणजे रामकृष्णस्वरूपी ऐक्याला तो कसा पावेल ? ॥२॥ ज्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने अहं (मी) इदं (हे) वृत्तिरूपी द्वैताची उत्पत्ति झाली त्या द्वैताचा नाश ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेंच होणार आहे. ते ज्ञान देणारे गुरु आहेत. गुरूवाचून ते कधीही मिळणार नाही; व ज्या साधकाला ते मिळाले नाही, त्याला नामी जो परमात्मा, त्याचे अभेदभजन घडत नाही. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरीच्या सगुणसाकार स्वरूपाचेंच ध्यान आहे, आणि त्याच्याच नामाची मी सतत आवृत्ति करीत असून प्रापंचिक गोष्टी संबंधाने मौन घेतले आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १०
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरीविण धावया न पावे कोणी ॥२॥
पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
नामे तिन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥४॥
हरीच्या नामाकडे चित्त नाही आणि गंगा यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम जो प्रयाग त्या प्रयागास जातो, अथवा दुसर्या अनेक तीर्थयात्रा करतो, तर त्याचे ते करणे व्यर्थ होय. ॥१॥ जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे, म्हणजे ते नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय. त्याला पापातून सोडविण्यास हरीवाचून दुसरा कोण धाव घेणारा आहे ? ॥२॥ भगवंताच्या नामाने पातकांपासून त्रैलोक्याचा उद्धार होतो असे वाल्मीकीने रामायणात सांगितले आहे. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामाचे जो भजन करतो त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग ११
हरिउच्चारणी अनंत पापराशी ।
जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामे केले जपता हरी ॥२॥
हरिउच्चारण मंत्र पै अगाध ।
पळे भूतबाधा भय याचे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदा ॥४॥
हरिनामाचा जप केल्याने पापाच्या अनंत राशी एका क्षणात नाहीशा होतात. ॥१॥ गवताचा व अग्नीचा संबंध झाला की ते गवत अग्निरूप होते, त्या प्रमाणे हरीचा जप निरंतर करीत असले, म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. ॥२॥ हरीच्या नाममंत्राचे सामर्थ्य अपूर्व आहे. त्याचे धाकाने भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाच्चबाधा नाहीशी होते, इतकेंच नव्हे, तर जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते; म्हणजे हरिनामाने देहाभिमानाचा नाश होतो. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यथार्थ निर्णय उपनिषदाकडूनही झाला नाही ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १२
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी ।
वायाची उपाधी करिसी जना ॥१॥
भावबळे आकळे येरवी नाकळे ।
करतळी आंवळे तैसा हरी ॥२॥
पारियाचा रवा घेता भूमीवरी ।
यत्न परोपरी साधन तैसे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधले संपूर्ण माझे हाती ॥४॥
अहो जनहो, कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रतनियमाचे आचरण केले, तरी हरीवर दृढ विश्वास असल्यावाचून ती सफळ होणार नाहीत, याकरिता तुम्ही हा व्यर्थ शीण का करता ? ॥१॥ हरीच्या ठिकाणी विश्वास ठेवून त्याचे भजन केल्याने तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणे आपल्या हस्तगत होतो, अन्य उपायांनी तो हस्तगत होणार नाही. ॥२॥ पारा जमिनीवर पडून त्याच्या बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या म्हणजे ज्याप्रमाणे ते पार्याचे सर्व कण एके ठिकाणी जमवून हातात घेण्याला पुष्कळ प्रयास पडतात, त्याप्रमाणे हरिनामावाचून इतर साधनांनी भगवत्प्राप्ति होण्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की, माझे गुरु निवृत्तिनाथ हे गुणत्रयापलीकडील निर्गुण आहेत. त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्ये दिला, म्हणजे त्यांनी केलेल्या बोधाने माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १३
समाधि हरीची सम सुखेवीण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
एका केशवराजे सकळ सिद्धि ॥२॥
ऋद्धि सिद्धि निधि अवघीच उपाधी ।
जव त्या परमानंदी मन नाही ॥३॥
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।
हरीचे चिंतन सर्वकाळ ॥४॥
सृष्टीतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचाराने काढून शिवापासून तृणापर्यंत एकरूपाने वास्तव्य करणार्या हरीचे समबुद्धीने ग्रहण केले असता समाधि (आत्मस्थिति) प्राप्त होते. जर बुद्धींतील सजातियादि भेद गेले नसतील तर भेदात्मक बुद्धीस हरीची समाधि कधींही प्राप्त होणार नाही . ॥१॥ केशवास (आत्म्यास) यथार्थत्वेकरून जाणणे हेच बुद्धीचे ऐश्वर्य आहे, यावाचून दुसरे नाही. त्यानेच जगातील सर्व सिद्धींचा लाभ होतो. ॥२॥ ऋद्धि म्हणजे ऐश्वर्य, सिद्धि म्हणजे अणिमा गरिमा इत्यादि अष्ट प्रकारच्या सिद्धि, यांचा निधि म्हणजे ठेवा प्राप्त झाला, तरी जोपर्यंत परमानंदरूप हरीच्या ठिकाणी मन नाही, तोपर्यंत त्या पीडादायकच आहेत. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्राणिमात्राला रमविणारे असे समाधान माझे ठिकाणी सुस्थिर झाले असून हरीचे चिंतन सर्वकाळ चालले आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १४
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्णी वाचा अनंतराशी तप ।
पापाचे कळप पळती पुढे ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निज स्थान ॥४॥
खर्या अपरिमित हरीचा जप निरंतर करणाराकडे कळिकाळ दृष्टीने देखील पहात नाही. ॥१॥ वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप केल्याने तपाच्या अनंत राशी घडतात व त्या योगाने पापाचे समुदायचे समुदाय पुढे पळून जातात. ॥२॥ हरि, हरि, हरि हा शिवाचा नित्य जप करण्याचा मंत्र आहे. या मंत्राचे जे कोणी वाचेने ग्रहण करतील त्यास मोक्षाची प्राप्ति होईल. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी निरंतर नारायणनामाची आवृत्ति करतों, त्यायोगे देहत्रयातीत अति उत्तम आत्मस्वरूप स्थानाची मला प्राप्ति झाली आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १५
एक नाम हरि द्वैतनाम दूरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥१॥
समबुद्धि घेता समान श्रीहरी ।
शमदमा वैरी हरि झाला ॥२॥
सर्वाघटी राम देहादेही एक ।
सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥४॥
जो एका हरीचेच नाम जाणतो, दुसरे (द्वैताचे) नाम ज्यापासून दुरावले गेले आहे, म्हणजे दुसर्या नांवाची ज्याला ओळखच नाहीं, जो सकळ सृष्टि हरिरूप पाहून हरिनामच सकळ सृष्टपदार्थात ओळखतो, असा एखादाच असतो. ॥१॥ जीव ईश, जीव जड, ईश जड, जीव जीव, आणि जड जड असे बुद्धींतील पांच प्रकारचे भेद विचाराने नाहीसे करून समबुद्धीने भेदशून्य श्रीहरीचे जो ग्रहण करतो, तो शमदमाचा वैरी म्हणजे साधकाला शमदमाच्याही बंधनातून सोडविणारा जो हरि तद्रूप होतो. ‘शमदमावरी’ असा पाठ घेतला तर दुसरा अर्थ असा होतो :- शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे बाह्येंद्रियनिग्रह, ते करून वर सांगितलेल्या पाच प्रकारच्या भेदवैषम्याच्या बुद्धींतून निरास करून समबुद्धीने सर्व ठिकाणी समान हरीचे जो ग्रहण करतो तो स्वतः हरि होतो. ॥२॥ सर्व देहामध्ये एकच व्यापक राम आहे. पहा, हजार किरणांतून तेजोरूपी एक सूर्यच भरलेला असतो, म्हणजे त्या हजार किरणांचा प्रकाशक एक सूर्यच असतो. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आपले चित्तामध्ये सर्वकाळ हरीचेंच चिंतन करण्याचा नियम केला आहे. त्या योगाने मागील (या जन्माचे, मागाहून येणारे, पुढचे) जन्म यापासून मी सुटलो. आता मला पुन्हा जन्म नाही. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १६
हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥१॥
राम कृष्ण नामी उन्मनी साधली ।
तयासी लाधली सकळ सिद्धि ॥२॥
सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठी आले ।
प्रपंची निमाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा ।
तेणे दशदिशा आत्माराम ॥४॥
ज्याच्या बुद्धीमध्ये हरिचिंतनाचा जप चालू आहे आणि ज्याच्या वाणीमध्ये सुलभ रामकृष्णनामाचे वास्तव्य आहे असा मनुष्य फारच दुर्लभ असतो. ॥१॥ ज्यांनी रामकृष्णनामाच्याच भजनाने संकल्पविकल्पात्मक मनरहित अशा निर्विकल्प सहज परमात्मस्थितीचा लाभ करून घेतला, त्याला परिपूर्ण परब्रह्मसिद्धि प्राप्त झाली अथवा त्याला जगांतील सर्व सिद्धि प्राप्त झाल्या. भगवत्चिंतनाने बुद्धीला सिद्धि प्राप्त होते, म्हणजे बुद्धीचे मल दूर होऊन तिची उत्तम सिद्धि होते, देहतादात्म्याने पंचविषयाच्या भोगात गुंतलेल्या व त्रिविधतापाने तप्त झालेल्या प्रापंचिक जीवांची शांति साधूंच्या संगतीने होते ॥२-३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामचिंतनाने माझ्या हृदयात रामकृष्णस्वरूपाचा ठसाच उमटला आहे. त्यायोगाने दाही दिशांमध्ये आत्माराम भरलेला भासत आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १७
हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय ।
पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।
चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥
मातृ पितृ भ्रातृ सगोत्र अपार ।
चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधले ।
निवृत्तीने दिधले माझे हाती ॥४॥
हरीचा जप करून वाणीने हरीची कीर्ति जो गाईल त्याचा देह पवित्र होईल. ॥१॥ हरिनामसंकीर्तनाच्या सामर्थ्याने ज्याने अगणित तप केले तो अनंत कल्पपर्यंत वैकुंठांत वास्तव्य करतो. ॥२॥ व आईबाप, भाऊबंद तसेच त्यांचे अनेक गोत्रज ही सर्व मनुष्ये चतुर्भुज होऊन वैकुंठी राहतात; म्हणजे त्यांना सरूपतामुक्तीचा लाभ होतो. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अति गुप्त आत्मज्ञानाचा लाभ माझे गुरु निवृत्तिनाथ यानी माझे हाती दिल्यामुळे मी ज्ञानसंपन्न झालों. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन ।
हरिविण सौजन्य नेणे कोणी ॥१॥
त्या नरा लाधले वैकुंठ जोडले ।
सकळही घडले तीर्थाटण ॥२॥
मनोमार्गे गेला तो तेथे मुकला ।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥४॥
जो हरिवंशपुराण वाचतो, आणि यथार्थ हरिनामाचे कीर्तन करतो व हरिवाचून दुसरे कोणीही प्रिय जाणत नाही, त्या मनुष्याला वैकुंठाचा लाभ झाला आणि त्याला सर्व तीर्थयात्रा घडल्या असे समजावे. ॥१-२॥ मनोवृत्तीप्रमाणे वागणारा असल्या लाभाला आचवतो. हरिभजनामध्ये जो स्थिर झाला तोच धन्य होय. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनामाच्या लाभाचीच मला गोडी असून मला सतत रामकृष्णस्वरूपींच आवड आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग १९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठी ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी ॥३॥
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म ।
हरीविण नेम नाही दुजा ॥४॥
हरिनामाच्या कीर्तनाची वैष्णव जनांनी जोड केलेली असते, त्यायोगाने त्यांची अनंत कोटी पातके नाहींशी होतात. ॥१॥ अनंतजन्मी केलेल्या तपांचे फल एक हरीचे नामस्मरण आहे. सर्व साधनामध्ये हरीचे चिंतन हे सुलभ साधन होय. ॥२॥ अष्टांगयोग, यज्ञक्रिया, धर्म व अधर्मरूपी माया ही सर्व हरीच्या चिंतनाने लयाला जातात. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,आमच्या ठिकाणी यज्ञ याग, क्रिया, धर्म सर्व काही हरि आहे. त्यावाचून दुसरा काही नेमधर्म नाही. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २०
वेदशास्त्रपुराण श्रुतीचे वचन ।
एक नारायण सार जप ॥१॥
जप तप कर्म हरीविण धर्म ।
वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरीपाठी गेले ते निवांताचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ।
यमे कुळगोत्र वर्जियेले ॥४॥
सर्वाचे सार एक नारायण आहे, त्याचा तू जप कर याविषयी श्रुतिस्मृति व शास्त्र यांचे वचन प्रमाण आहे ॥१॥ इतर जपतपादि कर्मे करण्याचे श्रम हरिभजनावाचून व्यर्थ जाणारे आहेत. ॥२॥ ज्याप्रमाणे भ्रमर मकरंद सेवन करण्याचे भरात त्या कमलकलिकेंत सापडला जातो म्हणजे त्याला बाहेर निघून येण्याची शुद्धि रहात नाही, त्याप्रमाणे हरीचे नामस्मरणात रत झालेला साधक हरिस्वरूपी एकमय होतो व त्याचे फिरून प्रपंच परावर्तन होत नाही. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हाच माझा मंत्र आहे, आणि शास्त्रही पण तेच आहे, त्याच्या दरार्याने यमाने आमचा कुलगोत्राचा त्याग केला आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २१
काळ वेळ नाम उच्चारिता नाही ।
दोन्ही पक्ष पाही उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण ।
जडजीवा तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची ।
उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।
पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥
हरीचे नाम घेण्याला शुद्ध काळ वेळेची जरूर नाही. ते हवे तेव्हा घावे, त्या योगाने आपल्या आईचे कुळ व बापाचे कुळ या दोहोंचाही उद्धार होतो. दुसरा अर्थ :- नाम घेणारा व ऐकणारा या उभयतांचा उद्धार होतो. ॥१॥ रामकृष्णाचे नाम सर्व पापांचा नाश करणारे आहे. याप्रमाणे सर्व पापांचा नाश करून मूर्ख जीवांना तारणारा एक हरीच आहे. ॥२॥ हरीचे नाम हेच सार आहे. भजन करण्याकडे जिव्हेची ज्याने योजना केली आहे, त्याचे दैवास उपमा कोणी द्यावी ? ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मजकडून हरीचे चिंतन यथासांग झाले, आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २२
नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।
लक्षुमीवल्लभ तया जवळी ॥१॥
नारायण हरी नारायण हरी ।
भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म नर्कचि पै जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तिसी चाड ।
गगनाहूनि वाड नाम आहे ॥४॥
सतत हरीचे नाम घेण्याचा ज्यांचा नियम आहे असे प्राणी दुर्मिळ आहेत. त्यांच्याजवळ लक्ष्मीचा पति विष्णु असतो. ॥१॥ नेहमी नारायण हरि, नारायण हरि, अशा नामाचा जो जप करतो त्याच्या घरी सर्व ऐश्वर्य व सलोकतादि चारी मुक्ति असतात ॥२॥ जन्मास येऊन जर हरीची ओळख झाली नाही तर त्या जन्मास नरकच समजावे, आणि तो प्राणी यमाचे घरचा पाहुणा होतो म्हणजे यमलोकास जातो, आणि यमाकडून त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु जे निवृत्तिनाथ, त्यास हरीचे नाम केवढे आहे असा आपले एच्छेनुरूप प्रश्न केला असता, त्यावर गुरु निवृत्तिनाथांकडून आकाशापेक्षांही नाम मोठे आहे असे उत्तर मिळालें. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २३
सात पांच तीन दशकाचा मेळा ।
एक तत्त्वी कळा दावी हरी ॥१॥
तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ ।
तेथे काही कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणे उलट प्राणाचा ।
येथेही मनाचा निर्धार असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ ।
रामकृष्णी पंथ क्रमियेला ॥४॥
हा संसार कोणी सात तत्त्वामक आहे, कोणी पांच तत्त्वात्मक आहे, कोणी तीन तत्त्वात्मक आहे तर कोणी दहा तत्त्वात्मक आहे असे मानतात. दुसरा अर्थ : – सात अधिक पांच अधिक तीन अधिक दहा मिळून पंचवीस तत्त्वात्मक संसार मानतात. ही सर्व तत्त्वेही हरि आपल्या एका चैतन्य तत्त्वावर दाखवतो. ॥१॥ असा तत्त्वविचार करण्यापैकी हरीचे नाम नाही. ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. ते घेण्याला काही कष्ट पडत नाहीत. ॥२॥ रात्री व दिवसा मिळून एकवीस हजार सहाशें वेळा सोहं सोहं असा आपले हृदयात प्राणाच्या वरती जाण्यात आणि अपानाच्या खाली जाण्यात होणार्या उभयतांचे भेटीत सहज जप होत असतो, त्यास अजपाजप म्हणतात. संकल्प सोडल्यास (म्हणजे २१६०० श्वास जे होतात त्यांमधून सोहं असा होणारा जप मी करतो असे म्हणून उदक सोडल्यास) साधकाचे मनाचा निश्चय असे करण्याकडे असतो. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणावाचून जगणे मला व्यर्थ वाटते, म्हणून मी रामकृष्णाच्या भजनमार्गाचे क्रमण केले आहे, म्हणजे निरंतर हरीचे भजन करीत आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटी राम भाव शुद्ध ॥१॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात ।
भज का त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी ।
वैकुंठभुवनी घर केले ॥४॥
जपतपादि कर्मे व अनेक नियमधर्म ज्या भावनेने करतो त्या भावनेपेक्षा सर्व देहामध्ये एक आत्मारामालाच पाहणे ही भावना शुद्ध आहे. दुसरा अर्थ :- जप, तप, कर्म, क्रिया, नेम धर्म इत्यादि साधने सर्व भूतांचे ठिकाणी अभिन्नत्वेकरून परमात्मरूपाला पाहणे, या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजेत. ॥१॥ म्हणून अशा शुद्ध भावाचा त्याग करू नको. या भावामध्ये बिघाड आणणार्या सर्व संशयास फेकून दे, आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहो फोडीत रहा. दुसरा अर्थ :- अशा प्रकारचा शुद्ध भाव त्या साधनादिकेंकरून साध्य आहे, तरी त्या साधनानुष्ठानाचे भरात या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृद्धिंगत होण्याकरिता जीवाने रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे. ॥२॥ जातीच्या, पैशाच्या, गोताच्या, कुळस्वभावादि गोष्टीच्या भानगडीत पडू नको. शुद्ध भावनेने युक्त होऊन त्वरेने हरीला जप. दुसरा अर्थ :- या शुद्ध भावनेने त्वरित युक्त होऊन जातीला, पैशाला व कुळगोत्रजाना तू भज, म्हणजे जातीस, गोतास, कुळशीलास योग्य अशी कर्मे कर, व द्रव्यार्जन, संगोपनादि व्यवहार मोठ्या दक्षतेने कर म्हणजे अशा करण्याने प्रापंचिक बाधा होणार नाही. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची वस्ती आहे, त्यामुळे वैकुंठलोकी माझे घर झाले आहे. दुसरा अर्थ :- श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचे घर वैकुंठभुवनांत झाले आहे, म्हणजे वैकुंठरूप हरीचे ठिकाणी आमची वस्ती झाली आहे ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २५
जाणीव नेणीव भगवंती नाही ।
हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीवजंतूंसी केवी कळे ॥३॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥
भक्त ज्ञानी आहे किंवा अज्ञानी आहे हे भगवंत पहात नाहीत, तर त्यांच्या नामस्मरणाने दोघांनाही सारखीच मुक्ति मिळते. ॥१॥ नारायणहरि या नामाचा उच्चार करणाराकडे कळिकाळाचा प्रवेश होत नाही. ॥२॥ हरीच्या यथार्थस्वरूपाचा विचार वेदांनाही कळत नाही. मग ते स्वरूप सामान्य जीवांना कसे जळेल ? ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणाने सर्व मृत्युलोक वैकुंठ केल्याचे फळ मला मिळाले आहे ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २६
एक तत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधी ॥२॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिक पंथा जाशील झणी ॥३॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरी जपे सदा ॥४॥
हरीचे नाम हेच तत्त्व आपल्या मनामध्ये बळकट धरा, म्हणजे एकट्या हरिनामाचे मनाने सारखे चिंतन करीत रहा, त्या योगाने हरीला तुझी दया येईल. ॥१॥ राम कृष्ण गोविंद हे नाम सोपे आहे, म्हणून अगोदर ते प्रेमाने घे. ॥२॥ हरीच्या नामाखेरीज जीवाला संसारातून सोडविण्यास दुसरे साधन नाही. तू दुसर्या साधनांकडे जाशील तर फसशील. ॥३॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मौन घेऊन अंतःकरणामध्ये जपमाळ धरून निरंतर श्रीहरीचा जप करीत आहे. ॥४॥
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २७
सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी ।
रिकामा अर्धघडी राहू नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया येरझार हरीविण ॥२॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णी संकल्प धरूनी राहे ॥३॥
निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी ।
इंद्रियांसवडी लपूं नको ॥४॥
तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
साही शास्त्रांनी हरीच्या नामात सर्व सुखमाधुर्य आहे असे निवडून ठरविले आहे. (देह हा सादर पहावा निश्चित । सर्व सुख येथे नाम आहे) त्याचे नेहमी तू सेवन कर, अर्ध घटका देखील रिकामा राहू नको. ॥१॥ कारण देहादिक संसार व त्यातील व्यवहार सर्व खोटा आहे, म्हणून हरीला सोडून या संसाराच्या मोहात राहशील तर तुझी जन्म-मरणाची येरझार व्यर्थ होईल. ॥२॥ म्हणून हरिनाममंत्राचा तू निरंतर जप करीत जा, या योगाने तुझ्या अनंत पापांचा नाश होईल, याकरिता रामकृष्णनाम घेण्याविषयींचा निश्चय तू आपल्या मनाशी पक्का करून रहा. ॥३॥ गुरूजवळ श्रवण, मनन व निदिध्यासनाचा अभ्यास करून तिन्ही देहातून व तिन्ही गुणाहून वेगळा जो आत्मा तो मी आहे अशी वृत्ति उत्पन्न कर व त्या योगाने सर्व मायाजाळाचा नाश कर. इंद्रियांच्या तादात्म्यात लपून बसू नको. ॥४॥ तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू विश्वास ठेव व नेहमी दया बाळग; कारण जेथे शांति दया असतात तेथे देवाची वस्ती असते, म्हणून तू आपल्या हृदयात शांति दया ठेवून तेथे श्रीहरि वस्तीला येईल असे कर. ॥५॥ हरिपाठ हा समाधीसंजीवन आहे, म्हणजे त्यास जिवंत करणारा आहे, अर्थात् हरिनामाचे ठिकाणी स्थिर होणे, हेच आत्मस्वरूपाचे ठिकाणी जागृत असणे होय, कारण हरिनाम व नामी परमात्मा हा दोन्हीचा अभेद आहे.
परी आश्रय आकाशा । आकाशचि का जैसा ।
या नामा नामी आश्रय तैसा । अभेद असे ॥ ज्ञानेश्वरी १७.४०३
ज्याप्रमाणे आकाशाला आश्रय आकाशाचा आहे, त्याप्रमाणे नामाला आश्रय तो नामी परमात्मा असल्यामुळे त्या परस्परात अभेदच आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत असणे हेच खरे जिवंत असणे होय. असले जिवंतपण हरिनामाच्या ठिकाणी स्थिर असले म्हणजे मिळतें. असे ज्ञान मला श्रीनिवृत्तिनाथापासून मिळाले व मला अनुभवाने ते खरे आहे असे पूर्ण कळले, असे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
🕉 संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 🕉
अभंग २८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस ।
रचिले विश्वासे ज्ञानदेवे ॥१॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरी ।
होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥
असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन ।
उल्हासे करून स्मरण जीवी ॥३॥
अंतकाळी तैसा संकटाचे वेळी ।
हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥
संतसज्जनानी घेतली प्रचीती ।
आळशी मंदमती केवी तरे ॥५॥
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ ।
तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥
हरिपाठातील हा शेवटचा अठ्ठाविसावा अभंग फलश्रुती सांगणारा आहे. काही लोक हरिपाठाचे सत्तावीसच अभंग मानतात. पण ज्ञानेश्वरमहाराजांच्या हरिपाठाचे अभंग अठ्ठावीसच आहेत. ” अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस ” असे ज्ञानेश्वरमहाराजांनी स्वतः या अभंगात सांगितले आहे. त्यामुळे अठ्ठाविसावा अभंग कोणता हा प्रश्नच उपस्थित होत नाही. परमात्मा अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे. ही युगे कधी सत्तावीस अथवा एकोणतीस होणार नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. या संदर्भात जुने व्यावलि विटंकी उभा ही नामदेवमहाराजांची विठोबाची आरती, तसेच ‘युगे झाली अठ्ठावीस । अजूनी का न म्हणली बैस॥’ हा तुकाराममहाराजांनी पुंडलिकाला केलेला खडा सवाल लक्षात घेण्याजोगा आहे. बाह्यातः पाहिल्यास सूर्याच्या बारा कळा व चंद्राच्या पंधरा कळा आहेत. या सत्तावीस कळांवर व्यवहार चालतो, परमार्थ नाही. परमार्थात चंद्राची सोळावी कळा आहे. सोळा आणि बारा मिळून अठ्ठावीस. म्हणून परमात्मा अठ्ठावीस युगेच उभा आहे व हरिपाठाचे अभंग हेही अठ्ठावीसच आहेत.
चंद्राची सोळावी कला भगवान शंकरांनी आपल्या मस्तकी धारण केली आहे. ही सोळावी कला जर चंद्राच्या पंधरा कळांत मिसळली तर सारे विश्व ब्रह्मरूप होऊन तेथे व्यवहारच राहणार नाही. शंभर नंबरी सोने जर पाहिले तर माणूस वेडा होतो. असे सोने बाजारात येतच नाही. जरा कमी कस असला म्हणजेच व्यवहार होतो. ‘बारा सोळा जणी हरीसी नेणती’ अशी अवस्था असल्याने, त्या रात्रंदिवस फिरत आहेत आणि या जीवनाच्या गतीच्या परिश्रमणामुळे जीवाचे बाहेर भ्रमण चालू आहे. या बारा-सोळाचे जर ऐक्य झाले तर अनाहत नाद होतो आणि त्या नादानुसंधानात आत्मसाक्षात्कार होतो असा महीपतींचा अनुभव आहे.
बारा सोळा जणी गडे गं बारा सोळा जणी,
मिळोनी येती गलका करिती मशी गेल्या घेऊनी ”
या पदांत महीपती ज्याला ” गलगा ” म्हणतात तो चैतन्याचा ध्वनी आहे आणि तो अठ्ठावीस कलांतून प्रगट झाला आहे. या बारा-सोळाचे ऐक्यातून श्रीहरीची अनुभूती आहे, हे स्पष्ट करणारा हा हरिपाठ असल्याने, याचे अभंग अठ्ठावीसच आहेत याबद्दल कोणताही संदेह रहाणार नाही. ज्ञानदेवांनी हरिपाठाचे हे अभंग ‘ज्ञानादेव तु कैवल्यम्’ अशा विश्वासाने रचले आहेत. ‘विश्वासाने’ रचले म्हणजे कुणी रचले, हे तुकाराम महाराजांच्या पुढील अभंगावरून लक्षात येते : –
” विश्वास तो देव । म्हणूनी धरियेला भाव ॥
माझी वदवितो वाणी । जेणे धरिली धरणी ॥
जोडिली अक्षरे । नव्हती बुद्धीची उत्तरे ॥
तुका म्हणे झरा । आहे मुळीचाच खरा ॥
” अहो, विश्वास हाच देव आहे; त्याने जसे स्फुरवले – वदवले – तसे ते उतरले गेले आहे. ते काही ‘र’ ला ‘ट’ आणि ‘ट’ ला ‘र’ असे जोडून केलेले बुद्धिचातुर्य नाही. तर ही अजोड अक्षराची जोड आहे. ‘अ’ म्हणजे नाही ‘ क्षर’ म्हणजे नाश; म्हणून ज्याला नाश नाही अशा अक्षराची ही जोड आहे.
पुढील कडव्यात ज्ञानेश्वरमहाराज सांगतात,
” नित्यपाठ करी इंद्रायणी तीरी ।
होय अधिकारी सर्वथा तो “
नित्य अशा हरिपाठाचा नित्य पाठ केला असता, तो सर्वथा अधिकारी होतो. परमार्थ करण्याचा अधिकार सर्वाना आहे, कोणाला आहे कोणाला नाही असा प्रकार येथे नाही.
‘ ‘सकळांसी येथे आहे अधिकार “
ही तुकोक्ती सर्वाना अधिकार देत आहे. नाम घ्यायचा अधिकार दिला, पण नाम घ्यायचे कोणी ? आम्ही घेतो का ?
” जो रसनेंद्रिया अंकिला । का निद्रेसी जीवे विकला ।
तो नाही येथ म्हणितला । अधिकारिया ॥ “
असे ज्ञानेश्वरी सांगते. जेवणे आणि झोपणे यांशिवाय आम्ही काही करीतच नाही. मग कुठला अधिकार आणि कुठले काय ? नित्य हरिपाठाचे नित्य पठणाने योग्य तो अधिकार प्राप्त होतो.
हे पठण कसे व्हावयास हवे हे ज्ञानेश्वरमहाराज पुढील कडव्यात सांगतात,
” असावे स्वस्थचित्त एकाग्र मन । उल्हासे करुन स्मरण जीवी ॥ “
स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन आल्हादाने अगदी जीवापासून स्मरणपूर्वक हरिपाठाचे पठण व्हायला पाहिजे. तर तो जीव परमार्थाचा अधिकारी होतो.
पुढील कडव्यात ज्ञानेश्वरमहाराज सांगतात, ” अंतकाळी तैसा संकटाचे वेळी । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥ ” हरिपाठ करणाऱ्या माणसाचे अंतर्बाह्य रक्षण अंतकाळी तसेच संकटाचे वेळी हरी करतो. अंतकाळी आपणाला कोण सोडवितो ? सगळे जण बाजूने हातपाय मारतात; पण धारेला कोणी पडत नाही. एका परमात्म्याशिवाय अन्य कोणीही आपल्याला सोडवत नाही. ‘ तुका म्हणे तुज सोडविना कोणी । एक चक्रपाणी वाचोनिया ॥ ” ही तुकोक्ती हीच गोष्ट स्पष्ट करते. अंतकाळी व संकटाचे वेळी हरी रक्षण करतो याची प्रचीती नित्य हरिपाठाचे नित्यश्रवण करणार्यांनी घेतली आहे. जे साधनांचा आळस करणारे आहेत, त्यांना ही प्रचीती कशी येणार, हा प्रश्न आहे. हीच गोष्ट ज्ञानेश्वरमहाराज पुढील कडव्यात सांगत आहेत : – ” संतसज्जनांनी घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवी तरे ॥ “
आता हरिपाठाच्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या कडव्यात ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, । श्रीगुरुनिवृत्ति वचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ” हरिपाठ रचल्यावर ज्ञानेश्वरमहाराजांनी तो आपले सद्गुरु निवृत्तिनाथमहाराज यांना दाखविला. तेव्हा निवृत्तिनाथांना फार आनंद झाला. त्यांनी धन्योदगार काढले आणि प्रत्यक्ष सद्गुरूंनी कौतुक केल्यामुळे ज्ञानेश्वरमहाराजांना अत्यंत संतोष झाला.
॥ इति श्रीज्ञानदेव हरिपाठ समाप्त ॥













